स्वराज्यसूर्य शिवराय
【भाग बारावा】
बाजीप्रभूची स्वामीनिष्ठा
स्वराज्यावर आलेली संकटाची मालिका खंडित होण्याची शक्यता दिसत नव्हती. स्वतः शिवराय सिद्दी जौहरच्या वेढ्यात पन्हाळगडावर अडकले होते. जौहर भर पावसाळ्यातही वेढा शिथिल होऊ देत नव्हता. दुसरीकडे शाईस्तेखान लालमहालात बसून स्वराज्याची हानी करत होता. तातडीने काहीतरी निर्णय घेणे आवश्यक होते. युक्ती, शक्ती, गनिमीकावा वापरून गनिमांना हैराण केलेच पाहिजे या विचाराने शिवरायांनी एक धाडसी निर्णय घेतला. एक जोखीम पत्करण्याचे ठरवले. विश्वासू सहकाऱ्यांनाही शिवरायांचे म्हणणे पटले. त्यांनीही होकार दिला. लगेचच सर्वांनी मिळून त्या योजनेला मूर्त स्वरूप देण्याची योजना आखण्याची तयारी सुरू केली. हे सारे करत असताना कमालीची खबरदारी घेतली जात होती. 'भिंतीला असणाऱ्या कानांनाही' आणि सिद्दीच्या खबऱ्यांनाही काहीही कळू नये याकडे डोळ्यात तेल घालून लक्ष दिले जात होते..
दुसरीकडे ज्याच्यावर शिवरायांची भिस्त होती त्या बहादूर नेताजी पालकर यांना शिवराय आणि स्वराज्यावर आलेल्या संकटाची माहिती मिळाली. त्याने विचार केला की, शाईस्तेखानास नंतर बघता येईल. आधी शिवरायांना सोडविणे गरजेचे आहे. त्याचबरोबर नेताजीने हाही विचार केला की, शिवरायांना सोडवण्यासाठी सिद्दी जौहरवर चालून जाऊन, त्याने आवळलेला विळखा सोडवणे गरजेचे आहे. परंतु आपल्याजवळ असलेल्या सहा - सात हजार फौजेकडून सिद्दीच्या प्रचंड सैन्याशी झुंज देणे अवघड होऊन बसेल त्यासाठी सरळ विजापूरवरच हल्ला करावा कारण बराचसा ताफा जौहरसोबत आहे. आदिलशाहीजवळ त्यामानाने कमी सैन्य असणार आहे. त्यामुळे विजापूरवर चढाई केली तर नाइलाजाने सिद्दी जौहरला किंवा त्याच्या काही बलाढ्य सरदारांना वेढा सोडून विजापूरकडे धाव घ्यावी लागेल. एकदा का सिद्दीचे बळ कमी झाले की, त्याचा पराभव करणे अवघड नाही असा विचार करून नेताजी आपल्या शूरवीर साथीदारांसह थेट विजापूरच्या दिशेने निघाला. वाटेत असणारी अनेक आदिलशाही ठाणी ताब्यात घेत सरळ विजापूरच्या जवळ असलेले शाहपूर गाठले त्यावेळी रात्र झाली होती. परंतु दिवसाची रात्र करून शिवरायांना सोडवायचे या एकाच ध्येयाने पेटलेल्या मावळ्यांनी रातोरात शाहपूर नगरावर जबरदस्त हल्ला बोलला. गाढ झोपेत असलेला गनीम कापून काढला. दुसऱ्या दिवशीच्या सकाळी सकाळी शाहपूर सोबत विजापूरमध्येही हाहाकार उडाला. ही कोणती नवी आफत आली, हा कोणता नवा नत्रू विजापूर गिळायला येतोय,शिवाजीला तिकडे सिद्दीने आवळून टाकलेला असताना विजापूरनगरीवर चाल करून येणारा हा कोण? विचार करायला तरी आदिलशाहीजवळ वेळ कुठे होता? त्याने होती नव्हती तेवढी फौज देऊन खवासखान नावाच्या सरदाराला नेताजीवर पाठवले.
