तुझ्या विना [मराठी नाटक] - भाग १० Aniket Samudra द्वारा प्रेम कथा मराठी में पीडीएफ

Featured Books
श्रेणी
शेयर करा

तुझ्या विना [मराठी नाटक] - भाग १०

सखाराम : (दारुच्या नशेत) हसा केतनदादा हसा.. पण एक लक्षात ठेवा.. तुमी ज्ये करताय ना.. त्ये बरोबर नाय बघा..
केतन : का रे बाबा? असं काय चुकीचं केलंय मी अं?
सखाराम : अहो कोणाला चुx बनवताय या सखाराम ला……..आ कोणाला …….. शिकवताय आ ??
केतन : अरे पण काय झालं ते तरी सांगशील का?
सखाराम : तुमास्नी काय वाटतंय, चढलीय मला? अहो असल्या देसीच्या छप्पन्न बाटल्या मी रिकाम्या केल्यात.. ही विदेसी काय चिज हाय? सखारामला सगल कलतया.. कुनाचं काय चाललय.. तुम्चं अन अनुताईंच…

केतन ताडकन उठतो आणि सखारामच्या कानाखाली वाजवतो…

सखाराम : (गाल चोळत) अहो तुम्ही दुसरे काय करणार? ……… जातो म्या पण एक गोष्ट ध्यानामंदी ठेवा ती तुमची होनारी वाहिनी हाय.. ह्ये मी कुठं बोल्लो तर अनुताईंच नाव पन खराब व्हाईल म्हनुन्शान मी गुमान बसलोय.. जातो म्या..

सखाराम निघुन जातो.. केतन फुल्ल टेन्शनमध्ये येतो.. हातातला ग्लास एका दमात रिकामा करतो आणि तो पण आतमध्ये निघुन जातो.

स्टेजवरचे दिवे मंद मंद होत जातात आणि अंधार पसरतो. 

प्रसंग – ८ स्थळ.. केतनचे घर..

आई : “सुशांत याला काय अर्थ आहे अरे… लग्न ६ दिवसांवर येऊन ठेपले आहे आणि आता तु ४ दिवस बॅंगलोरला निघालास?..”
सुशांत : (अनुकडे बघत आईशी ) “अगं आई.. मी काय स्वतःच्या मर्जीने चाललो आहे का? मी तरी काय करु? एक तर आधीच माझी अमेरीका व्हिजीट जवळ येउन ठेपली आहे.. त्यासाठीच काही ट्रेनींग चा भाग म्हणुन मला जावं लागत आहे.. नाही कसं म्हणणार..?”
आई : “ते ठिक आहे रे.. पण घरात कित्ती कामं पडली आहेत..अनु एकटी किती आणि काय काय करणार रे.. आणि तिला पण तिच्या घरची कामं आहेतंच की…”..

सुशांत : “अगं एकटी कश्याला? हा आहे ना केतन!! तो करेल की मदतं… काय रे? करशील ना?” (केतनकडे बघतो)

केतन अनुकडे एकदा बघतो. अनु चेहरा पाडुन उभी असते.

सुशांत : “अरे तिच्याकडे काय बघतो आहेस? ती काय नाही म्हणणार आहे का? मी शक्यतो लवकर येण्याचा प्रयत्न करीन..”

सुशांत अजुन कुणाच्या बोलण्याची वाट न बघता आतमध्ये निघुन जातो.
केतन कानाला वॉकमन लावुन बसतो. गाणी ऐकता ऐकता तो मोठ्मोठ्यांदा ‘ओम-शांती-ओम’ मधलं गाणं गुणगुणू लागतो…

“दिलं जुडे बिना ही टुट गये..
हथं मिले बिना ही छुट गये…
की लिखे ने लेख किस्मत ने..”

गाणं म्हणत असतानाच त्याचं लक्ष हसणार्‍या अनुकडे जात.

केतन : (इयर-प्लग काढत) “काय झालं?”
अनु : “ओ..देवदास.. ओम मखिजा.. अहो.. घरात लग्न आहे आपल्या.. कश्याला रडकी दुख्खी गाणी म्हणताय.. राहु द्या.. बंद करा ती गाणी..”

केतन इकडे तिकडे बघतो.. आजुबाजुला कोणीच नसते.

