फुलाचा प्रयोग
पांडुरंग सदाशिव साने
४. राजा आला, फुला वाचला
फुलाचा तो शेजारी गब्रू राजधानीत आला होता. फुलाला फाशीची शिक्षा झाल्याचे त्याला कळले. फुलाच्या अंगरख्याच्या खिशात ती कलमे आतील, ते प्रयोग असतील; परंतु कसा मिळावावयाचा तो अंगरखा? फुलाला त्याच्या कपडयांतच फाशी देतील का? सरकार स्वत:चे कपडे कशाला खर्च करील? फुलाच्या प्रेताची व्यवस्था कोण करणार? ते मांगच बहुधा ते काम करतील. त्या मांगाकडे जावे. फुलांचे कपडे त्यांनी द्यावे असे ठरवावे. गब्रूच्या मनात असे विचार आले. फाशी देणार्या मांगाच्या घरी तो गेला. मांगाच्या मांडीवर लहान मूल होते मांग त्या मुलाला खेळवीत होता. ‘तुम्हीच ना त्या कैद्याला उद्या फाशी देणार?’ गब्रूने विचारले.‘हो. काय काम आहे?’‘तुम्हाला एक विचारायचे आहे.’‘तुम्ही का फाशी जाणार्याचे नातलग?’‘हो.’‘मग?’‘त्यांना फाशी दिल्यावर ते प्रेत माझ्या ताब्यात द्या प्रेत न देता आले, तर निदान त्याच्या अंगावरील कपडे तरी द्या. तेवढी आठवण राहील. ते कपडे आम्ही घरात ठेवू. तेच पाहू. नाही म्हणू नका.‘प्रेत नाही देता येणार. कपडयाचे पाहीन. परंतु तुम्ही मला काय द्याल?’‘मी काय देणार?’‘काही तरी दिले पाहिजे. माझ्या हया मुलाबाळांना नको का सुख?’ ‘तुम्ही फाशी देता, तरी मुलांना खेळवता. तुम्ही कठोर नाही झालेत?’‘वाघीण का पिलांना चाटीत नाही? आणि फाशी देणे आमचा धंदा आहे. आम्ही क्रूर नाही. पटकन कसे फाशी द्यावे ते आम्हाला समजते. फाशीची शिक्षा झाल्यावर कोणी तरी फाशी देणारा हवा ना? हालहाल होऊ न देता पटकन फास बसेल असे करणारा नको का कोणी? फाशी जाणारा पटकन मरेल हयाची मी काळजी घेतो; परंतु फाशी दिल्यावर मला काय मिळते? तुरूंगाच्या अधिकार्यांना प्रत्येक फाशीच्या शिक्षेस हजर राहाण्याबद्दल वीस-वीस रुपये मिळतात, तर आम्हाला म्हणजे प्रत्यक्ष फास लावणार्यास दोन-दोनच रुपये! असो. काय देणार बोला.’
‘दहा रुपये देईन.’‘निघून जा. काम होणार नाही.’‘पन्नास देईन.’‘छट्.’‘शंभर घ्या.’‘पाचशे देता?’‘पाचशे?’‘हो.’‘तीनशे देतो! आता अधिक मागू नका.’‘परंतु पैसे आत्ता मोजा.’‘आत्ता?’‘हो.’‘मी रात्री आणून देतो.’एक लाख रूपये पुढे मिळतील ह्या आनंदात गब्रु होता. त्याने शहरातील एका सधन आप्ताकडून कर्ज काढले. रक्कम घेऊन तो रात्री मांगाकडे गेला. मांगाने पैसे मोजून घेतले.‘मात्र फसवू नका.’ गब्रु म्हणाला.‘मांग फसवीत नसतो.’‘सकाळी तेथे असेन.’‘ठीक.’‘गब्रु गेला. केव्हा उजाडते असे त्याला झाले. आज रात्र का मोठी झाली? आज सूर्य का कोठे पळाला? अजून कोंबडा का आरवत नाही? पाखरे का किलबिल करीत नाहीत? कधी संपणार रात्र? शेवटी एकदाचे उजाडले. आज उजाडताच फुलाला फाशी द्यावयाचे होते. लोकांच्या झुंडी बाहेर पडल्या. फाशी जाणार्याचे हाल पाहाण्यासाठी थवे जात होते. ‘देशद्रोह्याला शिक्षा, द्या फाशी,’ अशा गर्जना करीत लोक येत होते.
