पाठलाग – (भाग-११) Aniket Samudra द्वारा फिक्शन कथा मराठी में पीडीएफ

Featured Books
श्रेणी
शेयर करा

पाठलाग – (भाग-११)

थॉमस शिवाय खरं तर दीपककडे दुसरा कोणताच पर्याय नव्हता. हॉटेल मधील स्टाफशी अस अचानक स्टेफनी बद्दल बोलणे योग्य ठरले नसते. शिवाय उगाच तिला संशय आला असता तर सगळेच काम बिघडले असते.

थॉमसशी संबंध चांगले करायचे आणि हळू हळू बोलता बोलता थोडी थोडी माहित काढत जायची असा ढोबळ प्लान त्याने आखला होता.

रात्री थॉमस आल्यावर तिघेही नेहमीप्रमाणे खुर्च्या टाकून समुद्र किनारी बसले. थॉमसने येताना चीवाज-रिगलचे ३-४ बॉक्स हॉटेल मधील संपत आलेला स्टोक भरायला आणले होते, त्यातील २ बाटल्या घेऊन तो बसला होता.

गप्पांचा नेहमीचाच विषय चालला होता इतक्यात दीपकला एक कल्पना सुचली.

अचानक गंभीर होत तो म्हणाला..”थॉमस, मला तुला माझ्याबद्दल काही सांगायचे आहे. मला वाटते आपण एकत्र काम करणार तर तुझ्यापासून काही लपून राहावे असे मला वाटत नाही”

दीपकचे हे वाक्य ऐकताच स्टेफनी ताठ होऊन बसली.

“बोल ना यार.. बोल..”, दीपकच्या मांडीवर हात मारत थॉमस म्हणाला.
“थॉमस, आय एम अ क्रिमिनल.. पोलिस माझ्या मागावर आहेत माझ्यावर खुनाचा आरोप आहे….”, एका दमात दीपक म्हणाला..

“काय???”, थॉमस जवळ जवळ दोन फुट खुर्चीतून उडालाच..
“हो थॉमस.. मी कोणी जंगलातील वन-अधिकारी नाही.. मी सैन्यात होतो…”, असं म्हणून दिपकने आपली सगळी हकीकत हाताचे काहीही राखीव न ठेवता थॉमसला सांगून टाकली.

बोलताना एकवार त्याने स्टेफनीकडे पाहिले. तिच्या मनातला संताप तिच्या चेहर्यावर स्पष्ट दिसत होता

दीपकचे बोलणे झाल्यावर थॉमसने हातातला ग्लास रिकामा केला आणि तो काही क्षण डोळे मिटून शांत बसून राहिला तो प्रत्येक क्षण दीपकला युगासारखा वाटत होता. थॉमस कसा रिअ‍ॅक्ट करतो ह्यावर सर्व काही अवलंबून होते.

काही वेळ शांततेत गेल्यावर थॉमस म्हणाला..”गुड दॅट यु टोल्ड मी…. दुसर्‍या कोणाकडुन कळालं असतं तर कदाचीत फारसा विचार न करता मी सरळ पोलिसांनाच फोन केला असता…

मला वाटते तू योग्य तेच केलेस. आणि शेवटी तो खून तू जाणून बुजून नाही केलास.. तुझ्या हातून तो खून घडला होता.. आणि खरं तर ह्या असल्या पैश्याचा माज असणाऱ्या लोकांना कुणीतरी सरळ करायलाच हवे होते…डोन्ट वरी यु आर सेफ हिअर..”

थॉमसने पुन्हा आपला ग्लास भरून घेतला, बर्फाचे दोन मोट्ठे खडे टाकून त्याने ऑन द रॉक्स तो ग्लास रिकामा केला आणि पुढे तो म्हणाला…”खरं तर हा गुन्हा होऊच शकत नाही. तू स्वतःला वाचवताना केलेल्या झटापटीत तो मारला गेला, तू खुनी नाहीस.. आणि जसा तू खुनी नाहीस, तशीच स्टेफनी सुध्दा खुनी नाही…”

थॉमसला हळू हळू दारू चढू लागली होती.

