करुणादेवी
पांडुरंग सदाशिव साने
२. शिरीष
अंबर गावी सुखदेव म्हणून एक गृहस्थ राहात होता. त्याच्या पत्नीचे नाव सावित्री. बरेच दिवस मूलबाळ होईना. सावित्रीने पुष्कळ व्रते-वैकल्ये केली, नवस-सायास केले. ती निराश झाली; परंतु आता मूल होणार नाही, असे वाटल्यावर तिला मुलगा झाला. नक्षत्रासारखा मुलगा होता. त्याचे नाव शिरीष ठेवण्यात आले. सुखदेवाला फुलांचा फार नाद. घरात मूलबाळ नव्हते, तेव्हा तो बागेत फुले फुलवी. फुलांकडे पाही. फुलांचे मुके घेई. मला मुले असती तर त्यांचे असे मुके मी घेतले असते व त्या मुलांनी माझ्या गळ्याला मिठी मारली असती, असे तो म्हणे. त्याची पुष्पोपासना पाहून जणू परमेश्वराने त्याच्या संसारवृक्षाला शेवटी फुलवते. शिरीषचे सुंदर फूल लागले. शिरीष फूल किती सुकुमार असते ! बाळ शिरीषही तसाच सुकुमार होता.शिरीष वाढला. गावशाळेत शिकायला जाऊ लागला. सुखदेवही त्याला घरी शिकवायचे. आई सावित्री पुराणातील कथा-गोष्टी सांगायची. शिरीषची स्मरणशक्ती अपूर्व होती. तो खरोखर एकपाठी होता. पंतोजी त्याचे कौतुक करीत. शेजारी त्याची स्तुती करीत. आईबापांना तर अपार आनंद होई. शिरीषचे शाळेतील शिक्षण संपले. तो आता हळुहळू वृद्ध आईबापांस मदत करु लागला. त्यांचे लहानसे शेत होते. शिरीष तेथे खपे. शेत पिकवी. आईबापांची सेवा करी.गावाचे तो भूषण होता. भांडण कोठे असले तर तो न्याय देई. कोठे संकट असेल तर तो धावून जाई. एकदा एका विहिरीत एक मूल पडले. शिरीषने एकदम उडी घेतली. त्याने ते मूल वाचवले, उदार, प्रेमळ, शूर, बुद्धीमान असा हा आदर्श तरुण होता. त्याचे आता लग्न झाले. ऐका पोरक्या मुलीबरोबर लग्न. त्या मुलीचे लग्न ठरत नव्हते. ती गरीब होती. चुलत्याकडे ती होती. ‘तुझे लग्न कसे होणार? कोण तुला करणार? मी गरिब, कोठे तुला देऊ?’ चुलता एके दिवशी तिला म्हणाला.‘शिरीष लावील माझ्याबरोबर लग्न. त्याला गरिबांची काळजी. अनाथ मुलींचे नशीब तो फुलवील.’ ती म्हणाली.‘वेडी आहेस तू. असा सुंदर नवरा मिळायला साता जन्मांची पुण्याई हवी.’‘मी का पापी आहे?’‘पापी नसतीस तर पोरकी कशाला होतीस?’‘ईश्वरावर ज्याची श्रद्धा आहे तो कधी पोरका होत नाही. जगातले आईबाप गेले तरी तो मायबाप सदैव आहेच.’‘करुणे, तुझे बोलणे थोरामोठ्यांना लाजवील.’
