अर्धसत्य - अपघात Swapnil Tikhe द्वारा सामाजिक कथा मराठी में पीडीएफ

Featured Books
श्रेणी
शेयर करा

अर्धसत्य - अपघात

aअसे म्हणतात ‘सत्य’ जरी ‘गुणकारी’ असले तरी ते ‘कटू’ असते आणि ‘असत्य’ जरी ‘गोड’ असले तरी ‘विषारी’ असते. ‘अर्धसत्य’ मात्र आपल्याला हवे तसे मांडता येते, सत्याचा कडूपणा आणि असत्याचे विष आपल्याला हवे तसे कमी अधिक करता येत असते आणि त्यामुळे अर्धसत्य तुलनेने ‘गोड’ आणि ‘गुणकारी’ भासत असते.

पण जेव्हा त्या अर्धसत्याची दुसरी बाजू समोर येते तेव्हा मात्र ती निश्चितच कटूही असते आणि विषारीसुद्धा... अशाच एका अर्धसत्याची कहाणी “अपघात”

आज शेखरचा अठरावा वाढदिवस होता. तसा त्याच्या आयुष्यातील अत्यंत आनंदाचा दिवस होता. सकाळचा वेळ कॉलेजामधील मित्रांबरोबर व्यतीत करून दुपारी सिनेमा आणि मग संध्याकाळी जंगी मेजवानीचे आयोजन केले गेले होते. शेखरचे सगळे मित्र आणि मैत्रिणी आवर्जून या कार्यक्रमाला उपस्थित होते. शेखरच्या आवडत्या खाद्य पदार्थांनी खोलीतील टेबल भरलेले होते. तरुण मुले आणि मुली उडत्या चालींच्या गाण्यावर थिरकत होती. त्यातही भर म्हणून शेखरला भरमसाठ भेटवस्तू मिळाल्या होत्या. अठराव्या वाढदिवसा निमित्त त्याने विशेष करून मागितलेली नवीन स्कूटर काही वेळापूर्वीच दारात उभी झाली होती. त्याच्या आनंदात कसलीच कमतरता राहू नये याची पूर्ण काळजी त्याच्या लाडक्या काका-काकूंनी आणि त्याच्या सर्वच मित्रांनी घेतली होती. कोणत्याही तरुण मुलाने आनंदात हरवून जावे असे घरातील वातावरण झाले होते. शेखरही सर्वच समारंभामध्ये उत्साहाने वावरत होता, त्याच्या मानतील आनंद त्याच्या चेहऱ्यावर झळकत होता.

या सर्व आनंदाच्या वातावरणात मिस्टर काळे मात्र एका कोपऱ्यात शांत बसून होते. राहून राहून आपल्या पाकिटातील जुना फोटो निरखून बघत होते. त्यांची ही अस्वस्थता शेखरच्या नजरेतून सुटली नव्हती. म्हणूनच सर्व कार्यक्रम संपल्यावर आणि सर्व मित्रांना निरोप दिल्यावर त्याने आपल्या लाडक्या काकांशी बोलायचे ठरवले होते.

खरे तर काकांचे असे वागणे आता शेखरला नवे नव्हते. नेहमीच ते अशा आनंदाच्या क्षणी आणि विशेषतः शेखरच्या वाढदिवसाच्या दिवशी दु:खात हरवून जात असत. अशा वेळी ते बहुतेक वेळेला एकटेच बसणे पसंत करत असत आणि आताही ते तसेच वागत होते.

त्याला कारणही तसेच होते.