थॉमसच्या त्या वाक्याने स्टेफनी आणि दीपक दोघही ताडकन उडालेच..

“म्हणजे…”, दीपकला अनपेक्षीतरित्या जे पाहिजे होते ते घडत होते..
“थॉमस.. इनफ, तुला जास्ती झालीय.. मला वाटते आपण आता जेऊन घेऊ.. तुला उद्या परत सकाळी जायचे असेल ना..” स्टेफनी थॉमसला थांबवत म्हणाली..

“हो.. जसा तुझ्या हातून घडला तसाच गुन्हा स्टेफनीच्या हातून सुद्धा घडला होता… मी.. मी होतो म्हणून ती वाचली, नाहीतर आज कुठल्यातरी तुरुंगात खितपत पडली असती…” थॉमस स्टेफनीच्या बोलण्याकडे दुर्लक्ष करत म्हणाला.

दीपक लक्षपूर्वक थॉमसचे बोलणे ऐकू लागला.

“स्टेफनी इथे तिच्या एका हिप्पी मित्राबरोबर आली होती. मला अजूनही आठवतेय ती रात्र. मी त्या तिथे पायर्‍यांवर बसून हिशोब तपासात होतो. त्या तिथे कोपर्‍यात स्टेफनी आणि तिच्या मित्राची काहीतरी बाचा-बाची चालू होती. बहुतेक तिच्या मित्राला सुद्धा दारू चढली होती. नशेतच त्याने स्टेफनीला मारायला सुरुवात केली.

मी त्यांच्यातील भांडणे सोडवायला धावलो तो पर्यंत स्टेफनीने कडेला पडलेली बिअरची एक बॉटल फोडून हातात धरली होती. झोकांड्या खाणारा तो तिचा मित्र पुन्हा तिच्या अंगावर धावून गेला. स्टेफनीने ती बाटली त्याच्यावर उगारायला आणि तो तोल जाउन तिच्या अंगावर पडायला एकाच वेळ आली. फुटलेल्या बाटलीचे टोक त्याच्या नरडीत घुसले.. आणि.. आणि…”

थॉमसने पुन्हा आपला भरलेला ग्लास ओठाला लावला.

“अ‍ॅन्ड हि ब्लीड टू डेथ…” शांतपणे स्टेफनी म्हणाली..

काही काळ शांतता पसरली.

“मी आणि स्टेफनीने मिळून त्याच्या प्रेताची विल्हेवाट लावली. मी ह्या प्रकरणाची कुठेही वाच्यता केली नाही. ह्या सगळ्या प्रकार सावरता सावरता स्टेफनी माझ्या प्रेमात पडली आणि नंतर मी आणि स्टेफनीने लग्न केले…” थॉमस

“खोट कश्याला सांगतोस थॉमस.. यु ब्लॅक्मेल्ड मी.. तू म्हणालास मी तुझ्याशी लग्न केले तर तू ह्याबद्दल कुठे बोलणार नाहीस..” जळफळत स्टेफनी म्हणाली.

“सो व्हॉट डीअर.. यु लव्ह मी.. नाही का..”, स्टेफनीच्या गोर्‍या उघड्या मांडीवरून हात फिरवत निर्लज्जासारखा थॉमस म्हणाला..

स्टेफनी ने त्याचा हात झटकला आणि ती उठून उभी राहत म्हणाली.. “मी जेवायचे घेतीय.. प्लीज फिनिश अ‍ॅन्ड कम इन्साईड…”

स्टेफनी हॉटेल मध्ये निघून गेली..आणि दीपकच्या चेहर्‍यावर एक हास्य उमटले. त्याने अपेक्षा हि केली नव्हती इतक्या सहजपणे त्याला हवी असलेली गोष्ट मिळाली होती..

“लक अजून काय..” दीपक स्वतःशीच पुटपुटला.


दुसर्‍या दिवशी सकाळी दिपक उठला तेंव्हा थॉमस ट्रक घेउन गेला होता. दिपकने खिडकीतुन बाहेर पाहीले तेंव्हा अजुनही काहीसा अंधारच होता. दिपकने शर्ट घातला आणि तो बाहेर आला.

