तुझ्या विना [मराठी नाटक] - भाग-४ Aniket Samudra द्वारा प्रेम कथा मराठी में पीडीएफ

Featured Books
श्रेणी
शेयर करा

तुझ्या विना [मराठी नाटक] - भाग-४

केतन टेबलावर ठेवलेला अनुचा मोठ्ठा कॅमेरा उचलतो…

केतन : तुझा आहे?
अनु : नाही.. तो पलीकडे चिनी बसलाय ना.. त्याचा ढापलाय.. (थोड्यावेळ थांबत व मग हसुन,) ऑफकोर्स माझा आहे..
केतन : डी.एस.एल.आर. ना? वॉव निकॉन डी३ एस?? सॉल्लीड महाग आहे म्हणे.. कित्ती ४ लाख ना? आणि ही लेन्स.. ८०-८५ हजार…?
अनु : व्वा.. बरीच माहीती आहे की तुला…
केतन : हो.. माझ्या दोन-चार मित्रांना आहे शौक फोटोग्राफीचा… काय पैसा घालवतात वेड्यासारखा..
अनु : वेड्यासारखा काय.. छंदाला मोल नसते रे.. आणि तु फोटो क्वॉलीटी पाहीलीस का? हे बघ फ्लेमींगो चे फोटो मागच्याच आठवड्यात काढले होते.. बघ कसले शार्प आलेत..

अनु कॅमेरातले फोटो केतनला दाखवते..

केतन : कॅमेरामध्ये इतके पैसे घालवण्यापेक्षा मी त्याच पैश्यात घरी दोन-तिन फ्लेमींगो विकत घेउन ठेवेन.. जमलंच तर एखादा प्रशीक्षक पण ठेवेन त्या फ्लेमींगोंना ट्रेन करायला. मग माझ्या सवडीने माझ्या साध्या कॅमेरातुन पण असे घरबसल्या फोटो काढेन.. मान तिरकी केलेला फ्लेमींगो.. एक पाय उचललेला फ्लेमींगो.. कॅमेराकडे बघणारा फ्लेमींगो..

केतन उठुन उभा रहातो आणि स्वतःच फ्लेमींगो असल्याच्या अविर्भावात एक पाय वर करुन कधी इकडे बघ तर कधी चोचीने खाली किडे वेच असले उद्योग करतो आणि स्वतःशीच हसु लागतो.

अनु कॅमेरा बंद करुन परत ठेवुन देते..

अनु : व्हेरी फनी….

थोडावेळ शांतता…

केतन : यु नो व्हॉट… तु मगाशी म्हणालीस ना.. काही अंशी ते खरं आहे.. गुगल ने खुप मदत होते.. पण तुझं काम खरंच छान आहे. म्हणजे नविन लोकांना भेटायंच, त्यांच्या आयुष्याचा काही दिवसांकरीता का होइना भाग बनायचं.. नविन अनुभव, नविन ओळखी जोडायच्या.. नविन ठिकाणं पहायची.. हेच तर लाईफ आहे.. आणि तुला फोटोग्राफीची आवड आहे म्हणल्यावर तर काय, अश्या कित्तेक सुंदर आठवणी फोटोच्या रुपाने तुझ्याकडे संग्रही असतील.. नाही का?

अनु केतनकडे पाहुन हसते.

केतन : ह्या चायनीज काय.. किंवा जापनीज काय.. महाभयंकर भाषा आहेत बुवा.. नुसतीच चित्र चित्र. आणि त्याहुन ही माणसं सगळी एकसारखीच दिसतात.. एकदा माहीते काय गम्मत झाली? मी मॅक्डोनाल्ड मध्ये होतो तेथे एक असाच चिपचिप्या डोळ्यांचा, बुटका माणुस माझ्या पुढे होता. माझ्या मागच्या प्रोजेक्टचा क्लायंट जापनीज होता ना, त्यामुळे मला थोडंफार जॅपनीज येत म्हणलं दाखवावं आपलं शहाणपण म्हणुन मी त्याला म्हणलं.. “कोंन्बावा…” अर्थात “हॅलो.. ” तर त्याच्या चेहर्‍यावर काही भावच नाहीत…

अनु : मग?
केतन : मग काय, मी त्याला म्हणलो.. आर यु जॅपनीज.. तर हसला आणि म्हणाला.. आय अम सॉरी.. आय एम कोरीयन..

अनु खळखळुन हसते.. केतन तिच्याकडे पहात रहातो…

अनु : हो.. खरं आहे तुझं म्हणणं.. सगळेजण बरेचसे एकसारखेच दिसतात..

पुन्हा काही वेळ शांतता..

