Fulacha Prayog.. - 6 books and stories free download online pdf in Marathi

फुलाचा प्रयोग - 6

फुलाचा प्रयोग - 6

पांडुरंग सदाशिव साने

६. तुरुंगातील प्रयोग

त्या दिवशी उजाडत ढब्बूसाहेब फुलाच्या कोठडीजवळ एकदम आले. शिपायाने कोठडी उघडली. साहेब आत शिरले. ते खोलीत पाहू लागले. तेथे मडक्यात तो वेल वाढत होता. संशयी साहेब त्या वेलाकडे टक लावून पाहू लागले.‘हा कसला वेल? हा वेल वाढवून खिडकीतून खाली सोडायचा असेल. त्या दोराच्या साहाय्याने पळून जायचे असेल. होय ना? मोठे बिलंदर बोवा तुम्ही क्रान्तिकारक. कोठे काय कराल त्याचा नेम नाही. कोठून आणलेस हे मडके? कोठून आणलीस माती?’‘मडके मला मिळाले होते. माती मी मागितली. हा साधा फुलवेल आहे. हयाने मी कसा पळणार? खिडकीला भलेभक्कम गज आहेत. साहेब, काहीच्या काही शंका घेऊ नका. तुरूंगातील एवढा तरी माझा आनंद नाहीसा नका करु. हा वेल वाढविणे, त्याची पाने पाहाणे हयात माझा वेळ जातो.’‘तुरुंग का सुखासाठी असतात, आनंद देण्यासाठी असतात? तुम्हाला त्रास व्हावा, कंटाळा यावा हयासाठी तुरूंग असतात. ते काही नाही. शिपाई,? फोडा ते मडके, तोडा तो वेल. खबरदार कोणी माती वगैरे पुन्हा द्याल तर. हे क्रान्तिकारक मोठे पाताळयंत्री असतात. मोठे कारस्थानी. बघता काय? फोडा ते मडके.’‘नका फोडू. माझा सारा आनंद, माझा प्रयोग, नका नष्ट करू.‘प्रयोग? अरे लबाडा! पळण्याचा प्रयोग होय ना? फोडा, तुकडे करा त्या मडक्याचे. त्या वेलाचेही तुकडे करा.’शिपायांनी ते मडके फोडले. तो बेल कुस्करुन फेकून देण्यात आला. फुला कष्टाने ते सारे पाहात होता. साहेब अजून खोलीत पाहात होते. त्यांचे लक्ष एकदम वर गेले. तो तेथे पाखरांचे घरटे.‘पाखरांचे घरटे येथे कशाला? तुम्ही पक्षी पाळाल व त्यांच्याबरोबर निरोप पाठवाल. त्यांच्या गळयात चिठ्ठी बांधाल व धाडाल. हे नाही उपयोगी. शिपाई, पाडा, ते घरटे पाडा.’‘त्यात मादीने अंडी घातली आहेत. ती येईल व टाहो फोडील. नका पाडू ते घरटे. अंडयांतून चिव चिव करीत पिले बाहेर येतील. नका, नका फोडू ती अंडी. नका मारू उद्याचे आनंदी जीव.’‘शिपाई, बघता काय? ओढा काठीने ते घरटे.’ते घरटे पाडण्यात आले. ती सुंदर अंडी खाली पडून फुटली. फुलाला पाहावेना. त्यांने डोळे मिटून घेतले.‘पुन्हा तुझ्या खोलीत पक्षी दिसला किंवा घरटे दिसले तर अंधारकोठडीत तुला ठेवीन. याद राख-’ असे म्हणून ढब्बूसाहेब निघून गेले.

