traun delivery books and stories free download online pdf in Marathi

ट्रेन डिलिव्हरी

मधु

(भटका समाज म्हणून वडार समाजाची पूर्वपार ओळख आहे. महाराष्ट्राबाहेरील उगमस्थान असलेला वडार
समाज महाराष्ट्रात स्थलांतरित झाला. वडार समाजाचे लोक जिथे राहतात त्या वस्त्या नां वडरवाडा असं
म्हणतात, वर्षानुवर्षे हा समाज दगड फोडण्याचे काम करतो. शिक्षणापासून दूर राहिल्यामुळे हालअपेष्ठा
जणू पाचवीला पुंजलेली. अश्याच समाजातल्या मधु नावाच्या मुलीची कि काल्पनिक कथा)

गावाच्या बाहेर पार ४-५ कोस दूर वडरवाडा आहे. लोकसंख्या म्हणजे गावाच्या मानाने जेमतेम,पण
आसपासच्या वडारवाड्या पेक्षा जास्त. त्यात २५-३० कुटुंब आपल्या मोडक्या तोडक्या झोपडीत राहायची.
तेच म्हणजे त्यांचा बंगला. २ वेळेला पोटाला अन्न मिळालं म्हणजे घरी दिवाळी चा आनंद. काम केलं तर
दाम आणि दाम मिळालं तरच घास अस त्याचं जीवन. पण स्मार्ट युगात स्मार्ट तंत्रज्ञानामुळे ह्या
लोकांनवर उपासमारीची वेळ आली. त्यामुळे गाव सोडून इतर ठिकाणी काम शोधायला पुरुष मंडळी बाहेर
पडली. बसचं तिकीट तर परवडण्याच्या पलीकडचं, म्हणून हे लोक लोकल ट्रेन नि प्रवास करू लागले. कधी
या डब्यात तरी कधी त्या, टीसी ची नजर चुकवण्याचा खेळ रोजचाच होऊ लागला, पण कधी कधी या
खेळात टीसी जिंकायचा तेव्हा मात्र शिव्यांची माळ घातली जायची,कारण दंड भरायला खिशात दमडी नाही,
अशी तशी वेळ मारून न्यायची, कधी ढकलून बाहेर काढलं जायचं या सगळ्याची जणू त्यांना सवय च
झाली होती. पण पोटाला अन्न तर लागतंच नं, काम मिळालं तर घरी काहीतरी नेता येईल या आशेनं
रोज गडी कामावर निघायचे, कधी काम मिळायचं तर घरी जाताना हातातल्या भाकरीचा पीठ दिवसभराचा
थकवा एका क्षणांत घालवायची,पोरबाळं खुश होतील,आज जेवायला मिळेल या विचारानं सगळा क्षीण
निघून जायचा. पण कधी काहीच काम नसायचं तेव्हा घर नकोसं वाटायचं. पण असंच आयुष्य चालतं
होत. आणि हीच परिस्थिती होती गंगाधर च्या घरची. पाठीमागे बायको ,दोन पोरं आणि तीन पोरी.
कमावणारा एक आणि खाणारी तोंड सात. वडारी बायांना वडारणी म्हणतात. गंगाधर ची बायको रखमा
संसाराला जरा हातभार लागावा म्हणून उखळ,पाटा तयार करणे,पाट्याला टाके मारून देणे असे काम
करायची,पण मिक्सर च्या युगात हे सगळं कालबाह्य झालं आणि हातचं कामही गेलं. त्यामुळे वडारणी
आता पुरुषांसोबत बांधकामावर मजूर म्हणून जाऊ लागल्या. रखमा सुद्धा गंगाधर सोबत जाऊ लागली.
मधु सगळ्यात मोठी,तिच्या पाठीवर दोन बहिणी आणि दोन भाऊ.मधु पार सोळा सतरा वर्षाची झाली
तेव्हा तिला धाकटा भाऊ झाला. कुटुंब नियोजन वैगरे असले शब्द देखील त्यांना माहित नव्हते. त्यामुळे हे
असं.

