स्वराज्यसूर्य शिवराय - 13 Nagesh S Shewalkar द्वारा फिक्शन कथा मराठी में पीडीएफ

Featured Books
श्रेणी
शेयर करा

स्वराज्यसूर्य शिवराय - 13

स्वराज्यसूर्य शिवराय

【भाग तेरावा】

शाईस्तेखानावर वार

सिद्दी जौहर याच्या विषारी विळख्यातून बुद्धीचातुर्याने, धाडसाने, युक्तीने शिवराय सहीसलामत सुटले. स्वराज्याच्या गळ्याशी आलेले फार मोठे संकट टळले परंतु त्यासाठी बाजीप्रभू देशपांडे याजसारखा पराक्रमी मोहरा कायमचा सोडून गेला हे फार मोठे दुःख शिवरायांना झाले. दुसरीकडे आदिलशाही शिवरायांकडून एकामागोमाग एक होणाऱ्या पराभवाने त्रस्त झाली होती, भयभीत झाली होती. अफजलखानाच्या पाठोपाठ सिद्दी जौहरचा झालेला पराभव जास्तच झोंबत होता. शेवटी आदिलशाहीने शिवरायांसोबत तह करताना शिवरायांच्या स्वराज्याला स्वतंत्र राज्य म्हणून स्वीकारले. स्वराज्यात परतलेल्या शिवरायांना बाजीप्रभूच्या बलिदानाचे दुःख करायला तरी कुठे वेळ होता? शाईस्तेखानाच्या रुपाने अजून एक फार मोठे संकट लालमहालात तळ ठोकून होते.सिद्दी जौहरच्या विळख्यात शिवराय अडकलेले पाहून आदिलशाहा आणि औरंगजेब यांनी संगनमत करून शाईस्तेखानास पुणे जहागीरीचा घास घेण्यासाठी पाठवले होते. शाईस्तेखानानेही स्वराज्यात धुमाकूळ घातला होता. लालमहालात तळ ठोकून त्याने आसपासचा परिसर अक्षरशः लुटायला सुरुवात केली होती. परंतु मराठा सैनिक सहजासहजी हार मानायला तयार नव्हते. भलेही शिवराय नसतील परंतु शिवाजीसारख्या महापराक्रमी पुत्राला जन्म देणाऱ्या माता जिजाऊंनी सारी सुत्रं हाती घेऊन अधूनमधून खानाच्या सैन्यावर हल्ले करून त्यांना जेरीस आणले होते.

