फुलाचा प्रयोग.. - 5 Sane Guruji द्वारा कथा मराठी में पीडीएफ

Featured Books
श्रेणी
शेयर करा

फुलाचा प्रयोग.. - 5

फुलाचा प्रयोग

पांडुरंग सदाशिव साने

५. समुद्रकाठच्या तुरुंगात

फुलाला राजधानीतील तुरुंगात ठेवणे धोक्याचे होते. केव्हा लोक बिथरतील त्याचा नेम काय? राजाने समुद्रकाठच्या एका दूरच्या तुरुंगात फुलाची रवानगी केली. फुलाची खोली एकान्त होती. त्या खोलीला एकच खिडकी होती. फुला उडी मारी व त्या खिडकीतून उचंबळणारा समुद्र बघे. समुद्राच्या लाटांवरचा फेस बघे. तुरुंगाच्या बागेतील फुले पाहून त्याला आनंद होई. आपल्याला बागेत पाठवतील का कामाला, येतील का फुलांना हात लावता? येतील का प्रयोग करता? असे त्याच्या मनात येई.परंतु त्याला खोलीतून बाहेर काढण्यात येत नसे. खोलीतच त्याचे स्नान, खोलीतच शौचमुखमार्जन. तेथेच भोजन तेथेच शयन. तेथेच चिंतन, तेथेच मनन. ती खोली म्हणजेच सारे काही.त्याला दोन मडकी देण्यात आली होती. फुलाने एका मडक्याची कुंडी केली. खिशातील एक कलम त्याने त्या कुंडीत लावले. एका शिपायाजवळून त्याने माती घेतली होती. त्या मडक्यात माती भरून त्यात तो प्रयोग करू लागला. निळया फुलावर सोनेरी छटा उठवण्याचा प्रयोग. मडयातील वेल वाढू लागला, कोवळी पाने फुटली, ती पाने पाहून फुलाला आनंद होई, त्या पानांकडे तो दिवसभर बघत बसे.समुद्राकाठच्या खिडकीतून एके दिवशी एक पक्षी खोलीत आला, कोठून आला तो पक्षी? निळा निळा पक्षी, त्या खोलीत येऊन तो पक्षी गाणे गाई, काही वेळ त्या खिडकीत बसून निळया समुद्राकडे पुन्हा उडून जाई. तो पक्षी आपल्या आत्याकडून का आला होता? आत्याचा निरोप घेऊन तो येतो की काय? असा विचार फुलाच्या मनात आला. आत्याची आठवण येऊन फुला सद्‍गदित झाला. तो पक्षी आला की फुला त्याच्याकडे प्रेमाने बघे. त्या पक्ष्यासाठी आपल्या भाकरीतील तुकडा तो ठेवी. पक्षी येताच तुकडा फेकी. पक्षी खाली येई व चोचीने तो तुकडा घेऊन पुन्हा खिडकीत बसे. पुढे-पुढे तर फुलाच्या हातातूनच तो पक्षी तुकडा घेई. पक्षी फुलाचा मित्र बनला.एके दिवशी जोडपे तेथे आले, नर व मादी दोघे आली. फुलाने दोघांना दोन तुकडे दिले. त्या जोडप्याने खोलीची पाहाणी केली, एके ठिकाणी घरटे बांधण्याचे त्यांनी ठरविले, दोघे गवत, पाला, काडया, चिंध्या आणू लागली. घरटयाचे काम सुरू झाले. नर व मादी दोघे खपत. मधून-मधून गोड-गोड गाणी गात. एकमेकांच्या चोचीत चोच घालीत, फुलाच्या डोक्यावरुन भुर्र करीत खोलीत फेर्‍या घालीत. घरटे तयार झाले. मादीने त्यात अंडी घातली. मादी घरटयात बसून राही. अंडयांना ऊब देई.

फुला समुद्रकाठच्या तुरूंगात गेल्यापासून कळी दु:खी झाली. कळीला वाटत होते की आता हा कैदी आपल्या तुरूंगात राहील, रोज त्याला भेटता येईल. त्याच्याजवळ बोलता येईल. लिहा-वाचायला शिकता येईल; परंतु तिची निराशा झाली. तिला वाईट वाटले. तिचा आनंद अस्तास गेला. ती ना खाई ना पिई. ती एकटी बसे. ती न हसे, न खेळे. ती फिक्कट दिसू लागली. ती अशक्त झाली. शेवटी ती अंथरुणाला खिळली.

‘कळये, तुला काय होते?’ पित्याने विचारले.‘मला सांगता येत नाही. काही तरी होत आहे खरे. मला काही सुचत नाही, काही रूचत नाही, मला कंटाळा आला आहे.’

