स्वराज्यसूर्य शिवराय - 14 Nagesh S Shewalkar द्वारा फिक्शन कथा मराठी में पीडीएफ

Featured Books
श्रेणी
शेयर करा

स्वराज्यसूर्य शिवराय - 14

स्वराज्यसूर्य शिवराय

भाग चौदावा

सुरत पराक्रम

शाहिस्तेखानावरील विजय ही एक प्रचंड बळ देणारी घटना होती. स्वराज्यावर आलेले फार मोठे संकट शिवरायांनी अत्यंत चातुर्याने, धाडसाने, नियोजनाने, कुशलतेने सोडविले परंतु शाईस्तेखानाने आणि त्याच्या फौजेने स्वराज्याची आर्थिक, मानसिक, शारीरिक आणि प्राण हानी फार मोठ्या प्रमाणात केली होती. आर्थिक हानी कशी भरून काढता येईल हा विचार शिवराय सातत्याने करीत होते. विचार करता करता अचानक त्यांच्या समोर औरंगजेबाच्या ताब्यात असलेल्या सुरत या शहराची आठवण झाली. सुरत म्हणजे अत्यंत श्रीमंत असे शहर. शिवरायांनी ठरविले की, स्वराज्याची झालेली आर्थिक हानी भरून काढण्यासाठी एकमेव मार्ग म्हणजे सुरतेवर छापा टाकायचा आणि त्या शहरातील व्यापारी, श्रीमंत लोक यांच्याकडून वसुली करून झालेले स्वराज्याचे झालेले नुकसान भरून काढायचे. ह्या छाप्यातून मिळणारी संपत्ती औरंगजेबाने विस्कटलेली स्वराज्याची घडी नीट बसविण्यासाठी कामी येणार होती. 'तुमच्या शाहिस्तेखानाने आमच्या स्वराज्याच्या केलेल्या नुकसानीपोटी आपण अमूक एक रक्कम स्वराज्याच्या तिजोरीत भरावी' अशी मागणी औरंगजेबाकडे करून का तो नुकसानभरपाई देणार होता? त्यामुळे तसे काही तरी करणे आवश्यक होते. महत्त्वाचे म्हणजे सुरत मोहिमेतून आर्थिक कमाई सोबतच औरंगजेबाला धक्का पोहोचवणे, वचक बसविणे आवश्यक होते.

एकदा विचारांती निर्णय घेतला की, त्याचे अभ्यासपूर्ण नियोजन करून त्यावर ठोस कृती करणे ह्यामध्ये शिवरायांचा हातखंडा होता. सुरतेत जाऊन औरंगजेबाला आर्थिक धडा शिकवायचा हे एकदा ठरवले आणि मग त्या शहराचा, परिसराचा अभ्यास, बारीकसारीक गोष्टींची पाहणी करण्यासाठी सुरतेत कुणाला तरी पाठवायचे हा प्रश्नही शिवरायांनी चुटकीसरशी सोडवला. त्यांच्यासमोर एक नाव आले ते म्हणजे बहिर्जी नाईक या हुशार, चतुर हेराचे! बहिर्जीला त्याच्या कामाची रुपरेषा समजावून सांगितली.स्वराज्यापासून बऱ्याच दूर असलेल्या सुरत नावाच्या शहराची साारी माहिती काढण्याची अत्यंत महत्त्वाची जबाबदारी बहिर्जी नाईक यावर सोपविण्यात आली. ही मोहीम यशस्वीपणे पार पाडण्यासाठी बहिर्जीची हेरगिरी अत्यंत उपयुक्त ठरणार होती.सुरतेवर छापा या मोहिमेची तयारी करण्यासाठी बहिर्जी नाईक हा पुण्यापासून साधारण दीडशे कोस अंतरावर असलेल्या सुरत शहराकडे निघाला.

