Pathlag - 4 books and stories free download online pdf in Marathi

पाठलाग – (भाग- ४)

दिपक आपल्या कोठडीत परतला खरा, पण तो विचार त्याच्या डोक्यातून काही केल्या जात नव्हता.
काय आहे ६ दिवसांनी? कोण आहे तो कैदी? तो आपल्याला का मदत करत आहे? ह्यात काही काळ-बेर तर नसेल ना? कश्यावरून हा पोलिसांचाच एखादा डाव नसेल? कश्यावरून मला इथून पळून जायला भाग पाडतील आणि मग पळून जात होता म्हणून जाताना गोळ्या घालतील? चार दिवसांच्या ओळखीवर ह्या कैद्यावर भरवसा ठेवावा का?

अनेक प्रश्न दिपकच्या डोक्यात जमा झाले होते. पण त्यामुळे निदान त्याला काही काळापुरता का होईना जुन्या दुःखद गोष्टींचा विसर पडला होता. सुस्त झालेला त्याचा मेंदु विचार करु लागला होता आणि नकळतच ‘ह्या कैद्याच्या साथीने इथुन पळुन जाता आले तर?..’ असा विचार डोक्यात येऊ लागला होता.

दिपक उठुन खोलीत येरझार्‍या घालु लागला. दिपकमधला हरवत चाललेला सैनिक जागा झाला होता. पुर्वी तासासारखे वाटणारे मिनीट अचानक सेकंदाहुनही कमी वाटु लागले होते. वेळ कसा भराभर निघुन चालला होता. ह्या काळात दिपक जेलच्या अंतरंगाचा विचार करत होता परंतु अधीक विचार करता त्याच्या लक्षात येउ लागले की त्याने फारसे आजुबाजुला पाहीलेच नव्हते. जेल किती मोठ्ठ आहे, सेक्युरीटी किती आहे? लुप-होल्स काय आहेत.. काही म्हणजे काहीच माहीती नव्हते.

दिपकला स्वतःचाच अतीशय राग आला.

पुढचे दोन दिवस पट्कन गेले. दिवस रात्र केवळ एकच विचार दिपकच्या डोक्यात घोळत होता…

तिन दिवसांनी दिपक बाहेर आला तेंव्हा व्हरांड्याच्या दुसर्‍या कोपर्‍यात कैद्यांची रांग लागलेली होती. दिपकची नजर ‘त्या’ कैद्याला शोधत होती. त्याच्या कोठडीबाहेरील खांबाला टेकुन ‘तो’ उभा होता. दिपकला पहाताच तो दिपकच्या दिशेने चालत आला. दिपककडे बघुन त्याने एक सुचक खुण केली आणि तो कैद्यांच्या त्या रांगेच्या दिशेने जाऊ लागला.

दिपकसुध्दा काहीही न बोलता त्याच्या मागोमाग गेला.

दोघंही रांगेत जाऊन थांबले. रांगेच्या शेवटी एक पोलिस टेबल टाकुन बसला होता. प्रत्येक कैदी टेबलावरील कागदावर काहीतरी खुण करत होता. रांग हळु हळु पुढे सरकत होती.

थोड्यावेळाने त्या कैद्याचा नंबर आला. त्याने त्याच्या नावापुढे असलेल्या अनेक चौकोनांपैकी एका चौकोनात खुण केली. दिपक त्याच्या खांद्यावरुन तो कुठे खुण करतो आहे ते पहात होता. त्या कैद्याने खुण करुन झाल्यावर एकवार पुन्हा दिपककडे काही क्षण पाहीले आणि तो निघुन गेला.

दिपक त्या कागदाकडे बघत होता. एका बाजुला कैद्यांचे नाव-नंबर होते तर दुसर्‍या बाजुला काही कॉलम होते आणि त्याच्या खाली खुण करण्यासाठी चौकोन बनवलेले होते.