विजापूरनगरीत प्रवेश करण्यापूर्वीच खवासखानाने नेताजीला अडवले. तुफान युद्ध सुरु झाले. नेताजींच्या मानाने खवासखानाची सेना ताजीतवानी होती. मागील काही महिन्यांपासून नेताजी आणि सैनिक कुठल्या ना कुठल्या मैदानावरच होते. खवासखान चवताळून मराठा सैन्यावर वार करीत होते. नेताजीने ओळखले सध्या तरी लढणे शक्य नाही. नाहक साऱ्या शूरवीरांचे बळी देण्यात अर्थ नाही त्यापेक्षा माघारी फिरलेले बरे. याविचाराने नेताजीने फौजेला माघारी फिरण्याचे आदेश दिले. मराठी सेना मागे फिरते आहे, हे पाहून खवासखान आणि सैन्यात आनंद पसरला. परंतु खवासखानाने मराठ्यांचा पाठलाग मात्र केला नाही. नेताजी पालकर पाठ दाखवून पळाला यातच आनंद मानून खवासखान विजापूर दरबारी पोहोचला..…
तिकडे राजगडावर जिजाऊ माँसाहेब चिंतेने व्याकूळ झाल्या होत्या. पराक्रमी राजा संकटात होता. लालमहालात तळ ठोकलेला शाईस्तेखान रयतेचा प्रचंड छळ करीत होता. अशा परिस्थितीत एखाद्या बाईने शाईस्तेखानास शरण जाऊन कदाचित स्वराज्यावर पाणी सोडले असते परंतु जिजाऊंच्या मनाला तो विचार शिवला नाही. त्या नेटाने, हिंमतीने, धाडसाने अधूनमधून शाईस्तेखानावर मावळे पाठवून जेरीस आणत होत्या. कित्येक महिन्यांपासून भेट नसेलल्या शिवबाची भेट घेण्यासाठी त्यांचा जीव तळमळत होता, कासावीस होत होता. बरे, असेही नव्हते की, त्यांचा लाडका तिकडे आरामदायी जीवन जगत होता. उलट शिवराय हाती तलवार घेऊन गनिमांचा फडशा पाडत होते. शिवराय मजबूत वेढ्यात अडकले होते त्यामुळेच जिजाऊंच्या गळ्याखाली घास उतरत नव्हता, जेवण जात नव्हते, झोप लागत नव्हती. शेवटी त्यांनी एक निर्णय घेतला... क्रांतिकारी निर्णय! स्वतः पन्हाळ्यावर जाऊन त्या सिद्दीचा वेढा फोडून शिवबाची सुटका करण्याचा तो निर्णय! अशा निर्णयासाठी वाघिणीचे काळीज लागते, माता जगदंबेची शक्ती लागते ती खरोखरीच माँसाहेबाच्याजवळ होती म्हणून तो तसा निर्णय घेऊ शकल्या. जिजाऊंनी निर्णय घेतला आणि भवानीमाता पावली. नेताजी पालकरांचे राजगडावर आगमन झाले. जिजाऊंना वाटले, आला शेर आला. वाघाचे काळीज असलेला पठ्ठ्या आला. माझ्या शिवबाला सोडवू शकणारा शूरवीर आला. पण हे काय यांचे चेहरे हिरमुसलेले, काळवंडलेले का आहेत? काय घडले? काही अशुभ वार्ता तर नसेल ना? तितक्यात नेताजीने झालेला सारा प्रकार, मानहानी भीतभीत माँसाहेबांना सांगितली. माँसाहेब रागावल्या. शिवरायांना सोडवायचे सोडून विजापूरकडे का गेलात असाही जाब विचारला. त्याचेही स्पष्टीकरण नेताजीने दिले आणि पुढे म्हणाला,"माँसाहेब, रागावू नका. आपला राग, तळमळ मी समजू शकतो. आल्या पावली माघारी जातो. पन्हाळागडाच्या पायथ्याशी ठाण मांडून बसलेल्या सिद्दी जौहरला धडा शिकवतो, त्याला पळवून लावतो...." असे सांगत क्षणाचीही विश्रांती न घेता नेताजी पालकर आणि त्याच्या सोबतअसलेला सिद्दी हिलाल दोघेही पन्हाळगडाकडे धावत निघाले..…