स्टाफची सकाळची कामं चालु होती. दिपक बिचवर गेला. त्याच अंग काहीस आखडलं होतं. त्याने हात-पाय ताणुन एक मोठ्ठा आळस दिला. निटसा व्यायाम करुन त्याला कित्तेक दिवस उलटले होते. सैन्यात असताना रोजचा जो व्यायाम होता तसा बर्‍याच दिवसांत घडलाच नव्हता.

दिपकने आखडलेली मान दोन्ही बाजुंना हलवुन मोकळी केली आणि त्याने बिचवरुन धावायला सुरुवात केली. समुद्रावरुन येणारा खारा दमट वारा सुखावत होता. काही क्षणांतच थंडी पळुन गेली. चांगली ४ कि.मी. एक मोठ्ठी राऊंड मारुन तो पुन्हा हॉटलपाशी आला. समुद्राच्या लाटा जेथे किनार्‍यापाशी येऊन माघारी फिरत होत्या तेथे जाऊन दिपकने आपले हात वाळुवर टेकवले आणि पुश-अप्स मारायला सुरुवात केली. १..२..३..५..१०.. पुर्ण मग्न होऊन दिपक पुश-अप्स मारत होता. सहज त्याच लक्ष हॉटेल्सच्या रुम्स कडे गेले तेंव्हा तेथील एक पडदा अचानक हलल्यासारखा वाटला.

“स्टेफनी??” दिपकच्या मनात विचार डोकावुन गेला.

काही वेळ त्याने अजुन थोडा व्यायाम केला आणि मग तो हॉटेलमध्ये गेला.

स्टेफनी हॉटेलच्या लॉबीमधुन हातात कपडे घेऊन स्विमींगसाठी जाताना त्याला दिसली. तिने मात्र दिपककडे पाहुन न पाहील्यासारखे केले. जणु काही त्या दोघांची काहीच ओळख नव्हती. जणु काही त्या रात्री त्या दोघांत दिपकच्या रुममध्ये जे घडले तो खरोखरच एक ‘वन-नाईट-स्टॅंड’ होता.

दिपकने खांदे उडवले आणि तो आपल्या रुममध्ये आंघोळीसाठी गेला.

त्यानंतर दिवसभर त्याला स्टेफनी दिसलीच नाही. मग तो सुध्दा आपल्या कामात मग्न होऊन गेला.


पुढील ५-६ दिवस हाच प्रकार चालु होता. स्टेफनी आणि दिपकची फारशी भेट होतच नसे आणि झालीच तरी स्टेफनी त्याला नजरेआड करुन निघुन जाई.

थॉमसच्या नजरेतुनही हा प्रकार सुटला नाही. एकदा त्याने दिपकला विचारलेसुध्दा,

“काय रे, तुझं आणि स्टेफनीचं काही बिनसलं आहे का? नाही म्हणजे काही चावटपणा तर नाही ना केलास तिच्याबरोबर???”

परंतु दिपकने त्याचं म्हणणं हसण्यावारी न्हेलं.

पुढचे काही दिवस कामातच घालवले. आपल्या फावल्या वेळात आपल्या सैनिकी शिक्षणाचा अनुभव लावुन त्याने अप्लाईन टॉवर, आर्मी ऑब्स्टॅकल्स, रोप ब्रिज, रॅप्लींग सारख्या काही फन अ‍ॅक्टीव्हीटी बिचवर तयार केल्या. त्यासाठी लागणारं साहीत्य त्याने जवळच असलेल्या झाडांची लाकड, हॉटेल मध्ये पडुन असलेले रोप्स वगैरे वापरुन तयार केले. त्याला असलेल्या ज्ञानाचा वापर करुन इतर सेफ्टी हार्नेससुध्दा बनवले. पडुन असलेले जुनाट टायर्स, लोखंडी पाईप्स त्याने ब्राईट रंग देऊन नव्यासारखे बनवले.

अर्थातच हा नविन प्रकार हिप्पी लोकांना भलताच पसंद पडला. सर्वजण मोठ्याप्रमाणात त्याचा आनंद घेऊ लागले.

थॉमस अर्थातच ह्या प्रकारांमुळे अधीकच खुश झाला.