त्यामुळे थोरली बहीण म्हणून त्या भावंडांना सांभाळायची जबाबदारी मधुवर. त्यांचं खाणं- पिणं, हागण मुतणं सगळं मधुचं करायची. माय-बाप दिवसभर राबराब राबायचे आणि संध्याकाळी खायला आणायचे,तेव्हा मग मधु सगळ्यांनसाठी भाकर तुकडा करायची. असेच दिवसामागून दिवस जात होते आणि पाहता पाहता ३ वर्षे उलटली.मधु २० वर्षाची युवती झाली,दिसायला जरी सावळी असली तरी बघता क्षणी डोळ्यात भरणारी, एकदम सरळ नाक, मोठे टपोरे डोळे,पाणीदार चेहऱ्यावर शोभणारे नाजूक ओठ. नुकत्याच तारुण्यात प्रवेश केल्याने खुलून आलेलं तीच शरीर तिच्या सौंदर्यात जास्त भर टाकत होत. पाठीवरच्या बहिणी न भाऊ पण कळते झाले. पण या ३ वर्षात घरची परिस्थिती होती त्यापेक्षा हि जास्त बिघडली. खायला १ वेळच जेवणही महाग झालं होत. दिवसेंदिवस उपासमार वाढत होती..त्यामुळे वडारवाड्यातल्या सगळ्यांनी मिळून आपलं बिऱ्हाड दुसरीकडे हलवण्याचं ठरवलं. घरात नावाला असलेली चार दोन भांडी, आणि १जोडी कपडे गाठोड्यात बांधुन सगळे कामाच्या शोधात बाहेर पडले, लोकल ट्रेन नि..आणि इथूनच सुरु झाला मधूचा प्रवास...ट्रेन प्रवास..

