स्वराज्यसूर्य शिवराय - 9 Nagesh S Shewalkar द्वारा फिक्शन कथा मराठी में पीडीएफ

Featured Books
श्रेणी
शेयर करा

स्वराज्यसूर्य शिवराय - 9

स्वराज्यसूर्य शिवराय

【भाग नववा】

मुलाचे बंड पित्याला दंड

बंड! होय बंड! शिवरायांनी जे स्वराज्य स्थापनेचे प्रयत्न सुरू केले होते, हक्काची लढाई सुरू केली होती ती आदिलशाहीच्या दृष्टीने एक प्रकारचे बंडच होते. सुरुवातीला आदिलशाही दरबारी ज्या तक्रारी जात होत्या तिकडे दरबाराने 'उनाड पोरासोरांचे उद्योग' म्हणून कानाडोळा केला. परंतु शिवरायांची घोडदौड थांबत नव्हती ते एकामागून एका किल्ल्यावर भगवे निशाण फडकवत होते. आदिलशाहीकडे रोज नवनव्या तक्रारी येत होत्या. आदिलशाहा गंभीर झाला. ह्या पोराचे बंड मोडून काढण्यासाठी काय करावे या विचारात तो असताना त्याने शहाजीराजांना जाब विचारला. राजेही विचारात पडले, काय उत्तर द्यावे. शेवटी शहाजी राजेंनी उत्तर पाठवले,

"हुजूर, शिवाजी जे करतोय ते जहागीरीच्या भल्यासाठी, रक्षणासाठी. जहागीरीत एकही किल्ला नाही म्हणून शिवबाने तसे केले असणार. शिवबाच्या डोळ्यासमोर आदिलशाहीचे हित असणार आहे."आदिलशाहचे या उत्तराने समाधान झाले नाही. शिवाजीवर कार्यवाही करावी हा विचार बादशहाच्या मनात रूंजी घालत असताना एक भीती त्याला कायम सतावत होती. त्याला वाटत होते की, आपण शिवाजीवर सैन्य पाठवले तर शहाजी राजे नाराज होतील. ते आपल्याला परवडणारे नाही. शहाजींच्या हाताखाली भरपूर सैन्य आहे. शिवाय दक्षिण भागातील अनेक मराठा सरदार शहाजींचा शब्द मानणारे आहेत. अशा परिस्थितीत आपण शिवाजीच्या विरोधात काही केले आणि हे सारे सरदार शहाजींच्या नेतृत्वाखाली एकवटले तर आपली काही खैर नाही. नको. त्यापेक्षा काही काळ संयम बाळगावा. परंतु आदिलशाहाच्या पदरी बाजी घोरपडे हा निष्ठावान सरदार होता. तो शहाजी राजे यांचा कट्टर विरोधक होता. शहाजी राजेंवर कुरघोडी करायची आलेली संधी साधून तो म्हणाला,

"एक काम करता येईल. सध्या शहाजी जिंजीच्या मोहिमेवर आहे. जिंजीचा राजा वेंकट नाईक यांच्यासोबत युद्ध सुरू आहे. ही फार मोठी संधी आहे. रात्रीच्या वेळी शहाजी झोपेत असताना त्याला कैद करून तुरुंगात टाकणे अवघड नाही. एकदा का शहाजी साखळदंडांनी आवळला गेला की, इतर सरदारही गडबड करणार नाहीत आणि महत्त्वाचे म्हणजे तो शिवाजी नावाचा पोरगा बापाच्या सुटकेसाठी नाक घासत शरण येईल."