खूप वर्षापूर्वी म्हणजे साधारण बारा वर्षापूर्वी याच दिवशी मिस्टर काळ्यांच्या हातून एक अपघात घडला होता. आपल्या पत्नीला डॉक्टर कडून घेऊन येत असताना घरा जवळील निर्मनुष्य रस्त्यावर त्यांच्या गाडीचा वेग किंचित जास्तच होता. अशा वेळी काही समजायच्या आत समोरच्या वळणावरून एक भरधाव मोटार त्यांना सामोरी आली होती. त्यांनी तो अपघात टाळण्याचे सर्वतोपरी प्रयत्न केले होते. पण काळाच्या मनात काहीतरी वेगळेच होते. त्या दोन्ही मोटारींची भयंकर धडक त्या वळणावर कदाचित आधीपासूनच ठरली होती. त्या अपघातात मिस्टर काळे पण जखमी झाले होते, मात्र सुदैवाने त्यांना फार दुखापत झाली नव्हती. मिसेस काळे मात्र त्यामानाने गंभीर जखमी झाल्या होत्या. अपघाता नंतर उपचारासाठी काही दिवस त्यांनी (मिसेस काळेंनी) जवळच्या इस्पितळात व्यतीत केले होते, मात्र त्या उपचारानंतर त्या पूर्णपणे सावरल्या होत्या. त्या विरुद्ध मिस्टर काळे यांची परिस्थिती होती. अपघात झाल्यावर ते सर्वात पहिले शुद्धीत आले होते, त्याच वेळी त्यांना समजले की आपल्याला धडकलेली गाडी इतर कोणाची नसून आपला जवळचा मित्र आणि सख्खा शेजारी महेश याची आहे.

महेशच्या गाडीतले चित्र अधिक धक्कादायक होते. गाडीला बसलेल्या धडकेमुळे गाडीच्या पुढच्या भागाचे खूप जास्त नुकसान झाले होते आणि महेश आणि त्याची पत्नी पुढच्या सीटवर जखमी अवस्थेत गंभीर जखमी होऊन पडले होते. चिमुरडा शेखर मागच्या सीटवर बसला असल्यामुळे जखमी होऊन बेशुद्ध झाला होता.

काळेंच्या गाडीतील मागच्या सीटवर बसलेल्या मिसेस काळेही जखमी झाल्या होत्या आणि अजून शुद्धीत यायच्या होत्या. रस्ता निर्मनुष्य होता, त्यामुळे तिथे फारशी मदत मिळू शकणार नव्हती. मिस्टर काळेंनीच त्या अवस्थेत धावपळ करून जवळची वस्ती गाठली आणि तेथील उपस्थित लोकांना मदतीची याचना केली. वस्तीतील लोकांनी मिस्टर काळे आणि इतर जखमींना जवळच्या इस्पितळात भरती करण्याची सोय केली होती. त्यानंतर इस्पितळातील उपचारा दरम्यान शेखरच्या आई-वडीलांचा मृत्यू झाला होता.

इस्पितळातील उपचारानंतर शेखर आणि मिसेस काळे पूर्ण बरे झाले होते. त्या तिघांच्या शारीरिक जखमा कालांतराने भरून आल्या होत्या तरीही त्या अपघातामुळे मनावर झालेल्या जखमा आज बारा वर्षानंतरसुद्धा कमी अधिक प्रमाणात ताज्याच होत्या असे म्हणावे लागेल.

कारण एकीकडे मिस्टर काळे आजही त्या अपघातासाठी स्वत:लाच जबाबदार धरत असत. त्या अपघातात त्यांनी आपला बालमित्र हरवला होताच पण त्याच बरोबर शेखरचे आई वडील सुद्धा त्याच्यापासून हिरावून घेतले होते. हे सर्व केवळ आपल्या बेजबाबदारपणामुळे घडले असल्याची कबुली ते वारंवार देत असत आणि पुन्हा पुन्हा दु:खी होत असत. खरे तर त्या अपघातासाठी त्यांना इतर सगळ्यांनी माफ केले असले तरीही अजून ते स्वत:च स्वत:ला माफ करायला तयार नव्हते.

तर दुसरीकडे शेखर अजूनही अधून मधून आपल्या आई-बाबांच्या आठवणीत हरवून जात असे. काळे काका काकूंनी आपले पालकत्व स्वीकारले आहे आणि त्याला अनुसरून उत्तम संगोपन केले आहे इतपत त्याला सगळे मान्य होते. परंतु त्यांना आई-बाबांची उपाधी द्यायला त्याचे मन अजूनही चाचरत होते. आपल्या जन्मदात्या आई-वडीलांची जागा दुसरे कोणीच घेऊ शकत नाही असेच त्याचे मन त्याला वारंवार समजावू पाहत होते.