एकाच ठिकाणी सगळ्यांनी जाण्यापेक्षा गटागटाने वेगवेगळ्या ठिकाणी जाऊन काम शोधलं तर काम लवकर मिळेल असं वडार प्रमुखांनी सुचवलं आणि सगळ्यांनी माना डोलावल्या. दुसरा पर्याय होता कुठे त्यांच्याकडे?
त्यामुळे २०-२५ कुटुंबाचा वडारवाडा आता ३ ४ च्या गटात वेगवेगळ्या शहरात विखुरला. इथे तरी काम मिळेल आणि पोटाला अन्न एवढीच आशा सगळ्यांना होती.डोक्यावर काळजीच ओझं आणि पोटात भूक घेऊन गंगाधर चं कुटुंब यवतमाळ मध्ये येऊन पोहचलं. थांबायला ठिकाण तर नव्हतंच म्हणून फूटपाथचा सहारा घेतला. ट्रेन मध्ये डब्याच्या दारात बसून सगळ्यांची अंग मोडून आली होती, समोरच एक चहा ची टपरी होती. मस्त निवांत बसून चहा चे गरम गरम झुरके मारावं असं सगळ्यांच्याच मनात आलं. गंगाधर टपरी जवळ गेला आणि त्यानं टपरीवाल्याला विचारलं," भाऊ चहा कसा दितूया? " गंगाधर चा अवतार पाहून तुच्छतनेचं त्यांनी "१० ला फुल्ल आणि ७ ला हाफ असं सांगितलं." बापा रे.... ७ ला अर्धा कप म्हंजी सात जणांचे ४९!!!! एवढ्याचा चहा ढोसला तर खायचं काय???" मनातल्या मनात गंगाधर चे विचार सुरु झाले आणि तो तसाच गेल्या पावली परत फिरला. त्याचा चेहरा पाहून कुणी त्याला "काय झालं?" हे सुद्धा विचारलं नाही. कारण पैसे नाही म्हणून इथपर्यंत आलोय हे सगळ्यांना माहित होत.. तसंही ८ वाजून गेले होते , लवकर झोपून सकाळी उठून काम शोधायचं आहे म्हणून मधु न तिची बहीण सोबत आणलेल्या गोधडी पसरवत होत्या. बाकी २ भाऊ न बहीण रस्त्यावरून धावणाऱ्या गाड्यांकडे डोळे विस्फारून बघत होते, चमचमत्या गाडीतून नवीन नवीन ड्रेस घालून जाणारे लहान पोर बघून हेवा वाटत होता त्यांना. रखमा नं गंगाधर बाजूला बसून उद्याच्या कामाची आखणी करत होते, जवळच एक मोठ्या बिल्डिंग चं काम सुरु आहे एवढी माहिती गंगाधर ला होती, आणि त्याच्या आधारावरच ते इथपर्यंत आले होते. उद्या तिथे जाऊन काम मागायचं होत. मधु नं घरून ७ भाकरी आणि ठेचा करून आणलं होत. तिने शिदोरी उघडली आणि सगळ्यांना जेवायला आवाज दिला. सगळ्यांनी आपापल्या हिश्याची भाकरी खाल्ली. भूक होणे नं होणे हा प्रश्न त्यांच्याकडे नव्हता. काहीतरी खायला मिळाला यातच आनंद. जेवण करून सगळे झोपी गेले,पण गंगाधरचा जरा उशिराच डोळा लागला, शेवटी काळजी ती! सकाळी भल्या पहाटे गंगाधर आणि रखमा उठले. उघड्यावर आवरायचं आणि ते पण नवीन शहरात म्हणजे मोठा पेच.म्हणून शहर जाग व्हायच्या आत त्यांनी आवरायचं ठरवलं. रखमेन मधु ला हलवून उठवलं.डोळ्यावर झोप होती पण ती उठली." उठ व मधे. आणि पोरींना बी उठाव.पोरासनी झंपू दे जरा येळ.लै दगदग झाली " मधु नि डोळे चोळत होकार दिला आणि तिने बहिणीला हाक मारल्या, कंटाळा करत त्याही उठल्या. कारण सगळ्या मुलींना आवरायचं होत. गरीब असलं तरी अब्रू सगळ्याच स्त्रियांना असते, त्यांना त्यांच्या अब्रूची झलक हि कुणाला दिसू द्यायची नव्हती म्हणून त्या सगळ्यांनी अंधारात झाड्याच्या आडोश्याला आपल्या दैनंदिन क्रिया आटोपल्या.दिवस उजाडला तस रखमा आणि गंगाधर कामाच्या शोधात निघाले. मनावर खूप दडपण होत.रखमा गंगाधर ला धीर देत होती. ते दोघेही कामाच्या ठिकाणी पोहचले. मुकादम अजून यायचं होता म्हणून ते तिथेच वाट पाहत बसले.थोड्यावेळात मुकादम आला आणि सगळ्या मुजारांना दिवसाचं काम सांगू लागला.रखमा नं गंगाधर बाजूला उभे राहीले. मुकादम चं बोलून झाल्यावर दोघांनी वाकून हात जोडून त्याला नमस्कार केला ." साहेब आम्ही लै दुरून आलोय..पोटाला अन्न नाही नं हाताला काम नाही.उपासमार होत्या. बायकोपोरांचा माणूस हाय. काही काम असणं तर लै उपकार होतील बघा. आम्ही कोणतं बी काम करू." गंगाधर एका झटक्यात सगळं बोलून गेला. सकाळी सकाळी असं रडगाणं ऐकणं मुकादम च्या चांगलंच जीवावर आलं. जवळजवळ खेकसून चं तो बोलला "अरे बाबा, इथं कमला सुरवात झालीय केव्हाची . आता मजुरांची गरज नाही तर मी तुला कस ठेवू कामावर? नाहीय माझ्याकडे काम तुम्ही जा". हे ऐकून रखमा नं गंगाधर चा जीव पार उडाला.तस रखमा समोर होत पदर पसरवत म्हटली" साहेब दया करा, पण काम द्या, पाठीमागं पोरंबाळं आहेत हो. लै बेकार हालत हाय." रखमा नं गंगाधर हातपाय पडू लागले त्यामुळे मुकादम नि त्यांच्यावर दया दाखवली. आणि गंगाधर ला सिमेंट चे पोते उचलण्याचं तर रखमेला विटा वाहण्याचं काम दिल.काम मिळाल्याचा आनंद दोघांच्या चेहऱ्यावर उसंंडुन वाहत होता.ते लगेच कामाला लागले. आणि थोडीफार विस्कटलेली संसाराची घडी बसू लागली. कामावरच्या सोबत्यांसोबत ओळखी झाली. चांगल्या स्वभावामुळे दोघे पण त्यांच्यात लवकर रुळले.ते सगळे कामगार झोपडपट्टी त राहत होते.त्यांच्या आधाराने रखमा नं गंगाधर पण तिथे राह्यला गेले. राहायला छत नं पोटात अन्न पडायला लागलं. पण पोटभर नव्हतं. पण दिवस आधीपेक्षा चांगले होते म्हणून ते खुश होते.