आदिलशाहालाही घोरपडे यांनी सांगितलेला मार्ग पटला. त्याने लगोलग वजीर मुस्तफाखान यास फार मोठी फौज आणि सोबत बाजी घोरपडे, अंबरखान, बहलोलखान इत्यादी सरदार सोबत दिले. मुस्तफाखान एवढ्या तातडीने, अचानकपणे आणि काहीही समजू न देता आल्याचे पाहून शहाजींना आश्चर्य वाटले. नक्कीच काहीतरी काळेबेरे आहे, आपल्या विरोधात काहीतरी शिजतेय अशी शंका राजांना आली. प्रत्यक्षात मुस्तफाखान शहाजीराजांना म्हणाला,

"राजे, तुम्ही वेंकट नाईकांच्या विरोधात जोरदार लढत आहात. बादशहा आपल्या कामगिरीवर खुश आहेत परंतु हा किल्ला लवकरात लवकर जिंकून तुम्हाला कर्नाटक प्रांतात जायचे आहे. त्यामुळे बादशहाने आम्हाला तुमच्या मदतीसाठी पाठवले आहे. "

मुस्तफाखानाच्या गोड बोलण्यावर शहाजीराजांचा विश्वास बसला आणि इथेच महाराज फसले.एका मध्यरात्री शहाजी राजे त्यांच्या तंबूत झोपले असताना, नेहमीप्रमाणे तंबूभोवती पहारेकरी गस्त घालत असताना त्या छावणीपासून काही अंतरावर असलेल्या मुस्तफाखानाच्या छावणीतून अचानक मशाली घेतलेले आणि हातात धारदार तलवारी घेतलेले फार मोठे सैनिक धावून आले. गस्तकारांना यमसदनी धाडून ते सारे शहाजींच्या तंबूत घुसले. झालेल्या कोलाहलाने सर्व जागे होत होते. स्वतः राजे जागे झाले. त्यांनी तलवार उपसली आणि ते गनिमाच्या रुपाने आलेल्या सैनिकांवर तुटून पडले. घनघोर झटापट झाली. बेसावध असतानाही शहाजी राजे आणि त्यांच्या वीरांनी शत्रूच्या तोंडाला फेस आणला, शत्रूला रक्तबंबाळ केले परंतु दुर्दैव आड आले. शहाजीराजांना चक्कर आली. राजे खाली कोसळले. शत्रूने डाव साधला. बेशुध्द असलेल्या शहाजींना उचलून खानाच्या छावणीत नेऊन त्यांना बेड्या ठोकण्यात आल्या. अशारीतीने सह्याद्रीच्या सिंहाला धोका देऊन जेरबंद करण्यात आले .…

ही बातमी राजगडावर पोहोचली. शिवराय चिंताक्रांत झाले. माँसाहेब प्रचंड दुःखी झाल्या. पाठोपाठ अजून एक वाईट समाचार आला. बंगरूळ येथील किल्ल्यावर शिवरायांचे मोठे भाऊ संभाजी राजे त्यांच्या कुटुंबासह राहात होते. मुस्तफाखानाच्या सैन्याने त्या गडाला वेढा घालण्यासाठी विठ्ठल गोपाळ, तानाजी डुरे या मराठा सरदारांच्या सोबत फर्रादखानाला पाठवले होते. ती वार्ता ऐकून शिवरायांनी आपल्या मोजक्या आणि अत्यंत विश्वासू अशा शिलेदारांना एकत्र बोलावले. माँसाहेबही तिथे उपस्थित होत्या. महाराजांनी स्वराज्यावर आलेल्या संकटाची कल्पना दिली. ते ऐकून सारेच मोठ्या काळजीत पडले. काय बोलावे हे कुणालाच सुचत नव्हते. शिवराय म्हणाले,

"प्रसंग आणीबाणीचा आहे. तिकडे महाराज शत्रूच्या तावडीत आहेत. संभाजीराजे आणि इतर लोक शत्रूच्या हाती लागण्याची शक्यता नाकारता येत नाही. दुसरीकडे हे स्वराज्य आता कुठे बाळसे धरते आहे. शिवाय हे स्वराज्य व्हावे ही श्रींची इच्छा आहे...."

"पण मग आपण काय करायला हवे?" जिजाऊंनी विचारले.

"माँसाहेब, सध्यातरी आम्हाला दोन मार्ग दिसत आहेत. एक म्हणजे स्वराज्यावर पाणी सोडून शत्रूला शरण जाणे. ही नामुष्की, हा अपमान टाळायचा असेल आणि स्वराज्याचा बळी द्यायचा नसेल तर..." बोलताना शिवराय थांबले तसे अनेकांनी विचारले,

"तर काय? सांगा, राजे सांगा."

