मी आणि टकलू सैतान......
संध्याकाळचे चार वाजले होते. दिवसाभराची कामे उरकत आली होती. आता तासभरातच निघायचे होते. पुढे आठवडाभर सुट्टी टाकली होती. या सुटीत मात्र घरी निवांत आरामच करायचा असेही मी ठरवून टाकले होते.
सुटीवर जायच्या उत्साहातच मी हातातले काम संपवले. आता आठवडाभर घरी काय मजा करायची या स्वप्नात नकळतच मी माझ्या खुर्चीवर बसल्या बसल्याच हरवून गेलो. पण मी स्वप्नात हरवायला आणि साहेबांनी त्यांच्या केबिनमध्ये बोलवायला नेहमी कशी एकच वेळ सापडते हे मला न उलगडलेले कोडे आहे. त्यामुळेच ऑफिसच्या वेळात ऑफिसातील कोणत्याही माणसाने वैयक्तिक आनंदात हरवून जाऊ नये अशी जणू नियतीचीच इच्छा असावी असे माझे ठाम मत झाले आहे. म्हणूनच की काय तिने असे खडूस साहेब आमच्या माथ्यावर बसवले आहेत. ऑफिसातून निघायच्या वेळी डोक्यावर काम लादणे ही तर आमच्या साहेबांची खासियत आहे. ऑफिस मधल्या कर्मचार्यांच्या आनंदावर पाणी फिरवण्याचे पाप, आमचे साहेब अतिशय आनंदाने दिवसातून अनेकदा अगदी कर्तव्यनिष्ठ भावनेने करत असतात.
आजही त्यांनी परत एकदा तेच केले होते. पुढील आठवडाभर मी सुटीवरच जाणार आहे त्यामुळे ऑफिसात आज तासभर जास्त थांबून मी साचलेले काम उरकून घ्यावे असे त्यांनी मला हसत हसत सुचवले होते. सुचवले नाही तर तशी ऑर्डरच दिली होती असेच म्हणणे योग्य होईल, कारण पुढच्या दोनच मिनिटात त्यांनी त्या सर्व फाइल्स, माझ्या डेस्कवर पाठवून दिल्या होत्या.
त्यांच्या याच स्वभावामुळे आणि त्याच्या डोक्यावर विरळ होत जाणाऱ्या केसांमुळे संपूर्ण ऑफिस त्यांना ‘टकलू सैतान’ या टोपण नावाने ओळखू लागले होते. ऑफिस मधील प्रत्येकालाच टकलू सैतान आपले शोषण करतो आहे असे मनापासून वाटत होते.
अर्थात आता ते ऑफिस मधले शेवटचे काही दिवस मोजत होते. पुढील काही काळातच आमच्या ऑफिसच्या मुख्य ब्रांचवर त्यांची बदली होणार होती. आमच्या ऑफिसातली त्यांची जागा भरून काढता येईल अशा माणसांच्या यादीत माझे नाव सर्वात पुढे होते.
मी नाराजीनेच हातातील नवीन कामही उरकले. त्या वेळी आजूबाजूला बघितल्यावर माझ्या ध्यानात आले की ऑफिसमध्ये ‘मी’ आणि आमचा ‘ऑफिसबॉय’ असे दोघेच उरलो होतो. माझे काम संपल्याचा आनंद माझ्या पेक्षा ऑफिसबॉयच्याच चेहर्यावर जास्त होता.
“काय रे, एवढा कसला आनंद होतो आहे तुला?” – मी ऑफिसबॉयला विचारले.
“नाही, तसे काही नाही.” – ऑफिसबॉय
“अरे बोल रे, अजून कोणीच नाही आहे. बिनधास्त बोल.” – मी
“नाही हो साहेब, आज जरा लवकर जावे म्हणून विचार केला होता. पण तुम्ही काम घेऊन बसलात. म्हणले झाले. ‘गेली आजची संध्याकाळ वाया.’
तुम्हाला सांगतो, थोड्याच वेळापूर्वी तुम्ही तर मला नवीन टकलू सैतान वाटू लागला होतात.
पण आता पटले तुम्ही त्या टकलू सैतानासारखे नाही.” – ऑफिसबॉय
जरा मोकळेपणाने बोल म्हणले की त्याने पुढचा मागचा फार विचार न करता सगळे मनोगत बेधडकपणे व्यक्त केले होते. अर्थात ‘त्याने मला टकलू सैतान समजले म्हणून चिडावे’ की ‘मी तसा नाही अशी स्तुती केली’ म्हणून त्याचे कौतुक करावे अशा द्विधा मनस्थितीत मी सापडलो होतो. क्षणार्धात निर्णय न झाल्यामुळे मी केवळ हसण्यावरच वेळ मारून नेली. माझ्या त्या विचित्र हास्याने माझ्या मनातील गोंधळ त्याला नक्कीच समजला होता. त्यानेही मला हसून प्रत्युत्तर दिले.