शिवराय राजगडावर पोहोचले. त्यांनी शाईस्तेखानास कसे पिटाळून लावता येईल याचा विचार सुरू केला परंतु मार्ग सापडत नव्हता. कारण शाईस्तेखानासोबत थोडीथोडकी नाही तर एक लाखाच्या आसपास फौज होती. शस्त्रे, दारूगोळाही फार मोठ्या प्रमाणात होता. काय करावे, कसे करावे, कोणता मार्ग निवडून खानाच्या फौजेचा फडशा पाडावा याचा शिवराय सातत्याने विचार करीत होते. विश्वासू शिलेदारांसोबत चर्चा करीत होते. 'प्रयत्नांती परमेश्वर' त्याप्रमाणे 'विचारांती मार्ग' असा एक अत्यंत धाडसी, क्रांतिकारी मार्ग शिवरायांना सापडला.लालमहालासारख्या गुहेत लपलेल्या, 'वाघ' म्हणवून घेणाऱ्या खानाच्या नरडीचा घोट थेट लालमहालात शिरून घ्यायचा. असा निर्णय घ्यायला माणसाजवळ वाघाचेच काळीज असावे लागते आणि ते शिवरायांजवळ होते हे नेहमीप्रमाणे यावेळीही दिसून आले. शिवरायांनी ताबडतोब आपली विश्वासू माणसे जमवली. त्यांना मनात घोळत असलेला विचार ऐकवला. माँसाहेब, नेताजी पालकर, तानाजी मालुसरे, आबाजी आणि चिमणाजी देशपांडे हे सारे ती योजना ऐकून आश्चर्यचकित झाले. सर्वांनी एकमुखाने क्षणार्धात मान्यता दिली.कुणीही अडचणींचा पाढा वाचला नाही. खानाचे सैन्य, आपले सैन्य, शस्त्रे किंवा इतर कोणत्याही प्रकारे नकारघंटा वाजवली नाही. शिवराय सारा विचार करून निर्णय घेतात हा विश्वास होता. शिवरायांनाही कल्पना होती की, खानासोबत समोरासमोर लढणे शक्य नाही. काही तरी वेगळा डाव खेळावा लागेल. त्यासाठी गनिमीकावा हे आपले प्रभावी अस्त्र वापरायचे असे ठरले. यावेळी या अस्त्रातही थोडासा धोका होताच कारण एखादी बारीकशी चूक अत्यंत महागात पडण्याची दाट शक्यता होती. तशाप्रसंगी इतरांसोबत शिवरायांच्या जीवावर बेतण्याची शक्यता होती. शिवरायांसाठी या मोहिमेत एक बाजू फार भक्कम आणि त्यांच्या जमेची होती ती म्हणजे शाईस्तेखान लालमहालात तळ ठोकून होता. शिवरायांचे बालपण लालमहालात गेलेले असल्यामुळे त्यांना लालमहालाची खडानखडा आणि कोपरानकोपरा माहिती होती. त्यामुळे त्यांनी अल्प सैन्य घेऊन आत कुठून, कसे शिरायचे, कुणी कोणत्या भागात शिरायचे आणि मोहीम फत्ते होताच कुठल्या रस्त्याने निघून कुठे जायचे ह्याचे अगदी चोख नियोजन केले होते. सर्वात महत्त्वाचे म्हणजे शिवरायांच्याजवळ असलेला सकारात्मक दृष्टिकोन, आत्मविश्वास, सहकाऱ्यांवर असलेला विश्वास या गोष्टी त्यांना कोणतेही साहसी पाऊल उचलण्यासाठी प्रवृत्त, प्रेरित करत असत. आणखी एक गोष्ट शिवरायांच्या पथ्यावर पडणारी होती ती म्हणजे तो रमझानचा उपवास होता. याचा अर्थ शाईस्तेखानासोबत असलेले सैनिक हे दिवसभर कडक उपवास करून रात्री उपवास सोडल्यानंतर नक्कीच पेंगुळलेल्या अवस्थेत असणार. अशा अनेक गोष्टी शिवरायांना मदत करू पाहत होत्या.

मराठा हेरांनी हेही हेरून ठेवले होते की, खानाच्या फौजेत असलेल्या राजपूत, मराठा या सैनिकांच्या छावण्या, गस्त कुठे कुठे आहेत, वेळ पडलीच तर त्यांना कसा चकवा द्यायचा हेही निश्चित करून ठेवले होते. सारी तयारी झाल्यानंतर शिवराय माँसाहेबाच्या दालनात गेले. त्यांचा आशीर्वाद घेतला. माँसाहेबानी आशीर्वाद देताना काही मौलिक सुचना केल्या. शिवरायांनी त्यानंतर गडावर असलेल्या भवानीमातेचे दर्शन घेऊन मनोभावे नमस्कार केला. आशीर्वाद मागितला. नियोजनाप्रमाणे मावळ्यांच्या दोन तुकड्या लालमहालाकडे रवाना झाल्या. हे हत्यारबंद मावळे होते. शाईस्तेखानाने उभारलेल्या चौकीतील शिपायांनी या तुकड्यांना अडवून चौकशी केली असता तुकडीसोबत असलेल्या सर्जेराव जेधे या सरदाराने उलट दरडावून विचारले,

