" गुरुजी, आज काय लवकर शाळेत आलात?"
"होय ,आज आमच्या साहेबांची शाळेला भेट आहे, वार्षिक तपासणी आहे ," शाळेच्या शेजारी राहणाऱ्या दत्ता तात्यांनी देशमुख गुरुजीना प्रश्न विचारला.
दत्ता तात्या नेहमी शाळेच्या शिक्षकांवर नजर ठेवून असायचे. मोडक्या पान टपरी खाली आपल्या थोड्या पांढरया काळ्या मिशीला पीळ देत , आपली पांढरी विजार धुळी पासून सांभाळण्या साठी खांद्यावर टॉवेल घेऊन, येणाऱ्या-जाणाऱ्या हाक मारत ,आपल्या उतारवयात वेळ घालवण्याचा त्यांचा नेहमीचा छंद .
वाडीतील मुले असो वा तरुण पोरं सर्व त्यांना 'तात्या' म्हणूनच हाक मारायची. शाळेच्या कार्यक्रम असो अथवा गावातील सार्वजनिक कार्यक्रम तात्या हजर असत . त्यांचा चौकसपणा खूपच होता कुठलाही गावातील कार्यक्रम त्यांच्याशिवाय पार पडत नव्हता.
त्यादिवशी देशमुख गुरुजींची गाडी आज नेहमीपेक्षा अर्धा तास अगोदर कशी काय ? हा विचार त्याच्या डोक्यात होता. आज शाळेत साहेब येणार असं समजलं हे साहेब नेमकं तपासतात तरी काय ?असा प्रश्न तात्यांच्या डोक्यात पडला. याचा उलगडा आज करायचाच असा मनाशी हट्ट धरून त्यांनी तो पूर्ण करण्यासाठी आपली जागा बदलली व शाळे शेजारच्या राहणाऱ्या विज्या परबच्या दारातील आंब्याच्या झाडाखाली जाऊन ठाण मांडला. विज्याच घर व शाळा यांच्यामध्ये फक्त कंपाउंडची भिंत होती. त्यामुळे शाळेत काय काय चाललंय ते विज्याला चांगलं कळायचं. कुठलं मास्तर शिकवतात ,कुठलं शिकवत नाहीत याचा सगळा अंदाज विजय परबला होता. कधीकधी दुपारच्या सुट्टीतल्या गुरुजींच्या गप्पाही त्याच्या कानावर येत .आज तात्याला पाहून विज्याच्या बायकोने विचारले, "तात्यानु, आज काय इकडे येण कसं काय झालं?" "अगं आलो सहज एकाच ठिकाणी सारखे बसून काय डोक्यात ज्ञान वाढतय व्हय." असं म्हणत तात्याने आपल्या मनाचा प्रश्न काय फोडला नाही .तात्यानं विज्याच्या अंगणातील आंब्याच्या झाडाखालच्या कट्ट्यावर आपल्या खांद्यावरील टॉवेलने धूळ झटकली व आपला ठाव तिथे मांडला.