मिसेस काळेंसाठी मात्र तो अपघात एक वरदान बनूनच आला होता. कारण अपघातात शेखरचे आई वडील वारल्या नंतर त्याची जबाबदारी घेणारे कोणीच नातेवाईक पाठीमागे नव्हते, त्यामुळे काळे दांपत्यानेच रितसरपणे त्याला दत्तक घेतले होते. तसेही लहानपणापासून तो मिसेस काळेंच्या सोबत राहिला होता त्यामुळे सहाजिकच तो त्यांच्या घरात सहज रूळला होता. काळे दांपत्याकडे सगळे ऐश्वर्य लोळत असले तरीही त्यांना अपत्य सुख प्राप्त झाले नव्हते. ती कमी मिसेस काळेंसाठी नेहमीच शेखर भरून काढत असे. अपघाता नंतर त्यांनी देखील आपल्या स्वत:च्या मुलाप्रमाणे त्याचे पूर्ण संगोपन केले होते. कालांतराने त्या शेखर मध्ये इतक्या गुंतल्या होत्या की शेखर आपला मुलगा नाही ही कल्पनाच त्यांना सहन होत नसे.

शेखरने आपल्याला एकदा तरी आई म्हणून हाक मारावी म्हणून त्यांचे मन अजूनही तडफडत होते. शेखर कडून “आई” ही हाक अजूनही न ऐकल्यामुळे त्यांचे कान आणि मातृत्व दोन्हीही अजून अतृप्तच होते. मिस्टर काळेंनाही आपल्या पत्नीची ही व्यथा पुरती ठाऊक होती. तसे असले तरीही त्या दोघांनी तशी जबरदस्ती आज पर्यंत शेखरवर कधीच केली नव्हती कारण या बाबतीत निर्णय घ्यायचा अधिकार त्याचाच असावा या मताशी दोघंही सहमत होते.

त्या घटनेला आता बारा वर्षे उलटून गेली होती. तो दिवस आणि विशेषतः तो अपघात त्या तिघांच्या आयुष्यावर कायमचे ओरखडे उठवून गेला होता. त्या अपघातातील जखमांची धग आज बारा वर्षानंतरसुद्धा त्यांना जाणवत होती. नियतीच्या एका अस्पष्ट संकेताने त्यांची आयुष्ये एकमेकांत गुंतली होती असे म्हणावे लागेल.

पार्टी संपली होती, सगळी मुले घरी निघून गेली होती. मिसेस काळे नोकर मंडळींना हाताशी घेऊन घर आवरून घेत होत्या. मिस्टर काळे मात्र आपल्या दु:खात अजूनही हरवून होते. आज मात्र त्यांची ही अवस्था शेखरला बघवत नव्हती. खरे तर त्या अपघाता संबंधी त्याची काकांकडे कसलीच तक्रार नव्हती. काकांनी बारा वर्षा नंतर सुद्धा स्वत:ला त्या अपघाताची शिक्षा देऊ नये असे त्याला मनोमन वाटू लागले होते. म्हणूनच त्याने मनाशी एक निर्णय घेतला आणि काकांशी बोलण्यासाठी तो त्यांच्या समोर उभा राहिला.

त्याला बघून ते फक्त हसले, वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आणि उठून खोलीत जाऊन बसले. त्यांना अजून काही वेळ तरी असे एकटेच बसायचे होते. अशा वेळी त्यांना कोणाशीच कसलाच संवाद नको असे. इतके दिवस काकू आणि शेखर, काकांचे असे वागणे निमुटपणे सहन करत असत, त्यांना स्वत:चे दु:ख सावरून उभे राहण्यासाठी आवश्यक तो वेळ ते नेहमीच देत असत. पण आज मात्र शेखर जणू हट्टालाच पेटला होता. म्हणूनच तो त्यांच्या मागोमाग त्यांच्या खोलीतही गेला.

“बाबा!!” – शेखरने आज प्रथमच त्यांना बाबा म्हणून संबोधले होते. त्यामुळेच त्यांचे डोळे क्षणभर चमकले आणि शेखरला प्रतिसाद देण्यासाठी त्यांची नजर हातातील फोटोवरून हलली.

“बाबा!, अजून किती दिवस तुम्ही त्या अपघाताची जबाबदारी घेऊन स्वत:ला अशी शिक्षा देणार आहात?” – शेखर म्हणाला.

