Swaraja Surya Shivray - 23 books and stories free download online pdf in Marathi

स्वराज्यसूर्य शिवराय - 23

स्वराज्यसूर्य शिवराय

भाग तेवीसावा

शिवबा तख्तावरी, जिजाऊ स्वर्गचिया द्वारी..

शिवरायांची घोडदौड अविरत चालू होती. सर्वत्र त्यांचा दरारा पसरत होता. विशेषतः शत्रूपक्षांमध्ये शिवरायांच्या पराक्रमाची धास्ती पसरली होती. कारण शिवरायांनी कामगिरीच तशी जबरदस्त केली होती. शत्रूंनी शेकडो वर्षे मराठी भागातील जनतेला स्वतःच्या अंमलाखाली ठेवून अतोनात, क्रुर, भयंकर असा छळ केला होता. प्रचंड प्रमाणात लुट केली होती. त्यांच्या क्रुरकर्माला कुणी फारसा विरोध करत नसे. अधूनमधून कुणी तसा प्रयत्न केला तर त्याला संपवण्यासाठी ही दुश्मन मंडळी मागेपुढे पाहात नसत. त्याचा कुटुंबासह खात्मा करून जनतेला कायम दहशतीखाली ठेवण्यात आणि वर्चस्व राखण्यात ही मंडळी यशस्वी होत असे. पारतंत्र्याचा, गुलामगिरीचा, हुकूमशाहीचा काळाकुट्ट अंधार सर्वत्र पसरलेला असताना शिवरायांनी स्वबळावर, स्वपराक्रमावर, मावळ्यांच्या साथीने, जिजाऊंच्या आशीर्वादाने, ईश्वराच्या आशिषाने जनतेला स्वातंत्र्याचा शितल प्रकाश देण्याचे काम केले. आदिलशाही, निजामशाही, मुघलशाही इत्यादी सत्तांनी शिवरायांचे, मराठी माणसाचे सार्वभौमत्व मान्य केले असले तरीही त्यांच्या अधूनमधून स्वराज्याच्या विरोधात कुरापती चालूच असत. मराठी मुलुखातील जनता आपल्या शिवबावर अत्यंत खुश होती, समाधानी होती. असे असले तरीही दुश्मन आणि काही स्वकीय शत्रू शिवरायांचा राजा म्हणून स्वीकार करायला तयार नव्हते. शिवरायांचा पराक्रम त्यांच्या लेखी अजूनही एक प्रकारचे बंडच होते. अनेक मराठी सरदार सातत्याने शत्रुशी हातमिळवणी करून शिवरायांच्या कामात अडथळे निर्माण करीत होते. स्वकीय असूनही ही मंडळी शिवरायांना राजा, महाराज, छत्रपती मानायला तयार नव्हती. मग यावर उपाय काय? उलट शत्रूकडे चाकरी करणारी ही मंडळी सवाल करीत असत, ' कुणाचे स्वराज्य? कोण हा शिवाजी? कुणी याला राजा केले? दहा-वीस मावळे जमवून गुंडगिरी करणे म्हणजे काय राजा?'असे उलट प्रश्न विचारू लागले. कष्टाने उभारलेल्या, मावळ्यांच्या रक्ताने सिंचन झालेल्या, बलिदानाने पावन झालेल्या या मराठेशाहीला स्वराज्य म्हणून, शिवरायांना राजा म्हणून मान्यता मिळण्यासाठी, हिंदूचे राज्य निर्माण झाले आहे, त्या राज्याची धुरा एक बलवान, पराक्रमी सरदार नव्हे तर एक महापराक्रमी राजा सांभाळतो आहे, जनतेलाही हे आपलेच राज्य आहे ही खात्री पटावी, आपल्यालाही एक खराखुरा, पराक्रमी राजा मिळाला आहे हा समज दृढ व्हावा म्हणून शिवरायांनी आता राज्याभिषेक करून घ्यावा आणि सर्वांना हिंदू राज्य निर्माण झाले आहे, हिंदू राजा सिंहासनारूढ झाला आहे याची ग्वाही द्यावी अशी चर्चा शिवरायांच्या सरदारांमध्ये सुरु झाली. विशेषतः माँसाहेबाचीही ती फार दिवसांची इच्छा होती. शिवबा राजसिंहासनावर बसावा, वेदमंत्रांच्या घोषात त्याला राज्याभिषेक व्हावा, माझा शिवबा राजा व्हावा, महाराज-छत्रपती म्हणून त्याचा जयजयकार होताना पाहिले, ऐकले की, कैक वर्षांपासून पाहिलेले माझे स्वप्न पूर्ण होईल म्हणून जिजाऊ आग्रही होत्या. तितक्यात समर्थ रामदासांचाही तसा निरोप आला त्यामुळे शिवरायांनी खूप विचार केला. त्यांनाही सर्वांचे म्हणणे पटले, समजले. त्यांनी राज्याभिषेकासाठी संमती दिली.

