स्पर्श. Tejal Apale द्वारा सामाजिक कथा मराठी में पीडीएफ

Featured Books
श्रेणी
शेयर करा

स्पर्श.

रोहन.
एका कंपनी मध्ये चांगल्या पदावर काम करत असेलला तरुण. कंपनीनेच दिलेल्या फ्लॅट मध्ये आणखी तीन मित्रांसोबत राहायचा. इतर लोकांच असत तसच साधारण आयुष्य तो जगत होता. सोमवार ते शनिवार तेच रुटीन. सकाळी उठायचं, लगबगीने आवरून निघायचं. कंपनी ची बस पकडायची. तिथे जाऊन फेसबुक बघायचं,  व्हाट्सएपच्या दुनियेची स्वारी करायची. रोजचा टास्क पूर्ण करायचा, दुपारी जेवण आणि पाच वाजताची वाट... घरी यायचं .घरी आल्यानंतर ची वेळ मात्र रोहन आणि त्यांच्या मित्रांसाठी निवांत वेळ असायची.
मोबाईल मध्ये असलेले सगळे सोशिअल मीडिया तो चाळायचा.

एकाच घरात राहत असलेल्या त्या चौघांमध्ये जरी जास्त बोलणं होत नसलं तरी , फेसबुकवर त्यांचे हजारो लाखो मित्र मैत्रिणी होत्या, कोण कुठे आहे याची सगळी माहिती रोहन ला होती. इन्स्टाग्रामवर विविध नेचरल फोटोग्राफी ला तो सतत लाईक करायचा. त्यादिवशी रोहन ऑफिस मधून आल्यानंतर मोबाइल चाळत बसला होता. घराच्या चार कोपऱ्यात ते चौघे हातात मोबाइल घेवुन बसले होते. इन्स्टाग्रामवर पायलनी नवीन फोटो अपलोड केले होते. पायघोळ निळ्या गाऊन मध्ये ती फारच सुंदर दिसत होती.त्याने तिला मेसेज टाकला.
"लुकिंग गोर्जीअस"

तिचा लगेच रिप्लाय आला, "थँक्स"

पायल , रोहन च्याच ऑफिस मध्ये काम करणारी तरुणी. रोहनला ती मनापासून आवडायची, रोज बोलणं व्हायचं पण ते फक्त मोबाईलवर चॅट, प्रत्येक्षात मात्र समोरासमोर बोलायची त्यांना कधी गरजच भासली नाही.
खूपदा आईचा कॉल यायचा की घरी ये , खूप महिने झालेत तुला बघून, त्यावर रोहन त्यांना व्हिडिओ कॉल करायचा आणि म्हणायचा, "बघ आता दिसतोय नं? दिसण्यासाठी भेटायलाचं हवं असं नाही गं आई, टेक्नॉलॉजी खूप पुढे गेलीय".
" अरे बाळा जो जिव्हाळा स्पर्शात आहे तो देखाव्यात नाही रे सोन्या"
" ए आई तू उगाच सेंटी नको करुस हं!!"
यावर बिचारी आई तरी काय बोलणार?

रोहन च्या मते असं गप्पा करणं, दर महिन्याला घरी जाऊन आईच्या कुशीत झोपणं वैगरे हे सगळं कालबाह्य झालेलं आणि सो ओल्ड. एकदम टिपिकल... याउलट मस्त फिरायचं, शॉपिंग करायची खूप सारे फोटो काढायचे , ते सोशिअल अँप वर टाकून मिरवायचं , लाखो मित्र मैत्रिणी बनवायच्या, ही म्हणजे लाईफ. आपल्या पूर्ण ग्रुप मध्ये आपल्या एका फोटोला सगळ्यांपेक्षा जास्त लाईक मिळाले तर कसलं भारी वाटतं. कोण आंनद होतो आपल्याला!!  ही सगळी मजा आईवडिलांना कसं कळणार? शेवटी जनरेशन गॅप येतोच ना!
अस एकंदरीतच रोहन एक व्हर्च्युअल जीवन जगत होता.. आणि त्यामध्ये तो खूषही होता!

एक दिवस रोहन ऑफिस मधून घरी यायला निघाला. कुठल्याश्या कारणांनी आज ऑफिस ची बस नव्हती, त्यामुळे सगळे आपापल्या सोईनी जाणार होते, आज अजून रोहन चा टास्क पूर्ण झाला नव्हता त्यामुळे सगळे गेल्यानंतरही तो काम करत बसला होता. बाहेर काळोख दाटून आला होता, मुसळधार पाऊस येणार यात शंकाच नव्हती. विजांचा कडकडाट होत होता. शेवटी काम आटोपून रोहन घरी जायला निघाला. पावसाचं वातावरण असल्यामुळे काहीच रेंज नव्हती, ऑनलाइन कॅब बुक करायला जमत नव्हतं,त्यामुळे आता रिक्षाने जाण्याशिवाय काहीच पर्याय नव्हता.

