करुणादेवी
पांडुरंग सदाशिव साने
१. राजा यशोधर
फार प्राचीन काळची गोष्ट आहे. यशोधरा नावाचा एक राजा होता. त्याच्या राजधानीचे नाव होते मुक्तापूर. मुक्तापूर खरोखरच फार सुंदर शहर होते. मोत्याप्रमाणे शोभत होते. शीतला नदीच्या काठी ते वसलेले होते. नदीमुळे शहराला फारच शोभा आली होती. हंसांप्रमाणे शेकडो नावा नदीच्या पात्रातून ये-जा करताना दिसत. नदीतीरावर सोमेश्वराचे एक फार प्राचीन मंदीर होते. त्या मंदिरात एके काळी एक गरिब जोडपे राहात होते. त्यांना एक मुलगा होता; परंतु तो अकस्मात मरण पावला. आईबापांचा तो एकुलता एक मुलगा होता. तो मुलगा त्यांचे सर्वस्व होता. तो त्यांचे धन, तो त्यांचा देव. मृतपुत्र मातेच्या मांडीवर होता. ती त्याच्याकडे पाहात होती. मुलांचे मिटलेले डोळे उघडावे म्हणून तिच्या डोळ्यांतून अश्रुधारा सुटत होत्या; परंतु मुलाचे डोळे उघडले नाहीत आणि त्याचे डोळे उघडत ना म्हणून त्या मातेचे डोळेही मिटले आणि जवळच बसलेला पिता, त्याचेही प्राण निघून गेले! मुलावर त्या मायबापांचे किती हे प्रेम! त्या सोमेश्वराजवळ दर वर्षी तेव्हापासून यात्रा भरत असे. आईबापांविषयीची कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी सारे शहर तेथे लोटे. जवळचे, दूरचे लाखो लोक येत. ज्यांचे आईबाप मेलेले असतील ते मृतांसाठी कृतज्ञता दाखवायला येत. ज्यांचे आईबाप जिवंत असतील ते जिवंत असणा-यांविषयी कृतज्ञता दाखवायला येत. मातृपितृप्रेमाची ती अपूर्व यात्रा असे.
मुक्तापूर राजधानी सोमेश्वराच्या ह्या यात्रेसाठी प्राचीन काळापासून प्रसिद्ध होती आणि आता यशोधर राजाच्या प्रजावात्सल्यामुळेही तिचे नाव सर्वांच्या तोंडी झाले होते. मुक्तापूरची प्रचंड मंदिरे, भव्य राजवाडे, सुंदर रुंद रस्ते, तेथील भव्य बाजारपेठ, तेथील विद्यापीठ, तेथील न्यायमंदिर, सारे पाहाण्यासारखे होते; परंतु यशोधर राजाचे दर्शन व्हावे म्हणून लोक येत. तो पुण्यश्लोक राजा होता.
यशोधराला एकच चिंता रात्रंदिवस असे. प्रजा सुखी कशी होईल, हीच ती चिंता. एके दिवशी सुंदर सजलेल्या नावेतून तो शीतला नदीच्या शांत गंभीर प्रवाहावर विहार करीत होता. बरोबर मुख्यमंत्री आदित्यनारायण हा होता. एक वाद्यविशारद एक मधुर तंतुवाद्य वाजवित होता; परंतु राजा यशोधर प्रसन्न नव्हता.
‘महाराज, आज उदासीन का आपली चर्य़ा ? सारी प्रजा सुखी आहे. मग का चिंता ?’ प्रधानाने विचारले.
‘आदित्यनारायण, आपला राज्यकारभार दिवसेंदिवस अधीक चांगला व्हावा असे मला वाटते. राजा कितीही चांगला असला तरी त्याला जर अधिकारी चांगले मिळाले नाहीत, तर काय उपयोग ? कायदा शेवटी कागदावरच राहातो. ठायी ठायी चांगली माणसे काम करण्यासीठी कशी मिळतील हा मुख्य प्रश्न आहे. प्रत्येक गावाला, तालुक्याला, जिल्ह्याला योग्य माणसे निवडली जातील, योग्य माणसे नेमली जातीला म्हणून काय करावे ?’
‘परंतु हल्लीचे अधिकारी आहेत ते चांगलेच आहेत. तक्रार कोठून येत नाही.’
‘माझ्या मनात एक योजना आहे. त्या त्या तालुक्यात जी बुद्धीमान, सदगुणी अशी मुले असतील, त्या सर्वांना राजधानीत बोलवावे. त्यांना तेथे वर्षभर शिक्षण देऊन त्यांची परीक्षा घ्यावी. केवळ बौद्धिकच परीक्षा नाही, तर इतरही अनेक अंगांची आणि जी मुले जास्त योग्य ठरतील ती ठिकठिकाणी नेमावीत.’
