स्वराज्यसूर्य शिवराय
भाग अठरावा
स्वाभिमानी शेरः शिवराय!
पुरंदरचा तह झाला. एक भळभळती, सलणारी, बोचणारी जखम घेऊन शिवराय राजगडावर पोहोचले. केलेला तह त्यांच्या जिव्हारी लागला होता. मावळ्यांनी रक्त सांडून, प्राणांची आहुती देऊन जिंकलेले तेवीस किल्ले मिर्झाराजेंना सहजासहजी द्यावे लागले ही बोचणी शिवरायांना सतावत होती. पाठोपाठ संभाजीराजेंना औरंगजेबाने दिलेली सरदारकी स्वीकारण्याची पद्धती ही शिवरायांसाठी क्लेशदायक होती. शिवरायांची परिस्थिती अत्यंत उदासीन झालेली असताना मिर्झाराजेंचे अजून एक फर्मान आले. त्याप्रमाणे आदिलशाहीवर मिर्झाराजे चालून जाणार होते आणि त्या मोहिमेत शिवरायांनी सामील होऊन विजापूरकरांचा पराभव करण्यासाठी सर्व मदत करावी, प्रत्यक्ष युद्धात सहभागी व्हावे असा तो आदेश होता. त्याप्रमाणे शिवरायांना स्वतःच्या सैन्यासह मिर्झाराजेंच्या फौजेत समाविष्ट व्हावे लागले. फार मोठी फौज घेऊन मिर्झाराजे आदिलशाहीवर चालून गेले. घनघोर युद्ध पेटले. आघाडीवर शिवराय स्वतः लढत होते. पाठोपाठ दिलेरखान लढत होता. समोरून आदिलशाही सैनिक निकराचा प्रतिकार करत होते. ते चिडले होते, संतापले होते, त्वेषाने लढत होते. जिंकायचेच, काहीही झाले तरी मिर्झाराजेंचे इरादे यशस्वी होऊ द्यायचे नाहीत हे एक ध्येय ठेवून ते लढत होते. त्यांच्या आवेशापुढे, प्रचंड आवेगाने होणाऱ्या हल्ल्यापुढे मोघलांच्या फौजेचा आणि विशेषतः शिवरायांच्या फौजेचा टिकाव लागत नव्हता. शेवटी शिवरायांना माघार घ्यावी लागली. फार मोठा पराभव पदरी पडला. शिवराय दुःखी झाले. दिलेरखानाने पराभवाचे खापर शिवराय आणि त्यांच्या मावळ्यांवर फोडले. नंतरचा हल्ला स्वतः मिर्झाराजे जयसिंह यांनी केला परंतु आदिलशाहाच्या त्वेषाने लढणाऱ्या सैनिकांपुढे त्यांचीही डाळ शिजली नाही. जयसिंहांनाही पराभवाचे तोंड पाहावेच लागले. पराभवाची ती मालिका खंडित करण्याच्या हेतूने शिवराय मिर्झाराजेंना म्हणाले,
"राजे, आपण सर्वांनी येथे अडकून पडण्यापेक्षा आदिलशाहीच्या ताब्यात असलेल्या पन्हाळगडावर मी चालून जातो. तिथे आदिलशाही सैन्य जास्त नाही. गड वाचविण्यासाठी आदिलशाहा विजापूरची फौज नक्कीच तिकडे पाठविल म्हणजे इथले सैन्य कमी झाल्यामुळे तुम्हाला आदिलशाहीवर अखेरचा घाव घालणे सोपे जाईल. मी तिकडे पन्हाळगड निश्चितपणे जिंकून औरंगजेब बादशहाला नजराणा पेश करतो."