अकरा वाजले शाळेची प्रार्थना झाली. इतक्यात दोन-तीन मोटरसायकली त्यांना शाळेच्या आवारात येताना दिसल्या. मोटरसायकल वरची दोन-चार माणसं शाळेच्या आवारात शिरली .पोट पुढे वाढलेले, हातात एक डायरी घेतलेले,पिवळाजर्द शर्ट व काळी पँट असा इन शर्ट केलेले,डोक्यावरचे केस गेलेले -टक्कल पडलेले एक गृहस्थ व त्यांच्या पाठीमागून दोन-तीन इन शर्ट केलेले माणसं असा लवाजमा शाळेच्या ऑफिसाकडे जात होता. आता तात्याला खात्री पटली होती की पोट पुढे असलेले तेच दिपोटी म्हणजे शाळा तपासणीस असणार. आंब्याच्या झाडा पासून शाळेचे ऑफिस समोरच.ऑफिसमधील हालचाल स्पष्ट दिसत होती. डोकं खाली टेकून जरा आडवे पडत तात्यांने कान मात्र शाळेकडच ठेवलं होतं.शाळेच्या ऑफिसमधून तात्याना आवाज ऐकू आला. साहेबांचे स्वागत केले . देशमुख गुरुजींचा आवाज होता. ते मुलांस म्हणाले,"आज आपल्या शाळेला भेट देण्यासाठी साहेब आलेले आहेत. त्यांचं जोरदार
टाळ्यानी आपण स्वागत करूया. तात्यांना शाळेची तपासणी करण्यासाठी आलेल्या त्या दिपोटी सोबत आलेल्या साहेबांचा आवाज आता वर्गावर्गात ऐकू येऊ लागला . कोण कविता गाणी म्हणायला लावत होते तर कोण मुलांना आवडणारा धडा वाचायला होते. गाण्याच्या वेळी आनंदात गाणारी मुलं गणिताच्या प्रश्नाला चिडीचूप होत होती .असा खेळ चालूच होता. मुख्याध्यापक असलेले देशमुख गुरूजी आपल्या ऑफिसमधील साहेबांच्या कडून फायली तपासून घेत होते. दिपोटी फायलीच्या पूर्ण-अपूर्ण तेवर आवाज वर खाली होत होता . ते सर्व दत्ता तात्या आंब्याच्या झाडाखाली बसून ऐकत होता. इतक्यात विजा परब बाहेरुन आला आणि त्याने तात्याला विचारलं, "तात्यानु आज काय इकडे ? आज जागा बदलली वाटतं .
" होय विजू, आज जरा तुझ्याच अंगणात येऊन बसायचं ठरवलं."
"तात्यांनु ,चाय घेतली की नाय?"
"हो आताच घेतली,आज शाळेत साहेब तपासणी करायला आलेत. बघू नेमकं काय चाललय?" अस म्हणत आपल्या मनातील प्रश्न विज्या परबला सांगितला.आता विज्याचे डोळेही शाळेकडे लागले. वर्गावर्गातील हालचाल त्याना जाणवत होती.
दुपार होईपर्यंत शाळेच्या आवारातून मटण-रस्स्याचा सुगंध येत होता. "आज शाळेतून दररोज येणा-या डाळीच्या फोडणीपेक्षा वेगळा बेत गुरुजीनी आखलाय वाटत."तात्या ऑफिस कड नजर फिरवत म्हणाले.
"अरे विज्या ही तपासणी वार बघून करतात काय रे हे साहेब लोक?"
"अहो तात्या ,ही तपासणी दिवस म्हणजे यांचा रंगतदार दिवस असतो. त्यामूळे त्याना बुधवार आणि शुक्रवारच सापडतो."
"हां,असं गणित असत काय साहेबांच.तरीच त्याना दिपोटी का म्हणतात हे आता कळल बघ. "
"आता बघतोच या साहेबांच," अस मनात म्हणत तात्यांनआपला मोर्चा थेट शाळेत वळवला. तात्याना शाळेच्या आवारात बघून देशमुख गुरुजीनी त्याना ऑफीसातच बोलवल.
"हे या गावातील प्रतिष्ठित , लोकांच भल करणारा माणूस." अशी तात्यांची ओळख गुरुजीनी करुन दिली.
सगळे मटण खाऊन सुस्त झालेले दिपोटीकडे बघून तात्यांनी चांगलेच गरम झाले. "अहो ,तुम्ही साहेब मुलांच्या प्रगती तपासायला येताय की नुसतं या मांसाहारी खानावळी करताय? "असा थेट सवाल करत तात्यांनी प्रश्नाची सरबत्ती चालू केली. आता साहेबांचीच उलट तपासणी सुरु केल्याने साहेबांनी तेथून काढता पाय घेतला.त्यानी देशमुख गुरुजीना पुन्हा भेटू म्हणून आपापल्या मोटरसायकलीना कीक मारली व निघून गेले.