‘परंतु त्या त्या ठिकाणची हुशार, शहाणी मुले मिळणार कशी? समजायचा काय मार्ग ?’
‘त्या त्या गावच्या लोकांना माहीत असते. अमक्या अमक्याचा मुलगा फार हुशार आहे, फार परोपकारी आहे, असे गावात म्हणत असतात. त्या त्या गावच्या अधिका-यांनी नोंद करुन पाठवावी. आपण त्यांतून निवड करुन बोलावून घ्यावी. त्यांची परीक्षा घ्यावी. करुन तर पाहू या.’
‘करुन पाहायला काहीच हरकत नाही. पुढील राजांसाठी ही उत्कृष्ट परंपरा राहील. खरोखरच आपण धन्य आहात, किती सारखा विचार करीत असता!’
राजा होणे म्हणजे मोठी जोखीम. कोट्यवधी लोकांची सुखे राजावर अवलंबून असतात. एका कुटुंबाचा संसार नीट चालावा म्हणून त्या कुटुंबातील कर्त्या पुरुषाला किती दक्ष रहावे लागते. मग ज्याच्यावर लाखो संसार अवलंबून, त्या राजाने किती बरे दक्ष राहिले पाहिजे? मघा ते वाद्य वाजत होते. माझ्या मनात विचार येई की, किती कुटुंबातून सुखाचे संगीत नांदत असेल ? कोठे हाय हाय तर नसेल ना ? अन्याय नसेल ना ? जुलूम नसेल ना ? अन्नान्नदशा नसेल ना? भांडणे, विरोध नसतील ना ? घरी-दारी, सर्वत्र भिन्नभिन्न सूर असूनही त्यांतून गुण्यागोविंदाने संगीत निर्माण होत असेल का? आदित्यनारायण
आदित्यनारायण, मी जेव्हा चांदीच्या ताटातून अमृतासारखे अन्न खातो, तेव्हा माझी प्रजा मला आठवते. मी सोन्याच्या पलंगावर परांच्या गाद्यांवर झोपतो, तेव्हा माझी प्रजा माझ्या डोळ्यांसमोर असते. मी जेव्हा माझ्या विशाल ग्रंथशाळेत हिंडतो, तेव्हा माझी प्रजा माझ्या डोळ्यांसमोर असते. मी मनोरम राजवाड्यातून वावरतो, तेव्हा माझी प्रजा माझ्या डोळ्यांसमोर असते.
प्रजेला अन्न, वस्त्र, घरदार, ज्ञान सारे असेल का, हा विचार रात्रंदिवस माझ्या डोळ्यांसमोर असतो. मी सुखात असता माझी प्रजा दुःखात असेल, तर देवाघरी मी गुन्हेगार ठरेन. एखादे वेळेस वाटते की सोडावे राज्य, व्हावे संन्यासी व निघून जावे; परंतु अंगावरची जबाबदारी अशी सोडून जाणे, तेही पाप. म्हणून मी शक्य ती काळजी घेऊन हे प्रजापालनकर्तव्य पार पाडायचे असे ठरवले आहे. आपल्या बागेत जशी सुंदर सुगंधी फुले फुललेली असतात, तशी माझ्या प्रजेची जीवने फुलावीत, त्यांच्या जीवनात रस व गंध उत्पन्न व्हावा असे वाटते. आपण माणसे शेवटी अपूर्ण आहोत, परंतु जितके निर्दोष होता येईल तितके होण्यासाठी प्रयत्न करावयाचे.’
इतक्यात एका बगळ्याने झडप घालून एक मासा पकडला. यशोधराचे लक्ष तिकडे गेले.
“पाहिलात ना तो प्रकार?” तो म्हणाला.
“होय महाराज, आदित्यानारायण म्हणाले.”
“माझे अधिकारी असे नसोत. दिसायला गोरोगोमटे; वरुन गोड गोड बोलणारे; परंतु मनात घाणेरडे. खरे नाणे पाहिजे. अस्सल हवे. नक्कल नको. खरे ना?”
“होय महाराज!”
सोमेश्वराच्या मंदिरात घंटा वाजत होत्या. सायंकाळ जवळ आली. नाव माघारी वळली. यशोधर उतरला. शेकडो लोकांचे जयजयकार ऐकत व प्रणाम घेत तो राजवाड्यात गेला. ‘असा राजा असावा’ असे म्हणत लोक घरी गेले.
***