ऑफिस बंद करून मी गाडीत येऊन बसलो. माझी टॅक्सी माझी वाट बघत होती. ऑफिस ते घर, या तासभराच्या प्रवासात ‘नवीन टकलू सैतान’ ही संकल्पना मला फार छळत होती. तसे मी नेहमीच सर्वांच्या मतांचा आदर करतो, कोणावरही कधीही अन्याय करत नाही. पण केवळ नवीन पदावर विराजमान झाल्यामुळे आपणही टकलू सैतान होऊ की काय असा प्रश्न मला छळत होता. त्यामुळे जर कदाचित आपल्याला साहेबांची जागा मिळाली तर मात्र आपण कोणाचेच शोषण करायचे नाही असे मी मनाशीच ठरवून टाकले होते.
पण खरेच आपण इतर लोकांवर अन्याय करतो का? ऑफिसबॉयचे म्हणणे मी किती मनावर घ्यायला हवे? ऑफिसबॉय प्रमाणेच ऑफिसामधील इतर सहकारी माझ्याकडे ‘भावी टकलू सैतान’ या कल्पनेने बघत नसतील ना? असे नानाविध प्रश्न माझ्या डोक्यात थैमान घालू लागले.
त्यामुळे घरी पोचल्यावर ‘मी थकलो आहे, मला आता डिस्टर्ब करू नका.’ असे मी जाहीर केले आणि थेट माझ्या खोलीत गेलो. रात्रभर माझे प्रश्न मला छळत होते.
सगळे लोक मला ‘नवीन टकलू सैतान’ असे म्हणून चिडवत आहेत. माझ्या नावाने दबक्या आवाजात कुजबुज होते आहे. माझ्या नावाचे जोक ऑफिस मध्ये चर्चिले जात आहेत, लोक त्यावर टाळ्या देऊन एकमेकांना दाद देत आहेत. मी समोर आल्यावर मात्र सगळे काम अगदी शिस्तीत चालू करून मला अभिवादन करत आहेत. असे नानाविध भास मला होऊ लागले होते. या सगळ्या कल्पना माझ्यासाठी अतिशय भयावह होत्या.
या कल्पना सत्यात येऊ नये म्हणून मी विशेष काळजी घेत आलो होतो. त्यामुळेच ऑफिसमध्ये माझे सगळ्यांशीच पटत असे. तरीसुद्धा काहीही झाले तरी मला नवीन टकलू सैतान व्हायचे नव्हते. पण ते किती अवघड आहे हे नकळतच ऑफिसबॉयने मला दाखवून दिले होते. त्यामुळेच नकळतसुद्धा आपल्याकडून कोणावरही अन्याय होऊ नये अशी माझी प्रामाणिक इच्छा होती. हे सगळे जमवण्यासाठी मला आधी माझ्या प्रश्नांची उत्तरे शोधणे क्रमप्राप्त होते, आणि हे सगळे मला लवकरात लवकर करायचे होते.
“अरे काही प्रोब्लेम आहे का?” – बाबा.
“हो न, आल्यापासून कुठे तरी हरवल्या सारखा दिसतोस. काल पासून कोणाशी काही बोलला सुद्धा नाहीस तू.” – आई.
सुंदर सकाळ होती. आई, बाबा, सुधा (माझी बायको), चिनू आणि मी सगळेच निवांत होतो. नाष्ट्यासाठी सगळे बाहेरच्या खोलीत बसलो होतो. समोर गरम गरम उपमा होता. सगळे कसे निवांत चालू होते पण माझ्या मनातले वादळ अजूनही शमले नव्हते.
“नाही, अगदी तसे काही नाही.” – मी स्पष्टीकरण दिले. माझ्या या उत्तरानंतर मात्र आम्ही शांततेत नाष्टा करू लागलो.
“बाबा, आमच्या शाळेत न कालपासून नवीन बाई आल्या आहेत. त्या आम्हाला इतिहास शिकवणार आहेत. तुम्हाला माहिती आहे, त्या आम्हाला अजिबात ओरडत नाहीत. अगदी चुकले तरी. परत परत समजावून सांगतात.
आम्हाला काही समजले नसेल तर आम्ही कधीही हात वरती करून त्यांना थांबवू शकतो आणि पाहिजे तो प्रश्न विचारू शकतो. असे त्यांनी आम्हाला तास सुरू होण्या आधीच सांगीतले होते. त्यामुळे काल आम्हाला खूप भारी वाटले. पहिल्यांदाच इतिहास शिकताना मजा आली. आम्ही खूप प्रश्न विचारले, बाई पण आनंदाने उत्तरे देत होत्या.
पहिल्यांदाच आम्हाला आमच्या शिकवणार्या बाई इतक्या चांगल्या वाटल्या.
खूप मजा आली.” – चिनू म्हणजेच चिन्मय, माझा मुलगा त्याच्या शाळेचा अनुभव सांगत होता.