शेखरच्या तोंडातून “बाबा” ही हाक ऐकून मिस्टर काळे मनोमन सुखावले होते, शेखरने त्यांच्या नात्यात उरलेले शेवटचे थोडे अंतरही आता मिटवून टाकले होते. शेखरने खरेच आपल्याला माफ केले आहे याची ग्वाही त्यांचे मन त्यांना देऊ लागले आणि नकळतच त्यांच्या भावना उचंबळून आल्या आणि ते गदगदा रडू लागले. शेखरला काकांची अशी प्रतिक्रिया अजिबात अपेक्षित नव्हती.

“बाबा, तो एक अपघात होता.

तुमच्या जागी दुसरा कोणताही माणूस जर गाडी चालवत असता तर कदाचित तो सुद्धा हा अपघात टाळू शकला नसता. मा‍झ्या मनात तुमच्या विषयी कसलाही राग नाही आहे. काकूंच्या-,.... आईच्या मनातही तुमच्या विषयी कसलाच राग नाही आणि कदाचित माझे जन्मदाते आई-वडील जरी इथे असते तर माझा हा वाढदिवस, तुम्ही दिलेले हे प्रेम बघून त्यांनीही तुम्हाला कधीच माफ केले असते.

मग असे असून सुद्धा तुम्ही दु:खी का? तुमची ही अपराधीपणाची भावना दूर व्हावी म्हणून आम्ही नक्की काय करायला हवे?” – शेखर भावनेच्या भरात बोलत होता, त्याचा आवाज किंचित चढला होता.

मिसेस काळे तो आवाज ऐकून धावतच त्या खोलीत दाखल झाल्या होत्या. तरीही मिस्टर काळे अजून दु:खातून बाहेर येत नव्हते. उलट आपल्या अश्रूंना आवरण्याचे कसलेच प्रयत्न ते करताना दिसत नव्हते. खोलीत येताच मिसेस काळेंना सर्व परिस्थिती समजली, तसेही शेखरचे शेवटचे वाक्य त्यांनी स्पष्टपणे ऐकले होते. त्यामुळेच आपणही शेखरला मदत करून मिस्टर काळ्यांशी आज स्पष्ट बोलावे, आणि तो दिवस आपल्या आयुष्यातून कायमचा पुसून टाकावा असे त्यांना वाटू लागले.

“पाहीलंत, आज तो आपल्या आई-बाबा सुद्धा म्हणू लागला आहे. अजून काय हवे आहे तुम्हाला? किती दिवस तुमचे आयुष्य त्याच दिवसापाशी अडकून राहणार आहे? तो अपघात होता हे तुम्ही पण मान्य करता, पण मग का तुमच्या आयुष्याची गाडी त्या अपघाताच्या वळणावर वेळोवेळी बंद पडत असते.

मला पुढे जायचे आहे, शेखरलाही पुढे जायचे आहे. आम्ही सगळा भूतकाळ विसरून मनावर दगड ठेवून पुढची वाटचाल करतो आहोतच ना? मग तुम्हीसुद्धा आम्हाला साथ दिली तर काय बिघडणार आहे? तुम्हालाही आमच्या साठी पुढे चालावेच लागेल.

त्या साठी सगळ्या जगाच्या माफी पेक्षा तुम्हाला आधी तुमची स्वत:चीच माफी कमवावी लागेल. त्या दु:खात अजून किती दिवस जगायचे? या प्रश्नाचे उत्तर तुम्हाला शोधावेच लागेल....” – मिसेस काळेंना सुद्धा त्यांच्या भावना आवरत नव्हत्या.

जगासमोर आपला नवरा हसर्‍या चेहर्‍याने आणि समाधानाने वावरत असला तरीही तो मनातून किती दु:खी आहे हे बाकी सगळ्यांपेक्षा त्यांनाच जास्त ठाऊक होते. इतके दिवस त्यांनी या भावना स्वत:पाशीच जपून ठेवल्या होत्या पण आज शेखरने सगळीच समीकरणे बदलून टाकली होती. त्याने दोघांना आई-बाबा ही उपाधी देऊन त्याच्या मनावरील त्या अपघाताचे घाव भरून काढण्याची तयारी त्याने दर्शवली होती. मिसेस काळेंच्या मते शेखरने त्या अपघाताचे घाव भरून काढण्यासाठी एक खूप मोठे पाऊल पुढे टाकले होते आणि आता प्रतिसाद म्हणून मिस्टर काळेंनीसुद्धा थोडे पुढे सरकणे गरजेचे होते. तसे केल्यानेच त्या अपघाताचे त्यांच्या आयुष्यावरचे सावट दूर होणार होते.