असंच एक दिवस कामावर असताना एक महिला कामगार पायऱ्यांवरून घसरली आणि तिचा हात मोडला. तिला सुटी देण्यात आली. तिची जागा खाली होती. १- २ दिवस असेच गेल्यानंतर रखमा च्या मनात विचार आला त्या बाईच्या जागी मधु कामाला आली तर २ पैसे जास्त मिळतील. तिने गंगाधर शी बोलून मुकादम जवळ विषय काढला.गंगाधर नं रखेमेचं काम चांगलं च होत म्हणून त्यांनी लगेच होकार दिला. झालं आणि इथूनच मधु च जीवन बदललं. घर, चूल, भावंडं यांना सांभाळणारी, कधी घराबाहेर नं पडलेली मधु कामावर जायला लागली. ती आईच्या मागे मागे काम करू लागली. पण काम करताना मधु जरा अवखडल्या सारखी व्हायची.मजुरांमध्ये म्हातारे, तरुण सर्वच होते, मधु त्यात तरुण आणि रेखीव शरीराची असल्यामुळे तरुण वर्गात तिची जास्त चर्चा होऊ लागली. काम करताना तिच्या हालचाली पाहायला त्यातली टवाळ पोरं मुद्दाम मागे पुढे करू लागली. पण मधु दुर्लक्ष करत होती. खायला महाग अशी घरची परिस्थिती असल्याने ती पण गप्प होती. सुरवातीला छातीला ओढणी घट्ट आवळून काम करणारी मधु आता बिनधास्त वावरत होती.त्या पोरांमधला दिनेश सगळ्या त्याला 'दिन्या' म्हणायचे तो सतत मधु कडे पाहायचा. कालांतराने मधूला हि त्याच पाहून आवडू लागलं. कळत नकळत स्पर्श होऊ लागले. त्यात भरीस भर म्हणून मुकादम नि तरुण पोरापोरींना वरच्या माळ्यावर आणि वयस्कर लोकांना खालच्या माळ्यावरच काम दिल. त्यामुळे मधु तिच्या आईवडिलांच्या नजरेआळं राहायची. त्यामुळे दिन्या नं मधु जास्त जवळ येत गेले.. दिन्या काम करता करता मधु ला कुणाचं लक्ष नसताना जवळ ओढायचा, तिच्या भरलेल्या वक्षावरून हात फिरवायचा, सुरवातीला मधु ला ते आवडायचं नाही पण नंतर नंतर तिला दिन्याचा स्पर्श हवा हवा सा वाटू लागला. ती त्याला प्रतिसाद देऊ लागली. त्यांना एकांतात वेळ घालवायची इच्छा अनावर होत होती. मधु च्या घरी जाण्याच्या, घरून निघण्याच्या वेळा बदलल्या, ती आई वडिलांना टाळून त्यांच्या आधीच कामावर यायची दिन्यासाठी.. असं लोकांच्या नजरेआड त्यांचं प्रेम फुलत होत. आणि एक दिवस अचानक दिन्या नि मधुला लग्नाची मागणी घातली.मधु ला आनंद झाला पण त्यासोबत असंख्य प्रश्नांनी ग्रासलं.तरीही तिने धीर करून रात्री आईवडिलांना दिन्या बद्दल सांगितलं तस धाडकन तिच्या कानाखाली बसली, "असले धंदे करतीयस व्हय. आग पाठीवर २ जवान बहिणी हाय तुला त्याची तर काळजी करायची. गरीब हाय पण वस्तीत इज्जत हाय आपल्याला, तोंड काळ करू नगंस आमचं " एकापाठोपाठ एक असं गंगाधर आणि रखमेनी तिला शिव्यांची लाखोली वाहिली."ह्या कार्ट्या म्हणजे जीवाला घोर, झाली तवाच गळा घोटाया हवा होत्या म्या" असं म्हणून गंगाधर खाली बसला तेव्हा मात्र मधू ची तळपायातली आग मस्तकात गेली. एवढं घरासाठी राब राब राबायचं नं त्याच असलं फळ? असं वाटलं स्वतःच स्वतःचा गळा दाबावं. दुसऱ्या दिवस पासून रखमा सतत मधु सोबत राहू लागली. तिला दिन्या सोबत बोलता येत नव्हतं,जीव कासावीस होत होता.