तो कागद जेलमध्ये करावयाच्या कामांचा चार्ट होता. प्रत्येक कैदी आपल्या आवडीप्रमाणे काम निवडत होता. दिपकने त्या कैद्याने कुठे खुण केली आहे ते पाहीले. त्याने ‘गटार स्वच्छता’ निवडली होती. दिपकने तोंड वाकडे केले. आपण कुठे खुण करावी ह्याचा विचार तो करु लागला. ‘त्या’ कैद्याने सुचकपणे दिपकला सुध्दा तेथेच खुण करायला सुचवले होते, परंतु गटार स्वच्छता दिपकला खचीतच आवडणारे नव्हते. तो इतर कामं कोणती आहेत ते पाहु लागला.

‘क्या देख रहा है बै.. सनी लिऑ्न का फोटो है क्या? जल्दी कर चल..’, समोरचा पोलिस खेकसला.

दिपकने एकवार मागे वळुन पाहीले. दुर अंतरावरुन ‘तो’ कैदी दिपककडे बघत होता. दिपकने शेवटी ‘गटार स्वच्छता’ समोर खुण केली आणि तो रांगेतुन बाहेर पडला.

काही वेळातच सर्वांना आवश्यक असणारी साधन-सामग्री पुरवण्यात आली. ‘गटार स्वच्छता’ विभागात फक्त दिपक आणि तो कैदी दोघंच होते. बाकी कोणीच ते काम पत्करले नव्हते आणि त्याचे कारण दिपकला लगेचच समजले.

दिपक आणि त्या कैद्याला घेउन दोन पोलिस जेलच्या मागच्या बाजुस गेले. मागे मोठ-मोठ्ठाल्ले पाईप्स टाकले होते त्याच्या आतुन वाकत थोडे अंतर आत गेल्यावर घाणेरड्या वासाचा भपकारा आला. चौघांचेही हात नकळत नाकावर गेले.

“थांबा..” एक पोलिस मागुन म्हणाला..

दिपक आणि तो कैदी थांबुन माघारी वळले. ते दोन्ही पोलिस नाकावर रुमाल दाबुन उभे होते.

“तुम्ही दोघं पुढे जा आणि पटापट कामं उरका.. आम्ही इथेच थांबतो..” दुसरा पोलिस म्हणाला..

त्या कैद्याने मानेनेच होकारार्थी खुण केली आणि काहीही न बोलता तो पुढे निघुन गेला. दिपक त्याच्या मागोमाग चालु लागला. अजुन पुढे गेल्यावर रस्ता अरुंद होत गेला. जमीन ओलसर झाली होती आणि वातावरणातील कुबट वास अधीकच वाढला होता. त्या कैद्याने एक कापड खिश्यातुन काढले आणि त्याचे दोन भाग केले. एक भाग स्वतःच्या नाकाभोवती गुंडाळला आणि दुसरा दिपककडे दिला.

दिपकनेही त्याचे अनुकरण केले.

एव्हाना गटार सुरु झाले होते. दोघांचेही पाय गुडघ्याएवढ्या गटारात बुडले होते. त्या कैद्याने हातानेच दिपकला थांबायची खुण केली. बर्‍याच वेळ तो कानोसा घेउन त्या पोलिसांची काही हालचाल जाणवते का ते पहात राहीला. थोड्यावेळाने त्याच्या चेहर्‍यावर समाधान पसरले.

खांद्यावरचे फावडे काढुन तो गटारात साठलेला गाळ बाजुला काढु लागला. दिपकनेही लगोलग त्याचे अनुकरण चालु केले. ‘त्या’ कैद्याशी बोलायची दिपकची खुप इच्छा होती, पण त्याला खात्री होती की योग्य वेळ आली की तो कैदी स्वतःहुनच बोलले. शेवटी त्याचीच इच्छा होती की इथे दिपकने त्याच्याबरोबर यावे.

थोडा वेळ गेल्यावर तो कैदी कुजबुजल्यासारखा बोलला, “मी युसु्फ..”

दिपकने त्याच्याकडे पाहीले, मात्र तो कुठेही न बघता आपलं काम करण्यात मग्न होता.

“मी…”, दिपक
“दिपक.. ले.दिपक कपुर.. माहीती आहे मला.. आणि तुझ्यावर झालेला अन्याय सुध्दा”, युसुफ

“इथे.. ह्या घाणीत येण्याचे कारण?”
“पोलिस इथल्या घाणीमुळे जवळ थांबत नाहीत.. साले… लांब थांबतात तिकडे.. आपल्याला बोलता येईल.. शिवाय हे काम सहसा कोणी घेत नाही..”