तिकडे पन्हाळगडावर शिवराय स्वतः घेतलेल्या निर्णयावर ठाम होते?काय होता त्यांचा निर्णय?कोणते धाडस करण्याची योजना शिवराय आखत होते.त्यांची योजना होती,गड सोडण्याची. होय! सिद्दी जौहरच्या डोळ्यात धूळ फेकून पन्हाळगडावरून पुन्हा स्वराज्यात जाण्याची ते तयारी करत होते. केवढी जोखीम होती, सरळसरळ सिद्दी जौहर नामक यमदूतास ते आवाहन होते. दुर्दैवाने त्याच्या हाती शिवराय सापडले तर ? नाही... नाही... आपण ही कल्पनाच करु शकत नाही. परंतु शिवरायांजवळ किंतु, परंतु, अशक्य हे शब्दच नव्हते. त्यांनी त्यांच्या अत्यंत शूर, धाडसी अशा एका सहकाऱ्याला बोलावले. त्याचेही नाव शिवाजी होते. त्याला शिवराय म्हणाले,
"शिवा, स्वराज्य संकटात आहे.आपण सारे संकटात आहोत परंतु हातपाय गाळून चालणार नाही. माझ्या मनात एक विचार घोंघावत आहे. पण त्यात फार मोठी जोखीम आहे. यशस्वी झालो तर स्वराज्य जिंकेल, मावळे जिंकतील पण ..." बोलताना शिवराय थांबलेले पाहून शिवा म्हणाला,"सांगा राजे, सांगा. माझ्यासाठी काय काम आहे ते सांगा. स्वराज्यासाठी प्राण गेला तरी बेहत्तर. चकार शब्द काढणार नाही."
"आम्हाला तो विश्वास आहे म्हणूनच...." असे सांगत शिवरायांनी सारी योजना शिवाजीला ऐकवली. ऐकून आनंदी झालेला शिवा म्हणाला,
"महाराज अशा कामगिरीसाठी आपण माझी निवड केली हा माझा मोठा बहुमान आहे. येतो मी..."असे म्हणून शिवाने अत्यंत आनंदाने शिवरायांचा निरोप घेतला....…
महाराज आपल्या योजनेचा आढावा घेत असतानाच एक बातमी आली. नेताजी पालकर आणि सिद्दी हिलाल पन्हाळ्याच्या रोखाने येत आहेत. ही बातमी ऐकून शिवराय आनंदले. तीच बातमी सिद्दीलाही समजली. नेताजीला गडाजवळ येऊच द्यायचे नाही असा निर्णय त्याने घेतला. त्याने मराठ्यांचा डाव ओळखला.गडाला वेढलेला एकही सैनिक न पाठवता जौहरने आपली राखीव फौज बाहेर काढली आणि त्या फौजेला नेताजीच्या सैन्यावर हल्ला करायला पाठवले. नेताजीच्या सैन्यापुढे जौहरचे सैन्य येताच युद्धाला तोंड फुटले. घणाघाती वार होऊ लागले. कुणी मागे हटत नव्हते. तितक्यात घात झाला सिद्दी हिलालचा मुलगा वाहवाह याच्यावर फार मोठा वार झाला. तळमळणारा वाहवाह खाली पडला. त्याला शत्रूने घेरल्याचे पाहून त्याला वाचविण्यासाठी हिलाल तिकडे धावला. त्याने संतापाने शत्रूवर घणाघाती वार करायला सुरुवात केली. परंतु तुलनेने शत्रू अधिक होता. शत्रू वाहवाह यास ओढून नेत असल्याचे पाहून मराठा सैनिकांचे धाबे दणाणले, धीर खचला. मराठा सैन्य घाबरून पळत सुटले. नेताजी पालकर आणि फौजेचा फार मोठा पराभव झाला ही बातमी शिवरायांना समजली. ते अत्यंत दुःखी झाले. परंतु खचले नाहीत..
