स्वराज्यसूर्य शिवराय - 25 Nagesh S Shewalkar द्वारा फिक्शन कथा मराठी में पीडीएफ

Featured Books
श्रेणी
शेयर करा

स्वराज्यसूर्य शिवराय - 25

■■ स्वराज्यसूर्य शिवराय ■■ ** भाग पंचविसावा **

॥स्वातंत्र्यसूर्य मावळतीला गेला।। सातारा येथे असताना शिवराय आजारी पडले. अफवांचे पिक जोमात आले. कदाचित त्या अफवांमुळे नको ते घडले, ठिणगीची बीजे पेरल्या गेली. संभाजी राजे! शिवरायांचे चिरंजीव! संभाजी लहान असतानाच दुर्दैवाने त्यांच्या आईचा मृत्यू झाला. आईविना असलेले तान्हे पोर आजीच्या कुशीत शिरले. माँसाहेब त्या तान्हुल्याच्या आई बनल्या. मातेची उब देऊन त्यांनी संभाजीराजांना खेळवले,भरवल, खाऊ घातले, झोपवले. शिवरायांच्या पत्नी म्हणून आलेल्या इतर माता संभाजीराजांना होत्या पण त्या सावत्र आई होत्या. कुणी तसा भेदभाव करीत नसल्या तरीही सोयराबाईंची संभाजीसोबतची वागणूक तितकी आपलेपणाची नव्हती. त्यांना पुत्र झाला. राजाराम त्याचे नाव आणि सोयराबाईंचे संभाजीराजेंसोबतचे वागणे बदलले. अर्थात त्या उघडपणे काही कृत्य करत नसत. कदाचित शिवराय आणि जिजाऊ यांचा धाक, जरब असेल. जिथे प्रभू रामचंद्राला आपल्या सावत्र आईच्या वागण्यामुळे, हट्टामुळे वनवासात जावे लागले तिथे शिवरायांच्या संसारात तसे होणे ह्यात नवल ते कोणते. शिवाय सोयराबाईंचे कान भरणारांची संख्या का कमी होती? मराठी माणसांमध्ये भाऊबंदकी, सावत्रपणा ह्या गोष्टी पूर्वापार चालत आलेल्या आहेत. माँसाहेब गेल्या आणि संभाजीराजेंचा एक फार मोठा आधार गेला. शिवराय सातत्याने मोहिमेत गुंतलेले असत त्यामुळे ते संभाजीराजेंना पुरेसा वेळ देऊ शकत नसत. त्यामुळे सावत्र आईचे वागणे संभाजीला जास्तच खटकत होते. धुसफूस वाढत होती. मुळात संभाजीराजेंचा स्वभाव आक्रमक. शिवरायांच्या लक्षात ही गोष्ट आली. त्यांनी संभाजीराजेंना समजावले. एक-दोनवेळा रागावले. त्यामुळे संभाजीराजे काही प्रमाणात नाराज झाले. शिवराय दौऱ्यावर असताना, एका मोहिमेत गुंतलेले असताना संभाजीराजेंनी एक निर्णय घेतला. संभाजीराजे आपली पत्नी येसूबाई यांना घेऊन निघाले. ते सरळ श्रुंगारपुरास पोहोचले. चूक कोण,बरोबर कोण हा काथ्याकुट करण्यात अर्थ नाही . जे घडले ते अत्यंत वाईट घडले. शिवरायांच्या दृष्टीने अतिशय दुःखदायक होते. सोयराबाईंनीही संभाजीला अडवले नाही. कदाचित त्यांना तेच हवे असेल. सातारा येथील आजारातून शिवरायांची तब्येत नुकतीच सुधारत होती. परंतु शिवराय शरीराने काहीसे खंगले होते. त्यांना जास्त धावपळ, दगदग सोसवत नव्हती. तशातच संभाजीराजांचा तो निर्णय त्यांना जास्त चिंतेत टाकत होता. संभाजीराजे श्रुंगारपुरात गेल्यानंतर आठ-दहा महिन्यात एक घटना घडली. येसूबाईंना कन्यारत्न झाले. मुलीचे नाव भवानीबाई असे ठेवण्यात आले. तशात शिवरायांनी एक विचार केला. दुभंगलेले कुटुंब एकत्र यावे, संभाजीराजे काही दिवस पवित्र, धार्मिक वातावरणात, संतांच्या सान्निध्यात राहिले तर त्याच्या मनातील नकारात्मक विचार निघून जातील, सकारात्मक