पाठलाग – (भाग-१) Aniket Samudra द्वारा फिक्शन कथा मराठी में पीडीएफ

Featured Books
श्रेणी
शेयर करा

पाठलाग – (भाग-१)

जून महीन्यातील ती एक संध्याकाळ होती. दोन चार आठवड्यांपुर्वी येऊन गेलेली पावसाची एखादी बारीकशी सर सोडली तर पावसाने टांगच दिली होती. मुंबईच्या त्या दमट वातावरणात उष्णता अधीकच जाणवत होती. चर्चगेट स्टेशनमधुन बाहेर आल्या-आल्या मुंबईचा तो टिपीकल फिल दिपकच्या अंगावर आला. रस्ता भरुन वाहणारी वाहनांची गर्दी, स्टेशनच्या आतबाहेर करणारे माणसांचे लोंढे, फेरीवाले, पदपथावरील छोटेमोठे स्टॉल्स, भिकारी.. सगळं अगदी जस्सच्या तस्स होतं. त्यात काहीच फरक पडला नव्हता.

दिपक.. अर्थात लेफ्टनन दिपक कपुर.. तीन वर्षांपासुन काश्मीरच्या खोर्‍यात तैनात होता. गेल्याच वर्षी तो सुट्टीवरुन परतला होता. पण आता… आता त्याला मुंबईला सुट्टी काढुन लगेच परतणे अत्यंत गरजेचे होते नाहीतर जेनीने आणि तिच्या पोटात वाढणार्‍या पोराने त्याला घराबाहेरच काढले असते. ७-८ महीने जेनीने दिपकशिवाय कसेबसे काढले पण आता तिला दिपकची.. त्याच्या प्रेमाची.. जास्ती गरज होती. तारीख जवळ जवळ येत चालली होती आणि म्हणुनच दिपक शेवटी तीन महीन्यांची सुट्टी टाकुन आला होता.

स्टेशनवरुन खरं तर घरी जाणं त्याला जास्ती सोयीस्कर होते परंतु त्याने आणि त्याची पत्नी जेनीने भेटण्याचे ठिकाण ठरवले होते ते त्यांच्या कॉलेजच्या बाहेर असलेले छोटे टपरीवजा हॉटेल. ते हॉटेल जेथे त्यांची सर्वप्रथम ओळख झाली होती. ते हॉटेल जेथे त्यांच्यामधील प्रेम फुलले होते. ते हॉटेल ज्याने त्या दोघांमधील रुसवे-फुगवे, लटके राग पाहीले होते.

दिपकने एकवार सभोवताली नजर टाकली. मिलीटरी वेषातील रुबाबदार दिपककडे येणारे-जाणारे लोक आदबीने पहात होते. दिपकला त्याच्या कामाचा, त्याच्या वर्दीचा अभीमान होता.. त्याच्या व्यक्तीमत्वाला त्याचा वेष अधीकच शोभुन दिसायचा. लोकांकडुन मिळणार्‍या ह्या कौतुकाच्या नजरांची दिपकला सवय होती. क्षणभर तो स्वतःशीच हसला आणि मग त्याने टॅक्सी थांबवली. वळकटीत भरलेले सामान दिपकने टॅक्सीच्या डीकीत फेकले आणि तो मागच्या सिटवर जाऊन बसला.

टॅक्सीने वेग पकडला आणि दिपकचे मन भुतकाळात धावु लागले. एकाच कॉलेजमधुन दिपक आणि जेनी ग्रॅज्यएट झाले. कॉलेजच्या दुसर्‍याच वर्षात दोघांचे जमले. कॉलेजचे ते भारलेले दिवस दोघांनी एकमेकांच्या प्रेमात आकंठ बुडुनच घालवले. कॉलेज संपले आणि निधड्या छातीच्या दिपकने एन.डी.ए जॉईन केले. हुशार, तडफदार आणि बिंधास्त दिपकने एन.डी.ए ची सर्व वर्ष गाजवली आणि मिलीट्रीमध्ये जॉईन होताच लगेचच त्याचे पोस्टींग सिमावर्ती भागात झाले.

दिपक आणि जेनीचा विवाह थाटात पार पडला आणि लगेचच दिपक सैन्यात रुजु झाला. पहाता पहाता त्या घटनेला दोन वर्ष उलटुन गेली आणि मग मात्र दोघांना वेध लागले पुत्रप्राप्तीचे. ती गोड बातमी कळाली तेंव्हा दोघांना कोण आनंद झाला होता.