फुला खोलीत उदासीन होऊन बसला होता. त्याचा प्रयोग नष्ट झाला होता. पाखरांचे घरटे नष्ट झाले होते. ती अंडी नष्ट झाली होती. ते जोडपे, ते निळे-निळे पक्षी येतील, घरटे नाही असे पाहून त्यंना काय वाटेल? त्यांची अंडी नाहीत, मी मात्र जिवंत आहे, हे पाहून त्यांना काय वाटेल? नर मादी येथे असती तर त्यांनी अंडी वाचविण्यासाठी स्वत:चे प्राणही दिले असते. चोचींनी त्यांनी लढाई केली असती; परंतु मी? मी फक्त डोळे मिटून घेतले. त्या पाखरांना मी काय सांगू? ती पाखरे मला काय म्हणतील? आणि इतक्यात ती मादी खिडकीत आली, तो घरटे नाही. ती ची ची करू लागली. खोलीभर तिने फेर्‍या घातल्या. ची ची परंतु कोण उत्तर देणार? समुद्राकडे तोंड करून ती ची ची ओरडू लागली. ती का नराला हाक मारीत होती? तो पाहा नर आला. निळा-निळा नर. किती सुंदर दोघांनी टाहो फोडला. क्षणात खोलीकडे तोंडे करून ओरडत, क्षणात समुद्राकडे तोंडे करून ओरडत. फुलाच्या डोक्यावरुन त्यांनी घिरटया घातल्या, परंतु त्याला त्यांनी चोच मारली नाही. आपल्याला प्रेमाने भाकरी देणारा असे करणार नाही, असा त्यांना विश्वास होता.ची ची करीत नर व मादी बसली होती. समुद्र गर्जना करीत होता. ‘शेवटी मरण, मरण, सर्वांना मरण,’ असे का त्या लाटा किनार्‍यावर आदळून सांगत होत्या? ओहोटी-भरती, जगणे-मरणे असाच हा संसार आहे असे का समुद्र सांगत होता? मरावयाचे असले म्हणून का जन्मलो नाही तो मरावे? जीवनाचा अनुभव घेऊन मग मरण आले तर त्याचे दु:ख नाही; परंतु असे अकाली मरण, अंडयातच मरण दु:खदायी आहे.फुलाची भाकरी आली. ती पाखरे तेथेच होती. त्याने त्यांना आधी तुकडा दिला, परंतु ती घेत ना. त्यांनी तोंडे फिरविली. ची ची करीत ते जोडपे उडून गेले. फुलालाही त्या दिवशी जेवण गेले नाही. तो तसाच न खाता पाणी पिऊन खोलीत खाली मान घालून बसला होता.दुपारची वेळ झाली. हातात पाटी घेऊन कळी आली हळुहळू फुलू पाहाणारी कळी आली. ते पाहा तिच्या तोंडावर शतरंग पसरत आहेत, परंतु रंग आले व गेले. फुलाची खाली झालेली मान पाहून कळी दु:खी झाली.‘काय झाले आज?’ तिने विचारले.‘माझा वेल कुस्करण्यात आला. खोलीतील पक्ष्यांचे घरटे पाडण्यात आले. अंडी फुटली. पाखरे ची ची करीत बसली. तुकडा न घेता निघून गेली. कळे, कसा मी हसू? हया लहानशा खोलीतील एवढासाही आनंद देवाला बघवला नाही का?’‘ज्या पुस्तकाने तुम्हाला मरणासही हसत-हसत मिठी मारायला शिकविले, त्या पुस्तकाने निराशेत, दु:खात शांत ठेवायला नाही का शिकविले? रडू नका तुमचा अपराध नाही. पाखरे पुन्हा आली तर पुन्हा त्यांना प्रेम द्या.’‘पुन्हा कशाला प्रेम देऊ? पुन्हा येथे ती घरटे बांधतील, अंडी घालतील. पुन्हा घर पाडण्यात येईल, अंडी फोडण्यात येतील. नको. त्या पाखरांना आता मी प्रेम देणार नाही. ती आली तर त्यांना घालवीन. मलाच येथे एकटयाला मरू दे. त्यांच्या अंडयांना का मरण?’