मला मात्र त्याच्या बाई आणि त्यांची शिकवण्याची पद्धत म्हणजे माझ्या सगळ्या प्रश्नांचे उत्तर वाटू लागले होते. आता मला सगळे स्पष्ट दिसत होते. पुढे काय करायचे हे ठरवून मी मोकळा झालो होतो. हीच योग्य वेळ आहे हे ओळखून मी माझी कल्पना पुढे मांडली.
“सुधा, आई, बाबा, चिन्मय मला तुमच्याशी काही बोलायचे आहे.” – मी म्हणालो
माझ्या या वाक्यामुळे सगळे माझ्याकडे प्रश्नार्थक नजरेने पाहू लागले.
“कसे आहे, एकंदरीतच या जगात सागळीकडेच अन्याय सुरू आहे. त्यामुळे निदान आपले घर तरी या अन्यायाला अपवाद असायला हवे असे मला वाटते. त्यामुळेच सर्वात प्रथम आपल्या विरुद्ध होणार्या अन्यायाला वाचा फोडायला हवी.” – मी सगळ्यांचा अंदाज घेऊन बोलत होतो. मला माझ्या प्रयोगाचे मुळ कारण शक्य तो सगळ्यांपासून लपवायचे होते आणि निदान घरातल्यांना तरी मी टकलू सैतान वाटत नाही ना? खरेच आपण कोणावरच अन्याय करत नाही ना? हे खरे तर मला तपासून बघायचे होते.
घरात तरी कोणाचीच माड्याविषयी काहीही तक्रार नव्हती, त्यामुळे मी टकलू सैतान नसणार अशी माझ्या मनाला पूर्ण खात्री होती. एकंदरीत मी आमच्या ऑफिसबॉयचे बोलणे किती मनावर घ्यावे हे या प्रयोगाच्या निष्कर्षावरून ठरणार होते.
“म्हणजे आपण नक्की काय करायचे?” – सुधा.
मी माझ्याच विचारात इतका हरवून गेलो होतो की पुढे काय बोलायचे हेच मी क्षणभर विसरलो होतो, पण सुधाच्या त्या प्रश्नाने मी भानावर आलो.
“अगदी सोपे आहे. इथुन पुढे आपल्या घरात जर कोणाला असे वाटत असेल की त्याच्यावर अन्याय होतो आहे तर त्याने हात वर करायचा आणि समोरच्याला तसे स्पष्ट सांगायचे.” – मी माझी खरी कल्पना पुढे मांडली.
सुधाला ती फारच आवडली, आई आणि बाबा फार काही बोलले नाहीत आणि चिन्मय तर मलाच प्रश्न विचारून भंडावून सोडू लागला. तेव्हाच मी माझा स्वत:चा हात वर केला. ते पाहून सगळे एकदम शांत झाले.
“हे बघ चिन्मय, तू हा माझ्यावर अन्याय करतो आहेस. माझे शोषण होते आहे. तुझ्या सर्व प्रश्नांची उत्तरे मी तुला देईल पण थोडे सावकाश. आत्ता आपण नाष्टा करत आहोत तो आधी पूर्ण करूयात.” – मी चिन्मयला त्याच्या प्रश्नाचे उत्तर दिले होते आणि माझ्या प्रयोगाचे प्रात्यक्षिकही दाखवले होते.
“बाबा, मला समजले. आता काही उत्तर द्यायची गरज नाही.” – चिन्मय
समोर प्रस्तुत केलेल्या उदाहरणामुळे चिन्मयला आणि सगळ्यांनाच मी माझी कल्पना गंभीरपणे मांडल्याची जाणीव झाली आणि बहुतेक प्रश्नांची उत्तरेही आपसूकच मिळाली. आता मी वाट बघत होतो माझा प्रयोग रंगात येण्याची. माझ्या मनातील प्रश्नांची उत्तरे आज मला मिळणार होती. मी टकलू सैतान आहे की नाही हे मला समजणार होते.
त्याच आनंदात मी सुधाला चहा आणि भजी करून आणण्यासाठी ऑर्डर दिली आणि मला आश्चर्याचा पहिला धक्का बसला. बायको दोन्ही हात वर करून उभी होती. प्रयोग सूर झाल्या झाल्याच कोणी हात वर करेल आणि तेही माझ्या विरुद्ध अशी कल्पनासुद्धा मी केली नव्हती. पण अगदी तसेच घडले होते. सुधा हात वर करून उभे होती. तो धक्का पचवायला मला तसे जरा जडच गेले, पण मुळातच मी समजूतदार असल्यामुळे ‘बिनधास्त बोल.’ असे मी तिला सांगीतले.
“तुमची सुटी आहे हे मला मान्य आहे पण त्याचा आम्हाला जाच वाटायला नको इतकी काळजी घ्या. आताच नाष्टा करून दिला आहे. लगेच कसली भजी मागता आहात?