शिवरायांची सहमती मिळताच मोठ्या आनंदाने, उत्साहाने तयारी सुरू झाली. शिवरायांना राज्याभिषेक करण्यासाठी काशीहून अत्यंत हुशार असे गागाभट्ट नावाचे ब्राह्मण बोलावण्यात आले. त्यांनीही शिवरायांना राज्याभिषेकाची आवश्यकता का आहे हे पटवून सांगितले. गागाभट्टांच्या मार्गदर्शनाखाली सारी तयारी चालू झाली. रायगडाला राजधानीचा मान मिळाला. सोने, रत्नांनी सजवलेले सुंदर सिंहासन तयार करण्यात आले. शिवरायांच्या डोक्यावर धरण्यासाठी विविध रत्ने,माणिक, मोती अशा अलंकारांनी श्रुंगारलेले छत्र बनवून घेण्यात आले. सात नद्या, समुद्रातून पवित्र जल आणण्यात आले. राज्यात आणि राज्याबाहेर महत्त्वाच्या व्यक्तींना खास आमंत्रणे देण्यात आली. गागाभट्टांनी राज्यभिषेकासाठी जून १६७४ या पवित्र दिवसाची निवड केली. रायगड सर्व बाजूंनी सजविण्यात आला. रायगडाचे मनमोहक स्वरूप पाहून सर्वांना अतिशय आनंद होत होता. गागाभट्टांनी राज्यभिषेकासाठी खास 'राज्याभिषेक प्रयोग' हा ग्रंथ तयार केला. राज्याभिषेक सोहळ्याचे एक परिपूर्ण, बारीकसारीक गोष्टी, विधी पार पाडण्याचे उत्कृष्ट नियोजन, आयोजन म्हणजे तो ग्रंथ होता. शिवराय स्वतः त्या मंगलमय, आनंदी सोहळ्याला भवानीमातेचा आशीर्वाद घेण्यासाठी प्रतापगडावर केले. देवीची मनोभावे, षोडशोपचारे पूजा करून भवानीमातेच्या चरणी सोन्याचे रत्नजडित छत्र अर्पण केले. विधीप्रमाणे शिवरायांचा व्रतबंधनाचा (मौंजीचा) कार्यक्रम पार पडला. यामागील कारण असे की, शिवरायांची त्यापूर्वी मौंज झाली नव्हती. व्रतबंध करणे जसे ब्राह्मण समाजासाठी आवश्यक आहे तसेच ते क्षत्रियांसाठीही अत्यंत आवश्यक असते. त्या सोबतच शिवरायांनी सोयराबाई, सकराबाई आणि पुतळाबाई यांच्याशी पुन्हा विवाह केला. पाठोपाठ शिवरायांच्या सुवर्णतुलेसह, चांदी, तांबे यासह विविध प्रकारच्या पदार्थांनी तुला करण्यात आल्या.