तुम्ही मला सांगाल का वेल कसा लावायचा? कंद कोणता घ्यायचा? काय प्रयोग करायचे? तुमच्या सांगण्याप्रमाणे मी सारे करीन. त्या बगीच्यात लावीन. येथून तुम्हाला बघता येईल अशा ठिकाणी लावीन. सांगता मला काम?तुमचे जीवनातील काम मला सांगा. तुमच्या प्रयोगात मला रमू दे. तुमाचा प्रयोग यशस्वी होऊ दे.’‘कर माझे काम. माझ्या प्रयोगात भाग घे. हा घे तुकडा. हा तुकडा लाव. नीट खोल खणून लाव. मी सांगेन त्याप्रमाणे खत घाल, पाणी घाल.’ तो म्हणाला.‘तुमचे ते पुस्तक मी वाचायला शिकल्ये. मला समजते त्यातले.’‘तुझे विचार वाढलेले होते. कल्पनाशक्ती वाढलेली होती. फक्त अक्षरांच्या खुणा समजायचा अवकाश होता. वाच. इतरही पुस्तके वाच.’‘मला चांगल्या पुस्तकांची नावे सांगा. ती पुस्तके मी मागून घेईन. देता पाटीवर लिहून?’‘हो. देतो.’त्याने पाटीवर चांगल्या पुस्तकांची यादी दिली. कळी निघाली. त्या फुलाच्या प्रयोगाचा तो तुकडा घेऊन निघाली. तिसरे प्रहरी ती बगीच्यात गेली. तिने खालून वर पाहिले. फुला कोठडीच्या गजांजवळ उभा होता. तिने खणले. त्यात तो तुकडा तिने लावला. तिने वर पाहिले. दोघांची दृष्टी मिळाली. ती दृष्टी नव्हती. अनंत अशा मनातील सृष्टीचा जणू तो दरवाजा होता. त्या दृष्टीने मनातील सृष्टी दिसे.कळी रोज त्या लावलेल्या वेलाची बातमी सांगे नंतर वाची. काही वेळ गप्पा- गोष्टींत जाई. दोघे एकमेकांचे हात क्षणभर हातात घेत. ‘हे गज कधी दूर होतील? ही बंधने कधी तुटतील?’ ती म्हणे. ‘एक दिवस तुटतील. ती तुटोत वा न तुटोत. आपली मने अभंग जोडली गेली आहेत. खरे ना?’‘आपण कोण कुठले?’ ढब्बूसाहेबांनी विचारले.‘मी मुशाफिर आहे, मी एकटा आहे. घरी पाच लाखांची जहागीर आहे. मी जगात कोठे काय चांगले आहे ते पाहात हिंडत आहे. हा समुद्राकिनारा फार सुंदर आहे असे ऐकले म्हणून येथे आलो.’ ‘हो’.एके दिवशी ढब्बूसाहेबांना भेटायला एक प्रवासी आला. त्याचा श्रीमंती पोषाख होता. बोटांतून अंगठया होत्या. मनगटावर सोन्याचे घडयाळ होते.

‘आपण लग्न वगैरे नाही केले?’ ‘अजून नाही.’‘करायचे नाही का?’‘तसे ठरलेले काही नाही.’‘सृष्टीतील सुंदर वस्तू बघता बघता अनुरूप पत्नीही मिळायची!’‘योगायोगाच्या त्या गोष्टी असतात.’‘तुम्ही कोठे उतरला आहात?’‘एका खाणावळीत.’‘आमच्याकडे या ना! समुद्रावर फिरा. तुरूंगातील बागेत हिंडा. तुमच्यासारख्या सौदंर्यशोधकाची व्यवस्था लावणे म्हणजे पुण्य आहे.’‘येईन तुमच्याकडे राहायला. तसे मला परके असे कोठेच वाटत नही. मी घरातून बाहेर पडलो तो जगाचा मित्र होण्यासाठी.’‘तुम्ही एकदम माझ्या विनंतीस मान दिलात हयाबद्दल मी आभारी आहे. शिपाई तुमचे सामान आणतील. चला घरी.’पहुणा घरच्यासारखा झाला. तो शिपायांना चिरीमिरी देई. सारे त्याच्यावर खूष असत. त्याला तुरुंगात सर्वत्र हिंडण्या-फिरण्याची मुभा होती. एके दिवशी तो बगीच्यात हिंडता-हिंडता कळीने लावलेल्या झाडाजवळ आला. ती पाने त्याने ओळखली. हाच तो प्रयोग असे त्याने जाणले.पाहुणा त्या पानांकडे बघत होता व त्या पाहुण्याकडे गजांतून फुला पाहात होता. इतक्यात कळी तेथे आली.‘काय पाहाता इतके टवकारून!’ तिने विचारले.‘कळये, हा मनुष्य कोण?’‘तो घरचा पाहुणा झाला आहे. म्हणतो, मी मोठा श्रीमंत जहागीरदार आहे. बाबांना त्यानं भूल घातली आहे. सार्‍या शिपायांजवळ गोड बोलतो. त्याला वाटेल तेथे फिरण्याची सदर परवानगी आहे.’कळये, तो गृहस्थ आपल्याच झाडाशी बराच वेळ उभा आहे. मला भीती वाटते. हया माणसाचा संशय येतो. कदाचित त्या फुलझाडाला तो उपटून नेईल किंवा त्याचा नाश करील. तू असे कर, उद्या हळूच ते झाड खणून काढ. मुळांना धक्का नको लावू. नंतर तू ते झाड स्वत:च्या खेलीत एका मोठया कुंडीत लाव. खोलीला कुलूप लावून ठेव.’