आम्हालाही सुटीचा आनंद मिळूद्यात की जरासा?” – सुधा जवळ जवळ माझ्यावर खेकसलीच. आई आणि बाबा दोघांनीही तिला पाठिंबा दिला.
“बाबा रे, तुझी सुटी आहे. आराम कर आणि आम्हालाही आराम करू दे. सतत ऑर्डरी सोडू नकोस.” – आई.
आता माझा नाईलाज झाला, कसा बसा मी हा धक्का पचवला आणि परिस्थिती सांभाळून घेतली.
“ठीक आहे, ठीक आहे सुधा. आई आणि बाबा, माझी नवीन योजना ऐका. मीच तुम्हाला फक्कड चहा करून आणतो. कशी वाटतेय कल्पना.” – मी उत्साहाने नवीन पर्याय समोर ठेवला.
माझा हा पर्याय ऐकताच बाबांनी हात वर केला. नाराजीनेच मी त्यांना विचारले,
“काय अन्याय होतो आहे आता?” – मी थोडे नाराजीनेच विचारले.
“मी माझ्या पोटाच्या आणि जिभेच्या वतीने हात वरती केला आहे. तुझ्या हाताचा चहा प्यायला मला आवडेल पण असा अवेळी पिणे म्हणजे मी माझ्या पोटावर केलेला अन्याय होईल आणि त्याच बरोबर सुधाच्या हाताने बनवलेल्या उत्तम उपम्याची चव तुझा चहा घेऊन जिभेवरून पळवणे हा जिभेवर केलेला अन्याय होईल. या दोन्ही अन्याय कारक परिस्थितीमुळे मी तुझा प्रस्ताव नाकारतो आहे.” – बाबा
बाबांच्या या उत्तराने मात्र मी निष्प्रभ झालो. नाराजीनेच मी माझ्या खोलीकडे वळलो. आत येऊन शांतपणे पुस्तक हातात घेतले आणि वाचू लागलो.
दहाच मिनिटे झाली असतील, परत एकदा बायको समोर हात वर करून उभी राहिली.
“आता काय अन्याय होतो आहे? मी तर इथे शांत पुस्तक वाचतो आहे, कोणालाही त्रास दिलेला नाही.” – मी.
“तेच तर. असे सुटीच्या दिवशी तुम्ही घरातल्या एका खोलीत नाराजीने बसला आहात, हा वेळ तुम्ही आनंदाने आमच्या सोबत घालवायला हवा.
तुमचे असे एकटे बसणे, हाच मला अन्याय वाटतो आहे.” – सुधा लाडीकपणे म्हणाली.
मी उठलो आणि तिच्या बरोबर बाहेरच्या खोलीत जाऊन बसलो. सगळ्यांबरोबर गप्पा झाल्या, दुपारच्या जेवणाचे बेत ठरू लागले. आज बाहेरच जेवायला जावे असे एकमताने ठरले होते.
अशा प्रसंगी बहुतेक वेळेला मी हॉटेलचे नाव जाहीर करीत असे आणि सगळे तयार होत असत, पण आज वेगळेच झाले. मी सुचवलेल्या पहिल्या तीनही नावांना हात वर उचलले गेले होते. आता तुम्हीच नाव सुचवा असे मी जाहीर केले. त्यानंतर मात्र मला आश्चर्याचा धक्काच बसला. ते चौघेही आपापसात बोलून नवीन हॉटेलची नावे शोधु लागले. माझे मत त्यांना विचारात घ्यावेसे वाटलेच नाही. मी मात्र तिथेच बसून सगळे अनुभवत होतो. दहा एक मिनिटाच्या चर्चे नंतर त्यांनी सर्वांनी मिळून एक नाव निश्चित केले. आम्ही सगळे तयार झालो आणि हॉटेलमध्ये गेलो. तिथेही पदार्थ ठरवताना परत एकदा हात वर झाले आणि मला माझ्या आवडत्या पदार्थांची ऑर्डर रद्द करावी लागली. आज सगळ्यांना स्वतःच्याच आवडीचे पदार्थ खायचे होते. त्यामुळे बाबांनी स्टार्टर ठरवले, सुधाने सूप निवडले, आईने भाजी आणि भात निवडला तर मुलाने शेवटचे डेजर्ट निवडले. त्यांनी ठरवलेल्या ऑर्डरला संमती देण्याशिवाय माझ्याकडे कसलाच पर्याय नव्हता. नाही म्हणायला मी माझ्या करता माझ्या आवडीचे एक मॉकटेल मागवले, आणि माझ्या स्वातंत्र्याचा आंनद घेतला.
टकलू सैतान न बनता सगळ्यांना खुष ठेवायचे असेल तर त्याची काय किंमत चुकवावी लागेल याची पुरती कल्पना आता मला येऊ लागली होती. त्यामुळे नकळतच मी शांत बसून इतरांपेक्षा वेगळा पडू लागलो होतो, पण वर पाहता याचे कुणालाच काही पडले नव्हते. सगळे आपापल्या जगात हरवल्याचे मला भासू लागले होते. त्यामुळेच त्यादिवशीचे ते जेवण मला बेचव लागत होते.