मजल दरमजल करीत बहिर्जी सुरत शहरात दाखल झाला. लक्ष्मीचा वरदहस्त असणाऱ्या त्या शहराचे वर्णन काय करावे? सुसज्ज,श्रीमंतीचे प्रतिक असलेले शहर पाहून कुणाचेही डोळे दिपून जावेत अशी रचना आणि सुशोभीकरण केलेली ती नगरी! निरनिराळया, सर्व प्रकारच्या मालाचे भांडार ठिकठिकाणी पाहावयास मिळत होते. हिऱ्यामोत्यांची अनेक दुकाने डोळे दिपवून टाकत होती. बहिर्जीने किती बारीकसारीक आणि सुक्ष्म माहिती काढली होती हे लक्षात घेणे महत्त्वाचे आहे. बहिर्जीने मिळवलेल्या माहितीनुसार सुरत शहरातील एका व्यापाऱ्याजवळ अनेक किलोंच्या मोत्यांच्या माळा होत्या. दुसऱ्या एका व्यापाऱ्याजवळ अनेक पिंप भरून जवाहिर होते. अन्य एका विक्रेत्याने म्हणे पंचवीसपेक्षा अधिक टाक्यांमधून सोने भरून ठेवले होते.इतर दुकानात अशीच परिस्थिती होती. गडगंज संपत्ती असलेले अनेक व्यापारी शहरात होते. निरनिराळ्या प्रकारचा महागडा कपडा, हत्तीच्या दातांपासून बनवलेल्या वस्तू, नक्षीदार भांडी, महागडे गालीचे अशा नाना प्रकारची खूप सारी दुकाने थाटलेली होती. सोबतच परदेशी कंपन्याही सुरत शहरात होत्याच. सुरतेत पोहोचलेला बहिर्जी शहरातील कोपऱ्या-कोपऱ्यातून, बाजारांमधून,व्यापाऱ्यांच्या गोदामातून हिंडत असताना सुक्ष्म नजरेने सारे काही साठवत होता. तीक्ष्ण कानांनी आजूबाजूला चाललेली चर्चा ऐकत होता. हे करीत असताना सोईचे सावजही निवडून ठेवत होता. कोणत्या भागात कुणी जायचे,इमारतींच्या रचना कशा आहेत, त्या इमारतींमध्ये कुठून प्रवेश करता येईल या सर्वांचे नियोजन करताना कोणत्या भागात जायचे नाही असे नियोजन मनोमन आखत होता.

बहिर्जीने मिळवलेली माहिती खात्रीलायक, तितकीच मजेशीर होती. सुरतेचा सुभेदार आपल्याच बादशहाला म्हणजे औरंगजेबाला कसा लुटत होता, औरंगजेबाच्या पश्चात कसा भ्रष्टाचार सुरु होता ही माहितीही मनोरंजक होती. तो सुरतीय सुभेदार कागदोपत्री पाच हजार फौज आहे असे दाखवून त्या फौजेचा पगार, इतर खर्च औरंगजेबाच्या तिजोरीतून मिळवत असे. प्रत्यक्षात मात्र त्याने एक हजाराचीच फौज ठेवली होती. म्हणजे केवढी मोठी लुट तो सुभेदार करत होता. असा भ्रष्टाचार करताना सुभेदार विचार करत होता की, सुरतेच्या अवतीभवती, सर्वदूर केवळ आणि केवळ मुघलांचेच राज्य आहे, तेंव्हा एवढी मोठी मुघलसत्ता ओलांडून कोण कशाला सुरतेवर चालून येईल आणि म्हणून त्याने स्वतःच दोन्ही हातांनी सुरत आणि मुघल सत्ता लुटायला सुरुवात केली होती. स्वतः सुभेदार इनायतखान किल्ल्यावर राहात होता. 'जसा राजा तशी प्रजा' याप्रमाणे 'जसा सुभेदार तसेच नोकरदार ' याप्रमाणे सुभेदारीचे सरदार आणि सैनिक त्याच्या पश्चात भ्रष्टाचार करत होते. शिवरायांना सुभेदार, किल्ला यांच्याशी काही देणेघेणे नव्हते. त्यांचे लक्ष धनाढ्य, गब्बर व्यक्ती, मोठी दुकाने, गोदामे ह्यांच्यावर होते. बहिर्जीने हेरलेली सारी मंडळी किल्ल्यावर नव्हे तर शहरात होती आणि त्यामुळे शिवरायांच्या दृष्टीने ते अधिक फायदेशीर होते.