‘बरे. तुम्ही सांगता तसे मी उद्या करीन.’दुसर्‍या दिवशी कळी उजाडत बागेत गेली. हलक्या हातांनी ती खणीत होती; परंतु चुकून घाव मुळावर पडला. ती कोवळी मुळे तुटली, झाड मेले. ते कसे जगणार? ती रडू लागली. तिने वर पाहिले. ते डोळे तिच्याकडे बघत होते. ‘रडू नको’ अशी त्याने खूण केली.तो मुशाफिर हिंडत तेथे आला, तो ते झाड नाही. आपल्यावर कोणाची तरी पाळत आहे अशी त्याला शंका आली. त्याने वर पाहिले, तो गजांतून फुला क्रोधाने त्याच्याकडे बघत होता. फुलाला पाहाताच पाहुणा काळवंडला. तो एकदम बगीच्यातून निघून गेला.कळीच्या हालचालींवर तो पाहुणा पाळत ठेवू लागला. दुपारी कळी फुलाच्या खोलीकडे चालली. पाठोपाठ हळूच तो पाहुणा गेला. तो जिन्यात लपून त्यांचे बोलणे ऐकत होता.‘मुळे तुटली. मला किती वाईट वाटले-’ कळी सांगत होती. ‘जाऊ दे. आता शेवटचा प्रयोग करू. हा तिसरा तुकडा घे. हा शेवटचा तुकडा. तुझ्या खोलीतच एका मोठया कुंडीत हा लाव. खिडक्यांना मी सांगेन त्या रंगाचे पडदे लाव. तसा-तसा प्रकाश झाडाला मिळू दे. झाड कसे-कसे वाढते, कधी खत घातले, प्रकाश-किरण कसे-कसे दिले, ते सारे रोजनिशीत लिहित जा. मी तुरूंगात असलो तरी ज्ञान जगाला कळू दे. ती रोजनिशी तू मग प्रसिध्द कर, अर्थात जर प्रयोग यशस्वी झाला तर, निळया रंगावर सोनेरी छटा उमटल्या तर आणि कळये, खोली कधी-कधी उघडी टाकू नकोस. कुलूप लावून बाहेर जात जा प्रयोग कस-कसा होत आहे ते मला सांगत जा! समजलीस ना?‘हो. तुमच्यासाठी सारे करीन. तुमचा आनंद तो माझा.’ती निघाली. तो पाहुणा पटकन् निघून गेला. कळीने सांगितल्याप्रमाणे सारे केले. तिने कुंडीत तो तुकडा लावला. एका मोठया घडवंचीवर ती कुंडी तिने ठेवली. खिडक्यांना तांबडे, हिरवे, निळे असे पडदे करण्यात आले. निरनिराळया वेळी निरनिराळया रंगाचा प्रकाश खोलीत पडे. खोलीला तिने एक भक्कम कुलूप केले. बाहेर जाताना ते ती लावी.त्या पाहुण्याने त्यांचे सारे बोलणे ऐकले होते, त्याने एके दिवशी त्या कुलपाच्या तोंडाचा मेणावर ठसा घेतला. त्या तोंडाच्या आकाराची किल्ली त्याने घडवून घेतली. ती किल्ली त्या कुलपाला लागेल की नाही ते त्याने पाहिले. किल्ली लागली. कुलूप उघडले. आतील कुंडी पाहुण्याने पाहिली. ‘फुलू दे ते फूल. ते पळविल्याशिवाय मी राहाणार नाही. ते लाखाचे बक्षीस मी उपटीन. हा गब्रू मग गबर होईल. माझी किर्ती जगभर जाईल. हा बसेल येथे तुरुंगात रडत.’ असे पाहुणा म्हणला. तो पाहुणा म्हणला का तो गब्रू? हो. अजून नाही का तुमच्या ध्यानात आले?