"ओळखत नाहीत का? काल संध्याकाळी तुम्ही येथे नव्हता त्यावेळी येथे असलेल्या लोकांना सांगून आम्ही पहारा देण्यासाठी गेलो होतो. रात्रभर पहारा देऊन, गस्त घालून परत जात आहोत. आम्ही शाईस्तेखानाचेच शिपाई आहोत. तुम्ही आम्हाला अडवता? सांगायचे का खानसाहेबांना?" सर्जेरावांचा रोखठोक आणि निर्भीड सवाल ऐकून पहाऱ्यावरील खानाचे सैनिक डगमगले. त्यांनी मावळ्यांना आत जाऊ दिले. पुढे ज्या ज्या चौकींवर जेधे आणि कंपनी पोहोचली. त्या प्रत्येक ठिकाणच्या पहारेकऱ्यांचा असा समज झाला की, ज्याअर्थी अगोदरच्या पहारेकऱ्यांनी यांना आत सोडले त्याअर्थी ही आपलीच माणसे आहेत. नाहक अडवून वेळ कशाला गमवावा या विचाराने मावळ्यांना कुणीही अडवले नाही. सर्जेराव जेधे आणि त्यांचे साथीदार विनासायास गावात पोहोचले. वेळ न गमावता प्रत्येकाने आपापल्या जागा घेतल्या. अशाप्रकारे अर्धी लढाई जिंकल्या गेली. जेधेंच्या पाठोपाठ दोन बैलगाड्या प्रवेश करीत असताना त्यांनाही पहारेकऱ्यांनी अडवले. या गाड्यांसोबत इब्राहिमखान नावाचा मावळा होता. त्यानेही बेडरपणे उत्तर दिले,

"आपल्या सोबत असणारे घोडे, बैलं यांच्यासाठी वैरण आणि कडबा कमी पडतोय. हे गाडीवान यांच्या जनावरांसाठी कडबा, गवत घेऊन जात होते त्यांना पकडून नेत आहे. आपल्या छावणीत हा सारा माल उतरून घेतो आणि मग यांना माघारी धाडतो." इब्राहिमखानाच्या स्पष्टीकरणाने संतुष्ट झालेल्या पहारेकऱ्यांनी त्या गाड्या न तपासता आत जाऊ दिल्या. गाड्या त्यांच्या इच्छित स्थळी पोहोचताच इब्राहिमखानाने गाड्यांमध्ये असलेला कडबा तिथल्या जनावरांना टाकला आणि हलकेच कडब्याखाली लपविलेली शस्त्रे आधी गावात पोहोचलेल्या मराठा सैनिकांकडे सुपूर्द केली अशारीतीने हत्यारांचा प्रश्नही सहजगत्या मिटला…