शिवरायांचे म्हणणे मिर्झाराजेंना पटले. त्यांनी मोठ्या उत्साहाने परवानगी देताच शिवराय पन्हाळा- गडाच्या मोहिमेवर निघाले. सोबत असलेल्या नेताजी पालकर यास शिवरायांनी आज्ञा केली की, त्याने थोडे थांबून शिवरायांच्या पाठोपाठ यावे. शिवराय पन्हाळगडावर पोहोचले. परंतु त्यांच्या अंदाजाप्रमाणे घडले नाही. त्यांना वाटले त्यापेक्षा जास्त कडवा प्रतिकार गडावरील आदिलशाही फौजेने केला. आदिलशाही सैनिकांनी केलेल्या पहिल्याच प्रतिकाराच्या हल्ल्यात जवळपास हजार मावळे कामी आले. पहिल्याच फटक्यात फार मोठे अपयश मिळाले होते. शिवरायांनी बेत बदलला. त्यांनी माघार घेतली आणि ते विशाळगडाकडे निघून गेले. सर्वात महत्वाचे म्हणजे पाठीमागून येणारा नेताजी पालकर वेळेवर पोहोचला नाही त्यामुळे शिवराय नेताजीवर खूप रागावले आणि त्यांनी नेताजीची सरसेनापती या पदावरुन उचलबांगडी केली. नेताजीला तो स्वतःचा फार मोठा अपमान वाटला. त्याने एक आश्चर्यकारक निर्णय घेतला आणि तो तडकाफडकी आदिलशाहाला जाऊन मिळाला. शिवरायांना फार मोठा धक्का बसला..…
शिवराय एकानंतर एक पराभव पचवत असताना मिर्झाराजे जयसिंह यांनी अजून एक डाव खेळला. त्यांनी शिवरायांसमोर प्रस्ताव मांडला की, शिवरायांनी आग्रा येथे जाऊन औरंगजेब बादशहाची भेट घ्यावी. शिवराय विचारात पडले. मिर्झाराजे अधूनमधून आठवण करुन देत होते. शिवरायांना वचन देत होते की, 'तुम्हाला भीती वाटण्याची आवश्यकता नाही. आग्रा येथे तुम्हाला काहीही दगाफटका होणार नाही. तुमच्या केसालाही धक्का लागणार नाही.' दुसरीकडे त्यांनी औरंगजेबाकडे शिवरायांच्या भेटीसाठी परवानगी मागितली. औरंगजेबाने खूप विचार करून, काही गोष्टी मनाशी ठरवून शिवरायांच्या आग्रा भेटीला हिरवा कंदिल दाखवला. दुसरीकडे शिवराय विचारात पडले, ' जावे का नाही? औरंगजेब अतिशय कपटी आहे. तो स्वार्थासाठी कोणत्याही थराला जाऊ शकतो. भलेही मिर्झाराजे हमी घेत आहेत. आग्रा येथे मिर्झाराजेंचा मुलगा रामसिंग आहे. तो आपल्यावर कोणतेही गंडांतर येऊ देणार नाही. मिर्झाराजे राजपूत आहेत. दिलेल्या शब्द राखण्यासाठी राजपूत जीव गेला तरी मागेपुढे पाहात नाहीत. परंतु शेवटी तेही औरंगजेबाचे चाकरच ना. औरंगजेब मिर्झाराजेंचे ऐकण्यासाठी थोडाच बांधील आहे. एक गोष्ट मात्र आपणास करता येईल. औरंगजेबाच्या भेटीनंतर त्याचे सैन्य, तोफा, शस्त्रास्त्रे यांचा उपयोग करून स्वराज्याच्या आड येणारा, कायम शत्रू असलेला आदिलशाहा आणि इतर शत्रूंचा कायमचा बंदोबस्त करता येईल, त्यांना संपवून टाकता येईल. नंतर मग थोडे स्थिरस्थावर झाल्यावर औरंगजेबाच्या मुघल सैन्यावर हल्ले चढवून त्याला जेरीस आणून त्यालाही संपवता येईल. प्रत्यक्ष दरबारी जाऊन, औरंगजेबाच्या राज्यात जाऊन बघूया तर खरे तिथले वातावरण, तिथली माणसे, तिथली वागणूक. कदाचित भविष्यात औरंगजेबाशी लढताना काही गोष्टींचा उपयोग होईल....' असा विचार करून शिवरायांनी