aashray books and stories free download online pdf in Marathi

आश्रय

आश्रय

स्वरूप आणि मधुरा नेहमी प्रमाणे जॉगिंगला चालले होते. सकाळी ७ - ७.१५ ची वेळ असेल. जॉगिंग पार्कमधे गेले आणि जॉगिंग सुरू केले. सगळे आपाल्या नादात होते. स्वरूप आणि मधुराही. मधुराने ट्रॅकचा एक राउंड पूर्ण केला आणि दुसर्‍या राउंड साठी वळली तोच तिची नजर ट्रॅकच्या मधोमध लॉनवर बसलेल्या लहान मुलीवर गेली. ती लहान मुलगी तिथे मधोमध रडत बसली होती. अगदी दोन-तीन वर्षाची असेल. सगळे आपापल्या गडबडीत असल्यामुळे ऐकूनही न ऐकल्या सारखे करत होते.

मधुरा मात्र वळणावरच थबकली. त्या मुलीकडे गेली. ती आई आई करून रडत होती.तिची अवस्था अगदी पाहवत नव्हती. अंगात मळकटलेला..जागो जागी फाटलेला फ्रॉक..विस्कटलेले केस.. चेहरा धुळीच्या लोटाने काळवंडलेला..अगदी कोणी तिच्या कडे कित्येक दिवस लक्षच न दिल्या प्रमाणे तिची दुरावस्था होती.

मधुरा तिच्याशी बोलायचा प्रयत्न करू लागली. पण ती अजुनच जोरात रडू लागली. तो पर्यंत स्वरूप तिथे पोहोचलाच. त्या दोघांनी मिळून पार्क मधे सगळी कडे शोधले.. जो दिसेल त्याला विचारले. पण सगळे व्यर्थ. कोणीच तिला ओळखले नाही.

स्वरूप नि मधुराला प्रश्न पडला की आता काय करायचे. त्यांनी अर्धा तास वाट पहिली. पूर्ण पार्क रिकामे होत आले होते. पण त्या मुलीला ओळखणारे तिथे कोणी ही नव्हते. मुलगी तशीच रडत होती. मधुराने तिला उचलून जवळ घेतले होते. पण आता त्यांना ही थांबणे शक्य नव्हते कारण त्यांना ऑफीस होते. "एवढ्या चिमुरड्या मुलीला कोण बरे असे वाऱ्यावर सोडून गेले. काळीज आहे की दगड" मधुरच्या मनात विचार आल्यावाचून राहिला नाही.

ते दोघे त्या मुलीला घेऊन जवळच्याच पोलीस स्टेशनला गेले. त्यांनी घडलेला प्रकार इनस्पेक्टर साहेबांना सांगितला. त्यांनी कंप्लेंट लिहून घेतली. मधुरा आणि स्वरूपचे फोन नंबर्स घेतले. ते दोघे निघाले. पण मधुराला काही त्या मुलीला एकटे सोडणे बरोबर वाटत नव्हते. पण काय करणार. ते दोघे घरी आले. आपापले आवरून ऑफीसला गेले.

मधुराला अधून मधून त्या मुलीची आठवण येत होती. पण तो विचार बाजूला सारून परत कामावर कॉन्सेंट्रेट करत होती.

त्यांच्या लग्नाला आता पाच वर्षे झाली होती. पण संतती प्राप्ती झाली नव्हती. आणि एक चाइल्ड अडॉप्ट करण्याचे त्यांच्या डोक्यात खूप दिवसांपासून घोळत होते. या प्रसंगाने पुन्हा तो विचार मधुराच्या मनात ठळक केला.आश्रय नसणाऱ्या जीवाला आश्रय मिळेल आणि आपल्याही घरात चिमुकली पाऊले उमटू लागतील असा स्वरूप आणि मधुरा ने विचार केला होता.

या आधी त्यांनी बरेच प्रयत्न केले होते. डॉक्टरांकडून सल्ला घेतला. उपचारही घेतले होते. पण यश आले नव्हते. खूप हताश झाले होते दोघे त्या वेळेस. स्वरूपच्या आई-बाबांना ही वाटत होते की “एकुलता एक मुलगा. घराण्याची पुढची पिढी पाहण्याचा योग येणारच नाही काय?”