दिपकच्या चेहर्‍यावर नकळत हास्य पसरले.. “स्मार्ट..”

“ह्या तुरुंगातले माझे शेवटचे तिन दिवस..”, युसुफ

युसुफच्या त्या वाक्याने दिपक दचकलाच. त्याने चमकुन युसुफ कडे पाहीले. गेले काही दिवस त्याने वेगळाच विचार केला होता. युसुफच्या रुपाने त्याला एक साथीदार मिळु पहात होता आणि म्हणुनच त्याला थोडाफार आनंद वाटत होता. पण युसुफच्या त्या वाक्याने त्याचे सगळे मनसुबे गळुन पडले..

“ओह.. अभिनंदन”, दिपक
“माझा ह्या तुरुंगातला शेवटचा दिवस..शिक्षेचा नाही. माझी रवानगी दुसर्‍या तुरुंगात होत आहे..”

“पण का?”
“हे लोकं एकाच तुरुंगात सहा महीन्यांपेक्षा जास्त ठेवत नाहीत.. खास करुन तुझ्या-माझ्यासारखे ‘गंभीर’ गुन्ह्यात अटक झालेले असतील तर..”

“का?”, काहीच न समजल्याने दिपक म्हणाला..
“कदाचित एकाच जागेची सवय होऊ नये म्हणुन.. कदाचीत पळुन जाण्याचा प्रयत्न करु नये म्हणुन..”
“….”

“हा माझा तिसरा तुरुंग.. पण ह्यावेळेस मी सावध होतो.. पहील्या दिवसापासुनच मी तुरुंग निरखुन पहायला सुरुवात केली. प्रत्येक गोष्ट, प्रत्येक जागा माझ्या डोक्यात फिक्स आहे. ह्या तुरुंगातील प्रत्येक विभागात मी काम केले आहे. किचेन, प्लंबीग, गटार, बांधकाम, साफ-सफाई, वेल्डींग सर्व काही..”

“मला चौथ्या तुरुंगात नाही जायचे आहे दिपक.. मी इथुन पळुन जायचा विचार करतोय.. आणि मला तुझी मदत हवी आहे…”, युसुफने अचानक बॉम्ब टाकला.

दिपकने मान वर करुन पाहीले. युसुफ त्याच्याकडेच बघत होता.

“मला नाही पळुन जायचे आहे.. मी नाही मदत करु शकत तुझी..”, दिपकने सावधगीरीचे पावुल टाकले.
“हे बघ दिपक.. मला चर्चा करायला वेळ नाहीये. तुझा माझ्यावर विश्वास नसेल तर तसे सांग. वेळ कमी आहे.. तयार असशील तर लवकर सांग म्हणजे मला प्लॅन सांगायला..”

दिपकने साधारण अंदाज केला होताच. परंतु तरीही त्याच्या मनात चलबिचल सुरु झाली. काय करावं? विश्वास ठेवावा का ह्याच्यावर? हा कितपत तयारीचा आहे? बाहेर सुखरुप पडु शकु का? पकडलं गेलो तर? आगीतुन फुफाट्यात पडल्यासारखं होईल.

“कसला विचार करतो आहेस दिपक? हे बघ रिस्क आहेच, पण ती घ्यायलाच हवी. तुला तुरुंगात येउन फार तर ३-४ महीने झाले असतील. मला ५ वर्ष झाली आहेत तर असं वाटतंय ५० वर्ष उलटली. मला नाही वाटत असल्याप्रकारे कोणी १० वर्षांपेक्षा जास्ती कोणी जगु शकेल. आज मी आहे.. नंतर कोणी भेटेल की नाही.. सांगु शकत नाही.. उद्या तु सुध्दा दुसर्‍या तुरुंगात जाशील. कदाचीत तो याहीपेक्षा वाईट्ट असेल.. शेवटी निर्णय तुझा आहे..”, युसुफ बोलत होता.


दिपक स्वतःशीच विचार करत होता. जेनीच्या जाण्यानंतर तसेही त्याच्या आयुष्यात काही राहीले नव्हते. सैन्यातील नोकरी गेलीच होती, आणि असे इथुन पळुन गेल्यावर बाहेर नोकरी मिळण्याची शास्वतीही जवळ जवळ नव्हतीच.