"दुसरा मार्ग म्हणजे मुघलासारख्या बळकट, ताकदवर शत्रूची मदत घेऊन आदिलशाहीवर दडपण आणून एकाचवेळी पिताजी, संभाजी राजे आणि राज्यावरील संकटातून सुटका करून घेणे....." शिवराय सांगत होते. ते ऐकताना शिवरायांचे धाडस, बुद्धीमत्ता आणि निर्णय क्षमता पाहून इतरांप्रमाणे जिजाऊही आश्चर्यात पडल्या. शिवराय पुढे म्हणाले,

"मुघल बादशहा आपल्याला तेव्हाच मदत करेल, आपण पुढे केलेल्या हातावर तेव्हाच टाळी देईल ज्यावेळी अशा चौफेर संकटातही आपण न डगमगता, संयमाने काम करून पुरंदरचा किल्ला आपल्या ताब्यात घेतला आणि मुस्तफाखानाच्या सैन्याला टक्कर दिली, त्याचा पराभव केला तरच मुघल राजवट आपली ताकद मानून आपल्याला सहकार्य करेल."

शिवरायांच्या योजनेला सर्वांनी पाठिंबा दिला. शिवराय पुढील तयारीला लागले. स्वराज्याच्या दिशेने येणाऱ्या फत्तेखानाचा सामना करावयाचा असेल तर पुरंदरचा दणकट किल्ला जिंकला पाहिजेत. पण कसा? तिथे तर आदिलशाही सैन्य असणार. ही वेळ लढाई करत बसण्याची नाही. त्यांना आठवण आली ती पुरंदरचे किल्लेदार महादजी नाईक यांची! महादजी आणि शहाजी राजे यांचे संबंध चांगले होते शिवाय शिवराय करीत असलेल्या कामगिरीचे त्यांना कौतुक वाटत होते. शिवरायांनी या गोष्टीचा फायदा घेण्याचे ठरविले. शिवराय शेतकऱ्याच्या वेशात गडावर जाऊन महादजींना भेटले. सारी परिस्थिती समजावून सांगितली. सोबतच पुरंदरच्या किल्ल्यावर राहून फत्तेखानचा पराभव करणे कसे सोपे आहे हेही त्यांच्या लक्षात आणून दिले. ते ऐकून महादजी सरनाईक स्वराज्य रक्षणासाठी आणि आपल्या मित्राच्या सुटकेसाठी पुरंदर किल्ला शिवरायांच्या ताब्यात द्यायला तयार झाले.…

शिवरायांनी आपल्या फौजेसह मुक्काम पुरंदर किल्ल्यावर हलवला. किल्ल्याची बारकाईने पाहणी केली. फत्तेखान हा प्रचंड फौज घेऊन येतो आहे त्यामुळे त्यामानाने आपल्या अल्प सैन्यासह मुकाबला कसा करायचा, कोणती युक्ती, कोणते शस्त्र कधी वापरायचे ह्याची सारी जुळवणी, आराखडा शिवरायांनी तयार ठेवला होता. तिकडे जिंजीच्या मैदानावर शहाजी राजे यांना धोक्याने पकडल्यानंतर आदिलशाहाच्या हुकुमानुसार अफजलखानाने शहाजीराजांना लोखंडी बेड्या घातलेल्या अवस्थेत हत्तीवर बसवून विजापूर येथे नेले. त्याच अवस्थेत राजेंना विजापूरच्या मुख्य रस्त्यावरून मुद्दाम फिरवत तुरुंगात नेले. ही बातमी ऐकून आदिलशाहा खूप खुश झाला. तो मनाशीच म्हणाला,'शहाजी तर जेरबंद झाला आहे. त्याचा पोरगा संभाजी हाही लवकरच आपल्या ताब्यात येईल त्यामुळे घाबरलेला बच्चा शिवाजीही हात बांधलेल्या अवस्थेत आपल्याला शरण येईल. तो दिवस दूर नाही.'