करुणा त्या मुलीच नाव. किती गोड नाव. खरोखरच ती मूर्तीमंत करुणा होती. ती गाईगुरांना मारीत नसे. पाखरांस दाणे टाकील, मांजरास दहीभात घालील. करुणा सर्वांची करुणा करी; तिची करुणा कोण करणार? तिची दया कोणाला येणार? नाही का तिचे लग्न होणार? नाही का कोणी योग्य वर मिळणार? नाही का शिऱीष मिळणार? करुणेचे चुलत्याजवळचे बोलणे सर्वत्र पसरले. शिरीषच्याही कानावर आले आणि खरेच त्याने करुणेशी लग्न लावले. सुखदेव व सावित्री ह्यांना वाटत होते की, एखाद्या श्रीमंताची मुलगी आपल्या मुलाला मिळावी; परंतु मुलाच्या इच्छेविरुद्ध ती गेली नाहीत.शिरीष व करुणा परस्परांना अनुरुप होती. त्यांच्या लहानशा संसारात आता आनंदाला तोटा नव्हता. शिरीषबरोबर करुणाही शेतात काम करी. फुलांना पाणी घाली. ती पहाटे उठे. गोड गोड ओव्या म्हणत जात्यावर दळी, सासू-सास-यांची ती सेवा करी. त्यांची धुणी धुवी. त्यांचे पाय चेपी. गोड बोलून पतीलाही सुखवी, हसवी.दरवर्षी आपल्या विवाहाचा वाढदिवस शिरीष व करुणा साजरा करीत. वसंत ऋतीत त्यांचे लग्न झाले होते. वाढदिवस वसंत ऋतूत येई. सारी सृष्टी त्या वेळेस सुंदर असे. वृक्षवेलींना नवीन पल्लव फुटलेले असत. झाडांना मोहोर असे. पक्षी गो़ड गाणी गात असत. प्रसन्न वारा वाहात असे आणि अशा प्रसन्न वातावरणात हा विवाह-वाढदिवस साजरा होत असे.अद्याप त्यांना मूलबाळ झाले नव्हते. सुखदेव व सावित्री ह्यांना नातवाचे तोंड कधी दिसेल असे झाले होते.‘बाबा, तुम्हाला मी म्हातारपणी झालो तसे आम्हालाही म्हातारपणी मूल होईल!’ शिरीष हसून म्हणे.‘परंतु त्या वेळेस आम्ही नसू.’‘सोमेश्वराच्या यात्रेत बाळाला घेऊन आम्ही येऊ. तेथे तुमचे आत्मे बाळाला पाहातील.’‘सोमेश्वराला मला कधीही जाता आले नाही. किती तरी लांब. तू तरी कसा जाशील?’‘इच्छा असली म्हणजे जाता येईल.’ असे संवाद चालत.परंतु यशोधर राजाच्या नवीन आज्ञेची राज्यात सर्वत्र दवंडी देण्यात आली. सर्व बुद्धीमान तरुणांची यादी करण्याचे ठरले. आईबाप आपापल्या हुषार मुलांची नावे आनंदाने देऊ लागले.‘सुखदेव, तुमच्या शिरीषचे नाव दिलेत की नाही? त्याच्यासारखा हुषार कोण आहे? त्याच्यासारखा गुणी कोण आहे? सर्व राज्यात तो पहिला येईल. राजाचा मु्ख्य प्रधान होईल. तुमच्या भाग्याला मग काय तोटा?’