कळी रोज त्या फुलझाडाची सारी हकिगत सांगे. नवीन पान फुटले, नवीन धुमारा आला, सारे सांगे. ती हकीगत ऐकून फुलाला अतोनात आनंद होई. एके दिवशी कळी म्हणाली, ‘एक लहानशी कळी आली आहे!’‘कळी आली? छान. कळीच्या हाताचा गुण. कळीनं कळी आणली. आता ती फुलेल. तिच्या पाकळयांवर सोनेरी छटा दिसतील. प्रयोग यशस्वी होईल.’ फुला नाचत म्हणाला.त्या दिवशी कळी मोठया उत्सुकतेने भेटण्यास आली होती. झाडावरची कळी अर्धवट फुलली होती. सोनेरी छटा दिसत होत्या. केव्हा एकदा ही बातमी देऊ असे तिला झाले होते. ‘कळये, तुझे तोंड आज फुलले आहे.’ फुला म्हणाला.‘कारण कुंडीतील कळी फुलणार आहे, आज रात्री ती फुलेल. पूर्णपणे फुलेले. आत अर्धवट फुलली आहे. सोनेरी छटा दिसत आहेत. निळया ढगांवर सोनेरी किरण तशी ती कळी दिसत आहे.’‘छान छान. माझा प्रयोग यशस्वी झाला. कळये, किती तू चांगली; किती हुशार. आता असं कर. ती कुंडी घोडयाच्या गाडीत घाल व घेऊन जा. त्या प्रदर्शनाच्या ठिकाणी ने. ती तारीख जवळच आहे; हे फूल फुलंलं तरी दोन महिने कोमेजणार नाही. तू आपली रोजनिशी बरोबर ने. शास्त्रज्ञ विचारतील त्यांच्या हातात रोजनिशी दे.‘परंतु बाबा कसे जाऊ देतील?’‘त्यांना विचारू नकोस. माझ्याकडे येत होतीस ती का त्यांना विचारून? तू पाप थोडेच करीत आहेस?‘बरे मी जाईन.’‘परंतु कुंडी नेण्यापूर्वी मला दाखवशील का?’‘दाखवीन. शिपाई माझे ऐकतील. रात्री बारानंतर घेऊन येईन. देईन कोणाच्या डोक्यावर. रात्री आणीन हो. जाते मी.’तो पाहुणा सारे ऐकत होता. ‘आज रात्री फुलणार का?’ ठीक.’ असे म्हणत तो पटकन निघून गेला.मध्यरात्र झाली. गस्तवाले गस्त घालीत होते. बाराचे ठोके पडले. ‘ऑल बेल बराबर है.’ अशा आरोळया तुरुंगाच्या सर्व भागांतून झाल्या. ढब्बूसाहेब झोपले होते; परंतु कळी उठली. तिने दोन शिपाई व दोन वॉर्डर बरोबर घेतले. तिने खोली उघडली. त्या दोन वॉर्डरांनी ती कुंडी धरली. शिपायांच्या हातात कंदील होते. फुला दारात उभा होता. ती कुंडी गजांबाहेर ठेवण्यात आली. सुंदर फूल फुलले होते. कृष्णवर्ण पाकळयांवर सोनेरी छटा फुला पाहात राहिला. त्याने बाहेर हात लांबविले. त्या फुलाला त्याची बोटे लागली. ते फूल नाचू लागले. ते वारा आला म्हणून नाचले. का त्या बोटांतील भावनामय स्पर्शाने नाचले?