ऊर्जेचा संचार होईल या आशेने शिवरायांनी संभाजीराजेंना श्री समर्थ रामदास स्वामी यांच्या सेवेत पाठवण्याचा निर्णय घेतला. त्याप्रमाणे त्यांनी संभाजीराजेंना सज्जनगडावर राहायला जाण्याची सूचना केली. संभाजीराजेंची मूळ प्रकृती तशी धार्मिक नव्हती. तसे ते नास्तिक नसले तरी भजन, कीर्तन, जप-तप-व्रत, पोथीपुराण ह्यामध्ये ते फारसे रमायचे नाहीत. दैनंदिन धार्मिक सारे कार्य ते पार पाडायचे पण कशात गुंतून पडायचे नाहीत. त्यामुळे सज्जनगडावर ते रमले नाहीत. त्यांनी मनोमन ठरवले. आता नको सज्जनगड, नको रायगड. नको पुन्हा आबासाहेबांकडे कारण आपण त्यांच्या मर्जीच्या विरोधात सज्जनगड सोडले हे त्यांना आवडणार नाही. रायगडावर पुन्हा मातोश्री सोयराबाईंसोबत खटके उडणे नको. याविचाराने संभाजीराजेंनी बायको मुलीसह सज्जनगड सोडले. निघाले. स्वराज्याचे युवराज, शिवरायांचे पुत्र संभाजीराजे भोसले निघाले. ही बातमी रायगडावर शिवरायांना समजली. ते अत्यंत दुखावले परंतु वेळ दुःख करीत बसण्याची नव्हती. रुसलेल्या, रागावलेल्या मुलाची समजूत काढण्याची होती. त्यांनी दाही दिशांना हेर,ैन्य पिटाळले. संभाजीराजे जिथे असतील तिथून त्यांना माझा निरोप सांगून घेऊन या. ताबडतोब सैनिक सर्वत्र दौडत निघाले.परंतु संभाजीराजेंच्या घोड्याचा वेग सर्वात जास्त होता. संभाजीराजे कुणालाही सापडले नाहीत, दिसले नाहीत. पोहोचले. संभाजीराजे पोहोचले. कुठे? रायगडावर? शिवरायांकडे पोहोचले? नाही. शिवरायांचा रुसलेला सुत पोहोचला तो थेट शिवरायांच्या, स्वराज्याच्या परंपरागत शत्रूच्या छावणीत. औरंगजेबाचा सरदार दिलेरखानाच्या छावणीत.सज्जनगडावरुन निघाल्याबरोबर संभाजीराजांनी दिलेरखानाशी संधान साधले होते. दिलेरखानाकडे पत्र पाठवून त्यांनी मी आपल्या बादशहाच्या चाकरीत येत आहे असे कळविले. ते पत्र पाहून दिलेरखानास प्रचंड आनंद झाला. त्याला वाटले, संभाजीचे हे शरणागतीचे पत्र म्हणजे शिवरायांचे राज्य मोघलशाहीत आणण्याचा परवाना आहे. शिवाजीचा पराक्रमी, बहादूर पुत्र येऊन मिळतो आहे, याचा अर्थ शिवाजीचा सर्वनाश होण्याची वेळ आली आहे. आणि तो सर्वनाश आपल्या हातून या..या.. दिलेरखानाच्या हातून होतोय म्हणजे अजून काय पाहिजे? काहीही मागता तो अल्ला एवढे भरभरून दान आपल्या हाती टाकतोय हा तर परमोच्च आनंदाचा क्षण आहे.त्याने विनाविलंब आपले दूत संभाजीराजेंच्या स्वागतासाठी पाठवले. हे दोघे दूत संभाजीराजेंना मोरगावजवळ भेटले. संभाजीराजेंनी सोबत असलेली माणसे परत पाठवली आणि ते दिलेरखानाकडे निघाले. संभाजीराजे करकंबला येथे पोहोचले. तिथे दिलेरखान त्यांच्या स्वागतासाठी स्वतः आला होता. काही दिवसांपूर्वी एकमेकांच्या जीवावर उठलेले, एकमेकांच्या गळ्याचा घोट घेण्यासाठी टपलेले ते दोघे त्याक्षणी एकमेकांची गळाभेट घ्यायचा उत्सुक झाले होते. सारे काही विसरून दोस्त बनू पाहत होते. केवढी विटंबना होती ती एक युवराज, भविष्यातील छत्रपती, स्वराज्याचे सिंहासन लाथाडून शत्रूच्या आलिंगनात सुख