रात्र झाली. आता शेवटचा आणि निर्णायक टप्पा तो म्हणजे शिवराय आणि इतरांचा लालमहालात प्रवेश. शिवराय आणि त्यांचे विश्वासू सहकारी पुण्यापासून जवळ असलेल्या एका शेतात आले होते. सर्वत्र अष्टमीच्या चंद्राचा शितल, मनमोहक प्रकाश पसरला होता. मध्यरात्र होत होती. रातकिड्यांचा आवाज सर्वत्र घुमत होता. शिवराय पायीच निघाले. त्यांच्यासोबत चिमणाजी देशपांडे हा लढवय्या सैनिक आणि शिवरायांचा बालपणापासूनचा मित्र होता.चिमणाजी सोबत चांदोजी जेधे, कोयाजी बांदल यासह दोनशे मावळे शांतपणे, चुपचाप निघाले. गनीम हजारोंच्या संख्येने आणि मावळे किती... चारशे! दोनशे सैनिकांची अजून एक तुकडी घेऊन बाबाजी सोबत निघाले होते. मध्यरात्र झाली असल्याने आणि दिवसभराचा उपवास सोडून खानाची माणसे शांत झोपली होती. त्यांना स्वप्नातही असे वाटले नसणार की, आपला शत्रू आपल्या या अवस्थेचा फायदा घेत आहे. तो हाताच्या अंतरावर येऊन उभा ठाकला आहे.खुद्द शाईस्तेखानही आपल्या शयनगृहात गाढ झोपेत होता. जागे होते ते फक्त स्वयंपाकी! कारण लवकरच उपवासाला सुरुवात होण्यापूर्वी, सूर्योदयापूर्वी सैनिकांना जेवण लागणार होते. आणि स्वयंपाक करण्याच्या हेतूने आचारी जागे होत होते. तयारीला लागले होते. स्वयंपाक घराच्या बाजूला पाण्याचे कोठार किंवा आबदारखाना होता. स्वयंपाक खोलीतून खानाच्या शयनगृहात जाण्यासाठी असलेली वाट बंद केलेली होती. हे बांधकाम पाडून शयनगृहात जावे लागणार होते. शिवराय आणि त्यांचे शूरवीर स्वयंपाक घरात तर शिरले परंतु तिथले बांधकाम केलेली भिंत पाडताना आवाज तर होणार आणि हे जर आचाऱ्यांच्या लक्षात आले तर आरडाओरडा होणार आणि सारा शत्रू जागा होणार. यावर उपाय तो काय? उपाय एकच आचाऱ्यांचा बळी घेणे.वास्तविक त्यांचा बिचाऱ्यांचा काहीही दोष नव्हता. शिवरायांनाही अशा निष्पापांना त्रास देणे, मारणे आवडत नसे. परंतु ती वेळ कुणावर माया करायची, सहानुभूती दाखवायची नव्हती. स्वराज्यात असलेली अशीच निर्दोष माणसे शाईस्तेखानाने मारली होती. शेवटी गनिमाला कोणत्याही प्रकारची मदत करणारा तो गनीमच! या विचाराने मावळे स्वयंपाक घरात झोपलेल्या, जागे असलेल्या आचाऱ्यांना त्यांना काही समजू न देता, कोणताही आवाज न करता ठार करू लागले. दुसरीकडे काही मावळे ती भिंत पाडत होते. बांधकाम पक्के नसल्याने विनासायास पडत होते परंतु घात झाला. स्वयंपाक घराच्या बाजूला झोपलेला एक नोकर त्या हलक्या आवाजाने जागा झाला. 'स्वयंपाक घरात काही तरी गडबड आहे.' एवढेच त्याला समजले. तो लगबगीने उठला आणि सरळ शाईस्तेखानाच्या शयनगृहाकडे धावला. घाबरलेल्या अवस्थेत तो ओरडला,

"ख..ख...खा.. खानसाहेब..." त्याच्या लागोपाठच्या आवाजाने खानाची झोप चाळवली.

तो अर्धवट झोपेत ओरडला, "कोण आहे रे?" काही प्रमाणात सावरलेला नोकर म्हणाला,

"खानसाहेब, मुदपाकखान्यात काही तरी गडबड आहे. कशाचे तरी आवाज येत आहेत."

ते ऐकून चिडलेल्या आवाजात खान म्हणाला,"नालायक, आचारी उठले असतील."