केतन : तुला एक कॉम्लिमेंट देऊ?
अनु : ओह.. शुअर.. गो अहेड..
केतन : तुझी स्माईल ना खुप गोड आहे.. किप स्मायलींग.. अलवेज…
अनु : थॅक्स.. नक्कीच.. मला हसायला खुप आवडते.. उगाच रुसुन, फुगुन बसायला, तोंड पाडुन फिरायला नाही जमतरे मला.. उद्याचा काय भरवसा? आजच आयुष्य मस्त जगायचं बघ..
केतन : ए तुला एक जोक सांगु? चिनी भाषेशीच संबंधीत आहे.. आवडेल तुला..
अनु : हो.. सांग ना.. पण चायनातील शाळेचे नाव काय असेल?.. उत्तर – “या शिका”.. किंवा ब्रुसलीची आवडती डिश कोणती – उत्तर : “इड-ली”.. असले काही पाचकळ पि.जे. असतील तर प्लिज नको सांगुस.. हजारदा ऐकलेत..

केतन रागाने अनुकडे बघतो आणि मग काही न बोलता गप्प बसतो.
थोडावेळ शांततेत जातो.

अनु : काय रे..? काय झालं..? चिडलास?
केतन : मी कश्याला चिडु.. मला नाही राग-बिग येत..
अनु : अस्सं.. मग हास ना रे एकदा.. ती बघ ती कोपर्‍यातली चिनी मुलगी तुला लाईन देते आहे..

केतन एकदा मागे बघतो आणि मग अनुकडे बघुन हसतो.

अनु : (हसणार्‍या केतनकडे बघुन हाताची बोटं बंदुकीसारखी करत).. स्टॅच्यु

केतन दोन क्षण स्तब्ध होऊन बसतो.. चेहर्‍यावरची स्माईल तशीच हसते..
अनु : स्टॅच्यु ओव्हर ऐन्ड यु अलसो..(थोड्यावेळ थांबुन) किप स्माईलींग..

केतन आणि अनु खुप वेळ एकमेकांकडे पहात रहातात.

अनु : बरं मला सांग किती दिवस आहेस मुंबईमध्ये…?
केतन : आहे.. एक महीना तरी आहे.. भेटूयात?

अनु : का रे..? तुला मुंबईवगैरे फिरायची आहे आणि म्हणुन तु मला रिक्वेस्ट वगैरे करणार आहेस की काय?
केतन : छे गं.. म्हणजे मान्य आहे.. कित्तेक वर्षात गेलो नाही मुंबईला.. पण शेवटी रक्तात मुंबईच आहे ना.
अनु : बरं.. भेटु आपण.. नक्कीच भेटु… आणि आता तु नाही म्हणालास ना.. तरीही मी भेटेन तुला…

इतक्यात अनॉन्समेंन्ट होते : ईंडीयन एअरलाईन्स प्लाईट नंबर आय.ए. थ्री. सेवन नाइन इज नाऊ रेडी टु डिपार्ट इन थर्टी मिनीट्स, ऑल द पॅसेन्जर्स आर रिक्वेस्टेड टु प्रोसीड टु गेट नंबर सेव्हन.. प्लिज..

आय रिपीट… ईंडीयन एअरलाईन्स प्लाईट नंबर आय.ए. थ्री. सेवन नाइन इज नाऊ रेडी टु डिपार्ट इन थर्टी मिनीट्स, ऑल द पॅसेन्जर्स आर रिक्वेस्टेड टु प्रोसीड टु गेट नंबर सेव्हन.. प्लिज..

अनु : निघुयात? चेक-इनला मोठ्ठा क्यु असणारे…
केतन : (खुर्चीतुन उठत) येस्स शुअर.. चलो मुंबई…..

अनु : ओह.. बाय द वे.. मी अनु.. (शेक हॅन्ड साठी हात पुढे करते)
केतन : (शेक हॅन्ड करत) मी केतन…

दोघेही उठतात, आपल्या बॅगा घेतात आणि स्टेजच्या बाहेर जातात.

प्रसंग -३ केतनचे घर..
स्वयंपाक घरात केतनची आई कामात मग्न आहे.. तायडी हॉलमध्ये आवरा आवर करत आहे. केतन आळोखे-पिळोखे देत.. आळस देत हॉलमध्ये सोफ्यावर येऊन बसतो..

तायडी : अगो बाई.. उठले वाटतं भाऊराया.. आई.. हा उठला बघ गं!!
आई : “अरे.. उठलास केतु? झाली ना भरपुर झोप?

केतन डोळे चोळत चोळत मान डोलावतो आणि सोफ्यावर येऊन बसतो.