मानत होता. संभाजीराजे-दिलेरखानाच्या मनोमिलनाची बातमी जशी शिवरायांना समजली तशीच ती औरंगजेबाला समजली. जिथे शिवरायांना प्रचंड दुःख झाले तिथे औरंगजेबाला त्यांच्या दुप्पट आनंद झाला. शिवरायांना, सिंहासनाला, स्वराज्याला फार फार दुःख झाले. फार मोठा आघात झाला होता. परंतु त्यांना त्या महादुःखातही एका गोष्टीचा आनंद होता की, संभाजीराजे दिलेरखानाकडे गेले असले तरी शिवरायांच्या सैन्यात बंडाळी माजली नाही.कदाचित दिलेरखान किंवा औरंगजेबाने स्वप्न पाहिल्याप्रमाणे शिवरायांचे बरेचसे सरदार, सैनिक दिलेरखानाकडे गेले नाहीत. तिकडे दिलेरखानाने एक चाल खेळली... स्वराज्याचा अलगद घास घेण्यासाठी त्याने संभाजीराजेंच्या खांद्यावर बंदूक ठेवून मावळे टिपण्याचा, त्याच दणकट हातांनी तोफांचे गोळे स्वराज्याच्या मजबूत किल्ल्यावर डागण्याचा डाव खेळला. किल्ले भूपालगड! स्वराज्यातील एक बळकट किल्ला! सातारा परिसरात असलेल्या या किल्ल्यावर किल्लेदार म्हणून फिरंगोजी नरसाळा हा सरदार काम पाहत होता.दिलेरखानाच्या रुपाने शत्रू गडाच्या पायथ्याशी आला. दिलेरखानाने गडाजवळ असलेल्या एका डोंगरावर तोफा चढवल्या. गटाची तटबंदी तोफांचे गोळे भेदू पाहात होते. गडावरुनही जोरदारपणे प्रतिकार सुरु झाला. किल्लेदार या नात्याने गडाची सारी जबाबदारी फिरंगोजीवर होती. कदाचित दिलेरखानाबरोबर संभाजीराजे आहेत ही गोष्ट फिरंगोजी आणि त्याच्या सहकाऱ्यांना माहिती नसावी. कारण ते लागोपाठ पंधरा दिवस झुंजत होते. शेवटी खानाच्या सैन्याच्या समोर संभाजीराजे आले. गडावर कल्लोळ माजला. 'अरे बापरे! खुद्द आपले धनी. संभाजीराजे समोर आले आहेत. प्रत्यक्ष मालकावर तलवार कशी चालवावी? ज्याची चाकरी करतो त्याच्यावरच भाला फेकायचा? स्वराज्याच्या युवराजांवर तोफ डागायची? शिवरायांना कळाले तर?' या विचारात फिरंगोजी आणि मावळे सापडले. शौर्य, पराक्रम, धैर्य सारे सारे संभाजीराजांपुढे हात जोडून उभे टाकले. किल्लेदार रात्रीच्या अंधारात रायगडावर निघून गेला. दिलेरखानाचा पराक्रम नाही परंतु डाव जिंकला, खेळी यशस्वी झाली. दुसऱ्या दिवशी सकाळी भूपालगडाचे दरवाजे उघडले. शत्रू सैनिक आत शिरले. गडावर प्रतिकार होण्याऐवजी स्वागत झाले. किल्लेदार नसलेल्या गडावरील सैन्याने संभाजीराजेंचे हात जोडून स्वागत केले. ती बातमी खुद्द फिरंगोजीने शिवरायांना ऐकवली. ऐकून शिवरायांना तीव्र दुःख झाले. दिलेरखान संभाजीराजांना घेऊन विजापूरवर चढाई करण्यासाठी निघाला. त्यावेळी आदिलशाहीचा मुख्य वजीर म्हणून सिद्दी मसूद हा काम पाहत होता. त्याला ती बातमी समजली.