Karunadevi - 10 books and stories free download online pdf in Marathi

करुणादेवी - 10

करुणादेवी

पांडुरंग सदाशिव साने

१०. मी चोर नाही; तुम्ही चोर आहात

करुणा प्रातःकाळी उठे. शीतलेच्या शीतल पाण्यात स्नान करी. नंतर सोमेश्वराचे दर्शन घेऊन ती आपल्या ओवरीत एकतारीवर भजन करीत बसे. घटकाभर दिवस वर आला, म्हणजे ती राजधानीत भिक्षा मागे. तिला एकटीला कितीशी भिक्षा लागणार ? तिची गोड भजने ऐकून लोक तल्लीन होत. मुले-मुली ओंजळी भरभरुन तिला भिक्षा घालीत. करुणा स्वतःपुरती भिक्षा ठेवून उरलेली बाकीच्या अनाथ-पंगूस देऊन टाकी.राजधानीत ती हिंडे. रोज निरनिराळ्या रस्त्यांना जाई; परंतु राजाच्या राजवाड्याकडे, प्रधानाच्या प्रासादाकडे जाण्याचे तिला धैर्य होत नसे. कोठे तरी पती दृष्टीस पडावा म्हणून तिचे डोळे तहानेले होते.ओवरीत शिरीषचे चित्र हृदयाशी धरुन ती बसे. पुन्हा ते चित्र ती ठेवून देई. खरोखरच शिरीष कधी भेटेल ? खरेच, कधी भेटेल ? वसंत ऋतू आला. सृष्टी सजली. वृक्षांना पल्लव फुटले. कोकिळा कुहू करु लागली. करुणेला वाढदिवस आठवला. विवाहाचा वाढदिवस. किती तरी वर्षांत तो साजरा झाला नव्हता. यंदा होईल का ? माझ्या जीवनात वसंत केव्हा येईल ? माझ्या शुष्क संसाराला पल्लव केव्हा फुटतील ? माझ्या भावना पुन्हा मंजुळ गाणी केव्हा म्हणू लागतील ? जीवनाचे नंदनवन केव्हा बहरेल, आनंदाने गजबजेल ? यंदा येईल का वसंत ?सोमेश्वराच्या मंदिरातील प्रख्यात यात्रा वसंत ऋतूतच असे. यात्रेचे दिवस जवळ आले. मंदिराला सुंदर रंग दिला गेला. शेकडो ठिकाणची दुकाने आली. यात्रा म्हणजे कलाकौशल्य, उद्योग, व्यापार, सर्वांचे प्रदर्शन. देशातील सा-या वस्तू तेथे यावयाच्या. मालाची देवघेव, विचारांची देवघेव. व्यापारी व किर्तनकार, प्रवचनकार, मल्ल, नाटकमंडळ्या, नकलाकार, पोवाडेवाले सर्वांची तेथे हजेरी असायची.

सोमेश्वराच्या आसपासचे प्रचंड मैदान गजबजून गेले. दुकानदारांना जागा आखून देण्यात आली. पाले लागली. ह्या बाजूस कापडाची दुकाने, इकडे किराणा माल, मजाच मजा. हलवायीची गर्दी विचारुच नका.

राजधानीतील लोक यात्रा पाहायला येऊ लागले. मुले, मुली येत. वृद्ध येत, श्रीमंत, गरीब सारे येत. यात्रेचा मुख्य दिवस जवळ येत चालला. सोमेश्वराच्या आवारात त्या वत्सल, प्रेमळ मातापित्यांची समाधी होती. तिचे दर्शन घेण्यासाठी, कृतज्ञता प्रगट करण्यासाठी हजारो नारीनर शेकडो ठिकाणांहून येत होते. रथांतून येत होते, हत्तींवरुन येत होते, उंटावरून येत होते, कोणाचे मेणे, कोणाच्या पालख्या, सारी वाहने तेथे दिसत होती.

यात्रेचा मुख्य दिवस आला. करुणेचे हृदय आशेने उचंबळले होते. आज शिरीष येथे आल्याशिवाय राहाणार नाही. हातात एकतारी घेऊन ती बाहेर पडली. आज माझा देव मला भेटणार असे तिला वाटत होते.त्या बाजुला सारे भिकारी होते. जो जो येई, तो पै पैसा टाकायला इक़डेही येई. शिरीष इकडे आल्याशिवाय राहाणार नाही, असे करुणेला वाटले. ती त्याच भिका-यांत एके ठिकाणी भजन करीत बसली.आणि तिने काय केले, ऐका. तिने ते शिरीषचे चित्र काढले. तिने तेथे एक बांबूची काठी पुरली. त्या काठीला तिने ती तसबीर अडकवली. त्या तसबिराला तिने सुंदर घवघवीत हार घातला होता.हजारो लोक येत जात होते. समाधीवर फुले वाहून जात होते. आईबापांविषयी कृतज्ञता शिकून जात होते. आईबाप मुलांवर प्रेम करावे, असे शिकून जात होते. मुले आईबापांविषयी कृतज्ञ राहावे, असे शिकून जात होती.‘हेमा, मी एकटाच जातो दर्शनास. आज मी साध्या भिका-याच्या वेषाने बाहेर पडणार आहे. साध्या शिरीषला आईबापांचे आत्मे भेटतील. वैभवात लोळणा-या अहंकारी शिरीषला भेटणार नाहीत. मला नम्र होऊन आईकडे जाऊ दे. तू तुझ्या आईबापांबरोबर जा. मी एकटाच जाईन.’‘शिरीष, परत ये हो. जाऊ नको वैतागून. तू राजाचा मुख्य मंत्री आहेस. हेमाचा प्राण आहेस. येशील ना परत?’‘येईन. दरवर्षी मी यात्रेला जातो. गेलो का तुला सोडून?’‘परंतु भिका-यासारखा आजपर्यंत कधी गेला नाहीस. आपण सारी बरोबर जात असू. खरे की नाही?’‘परंतु आज एकटाच जातो. रागावू नकोस.’शिरीष वेष बदलून हळूच बाहेर पडला. अंधार पडला होता. यात्रेत लाखो दीप लागले होते. जणू आकाशातील अनंत तारे पृथ्वीवर अवतरले. करुणेची आशा संपत आली. नाही का येणार शिरीष? येईल. रात्रभर लोक येतच राहाणार आणि मोठे लोक रात्रीसच येतील. शिरीषचे चित्र वा-यावर नाचत होते. करुणेचे चित्त आशानिराशांवर नाचत होते. हजारो दिव्यांची ज्योती नाचत होत्या. धडपड़णा-या जीवांप्रमाणे नाचत होत्या.