जवळच्या माणसांशी सल्लामसलत केली. आणि शेवटी औरंगजेबाची भेट घ्यायची हा निर्णय घेतला. जिजाऊंशी सल्लामसलत झाली. मातेचा जीव घाबरला. मुलगा पुन्हा शत्रूच्या घरात जाणार, सोबत लहानगा नातू संभाजीलाही नेणार हे ऐकून जिजाऊंचा चेहरा काळवंडला. जीवाची घालमेल झाली. शिवरायांनी मातेची चिंता, तिला लागलेला घोर ओळखला. ते म्हणाले,"माँसाहेब, असे काय करता? तुम्हीच अशी हिंमत हरलीत तर कसे होईल? तिकडे काहीही विपरित घडणार नाही. तुमचा आशीर्वाद असताना आमचे कुणीही वाकडे करू शकणार नाही. ईश्वर आमच्या पाठीशी आहे. या प्रसंगातून चांगले काही घडावे अशीच श्रींची इच्छा असणार. म्हणूनच त्याने हा योग जुळवून आणला असेल. काळजी करु नका. आशीर्वाद द्या."
निराजी रावजी, त्र्यंबक सोनदेव, रघुनाथ बल्लाळ, बाजी सर्जेराव जेधे, माणकोजी हरी, दत्ताजी त्र्यंबक, हिरोजी फर्जद, राघोजी मित्रा, कवींद्र परमानंद, मदारी मेहतर अशी शूरवीर मंडळी शिवरायांनी सोबत घेतली. आणखी बरीचशी मंडळी सोबत होती. शिवराय निघाले आहेत असे निरोप औरंगजेबाकडे गेले. मिर्झाराजेंनी त्यांच्या मुलास रामसिंहाला पत्राद्वारे कळविले की, 'शिवाजीराजे, माझ्या आग्रहाखातर आग्रा येथे येत आहेत. त्यांच्या जीवीताला कोणताही धोका होणार नाही ही काळजी तू स्वतः डोळ्यात तेल घालून घे. आपण दोघे जामीन आहोत हे लक्षात ठेवून वाग.'
मिर्झाराजेंनी पाठविलेला निरोप मिळताच औरंगजेबाने शिवरायांना पत्र पाठवले. त्यात लिहिले की, 'तुम्ही आमच्या भेटीला निघाले असल्याचे मिर्झाराजेंनी कळविले. वाचून आम्हाला खूप आनंद झाला. आमचा तुमच्यावर खूप लोभ आहे. भेटीत चर्चा होईल. तुमचा दरबारी आदर सत्कार होईल. भेट म्हणून पोषाख पाठवला आहे. तो स्वीकारावा.' शिवराय आग्र्याच्या वाटेवर असताना त्यांना ते पत्र मिळाले. मार्गक्रमण करताना वाटेत असलेल्या मुघलशाहीतील ठिकठिकाणच्या सरदारांनी शिवरायांचे स्वागत केले. ते सारे स्वीकारून महाराज सहकाऱ्यांसह दौडत होते. आग्रा जवळ करीत होते. आले. एकदाचे आग्रा शहर आले. 'प्रथम ग्रासे मक्षिकापात' याप्रमाणे स्वागतालाच शिवराय नाराज झाले. कारण आपल्या स्वागतासाठी बादशहाकडून कुणी वजीर किंवा शाहजादा स्वागतासाठी येईल. आपले यथोचित, भव्य स्वागत होईल. आग्रा शहरातून आपली मिरवणूक काढून आपणास मुक्कामाच्या स्थळी नेण्यात येईल.' ही शिवरायांची अपेक्षा फोल ठरली. बादशहाने शिवरायांच्या स्वागतासाठी कुणीही पाठवले नाही. रामसिंहाच्या एका साध्या कारकूनाने शिवरायांचे स्वागत केले. शिवराय मनातल्या मनात संतापले. परंतु ते काही बोलले नाहीत. शिवरायांच्या मानाप्रमाणे त्यांचे स्वागत तर झालेच नाही उलट त्यांच्या राहण्याची व्यवस्था 'मुकुलचंदाची सराई' नावाच्या एका धर्मशाळेत करण्यात आली. दक्षिणेच्या एका महापराक्रमी राजाची राहण्याची व्यवस्था कशी शाही व्हायला हवी होती. पण तसे काही झाले नाही. शिवराय तरीही शांत होते.