पावसाचे दिवस नसल्यामुळे छत्री सोबत असणे शक्यच नव्हतं, खांद्यावरची बॅग डोक्यावर घेवुन रोहन धावत रिक्षा शोधायला बाहेर पडला, पण एकही रिक्षा थांबत नव्हती. रोहनला पावसाचा भयंकर राग आला होता. आज त्याने घातलेला लिनन चा शर्ट पावसामुळे भिजला होता, त्याचे वुडलंड चे शूज पूर्ण ओले झाले होते. मोबाईल तरी वाचवा म्हणून त्याने तो पॅन्ट च्या खिशात टाकला होता.

आडोसा शोधत तो एका घराजवळ आला आणि त्या घराच्या गेटजवळ असलेल्या शेड मध्ये उभा राहिला. लगबगीने त्याने मोबाईल तपासला, एवढं जपून सुद्धा मोबाईल ला पाणी लागलंच. आता मात्र रोहन चा पारा खूपच चढला. अचानक आलेल्या या पावसाने त्याच खूप नुकसान केलं होतं. पण आता करायला काहीच नसल्याने मोबाईल बॅगमध्ये ठेवून तो इकडे तिकडे रिक्षा मिळतंय का याची वाट बघू लागला.

तेवढ्यात त्याला लहान मुलांच्या खेळण्याचा आवाज आला. नकळत त्याने मागच्या घराकडे नजर टाकली. लहान मुलांचं अनाथाश्रम होतं ते. ७-८ मुलं मुली वेगवेगळ्या वयाची मनसोक्त पावसाचा आनंद लुटत होती, कुणी कागदाच्या होड्या बनवून कुणाची नाव सर्वात दूर पोहचते म्हणून शर्यत लावत होते तर कुणी पावसाने साचलेल्या डबक्यात उद्या मारून पाणी उडवत होते. त्या सगळ्यांमध्ये एका ९-१० वर्षाच्या मुलीनं रोहनच लक्ष वेधून घेतलं. २ वेण्या घातलेली, मस्त गुलाबी रंगाचा फ्रॉक घातलेली पाठमोरी ती अगदी बाहुली दिसत होती. त्या लहान मुलांच्या घोळक्यात ती अगदी भान विसरून भिजत होती. पावसाचा एक एक थेंब हातावर झेलत तिने हळूच एक घिरकी घेतली, आणि तसा रोहन च्या हृदयाचा ठोकाच चुकला. एवढीशी ती गोड बाहुली ....आंधळी होती.....
निसर्गाच्या सप्तरंगाची ती जे उधळण करत होती, ते रंगच ती बघू शकत नव्हती!! कसं जगत असेल ती आयुष्य? आईवडिलांनानी टाकलेली ती बिचारी पोर ..... असे असंख्य विचार रोहनला येऊन गेले. पण .... ती बाहुली.... ती तर आनंदी होती!!  उंचावरून पडणाऱ्या प्रत्येक पावसाच्या थेंबाला ती स्पर्श करत होती, आलिंगन देत होती. तिला पाऊस बघता येत नव्हता पण ती पावसाळा स्पर्श करत होती.

रोहन च्या डोक्यात लक्ख प्रकाश पडला, आईचं वाक्य त्याला आठवलं," जो आनंद स्पर्शात आहे तो देखाव्यात नाही."
त्याच्याकडे देवाने दिलेलं सगळं होत पण तो त्याचा आनंद क्षणभंगुर गोष्टी मध्ये शोधत होता, जे नाही त्याच दुःख करून काहीच उपयोग नाही, जे आहे त्याला आलिंगन दिलं, तर तो स्पर्श आपल्याला जीवनभर आंनद देतो. त्या १० मिनिटाच्या वेळात त्या दहा वर्षाच्या मुलीने त्याला न बोलता, न बघता सुखी जीवनाचा मंत्र दिला होता.

येणाऱ्या शनिवार रविवारी गावला जायचं असं मनात ठरवून रोहन त्या लहान मुलांच्या घोळक्यात घुसला, आणि बेधुंद होऊन नाचू लागला.
बाहुली चे हात पकडून तोही घिरकी घेऊ लागला.

आणि खाली साचलेल्या चिखलात त्याचे वुडलंड चे शूज भिजत होते.....