पण स्वरूपने स्वतःला सावरले नि मधुराला हि धीर दिला. इतरही बरेच पर्याय असतात हल्ली. त्यांनी सगळ्या पर्यायांचा विचार केला. पण शेवटी एकमताने निर्णय झाला तो मुल दत्तक घेण्याचा..

घरच्यांशी बोलून त्यांनी अडॉप्ट करण्याचा निर्णय फाइनल केला होता. स्वरूपच्या आई- बाबांची ही काही हरकत नव्हती. त्यासाठी त्यांनी घराजवळचेच अनाथ आश्रम निवडले. "आश्रय" असे त्याचे नाव.

स्वरूप आणि मधुरा आश्रमाच्या गेटपाशी आले. आश्रम छान आणि वेगवेगळ्या प्रकारच्या झाडांनी वेढलेला होता. वड, पिंपळ , लिंब , अशोक आणि इतर शोभिवंत वृक्ष होते. गेटवर मोठ्या छान अक्षरात आश्रमाचे नाव लिहले होते. ते दोघे आतमधे गेले. आतमधेही छान वेगवेगळ्या प्रकारची फुलझाडे होती. जेवढे घरपण आणता येईल तेवढा आणण्याचा प्रयत्न केला होता.. समोर छोटेखानी इमारत होती. ते दोघे त्या इमारतीत शिरले. रिसेपशनवर जाऊन त्यांनी सीमा ताईंची चौकशी केली.

रिसेपशनिस्टने फोन लावून सीमा ताईंना कॉल करून बोलावले. ते दोघे त्यांच्या बरोबर मुले पाहायला गेले. सीमा ताई त्यांना आश्रमभर फिरवीत होत्या. तेथे अगदी नुकत्याच जन्मलेल्या बाळा पासून ते अगदी १६-१७ वर्षांपर्यंतची मुले होती. स्वरूप नि मधुराला फार वाईट वाटत होते त्यांची संख्या बघून. "एवढ्या लोकांना स्वतःचे हक्काचे घर नसावे. काय ही भीषण परिस्थिती आहे. आपण मात्र आपल्या कडे सगळे असून ही नसलेल्या गोष्टींसाठी नशिबाला दोष लावत असतो. या मुलांकडून किती शिकण्यासारखे आहे". असेच विचार मधुराच्या डोक्यात चालू होते.

स्वरूपने आवाज दिला आणि मधुराची विचारांची शृंखला तुटली. समोर पाहून दोघांनाही आश्चर्याचा धक्का बसला होता. त्यांनी ज्या मुलीला दोन महिन्यांपूर्वी पोलीस स्टेशन मधे सोडले होते ती तिथे दिसली. म्हणजे हिला न्यायला कोणी आलेच नाही वाटते. काय रे देवा.. किती परीक्षा पाहतोस रे लहान मुलांची. मधुरा त्या मुली जवळ गेली. तीही ओळखल्या प्रमाणे मधुराला बिलगली. चिमुरडे ते बाळ..अजुन ही आईच्या माये पासून वंचित होते आणि आपल्या आईला शोधत होते.

तिच्या मागोमाग स्वरूपही आला.मधुराला लागलेला त्या मुलीचा लळा स्वरूपला दिसत होता. त्या दोघांनी तिला दत्तक घेण्याचा निर्णय घेतला. अर्थात बऱ्याच फॉरमॅलिटीस नंतर ते शक्य होणार होते. आपला निर्णय त्यांनी सीमा ताईंना सांगितला. सीमा ताईंनाही फार आनंद झाला. स्वरूप आणि मधुराचा आनंद गगनात मावत नव्हता.

सर्व फॉरमॅलिटीस पूर्ण व्हायला आठ दिवस गेले. त्या नंतर स्वरूप आणि मधुरा तिला घेऊन घरी आले.

अखेर एका घरट्यातून उडून पिल्लू दुसर्‍या पण त्याच्या हक्काच्या घरट्याच्या आश्रयाला आले होते.
©केतकी शहा

इतर रसदार पर्याय