जिजाऊ ज्या दिवसाची वाट पाहात होत्या, शिवराय छत्रपती होण्यासाठी आसुसलेल्या होत्या, जनता आपला स्वतःचा राजा मिळावा यासाठी डोळे लावून बसली होती तो दिवस उजाडला. सर्वत्र आनंदी वातावरण पसरले होते. पहाट होताच राजगडावरून सर्वत्र पसरणारे वेदमंत्रांचे आवाज ग्वाही देऊ लागले, हा विश्वास निर्माण करु लागले की, संपली, प्रतिक्षा संपली, अस्वस्थता लयाला गेली, दुश्मनांनो सांभाळा स्वतःला, या मराठी मातीकडे वाकड्या डोळ्यांनी पाहिले तर ते डोळे काढून हातात देणारा, या स्वराज्याकडे पाहून कुणी हात उगारला तर तो हात खांद्यापासून उखडून फेकण्याची हिंमत असलेला महाराजा, छत्रपती येतो आहे. सकाळी सकाळी मधुर आवाजात गाणारे पशुपक्षी, प्राणी आनंदाने गात होते, हंबरत होते जणू त्यांनाही त्यांच्या स्वातंत्र्याची चाहूल लागली होती म्हणूनच ते मुके बिचारे प्राणी आपापला आनंद व्यक्त करताना एकमेकांना सांगत होते, घाबरू नका. भिऊ नका. आता आपला शिवबा छत्रपती होतो आहे.संपला. आपला वनवास संपला, शत्रूच्या तलवारीची भीती बाळगण्याची कारण नाही. आता शत्रूला भीती घालण्याचे, त्याला घाबरवण्याचे आपले दिवस आहेत. तेव्हा बिनधास्त, मनमोकळेपणाने कुठेही विहार करा कारण राज्य आपले आहे. आपला शिवबा छत्रपती होतो आहे. रायगडावर पाहुण्यांची मांदियाळी जमली होती. घाईगडबडीचे वातावरण होते. शिवरायांची नजर त्याही गडबडीत शोधत होती काही मित्रांना. सारे आले होते पण जीवाला जीव देणारे आणि खरोखरीच जीव दिलेले तान्हाजी मालसुरे, सूर्याजी काकडे, बाजीप्रभू देशपांडे, मुरारबाजी, बाजी पासलकर, प्रतापराव गुजर यासोबतच शिवरायांसाठी, स्वराज्यासाठी प्राणार्पण केलेले, रक्ताचे सिंचन केलेले असंख्य..हजारो शूरवीर कुठे आहेत? त्यांच्या अद्वितीय कार्यामुळेच स्वराज्याची, या मंगलमय क्षणाची पहाट झालेली असताना, हा गौरवशाली क्षण पाहण्यासाठी ही जीवाभावाची मंडळी असायलाच पाहिजे होती परंतु नियतीच्या मनात वेगळेच काहीतरी असते, तसे ती घडवून आणते. सारे मानवप्राणी नियतीचे मांडलिक असतात

राज्याभिषेकाची सारी तयारी झाली. आवश्यक साहित्याची जमवाजमव झाली. गागाभट्टांनी सांगितले आणि शिवराय, सोयराबाई आणि संभाजीराजे दमदार, आत्मविश्वासपूर्वक पावले टाकत सजवलेल्या चौरंगावर जाऊन बसले. सर्वत्र हर्षोल्हासाचे वातावरण पसरले. जिजाऊंच्या डोळ्यात कौतुकाचे भाव दाटून आले. भावना उचंबळून आल्या. काय पाहू-काय नको अशी त्यांची अवस्था झाली. त्यांना प्रकर्षाने शहाजी राजे यांची आठवण येत होती. तिकडे चौरंगावर बसलेल्या शिवरायांच्या कुटुंबाभोवती आठ दिशांना अष्टप्रधान उभे होते. मोरोपंत पिंगळे हे पूर्व दिशेला उभे होते. त्यांच्या हातात असलेला सोन्याचा कलश तुपाने भरून होता. अग्नेय दिशेला अनाजीपंत छत्र घेऊन उभे होते. दक्षिणेला उभ्या असलेल्या हंबीरराव मोहिते यांच्या हातात असलेला चांदीचा कलश दुधाने भरलेला होता. त्र्यंबकपंतांच्या हातात पंखा होता ते नैऋत्येला उभे होते. रामचंद्र अमात्य यांच्या हातातील कलशात दही असून त्यांची पश्चिम दिशा होती. वायव्य दिशेला दत्ताजी ह्या मंत्र्याच्या हातात मोर्चेल (मोराच्या पंखांपासून तयार केलेला गुच्छ) होते.उत्तर दिशेला रघुनाथ पंडितराव उभे होते. त्यांच्याकडे असलेल्या सोन्याच्या कलशात मध होता. ईशान्य दिशा! इथे उभे होते निराजीपंत न्यायाधीश. त्यांच्याही हातात मोर्चेल होते. इतरही काही प्रमुख मंडळी आजूबाजूला उभी होती. सर्वत्र मंगलमय, पवित्र वातावरण पसरले होते. गागाभट्ट आणि इतर ब्राह्मण मंत्रघोष करीत होते...…