हॉटेलातून मात्र आम्ही सगळे थेट घरी आलो. आई आणि बाबा आता खोलीत झोपले होते, चिनु टीव्ही बघत होता. आमच्या खोलीत फक्त सुधा आणि मी
होतो.
"थँक्स." - सुधा म्हणाली.
"कशाबद्दल?" - मी
"आजचे जेवण खूप छान झाले." - सुधा
"का बरे?" - मी
"आज कसे सगळ्यांना त्यांच्या आवडी निवडी जपता आल्या. त्यामुळेच, आई आणि बाबा पण खूप खुष होते." - सुधा
"अच्छा, म्हणजे इतर वेळी नसतात का?" – मी नाराजीनेच विचारले.
"जाऊदेत मला नाही बोलायचे. तुमचे वेगळेच काहीतरी असते." - सुधा लाडिक रागाने म्हणली.
"सुधा खरे सांगू का?" - मी
"बोला की." - सुधा
"हे सगळे तुमच्या हात वर करण्या मुळे झाले आहे. आज पहिल्यांदाच तुम्ही तुमची मते निर्भीडपणे मांडलीत त्यामुळे हे झाले." - मी.
"हो न, आज पहिल्यांदाच तुम्ही तुमची मते आमच्यावर लादली नाहीत. त्यामुळेच हे झाले.
तुम्हाला ही कल्पना खूप आधीच सुचयला हवी होती, मी तर कित्तीतरी वेळेला हात वर केला असता." - सुधा आनंदाने म्हणाली.
सुधाने माझ्या कल्पनेच्या केलेल्या कौतुकात मी इतका हरवून गेलो होतो की नकळतच चुकीचा प्रश्न विचारून बसलो.
"खरंच? सांग बघू, तू कधी कधी हात वर केला असतास?" - मी
'खूप वेळा नाही हो, असेच कधी तरी.' असे काहीसे उत्तर मला अपेक्षित होते. पण सुधा मात्र तिच्या स्वातंत्र्याच्या आनंदात इतकी हरवली होती की तिने मला एक एक प्रसंग सांगायला सुरुवात केली.
सुरुवातीला मी खिलाडू वृत्तीने ऐकायचे ठरवून ऐकत होतो, पण पंधरा मिनिटे झाली तरी तिची यादी संपतच नव्हती आणि आपण चुकीचा प्रश्न विचारला आहे याची मला प्रकर्षाने जाणीव होऊ लागली. आता शोक करून काहीच उपयोग नव्हता. आता सुधा सांगेल ते मला शांतपणे आणि हसऱ्या चेहऱ्याने ऐकणे क्रमप्राप्त होते. साधारण वीस एक मिनिटे सलग यादी ऐकवल्यावर मात्र ती थकली आणि थांबली.
"छे, दमले हो मी. थांबा हं. पाणी पिऊन येते, कुठे जाऊ नका माझी यादी अजून संपली नाही आहे." - असे बोलून ती बाहेर निघून गेली. त्यामुळे ही मिळणारी विश्रांती केवळ एक अल्पविराम आहे हे मला समजले होते. दोनच मिनिटात जवळ जवळ धावतच ती परत आली आणि पुढची यादी सांगू लालगी. साधारण पुढच्या दहा एक मिनिटात ती भानावर आली आणि तिनेच यादी आवरती घेतली.
या प्रसंगाची खासियत अशी होती की त्या प्रसंगी मी कसे वागायला हवे होते हे देखील ती मला पटवून देत होती. म्हणजेच इतक्या दिवस तिने ही सगळी माहिती तपशीलवार आपल्या मनाच्या कोपऱ्यात साठवून ठेवली होती. आपल्या विषयी सुधाचे असे मत असेल अशी मला पुसटशी सुद्धा कल्पना नव्हती. तिच्या नेहमीच्या हसऱ्या चेहऱ्यामागे इतका राग दबला असेल हे मला जाणवलेच नव्हते. त्यामुळेच मन मात्र आत कुठे तरी दुखावले होते. निदान सुधासाठी तरी मी घरातला टकलू सैतानच होतो अशी माझी खात्री झाली.
सगळ्यांचे हॉटेल मधले वागणे आणि मग सुधाचे टीकास्त्र या दोन्ही प्रसंगामुळे माझे मन पुरते घायाळ झाले होते.
"उद्या तुम्हाला सुटी आहे, तर आज संध्याकाळी आपण आईकडे जायचे का?" - सुधाने निरागसपणे विचारले.
मी नाराज आहे याची जरासुद्धा कल्पना सुधाला आली नसावी.
मनातील विचित्र परिस्थितीमुळे खरे तर मला संध्याकाळ एकांतात घालवावी असे वाटू लागले होते, त्यामुळेच तिच्या या प्रश्नावर मी हात वर केला आणि सगळा खेळ बिनसला.