अश्यावेळी मित्र मैत्रिणी कामाला येतात ते म्हणजे असं. मधु न तिच्या मैत्रीणीकरवी दिन्याला रात्री भेटायचं निरोप पाठवला. आणि त्यांनी पळून जाण्याचा निर्णय घेतला.रात्री सगळे झोपल्या नंतर मधु तिच्या कपड्यांचं गाठोडं घेऊन हळूच बाहेर पडले. वस्तीबाहेर दिन्या तिची वाट पाहत होता. रात्रीच्या अंधारात ते दोघे रेल्वे स्टेशन ला आले आणि एक लोकल मध्ये बसले आणि त्यांनी शहर सोडलं, ट्रेन च्या दरवाज्यात संडासच्या शेजारी मधु दिन्याचा हात हातात घेऊन बसली होती. ती खुश होती, तिला तिचा जोडीदार मिळाला होता, रात्र असल्यामुळे डब्यात अंधार होता. त्या अंधाराचा फायदा घेऊन दिन्या मधु शी लगट करायला लागला. ओठावर एक दीर्घ चुम्बन देऊन त्यांनी तिच्या ड्रेस मध्ये हात घातला. दिन्याचा गरम स्पर्श्यामुळे मधु सुद्धा गरम झाली होती पण ती घाबरत होती कुणी पाहिलं तर कस? त्यामुळे ती दिन्याला टाळू लागली.
" आग कुणी जागं नाहीय . तू कावून असं करतंय मले?" ,"आर दिन्या म्या तुझीच हाय, पण लोक येन जण करतंय इथं असं बरं नाही दिसत.आपण उद्याच एक मंदिरात लग्न करू आणि स्वतःच घर करू. तेव्हा हे सगळं करायच हाय न आपल्याला" दिन्याचा चेहरा खर्रकन उतरला. कारण मधु ला समजलं नाही. तो तिच्याकडे पाठ करून बसला आणि झोपी गेला.मधु विचार करू लागली.असच ट्रेन नि आपण या शहरात आलो होतो. तेव्हा वाटलं पण नव्हतं आपल्याला दिन्या भेटेल म्हणून. आजपर्यंत आपण काय मागितलं होत बरं आय बापाजवळ? दिन्यासाठीच तर बोललो न? पण ऐकून पण नाही घेतलं आणि लगावली कानाखाली? एवढ्या मोठ्या पोरीच्या अंगावर कुणी हात घालत का?काय दिल आपल्याला लहानपणापासून? कधी नवा कपडा नाय तर कधी प्रेमाच बोलणं नाय, नुसतं काम काम. कळाया लागायच्या आधीपासून च बहीण भाऊ होते उरावर. आधी त्यांच्या पोटात घाला न उरलं तर आपल्या. त्यात भावांचे च लाड. आम्ही पोरी म्हणजे तर भुई ला भारच न?काय करू अश्या घरी थांबून? आता माझ्या सोबतीला दिन्या हाय. आमचा चांगला संसार होईल. मी न्हाय माझ्या पोरं-पोरीच्या असं भेद करेल." मधु विचार करत करत झोपी गेली..तिने आपल्या सुखी संसाराची स्वप्रे रंगवली होती. सकाळी ते एक स्टेशन ला उतरले . दिन्या नि १ कप चहा घेतला आणि दोघांनी एकाच कपात अर्धा अर्धा पिला. मधु ला तर बाहेर फिरायला आल्यासारखं वाटत होत.कुणाची भिती नाही कुणी ओळखीचं नाही. तिच्या समोर फक्त दिन्या होता. दिवसभर दिन्या मधु ची चांगली काळजी घेत होता, दुपारी मधु नि दिन्याला म्हटलं" दिन्या आता आवरून झाल आपलं. चाल एखाद्या जवळच्या मंदिरात जाऊन लग्न करू, हे असं सोबत राहणं म्हंजी लै वाईट नजर पडतात अंगावर. तशी आज न उद्या करायचं आहे तर नवरा बायको म्हणून आतापासून सोबत राहू न. मला आयुष्यभर तुझी बायको म्हणून राह्यचं हाय बघ तुझ्यासोबत"