केतन : कोण मी?
अनु : हो मग? दुसरं कोणी आहे का इथं?
केतन : मला वाटलं तु माझ्याशी बोलत नाहीयेस..
अनु : ए.. आपण काय शाळेतली मुलं आहोत का असं भांडुन न बोलायला? ऍक्च्युअली नां, मी नंतर खुप विचार केला.. मला मान्य आहे तुझी त्यात काही चुक नाहीये यात. इनफॅक्ट तु मनातले बोलुन दाखवुन खुप मोठेपणा दाखवला आहेस.. खरं तर आय एम सॉरी..”
केतन : “अच्छा? मग मगाशी आपण असा चेहरा पाडुन का उभे होतात?”
अनु : “का काय? मी सुशांत वर चिडले आहे.. मला नाही पटत त्याचे वागणं.. कामापुढे त्याला प्रत्येक गोष्ट नगण्य आहे.. अगदी मी सुध्दा.. कधी कधी तरं मला वाटतं खरंच आम्ही दोघं मेड फॉर इच आदर आहोत का?”

केतन लगेच खुर्चीत ताठ होऊन बसतो.

केतन : “अगं पण त्याला जाण गरजेचं होतं ना?.. उगाच का गेला आहे तो?”
अनु : “पण मी म्हणते.. हे अमेरीकेला जायलाचं हवं का? सगळेजण इथे असताना आपण तिकडे एकटे दुर रहायचे म्हणजे..”

केतन : “अरेच्या.. पण काल तुच म्हणालीस ना.. असते एकेकाला क्रेझ अमेरीकेची..तुच त्याची बाजु घेउन बोलत होतीस ना? मग आज काय झालं असं अचानक”
अनु : “असं काही नाही.. आता तुच बघ ना.. इतकी वर्ष अमेरीकन मुलीशी लग्न करायचं म्हणुरंन ठाम होतास.. पण मला भेटल्यावर.. (एकदम आपण काय बोललो हे लक्षात येऊन ती ओशाळते आणि मग सारवा सारव करत…) आय मीन.. तुला कोणीतरी एक मुलगी भेटली..जी तुला आवडली आणि तु क्षणार्धात निर्णय बदललास ना..!! का तरीही तु तुझ्या निर्णयावर ठाम राहीलास?..”
केतन : “हम्म.. प्रेमापुढे सगळं निरर्थक आहे असं मानणाऱ्यातला मी आहे.. तिच्यासाठी मी काहीही करायला तयार आहे.. अगदी अमेरीका सोडुन कायमचा भारतात यायला सुध्दा..”
अनु : .”कित्ती फरक आहे तुम्हा दोन भावंडात.!!!.”

केतन : मगं? बघ बदलते आहेस का विचार? कदाचीत तुला सुशांतदा बद्दल वाटते ते प्रेम नसेलही. तुम्ही दोघं एकमेकांना अनेक वर्षांपासुन ओळखता आहात.. तुम्ही चांगले मित्र असु शकता..कदाचीत”
अनु : चल चल.. थट्टा पुरे झाली.. बरं मला एक सांग केतन, तुला भारतीय मुलगी का नको, अमेरीकनच का हवी? तु सांगीतलस मला.. पण मला एक सांग.. प्रत्येक लग्नात तु म्हणतोस तस्सेच होते का? प्रत्येक मुलीचे आई-वडील लग्नानंतर मुलीच्या संसारात ढवळा ढवळ करतातच का? प्रत्येक सासुचे, प्रत्येक सुनेशी भांडण होतेच का असं?
होतात.. मान्य आहे होतात.. मी सत्य नाकारत नाही.. पण प्रत्येक घरात हे असेच होत असेल.. किंवा असेच होत.. असं मला नाही वाटत..
आणि समजा होत असेलच… तरी अमेरीकन लग्नाची कटु बाजु कशी तु नजरेआड करतोस? तेथील घटस्फोटांचे प्रमाण कित्ती आहे? कश्यावरुन तु तेथे केलेले लग्न आयुष्यभर टिकेल?
आणि कश्यावरुन भारतीय मुलींशी सगळे नवरे प्रामाणीक असतात?
केतन : बरोबर आहे तुझं.. बरं जाऊ देत.. हा प्रत्येकाच्या दृष्टीकोनाचा मुद्दा आहे. सोड.. तुला परवा काय गंमत झाली सांगतो.. माझा एक कलीग आहे, शेखर म्हणुन.. तो आणि त्याची बायको माझ्या समोरच्याच फ्लॅटमध्ये रहातात. शनिवारी रात्री मी त्यांच्याकडे जेवायला गेलो होतो तेंव्हा कोणाचा तरी फोन आला, शेखरने तो फोन घेतला.. बोलुन झाल्यावर तो त्याच्या बायकोला म्हणाला
“हनी.. उद्या सकाळी आई येतेय.. ४.३० ला फ्लाईट येईल..”
त्याची बायको : “काय कटकट आहे यार.. अरे आत्ताच ४ महीन्यांपुर्वी येऊन गेल्या ना आई? आणि उद्या रविवार.. सकाळी ५ ला उठुन बसायचे का? आणि ४.३० ला कोणती टॅक्सी मिळणार आहे एअरपोर्ट पिक-अप ला..??