आला. तो क्षण आला. ज्याची लहानथोर सारेच वाट पाहात होते. ठिकठिकाणाहून आणलेल्या पवित्र जलाने शिवराय, सोयराबाई, संभाजी यांना वेदमंत्रांच्या घोषात अभिषेक करण्यात आला. मंगलवाद्ये सुमधूर आवाजाने वातावरण अजून पवित्र करीत होते. अभिषेक, स्नानादिनंतर सर्व जण नवीन वस्त्रं,अलंकार धारण करून आले. शिवरायांना राणीसाहेब आणि युवराज यांच्यासह सवाष्ण स्त्रियांनी ओवाळले. शिवरायांसमोर तुपाने भरलेले एक काश्यपात्र ठेवण्यात आले. शिवरायांनी त्यात आपला चेहरा पाहिला. अगोदरच राजबिंडे रुप असणाऱ्या शिवरायांची चर्या अधिकच उजळली, खुलली होती. राजसभा! शिवरायांचा दरबार! त्याचा रुबाब काय वर्णावा सजूनधजून दरबार आपल्या महाराजांची वाट पाहात होता. दरबारात असलेले शिवरायांचे मुख्य आसन..... सिंहासन! तेही विविध प्रकारे श्रुंगारीत होऊन छत्रपती शिवाजी महाराजांची आतुरतेने वाट पाहात होते. राजसभा माणसांनी खचाखच भरली होती. पाय ठेवायलाही जागा नव्हती. सारेजण उत्सुकतेने शिवरायांच्या आगमनाची वाट पाहात होते. शिवरायांनी आपल्या शस्त्रास्त्रांची मनोभावे, विधीयुक्त पूजा केली. सारी शस्त्रास्त्रे धारण केली. निघाले.शिवराय, शिवाजी महाराज सिंहासनारूढ होण्यासाठी निघाले. जातांना त्यांनी कुलदेवता, देवता, गागाभट्ट, इतर ब्राह्मणांना नमस्कार केला आणि शिवराय निघाले... माँसाहेबाच्यासमोर उभे राहिले. भावनांचा कल्लोळ माजला. स्वप्नपूर्ती, इच्छापूर्ती, धन्यता, कृतार्थता, समाधान, आनंद अशा शेकडो भावना दाटून आल्या. लहानपणी शिवनेरीगडावर मित्रांसह खेळताना मातीचे किल्ले करून 'राजा' बनणारा जिजाऊंचा शिवबा आज खरोखरीच राजा झाला होता. शिवाजी महाराज झाला होता. छत्रपती झाला होता. तोच छत्रपती आपल्या महाराणीसोबत, युवराजांसह आपल्या मातेच्या चरणी लीन होत होता, नतमस्तक होत होता. कृतार्थ भावनेने आशिष मागत होता. त्या माऊलीचा हात समाधानाने, आनंदातिशयाने थरथर कापत होता. खूप बोलावेसे वाटत होते, भरभरून आशीर्वाद द्यावासा वाटत होता परंतु शब्द तोंडातून बाहेर पडत नव्हते. तेही आनंदाने आतच दडी मारून बसले होते. थरथरणारे हात लेकरांच्या डोक्यावर स्थिरावले. त्या स्पर्शातून लक्ष लक्ष आशीर्वाद मिळाले. भावना अनावर होतात तेव्हा स्पर्श खूप काही सांगून जातात, हवे ते देऊन जातात. महाराज उठले. आईकडे पाहिले. नजरेला नजर मिळाली. मातेचे हरवलेले शब्द डोळ्यात अश्रूंच्या रुपाने कौतुकाचा वर्षाव करीत होते. काही क्षणात शिवरायांनी दरबारात प्रवेश केला. जमलेल्या आप्तेष्टांना, मित्रांना, पाहुण्यांना खूप खूप आनंद झाला. डौलदार चालीने, छत्रपतींना शोभतील अशी दमदार पावले टाकत शिवराय सिंहासनासमोर आले. ते सिंहासन त्याच क्षणाची वाट पाहात होते. तेही आनंदाने फुलून आले. केव्हा एकदा राजे शिवाजी माझ्या मांडीवर बसतात याची ते सिंहासन वाट पाहत होते. शिवराय सिंहासनासमोर उजव्या पायाचा गुडघा टेकवून बसले. डोके सिंहासनावर टेकवून भक्तीभावाने नमस्कार केला. त्या कृतीने सिंहासन गदगद झाले, कृतकृत्य झाले. त्याच्या आनंदाला सीमा राहिल्या नाही. शिवराय उभे राहिले. गागाभट्ट आणि इतरांनी पुन्हा मंत्राचा जयघोष केला. शिवराय हलकेच सिंहासनावर बसले, सिंहासनारूढ झाले. आनंदाला भरती आली. ताशे, चौघडे इतर वाद्यांनी धुमधडाक्यात त्या क्षणाचे, शिवरायांचे स्वागत केले. बाहेर त्या क्षणाची अगतिकतेने वाट पाहणाऱ्या तोफा कडाडल्या. बंदुकांमधून हर्षभरीत गोळ्यांचा वर्षाव झाला. त्या आवाजांनी दाही दिशांना गरजून सांगितले,' बघा. बघा. हिंदवी स्वराज्याचा संस्थापक सिंहासनावर अभिमानाने बसला आहे. खबरदार! या भुमिकडे, या जनतेकडे वाईट नजरेने पाहाल तर ! दरबारात वेगळाच जल्लोष होता. टाळ्यांचा कडकडाट होत होता. कुणी सोन्याचांदीच्या फुलांची उधळण केली. कुणी सुगंधी फुले शिवरायांच्या दिशेने उधळली. कुणी अक्षता टाकल्या आणि जमलेल्या प्रचंड समुदायाने एका आवाजात जयजयकार केला....…