भरलेल्या डोळ्यांनी आणि खूप जास्त अपेक्षेने ते दोघे मिस्टर काळेंच्या प्रतिसादाची वाट बघत होते.

मिस्टर काळे अजूनही कसलाच प्रतिसाद देत नव्हते. आता मात्र मिसेस काळे मिस्टर काळ्यांचा हात हातात घेऊन त्यांना जवळ जवळ विनवणी करू लागल्या होत्या. मिस्टर काळेंनी मात्र आपले डोळे घट्ट मिटून घेतले होते.

‘आपण बाबांच्या स्वत:शी सुरू असलेल्या संवादात व्यत्यय तर आणत नाही आहोत न?’ अशी शंका शेखरला आली आणि त्याने आईला तेथून उठवले.

“मला वाटते आपण नेहमी प्रमाणेच बाबांना अजून थोडा वेळ द्यायला हवा.” – शेखर

असे म्हणून शेखर मिसेस काळेंना तेथून बाहेर घेऊन जाऊ लागला होता. मिसेस काळेंचा हात हातातून सुटताच मिस्टर काळे भानावर आले. आणि भरलेल्या डोळ्यांनी दोघांना मनभरून बघू लागले. शेखर मात्र मंद पावलांनी आईला खोलीतून बाहेर घेऊन जात होता. तिच्या भावना सावरण्यासाठी तिचे सांत्वन करत होता.

“बरोबर म्हणालीस तू..” – मिस्टर काळे म्हणाले आणि त्या दोघांची खोलीतून बाहेर पडणारी पावले जागेवरच थबकली.

“बरोबर म्हणालीस... मला पुढे सरकावेच लागेल आणि त्या साठी मला माझी स्वत:ची माफी कमवावी लागेल.....” – मिस्टर काळे म्हणाले.

त्यांचे वाक्य आशादायक होते, म्हणूनच मिसेस काळे शेखरचा हात सोडून परत एकदा मिस्टर काळेंकडे वाळू लागल्या. तेव्हा मिस्टर काळेंनीच त्यांना हात दाखवून थांबवले आणि स्वत:कडे येण्यापासून परावृत्त केले आणि भरलेल्या आवाजाने बोलू लागले.....

“तुम्ही इतके दिवस मला वेळ दिला आहेत, मा‍झ्या दु:खातून सावरण्याची संधी दिली आहेत. ही शेवटची वेळ ...... उद्या सगळे नीट झाले असेल.” – मिस्टर काळे आश्वासक शब्दात म्हणाले आणि त्यामुळेच मिसेस काळे आणि शेखर यांनी मिस्टर काळेंना प्रेमाने आलिंगन दिले. मग मात्र ते दोघे आनंदाने खोलीतून बाहेर पडले.

मिस्टर काळे आता खोलीत एकटेच होते. आपले दु:ख कुरवाळण्यासाठी, आपल्या कर्माचा जमा-हिशोब मांडण्यासाठी, आपले आयुष्य परत एकदा सावरण्यासाठी ही रात्रच आता त्यांची सोबती होती. रात्रभर त्यांच्या एकांतात व्यत्यय आणण्यासाठी आता त्या खोलीत कोणीच येणार नव्हते.

खोलीतून बाहेर पडल्यावर मात्र मिसेस काळे स्वत:ला सावरू शकल्या नाहीत, शेखरने आई म्हणून संबोधल्याने त्यांचे मन जास्तच आनंदित झाले होते, त्या वारंवार शेखरच्या चेहर्‍यावरून हात फिरवत होत्या आणि परत एकदा अभिमानाने त्याच्याकडे अभिमानाने त्याच्याकडे बघत होत्या. मिस्टर काळेही आता पुढे सरकण्यासाठी तयार झाले होते. दैवाने आपल्या आयुष्यातील दोन मोठे प्रश्न एकाच रात्रीत सोडवले आहेत असे त्यांना मनोमन वाटू लागले होते. त्याच आनंदात त्या रात्री त्या झोपी गेल्या.