दिपक म्हणाला होता.. “आमच्या सैन्यात स्मार्ट आणि सुंदर लेडी डॉक्टर्सची कमतरता आहे.. आपल्याला कन्याच हवी..” तर जेनी म्हणायची..”तु असतोस सदा सर्वकाळ सीमेवर.. मला तर तुझ्यासारखाच एखादा मुलगा हवा जो मला तुझी आठवण येऊ देणार नाही…”

दिपकला आज टॅक्सीत बसल्या बसल्या त्या गोष्टी आठवुन हसु येत होते. त्याने त्या खटार्‍या प्रिमीयर पद्मीनीचे हॅन्डल फिरवुन खिडकी उघडली. खिडकीतुन येणार्‍या समुद्रावरच्या खार्‍या वार्‍याने दिपकचे मन उचंबळुन आले. त्याने खिडकीबाहेर नजर टाकली. दुरवर वरळी सी-लिंकवरील दिवे लु्कलुकत होते. सुर्यास्ताच्या वेळी आकाशात पसरलेल्या लालीची जागा आता निळसर करड्या रंगाने घेतली होती.

दिपकने घड्याळात नजर टाकली आणि तो ड्रायव्हरला म्हणाला..”जरा जल्दी चलो भैय्या.. बिवी इंतजार कर रही होगी..”

टॅक्सीवाल्याने आरश्यातुन मागे बसलेल्या दिपकला एकवार न्हाहाळले, त्याच्या चेहर्‍यावर एक मंद हास्य उमटले आणि त्याने गाडी थर्डमध्ये टाकुन ओव्हरटेकींगला सुरुवात केली.
————————————————————————

दिपक कॅफेजवळ पोहोचला तेंव्हा सांजवेळ टळुन गेली होती आणि अंधाराने आपले जाळे विणायला सुरुवात केली होती. कॅफेच्या निऑन दिव्यांच्याखाली पायरीवर जेनी दिपकची वाट पहात बसली होती.पांढर्‍या रंगाचा, गुलाबी फुलांची नक्षी असलेला मिडी जेनीने घातला होता. फिक्कट हिरव्या रंगाच्या रीबिनेने तिचे लांबसडक केस बांधलेले होते. जादूच्या पोतडीप्रमाणे भासणारी केशरी रंगाची मोठ्ठी पर्स पायाशी लोळत होती.

“चायला ह्या बायका मिड थर्टीमध्ये किंवा प्रेग्नंट असताना इतक्या सुंदर कश्या दिसतात हे एक न उलगडलेले कोड आहे..”, दीपक स्वतःशीच बोलला..

दिपकला पहाताच जेनी उठुन उभी राहीली. दोघेही सावकाश पावलं टाकत एकमेकांकडे जाऊ लागले. त्यात कुठेही प्रेमाचा दिखाउपणा नव्हता, कुठेही मर्यादा ओलांडुन वाहणारे कृत्य नव्हते, कुठेही भावनांचा अतिरेक नव्हता.

दिपकने एकवार जेनीच्या मोठ्या पोटाकडे कौतुकमिश्रीत नजरेने पाहीले आणि मिश्कील स्वरात म्हणाला…”मी सांगतोय तुला जेनी, मुलगीच असणार…”

जेनीने एक स्मितहास्य केले आणि ती दिपकला बिलगली.

दिपकने एकदा कॅफे कडे बघितले आणि तो म्हणाला.. “इतकी वर्ष झाली पण सगळं कस जसच्या तस आहे नाही?”

“हम्म खर आहे, पण इथे येणारी लोक बदलली.. बघ न आजूबाजूला.. कोणीच ओळखीचे नाही.. सगळे नवीन चेहरे..”, जेनी म्हणाली..

दिपकने कारच्या डिकीतून आपले सामान काढले आणि तो जेनीचा हात धरून कॅफे च्या पायर्‍या चढू लागला..

“एय. ते बघ अंकल आंटी आपल्या कॅफे मध्ये..”.. तेवढ्यात मागून एक आवाज आला..

“आयला हो रे.. प्रौढ साक्षरता वर्ग वगैरे चालू केले का काय?’, दुसरा आवाज म्हणाला..