"माझ्या आईकडे जाणे म्हणजे तुला दर वेळीच अन्याय वाटत असेल न!!!" – क्षणार्धात सुधाच्या चेहर्यावरील आनंद विरला होता आणि त्याची जागा आता रागाने घेतली होती. त्यामुळेच सुधा अतिशय वरच्या स्वरात बोलली होती.
तिचा तो आवेश मला काही आवडला नाही. निदान मी हात वर का केला याचे कारण तरी तिला समजायला हवे होते आणि समजले नव्हते तर तसे तिने मला विचारायला हवे होते. असे माझे मत होते. तिच्या त्या पुढच्या कृतीचा निषेध म्हणून मी माझा दुसरा हात सुद्धा वर केला आणि त्याचा व्हायचा तोच परिणाम झाला. सुधाने आणखी काही तक्रारी ऐकवल्या.
आता मात्र, माझाही संताप अनावर झाला होता. आता कोणत्याही परिस्थितीत माघार घ्यायची नाही या निर्धाराने मी त्या वेळी वादात उतरलो.
पुढे शब्दाने शब्द वाढत गेले. छोट्याश्या वादाचे रूपांतर वाकयुद्धात होण्यास फार वेळ लागत नाही हे माहित असूनही मी स्वतःला थांबवले नाही.
माझा अहंकार, माझी बुद्धी, शब्दसामुग्री, जुन्या भांडणातील काही आठवणी आणि मुद्दे अशा फौजफाट्यासह मी ते युद्ध लढत होतो.
पुढे मात्र खूप घनघोर युद्ध झाले, आम्ही एकमेकांना शब्दाने घायाळ करण्यात व्यस्त झालो. वार आणि प्रतिकार जोमाने चालू होते. आम्ही दोघेही माघार घेत नव्हतो.
साधारण तासभर भांडल्यावर मात्र दोघांचेही डोके आणि तोंड दुखू लागले आणि आक्रमणाच्या तोफा आपसूकच थंडावल्या. आम्ही दोघांनीही सन्मानजनक माघार घेतली. प्रत्येक वेळी भांडण संपल्यावर जाणवणारे ज्ञान मला परत जाणवू लागले. अशा युद्धात कोणाचाच विजय होत नसतो, आपण आपल्याच आवडत्या व्यक्तीला केवळ काही काळाच्या क्रोधापायी कदाचित कायमचे दुखवत असतो. पण आता या ज्ञानाचा उपयोग नव्हता. कारण वाद आणि मुद्दा नक्कीच संपला नव्हता, कदाचित पुढचे भांडण आज सोडले तेथूनच पुढे सुरू होणार होते, पण सध्या तरी शांतता माझ्या वाट्याला येत होती आणि त्याची मला नितांत गरज होती. सुधा शांतपणे उठली आणि किचनमध्ये शिरली आणि स्वयंपाकाची तयारी करू लागली. अशा वेळी ही तणावपूर्वक शांतता दुसऱ्या दिवसापर्यंत टिकत असे. त्यामुळे आता परत विषयाला हात घालण्यात काहीच अर्थ नाही हे मला समजले होते म्हणून मी खोलीतच पडून राहिलो.
संध्याकाळ झाली होती. सुधाशी मी प्रेमाने वागतो त्यामुळे तिला तक्रारीला काहीच वाव नाही हा माझा ग्रह आता गळून पडला होता. दुःखी मन, डिवचलेला अहंकार आणि दुखणारे डोके सोबत घेऊन मी बाहेरच्या खोलीत आलो. आई आणि बाबा शांतपणे टीव्ही बघत होते.
त्यावेळी मला आईने आमच्यात मध्यस्ती करावी असे वाटले, म्हणून मी तिला माझी बाजू समजावून सांगू लागलो. मी जेमतेम दोनच वाक्य बोललो असेल तोच आईने हात वर उचलला. काय बोलावे हे मला समजत नव्हते. टकलू सैतानाविरूद्धचा प्रयोग अजूनही सुरूच आहे हे मी आमच्या भांडणामुळे विसरलोच होतो.
"हे बघ, कोण चूक आणि कोण बरोबर याच्याशी तुमच्या भांडणात काहीच घेणे देणे नसते.
त्यामुळे तुमची भांडणे तुमच्यातच मिटवत जा पाहू. उगाच माझे भजे होते तुमच्या दोघांमध्ये.
तुझी बाजू घेतली तर ती नाराज, तिची बाजू घेतली की तू नाराज. हा माझ्यावर होणारा अन्याय आहे आणि मला हे चालणार नाही." - आई शांतपणे म्हणाली.