नियोजनाप्रमाणे शिवरायांनी आपले वकील गंगाधरपंत यांना एक लखोटा देऊन जौहरकडे पाठवले. काय होते त्या लखोट्यात? शिवरायांनी सिद्दी जौहरकडे शरणागती पत्करत असल्याचे पत्र पाठवले होते. त्यात लिहिले होते, 'मी यापूर्वीच आपली भेट घ्यायला हवी होते. परंतु मनात घर केलेली भीती आणि माझे नशीब यामुळे भेट घेऊ शकलो नाही. आपली परवानगी असल्यास रात्रीच्या वेळी अगदी कमी, विश्वासू लोकांसोबत भेटायला येईल. माझी सर्व धनदौलत मी विजापूर दरबारी पेश करायला तयार आहे.' पत्र वाचून जौहर आश्चर्यात पडला. हे तर नवलच घडले. पराक्रमी शिवाजी, अफजलखानाचा कोथळा बाहेर काढणारा शिवाजी शरण येतोय, म्हणजे वैर संपले! युद्ध न करता शिवाजीची दौलत, गड सारे सारे अलगद मिळणार. व्वा! यापेक्षा दुसरे काय हवे? दगाफटका करण्यात शिवाजी माहीर आहे पण येथे त्याची डाळ शिजणार नाही. काही चाल खेळलीच तर तीस हजार फौजेच्या गराड्यातून शिवाजी निसटूच शकणार नाही. त्याने तातडीने शिवरायांचा प्रस्ताव स्वीकारला. ती बातमी सिद्दीच्या सैन्यात पोहोचली. सारेजण आनंदले. न लढता मिळालेल्या विजयाचा जल्लोष करण्याची तयारी सुरू झाली. गंगाधरपंत लगोलग गडावर आले. त्यांनी सारे वर्तमान शिवरायांच्या कानावर घातले. शिवरायांनी ठाम निर्णय घेतला. त्याच रात्री गडावरून कुच करण्याचा.…
रात्र झाली. आषाढ मासाचा मुसळधार पाऊस पडत होता. सिद्दीचे सैन्य नेहमीपेक्षा गाफील होते. एकतर तशा मुसळधार पावसात गडावरील कुणी खाली उतरून येणार नाही ही खात्री तर होतीच आणि महत्त्वाचे म्हणजे शिवाजीने माघार घेतली आहे तो उद्या शरण येणार आहे यामुळे बरेचसे सैन्य आनंद साजरा करण्यात, खान्यापिण्यात आणि पाठोपाठ निद्राधीन होण्यात समाधान मानत होते. शिवरायांनी त्र्यंबकपंतावर पन्हाळगडाची जबाबदारी सोपविली. त्या काळोख्या आणि धुवाँधार वातावरणात शिवराय निघाले. शिवरायांसोबत सहाशे मावळे निघाले. कोणताही आवाज नाही, धांदल नाही, गडबड नाही. फक्त एकमेकांच्या श्वासांनी जणू ते एकमेकांशी संवाद साधत होते. चेहऱ्यावर भीती नव्हती. एक आत्मविश्वास होता. शिवरायांच्या सोबत होते, बाजीप्रभू! देशपांड्यांचा हा पुत्र शिवरायांचा अत्यंत विश्वासू होता. शिवरायांचा शब्द म्हणजे जीव की प्राण ! महाराजांनी 'जगदंब .. जगदंब...'असे नामस्मरण मनोमन सुरु केले. महाराज एका पालखीत बसले. दुसरी रिकामी पालखीही सोबत होती. बाकी सारे वीर पायी निघाले. गडाचा दरवाजा उघडून सारे निघाले. गडाची खडानखडा माहिती असणारे हेर वाटाड्याची भूमिका बजावत होते. तशाही वातावरणात गडाला जौहरचा वेढा होता परंतु नेहमीसारखा दक्ष नव्हता, काहीसा सुस्तावलेला होता. वेढा ओलांडून जाणे अतिशय धोकादायक, जीवावर बेतण्यासारखे होते. पालखी निघाली. धडधडत्या अंतःकरणाने वेढा ओलांडून पालखी पुढे आली. अर्धी लढाई जिंकली परंतु खरी लढाई पुढे होती... निसर्गाशी! लवाजमा बराच पुढे गेला. आणि कुणीतरी आपल्याला पाहिले हेही लक्षात आले. जौहरचे हेर होते ते. त्यांनीही दुरून ओळखले. काहीतरी घडले...बिघडले. मावळ्याच्या रुपातील शत्रूने दगा दिलाय. वाऱ्याच्या वेगाने ते हेर सिद्दी जौहरपुढे धडधडत्या अंतःकरणाने उभे राहिले..