दिपकने मागे वळून पाहिले.. थोड्या अंतरावर पोरांचे एक टोळकं दंगामस्ती करत उभ होत.

“ए.. गप्प बसा… सोल्जर चिडला बर का…” तिसरा आवाज म्हणाला..

दीपक रागाने मागे फिरला, परंतु जेनीने त्याला थांबवले..

“सोड न.. कश्याला त्यांच्या नादी लागतोस? कॉलेज मधली पोर ती, असला पोरकटपणा ते नाही करणार तर कोण करणार?”, जेनी..
“अगं पण…”
“चालतं रे.. त्यांच्या दृष्टीने आपण अंकल ऑन्टीच तर आहोत ना.. सोड ना.. नको मुड खराब करुस.. चल..”

दिपकने एक रागाने आवंढा गिळला आणि तो जेनीचा हात धरून कॅफे मध्ये गेला..

बाहेरून हसण्या-खिदळण्याचे, कमेंट्सचे आवाज येत होते, परंतु दिपकने मोठ्या कष्टाने तिकडे दुर्लक्ष केले..

दिपकने कॅफे मधली एक कोपर्‍यातली जागा पकडली. दीपकला बघताच कॅफे मधला जुना वेटर दीपक समोर येऊन उभा राहिला आणि त्याने खाडकन एक सलाम ठोकला..

“अरे महादेव!!”, त्याला पहाताच दिपक म्हणाला.. “तु अजुन आहेस होय…”
“मग? मी कुठं जातोय? तुमच्या सारखं थोडंच इथं तिन वर्षांपुरता आलोय…” आणि मग जेनीकडे वळुन.. “काय आणु? नेहमीचीच अंडा भुर्जी, बन मस्का, स्पेशल चहा?”

“मग काय महादेव काका! दुसरीकडं कुठंही काहीही खाल्ल तरी इथल्या ह्या पदार्थांची चव येणार नाही त्याला…नेहमीचीच ऑर्डर…”, जेनी

महादेव हसुन ऑर्डर आणायला गेला…

“सो??”, जेनी…
“सो!.. शेवटी आलो मी…”, दिपक..
“आय मिस्ड यु सोsssss मच…”, जेनी..

दिपकने हसुन जेनीचा हात हातात घेतला..

“आऊच..”, जेनी एकदम पोटावर हात ठेवत म्हणाली..
“काय झालं?? यु ऑलराईट?”, दचकत दिपक म्हणाला..

“लाथ मारली बाळानं.. सो सॉरी.. वुई मिस्ड यु सोsssssssss मच..”, पोटाकडे बोट दाखवत जेनी हसत म्हणाली…
“अ‍ॅन्ड मी टु….”, जेनीच्या पोटावरुन हात फिरवत दिपक म्हणाला…

एकदम काही तरी आठवले तसं जेनीने पर्समधुन एक कागद काढुन दिपक कडे दिला..

“हे काय?” दिपक
“बघ तरी.. बाळाचा फोटो आहे.. काल शेवटची सोनोग्राफी होती ना.. तेंव्हा तेथे प्रिंट काढुन दिला…”, जेनी हसत हसत म्हणाली..

दिपकने तो कागद उत्सुक्तेने काढुन घेतला आणि तो पाहु लागला… तेवढ्यात महादेवने ऑर्डर आणुन ठेवली होती.

“अगं कसला फोटो आहे हा? काहीच कळत नाहीये..”, दिपक
“अरे हे बघ ना..”, पुढे सरकत जेनी म्हणाली, “हे बघ असं.. हे बाळाचं डोकं आहे वरच्या बाजुने… हा.. इकडे दिसतो आहे तो बाळाचा हात.. हे इथं हार्ट आहे..” जेनी सांगत होती आणि दिपक आपलं माना डोलावत होता.

“.. आणि हे नाक बघ अगदी तुझ्यासारखं आहे लांब….”, जेनी दिपकचे नाक ओढत म्हणाली..

दिपक आणि जेनी गप्पांमध्ये अगदी रंगुन गेले होते.. बाहेर विजा चमकल्या तसे दोघं गप्पांमधुन बाहेर आले..