" आग मधु, लग्न तर आपण करणारच हाय. पण असच नाई .मला तुला सवतः च्या घरात न्यायचं हाय. लग्न करून असच स्टेशन ला ठेवू व्हय तुला?जरा दम काढ, हाताला काम लागलं कि मस्त १ झोपडी उभारू न राजा राणी चा संसार करू."
दिन्या आपली किती काळजी करतो बघून मधु गहिवरली.
तिने आनंदाने दिन्याला मिठी मारली. पण तिच्या मिठी मारण्याने दिन्या शहारला. त्याला मधु ची ओढ लागली होती.

तो दिवस त्यांनी वडापाव खाऊन घालवला. रात्र झाली. दिन्या स्टेशन वर झोपायला जागा शोधू लागला. मधु त्याची वाट पाहत होती. दिन्या मधु जवळ आला आणि त्यानी तिला खुणेनं पाठीमागे येण्याचां इशारा केला. मधु त्याच्या मागे चालू लागली. दिन्या स्टेशन च्या शेवटच्या टोकावर जिथे वर्दळ कमी होती आणि एक कोपऱ्यात भरपूर अंधार होता तिथे तिला घेऊन आला. " इथे टाक गोधडी , " ' इथं झोपायचं आपण, आर किती अंधार हाय. मला भ्याव लागत"
"आव मी हाय ना, टाक तू"
मधु न गोधडी टाकली आणि दोघेही झोपले, तसा दिन्या मधु ला जवळ ओढू लागला, मधु ला कळलं दिन्याला काय हवं आहे ते.तिला हि ते हवंच होत पण लग्नाच्या आधी कसं? असं तिला वाटत होत. ती जरा टाळू लागली. तसा दिन्या खवळला " हे काय चालू हाय तुय? तुयसाठी मी आलो न इथपर्यंत.? तू कावून मले असं करतंय? '
"आर राजा, असं न्हाय. पण लग्न होईपर्यंत...."
"लग्न करणार नाई असं वाटतंय का तुले? विश्वास न्हाय का मह्यावर ?"
" नाही रे दिन्या, असं का बोलतुस तू"
दिन्या पुन्हा चिडून पाठमोरा झोपला . मधुनि विचार केला. जे आहे ते यायचं तर आहे मग का दुःखी करायचं ?
तिने प्रेमानी घट्ट मिठी मारली दिन्याला. तिच्या छातीच्या स्पर्शाने दिन्या पुन्हा शहारला आणि त्या अंधाऱ्या ठिकाणी दोघे एक झाले.
सकाळी उठून दोघांनी आवरलं. दिन्या नि ठरवलं कि काही दिवस तो कुली च काम करेल मधु पण झाडलोट च काम मिळते का बघायला गेली आणि त्यांच्या सुदैवाने त्यांना ते मिळालंही. आता त्यांचा दिनक्रम असाच झाला. सकाळी उठून मधु स्टेशन वर साफसफाई करायची आणि दिन्या कुली च काम करू लागला. आणि रोज रात्री मधुचंद्र साजरा होऊ लागला. दिवस बघता बघता निघून गेले. महिना उलटून गेला होता. असाच एक दिवशी मधु न दिन्या यावरून आपापल्या कामावर गेले, दुपारी जेवण्याच्या वेळी ते भेटायचे, पण आज दिन्या आलाच नाही, कुठं कामात अडकला असेल,मोठं गिऱ्हाईक मिळालं असेल म्हणून ती वाट पाहू लागली, पण दिन्या आला नाही, तिला कामावर जायचं असल्यानी तिने कसतरी जेवण केलं आणि दिन्याचा विचार करतच ती कामावर गेली. संध्याकाळी येईल परत म्हणून काम करू लागली. पण रात्र झाली तरी दिन्या परतला नाही. रोजचं ओळखीचं स्टेशन आता तिला भयानक वाटू लागलं. जीव मुठीत धरून तिने रात्र काढली. सकाळ झाल्यापासून ती दिन्याला शोधू लागली, ओळखीच्यांकडे विचारपूस करू लागली, पण कुणालाच दिन्याबद्दल माहित नव्हतं.ती वेड्यासारखा त्याचा शोध घेत होती. शेवटी गण्या सोबत कुलीच काम करणाऱ्या एक म्हाताऱ्यानि तिला सांगितलं कि तो सकाळच्या ट्रेन मध्ये बसून निघून गेला कुठंतरी. गण्या तिला एकटीला टाकून निघून गेला होता. त्याला जे हवं होत ते मिळालं होत, आता त्याला मधु ची गरज नव्हती, तो त्याच्या नव्या आयुष्याकडे निघून गेला होता.मधु वर आभाळ कोसळल्यासारखं झालं, ज्याच्यासाठी घर सोडलं, आईबापाला तोडलं आज तोच नाही, तिला स्वतःचा प्रचंड राग आला. आता येणाऱ्या ट्रेन खाली उडी टाकून जीव द्यावा असं तिला वाटलं, ती रुळाकडे गेली पण, पण भरधाव येणाऱ्या ट्रेनचा आवाज काळजाला चिरत होता. ती धावत मागे झाली. मरायला सुद्धा किती हिम्मत लागते याची जाणीव तिला झाली. ती तिच्या नकळत आलेल्या ट्रेन मध्ये चढली आणि खिन्न मनानी तिच्या ठरलेल्या जागी म्हणजे दरवाज्यात बसली.