सारी अत्यावश्यक, लहानसहान माहिती गोळा करुन, स्वारी करण्याचा एक आराखडा मनातल्या मनात तयार करून बहिर्जी नाईक राजगडावर पोहोचला. शिवरायांच्या समोर सारा इतिवृत्तांत सादर केला. तो ऐकून, पाहून शिवराय म्हणाले असतील, 'सुरतेवर करून हल्ला, मिळवूया मोठा गल्ला!' सुरतेचा थाट, ती श्रीमंती ऐकून शिवरायांनी निश्चय केला की, सुरतेवर चालून जायचे आणि स्वतःच जायचे. सुरतेची धनदौलत मिळवून शाईस्तेखानाने केलेल्या नुकसानीची भरपाई करून आणायची. शिवरायांनी फौज जमवली. आठ हजाराच्या जवळपास सैन्य एकत्र आले. कुठे जायचे? कोणावर हल्ला करायचा? समोर कोण आहे? असे एक ना अनेक प्रश्नांची मालिका प्रत्येकाच्या मनात होती परंतु कुणीही जाहीर चर्चा करीत नव्हता. शिवरायांनी बोलावले ना मग बस झाले. ठरले. शिवराय सांगतील तिकडे दौडत जायचे, आडवे येणारास आडवे करून जायचे. तिथे भगवा फडकवत ठेवायचा. जीवापाड भगव्या ध्वजाला जपायचे. ठरलेल्या दिवशी, ठरलेल्या वेळी शिवरायांनी गडावरील देवीचे दर्शन घेतले. जिजाऊंचा आशीर्वाद घेऊन घोड्याला टाच मारली आणि थेट सुरतेच्या दिशेने निघाले.