पुरे आता.’ शिपाई म्हणाले.वॉर्डरांनी कुंडी नेली. शिपाई गेले. कळीही निघून गेली. ती झोपली. पहाटे उठून ती जाणार होती. चार घोडयांची गाडी तिने ठरविली होती.परंतु पाहुणा आधी उठला. त्याने किल्ली कुलपाला लावली. त्याने द्रव्याने वश केलेल्या शिपायांकडून ती कुंडी बाहेर नेवविली. तेथे त्यानेही गाडी तयार ठेवली होती. कुंडी गाडीत ठेवण्यात आली. गाडी भरधाव निघाली. दूर गेली.पहाट झाली. कळी उठली, ती खोलीत गेली. तो कुंडी नाही! ती खांबासारखी उभी राहिली. घेरी येईल असे तिला वाटले. तिच्या डोळयांसमोर एकदम तो पाहुणा आला. तिने पाहुण्याचा तपास केला, परंतु तपास लागेना. त्या पाहुण्यानेच कुंडी लांबविली हयात संशय नाही असे तिला वाटले. ती भीतभीत फुलाकडे गेली. तिने फुलाला हाक मारली. तिने त्याला सारी हकीगत सांगितली.‘आता ताबडतोब जा. तुझी रोजनिशी घेऊन जा. तुझे म्हणणे तेथे सांग. हे फूल मी फुलविले असे स्पष्टपणे बोल. जा. थांबू नकोस. सत्याला यश येईल.’ तो म्हणाला.ती गेली. तिची ती ठरलेली गाडी बाहेर उभी होती. तीत बसून ती गेली. पाहुण्याच्या पाठोपाठ तीही निघाली. सकाळी ढब्बूसाहेब उठले; परंतु कळी कोठे दिसेना. तिचे अंथरुण रिकामे होते. कोठे आहे कळी? त्यांनी सर्वत्र पाहिले, सर्वत्र शोधले, परंतु कळीचा पत्ता नाही आणि ते श्रीमंत पाहुणे? त्यांचाही पत्ता नाही. तो श्रीमंत पाहुणा आपला पुढे-मागे जावई व्हावा असे ढब्बूसाहेबांस वाटत होते. म्हणून त्यांनी त्याला घरी ठेवून घेतले, त्याचा मान-सन्मान ठेवला; परंतु तो पाहुणा का कळीला घेऊन पळून गेला? पित्याला न सांगता? लफंगा पाहुणा; परंतु त्याने कळीला पळविले, का कळी त्याच्याबरोबर आपण होऊन गेली? ती अलिकडे शिकत होती. लिहीत असे, वाचीत असे. त्या कैद्याकडे म्हणे शिकायला जाई. त्या कैद्याने तर नाही काही कारस्थान केले? हे क्रांतिकारक मोठे पाताळयंत्री. कोणाला फितवतील, आपल्या जाळयात घेतील त्याचा नेम नाही.

ढब्बूची एकुलती एक मुलगी. ती घरातून गेली. हे पाहून तो निराश झाला. तो संतापला, चिडला. धावत धावत त्या फुलाच्या कोठडीकडे तो गेला. शिपाई बरोबर होता. खोली खोलण्यात आली. संतापलेला ढब्बूसाहेब फुलाला शिव्या देऊ लागला.’ बदमाष, कोठे गेली माझी मुलगी? बोल. हरामखोर, काय केलास जादूटोणा? बोलं.’ साहेब फुलाला मारू लागला. फुलाही संतापला. त्याच्या मनातील सारे साठलेले जागे झाले. तो एकदम ढब्बूवर घसरला. त्याने ढब्बूस खाली पाडले. फुला त्याच्या छातीवर बसला. हत्ततीवर सिंहाचा छावा तसे ते दृश्य दिसत होते. फुला त्या ढब्बूच्या थोबाडीत दोहोकडून देत होता.शिपायाने शिटी वाजविली. जिकडे-तिकडे शिटया झाल्या. धोक्याची घंटा घणघण वाजू लागली. सारे शिपाई वॉर्डर दंडुके घेऊन धावत आले. फुलाला ओढण्यात आले. साहेब उठले. ते थरथरत होते. शिपायांनी फुलाला दंडे मारले.‘हरामखोर! अधिकार्‍यांवर हात टाकतोस? थांब. हयाला जडांतील जड अशी दंडा-बेडी घाला. मागे मरणातून वाचलास. आता वाचणार नाहीस. अधिकार्‍यावर हात टाकाणार्‍यास तोफेच्या तोंडी देण्यात येते. तयार राहा मरणाला. आजच्या आज वर कळवतो. घाला, बेडया घाला हरामखोराला.’ असे म्हणत ढब्बूसाहेब खाली गेले.फुलाला दंडा-बेडी घालण्यात आली. मला तोफेच्या तोंडी देणार? देऊ देत. माझा प्रयोग यशस्वी झाला आहे. आता मरण आले तरी काय हरकत? परंतु मरणापूर्वी कळी भेटेल का? माझी कळी मला दिसेल का? फुलराणी किती गोड, किती शहाणी?

इतर रसदार पर्याय

शेयर करा

NEW REALESED