Tujhya Vina- Marathi Play - 11 books and stories free download online pdf in Marathi

तुझ्या विना [मराठी नाटक] - भाग ११

प्रसंग – ९ स्थळ.. केतनचे घर..

केतन सोफ्यावर पुस्तक वाचत बसलेला आहे. खरं तर नुसतच पुस्तक हातात आहे. तेवढ्यात अनु येते. अनुला बघुन केतन उठुन उभा रहातो.
(मागुन हृदयाच्या धडधडण्याचा आवाज येत रहातो.)

अनु : आई…..sssss
केतन : अनु? आई घरी नाहीये… बाहेर गेली आहे..
अनु : ओह.. कधी पर्यंत येतील? कालच्या त्या किचन रेसेपीज मधला एक पदार्थ बनवला होता मी..

केतन तिच्या हातातले भांड काढुन बाजुला ठेवतो, आणि तिचा हात हातात घेतो

केतन : आई आणि तायडी बाहेर केळवणाला गेल्यात.. यायला खुप उशीर होइल…
अनु : केतन प्लिज.. हात सोड.. मला जाऊ देत घरी…
केतन : अजुन किती दिवस स्वतःला माझ्यापासुन दुर ठेवणार आहेस तु अनु? किती दिवस मला आणि स्वतःला त्रास देणार आहेस असा?

अनु एक आवंढा गिळते…

अनु : तसं काही नाहीये केतन..
केतन : मग कसं आहे अनु? सांग मला, मग कसं आहे? तुला मला भेटावंसं नाही वाटत? माझ्याशी बोलावंस नाही वाटत? मी तुझ्या लेखी केवळ एक मित्र.. किंवा.. किंवा तुझा होणारा दीर इतकाच आहे का? तुझ्या डोळ्यातले भाव मला बघीतल्यावर का बदलतात? सुशांतबरोबर असतानाही तुझी नजर मला का शोधत असते? का अनु? का?
अनु : मला माहीत नाही केतन तु काय बोलतो आहेस? जाते मी..
केतन : थांब अनु.. तुला माझ्या प्रश्नांची उत्तर आज द्यावीच लागतील. तुला माझ्याशी लग्न नाही करायचं ना? हरकत नाही.. तुला सुशांतशी ठरलेले लग्न नाही मोडायचे? तरीही हरकत नाही, पण म्हणुन तुझं माझ्यावर प्रेम आहे हे सत्य तु नाकारु शकत नाहीस.. आज तुला मान्य करावंच लागेल अनु.. ’यु लव्ह मी…’ आय नो यु लव्ह मी….

अनु : लिव्ह मी केतन.. प्लिज लिव्ह मी………..
केतन अनुला घट्ट धरुन ठेवतो…

अनु : केतन.. आय सेड.. लिव्ह मी………..

केतन अनुला जवळ घेतो….
अनु डोळे बंद करुन माघारी वळते…
मागुन जोराने वारा सुटल्याचा आवाज.. केतन हळुवार हातांनी अनुला आपल्या मिठीमध्ये ओढुन घेतो. अनु डोळे बंद करुन त्याच्या मिठीमध्ये स्वतःला झोकुन देते.

अनुचा श्वासोच्छास वाढलेला आहे..
अनु : लव्ह मी केतन.. प्लिज.. लव्ह मी…
केतन : आय लव्ह यु अनु.. आय रिअली लव्ह यु……………….
(मागुन हृदयाच्या धडधडण्याचा आवाज येत रहातो.)

एखादे इंटेन्स.. बेधुंद करणारे रोमॅन्टीक गाणे… अनु-केतन दोघं एकमेकांच्या खुप जवळ येतात.
गाणं संपते. अनु आणि केतन अजुनही एकमेकांच्या मिठीमध्ये. अनुचे केस केतनच्या चेहर्‍याला वेढुन बसले आहेत.
काही काळाने परिस्थीतीची जाणीव झाल्यावर अनु झटकन केतनपासुन लांब होते आणि थोडी दुर जावुन केतनला पाठमोरी उभी रहाते..
काही क्षण शांतता…

केतन : गप्प का झालीस? बोल ना…
अनु : नको..
केतन : मला तर खुप बोलावेसे वाटते आहे. कंट्रोलच राहीला नाहीये काही. अजुन नाचावेसे वाटते आहे. बोल ना काही तरी, शांत नको राहुस..
अनु : शांत नाही झाले तर अवघड होईल केतन…नको.. प्लिज..
केतन : होऊ देत अवघड.. हे बघ अनु.. ह्या जगात काहीही अवघड नसते. नको कंट्रोल करुस.. बोल काय चाललं आहे तुझ्या मनात..
आज तुला इतक्या जवळ घेतल्यावर माहीतेय कसं वाटलं अनु? बेधुंद होऊन कोसळणार्‍या पावसात भिजल्यासारखं…
अनु : सुशांतचा चेहरा माझ्या डोळ्यासमोर येतोय…केतन
केतन : (खाड्कन जागा झाल्यासारखा) काही गरज होती का अनु त्याचं नाव आत्ता घ्यायची..?
अनु : कमऑन केतन, सुशांत माझा होणारा नवरा आहे.