तितक्यात शिवराय आणि काही मावळे त्या पाडलेल्या भगदाडातून आत शिरत असताना काही दासी जाग्या झाल्या. त्यांनी पाहिले की, खूप सारी माणसे हातात तलवारी घेऊन गुपचूप शिरत आहेत. अशा रात्रीच्या वेळी आपली माणसे नंग्या तलवारी घेऊन कशाला शिरतील? याचा अर्थ आत शिरलेली माणसे गनीम आहेत, शत्रू आहेत. हे लक्षात येताच दासींनी खानाच्या शयनगृहाकडे 'गनीम... गनीम... शत्रू...' असे ओरडत धाव घेतली. ती धावाधाव ऐकून शाईस्तेखान रागारागाने उठला. स्वतःचे शस्त्र घेऊन तो घाईघाईने निघाला. काही मावळे खानाच्या समोर आले. ते पाहून खानाने बाण सोडला. तो चुकवून त्या मावळ्याने खानावर वार केल्याचे पाहून काही चतुर दासींनी सर्व दिवे मालवायला सुरुवात केली. दुसऱ्या काही दासींनी खानाला धरून बाजूला ओढले. दिवे बंद झाल्यामुळे काहीही दिसत नव्हते. मावळे अंधारात जबरदस्त वार करून गनीम कापून काढत होते. या झटापटीत खानाच्या दोन बेगमही सापडल्या. एक बेगम जागीच ठार झाली. वास्तविक शिवराय आणि त्यांचे सैनिक कधीही स्त्रियांवर हल्ला करीत नसत. युद्धाच्या धुमश्चक्रीत एखादी स्त्री समोर आली, सापडली तर त्या महिलेचा आदरसत्कार करण्याची शिवरायांची परंपरा होती परंतु त्या अंधारात समोर कोण येते आहे हेच कळत नसल्याने तसे प्रकार घडत होते. शिवराय स्वतः शाईस्तेखानास शोधत होते. त्यांना शाईस्तेखानास यमसदनी पाठवायचे होते. अनेक महिन्यांपासून शाईस्तेखान स्वराज्यात गोंधळ घालत होता, निष्पापांचे प्राण घेत होता अशा शाईस्तेखानाच्या नरडीचा घोट घेण्याची तहान शिवरायांच्या तलवारीला लागली होती.तो सारा गोंधळ ऐकून शाईस्तेखानाचा मुलगा अबुल फत्तेखानाला जाग आली. परिस्थितीचे गांभीर्य ओळखून तलवार उपसून तो धावला. त्यानेही अंधारात वार करायला सुरुवात केली. त्याच्या तलवारीने दोघा तिघांना यमसदनी पाठविले परंतु ती खानाची माणसे होती की शिवरायांची ते अंधारात समजत नव्हते. शिवरायांचे दोन विश्वासू शिलेदार जेधे आणि बांदल हेही जखमी झाले. दुसरीकडे प्राणपणाने लढणारा, बापाचा जीव वाचवण्यासाठी धडपडणारा फत्तेखान मावळ्यांच्या तडाख्यात सापडला आणि प्राणास मुकला.

शिवराय शाईस्तेखानास शोधत शोधत एका दालनाच्या जवळ गेले. त्या दालनात खानाच्या स्त्रियांनी खानाला लपवले होते. शिवरायांनी ते ओळखले. त्यांनी अंधारात तलवार चालवली त्या घावाने पडदा फाटला. निर्वाणीची वेळ ओळखून शाईस्तेखानाने तलवार उपसली. शिवरायांची नजर अंधाराला सरावली होती. त्यांनी अंदाजाने खान कुठे आहे ते ओळखले आणि पुढे जाऊन त्यादिशेने तलवारीने एक जोरदार घाव घातला. शिवाजी इथपर्यंत पोहोचला ह्या धक्क्याने खान घाबरला होता त्याने खिडकीतून उडी मारण्याचा प्रयत्न केला असताना शिवरायांच्या तलवारीचा जोरदार फटका त्याच्या हातावर बसला आणि त्याची तीन बोटे तुटली...'जीवावर आले पण बोटावर निभावले.' अशा अवस्थेत खान धावत सुटला. शिवरायांचा असा समज झाला की, खान मरण पावला...…

हे सारे घडत असताना, प्रचंड प्रमाणात होणारा गोंधळ, आरडाओरडा ऐकून जागे झालेले सैनिक आपापली शस्त्रे सावरत महालाच्या मुख्य दरवाजाजवळ जमा झाली परंतु त्यांना आतमध्ये प्रवेश करता येत नव्हता कारण आत शिरल्याबरोबर नियोजनाप्रमाणे मावळ्यांनी आतून दरवाजा बंद केला होता. ते सर्व ओरडत होते, 'गनीम... गनीम...'