दुसरा दिवस उजाडला. तो दिवस मुघलशाहीत परमोच्च आनंदाचा दिवस! औरंगजेबाचा वाढदिवस! सर्वत्र लगबग चालू होती. दरबारात सकाळी दहा वाजता औरंगजेबाचा पन्नासावा वाढदिवस साजरा करण्यात येणार होता. याच समारंभाला शिवरायांना आणण्याची जबाबदारी पुन्हा रामसिंग आणि मुखलीसखान या दोघांवर सोपवली परंतु त्याचवेळी त्या दोघांनाही औरंगजेबाच्या महालाभोवती संरक्षणासाठी नेमले. आली का पंचाईत. पहारा सोडून जाता येत नव्हते. मग शिवरायांना आणावे कसे? शेवटी रामसिंहाने मुनशी गिरधरलाल या कारकुनाला पाठवले. त्याने शिवरायांची भेट घेतली आणि दरबारात येण्याची विनंती केली. शिवरायांना तोही अपमान वाटला परंतु त्यांनी तोही सहन केला. ते त्या मुनशीसोबत निघाले. तिकडे पहारा देण्याचे काम संपताच रामसिंह आणि मुखलीसखान हे दोघे शिवरायांना आणण्यासाठी निघाले. त्यावेळी त्यांनी असा विचार केला की, आपली आणि शिवरायांची रस्त्यातच गाठ पडेल आणि तिथूनच आपण शिवरायांना सन्मानाने दरबारी घेऊन येऊ. धर्मशाळेपासून औरंगजेबाच्या दरबारात पोहोचण्यासाठी दोन रस्ते होते. शिवरायांना आणण्याचा मार्ग न ठरल्यामुळे मुनशी गिरधरलालने एक मार्ग निवडला आणि ते निघाले. रामसिंह आणि खान दुसऱ्याच मार्गाने धर्मशाळेकडे निघाल्यामुळे चुकामूक झाली. ती चूक लक्षात येताच त्या दोघांनी मार्ग बदलले. शेवटी एकदाची सर्वांची भेट झाली परंतु त्यामुळे दरबारात पोहोचायला उशीर झाला. रामसिंह आणि शिवराय दरबारी पोहोचले. किल्ल्यावर मुख्य दरबारातील समारंभ संपन्न झाला होता. शिवराय त्या समारंभाला पोहोचू शकले नाहीत. औरंगजेबाचे तीन दरबार होते. आम दरबार, खास दरबार आणि घुशलखाना दरबार! शिवराय गडावर पोहोचले तेंव्हा औरंगजेब घुशलखाना दरबारात होता. त्याला शिवराय दरबारात पोहोचले असल्याची वर्दी मिळाली. त्याने बक्षी आसदखान यास शिवरायांना घुशलखाना दरबारात आणण्यासाठी पाठवले. औरंगजेबाचे दरबार, ती शाही व्यवस्था, थाटामाट, डामडौल सारे काही बघत, डोळ्यात साठवत शिवराय आसदखान सोबत निघाले. सोबत शंभूराजे संभाजी, रामसिंह, मुखलीसखान आणि इतर मंडळी होती.