थोड्यावेळ परत शांतता
अनु : लेट्स स्टॉप केतन.. धिस इज ड्रायव्हिंग मी क्रेझी…
केतन : हे बघ अनु.. either u can listen to ur heart or u can listen to ur brain, दोन्ही होणं शक्य नाही.
अनु : Then lets listen to brain, सुशांत माझा होणारा नवरा आहे आणि काही दिवसांतच माझं त्याच्याशी लग्न होणार आहे हेच बरोबर आहे.
केतन : हार्ट-ब्रेन.. ब्रेन-हार्ट.. कोण बरोबर..कोण चुक कोण ठरवणार. मला खात्री आहे अनु इतके दिवस तु तुझ्या मनावर ताबा ठेवुन तुझ्या मेंदुचेच ऐकत आलीस.. मग आत्ता काय झालं.. गेलीसच ना वहावत? हे आज नाही तर उद्या होणारच.. किती दिवस स्वतःच्या मनाकडे दुर्लक्ष करशील??
अनु : (वैतागुन) मग काय करायचं केतन? काय म्हणणं आहे तुझं? मी सुशांतला जाऊन सांगु का की मला तु नाही तुझा भाऊ आवडतो? मी तुझ्या आईला सांगु का.. आई मी तुमचीच सुन होणार आहे पण सुशांतची बायको म्हणुन नाही तर केतनची बायको म्हणुन.. आणि माझ्या आई-बाबांना.. त्यांना कुठल्या तोंडाने सामोरे जाऊ मी?
(ढगांच्या गडगडण्याचा आवाज येतो…)

केतन : बाहेर बघ अनु.. कित्ती मस्त पाऊस पडतोय.. असं वाटतंय.. असं वाटतयं.. प्रत्येक पानं पान मदहोश होऊन नाचतं आहे, फक्त तु आणि मी.. बाकी निरव शांतता… कुणालाच काही बोलायची गरज नाही.. our eyes will do the talking.. our heart bits will dance on the rhythm of love…
अनु : ओह गॉड….धिस इज डॅम्न गुड.. हे असं रोमॅन्टीक सुशांत माझ्याशी कधीच बोलला नाही. मला काय बोलावं काहीच सुचत नाहीये केतन.. फक्त डोळे मिटुन.. सगळ्या जगाला विसरुन हे सगळं अनुभवावसं वाटतं आहे..
केतन आपण एखाद्या कॉन्सलर कडे जायचे का?
केतन : (आश्चर्याने..) कॉन्सलर कडे? कश्याला..
अनु : कदाचीत तोच आपल्याला ह्यातुन बाहेर पडण्याचा मार्ग दाखवु शकेल. पेपरात नाही का लोकांचे असे विचीत्र प्रश्न असतात.. मी माझ्या बायकोच्या बहीणीच्या प्रेमात पडलो आहे.. किंवा मी चाळीतील एका विवाहीत पुरूषाच्या प्रेमात पडले आहे वगैरे वगैरे.. आणि मग कॉन्सलर त्यांना मार्ग सुचवतो.. तसंच काही..
केतन : वेडी आहेस तु अनु.. असं कॉन्सलर कडे जाऊन कधी काही होतं नसतं…
अनु : हो केतन.. आहे मी वेडी.. खरंच वेड लागलं आहे मला.. तु वेड केलं आहेस केतन.. तु वेडं केलं आहेस…

काही क्षण शांततेत जातात. बाहेर कोसळणार्‍या पावसाचा आवाज येत रहातो.

अनु : .. का आलास तु केतन? कित्ती आनंदी होते मी इकडे.. मनासारखं घरं मिळालं होतं.. माझा अनेक वर्षांचा मित्रच मला जिवनसाथी म्हणुन मिळाला होता.. सगळं सगळं सुरळीत चालले होते..

(काही क्षण शांतता..)

पण त्या दिवशी शांघाय एअरपोर्ट वर तुला भेटले आणि…. खरं तर त्याच दिवशी तुझी झाले.. मी पुर्णपणे स्वतःला विसरुन गेले होते.. सुशांत, माझे ठरलेले लग्न, घर.. सगळं.. तुझ्याशी बोलण्यात, तुझ्याबरोबर हसण्यात मी हरवुन गेले.. असं वाटलं आपली कित्तेक वर्षांची ओळख आहे..