ते ऐकून शिवरायांची माणसेही मुद्दाम ओरडू लागली,'गनीम... गनीम.... कुठे आहे?' सोबतच खानाच्या पहारेकऱ्यांवरही मावळे ओरडू लागले,'शत्रू थेट आत घुसलाच कसा? तुम्ही काय झोपा काढत होते का?' एकूण काय तर मावळे ठरवल्याप्रमाणे वागत होते. घाबरलेल्या बलाढ्य फौजेलाअजून घाबरवत होते, गोंधळात टाकत होते. शेवटी कुणीतरी मुख्य दरवाजा उघडला. खानाची फौज आत शिरली. 'गनीम आया, गनीम आया...' असे स्वतःच ओरडत शिवराय आणि मावळे महालाच्या बाहेर पडले. बाहेर नेताजी पालकर आणि मोरोपंत वाट पाहात उभेच होते. शिवराय त्यांच्या सहकाऱ्यांसह आणि जागोजागी थांबून दिलेली कामगिरी यशस्वीपणे पार पाडणाऱ्या मावळ्यांसह सिंहगडाच्या दिशेने वेगाने निघाले. यावेळीही शिवरायांनी एक काळजी घेतली होती,एक वेगळीच व्यवस्था केली होती.आपण लालमहालातून निघालो आणि सिंहगडाकडे जात आहोत हे खानाच्या फौजेच्या लक्षात येणार आणि चिडलेला, रागावलेला,संतापलेला गनीम आपल्या पाठलागावर येणार हे शिवराय जाणून होते. घडलेही त्याचप्रमाणे. खवताळलेले शाहिस्तेखानाचे सैनिक शिवरायांच्या पाठलागावर निघाले. बाहेर पडल्या पडल्या दूरवर त्यांना पेटलेल्या मशालींचा उजेड दिसला आणि मावळे मशालींच्या प्रकाशात पळून जात आहेत हे समजून खानाची फौज तिकडे धावत सुटली. पण हाय रे दैवा! त्यांनी 'त्या' शत्रूला गाठले परंतु धोका पुन्हा धोका! नेताजी पालकर यांनी दिलेली ती सणसणीत चपराक होती. जणू पाठीवर जखमांचे ओझे घेऊन आलेल्या खानाच्या सैनिकांवर कुणीतरी मीठ-तिखटाची उधळण केली होती.जबरदस्त खेळी होती. लालमहालातून शिवराय बाहेर पडताच सिंहगडाकडे निघाले आणि नेताजीच्या इशाऱ्यावर एका मावळ्याने शिंग फुंकले तो इशारा होता कात्रजच्या घाटात शेकडो बैलांना घेऊन वाट पाहणाऱ्या मावळ्यांसाठी! घाटातील मावळ्यांनी केलेली तयारी वेगळीच होती. त्यांनी बैलांच्या शिंगांना पलिते बांधून ठेवले होते. इशारा होताच ते पलिते पेटवून देताच ते बैल वाट फुटेल तिकडे धावत सुटले. ते पळणारे बैल म्हणजेच मावळे असे समजून खानाची फौज तिकडे पळत सुटली परंतु खरा प्रकार समजताच रागाने त्यांच्या अंगाची लाही लाही झाली. सारा प्रकार लक्षात येईपर्यंत शिवराय साथीदारांसह फार दूर निघून गेले...…

शाईस्तेखान आपल्या हातून ठार झाला या आनंदात शिवराय सिंहगडावर पोहोचले. शत्रूला मात देण्यात आणि चकवा देण्यात आपण यशस्वी झालो असे समजून शिवराय सिंहगडावरून राजगडावर पोहोचले.परंतु खानाची केवळ तीन बोटे तुटली असल्याची खबर शिवरायांना कळाली. शिवराय काही क्षण नाराज झाले पण लगेच म्हणाले,

"ठीक आहे. बोटे तर बोटे! अद्दल तर घडली."

राजगडावर पोहोचताच शिवराय माँसाहेबाच्या भेटीला गेले. त्यांना नमस्कार करून म्हणाले,"माँसाहेब, मोहिम फत्ते झाली. शास्ताखानास शास्त घडवली......" याठिकाणी शिवराय शास्त असे 'शिक्षा' याअर्थाने म्हणाले. राजगडावर आणि स्वराज्यात सर्वत्र आनंदाचे वातावरण पसरले.

तिकडे शाहिस्तेखानाच्या पराभवाने चिडलेल्या औरंगजेबाने त्याची बदली बंगाल प्रांतात केली. ही बदली म्हणजे औरंगजेबाने खानाला दिलेली शिक्षाच होती. खान मनोमन चिडला, तडफडला, संतापला. फार मोठ्या अपमानाचा घोट गिळून तो बंगालकडे रवाना झाला.......

नागेश शेवाळकर