शेखर : “हनी.. कुल डाऊन.. आई माझी नाही, तुझी येते आहे..”

तर त्याची बायको म्हणाली.. “ओह हाऊ वंडरफुल.. दोन महीने झाले आईला न भेटुन.. शेखु आपण जायचं सकाळी आईला पिक-अप करायला. खुप बरं वाटेल अरे तिला.. आणि आपलंही लॉंग ड्राईव्ह खुप दिवसांपासुन पेन्डींग आहे.. जाऊ यात ना प्लिज.. आणि येताना जेम्स कडे मस्त ब्रेकफास्ट पण करुन येऊ. बरं आहे आई रविवारीच येतेय.. मुलांना पण शाळा नसल्याने दिवसभर खेळता येईल तिच्याशी नै..”
केतन आणि अनु दोघंही हसायला लागतात.

अनु : ए.. पण असं सगळ्यांच्याच बाबतीत होतं अस् नाही हा.. कित्तेक मुली असतात चांगल्या.. ज्या घरात जातात त्याच घरातल्या होऊन रहातात. सासु-सासरे काय आणि आई-वडील काय दोघंही त्यांना सारखेच असतात.

केतन : हो.. माहीती आहे मला.. बघतोय ना मी माझ्या डोळ्यासमोर.. म्हणुनच तर म्हणलो.. माझं मत चुकीचं होतं…

दोघंही एकमेकांकडे बघत रहातात.

अनु लाजते.. इतक्या स्टेजवर पार्वती एका विंगेतुन येऊन दुसर्‍या विंगेत जाते. जाताना ती एकवार केतनकडे आणि एकदा अनुकडे बघते.
पार्वतीला बघुन अनुची आणि केतनची नजरानजर होते. जणु काही दोघांनाही केतनने कॉफी शॉपमध्ये सांगीतलेले पार्वती-सुशांतचे बोलणे आठवते. पार्वती निघुन गेल्यावर दोघंही पुन्हा जोर जोरात हसतात. मग..

अनु : बरं चल, बरीच कामं रेंगाळली आहेत… पळते मी..

अनु निघुन जाते….
काही क्षण शांतता आणि मग लपुन बसलेला सखाराम स्टेजवर डोकं खाजवत येतो. एकवार ज्या दिशेने अनु गेली तिकडे बघतो, आणि मग केतनच्या मागे जाऊन उभा रहातो.

केतन अनु ज्या दिशेने गेली तिकडे पहात उभा असतो. उजव्या तळहाताची मुठ करुन तो निराशेने डाव्या बाजुला छातीवर तिनदा मारतो आणि मग शेवटी दीर्घ श्वास घेउन एक उसासा घेत मागे वळतो..

केतन : (सखारामला असा अचानक आलेला पाहुन चपापतो) काय रे सख्या.. तु कधी आलास?

सखाराम नुसतंच केतनकडे बघुन मान हलवत बसतो आणि एका बोटानं सांगणार सांगणार अशी खुण करत रहातो.

तेव्हढ्यात पार्वती पुन्हा स्टेजवर येते. सखाराम ती जाईपर्यंत तिच्याकडे आ वासुन बघत रहतो. पहाता पाहता त्याची आणि केतनची नजरानजर होते.

केतन सखारामप्रमाणेच नुसती मान डोलावतो आणि एक बोट हलवत ’सांगणार.. सांगणार’ अशी खुण करतो.

स्टेजच्या दुसर्‍या कोपर्‍यातुन आई आणि तायडी सामानाने भरलेल्या पिशव्या घेउन येतात. त्यांना येताना बघुन सखाराम लगेच धावत धावत जातो आणि त्यांच्या पिशव्या घेऊन कोपर्‍यात ठेवुन देतो. दोघी हाश्श-हुश्श करत सोफ्यावर बसतात. केतन आतमध्ये निघुन जातो.