फत्तेखान बेलसरजवळ छावणी टाकून होता. जवळच पुरंदर किल्ला होता. त्याला वाटले, शिवाजी सध्या पुरंदरवर लपून बसला आहे. आपल्या भल्यामोठ्या फौजेचा त्याची चिमूटभर फौज कसा काय सामना करणार? दुसरीकडे शिवरायांनी ठरविले की, फत्तेखान बेसावध असताना त्याच्या छावणीवर हल्ला करून आपल्या डावपेचांची आणि शक्तीची चुणूक त्याला दाखवू या. त्याप्रमाणे शिवरायांनी जवळपास दीडहजार सैनिक बेलसरकडे पाठवले. या सैनिकांनी फत्तेखानाच्या छावणीवर सर्वच बाजूंनी एकदम हल्ला चढवला. बेसावध शत्रू गांगरला, काही प्रमाणात घाबरलाही. फत्तेखानाचे सैन्य सावध होऊन आपल्याला तलवारी शोधेपर्यंत शेकडोंच्या संख्येने शत्रूला यमसदनी पाठवून शिवरायांचे शूरवीर मावळे आले तसे पुन्हा पुरंदरच्या किल्ल्यावर परतले. अशा तडफदार, घणाघाती हल्ल्याने सैनिक सोडा परंतु स्वतः फत्तेखान घाबरला परंतु तसे न दाखवता त्याने सैन्यामध्ये जोश, आत्मविश्वास निर्माण करण्याचा प्रयत्न केला. त्या हल्ल्याचा बदला घेण्यासाठी, शिवरायांना शरण आणण्यासाठी फत्तेखानाने मुसेखान या सरदारासोबत शिवरायांचे मेहुणे बजाजी निंबाळकर, घाटगे या सरदारांच्यासह फार मोठे सैन्य दिले. सर्वांनी मिळून पुरंदरच्या मार्गाने कुच केले. ह्याच गोष्टीची गडावरील मावळे वाट पाहात होते. त्यांना मिळालेली जबाबदारी पार पाडण्यासाठी ते सारे सज्ज झाले. गनीम पुरंदरचा अवघड रस्ता चढत असताना घामाघूम झाला. शिवरायांच्या युद्धनीतीचे अनेक कंगोरे आहेत. ते कुठे, कसे वापरायचे यामध्ये मावळे पटाईत होते. गनिमी कावा हे शिवरायांचे एक प्रमुख आणि इतर कोणत्याही शस्त्रास्त्रांपेक्षा लाखपटीने उपयुक्त असे अस्त्र होते. ज्याचा प्रसाद चाखलेली फत्तेखानाची फौज चिडून पुरंदरवर चाल करून येत होती. शिवरायांनी याचक्षणी उपयोगी पडावे म्हणून पुरंदरावर विखुरलेल्या अवस्थेत पडलेले लहानमोठे दगड गोटे व्यवस्थित जमवून ठेवले होते. त्या 'युद्ध सामुग्रीचा' उपयोग करण्याची वेळ आली. गडावर चाल करून येणारा शत्रू टप्प्यात येताच 'हर हर महादेव' या जयघोषात मावळ्यांनी जमा केलेल्या दगडांना शत्रूच्या दिशेने ढकलायला, फेकायला सुरुवात केली.अचानक प्रचंड मोठे दगड शरीरावर आदळू लागले, गोफणीतून सुटलेले गोटे कपाळाचा वेध घेऊ लागले. समोर शत्रू नसतानाही, न लढताही फत्तेखानाचे सैनिक धराशायी होऊ लागले, रक्तबंबाळ होऊ लागले. शत्रू घाबरला. तो माघारी फिरत असताना गडावरील मुख्य दरवाजा उघडून असंख्य मावळ्यांनी घाबरलेल्या शत्रूवर जोरदार हल्ला चढवला. गनिमाला पळता भुई थोडी झाली. त्यांना वाटही सापडत नव्हती. मुसेखान हा गनीम गोदाजी जगताप ह्यांच्या भालाफेकीचा बळी ठरला तर पुरंदर जिंकण्यासाठी आलेले, शिवरायांना कैद करून बादशहाच्या समोर उभे करू अशी स्वप्न पाहणारा फत्तेखान, बजाजी नाईक हे वाट मिळेल तिकडे पळत सुटले मात्र मावळे त्यांची पाठ सोडत नव्हते. शिवरायांच्या पदरी फार मोठे यश पडले परंतु दुर्दैवाने बाजी पासलकर यांना मात्र मृत्यूला सामोरे जावे लागले. बाजींच्या जाण्याने शिवरायांना फार मोठे दुःख झाले.