ट्रेन कुठे जात होती माहित नव्हतं.
ट्रेन कुठल्या तरी शहरात येऊन थांबली. चढणाऱ्या उतरणाऱ्यांची दारात गर्दी झाली. मधु दारात बसल्याने सगळे तिच्यावर ओरडत होते. ती ट्रेन मधून उतरली. शून्यात हरवली होती. स्टेशन वर चालत चालत ती एके ठिकाणी येऊन बसली. थोड्यावेळात तिच्याजवळ भीक मागणारी बाई आली. तिच्या आईच्या वयाचीच असेल बहुतेक. तीन जरा मायेन विचारपूस केली, कारण मधु ची अवस्था त्यांच्यासारखी दिसत होती. मळकट ,ठिकठिकाणी फाटलेले कपडे, विस्कटलेले केस. हि पण आपल्यातीलच एक म्हणून ती बाई तिची विचारपूस करत होती.तिला बघून मधु ला रखमीची आठवण आली आणि ती काहीच न बोलता धाय मोकलून रडली. त्या बाई ला काही सुचलं नाही, तिने मधु ला शांत करण्याचा प्रयत्न केला. आणि स्वतःच्या झोळीतला एक भाकरीचा तुकडा तिला खायला दिला. मधुनि खायला नकार दिला, ती उठून चालायला लागली आणि थोडं दूर जाताच धाडकन खाली कोसळली.तिची शुद्ध हरवली होती. त्या बाईनं त्यांच्या टोळीतल्या मुलांना आवाज देऊन मधु ला एका कोपऱ्यात नेलं. तोंडावर पाणी मारलं. पण त्या बाई ला वेगळीच शंका येत होती. तिने मधु ची नाळी तपासली, पोटावरून हात फिरवला........... मधु ला दिवस गेले होते...मधुच्या रडण्याचं कारण कदाचित आता तिला उलगडलं होत.थोड्यावेळानी मधूळ शुद्ध आली.त्या बाई न मधु ला पुन्हा भाकर खायला म्हटलं.यावेळी मधुनी ती गपगुमान खाल्ली. पोटाच्या भुकेची आग तिला जाणवायला लागली होती. कालपासून तिने काहीच खाल्लं नव्हतं.तस तिला एकदम दिन्याची आठवण झाली. डोळ्यात पाणी आलं. तोंडातला घास तोंडातच फिरला. त्या बाईनं खुणेनं बाकी पोरांना जायचा इशारा केला. मुलं निघून गेली. "पोरी काय झालंय? कावून अवढि रडून ऱ्हायली माय?"
"मावशे, ज्याच्यासाठी समदं सोडून आले व्हते तोच सोडून गेला वं मले.."
मधुच्या मावशी म्हणण्याने त्या बाईला आपुलकी वाटली, तिला मधु ची दया आणि काळजी वाटली..
दीर्घ श्वास घेऊन ती म्हटली," आणि त्याच पाप तुह्या पोटात टाकून गेला, मुर्दा "
तीच बोलणं ऐकून मधु स्तब्ध झाली, नजरेनंच मावशी नि तिला तिच्या आई असण्याची कल्पना दिली. तिच्या डोळ्यात आनंद आणि दुःख दोन्ही होत. तिने पोटावर हात ठेवला. तिच्या स्वप्नाची राखरांगोळी झाली होती. पण या सगळ्यात त्या जीवाचा काय दोष? तिला असं खचून चालणार नव्हतं. ती धैर्यानी उभी राहिली, तिला तिच्या बाळासाठी जगायचं होत. मावशी नि तिच्या पाठीवर प्रेमानी हात फिरवला "पोरी, भूतकाळात वाईट घडलं म्हून रडत कुढत बसण्यापेक्षा आजचा दिस जग, देव हाय बग. त्यानं आपल्याला जीत ठेवली म्हणजे आपल्याला जगलच पाहिजे. कुणाचबी कुना बगर अडत न्हाय. तू एकटी तुह्या लेकराले घडवू शकत."
तिच्या एवढ्या बोलण्याने मधु ला दहा हत्तीचं बळ आलं. आणि एक हसण्याची लहर तिच्या चेहऱ्यावर उमटली. मधु न जगण्याचा निर्णय घेतला. ती स्टेशन वर पडेल ते काम करू लागली. झाडू मारणं, स्वच्छतागृह साफ करणं, असली काम ती करू लागली, काही दिवसात तिची फेरीवाला बायांसोबत ओळख झाली,त्यांच्या मदतीने तिने हि छोट्या मोठ्या वस्तू ट्रेन मध्ये विकायला सुरवात केली. थोडं पैसे हाती यायला लागले, दिवसेंदिवस मधु च पोट वाढत होत. पोटोशी बाई म्हणून लोक वस्तू घेतांना घिसघीस करत नव्हते, बघता बघता मधु ला नववा महिना लागला, मावशी तिला ट्रेन मध्ये जायला नको म्हणत होती, पण भीक मागायला मधु ला पटायचं नाही, ती रोज वस्तू विकायला ट्रेन मध्ये चढायची. परिस्थीती माणसाकडून सगळं करून घेते म्हणतात ते हे.