शिवराय निघाले. ते राजगडावरून थेट सुरत शहरात जाणार ही कुणकुण कुणालाही लागू नये, त्यामुळे सुरतेचा सुभेदार, वाटेतील मुघलांचे सरदार आणि खुद्द औरंगजेबही सावध होऊ नये, कोणतीही आडकाठी येऊ नये म्हणून शिवराय दिवसभर जंगलात कुठेतरी तळ ठोकून आराम करायचे आणि रात्रभर प्रवास करायचे. त्र्यंबकेश्वर शिवशंकराचे दर्शन घेऊन मग पुढे सुरतेकडे प्रयाण करावे या हेतूने शिवराय त्र्यंबकेश्वरी पोहोचले. तिथे शिवराय पोहोचले, तिथून पुढे सुरतेकडे जाणार ही बातमी पसरू नये म्हणून सोबतच्या प्रमुख शिलेदारांनी अशी बातमी पसरवून दिली की, शिवराय त्र्यंबकेश्वराचे दर्शन घेऊन औरंगाबाद येथे जाणार आहेत. स्वतःवरील लक्ष वळविण्यासाठी खेळलेली ती एक यशस्वी खेळी होती. त्या दिवशी त्र्यंबकेश्वर येथे कोणताही उत्सव, सण, यात्रा, विशेष दिन नसताना, कुणाच्या ध्यानीमनी नसताना अचानक यात्रा भरल्याचे वातावरण तयार झाले. पाच हजार सशस्त्र असे भक्त दर्शनासाठी लोटल्यानंतर जत्रेचे स्वरूप तर येणारच ना. शिवाय भक्त तरी साधासुधा होता काय? भक्तश्रेष्ठ शिवराय दर्शनासाठी आले आहेत म्हटल्यावर मग विचारायचे काय? अख्खे त्र्यंबकेश्वर शहर 'शिवशंभो...शंभोशंकरा' अशा गर्जनांनी घुमत होते. शिवराय औरंगाबादेवर चाल करून जात आहेत असे ऐकताच औरंगाबाद परिसरातील सारे मोगल प्रतिकारासाठी तयार झाले. पूर्वतयारी म्हणून सुरतेकडील बरीचशी फौजही औरंगजेबाच्या हुकुमानुसार औरंगाबादेच्या रस्त्याला लागली. त्यामुळे शिवरायांच्या वाटेवरील मुघल काटे मोठ्या प्रमाणात कमी झाले. त्र्यंबकेश्वराचे दर्शन घेऊन, षोडशोपचारे पूजा करून, शिवशंकराचा आशीर्वाद घेऊन शिवराय पुन्हा नव्या जोमाने सुरतेकडे रवाना झाले. वाटाड्या म्हणून अर्थातच सर्वांच्या पुढे बहिर्जी नाईक दौडत होता. त्र्यंबकेश्वराहून निघालेली मराठी फौज अक्षरशः रात्रीचा दिवस करून दमणगंगा ओलांडून पाचव्या दिवशी सुरतेच्या अगदी जवळ असलेल्या घणदेवी येथे पोहोचली. परंतु जेव्हा जेव्हा आदिलशाहाचे, औरंगजेबाचे सैन्य स्वराज्यावर चालून आले तेव्हा प्रत्येक वेळी त्यांनी स्वराज्यातील गावे जाळली, मंदिरांचा विध्वंस केला, निष्पाप रयतेला छळले, ठोकले, जीवानिशी मारले. परंतु मावळ्यांचे तसे नव्हते. ते कोणताही उन्माद करत नसत, स्त्रिया, बालके, निष्पाप जनता यांना कोणत्याही प्रकारचा त्रास देत नसत. घणदेवी येथील नागरिकांना एवढेच समजले की, आपल्या गावातून जी फौज जाते आहे, ती फौज शिवाजीची आहे आणि त्या फौजेत स्वतः शिवाजी आहे. ही एकच गोष्ट गावकऱ्यांची बोबडी वळायला पुरेशी होती. कुणालाही काडीचाही त्रास देता, कुणाच्या केसालाही धक्का लावता मराठा फौज पुढे निघून गेल्याने घणदेवीकरांना फार मोठे आश्चर्य वाटले. शिवरायांनी घणदेवी शहरातही एक डाव टाकला. त्यांच्या सांगण्यावरून मावळ्यांनी अशी अफवा पेरली की, ही फौज औरंगजेबाचीच आहे. महाबतखान या औरंगजेबी सरदाराच्या बोलावण्यानुसार पट्टणचे बंड मोडण्यासाठी अहमदाबाद मार्गे जात आहे.

तिकडे सुरत शहरात नेहमीप्रमाणेच वातावरण होते. नागरिक, दुकानदार सारे आपापल्या कामात मग्न होते. इनायतखान हा सुरतचा सुभेदार त्याच्या सुभेदारीत व्यग्र असताना बरेच लोक त्याच्याकडे धावत गेले. स्वतःच्या श्वासांवर नियंत्रण मिळवत, प्रचंड घाबरलेल्या अवस्थेत कुणीतरी खानाला म्हणाले,"..खाँसाहेब, गडबड झाली. गडबड झाली..."

ते ऐकून बेफिकीर असलेल्या इनायतखानाने विचारले, "अरे, झाले तरी काय?""..तो शिवाजी..."

"शिवाजी.... कोण शिवाजी? अच्छा! तो मराठा शिवाजी? त्याचे काय?"