थॉमस गेल्यावर एकदा सकाळी दिपक किचनमध्ये स्वतःसाठी चहा बनवत होता. गरम चहा कपात ओतुन तो माघारी वळला आणि क्षणभर दचकलाच.

किचनच्या दारामध्ये स्टेफनी त्याच्याकडे रोखुन पहात उभी होती. तिने केशरी रंगाची स्लॅक पॅन्ट आणि पांढर्‍या रंगाचा डेनीम शर्ट घातला होता. शर्टाच्या दोन उघड्या बटनांमधुन ख्रिश्चनालिटीवर तिची श्रध्दा दर्शवणारा डायमंडचा क्रॉस चमकत होता.

काही क्षण शांततेत गेली आणि अनपेक्षीतपणे स्टेफनीच्या चेहर्‍यावर हास्य पसरले. दिपक तिच्या चेहर्‍यावरील हास्य पाहुन अचंबीतच झाला.

त्याच्याकडे दुर्लक्ष करुन स्टेफनी म्हणाली, “मला वाटतं झालं गेलं आपण विसरुन जावू. शेवटी दोघांनाही इथेच, एकत्र काम करायचे आहे..सो उगाच ही अढी कश्याला नाही का?”

दिपकने काही न बोलता मान डोलावली.

“बाय द वे, हे अ‍ॅडव्हेंचर गेम्स मला खुप आवडले. माझ्याकडे अजुन काही आयडीया आहेत ज्या मला तुझ्याशी डिस्कस करायच्या आहेत. व्हाय डोंन्ट यु अ‍ॅन्ड मी टेक अ जकुझी बाथ इन माय बाथरुम अ‍ॅन्ड देन डिस्कस मोर ऑन धिस?”

दिपकच्या उत्तराची वाट न पहाता स्टेफनी तिच्या रुममध्ये निघुन गेली.

दिपकने कसलीही घाई न करता हातातील चहा सावकाश घोट घेत संपवला.

“इफ़ शी हॅज टु वर्क विथ मी, देन धिस बिच शुड लर्न तो बिहेव्ह फर्स्ट…”, दिपक मनातल्या मनात म्हणाला आणि मग सावकाश पावलं टाकत तो स्टेफनीच्या रुममध्ये गेला.


दिपक स्टेफनीच्या केसांमधुन हात फिरवत तिच्या अलिशान बेडवर पहुडला होता.

“माझा इतिहास तर तुला माहीती आहे.. पण तुझ्याबद्दल मला काहीच माहीत नाही..”, दिपक स्टेफनीला म्हणाला..”आय मीन यु अ‍ॅन्ड थॉमस…”

“माझं आणि थॉमसचं लग्न कसं झालं हे तर तुला माहीतीच आहे. त्या प्रकरणानंतर एकदा गोड बोलुन थॉमसने माझा पासपोर्ट-व्हिसा काढुन घेतला. आजपर्यंत तो त्याने कुठे लपवुन ठेवला आहे हे मला माहीत नाही. त्याला सोडुन पळुन गेले तर नविन पासपोर्ट यायच्या आत तो मला पोलिस कोठडीत पाठवायची व्यवस्था करेल हे नक्की.

फ़ेक पासपोर्ट कसा कुठुन काढायचा हे सर्व मी शोधुन ठेवलं आहे. पण त्याला पैसे खुप लागतील. थॉमस माझ्या हाती एक रुपया लागुन देत नाही. पैश्याचे सर्व व्यवहार तोच बघतो. त्याच्या हातील एक बाहुली बनुन राहीली आहे मी…”.स्टेफनी सांगत होती.

“पण मग आता? तुला माझी काय मदत हवी आहे?”, दिपकने विचारले.

स्टेफनीने काही क्षण त्याच्याकडे रोखुन पाहीले आणि मग ती म्हणाली, “थॉमसकडे खुप पैसा आहे जो त्याने इथेच हॉटेलमध्ये कुठेतरी लपवुन ठेवला आहे.

थॉमसचे एक स्वप्न आहे.. बोटीतुन जगप्रवास करायचा. तो जे काही कमावतो ते सगळं हेच स्वप्न पुर्ण करण्यासाठी..”