संभाजी राजेंची कैद, शिवरायांचा पराभव या बातम्यांची आतुरतेने वाट पाहणाऱ्या आदिलशाहापर्यंत पोहोचल्या त्या पराभवाच्या बातम्या. संभाजी राजेंनी फर्रादखानाचा केलेला पराभव असेल, पुरंदरच्या पायथ्याशी फत्तेखानावर शिवरायांनी मिळवलेली 'फतेह' असेल आदिलशाही पुरती हादरली होती. त्याच्यासाठी एकच समाधानाची बाब होती ती म्हणजे शहाजी राजे त्याच्या कैदेत होते. त्यामुळे आपण शिवाजीला केव्हाही शरण आणू शकतो ही एक आशा तो बाळगून होता. दुसरीकडे पुरंदरचा विजय मिळताच शिवरायांनी पाठोपाठ दुसरा डाव टाकला. त्यांनी मोगल बादशहा शहाजहान यास एक पत्र लिहिले. त्यात सारी परिस्थिती वर्णन केली आणि शहाजहानला विनंती केली की, 'तुम्ही मध्यस्थी करून शहाजीराजेंची सुटका केली तर आम्ही दोघेही तुमची चाकरी करु.' वर उल्लेख केल्याप्रमाणे शिवरायांची युद्धनीती, कौशल्य काही वेगळेच होते. शाहजहान यास पत्र पाठविल्यानंतर इतर कुणी असता तर बादशहाच्या उत्तराची वाट बघत बसला असता परंतु शिवराय शांत बसले नाहीत त्यांनी एक अफवा पसरवून दिली की, शिवाजीने वडिलांच्या सुटकेसाठी शहाजहानची मदत मागितली असून बादशहाने मदत द्यायला होकार दिला आहे. ही अफवा आदिलशाहीच्या कानावर जाईल ही व्यवस्थाही शिवरायांनी अत्यंत चोखपणे बजावली. ती वार्ता आदिलशाहाच्या कानावर गेली. शहाजहान आणि शिवाजी एकत्र आले तर आपला निभाव लागणे कठीण आहे हे त्याने ओळखले. त्यापेक्षा शहाजींची सुटका मी स्वतःच करतोय हे दाखवून द्यावे व त्याबदल्यात शिवाजीकडून एखादा-दुसरा किल्ला घ्यावा या हेतूने त्याने शहाजीराजांना सन्मानाने बोलावून घेतले आणि म्हणाला,

"शहाजी राजे, काही गोष्टी गैरसमजातून, अनवधानाने घडलेल्या आहेत. वाईट वाटून घेऊ नका. तुमच्यावरील प्रेम, विश्वास पूर्वीप्रमाणेच कायम आहे. आम्ही तुम्हाला मुक्त करतोय त्याबदल्यात शिवाजीच्या ताब्यात असलेला कोंढाणा किल्ला आणि संभाजीने ताब्यात ठेवलेले बंगरूळ शहर आम्हाला द्यावे."शहाजींनी काहीही न बोलता होकारार्थी मान हलवली.आदिलशाहाने मोठ्या सन्मानाने शहाजीराजांची बोळवण केली. हा विजय होता, शिवरायांच्या बुद्धीचातुर्याचा, दूरदृष्टीचा, धाडसाचा, गनिमीकाव्याने लढण्याचा, अचूक निर्णय घेण्याचा. राजगडावर आनंदी, समाधानी वातावरण पसरले. मावळ्यांनी हत्तीवरून साखर वाटून आनंद साजरा केला...