नेहमीप्रमाणे काळ पुढे सरकत होता. नेहमी प्रमाणे पक्षांची किलबिल ऐकून मिसेस काळ्यांची सकाळ झाली होती. काल रात्रीचे संभाषण संक्षिप्त असले तरीही भावनिक कल्लोळ उत्तेजित करणारे होते. त्या भावनिक कल्लोळामुळेच शांत झोप पूर्ण होऊनसुद्धा त्यांचे डोके अजून दुखत होते. त्या दुखत्या डोक्यावर इलाज म्हणून कडक चहा करावा या विचारात त्या स्वयंपाक खोलीत शिरल्या होत्या. नुकताच त्यांचा नित्यक्रम सुरू होत होता आणि तेवढ्यात शेखरने आकांताने मारलेल्या हाकेमुळे त्या पूर्णपणे हादरून गेल्या.

हातातील कामे सोडून धावतच त्या शेखरने हाक मारलेल्या खोलीत गेल्या, त्याच खोलीत काल रात्री मिस्टर काळेंना ते दोघे एकटे सोडून गेले होते. ती खोली आज सकाळी रिकामी होती, शेखरच्या हातात एक चिठ्ठी होती. ते दृश्य पाहून मिसेस काळेंना एकंदरीत अंदाज आला होता आणि म्हणूनच त्या मटकन खाली बसल्या.

शेखर शांतपणे हातातील चिठ्ठी वाचू लागला –

“कशी सुरुवात करावी हे मला समजत नाही, आज खूप बोलायचे आहे पण सगळेच पत्रात मांडता येणार नाही. म्हणूनच कालचा संवाद संपला तिथून पुढे सुरुवात करतो.

शेखर, काल तू आम्हाला आई-बाबा ही उपाधी देऊ केलीस त्यानंतर खरे तर मला आनंद व्हायला हवा होता पण त्याउलट मा‍झ्या मनातील अपराधी भावना अधिक तीव्रतेने वाढली.

‘जगाची माफी कमावण्या आधी मला माझी स्वत:ची माफी कमवावी लागेल.’ हे तुमचे म्हणणे मला शतश: पटले आहे आणि मी त्या दिशेने प्रयत्न करायचे ठरवले आहे. खूप विचार केल्यानंतर मी या निर्णयाप्रत पोचलो आहे की स्वत:ची माफी कमवायची असेल तर त्याची सुरुवात मला ‘पूर्ण सत्य’ सांगून केली पाहिजे.

मी त्या अपघाताबद्दल तुमच्याशी खोटे बोललो असा जर आरोप माझ्यावर होणार असेल तर तो साफ चुकीचा असेल. कारण मी तुमच्याशी कधीच खोटे बोललेलो नाही पण त्याच वेळी हे देखील तितकेच खरे आहे की मी तुम्हाला त्या अपघाताबद्दल सर्व सत्य सांगितले नाही.

होय त्या अपघाताला मी जबाबदार आहे आणि म्हणून मी स्वत:ला अपराधी समजतो हे मी सांगितलेले ‘अर्धसत्य’ आहे आणि कदाचित हीच जाणीव मला मा‍झ्या मनातील अपराधी भावना दूर करून देत नसावी या निर्णयाप्रत मी आलो आहे.

असे म्हणतात ‘सत्य’ जरी ‘गुणकारी’ असले तरी ते ‘कटू’ असते आणि ‘असत्य’ जरी ‘गोड’ असले तरी ‘विषारी’ असते. मी तुम्हाला सांगितलेल्या अर्धसत्यामध्ये सत्याची कटुता कमी केली होती आणि असत्याचा विषारीपणाही सौम्य केला होता. आज मी सत्याचा उर्वरित अर्धा भाग तुमच्या समोर मांडणार आहे, तो निश्चितच कटू आणि विषारीही असेल याची मी तुम्हाला पूर्व कल्पना देत आहे.