तो घाबरला. त्याने सरळ शिवरायांकडे मदतीची याचना केली. शिवाजी महाराजांनी तात्काळ होकार दिला. स्वतः शिवराय दिलेरचा बंदोबस्त करण्यासाठी निघाले. त्यांच्यासोबत दहा हजाराची फौज होती. दिलेरखान आणि शिवरायांच्या मावळ्यांमध्ये झालेल्या घनघोर युद्धात दिलेरखानाचे सैनिक त्रस्त झाले. हैराण झाले. शिवरायांच्या ताकदीपुढे आपला निभाव लागत नाही म्हणून दिलेरखानाने तिथून काढता पाय घेतला. तो फौजेसह तिकोट्याकडे निघून गेला. तिथे पोहोचताच दिलेरखानाचे मूळ रुप संभाजीराजांपुढे आले. तेथील गरीब, निष्पाप, भोळ्याभाबड्या जनतेवर भयंकर अत्याचार सुरू झाले. तो जुलूम, ती जबरदस्ती सहन झालेल्या बायका धडाधड विहिरीत जीव देऊ लागल्या. पडली ठिणगी पडली. संभाजी-दिलेर या अपवित्र दोस्तीमध्ये संघर्षाची ठिणगी पडली. मराठी रयतेवर होणारे अत्याचार पाहून संभाजीराजेंचे सुसंस्कृत मन कळवळले. स्वराज्यासाठी लढताना त्यांनी, त्यांच्या सैनिकांनी कधीही शत्रूच्या जनतेचा असा क्रुर छळ केला नव्हता. चिडलेल्या, संतापलेल्या संभाजीराजेंनी दिलेरखानास विनंती केली, " सारे थांबवा. या निष्पाप जनतेला असे सतावू नका...." ती विनंती ऐकून दिलेरखान चिडून म्हणाला,"मी या फौजेचा सर्वेसर्वा आहे. मी वाट्टेल ते करीन. मला शिकवणारे तुम्ही कोण?"खानाचा 'तुम्ही कोण?' हा प्रश्न संभाजीराजेंच्या डोक्यात एखाद्या तोफेच्या गोळ्याप्रमाणे घुसला. ते स्वतःशीच म्हणाले,'तुम्ही कोण? दिलेरखानाला अजूनही ओळख पटली नाही? हा प्रश्न दिलेरकडून गडावर हल्ला करताना समोर आलेल्या भूपालगडाच्या किल्लेदाराने.. फिरंगोजीने विचारला नाही. मी नसतो तर या दिलेरच्या हाती गड लागलाच नसता. तरीही हा विचारतो, तुम्ही कोण? ...' हा प्रश्न स्वतःलाच विचारणाऱ्या संभाजीराजेंना जाणीव झाली... मी शिवरायांचा पुत्र. स्वराज्याचा युवराज........ संभाजीराजे स्वप्नातून जागे व्हावे तसे वास्तवात परतले. त्यांना एकदम आठवण झाली...पित्याची! शिवरायांची! या वयातही, संभाजीराजांनी दिलेला धक्का विसरून शिवराय स्वराज्यासाठी भरपूर मेहनत करत होते.... शिवराय औरंगाबाद शहराजवळ असलेल्या जालना शहराजवळील मस्तगड किल्ल्याकडे निघाले. मस्तगड औरंगजेबाच्या ताब्यात होता. जालना शहराची श्रीमंत शहर अशी ख्याती होती.शिवरायांनी त्या शहरावर आक्रमण केले. फार मोठी संपत्ती शिवरायांना मिळाली. तितक्यात रणमस्तखान नावाच्या सरदाराने मावळ्यांवर हल्ला चढवला. परंतु शिवरायांच्या सैन्यापुढे त्याचे काही चालले नाही. मस्तखान शरण आला. परंतु पाठोपाठ सरदारखान आणि केसरसिंग हे चालून आले. ते सैन्य अधिक होते. आता काय करावे हा प्रश्न शिवरायांना पडलेला असताना बहिर्जी नाईक हा हेर त्यांच्या मदतीला धावून आला. तो म्हणाला,"महाराज, मी असताना आपणास चिंता करायची गरज नाही. मी त्या गनिमाला काहीही समजू देता तुम्हाला पट्टा किल्ल्यावर घेऊन जातो. मला साऱ्या वाटा, पळवाटा माहिती आहेत."त्याप्रमाणे पाठीमागे येणाऱ्या शत्रूला मागमूस लागू देता अकोला शहराजवळील पट्टा किल्ल्यावर बहिर्जीने शिवरायांना सुखरूप आणले. शिवरायांकडून सातत्याने होणाऱ्या पराभवाने चिडून औरंगजेबाने एक कपटी, क्रुर चाल खेळली. औरंगजेबाच्या डोक्यात नेहमी तिरके डाव शिजत असत. वास्तविक पाहता संभाजीसारखा हुकमी एक्का त्याच्या दरबारी होता. संभाजीराजेंकडून तो शिवशाही खिळखिळी करु शकला असता परंतु तसे करायचे सोडून त्याने 'संभाजीला पकडून