सखाराम दोघींना स्वयंपाकघरातुन पाणी आणुन देतो.

आई: तु काही म्हण, पण ती पैठणी मस्तच होती.. घ्यायला हवी होती तु…करवली आहेस शेवटी..
तायडी: अगं मी घेउन काय करु, तु मुलाची आई.. तु घ्यायला हवी. मी एव्हढी महागाची साडी घेउन उपयोग काय त्याचा..? नंतर नेसणं ही होत नाही.. पडुन रहाते मग.. त्यापेक्षा तुच घ्यायची होतीस..
आई : अगं पण.. (सखारामला तेथेच उभा पाहुन त्या विषय बदलतात).. काय रे सखाराम काही बोलायचे आहे का?

सखाराम काही वेळ तात्कळत उभा रहातो आणि मग जमीनीवर बसतो..

सखाराम : म्हंजी.. आता कसं सांगु तुम्हास्नी.. त्ये केतनदादांच डोस्क-बिस्क फिरलं हाय व्हयं?

दोघीही चमकुन सखारामकडे पाहु लागतात.

आई : का रे? काय झालं?
सखाराम : अवं, मगाशी ते अनु ताईंना सुशांतदादाशी लगीन करु नको असं सांगत होते..

आई आणि तायडी (एकदम) : चलं रे, काही तरी सांगु नको..
सखाराम : अवं.. म्या स्वतःच्या डोळ्यांनी ऐकलय?
आई : काय? अरे काय बोलतोयेस? डोळ्यांनी कधी कोणी ऐकतं का?
सखाराम : म्हंजी.. स्वतःच्या कानांनी पाहीलय.. ह्यो.. हिथं.. हिथं केतनदादा आणि अनुताई बसल्या व्हत्या.. आणि केतन दादा त्यास्नी म्हणत होत्ये..

तायडी : काय काय बोलतोय हा सखाराम?? डोळ्यांनी ऐकलय काय.. कानांनी पाहीलय काय?
आई : अरे तो मजेने म्हणत असेल.. इतकी वर्ष अमेरीकेत काढली आहेत त्याने.. थोडासा मोकळा स्वभाव आहे त्याचा.. तुझा उगाच गैरसमज झाला असेल..

सखाराम काही तरी बोलण्यासाठी तोंड उघडतो पण तेव्हढ्यात स्टेजच्या कोपर्‍यातुन बादली आणि केरसुणी घेउन पार्वती येते. सखाराम पुन्हा एकवार “आssss” वासुन तिच्याकडे पहात रहातो.
मागुन पुन्हा एकदा ते “नाक्का मुका.. नाक्का मुकक्का” चे संगीत पार्वती आतमध्ये जाईपर्यंत वाजत रहाते.

तायडी : बरं ते भजनीमंडळात आज रात्री आपल्या दोघींना केळवणाला बोलावले आहे.. काय करायचं आहे? जायचं आहे ना? फार दमायला झालं बाई आज..
आई : हो हो….जाऊ ना.. परत नंतर नाही जमणार.. असं ऐनवेळी नाही म्हणणं बरोबर नाही दिसणार.. आणि सकाळीच भेंडे बाईंना सांगीतले आहे रात्री आम्ही येणार आहोत म्हणुन..
तायडी : हो बाई.. असं नाही म्हणायचं म्हणजे जरा जिवावरच येते नाही.. नकोच ते.. जाऊ यात आपण.. पण केतनला सांगीतले आहेस का?
आई : अग्गोबाई.. विसरलेच की मी.. थांबा त्याला सांगुन येते… तु घे आवरायला..
तायडी : थांब तु.. मी सांगते.. तिकडेच चालले आहे

तायडीपण उठुन निघुन जाते.

आई : पार्वती.. हे बघ आम्ही दोघी बाहेर चाललो आहे.. रात्री केतनपुरता स्वयंपाक कर.. आणि हे बघ.. मुगाची डाळ कर, आवडते त्याला आणि दोन-चार पोळ्या जरा जास्तच कर, उद्या सकाळच्याला फोडणीची पोळी करु..

पार्वती मान डोलावते..

आई निघुन जातात.. पार्वती स्वयंपाकघरात कामात मग्न होते..

स्टेजवरचे दिवे मंद होत जातात…..