'दुश्मन पळाला. गनीम भाग गया.' अशा आरोळ्या उठल्या. जौहर खूप खूप संतापला. अखेर शिवाजीने डाव साधला. विचार करायला, चर्चा करायला वेळ नव्हता उलट वेळ खूप कमी होता.सिद्दी जौहरने ताबडतोब सिद्दी मसूद या विश्वासू सरदाराला बोलावून त्याला ताबडतोब शिवरायांच्या पाठलागावर जाण्याची आज्ञा केली. तीन-चार हजाराची फौज घेऊन मसूद निघाला. घनघोर अंधार, तुफानी पाऊस, गुडघ्याइतका चिखल. सिद्दीच्या सैन्याची फरफट होत होती. पडत, धडपडत ते शिवरायांचा पाठलाग करीत होते. काही अंतर चालून जाताच त्यांना काहीतरी जाणवले. समोर कुणीतरी पळत आहे. दुप्पट वेगाने त्यांनी ती पालखी गाठली. अडवली. मसूदने दरडावून विचारले, "कोण आहात तुम्ही? पालखीत कोण आहे?" पढवलेले मावळे घाबरल्याचे नाटक करीत म्हणाले,
"अ..अ.. आम्ही शिपाई... स्वराज्याचे. आत शिवाजी महाराज आहेत...." ते ऐकताच मसूदचा संताप अनावर झाला. त्याने पालखीत डोकावले. 'अरे, खरेच शिवाजीच आहे.' असे आनंदाने ओरडत त्याने सर्वांना अटक केली आणि माघारी वळला. काही क्षणातच तो लवाजमा छावणीत पोहोचला. शिवाजी पकडला गेला या बातमीनेच सिद्दीच्या फौजेत पुन्हा आनंदाचे भरते आले. सारे आनंदाने नाचत असताना पालखीतून शिवराय उतरले. परंतु काही जणांचे चेहरे उतरले. ज्यांनी अगोदर शिवरायांना पाहिले होते. त्यापैकी एकजण ओरडला,
"धोका झाला. फार मोठा विश्वासघात झालाय. हा... हा... शिवाजी नाही."
"काय? हा शिवा नाही..." एकाच वेळी अनेकांनी प्रश्न केले. लगेचच पकडलेल्या त्या माणसाला दरडावून विचारण्यात आले. त्याने शिवाजी नामक युवकाने नीडरपणे सारे खरे सांगताच अपमानित झालेला मसूद पुन्हा आपली फौज घेऊन निघाला...…
रात्रभर शिवराय दौडत होते,बाजीप्रभूसह, मावळ्यांसह न थांबता, न थकता! पाठीमागे मसूदही सैन्यासह पिच्छा करतच होता. सकाळ होत होती. पांढरपाणी ओढ्याजवळ मसूद शिवरायांच्या जवळ आला. शिवरायांच्या शिलेदारांनी घोडखिंड ओलांडली. शिवराय आणि मावळ्यांना पाहताच मसूद अधिकच चवताळला. त्याने सैनिकांना आणखी जोराने धावण्याचा हुकूम केला. शिवरायांनी परिस्थितीचे गांभीर्य ओळखले. विशाळगड गाठणे म्हणावे तितके सोपे नाही हे लक्षात येताच शिवराय बाजीप्रभूला म्हणाले,"बाजी, वेळ कठीण आहे. इथून पुढला रस्ता चढणीचा आहे. रात्रभर पळून पालखी वाहणारे आणि पायी चालणारे थकले असतील. शत्रू हा असा जवळ आलेला आहे. तो केव्हाही पाठीवर वार करू शकतो. त्यापेक्षा इथेच थांबून शत्रूचा मुकाबला करूया. भवानीमातेच्या आशीर्वादाने शत्रूवर विजयही मिळेल." शिवरायांच्या बोलण्यातील घालमेल, तगमग बाजींनी ओळखली. त्यांच्याही मनात विचार चालू होते परंतु ते स्वराज्याच्या काळजीचे होते, शिवरायांच्याबाबत वाटणाऱ्या चिंतेचे होते. बाजीप्रभू देशपांडे म्हणाले,