'शिवाजी महाराज की.....जय !''शिवाजी महाराज की.....जय !!''शिवाजी महाराज की.....जय !!!'

वाद्यांच्या गजरात, गायकांच्या सुरेल सुरात, नृत्यांगणांच्या पदलालित्याच्या अदाकारीने उपस्थित सारे तृप्त होत होते. तितक्यात पुन्हा छत्रपती शिवाजी महाराजांना औक्षण करण्यासाठी सुवासिनी आणि कुमारिका सिंहासनाजवळ आल्या. त्यांच्यारुपाने स्वराज्यातील प्रत्येक महिलेने जणू आपल्या लाडक्या महाराजांना ओवाळले. परंपरेनुसार ओवाळणाऱ्या प्रत्येक भगिनीला ओवाळणी म्हणून कपडे, दागिने देण्यात आले. औक्षणानंतर गागाभट्टांनी छत्रपतींच्या शिरावर मंत्रोच्चाराच्या गजरात विविध धातूंनी श्रुंगारलेले राजछत्र धरले. यावेळी गागाभट्टांनी घोषणा केली,

"शिवराय, शिवाजी शहाजी भोसले आज छत्रपती झाले!राजा शिवछत्रपती! क्षत्रियकुलवतंस महाराज सिंहासनाधीश्वर राजा शिवछत्रपती की जय! जय!! जय !!! " अशाप्रकारे गागाभट्टांनी विधिवत घोषणा केली. ऐकणारे तृप्त झाले. पाहणारे समाधान पावले. पंडित मोरोपंत प्रधान यांनी शिवरायांना थोड्याथोडक्या नव्हे तर तब्बल आठ हजार सुवर्ण नाण्यांनी हलकेच स्नान घातले. त्यानंतर उपस्थितांनी हुद्द्याप्रमाणे, अधिकाराप्रमाणे महाराजांना मुजरे करुन नजराणे पेश करायला सुरुवात केली. शिवरायांनीही प्रत्येकाला मानाप्रमाणे वस्त्रं, आभुषणे देऊन यथोचित मानसन्मान केला. त्यानंतर एका सजवलेल्या हत्तीवर शिवाजी महाराज बसले. मोठ्या उत्साहात, आनंदात, चैतन्यमयी वातावरणात शिवरायांची मिरवणूक निघाली.पुन्हा एकदा छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयजयकाराने आसमंत दुमदूमला. हत्तीच्या आजूबाजूला, मागेपुढे हजारो लोक निघाले. ठिक- ठिकाणी सवाष्ण स्त्रिया शिवरायांच्या दिशेने फुले,अक्षता फेकून मोठ्या भक्तीभावाने ओवाळत होत्या..…

मिरवणूक पुन्हा राजगडावर आली. महाराज महालात गेले. देवघरातील देवांना नमस्कार केला. त्यानंतर शिवराय आऊसाहेबांच्या महालात आले. माँसाहेबाना वाकून नमस्कार केला. शिवरायांनी आईसाहेबांनाही वस्त्रे दिली. माँसाहेब भारावल्या. नंतर जमलेल्या अतिथींना शिवाजी महाराजांनी निरोपाप्रित्यर्थ विडे देऊन सन्मानपूर्वक निरोप दिला. स्वराज्याच्या प्रत्येक शिलेदाराला महाराजांनी आठवणीने काही ना काही दिले. मदारी मेहतर या तरुणाने आग्रा मुक्कामी स्वतःचा जीव धोक्यात घालून शिवरायांची सुटका केली होती. त्याला द्यावे तरी काय या विचारात असताना खुद्द मदारी मेहतर पुढे आला आणि मुजरा करून म्हणाला,

"महाराज, मला काहीही नको. माझी एकच इच्छा आहे की, आपल्या सिंहासनावर चादर टाकण्याचे आणि सिंहासनाची निगा राखण्यासाठी माझी नेमणूक व्हावी."