आमच्याकडे पाठवून द्या.' असा आदेश पाठवला. परंतु त्याचे दुर्दैव नेहमीप्रमाणे आड आले. त्याने पाठवलेला निरोप संभाजीराजेंना समजला. त्यांना ताडकन जाग आली. त्यावेळी त्यांच्यासोबत असलेले त्यांचे मेहुणे महादजी निंबाळकर यांच्याशी त्यांनी बातचित केली. चर्चेनंतर एक मोठा निर्णय झाला. त्याप्रमाणे येसूबाईंनी पुरूषी वेश धारण केला आणि एका रात्री संभाजीराजेंनी दिलेरखानाची संगत सोडली. ते थेट आदिलशाही सरदार मसूद याचेकडे गेले. संभाजीराजेंसारखा मोहरा आपल्या हाती लागतोय हे पाहून मसुदच्या आनंदाला पारावार उरला नाही. त्याने मोठ्या हर्षोल्हासाने संभाजीराजेंचे स्वागत केले. ती बातमी दिलेरखानास समजली. त्याचा संताप अनावर झाला. त्याने आपल्या वकिलाला मसूदकडे पाठवून संभाजीराजेंना ताब्यात देण्याची विनंती केली. तितक्यात संभाजीराजांच्या पाळतीवर असलेल्या शिवरायांच्या हेरांनी संभाजीराजेंना गाठले. आपली माणसं, स्वराज्याची माणसं भेटलेली पाहून संभाजीराजांना अत्यंत हर्ष झाला. मनातील घालमेल संपली. निर्णय झाला. जायचे स्वराज्यात. परतायचे आपल्या माणसात. भेटायचे महाराज साहेबांना. शेवटी शिवरायांच्या माणसांसोबत संभाजीराजेंनी स्वराज्यात प्रवेश केला. त्यांनी तडक पन्हाळगड गाठला....... आला. आला. मालोजी भोसल्यांचा पणतु, शहाजीराजांचा नातु, माँसाहेबांचा लाडला, शिवरायांचा सुत परतून आला. सुखरुप परतला. शत्रूचे चक्रव्यूह भेदून आला. या बातमीने शिवरायांना खूप खूप आनंद झाला. निघाले. शिवराय स्वतः निघाले. आपल्या पुत्राला भेटायला. त्याचे सांत्वन करायला. त्याची चूक पदरात घ्यायला. त्याला कवटाळायला. शिवराय पन्हाळगडावर पोहोचले. संभाजीराजे सामोरे गेले. काय असतील पिता-पुत्रांच्या भावना? शिवरायांनी वाट चुकलेल्या मुलाची चूक पोटात घातली. समजावणीच्या सुरात म्हणाले,"पोरा, असे का केलेस? या वयात मला का दुखावले? अरे, तो औरंगजेब आपला कट्टर दुश्मन आहे. औरंगजेब कपटी आहे हे का तुला माहिती नाही? आग्रा भेटीत त्याने आपल्याशी कसा डाव खेळला हे तू अनुभवलेस ना? मग असा अविचार का केलास? आताही तो तुझ्यासोबत दगाफटका करणार होता. परंतु ईश्वराने तुला सुबुद्धी दिली आणि त्यानेच कृपा करून तुला सोडवून आणले. आपण असे करूया. हा आपसी तंटा सोडवू या. स्वराज्याचे दोन भाग करुया. कर्नाटक प्रांताची जबाबदारी तू घे. इकडचा भाग राजाराम बघेल. आम्ही आता थकलो आहोत. उरलेले आयुष्य भजनपूजन करण्यात घालवतो." परंतु संभाजीराजेंना स्वराज्याची विभागणी करणे पटले नाही. ते म्हणाले,"नाही. असे होणे नाही. आपल्या पायाची आण आहे. आपली सेवा करताना दूधभात खाऊन राहू."ते ऐकून शिवराय समाधान पावले. त्यांनी पन्हाळगडावर संभाजीराजेंची राहण्याची व्यवस्था केली.