त्या दिवशी मी हिला डॉक्टरांकडे घेऊन गेलो होतो, खूप प्रयत्न करून सुद्धा आम्हाला अपत्य सुख प्राप्त होत नव्हते, त्याचे मुळ कारण शोधण्यासाठी डॉक्टरांनी काही टेस्ट केल्या होत्या. अर्थात त्या टेस्ट बाबतही, मी हिला सर्व सत्य सांगितले नव्हते. डॉक्टरांकडे काही तपासण्या करण्यासाठी जात आहोत इतकीच कल्पना तिला दिली होती. त्या टेस्टचे रिपोर्ट मात्र अतिशय निराशाजनक होते. ही कधीच आई बनू शकणार नाही या निर्णयाप्रत डॉक्टर पोचले होते. हिचे मुलांविषयीचे प्रेम बघता, आणि आई होण्याची तीव्र इच्छा समोर असताना हे सत्य तिला न दुखावता कसे समजवावे हाच विचार मी गाडी चालवत असताना करत होतो. सत्य परिस्थिती मा‍झ्या मनातील विफलता वाढवत होती. नियतीने अशी क्रूर थट्टा आमच्या सोबतच का करावी हा प्रश्न मला वारंवार छळत होता. त्यामुळे सहाजिकच माझी मनस्थिती क्षणाक्षणाला बिघडत चालली होती. दैवावरील माझा क्रोध अनावर होत होता आणि त्यामुळेच गाडी थोडी जास्तच वेगात धावत होती. मागच्या सीटवर ही निवांत झोपली आहे याचे देखील भान मला राहिले नव्हते.

......आणि तेव्हाच त्या वळणावर तो अपघात घडला.

सगळ्यात पहिल्यांदा मी शुद्धीत आलो होतो तेव्हा तुम्ही सगळेच बेशुद्ध होता. गाडीतून बाहेर पडलो तेव्हा काही क्षण काय सुरू आहे हे मला सुधारत नव्हते. ती अजूनही बेशुद्धच होती. मा‍झ्या बाजूच्याच सीटवर तिचे रिपोर्ट पडले होते, ते पाहून मला अपघाताआधीचे मा‍झ्या मानतील सगळे विचार स्पष्टपणे आठवले.

मी दुसर्‍या मोटारीकडे वळलो. तिथे पुढच्या सीटवर तुझे आई-बाबा आणि मागच्या सीटवर तू असे तिघंही बेशुद्ध होतात. सगळ्यांनाच लवकरात लवकर इस्पितळात न्यायला हवे हे मला समजले होते म्हणूनच मी माझी गाडी सुरू होते आहे का हे तपासून बघितले पण त्याचा काही उपयोग झाला नाही आणि त्याच वेळी परत एकदा डॉक्टरचे रिपोर्ट मा‍झ्या नजरेवर पडले आणि माझी मती भ्रष्ट झाली.

हा अपघात मला दैवाने चालून आलेली एक संधी भासू लागला.

“दुर्दैवाने जर कधी आम्हाला काही झालेच, तर शेखरची काळजी तुम्हालाच घ्यायची आहे बरं..का !!!” हे तुझ्या बापाचे वाक्य मला राहून राहून आठवू लागले.

आणि त्याच वेळी हिला संतती सुख देणे गरजेचे आहे हे पण जाणवू लागले.

आता जर तुझे आईवडील आज वाचले नाहीत तर तुझी जबाबदारी आमच्यावर येणार हे स्पष्ट होते आणि म्हणूनच ‘तुझ्या आईवडीलांचा अपघाती मृत्यू’ ही शक्यता मला त्या रिपोर्ट मधील सत्यावर दैवाने दिलेले उत्तर भासू लागली होती. अर्थात मा‍झ्या मनाच्या दुसर्‍या संवेदनशील बाजूने असे विचार क्षणार्धात खोडून काढले.

मग मात्र मा‍झ्या मनात वैचारिक द्वंद्व सुरू झाले. जाणारा प्रत्येक क्षण महत्त्वाचा होता आणि मला तत्काळ निर्णय घेणे महत्त्वाचे होते. पण काही केल्या मनातील द्वंद्व संपत नव्हते. म्हणूनच मी मधला मार्ग स्वीकारायचे ठरवले.

मी हा निर्णय नियतीवरच सोडायचे ठरवले आणि पुढची पंधरा मिनिटे गाडीत बसून राहायचे ठरवले. सगळ्यांनी सुखरूप राहावे अशी जर नियतीची इच्छा असेल तर तिने आम्हाला तत्काळ मदत पाठवून आमची मदत करावी हा विचार मा‍झ्या मनाला त्यावेळी योग्य वाटत होता. पण दहाच मिनिटे झाली असतील तेव्हा तुझे वडील शुद्धीत येऊ लागले होते. जीवाच्या आकांताने ते मदतीसाठी ओरडत होते. त्याची ती अवस्था मला बघवली नाही आणि माझे संवेदनशील मन द्वंद्वात विजयी झाले. आता माझा निर्णय झाला होता. मी तत्काळ गाडीतून बाहेर पडलो आणि जवळच्या वस्तीवरून मदत घेऊन येतो असे सांगून मी महेशचा निरोप घेतला.