"महाराज, मी काय म्हणतो, आपल्याजवळ माणसं कमी आहेत. तुलनेने गनिमांची संख्या जास्त वाटते आहे. असे असताना मी तुमचा जीव धोक्यात कसा काय घालू शकतो? एक काम करा, काही सैनिक घेऊन तुम्ही विशाळगड गाठा. तोवर मी या इथेच शत्रूला रोखून ठेवतो. एकाही शत्रूला खिंड ओलांडू देणार नाही. स्वराज्यासाठी मरण आले तरी बेहत्तर पण तुम्हाला अशा प्रसंगी येथे थांबू देणार नाही. महाराज या स्वराज्याला याक्षणी बाजीप्रभू देशपांडे याजपेक्षा शिवाजी महाराजांची जास्त गरज आहे. शिवराय असतील तर स्वराज्य असेल, शिवाजी महाराज असतील तर असंख्य बाजीप्रभू सापडतील. महाराज, ऐका. वेळ गमावू नका."
बाजीप्रभू पोटतिडकीने बोलत होता.इच्छा नसताना, बाजीप्रभूसारखा एकनिष्ठ गडी असा संकटात टाकून जाणे शिवरायांच्या जीवावर आले होते. दुःखी मनाने शिवरायांनी बाजीला मिठी मारली.भरलेल्या आवाजाने शिवराय म्हणाले, "बाजी, तुम्ही म्हणता म्हणून आम्ही निघत आहोत. गडावर पोहोचलो की, तोफांचे आवाज करु. ते आवाज ऐकले की, क्षणभरही न थांबता तुम्हीपण निघा."असे सांगून दो मनाने शिवराय निघाले. शिवराय वळाले. त्यांना मुजरा करून बाजीप्रभूने कमरेची तलवार हाती घेतली. सोबतच्या सैनिकांची विभागणी केली. कोण कुठे उभे राहून, शत्रूचा कसा सामना करावा हे निक्षून सांगितले. मावळ्यांनी आपापल्या जागा घेताना आजूबाजूला पडलेले दगड -गोटे जमा केले. ठरवून दिलेल्या जागांवर सावधपणे उभे राहिले. खिंडीच्या तोंडाशी बहादूर मावळे उभे राहिले. तितक्यात मसूदचे सैन्य खिंडीजवळ येत असताना केलेल्या गर्जना ऐकताच बाजीप्रभू आपल्या सहकाऱ्यांना म्हणाला,
"शूरवीर मित्रांनो, गनीम येतो आहे. घाबरू नका. ठेचून काढूया. प्रसंगी जखमी होऊ, कदाचित जीव जाईल पण एकही शत्रू खिंडीतून पुढे नाही गेला पाहिजे. फार नाही. दोन एक घंटे ही खिंड रोखून धरायची आहे. महाराज विशाळगडावर पोहोचले की, आपले काम फत्ते. चला. तयार व्हा...." असे म्हणत बाजीप्रभू स्वतः खिंडीच्या तोंडाशी येऊन थांबला. तिकडे मसूद खिंडीजवळ आला. खिंडीत शिरण्याचा रस्ता वाकडा तिकडा अरूंद होता. एकावेळी दोन-तीन माणसे जाऊ शकतील अशी ती वाट होती. मसूदनेही सैन्याचे गट पाडले आणि पहिल्या गटाला जाण्याचा इशारा केला. ती तुकडी खिंडीजवळ येताच मावळ्यांनी 'हरहर महादेव' हा जयघोष केला. शत्रूला पाहताच चवताळून दगडफेक सुरू केली. अशी दगडफेक करण्यात लहानपणापासून मावळे सराईत होते. त्यांच्या हातातून सुटलेल्या दगडांनी सावज टिपायला सुरुवात केली. कुणाचे तोंड फुटले, कुणाचे कपाळ रक्तबंबाळ झाले, तर कुणाचे डोके फुटले. शरीरावर बसणाऱ्या दगडांच्या फटक्याने शत्रू नामोहरम झाला.मागे वळला. झालेल्या विजयाने मावळ्यांचा हुरूप वाढला.अंगात नवचैतन्य संचारले. पाठोपाठ मसूदची दुसरी टोळी चालून आली परंतु जिगरबाज मराठी शिलेदारांनी त्या टोळीचीही तशीच अवस्था केली. शत्रू खाली पडत होता, जखमी होऊन मागे पळत होता. बाजीप्रभू आपल्या साथीदारांना चेतवत होता, त्यांच्यामध्ये त्वेष, इर्षा भरत होता. तो सारखा ओरडत होता,
"शाब्बास रे माझ्या मर्दांनो. हाणा. मारा. फोडून काढा. ठेचून काढा.एकही गनीम विशाळगडाकडे काय पण या खिंडीत आला नाही पाहिजे. बोला 'हर हर..."