शिवराय पुन्हा रायगडावर परतले. त्यांनी विचार केला. लवकरच राजारामाची मौंज आणि लग्न करावे. त्यासाठी त्यांनी एक मुलगी निवडली. तिचे नाव जानक ! जानकी प्रतापराव गुजर ! स्वराज्यासाठी प्राणाची आहुती देणाऱ्या नीडर, बेडर, धाडसी, पराक्रमी मित्राची कन्या सून म्हणून स्वीकारली. राजारामांचे लग्न मोठ्या थाटामाटात झाले. त्यानंतर अवघ्या काही दिवसांनी शिवराय आजारी पडले. त्यांच्या अंगात ताप भरला. शिवराय अंथरुणावर पडले. ताप कमी होत नव्हता. वरचेवर वाढत होता. औषधोपचार सातत्याने चालू होते परंतु कशानेही फरक जाणवत नव्हता. शिवरायांचे वय तेव्हा फक्त पन्नास वर्षांचे! सारे आयुष्य धावपळ, मोहीम, लढाई यात गेले. शरीर थकले. कदाचित काही महिन्यांपासून घरात उफाळलेल्या वादामुळे मनही थकले....उजाडला. तो दिवस उजाडला. तो काळा दिवस उजाडला. तो दिवस उजाडलाच नसता तर...पण असे होणे नाही. त्यादिवशी स्वातंत्र्यसूर्य मावळतीला गेला. दिवस, तिथी ौकिकाला साजेशी! शनिवार! हनुमान जयंती! चैत्र शुद्ध पोर्णिमा! हनुमानाप्रमाणे उंच झेप घेणारा वीर निजधामी गेला. माँसाहेबांच्या पाठोपाठ....पाच-साडेपाच वर्षांच्या अंतराने शिवराय या जगाचा, स्वराज्याचा निरोप घेते झाले. रायगडासारखा मजबूत तटबंदीचा किल्ला दुःखात बुडाला. त्याला दुःख आवरेनासे झाले. स्वराज्य पोरके झाले. स्वराज्याचा स्वामी चालता बोलता निघून गेला.ऐन मध्यान्ही स्वराज्यसूर्य काळाच्या पडद्याआड गेला. पत्नी, पुत्र, स्नुषा, मित्र, नातेवाईक, रयत, आबालवृद्ध सारे सारे धाय मोकलून रडू लागले. सर्वांना शोक आवरता येत नव्हता. त्यांचे सर्वस्व हिरावल्या गेले होते. कुणाला कुंकू पुसल्याची जाणीव झाली. कुणाला पित्याचे छत्र हिरावल्याची जाणीव झाली. कुणाला अन्नदाता निघून गेल्याचे दुःख झाले. तर कुणाला एक हिंमतवान, पराक्रमी शत्रू उरला नसल्याची जाणीव झाली. समर्थ रामदास स्वामींना एक शिष्य हरवल्याचे दुःख झाले.शिवरायांचा, शिवशाहीचा कायम शत्रू असलेला औरंगजेब म्हणाला,"शिवाजी हा एक असा माणूस होता की, राज्य निर्माण करण्याची क्षमता त्याच्यात होती. माझे सेनानी वर्षानुवर्षे त्याच्याशी झुंजत असताना त्याचे राज्य मात्र वाढतच गेले. शरण आलेल्या शत्रूंच्या बायकांशी गैरहरकत करण्याचा त्याचा स्वभावच नव्हता." शिवरायांच्या दुःखद निधनामुळे अत्यंत शोकाकूल झालेले रामदास स्वामी म्हणाले, "निश्चयाचा महामेरू। बहुत जनांसी आधारू। अखंड स्थितीचा निर्धारू। श्रीमंतयोगी यशवंत कीर्तिवंत। सामर्थ्यवंत वरदवंत। पुण्यवंत जयवंत। जाणता राजा। कित्येक दुष्ट संहारिले।कित्येकास धाक सुटले। कित्येकांस धाक झाले। शिवकल्याण राजा ।।" ।। जय भवानी जय शिवाजी ।। ।। श्री शिवाजी महाराज की जय ।। © नागेश सू. शेवाळकर

______________________________________________________ ★★ संदर्भ ग्रंथ ★★ ) राजा शिवछत्रपती (भाग एक आणि दोन) लेखक:- श्री बाबासाहेब पुरंदरे. ) छत्रपती शिवाजी महाराजांच्या गोष्टी. लेखक :- श्री श्रीकांत गोवंडे ) शिवरायांच्या स्फूर्तिकथा . लेखक :- श्री शांताराम कर्णिक. ) शिवछत्रपती (इयत्ता चौथी) महाराष्ट्र राज्य पाठ्यपुस्तक निर्मिती अभ्यासक्रम संशोधन मंडळ, पुणे. ) जाणता राजा.(राजे शिवाजी छत्रपती महाराज चरित्र पीडीएफ फॉरमॅट)