आई : चहा घे आता मस्त वाटेल. आलं टाकुन करते…. घेतोस ना चहाच? का कॉफी टाकु?”
केतन (सुस्तावलेला) : “नाही.. घेतो चहा.. चालेल.. त्या अमेरीकेतील स्टार-बक्सची कॉफी पिऊन पिऊन कंटाळा आलाय..
आई (गॅसवर चहा टाकत) : अगं पार्वती.. वरचं झाडुन झालं असेल तर केतनची खोली आवरुन घे गं.. उठलाय तो..
केतन : पार्वती? आता ही कोण नविन?
तायडी : अरे कामवाली आहे.
केतन : कामवाली? आणि मग सख्या काय् करतो?
आई : अरे सखाराम आहे रे.. पण तो बाहेरच्या कामातच जास्त बिझी.. पार्वतीची स्वयंपाकात पण खुप मदत होते. काय मस्त स्वयंपाक करते माहीते? खरं तर तिला कामं सांगवतच नाहीत रे. गोड आहे मुलगी.
केतन : आणि मग ही तायडी काय करते.. काय गं घोडे.. तु नाही का स्वयंपाकात मदत करत?
तायडी : चुप रे.. तुला काय करायचं आहे चोमडेपणा.. आणि माझं ऑफीसमधलं काम कोण करणार मग?
आई : अरे.. सुशांतच्या ऑफीसमधले ते कोण सपोर्ट-स्टाफ का कोण असतात त्यातील एकाची बहीण आहे पार्वती.. गरीब आहेत बिचारे.. तिला कामाची गरज होती म्हणुन ठेवलं सुशांतने तिला इथं कामाला..
केतन : बरं केलं सुशांतने.. तुला केंव्हापासुन सांगत होतो घरी एक कामाला बाई ठेव आता.. किती वर्ष कामं करशील घरातली.. स्वतःसाठी जरा काढ वेळ..
तायडी : आणि काय करेल ती वेळ काढुन? तु तर काही वहीनी आणत नाहीस. मग मोकळ्या वेळेत करायच काय तिनं?
केतन : ए गपे…. करण्यासारखं बरंच आहे गं.. तुला आपलं कारणच पाहीजे वहीनीचा विषय काढायला..
तायडी : हो मग? काय चुकीचे बोलतेय का मी?.. नाही.. सांग ना, काय चुकीचं बोलतेय मी..? नाही बोलणार मी पुढे.. शेवटी तु नाही लग्न केलंस तरी मी करणारच आहे.. आज ना उद्या मला जायचंच आहे हे घर सोडुन.. (उगाचच डोळे हाताच्या बोटांनी टिपल्याचे नाटक करते..)
केतन : झाली हिची नाटकं सुरु…

आई चहाचा कप आणुन देते….

केतन : पण आई, मी इथे असेपर्यंत स्वयंपाक तुच करायचास हा, मला नको पार्वतीच्या हातचा स्वयंपाक.
आई : बरं.. मीच करीन हो…
केतन : (चहाचा घोट घेत).”काय गं आई एवढी शांतता का आहे? कुणी दिसत नाही ते?”
आई: “अरे सगळे गेले आहेत देवी दर्शनाला. सुशांत-अनु चे लग्न आठवड्यावर येउन ठेपले ना.. म्हणुन एकदा जावुन यावं म्हणुन गेले आहेत. सकाळीच गेलेत सगळे ५.३० ला येतीलच एवढ्यात..
केतन : आणि ही तायडी नाही गेली ते?
आई : अरे तिला ऑफीसला जायचे आहे लवकर.. म्हणुन नाही गेली..
केतन : पण मला का नाही उठवलंस? मी पण गेलो असतो ना..
आई : आधी फक्त अनु आणि सुशांत दोघंच जाणार होते, पण मग अनुच म्हणाली सगळ्यांनाच घेउन जाऊ काय १००-१५० कि.मी. चा तर प्रवास, मग काकांनी गाडी काढली आणि सगळेच गेले बघ. फार गोड आहे रे ती पोरगी! सगळ्यांमध्ये मिळुन मिसळुन असते..”

केतन : (अनुचे नाव ऐकल्यावर केतन परत विचारात बुडुन जातो) : ”काय गं आई.. काय करते काय ही अनु? अं.. आय मिन अनुराधा..?”
आई : “अरे ते चायनीज भाषेचं काहीतरी करते बघ. महाराष्ट्र सरकारचे सांस्कृतीक खातं आहे ना, त्यातील चिन देशाशी संबंधीत संस्कृतीची देवाण-घेवाण करणं, आपल्या इथे चिनी भाषेबद्दल जागृकता निर्माण करणं, त्याचे क्लासेस असंच काहीतरी चालु असते. परवाच आली ती परत, एक महीना शांघायला गेली होती..”
केतन (स्वगत) : “हम्म. म्हणजे तीच ही आहे तर.. चुकुन माकुन एकसारख्या दिसणाऱ्या दोन व्यक्ती असु शकतात.. पण कसलं कायं? नशीबाने ऐन वेळेस धोका दिला..”

बाहेर गाडीचा थांबल्याचा आवाज आणि नंतर बर्‍याच लोकांचा गोंगाट ऐकु येतो. थोड्याच वेळात सगळी मंडळी स्टेजमध्ये घुसतात.
मागोमाग सुशांत आणि अनु पण आतमध्ये येतात.. क्षणभरासाठी अनुची आणि केतनची नजरानजर होते..