'महादेव..' मावळेही तेवढ्याच उत्साहाने साथ देत होते.....
तिकडे शिवराय वाऱ्याच्या वेगाने धावत होते. कितीवेळ गेला कुणास ठाऊक परंतु शेवटी विशाळगड नजरेच्या टप्प्यात आला. पायथा जवळ येत होता. सिद्दी जौहरने आधीपासूनच विशाळगडावर आणि पायथ्याला पहारा बसवला होता. शिवरायांनी आपल्या सहकाऱ्यांसह पायथ्याशी असलेल्या पहारेकऱ्यांवर हल्ला चढवला. त्यांच्याशी लढत लढत ती फळी कापून शिवराय गड चढू लागले.…
घोडखिंडीत वेगळीच परिस्थिती होती. आपल्या दोन तुकड्यांचा झालेला पराभव मसुदच्या जिव्हारी लागला होता. प्रचंड चिडलेल्या अवस्थेत त्याने तिसरी फळी खिंडीकडे पाठवली. मराठा शूरवीरांनी पराक्रमाची शर्थ केली परंतु शत्रूचे काही लोक आत शिरले. त्यांनी बाजीप्रभूला घेरले. बाजी जोर लावून लढू लागला. शरीरावर गनीम एकामागोमाग एक वार करत होते परंतु बाजी शरीरातून रक्ताच्या धारा लागलेल्या अवस्थेत लढत होता, वार झेलत होता पण मागे हटायचे नाव घेत नव्हता. सोबतच साथीदारांना सूचना देत होता. त्यांना लढण्यासाठी प्रेरित करत होता. त्याचे लक्ष फक्त विशाळगडावरून येणाऱ्या तोफांच्या आवाजाकडे लागले होते. कधी एकदा तोफ कडाडते आणि मी माझ्या कर्तव्यातून, शिवरायांना दिलेल्या वचनातून मुक्त होतो असे त्याला वाटत होते. त्यामुळे तो जखमी अवस्थेत ही लढत होता, झुंजत होता. आणि शेवटी जीवाची बाजी लावून लढणाऱ्या बाजीच्या कानावर तोफांचे आवाज आले. त्यावेळी बाजीला झालेला आनंद काय वर्णावा, ते वर्णन करण्यासाठी शब्द अपूरे पडतील. तोफांचे आवाज ऐकताक्षणी बाजीप्रभू देशपांडे खाली कोसळला. आपल्या शूरवीरांना म्हणाला,"ऐका. ऐका. मर्दांनो, ऐका. तोफांचे आवाज ऐका. महाराज गडावर पोहोचले. आपले काम झाले. आपण जिंकलो. आता प्राण सोडायला हरकत नाही..." असे म्हणत खरोखरच बाजीप्रभूने डोळे मिटले. अत्यंत समाधानाने, कर्तव्यपूर्ततेच्या आनंदाने आपला जीव स्वराज्याच्या चरणी अर्पण करण्यात धन्यता मानली. बाजीप्रभू देशपांडे यांचे नाव अजरामर झाले. त्याचबरोबरीने ती खिंड इतिहासात 'पावनखिंड' म्हणून नावारुपास आली, प्रसिद्ध झाली..…
नागेश सू. शेवाळकर