“ओह माय गॉड.. पाऊस येणार आहे जोरात.. ९.३० वाजुन गेले आहेत.. चलं जाऊ यात…”, दिपक
“ए.. काय रे.. सैनिक ना तु? पावसाला कसला घाबरतोस तु? कित्ती मस्त हवा पडली आहे..”, जेनी..
“मॅडम.. टॅक्सी मिळणार नाही.. परत ट्रॅफीक जाम होतं.. आपल्याला जपलं पाहीजे आता म्हणुन बाकी काही नाही..” दिपक काऊंटरला बिलाची खुण करत म्हणाला…

जेनीने चहा संपवला आणि बिल पे करुन दोघं बाहेर पडले.

एव्हाना जोराचा वारा सुटला होता.. कुठल्याही क्षणी जोरदार पाऊस कोसळणार होता..

दिपक आणि जेनी कॅफेमधुन बाहेर आले….

“ए.. आले रे.. अंकल आन्टी आले बघ…” परत मगाचचाच आवाज आला..
“सोल्जर सोल्जर.. मिठी बाते बोलकर…”, दुसरा आवाज

“तेरी मा की…”, स्वतःशीच पुटपुटत दिपक मागे वळला, परंतु जेनीने त्याला पुन्हा थांबवले…

“दिपक.. जाऊ देत रे.. ते बघ कोपर्‍यावर टॅक्सी आहे.. नको चिडुस एव्हडा.. जाऊ देत चल…”, जेनी

दिपक नाईलाजानेच मागे वळुन टॅक्सीच्या दिशेने जाऊ लागला..

“तुझ्यायला.. बायकोच्या पदराखालचं मांजर दिसतेय हे सोल्जर.. गेला लगेच घाबरुन..”, परत एक आवाज
“काय माहीत खराच सैनिक आहे का बहुरुपीया आहे.. दिवसभर घरोघरी फिरुन पैसे गोळा करुन आला असेल इथं…” दुसरा आवाज..

सगळे जण एकमेकांना टाळ्या देत जोरजोरात हसत होते..

प्रत्येक शब्द.. प्रत्येक आवाजाबरोबर तापट स्वभावाच्या दिपकची मेंदुची शिर ताणली जात होती. त्याच्या संतापाचा पारा चढत चालला होता. केवळ जेनीखातर तो शांतपणे चालला होता..

“मी सांगतो हा बहुरुपीच असणार…”
“कश्यावरुन??”
“अरे त्याच्याबरोबरच्या त्या आयटमचे पोट बघ ना.. हा सैनिक असता तर ही गेम झालीच नसती.. तो तिकडे सेवेत असताना तिला प्रेग्नंट कसं करणार? अं?”
“का? त्यात काय अवघड आहे? तो तिथं असताना त्या आयटमचा दुसरा कोण तरी असणार इथं.. तोच डल्ला मारुन गेला असणार…”

दिपक स्वतःबद्दल बोललेले एकवेळ सहन करु शकत होता.. पण जेनीबद्दल… नो वे..! आणि त्यांच्या होणार्‍या बाळाबद्दल..

“धिस इज इट..”, जेनीचा हात सोडुन दिपक माघारी फिरला.. जेनीला त्याला थांबवायला वेळ सुध्दा मिळाला नाही…

दिपक ताड ताड पावलं टाकत त्यांच्यापाशी गेला..

टोळक्यातली पोरं टोरं बेसावध होती.. त्यांच्या दृष्टीने फार तर फार तो वादा-वादी करणार होता आणि त्याने मारामारीचा प्रयत्न केलाच असता तरी तो एकटा विरुध्द ते सहा सात जण होते.. पण दिपकने त्यांचा अंदाज चुकीचा ठरवला, दिपक सरळ त्या टोळक्यात घुसला, एकाची कॉलर धरुन त्याला पुढे ओढला आणि त्याच्या हनुवटीवर एक जोरदार ठोसा लगावुन दिला.

अनपेक्षीत अश्या त्या प्रहाराने तो तरुण धडपडत खाली कोसळला.

भांबावलेल्या बाकीच्यांनी एकदमच दिपकवर धाव घेतली. पण दिपक सावध होता. त्याने खाली वाकुन सर्वांचे ठोसे चुकवलेच पण त्याचबरोबर एक दो्घांच्या पोटात अश्या काही फाईट्स लगावल्या की त्यांच्या डोळ्यासमोर अंधेरीच आली.