भरलेल्या आवाजात शिवराय 'तथास्तु!' एवढेच म्हणाले.....

सारे स्वराज्य, रयत, पशूपक्षी, प्राणी आनंदाने म्हणत होते, 'छत्रपती शिवाजी महाराज की......जय !'

शिवाजी महाराजांना, रयतेला, पै पाहुण्यांना शिवराज्याभिषेकाचा आनंद मोजून अकरा-बारा दिवसच उपभोगता आला, साजरा करण्यात आला. बरोबर बाराव्या दिवशी एक महाभयंकर, अत्यंत दुःखदायक अशी घटना घडली. शिवराय मोहिमेत व्यस्त असोत, राज्यकारभारात व्यग्र असोत किंवा राज्याभिषेकाच्या गडबडीत असोत त्यांचे लक्ष माँसाहेबांकडे, त्यांच्या तब्येतीकडे लागलेले असायचे. राज्याभिषेक सोहळ्याची गडबड सुरू असताना शिवरायांनी हेरले की, माँसाहेबाची तब्येत पूर्वीसारखी राहिलेली नाही. त्या थकत चाललेल्या आहेत, खंगत चालल्या आहेत. राज्यभिषेकासाठी आलेल्या मंडळीला यथोचित निरोप दिल्यानंतर शिवरायांनी एक निर्णय घेतला. रायगडावरील वातावरण थंड. हवा गार. कदाचित ही गार हवा, थंडी माँसाहेबाना सहन होत नव्हती म्हणून शिवरायांनी पांचाड येथे एक वाडा बांधून माँसाहेबाच्या राहण्याची व्यवस्था त्या वाड्यात केली होती. राज्याभिषेक सोहळ्यासाठी जिजाऊंना गडावर आणण्यात आले होते. सोहळा संपला. माँसाहेबाच्या प्रकृतीची काळजी घ्यावी म्हणून आऊसाहेबांना पुन्हा वाड्यात नेण्याचा निर्णय शिवरायांनी घेतला. त्याप्रमाणे अत्यंत काळजीपूर्वक, हळूवारपणे जिजाऊंची पालखी पांचाडच्या वाड्यात आली. माँसाहेब अंथरुणावर टेकल्या त्या कायमच्याच. वैद्यांनीही जणू हात टेकले. जिजाऊ समाधानी होत्या, कृतकृत्य होत्या. जे स्वप्न पाहिले ते प्रत्यक्षात उतरले. अजून काय पाहिजे? स्वप्नपूर्तीचा आनंद, समाधान ती जाणीव काही वेगळीच असते. माँसाहेब निघाल्या, प्रसन्न मनाने निघाल्या. शहाजीराजांकडे निघाल्या. शहाजीराजे गेले त्याचवेळी खरेतर जिजाऊंचे मन या संसारातून उठले होते, विटले होते. शहाजी राजांचा मृत्यू त्यांचे सर्वस्व घेऊन गेला होता. आता जगायचे कशासाठी, कोणासाठी आणि का अशा भावनेतून त्यांनी सती जाण्याचा निर्णय घेतला होता परंतु शिवबाने घातलेल्या शपथेमुळे त्यांना निर्णय मागे घ्यावा लागला. परंतु यावेळी नाही. यावेळी कायमच्या निघालेल्या माँसाहेबांना कुणी थांबवू शकत नव्हते.... शिवरायसुद्धा! अखेर तो क्षण आला. ज्या क्षणाने केवळ शिवरायांना पोरके केले नाहीतर अवघ्या स्वराज्यावर असलेले मायेचे छत्र हिरावून नेले. १७ जून १६७४ ची मध्यरात्र, आऊसाहेबांनी शेवटचा श्वास घेतला. तशा भयाणरात्री शिवरायांनी फोडलेल्या 's s सा s हे s s...' या टाहोने स्वराज्य थरारले, स्वराज्यातील घराघरातून अश्रू पाझरू लागले...… हुंदके ऐकू येत होते.…

नागेश सू. शेवाळकर

इतर रसदार पर्याय

शेयर करा

NEW REALESED