इथे तुरुंगात राहुन शिक्षा पुर्ण केल्यावर कदाचीत बाहेर संधी असु शकत होती. पण कितपत? तुरुंगातुन बाहेर पडलेल्या कैद्यावर कोण आणि किती विश्वास ठेवणार? तुरुंगातुन बाहेर पडल्यावर निम्याहुन जास्त आयुष्य संपल्यातच जमा होते… आणि तो पर्यंत तुरुंगात काढलेले हे जिवघेणे हाल????

दिपकने स्वतःशीच निश्चय केला आणि तो युसुफला म्हणाला.. “मी तयार आहे, काय प्लॅन आहे?”

युसुफने एकवार दिपकला निरखुन पाहीले आणि मग तो हळु आवाजात बोलु लागला.

“आपण जेथे बंद असतो तो तुरुंगाचा मागचा भाग आहे, इथुन जी लांब भिंत दिसते ती नाही म्हणलं तरी एक किलोमीटर अंतरावर आहे. दिवसा तर इथुन बाहेर पडणं केवळ अशक्यच.. पण रात्री अगदी धुसर संधी आहे. हा जो जाड्या गिड्डा पोलिस आहे तो इन्चार्ज आहे ह्या तुरुंगाचा. दिवसा आणि रात्री दोन्ही वेळच्या सुरक्षेची जबाबदारी त्याचीच आहे.

ह्या ढोल्याला झोप फार प्रिय आहे आणि रात्र झाली की हा झोपुन जातो. अर्थात पोलिसांचा इतरत्र बंदोबस्त असतोच. शिवाय ह्याने काही शिकारी कुत्री पाळलेली आहेत. ती कुत्री इतकी भयंकर आहेत की अजुन तो सुध्दा त्या कुत्र्यांना घाबरुन असतो. दोन फुट लांब थांबुनच रिमोट च्या सहाय्याने तो कुत्र्यांच्या पिंजर्‍याचे दार उघडतो.

एकदा का कुत्री बाहेर पडली की मग ड्युटीवर असलेले पोलिससुध्दा इकडे तिकडे फिरत नाहीत. भिंतीच्या कोपर्‍यात असलेल्या उंच मनोर्‍यांवर दोन दिशांना दोन पोलिस असतात तेवढेच. सर्चलाईट चालु असतो आणि तुरुंगात लावलेल्या सि.सि.टी.व्ही कॅमेर्‍यातुन होणारे चित्रण इमारतीच्या पुढच्या बाजुला असलेल्या एका खोलीतुन नियंत्रण केले जाते.

ह्या कुत्र्यांना चकवुन जाणे केवळ अशक्य आहे. असं ऐकुन आहे की एक-दोनदा काही कैद्यांनी तसा प्रयत्नही केला होता. पण त्या कुत्र्यांच्या तावडीत सापडल्यावर गस्तीवर असलेल्या पोलिसांनीसुध्दा मध्ये पडुन त्या कुत्र्यांना बाजुला करण्याची हिंमत केली नाही.

त्या कुत्र्यांनी जागेवरच म्हणे त्या कैद्यांना फाडला. समजा त्या कुत्र्यांना चकवुन बाहेर पडलो तरी सि.सि.टी.व्ही.चा धोका कायम आहे. अनधिकृतपणे येथील पोलिसांना ‘शुट अ‍ॅट साईटच्या’ ऑर्डर्स आहेत. रात्री कोणी पळुन जायचा प्रयत्न केलाच आणि सर्चलाईटमध्ये तो दिसला तर मनोर्‍यावरील पोलिसांच्या गोळीच्या टप्यात नक्कीच येईल.

समजा सर्चलाईटमधुन कसेबसे सुटलोच तरी ह्या उंच भिंतीपार करणे अशक्य आहे. भिंत कमीतकमी २५ फुटी तरी असेल त्यावरुन चढुन, मनोर्‍य़ावरील पोलिसांच्या नजरेतुन सुटलोच तर पुढे नदी आहे.