शिवरायांनी घुशलखान दरबारात प्रवेश केला त्यावेळी बडे बडे सरदार तिथे उपस्थित होते. शिवराय पोहोचले. औरंगजेबाने फारशी दखल घेतली नाही. चेहऱ्यावर कोणताही भाव येऊ दिला नाही. शिवराय पुढे झाले. सोबत आणलेला नजराणा औरंगजेबास पेश केला. दरबाराच्या प्रथेप्रमाणे शिवरायांनी औरंगजेबास तीनवेळा झुकून मुजरा केला. एक निधड्या छातीचा, महापराक्रमी वीर,रयतेचा आवडता राजा, मोडेन पण वाकणार नाही अशी वाटचाल करणारा शहाजी राजेंचा मुलगा, स्वराज्याची स्वप्ने जगणाऱ्या माँसाहेब जिजाऊंचा सुत एका दुश्मनापुढे, अनेक सरदारांना पाणी पाजलेला, ज्याचे नाव ऐकताच भल्याभल्यांना कापरे भरावे असा एक सुपुत शिवाजी शहाजी भोसले हा औरंगजेबाला कुर्निसात करतो यापेक्षा दुसरे दुर्दैव कोणते? याच क्षणासाठी का जिजाऊंनी शिवरायांमध्ये बालपणापासून पराक्रमाचे, धैर्याचे, धाडसाचे बीजारोपण केले होते? काय असेल नियतीच्या मनात? काय घडणार असेल? आग्रा येथे पोहोचल्यापासून एकानंतर एक अपमानाचे घोट रिचवणाऱ्या शिवरायांच्या मनात काय चालले असेल? ते का सहन करीत होते? केवळ आणि केवळ स्वराज्य! बस एवढे एकच उत्तर. इतिहासकार म्हणतात, शिवरायांसारखा मुत्सद्दी राजा जेंव्हा औरंगजेबाला वाकून तीनवेळा सलाम करतो त्यावेळी तो महाराजा मनात म्हणत असेल, ' हे जे काही मी करतोय त्यापैकी हा पहिला मुजरा.... हे जगरक्षका शंभोशंकरा तुला. स्वीकार कर. औरंगजेबाच्या दिशेने केलेला हा दुसरा कुर्निसात तीर्थरूप शहाजी महाराज तुमच्या चरणी सादर ! आता हा तिसरा मुजरा हे जन्मदात्री माता, या जगातील एकमेव अशी माता, जिने सुखी संसाराची स्वप्ने पाहिली नाहीत, जिने राखरांगोळी झालेल्या अनेक कुटुंबांना संजीवनी दिली अशा माझ्या स्वराज्यमाता जिजाऊच्या चरणी ! ' नक्कीच शिवरायांनी केलेले तीन मुजरे हे जरी औरंगजेबाच्या दिशेने केले होते तरी ते त्याच्यापर्यंत पोहोचलेच नाहीत ते पोहोचले शिवशंकर, शहाजी राजे आणि माँसाहेबाचे चरणी! केवढी ही चतुराई! भरजरी सिंहासनावर बसलेला औरंगजेब मनोमन खुश होता तो यासाठी की, अखेरीस शिवाजी झुकला. एकदा नव्हे तीनदा झुकला! परंतु त्याने जशी मराठा वाघाची दखल घेतली नाही तशीच शिवरायांच्या नजराण्याची आणि शिवराय, संभाजींनी केलेल्या कुर्निसातांची दखल त्याने घेतली नाही. ठरल्याप्रमाणे शिवरायांना एका रांगेत उभे करण्यात आले. ती रांग होती, पंचहजारी सरदारांची! हाही अपमान शिवरायांनी गिळला. तितक्यात महाराजांचे लक्ष त्यांच्यासमोर, त्यांच्याकडे पाठ करून उभ्या असलेल्या एका सरदाराकडे गेले.... जसवंतसिंह राठोड! कोण होता हा जसवंतसिंह? कोंढाण्यावर मावळ्यांकडून मार खाऊन पळालेला हा सरदार आणि अशा पराभूत केलेल्या सरदारांच्या