“बोटीतुन जगप्रवास….”, दिपक स्टेफनीच वाक्य तोडत हसत म्हणाला..”मला वाटतं त्याला त्याची ४-५ आयुष्यतरी खर्ची करावी लागतील तितका पैसा जमवण्यासाठी..”

“..म्हणजे?? थॉमसने तुला काहीच सांगीतले नाही तर…” स्टेफनी म्हणाली..
“नाही.. कश्याबद्दल बोलते आहेस तु??”, दिपक

“दिपक.. थॉमस इज अ ड्रग डिलर..तो ह्या ज्या ट्रकने फेर्‍या मारत असतो तो सगळा दिखावा आहे. खरं तर त्याच्या आडुन तो ड्रग्सचे ट्रॅफीकींग करतो… उगाच नाही हे हॉटेल सदैव हिप्पींनी तुडूंब भरलेले असते…”, स्टेफनी म्हणाली.

“आय डोन्ट बिलीव्ह धिस..” बेडमधुन उठत दिपक म्हणाला

“तुझा विश्वास असण्या, नसण्याचा प्रश्नच येत नाही.. आस्क मी.. मी इथे का आले? कारण मला माहीती होतं की इथे ड्रग्सची विक्री होते म्हणुन.. आजही मला ड्रग्स थॉमसकडुनच मिळतात दिपक..”

“पण.. पण हे इतकं ओपनली माहीती आहे तर पोलिसांनी कसं काही केलं नाही”, आश्चर्यचकीत होत दिपक म्हणाला..

“कुठल्या जमान्यात आहेस तु दिपक? वरपासुन खालपर्यंत सर्वांना हप्ते पोहोचतात.. कश्याला कोण काय करेल? थॉमसकडे निदान २-४ कोटी रुपये कॅशमध्ये आहेत हे मी शपथेवर सांगु शकते. उगाच एन्क्वायरी नको म्हणुन तो हे पैसे बॅंकेत भरत नाही..

जर.. जर ते पैसे मला मिळाले ना दिपक.. आपल्याला मिळाले ना…”

शुन्यात नजर लावुन स्टेफनी बोलत होती..

“तर काय स्टेफनी??”
“आपण.. आपण दोघंही नकली पासपोर्ट काढुन इथुन पळुन जावु.. माझ्या देशात… कसं ते तु माझ्यावर सोड.. तेथे तुझ्या मागे कुणाचाही ससेमिरा नसेल.. जेथे माझ्यावर कोणतेही बंधन नसेल.. बोथ ऑफ अस विल बी फ्री बर्ड्स.. फ्रि लव्ह बर्ड्स… वुई विल लिव्ह आवर लाईफ.. द वे वुई वॉन्टेड.. द वन वुई अल्वेज ड्रिम्ड ऑफ.. बोल करशील मला मदत?” स्टेफनी आशाळभुत नजरेने बोलत होती.


दोन आठवड्यांनंतर…….
पहाटेची ५:३०ची वेळ होती. इतक्यात दिपकच्या दारावर जोरजोरात थापा वाजल्या. दिपक खडबडुन जागा झाला. त्याने खोलीतला दिवा लावला आणि दार उघडले. बाहेर स्टेफनी उभी होती. तिचा चेहरा घामाने डबडबला होता.. भितीने तिचा चेहरा पांढराफटक पडला होता..

“स्टेफनी?? काय झालं?”, दिपकने विचारले..
“काय झालं? यु स्ट्पीड, इडीयट.. मोरॉन… आरे आधी सांगायचेस तरी मला.. इथे.. इथे करायची काय गरज होती?”, स्टेफनी शब्द जुळवीत म्हणाली..

“काय बोलते आहेस तु? जरा निट सांगशील का?”, दिपक आवाज चढवत म्हणाला..
“श्शु sss.. मुर्खा थॉमसचा खुन कश्याला केलास????”, स्टेफनी दबक्या आवाजात म्हणाली..

दिपकचे डोळे तिच्या वाक्याबरोबर विस्फारले गेले….

[क्रमशः]