आणि एक छोटे जंगल आहे. एकदा का त्या जंगला घुसलो की काही दिवस लपुन रहाण्यास वाव आहे. तेथे शोध घेणं पोलिसांच्या दृष्टीने कठीण काम आहे. काही दिवस जंगलात लपुन राहुन मग बाहेर पडलो की हायवे लागतो. तेथुनच कायमचे बाहेर पडु शकतो. पण त्यापुर्वी हे मधले अडथळे पार करण्याचे दिव्य कर्म आहे मित्रा….”

युसुफ बोलताना दिपकचा चेहरा न्ह्याहाळत होता. पण दिपकच्या चेहर्‍यावरील भाव यत्किंचीतही बदलले नाहीत. तो शांतपणे, लक्षपुर्वक युसुफचे बोलणे ऐकत होता.

“काय झालं दिपक. इतके सगळे अडथळे ऐकुन विचार बदलला तर नाही?”, युसुफने विचारले.

“नाही..”, थोडावेळ विचार करुन दिपक म्हणाला, “ज्या अर्थी तुला एव्हढी सगळी माहीती आहे आणि तरीही तु पळुन जायचा विचार करत आहेस, त्या अर्थी ह्या सगळ्या गोष्टींचा विचार तु केलेला आहेस आणि त्यातुनच तुला सुटकेचा मार्ग दिसला आहे… नाही का?”

युसुफच्या चेहर्‍यावर हास्य पसरले.

तो पुढे म्हणाला, “ह्या प्लॅनमध्ये माझ्या आणि तुझ्याशिवाय अजुन एक व्यक्ती सहभागी आहे..”

दिपकचा सिक्स्थ सेन्स अचानक जागा झाला. “तिघं जणं? कोण आहे तिसरा?”

“इस्माईल शेख…”, युसुफ म्हणाला..
“इस्माईल.. यु मीन तो माफीया डॉन शेख जिंदालचा छोटा भाऊ?”
“हम्म तोच…”, युसुफ..

“नो वे..”, दिपक चिडुन म्हणाला.. “त्याला इथुन पळुन जायला मी मदत करणार नाही. तो देशाचा दुश्मन आहे, आणि आपल्या ह्या प्लॅनमुळे तो इथुन पळुन जाऊ शकला तर ती माझ्या दृष्टीने देशाशी केलेली गद्दारी होईल..”

“कोणत्या जमान्यात रहातो आहेस तु दिपक? अरे देशाशी गद्दारी वगैरे असे काही नसते. आजकाल जो तो स्वतःचा स्वार्थ बघतो.. आपले नेते मंडळी काय करतात? आणि कोणत्या देशाची गोष्ट करतोस तु? तुला वाचवायला आले का कोणी तुझ्या बाजुने. पडलासच ना इथे येऊन सामान्य कैद्यांसारखा?”, युसुफ

“अरे पण…”, दिपक
“हे बघ दिपक.. आत्ता ह्या क्षणाला इथुन बाहेर जाणं माझ्या दृष्टीने अत्यंत महत्वाच आहे आणि त्या कामात मला कोणाची मदत होतेय हे माझ्या दृष्टीने क्षुल्लक आहे..”

दिपक काहीही न् बोलता गप्प राहीला.

“आज आपण कोठडीत गेलो की पुन्हा तिन दिवसांशिवाय बाहेर येण्याची शक्यता नाहीच. आणि तिन दिवसांनंतर मला इथुन दुसर्‍या तुरुंगात न्हेतील. ते कधी न्हेतील… सांगता येत नाही. कदाचीत सकाळी.. कदाचीत दुपारी.. तर कदाचीत एकदम रात्री. त्यामुळे जे काही करायचे ते आज रात्रीच.”, युसफ.. “आता माझा प्लॅन निट ऐक..” असं म्हणुन.. युसुफने आपला प्लॅन सांगायला सुरुवात केली.


काय होता युसुफचा प्लॅन, कोण होता हा अचानक उगवलेला तिसरा कैदी. दिपकचा ह्या प्लॅनमध्ये काय सहभाग होता? दिपक तुरुंगातुन सुटुन जाऊ शकेल का?

काय होईल पुढे? वाचत रहा पाठलाग भाग-५ लवकरच….

[क्रमशः]

इतर रसदार पर्याय

शेयर करा

NEW REALESED