मी धावतच वस्तीवर पोचलो, त्यानंतर क्षणाचाही विलंब न लावता वस्तीतील लोकांनी माझी मदत केली. आम्ही परत घटना स्थळी पोचलो तेव्हा महेश परत एकदा आपली शुद्ध हरपून बसला होता. आम्ही सगळ्यांना गाडीतून बाहेर काढले आणि इस्पितळात हलवले. इस्पितळात पोचताच सर्वांवर उपचार सुरू झाले होते. तुझी आणि हिची तब्येत लवकरच सुधारेल असे आश्वासन डॉक्टर देत होते पण तुझ्या आई वडीलांची परिस्थिती अधिक गंभीर असल्याचे समजत होते. इस्पितळात स्टाफ धावपळ करत होता आणि मी हतबलपणे समोरच्या बाकड्यावर बसलो होतो.

पुढच्या पाचच मिनिटात डॉक्टर मा‍झ्या समोर उभे होते. तुझ्या आई वडीलांचा शस्त्रक्रिया करताना मृत्यू झाल्याचे त्यांनी मला कळवले होते. नियतीने आपला निर्णय दिला होता असे माझे मन मला समजावू पाहत होते तेव्हाच डॉक्टरांच्या तोंडून ते वाक्य निघाले.

‘तुम्ही जर दहा मिनिटे लवकर आला असतात तर त्या दोघांच्या वाचण्याची शक्यता किमान पन्नास टक्क्यांनी वाढली असती.’

शेखर!!! आजही एकटा बसलो असताना डॉक्टरांचे ते वाक्य मा‍झ्या कानात स्पष्ट पणे परत परत ऐकू येते. निवांतपणे डोळे मिटले की तुझ्या बापाचा हसरा चेहरा डोळ्यासमोर येतो, ‘फक्त दहा मिनिटे’ इतके बोलून तो मोठ्याने हसू लागतो.

शेखर खूप आधीच मला समजले होते की आपले भविष्य कसे असावे हे निवडण्याची संधी नियतीवर सोडून मी खूप मोठी चूक केली होती. माझे भविष्य कसे असावे हे मीच ठरवावे अशी त्यावेळी नियतीचीच इच्छा होती, आणि अर्थातच मी त्या महत्त्वाच्या क्षणी हतबल झालो होतो. कदाचित म्हणूनच आजही जगाने जरी मला माफ केले तरीही स्वत:ला माफ करू शकत नाही.

माझा फार विचार करू नका. मी आता एका प्रवासाला निघालो आहे. मा‍झ्या पापाचे प्रायश्चित्त मला घेतलेच पाहिजे. ‘जगाची माफी मिळवण्याआधी मला स्वत:ची माफी कमावली पाहिजे.’

ज्या वेळी मी स्वत:ला माफ करू शकेल तेव्हाच माझा परतीचा प्रवास सुरू करेल. तो पर्यंत तुम्ही मनावर दगड ठेवून पुढचा प्रवास पार करत असाल अशी मी अपेक्षा करतो, कारण एक गोष्ट मात्र पूर्ण सत्य आहे. या सर्व परिस्थितीमागे तुमच्या दोघांचाही काडीचाही दोष नाही. आपल्यातील अंतर तेव्हा मात्र आता पेक्षा जास्त वाढले असेल तर मला आश्चर्य वाटणार नाही.”

पत्र संपले होते, दोघांच्याही डोळ्यातून अश्रु मुक्तपणे वाहत होते. काल बारा वर्षानंतर त्या अपघाताचे सर्व घाव भरून आले आहेत असे वाटू लागले असतानाच, अर्धसत्याचा दुसरा कडू आणि विषारी भाग आज समोर आला होता, त्याचे परिणाम दूर होण्यासाठी आता कदाचित परत एकदा पुढची बारा वर्षे परत एकदा खर्ची पडणार होती.

- समाप्त