तिचे ते वाक्य ऐकून मी गोंधळून गेलो होतो. आईदेखील माझ्यासमोर हात वर करेल असे मला वाटले नव्हते. कारण निदान आईवर तरी मी कधीच अन्याय केलेला नाही अशी माझी खात्री होती, पण तो ही गैरसमजही आता दूर झाला होता. आईला देखील आपण नकळत खूप वेळा दुखावले आहे ही गोष्ट मला तिच्या वर गेलेल्या हातामुळे समजली. पण सुधाबरोबर झालेल्या भांडणातून मी थोडेफार शिकलो होतो. त्यामुळेच आई कडूनही यादी जाणून घ्यायची चूक मी केली नाही आणि मनातील ग्रह स्वतःच दूर केला.
त्याच नैराश्यात मी माझा मोर्चा बाबांकडे वळवला. त्यांनी तर मी काही बोलायच्या आधीच हात वर केला होता.
"हे बघ, तुझी जुनी सवय आहे. खेळणे मोडले की मग ते बाबांकडे घेऊन यायचे. त्याने ते दुरुस्त करून द्यावे ही तुझी भाबडी अपेक्षा असते.
बाबारे, मी काही जादूगार नाही. दरवेळीच बिनसलेली गोष्ट मला नीट करता येणार नाही.
तुझे प्रॉब्लेम शक्यतो तूच सोडवत जा.
मी आहेच, पण दरवेळी उपयोगी पडेल अशी तुझी धारणा मला अन्यायकारक वाटते." - बाबा
बाबा बोलते झाले, त्यांचे शब्द मनावर आघात करत होते.
एकंदरीतच मी घरातल्या प्रत्येकासाठी टकलू सैतानच होतो अशी माझी खात्री झाली. आमच्या साहेबांविषयी माझी जी धारणा होती अगदी तशीच धारणा घरातल्या सगळ्यांची माझ्याविषयी होती.
आता मात्र हा प्रयोग मी उगीच रचला असे माझे ठाम मत झाले. अन्यायाला वाचा फोडणे वैगैरे ऐकायला छान वाटते पण ते निस्तरायला फार अवघड असते हे मला पुरते समजले होते. काल रात्री 'टकलू सैतान' बनण्याची वाटणारी भीती तर संपली नव्हती, पण ऑफिसबॉयचे म्हणणे मी निश्चितच मनावर घ्यायला हवे हे मला कळून चुकले होते.
त्याच बरोबर घरात काही बोलण्याची मला सोय उरली नव्हती. कोण कधी हात वर करेल आणि नवीन भांडण सुरू होईल याची काहीच खात्री देता येत नव्हती. हा नवीन प्रयोग करून मीच माझ्या गळ्यात धोंडा बांधून घेतल्याचा मला पश्चाताप होऊ लागला. माझ्या मनाने वर येणाऱ्या हाताची चांगलीच धास्तीच घेतली होती. त्यामुळेच उद्या सकाळीच हा असफल प्रयोग आटोपता घ्यायचा असे मी ठरवले.
फार कोणाशी बोलायला लागू नये म्हणून मी ऑफिसचे काम काढून बसलो. बाहेर ते चौघे जण टीव्ही बघण्यात मग्न होते, मधूनच त्यांच्या हसण्याचे आवाज माझ्या कानावर पडत होते. पण या सगळ्याकडे दुर्लक्ष करून मी माझ्या घायाळ मनाला सावरण्याचा प्रयत्न करत होतो. थोड्याच वेळात दारावर टक टक झाली. मी नजर वळवून बघितले तर आई तेलाची बाटली घेऊन उभी होती.
मी नाराजीनेच माझा हात वर केला. माझ्यावर अन्याय होतो आहे हे मला दर्शवायचे होते. पण घरातले कोणीच माझे ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हते. आईने चक्क माझ्या हाताकडे दुर्लक्ष केले आणि माझ्या शेजारी येऊन बसली.
“लहानपणापासूनची सवय आहे तुझी. नाराज झालास की असाच एकटा बसतोस. चल तेल लावून देते तुला.
थोडे बरे वाटेल.” – आई
“नाही नको उगाच, तुझ्यावर परत एकदा अन्याय व्हायचा.” – मी रागानेच बोललो.
आई त्यावर केवळ हसली आणि मला पुढे काही कळायच्या आतच तेलानी भरलेले तिचे हात माझ्या डोक्यावरून फिरू लागले. तिच्या हातात काय जादू होती ते शब्दात सांगता येणार नाही, पण दर वेळी डोक्यावरून तिचा हात फिरू लागला की माझा राग, दुख काही क्षणातच आपसूक दूर व्हायचे. आताही तसेच झाले. दोनच मिनिटात मी शांत झालो.
सगळी परिस्थिती नियंत्रणात घेतल्यावर मात्र आईने एका उत्तम मुत्सद्दी आणि मुरलेल्या राजकारण्याप्रमाणे मूळ विषयाला हात घातला आणि माझ्या अस्वस्थतेचे कारण विचारले. मी ही मोकळेपणाने बोलू लागलो. तिला सगळे सांगीतले, माझ्या मनातील भीती सांगितली, ऑफिसबॉयचे शब्द सांगीतले. सुधाबरोबरचे भांडण सांगीतले, मनातले अनुत्तरीत प्रश्नही सांगीतले.