मागे शिवराय? नाही. नाही. हा भयंकर अपमान होता. तो सहन करणे शक्यच नव्हते. शिवराय भयंकर चिडले. औरंगजेबाच्या दरबारात त्यापूर्वी कधीही न घडलेला प्रकार घडला. तोपर्यंत त्या दरबाराने, दरबारातील सरदारांनी उच्च स्वर ऐकला होता तो केवळ सिंहासनावर आरुढ झालेल्या व्यक्तीकडून... बादशहाकडून! बादशहापुढे मान खाली घालून उभी असलेली कुणी व्यक्ती आवाज मोठा करून, संतापून ओरडते ही बाब स्वप्नातही कुणाला शक्य वाटत नसताना, ती 'मुकी' परंपरा, अन्यायाविरुद्ध आवाज न करण्याचा रीतीरिवाज मोडला. तो रिवाज मोडणारा दुसरा-तिसरा कुणी नव्हता तर दख्खनचा शेर राजा शिवाजी होता. आग्रा परिसरात पोहोचल्यापासून पदोपदी अपमान सहन करणाऱ्या जिजाऊच्या वाघाने डरकाळी फोडली, "रामसिंह, आमच्या पुढे हा राठोड कसा काय? माझ्या मावळ्यांनी पळताभुई थोडी केलेला, घाबरून हाती प्राण घेऊन धावत सुटलेला हा भित्रा आमच्या समोर? का? असे का? सोबत मला पाच हजारी मनसबदार हा दर्जा? हिच किंमत केली का आमची? तुम्हाला, तुमच्या वडिलांना आणि तुमच्या बादशहाला आमची ख्याती, कीर्ती, आमचा पराक्रम माहिती असतानाही ही अशी वागणूक? मला जाणूनबुजून हा दर्जा देण्यात आला आहे..." कोणतीही कल्पना नसताना, कुठलीही शक्यता नसताना त्या डरकाळीने तो शाही दरबार थरारला. कदाचित त्या आरोळीने बादशहाचे सिंहासनही हादरले असणार परंतु औरंगजेबाने ते दाखवले नाही. 'काय झाले? कोण ओरडले? बादशहाच्या समोर अपशब्द उच्चारण्याची हिंमत कुणी केली?' असंख्य प्रश्नांच्या जाळ्यात गरगरणाऱ्या दरबारी लोकांच्या कानात शिवरायांचे शब्द गरम तेलाप्रमाणे शिरले. रागारागाने बोलत शिवराय त्या रांगेतून बाहेर आले. निघाले. ते पाहून रामसिंह त्यांच्यामागे धावला. तो शिवरायांना समजावण्याचा प्रयत्न करु लागला. परंतु शिवरायांचा संताप अनावर झाला होता ते पुन्हा कडाडले, "काय आहे तुमच्या बादशहाच्या मनात? आमचा जीव हवा आहे का? तर मग वाट कशाची बघता, उडवा माझे मुंडके. मी आत्महत्त्या करेन पण पुन्हा या दरबारात येणार नाही. बादशहाचे तोंड पाहणार नाही." असे म्हणत शिवरायांनी तात्काळ दरबार सोडला. दाणदाण पावले टाकत, एखाद्या सिंहाप्रमाणे शिवराय बाहेर पडले..…
औरंगजेबाच्या दरबारात शिवरायांकडून, मावळ्यांकडून पराभूत झालेले, मार खाल्लेले असे अनेक सरदार होते. त्यात मराठा सरदारही होते. त्यांना ही आयती संधी मिळाली. सर्वांनी औरंगजेबाचे शिवरायांच्या विरोधात कान भरायला सुरुवात केली. तसा औरंगजेबही शिवरायांच्या वर्तनाने चिडला होता, संतापला होता. शेवटी त्याने एक निर्णय घेतला. दगाबाजी, धोका ज्याच्या नसानसांत होता, त्याच्याकडून दुसऱ्या अपेक्षा तरी काय कराव्यात? त्याने