आणि सुशांतला?? खरं सांगायचं तर सुशांतला मी अजुनही ओळखु शकले नाही.. तो कुठल्या गोष्टीवर कसा रिऍक्ट करेल मला सांगता येत नाही.. कित्तेकदा माझ्यापासुन दुर असुनही तो माझ्यात गुंतुन बसतो, दहा वेळा फोन करेन, एस.एम.एस. करेल तर माझ्याबरोबर असुनही कित्तेकदा तो माझा नसतो. असा.. असा.. परका वाटत रहातो.. त्याच्याबरोबर अश्या मनमोकळ्या गप्पा नाही माराव्याश्या वाटत मला.
मी मुंबईला आले.. आपल्या माणसात आले.. आणि मग तुला विसरायचे ठरवले.. तुझ्याबरोबरचे ते निखळं आनंदाचे क्षण मनाच्या एका कोपऱ्यात बंद करुन..

पण.. पण नशीब कसं असते ते बघ ना.. दुसऱ्याच दिवशी तुझी आणि माझी भेट झाली.. नंतर स्वतःला मी समजावले की.. मला तु आवडत असलास तरीही तुला मी आवडले असेन असे नाही..

परत तुझे ते अमेरीकन मुलगी.. ब्लॉंड.. पण तु मॉल मध्ये जे काही बोललास त्यानंतर खरं सांगायचे तर माझं मलाच कळत नव्हतं काय करावं..? एकीकडे सर्वांच्या दृष्टीने मी सुशांतची जवळ-जवळ झालेच होते.. लग्नाचे औपचारीक बंधनच राहीले होते.. आणि एकीकडे माझे मन तुझ्याकडे धावत होत… तु मला आवडलास केतन.. आवडतोस.. सुशांतपेक्षाही जास्त..

तुझं बरोबर आहे.. सुशांत चांगला आहे.. पण माझा एक मित्र म्हणुनच.. कदाचीत मी त्याला ओळखण्यात कमी पडले असेन.. पण एक जिवनसाथी म्हणुन तुला भेटल्यानंतर सुशांत बरोबर मी खरंच सुखी आहे का? हा प्रश्न मला राहुन राहुन पडतो केतन”
केतनचे चेहर्‍यावरचे भाव क्षणाक्षणाला बदलत जातात…. तो उठुन अनु कडे जाऊ लागतो..
(मागुन हृदयाच्या धडधडण्याचा आवाज येत रहातो.)

अनु : एक मिनीट केतन.. तेथेच थांब.. जवळ येऊ नकोस. इतके दिवस मी मोठ्या प्रयत्नांनी मनावर ताबा मिळवला आहे. परवा माझं लग्न आहे आणि तो पर्यंत मला मनावरचा ताबा सुटुन द्यायचा नाहीये केतन.. मला काय करावं काही कळत नाहीये..
एकदा वाटतं स्वतःला झोकुन द्यावं तुझ्याकडे.. कोण आई? कोण तायडी? कोण सुशांत? कुणा-कुणाशी घेणं नाही.. तु माझा आणि मी तुझी.. बस्स… तर दुसर्‍या क्षणी मन पुन्हा भानावर येतं.. ह्या गोष्टी बोलायला सोप्या आहेत.. पण त्यानंतर कुणाला तोंड देऊ शकु का आपण?

केतन : अनु अजुनही वेळ गेलेला नाही.. मी बोलतो सुशांतदाशी
अनु : वेडा आहेस का? आता काही उपयोग नाही केतन. आणि उगाच तु कुणाला काही बोलु नकोस.. दोन दिवसांवर लग्न आले आणि तु असे काही बोललास तर काय होईल? सगळी तयारी झाली आहे..लोकं काय म्हणतील? त्यानंतर आई-वडीलांच्या नजरेला आपण नजर देऊ शकु का?”
केतन : “अनु, मी आत्ता नाही बोललो तर तिघांची आयुष्य खराब होतील. तु, मी आणि सुशांतदा. करु शकशील तु सुखाने संसार सुशांतदाशी? तुझ्याशी एका वहिनीचे नाते निभाउ शकेन मी? सगळ्यांना अंधारात ठेवुन जगणं जमेल आपल्याला? अजुनही वेळ आहे अनु.. अजुनही वेळ आहे.. उद्या सकाळी सुशांत येईल विचार कर….”

अनु खुर्चीत पाय मुडपुन गुडघ्यात डोकं घालुन रडु लागते.. केतन हेल्पलेस होऊन तिच्याकडे पहात रहातो.


स्टेजवरचे दिवे मंद होत जातात…..

इतर रसदार पर्याय

शेयर करा

NEW REALESED