"तो सुरतेकडे येतोय. मोठी फौज घेऊन....." ते ऐकले आणि इनायतखान गडगडाटी हास्य करीत म्हणाला, "वेड लागलय तुम्हाला. तो शिवाजी या जन्मात काय पण पुढल्या सात जन्मात इकडे येण्याचा विचार करणार नाही..... "

तितक्यात सर्वत्र एकच गोंधळ उडाला. जो तो 'शिवाजी आला....शिवाजी आला....' असे ओरडत सुटला. श्रीमंत, धनाढ्य लोकांच्या शरीरात कापरे भरले. काही जण धनदौलतीची चिंता सोडून कुटुंबासह सहीसलामत सुरतेच्या बाहेर पडण्याचा,शिवाजी गाठणार नाही असा रस्ता शोधू लागले. लोक घाबरून पळत सुटले. सगळीकडे आरडाओरडा, गोंधळ, किंकाळ्या, रडारडी सारे काही एकदाच सुरु झाले. इनायतखानाच्या कानावर तो गोंधळ गेला. त्याने बाहेर डोकावले. पळणारे, अडखळणारे, पडणारे लोक पाहून तो थोडासा विचारात पडला परंतु तरीही त्याची गुर्मी उतरली नाही. छद्मीपणे हसतहसत तो म्हणाला, "एकजात घाबरट कुठले? त्या शिवाजीची माझ्या सुभ्यात घुसण्याची हिंमत होईलच कशी?" पाठोपाठ शिवरायांनी पेरलेली बातमी त्याच्याकडे पोहोचली की, जी फौज येते आहे ती शिवाजीची नसून आपली मुघलांची सेना असून ती महाबतखानाच्या मदतीसाठी जात आहे. ते ऐकून इनायतखान अजून निर्धास्त झाला.परंतु लोकांमधील घबराट चलबिचल कमी झाली नाही.व्यापारी वर्गात प्रचंड घबराट पसरली.त्यांनी आपापला माल गोदामांमध्ये, सुरक्षित ठिकाणी हलवायला सुरुवात केली.एका व्यापाऱ्याने हिंमत करून आपली दोन माणसे हेरगिरी करुन सत्य शोधण्यासाठी म्हणून शिवराय थांबलेल्या उधना या ठिकाणी पाठवली. पण त्यांचा डाव उलटा पडला. त्या दोन्ही हेरांवर शिवरायांचे हेर भारी पडले. त्या दोघांना पकडून शिवरायांच्या समोर उभे करण्यात आले. शिवरायांनी एक क्षण त्या हेरांकडे पाहिले आणि त्यांना परत पाठविण्याची आज्ञा केली. परंतु त्या दोघांपैकी एकाजणाने शिवरायांना पूर्वी एकदा राजापूर मुक्कामी पाहिले होते. त्याने हेच ते शिवाजी असे सहकाऱ्यास आणि नंतर सुरत शहरात गेल्याबरोबर सर्वांना सांगितले की, 'खरे आहे. उधान्यात आलेला शिवाजीच आहे. फार मोठी फौज घेऊन आला आहे. आता आपले काही खरे नाही.'

त्या बातमीने पुन्हा हलकल्लोळ माजला. इंग्रज व्यापारी इनायतखानाकडे गेले. म्हणाले,

"खाँसाहेब, शिवाजी सुरतेजवळ आलाय. तो केंव्हाही सुरतेत घुसून काहीही करू शकतो. आम्ही आमच्या वखारीत असलेला सारा माल सुरक्षित ठिकाणी नेऊ इच्छितो...."