‘नको ते भाग्य. शिरीषचा वियोग मला क्षणभरही सहन होत नाही. मुक्तापूर राजधानी किती दूर. तेथे जायचे. वर्षभर शिकायचे. मग परीक्षा. नकोच ते. एक क्षणभरही शिरीष जवळ नसेल, तर मी कावराबावरा होतो. मग वर्षभर त्याच्याशिवाय कसा राहू? नको ते प्रधानपद. हे लहानसे घर, ही छोटाशी बाग, हा लहान मळा, पुरे. मी नाही शिरीषचे नाव देणार.’ ‘परंतु शिरीष आपल्या गावचे भूषण आहे हे सर्वांना माहीत आहे. अधिका-यांना माहीत आहे. मागे शिरीषने एका भांडणात दिलेला न्याय ऐकून प्रांताधिकारी प्रसन्न झाला होता. तुम्ही शिरीषचे नाव नाही दिले तर राजाच्या कानांवर गेल्याशिवाय राहाणार नाही.’ शेजारी व सुखदेव ह्यांचे बोलणे चालले होते. तो शिरीष तेथे आला. ‘बाबा, तुम्ही सचिंत का?’‘शिरीष, तू मला सोडून जाशील?’ पित्याने विचारले.‘शिरीष, राजाचे बोलावणे आले तर जाशील की नाही? राजाची आज्ञा पाळणे हाही धर्मच आहे!’ शेजारी म्हणाला.‘परंतु ती आज्ञा योग्य असेल तर,’ शिरीष म्हणाला.‘राजा यशोधर कधीही अन्याय्य गोष्ट करणार नाही.’ शेजा-याने सांगितले. ‘आईबापांपासून एकुलता मुलगा घेऊन जाणे म्हणजे अन्याय नव्हे का?’ सुखदेव म्हणाला.‘परंतु सर्व प्रजेचे कल्याण व्हावे म्हणून आईबापांनी आपल्या एकुलत्या मुलासही नको का घ्यायला? एकट्याच्या संसारापेक्षा राज्यातील सर्वांचे संसार सुखाचे होणे अधिक श्रेयस्कर नाही का?’ शेजा-याने उत्तर दिले. ‘बाबा, ते काही असो. मी जाणार नाही. तुम्ही माझे नाव देऊ नका. मीही देणार नाही.’ शिरीषने ग्वाही दिली. ‘अरे, तुझे नाव आधीच सर्वत्र गेले आहे.’ असे म्हणून तो शेजारी निघून गेला. दुःखी पित्याची समजूत शिरीषने घातली.
एके दिवशी शिरीष व करुणा शेतात होती. झाडावर एक पक्षी करुण आवाज काढीत होता.‘मादीचा नर गेला वाटते कोठे?’‘का नर मादीला हाक मारीत आहे?’‘किती करुण आवाज!’‘शिरीष, तू नाही मला असाच सोडून जाणार? राजाचे मंत्रिपद तुला मोह नाही ना पाडणार? तू गेलास तर मी अशीच ओरडत बसेन. तुझी करुणा रडत बसेल. नको हो जाऊ.’‘नाही जाणार. तुम्हाला कोणालाही सोडून मी जाणार नाही.’‘शिरीष, लवकरच आपल्या विवाहाचा वाढदिवस येईल.’‘यंदा थाटाने साजरा करु. शेजारच्या गावचे गवई बोलावू.’आणि लग्नाचा वाढदिवस आला. बागेत तयारी करण्यात आली. सुंदर फुले फुलली होती. मध्ये गालिचा होता. रात्री मुख्य जेवण झाले. सुखदेव व सावित्री, शिरीष व करुणा तेथे होती. शिरीषचा मित्र प्रेमानंद तोही तेथे होता. गायन-वादन सुरु झाले. आकाशात चंद्र होता. मंद वारा वाहात होता. फुलांचा परिमळ सुटला होता. आनंदाला भरती आली होती.‘करुणा, तू म्हण तुझे आवडते गाणे.’ शिरीष म्हणाला.‘माझा गळा चांगला नाही.’ ती म्हणाली.‘तुझा गळा मला गोड वाटतो. म्हण!’आणि करुणेने आढेवेढे न घेता ते गाणे म्हटलेः‘कर्तव्याचा जीवनात सुगंधसत्प्रेमाचा जीवनात आनंद।।ध्रु.।।चिंता नाही माते। सेवा होई माते। मुक्त आहे जरी संसार-बंध ।। कर्त० ।।भाग्य माझे थोर। नाही कसला घोर।प्रभु पुरवी माझे सारे सच्छंद।। कर्त० ।।’