शिवरायांनी एक गोष्ट हेरली की, स्वराज्य स्थापन करण्यासाठी आपलीच काही स्वकीय मंडळी आड येते आहे. जोपर्यंत ही मंडळी स्वराज्य स्थापन करण्यासाठी मदत करणार नाही, नेहमीप्रमाणे परकियांच्या सेवेत राहून आपल्या कार्यात अडथळे आणतील तोपर्यंत स्वराज्य स्थापन होणे कठीण आहे. शिवरायांच्या कामगिरीला विरोध करणारांपैकी निंबाळकर, मोरे, घोरपडे ही सरदार मंडळी प्रमुख होती. यापैकी निंबाळकर हे शिवरायांचे मेहुणे! सईबाईंचे सख्खे भाऊ! परंतु तेही शिवराय आणि स्वराज्य यांच्या विरोधात होते. घोरपडे घराण्यातील खंडोजी आणि बाजी ह्या दोन सरदारांनी आदिलशाहाच्या हुकुमानुसार कोंढाणा परिसरात खूप धुमाकूळ घातला होता. शेवटी शिवरायांना त्यांची दखल घेऊन त्यांच्यावर चालून जावे लागले. शिवरायांसमोर घोरपडेंचे काही चालले नाही. त्यांच्या पदरी पराभव पडला.

घोरपडे यांच्यानंतर शिवरायांनी मोर्चा वळवला तो फलटणच्या दिशेने! सख्ख्या मेहुण्याच्या जहागीरीच्या दिशेने शिवराय निघाले. बजाजी नाईक फलटणकर यांचा पराभव करून त्यांना कैद करून राजेंनी स्वराज्याच्या दुश्मनांना जणू एक प्रकारे इशारा दिला, 'आम्ही स्वराज्य निर्मितीचे पवित्र कार्य हाती घेतले आहे. आम्हाला या कामी मदत करा. नाहीतर परिणामाला तयार रहा.'

सुपे परगण्यातील शिवरायांचे जवळचे नातेवाईक म्हणजे संभाजी मोहिते. परंतु तेही विरोधात जाऊन कार्य करीत होते. अखेर शिवरायांनी सुपे गाठले. मोहितेंना पकडून त्यांना थेट कर्नाटक प्रांतात पाठवले. 'स्वराज्याच्या आड जो आला तो तडीपार झाला.' असे तत्त्व शिवरायांनी अनुसरले होते. आपल्याच जवळच्या लोकांचा शिवरायांनी बंदोबस्त केलेला पाहून शिवरायांची कर्तबगारी मावळ्यांनी ओळखली. ही मंडळी अधिक प्रेमाने, आपुलकीने शिवरायांचे कौतुक, गुणगान करू लागली. पुणे जहागीर आणि आसपासच्या लोकांसाठी शिवराय राजे झाले, देवदूत झाले. परंतु शिवरायांचा हा उदोउदो न पटणारे अजूनही काही लोक... आप्त, स्वकीय म्हणावे असे लोक राज्यात होते. त्यांना शिवरायांचे सर्वत्र दुमदुमणारे नाव अस्वस्थ करीत होते. त्यापैकी जावळीचे मोरे हे एक प्रमुख होते. आदिलशाहीचे एक वजनदार सरदार... जावळीचे जहागीरदार. आदिलशाहीने त्यांना 'चंद्रराव' हा मानाचा किताब बहाल केला होता. मोऱ्यांच्या जावळीचे एक खास वैशिष्ट्य म्हणजे जावळीचे घनदाट जंगल! जावळप्रांतात मानवाला काय परंतु भरदिवसा सूर्यकिरणांनाही बंदी असावी अशी परिस्थिती! शिवाय या जंगलात अनेक हिंस्र जनावरे फिरत असत त्यामुळे मोरे यांच्याशी कुणी वैरत्व पत्करत नसे.