मधुला चालणंही जड जात होत पण सांगणार कुणाला? होणाऱ्या लेकरासाठी काही तर करायला लागेल न? असच मधु त्या दिवशी एका ट्रेन मध्ये चढली. एकेक डब्यातून सामान विकत जात होती. अचानक पोटात कळ यायला लागल्या ,अश्या कळ तिला अधून मधून येत होत्या पण आज त्रास सहन होत नव्हता. ती हातंच सामान कसतरी संडासच्या बाहेर ठेवून आत गेली. पोटात असंख्य कळा येत होत्या.मधु जिवाच्या आकांतानं ओरडत होती. पण ट्रेन च्या आवाजात मधु चा आवाज विरत होता, आणि संडासातून आवाज येत असल्यानी लोक दाराजवळ जमा झाले होते,पण आत जाणार कोण?
मधु पोटावर हात ठेवून जोरात ओरडत होती, डोळे अर्धे मिटत होते, प्राण जातोय असं वाटत होत, खालून रक्त सांडत होत आणि अचानक,,,,..........
मधु चा आवाज बंद झाला आणि खाली संडासच्या पाईप लाईन मधून काहीतरी पडल्याचं मधु ला जाणवलं,नाळ तुटली होती. तिच्या हृदयाला असंख्या इंगळ्या चावल्या. सगळं प्राण एकवटून तिने ट्रेन ची चैन ओढली. आणि कसतरी स्वतःला सावरत संडासच्या बाहेर आली. ट्रेन थांबली, मधुची परिस्थिती पाहून सगले अवाक झाले, पण त्या डब्यातल्या प्रवास करणाऱ्या स्वतःला उचभ्रु समजणाऱ्या स्त्रियांनी तिला हात हि लावला नाही कि कुणी पाणी हि विचारलं नाही.पण देव जेव्हा स्त्री ला मातृत्व देतो तेव्हा सगळ्या संकटांवर मात करायची ताकदही देतो. ती त्याच अवस्थेत ट्रेन च्या खाली उतरली.तिची नजर तिच्या बाळाला शोधत होती. ती धावत होती. देवाचा धावा करत होती, "ज्याच्यासाठी जीवाचा एवढा आटापिटा केला त्या जीवाला जिवंत ठेव रे देवा" ती कावरीबावरी झाली होती. रुळाच्या मधोमध काळसावळ अभ्रक हात पाय हलवत रडत होत. ती जवळ गेली, तिला एक गोंडस मुलगी झाली होती. तीच रडणं बघून मधुच्या चेहऱ्यावर हसू आलं. तिने आपल्या पोरीला घट्ट छातीशी कवटाळून घेतलं आणि ती ट्रेन मध्ये चढली. ट्रेन मधले माणसं बाया आश्यर्यानी मधु कडे बघत होते.

मधु दरवाजात बसली. तिने बाळाला कपड्याखाली घेतलं आणि दूध पाजायला लागली. जगातलं सगळ्यात मोठं समाधान मधु च्या चेहऱ्यावर होत. लोक आपापल्या जागेवर जाऊन बसली , एका माणसानं मधु च्या हातातल्या कोवळ्या बाळाकडे पाहून म्हटलं"देव तरी त्याला कोण मारी?"
मधु ला ट्रेन नि खूप काही दिल होत..हाताला काम, दिन्या,, जगण्यासाठी सामर्थ आणि जगातला सर्वोच आनंद "मातृत्व". तिची डिलिव्हरी ट्रेन मध्ये झाली होती.

इतर रसदार पर्याय

शेयर करा

NEW REALESED