‘कोठे जायचे बाळ?’‘बाबा, समुद्रकाठी घ्या ना बदली करून! किती दिवसांत मी समुद्र पहिला नाही. अगदी लहानपणी पाहिला होता. समुद्राच्या लाटात पुन्हा एकदा डुंबू दे. खेळू दे. वाळूत किल्ले बांधू दे. बाबा, नदीला समुद्राकडे जावेसे वाटते. तसे मला झाले आहे. उचंबळणारा समुद्र पाहून तुमच्या कळीचे मन उचंबळेल. मी सुंदर-सुंदर शिंपल्या गोळा करीन, सुंदर खडे गोळा करीन, घ्या ना बदली करून.’‘अर्ज करून बघतो; परंतु तू खात जा, पीत जा. कळये, तू दु:खी असलीस म्हणजे मला मग काही सुचत नाही. तू आनंदी राहा.’‘मी का मुद्दाम दु:खी असते बाबा? खोटे-खोटे हसू किती वेळ टिकणार? खोटे हसणे, खोटे रडणे म्हणजे अळवावरचे पाणी.’ढब्बूसाहेबाने कोठे तरी समुद्रकाठच्या तुरूंगावर बदली व्हावी, मुलगी आजारी आहे, तिला तेथे बरे वाटेल, असे लिहून अर्ज केला. अर्ज राजाकडे गेला. राजाने विचार केला, फुला प्रथम हयाच अधिकार्‍याच्या ताब्यात होता. फुला ज्या तुरुंगात आहे, त्याच तुरुंगावर हयाची बदली केली तर बरे होईल असे राजाला वाटले. शेवटी ढब्बूची बदली झाली. त्या समुद्रकाठच्या तुरुंगाचा अधिकारी म्हणून तो गेला. कळीही अर्थात तेथे गेली.ढब्बूसाहेब तुरूंगाची पाहाणी करीत होते. पाहाता-पाहाता फुलाच्या कोठडीजवळ ते आले. तेथे फुला होता. तो उभा होता. बागेतील फुलांकडे बघत होता.‘काय ठीक आहे ना? फाशीतून वाचलेत. आता नीट वागा, तुरूंगाची शिस्त पाळा. मी मोठा कडवा आहे. शिस्त पाळणार्‍याला मी चांगला आहे. शिस्तभंग करणार्‍याला मी वाईट आहे’. ढब्बुसाहेब म्हणाले.ढब्बूसाहेब निघून गेले. फुला पाहात होता. त्याला आनंद झाला होता. कळीही आली असेल. ती येईल, ती भेटेल, ती बोलेल, फुलाने खोलीत उडया मारल्या. खिडकीतून भरती आलेला समुद्र त्याने पाहिला. त्याच्याही मनात सुखकारक कल्पनांच्या लाटा उसळत होत्या. आनंदाला भरती आली होती.दुपारची एक- दोन वाजण्याची वेळ होती. ढब्बूसाहेबांची ती वामकुक्षीची वेळ. पिता निजला आहे असे पाहून कळी उठली. ती एकदम फुलासामोर येऊन उभी राहिली, दोघे हसली, आनंदली. तिने गजातून आपले हात आत घातले. त्याने ते धरले. तो तिच्या हातावर बोटाने लिहू लागला. काय लिहित होता? ‘समजले का काय लिहिले ते?’ त्याने विचारले.

‘हो.’ ती म्हणाली. ‘काय लिहिले ते सांग.’‘माझे तुझ्यावर प्रेम आहे, असे ना लिहिलेत?’ ‘नाही काही.’‘मग काय लिहिलेत?’ ‘तुला अद्याप वाचता येत नाही. तू वेडी आहेस.’‘मी तुमच्या डोळयांवरून वाचले. तुमच्या स्पर्शावरून वाचले. तुमची बोटे थरथरत होती, त्यांवरून वाचले. अक्षरे मला वाचता येत नाहीत; परंतु डोळे वाचता येतात. मी तुम्हाला आवडत नाही?‘आवडतेस.’‘आता मला वेडी नका ठेवू. मला शहाणी करा. मी पाटी घेऊन येत जाईन. मला धडा देत जा. मी भराभर शिकेन. म्हणजे तुम्हाला अधिक आवडेन. खरे ना?’ असे म्हणून कळी निघून गेली. दुसर्‍या दिवसापासून ती तुरूंगातील शाळा सुरू झाली. कळीचे जीवन फुलू लागले. फुला खतपाणी घालू लागला. कळी पाटी आणी. फुला गजांतून ती घेई. तिच्यावर तो अक्षरे लिही. तो तिला उजळणी सांगे. ती अक्षरे वाचायला सांगे. मग कळी खाली जाई. ती खोलीत बसे व गिरवी. धडा पाठ करून ठेवी.‘तुमचे नाव कसे लिहायचे ते मला शिकवा आज.’ ती म्हणाली.‘आधी स्वत:चे नाव लिहायला शीक.’‘माझ्या वस्तूंवर मी तुमचे नाव लिहिणार आहे. माझ्या रूमालावर, माझ्या उशीवर, माझ्या अंगातल्यावर.’‘मग त्या वस्तू माझ्या होतील.’‘मी तुमची आहे. म्हणून माझ्या वस्तूही तुमच्या नाहीत का? हसता काय? शिकवा ना तुमचे नाव. काय आहे तुमचे नाव?’‘कळी फुलली म्हणजे काय होते?’‘फूल.’‘त्या फुलाला हाक कशी मारशील?’‘फुला, अरे फुला, अशी.’‘हेच माझे नाव. दोनदा घेतलेस माझे नाव.’‘फुला का तुमचे नाव? किती छान नाव. सार्‍या जगाला ‘फुला’ असे सांगता वाटते? सर्वांना फुलवणारे, फुला असे सांगणारे. हया कळीला फुलवणारे. ‘फु’ कसा लिहायचा? सांगा ना.’ त्याने पाटीवर स्वत:चे नाव लिहून दिले; ‘फुला’ ‘फुला’ असे घोकित कळी निघून गेली.