तो पाहा एक मनुष्य आला. भिका-याच्या बाजूला आला. पै पैसा टाकीत आहे. करुणा भजनात रंगली आहे. डोळे मिटलेले आहेत. कोणते गाणे ती म्हणत होती? जा गाणे विवाहाच्या वाढदिवशी तिने म्हटले होते तेच. कर्तव्याच्या आनंदाने गाणे ती म्हणत होती. एकतारी वाजत होती. हृदयाची तार लागली होती. तो मनुष्य तेथे उभा राहिला.आणि त्याला ते चित्र दिसले! वा-यावर नाचणारे चित्र. त्या माणसाने गाणे म्हणणा-या त्या भिकारणीकडे पाहिले. त्या चित्राकडे पाहिले. ते चित्र त्याने पटकन उचलले, घेतले व तो पुढे चालला.करुणेने डोळे उघडले, तो चित्र नाही. कोठे गेले चित्र? कोणी नेले चित्र? वा-याने का उडाले? अरेरे! ‘कोणी नेले चित्र? तुम्ही पाहिले का?’ जवळच्या भिका-यांना तिने विचारले.‘आम्हाला काय माहीत? आमचे लक्ष तुमच्या चित्राकडे थोडेच होते? आमचे चित्त समोरच्या फडक्यावर काय पडते त्यावर होते.’ ते म्हणाले.‘येथे कोणी आले होते?’‘एक मनुष्य उभा होता. आताच गेला.’‘कोणत्या दिशेने?’‘ह्या.’ती एकदम निघाली. तो चित्र पळवणारा एके ठिकाणी दिव्याजवळ उभा होता. त्या चित्राकडे पाहात होता. करुणेचे एकदम लक्ष गेले. त्या माणसाने इकडे पाहिले. तो वेगाने निघाला. करुणेने चोर ओळखला. तीही त्याच्या पाठोपाठ निघाली.रस्ते ओलांडीत तो मनुष्य ज्या बाजुला राजवाडे होते, प्रासाद होते तिकडे वळला. जरा अंतरावरुन करुणा येत होती. शिरीषचा प्रासाद आला. तो मनुष्य एकदम त्या प्रासादात शिरला. करुणा पाहात होती. किती तरी वेळ त्या प्रासादाकडे पाहात होती. शिरावे का त्या प्रासादात?काही वेळ गेला. इतक्यात राजाकडून रथ आला. शिरीषला बोलावणे आले होते. शिरीष पोषाख करुन त्यात बसला होता. धावत जावे व शिरीषला हृदयाशी धरावे, त्याच्या खांद्यावर मान ठेवून रडावे, असे करुणेला वाटले परंतु पाय जागचा हालेना.

रथ दृष्टीआड झाला. करुणेने एकदम काही तरी मनात ठरविले. ती त्या प्रासादाकडे वळली. पाय-या चढू लागाली. ‘कोठे जाता आत?’ पहारेक-याने हटकले.‘मी भिकारीण आहे.’‘भिकारीण राजवाड्यात शिरते? हो बाहेर.’‘मी आत जाणार.’‘हो बाहेर. दिसतेस बैरागीण; परंतु चोर तर नाहीस?’‘चोर मी नाही. तुम्ही सारे चोर आहात, तुमचे मालक चोर आहेत, तुमचा धनी माझी वस्तू चोरुन घेऊन आला. ह्या भिकारणीची संपत्ती तुमच्या धन्याने चोरली.’‘वेडी तर नाहीस?’तेथे गर्दी जमली. स्त्रीवर हात कोण टाकणार? हेमा बाहेर आली.‘काय पाहिजे बाई?’‘माझी वस्तू.’‘कोणती वस्तू.’‘माझे चित्र द्या नाही तर माझे प्राण घ्या. चित्र, माझे चित्र. ते चोर आहेत. त्यांनी ते चोरून आणले.’‘बाई, रागावू नका, आत या. मला सारे नीट समजून सांगा. या आत.’हेमा त्या भिकारणीला, शिरीषच्या त्या करुणेला आत घेऊन गेली. पहारेकरी पाहातच राहिले!

इतर रसदार पर्याय

शेयर करा

NEW REALESED