समोरुन दिपकशी दोघ जण झुंजत असताना एक जण गोल फिरुन दिपकच्या मागुन त्याला पकडायला आला आणि तिच त्याची मोठ्ठी चुक ठरली, पुर्णपणे सावध असलेल्या दिपकने सण्णदिशी एक लाथ त्याच्या तोंडावर मारली. मिलीटरी जाड, लेदर सोलच्या त्या शुजचा प्रवाह त्या तरुणाच्या जबड्यावर बसला. तो प्रवाहर इतका जोरदार होता की त्या तरुणाचा जबडाच फाटला आणि त्यातुन रक्त वाहु लागले.

मुसळधार पावसाला सुरुवात झाली होती, पण दिपक थांबण्याच्या मुडमध्ये नव्हता. त्याच्या डोक्यातला संताप अजुनही भडकत होता. त्याने खाली कोसळलेल्याला पुन्हा उठवले आणि एक थोबाडावर आणि दोन-चार पोटात ठोसे लगावले. तो तरुण कोणताही प्रतिकार न करता मार खात राहीला. एव्हढ्यात दिपकच्या सैनिकी नजरेने उजव्या बाजुच्या कोपर्‍यात काहीतरी चमकताना पाहीले. इतर कोणत्याही इसमाच्या दृष्टीने ती गोष्ट टिपली नसती, पण दिपक सावध होता. उजव्या कोपर्‍यातुन त्याच्यावर चालुन येणार्‍या तरुणाच्या हातातील चाकु विजांच्या प्रकाशात त्याला दिसला होता. दिपकने तो वार सहज चुकवला. वेगाने केलेला वार चुकल्याने तो तरुण हेलपांडत खाली झुकला त्याचवेळी दिपकने आपल्या गुडघ्यांचा वार त्याच्या तोंडावर केला.

त्या तरुणाचा नाकाचा घोळणा फुटला आणि त्यातुन रक्त वाहु लागले.

एव्हाना सुरुवातीला कोसळलेले ते दोन तरुण झाल्या प्रकारातुन सावरले होते. एकुण प्रकरण आपल्या हाताबाहेरचे आहे हे लक्षात येताच ते सावकाश आपल्या गाडीत परतले. त्यांनी गाडी सुरु केली आणि तेथुन सटकु लागले.

पण दिपक.. त्यांना सहजा सहजी असा थोडच जाऊ देणार होता. गाडीचा आवाज येताच तो त्यांच्या मागे धावु लागला. दिपक गाडीच्या मागे धावत येतो आहे हे आरश्यात दिसताच दोघेही घाबरुन मागे मागे पाहु लागले आणि त्याच वेळी… त्याच वेळी समोर असलेली जेनी.. वेगाने तिच्या दिशेने येणारी जिप दिसत असुनही पटकन बाजुला होऊ शकली नाही. जिपच्या बंपरची एक जोरदार धडक तिच्या पोटाला बसली.

जेनी हवेत उंच फेकली गेली आणि क्षणार्धात खाली कोसळली.

“जेनीsssssssssss”, दिपक ओरडला.. पण जे व्हायला नको होते तेच घडले होते.

जिप न थांबता निघुन गेली.

जेनीच्या भोवती लोकांच कोंडाळ जमु लागलं होतं. दिपक संतापाने बेभान झाला होता. त्याने मागे वळुन बघीतले. हातात सुरा घेतलेला तो तरुण अजुनही नाकातुन वाहणारे रक्त थांबवण्याचा प्रयत्न करत होता.

दिपक त्वेषाने त्याच्याकडे धावत गेला. दिपकला येताना पाहुन तो तरुण पुन्हा सरसावला. परंतु दिपक वेगाने त्याच्याजवळ पोहोचला. उगारलेल्या सुर्‍याचा हात त्याने हवेतल्या हवेत पकडला आणि पिरगाळला.

‘कड.. कड्ड कड्ड’ हाड मोडण्याचा आवाज येत तो हात खाली आला. दिपकने त्याच्या हातातील सुरा काढुन घेतला आणि त्या तरुणाच्या पोटात खुपसला…

एक.. दोन.. तिन.. चार.. सपासप तो सुरा त्या तरुणाच्या पोटातुन आतबाहेर येत राहीला…..

दुरुन पोलिसांच्या सायरनचा आवाज येत होता जेंव्हा रक्तबंबाळ अवस्थेतील निर्जीव पडलेल्या जेनीला दिपक मांडीवर घेऊन जागं करण्याचा प्रयत्न करत होता.

[क्रमशः]