“ही सगळी परिस्थिती तू कशी हाताळली असतीस? मला ऑफिसमध्ये किंवा घरीही टकलू सैतान बनायचे नाहीये ग.” – मी निरागसपणे तिला विचारले आणि माझी अडचण समोर मांडली.
त्यावर तिने परत एकदा हातावर तेल घेतले आणि माझ्या डोक्यावरून हात फिरवू लागली.
“ऑफिस मधले मला फार कळत नाही, पण मी जमेल तसे उत्तर देते, बघ तुला पटते आहे का.
मला आता सांग वाण्याकडून तू सामान आणतोस तेव्हा तुला तू त्याच्यावर अन्याय करतोस असे वाटते का?.” – आई
मी नकारार्थी मान हलवली.
“कारण मी सांगते, तिथे तुला पक्के ठाऊक असते की वाण्याने तुला दिलेल्या सामानाची योग्य ती किंमत वसूल केलेली आहे. त्यामुळेच तुला तिथे ही अन्याय केल्याची भावना येत नाही.
घरातही तसेच असते. सुधाकडून तुझ्या अपेक्षा असतात, तिला तू बिनधास्तपणे ऑर्डरी सोडत असतोस पण त्याची तू योग्य किंमत चुकवतोस का? याचा विचार कर. जेव्हा ती योग्य किंमत मिळेल तेव्हा ही अन्यायाची भावना आपोआप गळून पडेल.
एखादे गुलाबाचे फुल, कधी अचानक आणलेला गजरा मोठी जादू करत असतो.
चिनुसाठी पाठीवर पडणारी कौतुकाची थाप, आवडीचे चॉकलेटही चालून जाईल.
घरात प्रत्येक गोष्ट पैशाने साध्य होत नाही. त्यामुळे प्रेम, आपुलकी, काळजी, वेळ या गोष्टींमध्ये तुला किंमत चुकवावी लागेल.
मी इतके वर्षे तेच केले आहे.
तुझंच उदाहरण घे. हे तू असे रुसून बसतोस, मग हे असे केसांना तेल लावले की गाडी बघ कशी रुळावर येते.
आता बाकी तू हुशार आहेस, बाकीचे प्रश्न तूच सोडव.
आता मी निघते. मला सुधालाही मदत करायची आहे." - आई हसत हसत बोलत होती.
ती तेलाची बाटली बाहेर घेऊन जातानाच मला बाकीच्या प्रश्नांची उत्तरे मिळाली होती.
आता मला टकलू सैतान बनण्याची भीती वाटत नव्हती, मी माझा प्रयोग आजून एक दिवस चालू ठेवायचा निर्णय घेतला. त्या साठी काही खास तयारीही केली.
दुसऱ्या दिवशी सकाळीच मी बाहेर पडलो, सगळे झोपले होते. सगळे उठायच्या आधी मला घरी परत यायचे होते. मी घरी परत आलो तेव्हा सगळे झोपले होते. मी सुधाच्या आईबरोबर दारात उभा होतो, काल रात्रीच त्यांना फोन करून सर्व कळवले होते. त्याही तयार झाल्या होत्या.
आता दाराची बेल वाजवली होती, सुधाने झोपेतच दार उघडले. समोर आईला बघून तिचा आंनद ओसंडून वाहू लागला.
त्या दिवशी मात्र तिने एकदाही हात वर उचलला नाही, त्या उलट कालच्या भांडणाबद्दल दोन तीन वेळेला सॉरी देखील म्हणाली. मी मात्र मनातूनच आनंदात होतो. चिनूही खुष होता. आई माझ्याकडे बघून गालातल्या गालात हसत होती.
माझी उर्वरित सुटी आनंदात गेली, पुढे आमचा टकलू सैतान ऑफिस सोडून गेला आणि मला त्याच्या जागी बढतीही मिळाली.
पण मला माणसे सांभाळायची गुरुकिल्ली मिळाली आहे. आईचे सूचक आणि अनुभवी मार्गदर्शन वापरून मी ऑफिसदेखील व्यवस्थित सांभाळतो आहे. प्रत्येकाला त्याच्या कामाचा योग्य मोबदला मिळेल, ऑफिसात मान सन्मान मिळेल याची मी विशेष काळजी घेतो आहे. गरज पडेल तशी किंमत बदलायची माझी तयारी आहे.
अजूनही आमच्या घरात अन्यायाविरुद्ध हात वर करण्याची पद्धत सुरु आहे पण आता मात्र तशी वेळ अपवादानेच येत असते.
आईच्या सल्ल्यामुळेच आज पर्यंत तरी टकलू सैतानाला मी माझ्या घरापासून आणि ऑफिसपासून दूर ठेवण्यात यशस्वी झालो आहे.
----The end ----
स्वप्निल तिखे