वास्तविक पाहता यशवंतराव मोरे यांना शिवरायांनी मदत केल्यामुळेच जावळीची सरदारकी मिळाली होती. दौलतराव मोरे यांच्या निधनानंतर गादीवर बसण्यासाठी मोठा तंटा, वाद निर्माण झाला होता. त्यावेळी शिवरायांनी यशवंतरावांना मदत करून त्यांना गादीवर बसविले होते त्यावेळी यशवंतरावांनी शिवरायांना शब्द दिला होता की, खंडणी तर देईलच परंतु स्वराज्य स्थापनेच्या कार्यात मदत करीन. गादी मिळाली. मात्र वादा, वचन सारे विसरले. उलट शिवरायांच्या कामात अडथळे निर्माण करू लागला. या यशवंतरावांना धडा शिकविणे गरजेचे आहे हे शिवरायांनी ओळखले. नाहीतर हा मोरे स्वराज्यासाठी धोकादायक ठरू शकतो हे जाणून शिवरायांनी मोरेंकडे एक लखोटा पाठवला. त्यात महाराजांनी लिहिले,'तुम्ही स्वतःला राजे कसे काय समजता? श्रीशंभूच्या इच्छेने आणि आशीर्वादाने आम्ही राजे आहोत. तेंव्हा स्वतःला राजे समजू नका.'

यशवंतराव मोरे यांनी शिवरायांच्या पत्राला फारसे महत्त्व दिले तर नाहीच उलट टपाली शिवरायांना लिहिलेल्या पत्रात ते म्हणतात,

'राजे? कोण राजे? तुम्हाला राज्य कुणी दिले? खरे राजे आम्ही. आदिलशाहाची मर्जी आम्ही संपादन केली आहे. आदिलशाहा आमच्यावर प्रसन्न आहे म्हणूनच बादशहाने आम्हाला 'चंद्रराव' हा किताब आणि सिंहासन दिले आहे. आमच्या वाटेला येऊ नका. अपाय होईल.'

यशवंतराव यांच्या अशा आडमुठ्या उत्तराने शिवराय संतापले. त्यांनीही यशवंतरावांना खरमरीत पत्र लिहून फर्मावले,

'मुकाट्याने जावळीचे राज्य सोडून या. राजे म्हणून नाहीतर चाकर म्हणून भेटायला या.'

जावळीच्या घनदाट अरण्यातून जावळीवर चालून अवघड होते. त्यामुळे तो किल्ला जिंकण्याचा किंवा जावळीवर हल्ला करण्याचा कुणी प्रयत्न करीत नसे. परंतु शिवरायांचे तसे नव्हते. शिवरायांचा अभ्यास दांडगा होता. जंगलातील वाटा, आडमार्ग यांची खडानखडा माहिती त्यांनी मिळवली होती. जवळपास महिनाभर अभ्यास, विचार, नियोजन करून शिवराय शेवटी जावळीवर चालून गेले. मोरे मंडळीही संख्येने आणि सैन्य बळाने अधिक होती. जवळपास महिनाभर युद्ध चालले. परंतु शिवरायांच्यासमोर आता टिकाव लागत नाही हे ओळखून यशवंतरावांनी माघार घेतली. आपल्या कुटुंबासह यशवंतराव रायरी किल्ल्यावर आश्रयाला गेला. शिवराय रायरी किल्ल्यावर चालून गेले. रायरी किल्ल्याला वेढा घालण्यात आला. तीन महिने यशवंतराव आणि त्यांच्या सैन्याने झुंज दिली. परंतु शेवटी त्यांना माघार घ्यावी लागली. शिवरायांचा विजय झाला. रायरीसारखा प्रचंड मजबूत किल्ला स्वराज्यात समाविष्ट झाला. रायरी किल्ल्याचे नाव बदलून शिवरायांनी त्याचे नाव किल्ले 'रायगड'असे ठेवले. रायगडच्या जवळच एका डोंगरमाथ्याने शिवरायांचे लक्ष वेधले. तो डोंगर भोरप्या नावाने ओळखला जात असे. दूरदृष्टी असलेल्या शिवरायांनी या डोंगरावर अत्यंत मजबूत असा एक किल्ला बांधला. या किल्ल्याला नाव दिले.... प्रतापगड! या विजयाने शिवरायांची कीर्ती सर्वदूर पोहोचली....

नागेश सू. शेवाळकर