ते ऐकून संतापलेला इनायतखान म्हणाला, "डरपोक कुठले? "

इनायतखानाकडून परतलेल्या इंग्रज अधिकाऱ्याने विनंती करून, आपल्या मालाचे, संपत्तीचे संरक्षण करण्यासाठी म्हणून हत्यारबंद इंग्रज शिपायांची एक तुकडी बोलावून घेतली. ते पाहून सुरतेतील अनेक धनाढ्य आणि व्यापाऱ्यांनी स्वसंरक्षणाची व्यवस्था केली. इनायतखान मात्र हे सारे हसण्यावर नेत होता. शिवराय पंचक्रोशीत आले आहेत या बातमीवर त्याचा विश्वास बसत नव्हता, तो विश्वास ठेवत नव्हता.

तितक्यात शिवरायांनी आपला एक वकील इनायतखानाकडे पाठविला. तो लखोटा घेऊन वकील इनायतखानाकडे गेला. इनायतखानाच्या माणसाने लखोटा उघडला. वाचला. शिवरायांनी लिहिले होते, 'आम्ही उद्या सुरत शहरात येत आहोत. तुम्ही स्वतः महत्त्वाच्या व्यापाऱ्यांना आणि व्यक्तींना घेऊन समक्ष भेटावे. आम्हाला सुरत शहर बदसुरत करायचे नाही. आम्हाला खंडणी हवी आहे.आपल्या भेटीत खंडणीची रक्कम ठरवता येईल आणि ती तुम्हाला बऱ्याबोलाने भरावी लागेल. तुम्ही खंडणी भरल्यास आम्ही स्वतः शहरात फिरून ती वसूल करु. त्यावेळी शहराचे, व्यापाऱ्यांचे नुकसान होईल त्याची सर्व जबाबदारी तुमची असेल.'

शिवरायांचा तो खणखणीत इशारा ऐकून व्यापारी अजून घाबरले परंतु सुभेदार इनायतखानाने वकिलांना कोणतेही उत्तर दिले नाही. वाट पाहून शिवरायांचा वकील आल्या पावली परत फिरला.इनायतखान अजूनही वेगळाच माज चढलेल्याअवस्थेत होता. त्याने उर्मटपणे, निलाजरेपणे एक पत्र देऊन आपला वकील शिवरायांकडे पाठवला. त्यात एकच प्रश्न विचारला होता की,

'तुम्हाला दंड हवा आहे असे ऐकले. सांगा कोणता 'दंड' तुम्हाला करु?'

ते ऐकून शिवराय चिडले. ते मनाशी म्हणाले, 'तू कोण आम्हाला दंड करणार? थांब. आम्ही शहरात येऊन, तुझ्या घरात घुसून तुला दंड काय असतो, आम्हाला काय पाहिजे ते सांगतो..' असे म्हणत शिवरायांनी आपल्या मावळ्यांना सुरतेची वाट चालण्याची आज्ञा केली. ताबडतोब सारी फौज सुरत शहराकडे कुच करती झाली. ती बातमी वणव्याप्रमाणे सुरत शहरात पसरली. पुन्हा घाबरलेली जनता आकांत करू लागली. ज्यांचे वाडे, इमारती बळकट होत्या त्यांनी तिथे दडी मारली. आतून कड्या-कुलुपं घालून अडथळे घातले. आतमध्ये घाबरलेल्या अवस्थेत, भीतीने थरथर कापत त्यांनी आपापल्या देवतांचा धावा सुरु केला. दुसरीकडे इनायतखान अजूनही बेदरकारपणे बसला होता. सुरुवातीचा निरोप आला त्यावेळी इतस्ततः विखुरलेली आपली फौज गोळा केली असती किंवा शिवरायांनी वकिलासोबत पाठविलेल्या निरोपाप्रमाणे खंडणी संदर्भात शिवरायांशी बोलणी सुरू केली असती तर? परंतु का कोण जाणे इनायतखान एका वेगळ्याच गुर्मीत होता... पोकळ गुर्मी! शहरातील नागरिकांचे, शहराचे रक्षण करण्याची त्याची जबाबदारी असूनही तो जबाबदारीने वागत नव्हता. शिवराय सुरतेच्या जवळ आले आहेत हे समजताच अनेक श्रीमंत लोकांनी त्याला गळ घातली की, 'काहीही करा. कितीही रक्कम घ्या पण आम्हाला, आमच्या कुटुंबाला या संकटातून, शिवाजीपासून वाचवा.'