परंतु ही कसली तिकडे गडबड ! घो़डेस्वार दौडत आहेत. टापटाप आवाज येत आहेत. सारे घाबरले. गाणे संपले. आनंद अस्तास गेला. तो पाहा एक दिवा मालवला आणि चंद्रही खाली वळला. अंधार होणार वाटते !‘काय रे शिरीष, काय आहे ?’ पित्याने विचारले.‘राजाचे दूत आहेत. प्रांताधिपतीकडून आले आहेत. हे पाहा आदेशपत्र.’सुखदेवाने ते आदेशपत्र वाचले. शिरीषची मागणी करण्यात आली होती. राजाच्या कानावर शिरीषचे नाव गेले होते. प्रांताधिपतीने शिरीषला पाठवले नाही, म्हणून राजा यशोधर रागावला होता. प्रांताधिपतीने ताबडतोब शिरीषला आणण्यासाठी घोडेस्वार पाठवले होते.‘चला निघा !’ आलेला नायक म्हणाला.‘एकुलता एक मुलगा नेऊ नका.’ पिता म्हणाला.‘आम्ही पिकली पाने झालो. नको नेऊ म्हाता-यांची काठी !’ सावित्रीबाई म्हणाली.‘त्यांना न्याल तर मी कोठे जाऊ !’ करुणा म्हणाली.‘तुम्ही सारी रडता का ? तुमचे दैव थोर आहे. ह्या शिरीषला राजा प्रधान करील. वेडी दिसता तुम्ही !’ तो नायक हसून म्हणाला.‘आजची रात्र तरी नका नेऊ. आज शिरीषच्या लग्नाचा वाढदिवस साजरा होत आहे. आजीची रात्र तरी आनंदात जाऊ दे. उद्या न्या. म्हाता-याचे ऐका.’ सुखदेव रडत म्हणाला.‘बरे सकाळी नेऊ. सकाळी मात्र आढेवेढे चालणार नाहीत. ब-या बोलाने शिरीष येणार नसेल, तर मुसक्या बांधून त्याला न्यावे लागेल. तुम्ही त्याचे नाव लपवून ठेवलेत. प्रांताधिपती चिडला आहे. आता तरी तुम्ही मूर्खपणा करु नका.’
असे म्हणून तो नायक घोडेस्वरांसह निघून गेला. समारंभ संपला. आईबापांसह व पत्नीसह शिरीष घरी आला. चौघे खिन्न होऊन बसली.‘बाळ, नको रे तू जाऊस. काय व्हायचे असेल ते होईल !’ आई म्हणाली.‘अग, असे करुन कसे चालेल ? त्याला बांधून ते नेणारच आणि शिवाय असे बघ, नाही तरी आपण म्हातारीच झालो. बाळाचे दैव उदयास येत आहे. आपण कशाला आड यावे ?’ जाऊ दे त्याला राजधानीला होऊ दे प्रधान शेतात कष्ट करायला नकोत. राजवाड्यात राहील. हत्तीवर बसेल. जाऊ दे त्याला. आपण मायाममतेने आंधळी होऊन त्याच्या भविष्याचे का वाटोळे करावे ? मनुष्याने दूरचे पाहावे. जा हो शिरीष. आम्ही आमचे दुःख गिळू. तू मोठा हो, तुझी कीर्ती दिगंबरात जाऊ दे.’‘बाबा, मला कीर्ती नको, वैभव नको. शेतात काम करायचा मला कंटाळा नाही. मी शेतात काम करीत असतो, त्या वेळेस सूर्य आशीर्वाद देतो. वारे वारा घालतात. पक्षी गाणी गातात. तहान लागली तर नद्या पाणी देतात. आणि मूलता प्रसन्नपणे हसते. मला शेतात काम करायला खरेच आवडते. नको ते मंत्रिपद, नकोत ते राजवाडे.’‘बाळ, परंतु हट्ट चालणार नाही.’ ते तुझ्या मुसक्या बांधून नेतील. ’‘तसे करतील तर मी प्राण देईन. ‘नको, असे नको करुस. कोठेही असं. परंतु सुखरुप आस. माझे तुम्ही ऐका. शिरीषला जाऊ दे.’‘जा हो, बाळ,’ माता म्हणाली.‘करुणे, जाऊ का ?’ शिरीषने विचारले; परंतु करुणा एकदम हुदका देऊन निघून गेली.