शिवरायांना संपविण्याचा निर्णय घेतला. शिवरायांना आग्र्याचा किल्लेदार रादअंदाजखानाकडे सोपवायचे. हा खान अत्यंत क्रुर, उलट्या काळजाचा माणूस! माणूस कसला जल्लाद होता. औरंगजेबाने तसा हुकूम सोडला. फिरले. स्वराज्याचे दैव फिरले. शिवराय औरंगजेबाच्या कटकारस्थानाला बळी पडले. करायला गेले एक नि घडले भलतेच. शिवरायांना किल्लेदाराच्या ताब्यात देणार ही बातमी रामसिंहाला समजली. तो घाबरला. 'आपल्या वडिलांनी दिलेला शब्द बादशहा मोडणार? नाही. नाही. असे व्हायला नको. काहीतरी करावे लागेल. बादशहाला या कृत्यापासून थांबवावे लागेल? पण कसे? बादशहासमोर बोलायची ताकद आहे कुणामध्ये?...' असा विचार करणाऱ्या रामसिंहाला आठवले ते मीर बक्षी मुहम्मद अमीन खान हे नाव. बादशहाच्या जवळचा माणूस. बादशहाला चार गोष्टी सांगू शकेल अशी व्यक्ती. रामसिंह सरळ अमीन खानाकडे गेला. सर्व काही त्याला समजावून सांगितले. ते खानाला पटले. तोही तात्काळ औरंगजेबाकडे गेला आणि बादशहाला निर्णय मागे घेण्याची विनंती करताना तसे का करावे हेही विनयाने समजावून सांगितले. त्याने हेही सांगितले की, रामसिंह म्हणतो आहे की, शिवाजीला मारण्याच्या आधी रामसिंहाला मारावे लागेल. ते ऐकून औरंगजेबाने विचार केला की, प्रकरण वाटते तितके सोपे नाही. मग औरंगजेबानेही धूर्तपणे डाव टाकला तो म्हणाला,
" ठिक आहे. रामसिंहाने आम्हाला असे लेखी आश्वासन द्यावे की, शिवाजी आग्रा येथून पळून जाणार नाही किंवा कोणतीही गैरहरकत करणार नाही." बादशहाचा निरोप मीर बक्षीने रामसिंहाला सांगितला. त्याने होकार दिला आणि तो तडक शिवरायांकडे गेला. घडलेली सारी हकिकत त्याने ऐकवली. शिवरायांनी मनोमन जाणले की, रामसिंहाला आपल्याकडून तसे वचन हवे आहे. शिवरायांनी रामसिंहाला विश्वास देण्यासाठी, हमी देण्यासाठी महादेवाच्या पिंडीवर वाहिलेले बेलपत्र उचलले आणि ते रामसिंहाच्या हातात देत म्हणाले,
"तुमच्या विश्वासाला तडा जाईल असे मी काहीही करणार नाही. निश्चिंत राहा."
हे सारे घडले. सर्वांनी एकमेकांना विश्वास दिला, वचन दिले, हमी भरली परंतु औरंगजेब अत्यंत संशयी होता. त्याला एक गोष्ट सातत्याने चिंतेत टाकत होती, ती म्हणजे शिवाजीने धोका दिला तर? दगाबाजी केली तर? पळून गेला तर ? त्याची चिंता वाढवणारी, शिवरायांविरुद्ध सतत गरळ ओकणारी माणसे त्याच्या अवतीभवती होती. ते सारखे त्याचे कान भरत होते. शेवटी औरंगजेबाने निर्णय घेतला. त्याप्रमाणे शिवरायांचा मुक्काम असलेल्या जागेला पाच हजार सशस्त्र सैनिकांनी घेरले. सोबत तोफाही होत्याच. सरळसरळ ती कैद होती. नजरकैद! स्वराज्याचा, दख्खनचा शेर अशाप्रकारे मुघलांच्या नजरकैदेत..... जाळ्यात अडकला.
नागेश सू. शेवाळकर