भ्रष्टाचारात अखंड बुडालेल्या इनायतखानाने तशा संकटसमयीही स्वतःचा स्वार्थ साधला.त्याने आश्रयाला आलेल्या, जीवाची भीक मागणाऱ्या याचकांना सर्व संपत्ती घेऊन गडावर प्रवेश दिला आणि किल्ल्याची दारे, खिडक्या सारे बंद करून टाकले. सामान्य जनतेच्या जीवाचे, त्यांच्या संरक्षणाचे त्याला काहीही देणेघेणे नव्हते.

शिवराय आणि त्यांच्या शूरवीरांनी सुरत शहरात प्रवेश केला. आपण शहरात आल्यावर तरी सुभेदार जागा होईल आणि बोलणी करायला तयार होईल असे शिवरायांना वाटत होते परंतु तसे काही घडत नाही हे पाहून शिवरायांनी मावळ्यांना घराघरात-दुकानात घुसून धनदौलत गोळा करण्याचे फर्मावले. अर्थात यासाठी बहिर्जी नाईक यांनी जमवलेली माहिती मदतीला होती. मराठा वीर शहरात धडकले पण पाहतात तर शहरातले एकूणएक रस्ते ओस पडले होते, शहरात स्मशान शांतता होती. ठरल्याप्रमाणे मावळे ठरवून दिलेली दुकाने, घरे फोडत होती. घर फोडताना घरातील स्त्रिया, बालके आणि काही घरातून करत्या पुरुषांच्या रडण्याचा, ओरडण्याचा आवाज येत होता. घरात दडवलेला थोडासा किमती माल मावळ्यांच्या हवाली करून 'झाले हो. एवढेच होते. संपले सारे. आम्हाला सोडा हो..' अशा विनवण्या होत होत्या परंतु मावळे ऐकत नव्हते ते घरात घुसून सारे काही बाहेर आणत होते. हे करताना महिला, लहान मुलं, म्हातारी माणसे यांना काहीही त्रास देत नव्हते. झालेच तर मंदिर, मशिदी आणि इतर प्रार्थनास्थळे, जनावरे यांनाही त्रास देत नव्हते. जी माणसे खोटे बोलत होती, खंडणी द्यायला टाळाटाळ करीत होती त्यांना मात्र मावळे सोडत नव्हते. जमवलेले धन, दागदागिने, जडजवाहीर थैल्यांमध्ये भरून शहराबाहेर थांबलेल्या शिवरायांच्या समोर पोहोचविण्यात येत होते. काही व्यापाऱ्यांना पकडून शिवरायांसमोर उभे करण्यात येत होते, त्यात काही इंग्रज व्यापारी होते. त्यापैकी काही इंग्रज अधिकारी औरंगजेबासाठी किंमती नजराणा घेऊन आले होते परंतु मावळ्यांनी धाक दाखवताच तो नजराणा शिवरायांच्या समोर ठेवू लागले. काही इंंग्रज मात्र खोटे सांगून स्वतःची सुटका करून घेत होते. या इंग्रजांच्या खानी सुरतेत होत्या. संरक्षणासाठी त्यांनी तोफांची व्यवस्था केली. त्यांचा खोटेपणा शिवरायांनी ओळखला परंतु यांच्याशी लढून शक्ती खर्च करायची नाही असे शिवरायांनी ठरवले. तिकडे मावळ्यांनी साऱ्या शहरावर कब्जा मिळवला होता. काही मावळ्यांनी इनायतखान लपलेल्या किल्ल्यावर हल्ला चढवला. खानाच्या माणसांनी तोफा सुरु केल्या त्यामुळे मावळ्यांचे काम सोपे झाले कारण त्या तोफांचे गोळे तोफांच्या टप्प्यात असणाऱ्या मोठमोठ्या घरांवर कोसळून घरांना भगदाड पाडण्याचे काम करीत होते. मोहिमेचा दुसरा दिवस उजाडला. प्रचंड प्रमाणात धनदौलत जमा होत होती. शहराबाहेरच्या शामियान्यात शिवराय बसले होते. त्यांच्यासमोर राशीच्या राशी जमा होत होत्या. शिवरायांच्यासोबत असलेले कारकून, इतर लोक जमा झालेल्या मालाची नोंदणीही करू लागले. बाजूला खंडणी देणारे परंतु धनाढ्य असणाऱ्या लोकांना बंदी बनवून ठेवले होते.