फुला शांतपणे प्रार्थना करीत होता. त्याच्या तोंडावर मंगल प्रसन्नता होती. त्याच्या कोठडीसमोर कळी येऊन उभी होती; परंतु त्याचे लक्ष नव्हते. एकदम बाहेर जयघोष झाले. गर्जना झाल्या. फुलाने खिडकीतून पाहिले. तो हसला. त्याने दाराकडे पाहिले, तो कळी रडत होती.‘रडू नका,’ तो म्हणाला.‘माझ्या बाबांना क्षमा करा.’ ती म्हणाली.‘माझ्या मनात कोणाविषयी राग नाही.’‘आता तुम्हाला नेतील.’‘घाबरू नका. वाईट वाटून घेऊ नका.’‘किती तुम्ही थोर! पृथ्वीवरचे तुम्ही देव.’इतक्यात ढब्बूसाहेब तेथे आले. सशस्त्र शिपाई आले. कोठडीचे दार उघडण्यात आले. दोर्या बांधून फुलाला त्यांनी नेले. कळी रडू लागली. ती आपल्या खोलीत गेली. ती देवाची प्रार्थना करीत होती. बाहेर लोक फाशीसाठी अधीर होते आणि गब्रु वधस्तंभाच्या जवळ गर्दीत उभा होता.जिकडे तिकडे कडेकोट बंदोबस्त होता. लोक आता अधीर झाले होते. इतक्यात फाशी जाणारा जीव त्यांच्या दृष्टीस पडला. लोकांनी टाळया वाजविल्या.‘फाशी जायचे आहे तरी हा दु:खी नाही.’‘बेरड आहे हा बेरड.’‘पक्का निगरगट्ट-’असे लोक म्हणत होते. फुलाला वधस्तंभाजवळ उभे करण्यात आले. अधिकारी उभे होते. मांग दोरी हातात घेऊन तयार होता. शेवटची खूण होण्याचा अवकाश. वधस्तंभावर सूर्याचे किरण पडले होते. सर्वत्रच आता प्रकाश पडला. सकाळचा कोवळा सोनेरी प्रकाश!परंतु हे काय? हा कसला गलबला? हटो, हटो, राजा आ गया. हटो; ठैरो, राजा आ गया. ठैरो.’ असे शब्द कानांवर आले. घोडेस्वार दौडत येत होते. त्यांनी आपले घोडे गर्दीत लोटले. टापांखाली कोणी तुडवले गेले. ‘हटो, ठैरो, राजा आ गया.’ सर्वत्र एकच घोष. एकाच आरोळी. ते घोडेस्वार वधस्तंभाजवळ गेले. ‘राजा येत आहे, थांबा.’ असा त्यांनी निरोप दिला. सर्व लोकांचे डोळे वधस्तंभाकडून आता राजाकडे वळले. कोठे आहे राजा, नवीन उदार राजा? तो पाहा आला. राजा आला.’ शुभ्र घोडयावर बसून वायुवेगाने राजा येत होता. ‘राजा चिरायू होवो! क्रांती चिरायू होवा!’ अशा गर्जना झाल्या.
वधस्तंभाजवळ जाऊन राजा उभा राहिला. राजाला पाहाताच सर्वांची हृदये उचंबळली. सूडबुध्दी मावळली. हृदये निराळे झाले. राजा बोलू लागला. सर्वत्र शांतता होती.‘माझ्या प्रिय प्रजाजनांनो, मी वेळेवर आलो. तुमच्या हातून पाप होऊ नये म्हणून देवाने मला वेळेवर आणले. प्रजेच्या पापाची जबाबदारी राजाच्या शिरावर असते. माझे दोन प्रधान गेले. त्यांची चौकशी केली गेली असती तर ते निर्दोष ठरते. माझे जणू दोन डोळे गेले. दोन हात गेले. कोणी तरी काही बातमी उठवतो. तुम्ही ती खरी मानता. असे चंचल व अधीर नका होऊ सत्यासत्याची निवड करायला शिका. विचारी प्रजेचा, संयमी प्रजेचा मला राजा होऊ दे. आपल्या देशाची जगात अपकिर्ती व्हावी असे तुम्हाला वाटते का? हया देशातील लोक वाटेल तेव्हा खवळतात, एखाद्याला विनाचौकशी हालहाल करून ठार करतात. हया देशात न्यायनीती नाही असे जगाने म्हणावे? आपल्या देशाला कमीपणा येईल असे कोणीही कधीही वर्तन करता कामा नये. देशाचा मान वाढवा, किर्ती वाढवा, गौरव वाढवा. तुमच्या देशाचे उदाहरण इतरांना होऊ दे. तुमच्या देशाकडे सारी दुनिया कौतुकाने बोट दाखवील असे वागा.‘हया अपराध्याला येथे उभे करण्यात आले आहे. पाहा, तो कसा शांतपणे उभा आहे! पाप असे उभे राहून शकत नही. हा मनुष्य अपराधी आहे का महात्मा आहे? आपण चौकशी करू. जे कागदपत्र ह्याच्या घरी सापडले. ते मी वाचीत आहे इतरही सारा पुरावा मी बघत आहे. जर हा मनुष्य अपराधी ठरला तर त्याला आपण शासन करू. सूड म्हणून नाही, न्यायासाठी म्हणून सूडबुध्दी माणसाला शोभत नाही. आपण माणुसकी वाढवू या. फाशीची शिक्षा रद्द करण्यात येत आहे. आरोपीला तुरुंगात घेऊन जा. पुढे चौकशी करू. आपण न्यायाने वागू या. मनुष्यधर्माला जागरूक राहू या. परमेश्वर सर्वांना सद्बुद्धी देवो.’राजाच्या भाषणाचा विलक्षण परिणाम झाला. ‘किती न्यायी राजा, खरा राजा, राजा चिरायू होवो! आपण माणसे होऊ या. खरेच सूड वाईट. देशाची किर्ती वाढवू या. उगीच मारले ते प्रधान; परंतु राजा आला. आता सारे ठीक होईल. तो मार्ग दाखवील. किती थोर मनाचा राजा. राजाचा जयजयकार असो!’ असे लोक म्हणू लागले.फुलाला पुन्हा तुरूंगात नेण्यात आले. लोक राजाची स्तुती करीत घरोघरी गेले. मांग घरी गेला. तो गब्रु मात्र त्या वधस्तंभाजवळ मेल्याप्रमाणे बसला होता.