तितक्यात इनायतखानाने एक वकील शिवरायांकडे पाठवला. त्याला शिवरायांच्या भेटीची परवानगी मिळाली आणि तो शिवरायांसमोर उभा राहून म्हणाला,

"खानसाहेबांनी काही अटी ....." त्याचे बोलणे पूर्ण होण्यापूर्वीच शिवराय कडाडले,"अटी? हा कोण आम्हाला अटी घालणारा? बायकांसारखा लपून बसलाय आणि म्हणे अटी?"शिवरायांचे ते कडवट बोल ऐकून शिवरायांच्या दिशेने झुकत तो वकील म्हणाला,"थोडे खाजगीत बोलायचे होते....." असे म्हणत त्याने चपळाईने लपवलेली कट्यार काढली आणि शिवरायांच्या छातीवर घाव घालण्याच्या हेतूने हात वर नेला पण शिवरायांच्या शेजारी उभ्या असणाऱ्या एका कर्तव्यतत्पर शिलेदाराने विजेच्या वेगाने स्वतःच्या तलवारीचा घणाघाती घाव शिवरायांच्या दिशेने जाणाऱ्या त्या दुश्मन हातावर घातला. धडापासून हात वेगळा झालेला तो वकील खाली कोसळला आणि मग चवताळलेल्या, खवळलेल्या, संतापलेल्या मावळ्यांनी त्या वकिलाच्या शरीराची अक्षरशः खांडोळी केली. ती दगाबाजी पाहून काही मावळे संतापले त्यांनी तलवारी उपसल्या आणि नजरकैदेत असणाऱ्या लोकांवर घाव घालायला सुरुवात केली. परंतु शिवरायांनी त्यांना थांबवले. तिकडे शहरात खानाची धोकेबाजी समजताच शहरातील मराठा शिलेदार संतापले आणि काही क्षणात सुरत शहरात अनेक ठिकाणी आगी लावण्यात आल्या.…

दिवस-रात्र अविश्रांत कष्ट करून सुरत शहराचा निरोप घ्यायची वेळ आली होती. निघण्यापूर्वी सुरत शहराच्या दिशेने पाहून शिवराय नम्रपणे म्हणाले,

"या नगरीशी, नगरातील जनतेसोबत आमचे मुळात वैर नव्हते आणि आजही नाही. आम्ही सुरतेवर छापा टाकला तो हे शहर औरंगजेबाच्या अधिपत्याखाली आहे म्हणून कारण याच औरंगजेबाच्या मामाने शाहिस्तेखानाने आमच्या स्वराज्याची फार मोठी हानी केली होती, कधीही भरून निघणार नाहीत अशा जखमा स्वराज्यातील निष्पाप लोकांना दिल्या होत्या. मानसिक, शारीरिक जखमा तर भरून निघणार नाहीतच पण स्वराज्याचे झालेले आर्थिक नुकसान भरून काढावे म्हणून आम्हाला ही कामगिरी करावी लागली...." असे म्हणत शिवरायांनी घोड्याला टाच मारली... परतीचा प्रवास सुरु झाला.…

नागेश सू. शेवाळकर