भारत जोडो अभियानाचे जनक : बाबा आमटे Nagesh S Shewalkar द्वारा नियतकालिक मराठी में पीडीएफ

Featured Books
श्रेणी
शेयर करा

भारत जोडो अभियानाचे जनक : बाबा आमटे

भारत जोडो अभियानाचे जनक : बाबा आमटे

'मी देवाच्या शोधाला गेलो. देव मला सापडला नाही. मी आत्म्याच्या शोधाला गेलो. आत्मा मला सापडला नाही. मग मी माझ्या भावांच्या सेवेला गेलो. तेथे मला देवही दिसला नि आत्माही मिळाला.' हे विचार मांडणारी व्यक्ती म्हणजे सुप्रसिद्ध समाजसेवक आणि कुष्ठरोग्यांचे तारणहार असणारे बाबा आमटे!

महाराष्ट्रातील एक जिल्हा म्हणजे वर्धा! या जिल्ह्यातील हिंगणघाट या गावी देवीदास हरबाजी आमटे यांचे वास्तव्य होते. ते इंग्रज सरकारच्या कार्यालयात लेखापाल या मोठ्या पदावर काम करीत होते. विदर्भातील वरोरा या गावाजवळ असलेल्या गोरजे गावचे ते जमीनदार होते. भरपूर जमीन होती. एक श्रीमंत, धनाढ्य घराणे अशी त्यांची ख्याती होती. त्यांच्या पत्नीचे नाव लक्ष्मीबाई होते. २६ डिसेंबर १९१४ या दिवशी देवीदास आमटे यांच्या घरात एक मुलगा जन्मला. ती त्यांची पहिली संतती! या मुलाचे नाव मोठ्या उत्साहात आणि थाटामाटात मुरलीधर असे ठेवण्यात आले. त्यांच्या पोटी जन्म घेतलेला मुरलीधर हा पहिलाच मुलगा असल्यामुळे तो सर्वांचा लाडका होता. लाडालाडात मुरलीधरचा बाबा कधी झाला हे कुणालाही समजले नाही आणि सगळेजण मुरलीधरला बाबा याच नावाने बोलावू लागले. कालांतराने बाबा हेच नाव सर्वदूर परिचित झाले. असे म्हणतात की, बाबांचे बालपण अतिशय थाटामाटात गेले. त्यांना झोपण्यासाठी लहानपणी सोन्याचा पाळणा होता तर त्यांना खाऊपिऊ घालण्यासाठी चांदीचे चमचे होते. एखाद्या राजकुमाराप्रमाणे त्यांची व्यवस्था होती. रेशमचा कुर्ता, डोक्यावर जरीची टोपी आणि पायात घालायला छानशी महागडी चप्पल! बाबा आमटे यांना लहानपणी चित्रपटांची खूप आवड होती. त्यातही इंग्रजी चित्रपटांचे त्यांना वेडं होते. केवळ चित्रपट पाहून ते स्वस्थ बसायचे नाहीत तर पाहिलेल्या चित्रपटावर छानसे समीक्षण लिहायचे. या त्यांच्या आवडीतून त्यांचा ग्रेटा गार्बो आणि नोर्मा शेअरर अशा कलाकारांसोबत त्यांचा परिचय आणि नंतर पत्रव्यवहार सुरु झाला. महत्त्वाचे म्हणजे जेव्हा बाबा आमटे यांनी कुष्ठरोग्यांसाठी मदत सुरु केली त्यावेळी नोर्मा हिने मोलाची मदत केली होती.

बाबा आमटे यांचे शिक्षण ख्रिश्चन मिशन स्कुलमध्ये झाले. १९३४ साली बाबा बी. ए. झाले. एम. ए. उत्तीर्ण झाल्यानंतर बाबा नागपूर महाविद्यालयातून एल.एल.बी. परीक्षा उत्तीर्ण झाले. नागपूर येथे त्यांनी वकिलीचा व्यवसाय सुरु केला. बाबांना शिकार करण्याची अत्यंत आवड होती. जंगलात जाऊन बाबा रानडुक्कर आणि हरीण या प्राण्यांची शिकार करीत असत. असे म्हणतात की, बाबाजवळ असलेल्या स्पोर्ट्स कारच्या आसनांना प्राण्यांच्या कातडीचे आवरण असे. शिकारीसोबतच बाबांना टेनिस आणि ब्रिज या खेळांची आवड होती. वकिलाचा व्यवसाय करत असताना बाबांच्या जीवनात एक अत्यंत महत्त्वाची घटना घडली आणि त्यामुळे बाबांच्या जीवनात आमुलाग्र बदल झाला. बाबा आमटे हे विनोबा भावे यांच्याकडे आकर्षित झाले. त्यांच्या विचाराने प्रभावित झालेल्या बाबांनी संपूर्ण भारत देशाचा दौरा केला. एकदा बाबांनी 'वंदे मातरम्' अशा घोषणा दिल्या. त्याचा परिणाम असा झाला की, त्यांना एकवीस दिवसांचा कारावास भोगावा लागला. जनतेच्या अनेक समस्या, प्रश्न जाणून घेतले. गरिबी, अन्याय, अंधश्रद्धा, निरक्षरता अशा अनेक गोष्टींची जाणीव बाबांना झाली. या समस्या दूर करण्यासाठी कार्य करण्याचा त्यांनी मनोमन निश्चय केला. विद्यालयीन शिक्षण घेत असताना रवींद्रनाथ टागोर यांच्या कविता बाबांना खूप आवडत असत. बाबांनी टागोरांच्या शांतीनिकेतनला भेट देऊन त्यांच्या कार्याचा अभ्यास आणि पाहणी केली. टागोर यांच्या प्रमाणेच बाबा महात्मा गांधी, साने गुरुजी यांच्यासह मार्क्स आणि माओ यांच्याकडे, त्यांच्या विचारांकडे आकर्षित झाले. महात्मा गांधी यांची भेट झाल्यानंतर त्यांनी चरखा आणि खादीला पसंती दिली. ते खादी पोशाख वापरु लागले.

दरम्यान बाबा आमटे यांचा विवाह ८ डिसेंबर १९४६ ला साधना घुले (गुलशास्त्री) यांच्यासोबत झाला. त्या ताई या नावाने ओळखल्या जात. ताईंचा जन्म ५ मे १९२७ रोजी नागपूर येथे झाला. त्यांच्या वडिलांचे नाव कृष्णशास्त्री घुले असे होते. हे घराणे कर्मठ आणि वेदोक्त घराणे म्हणून ओळखले जात होते. त्यांचे माहेरचे नाव इंदू! इंटरपर्यंत शिक्षण घेतलेल्या ताईंची विचारसरणी बाबा आमटे यांच्या विचारसरणीशी मिळतीजुळती होती. ताईंनाही सामाजिक कार्याची भरपूर आवड होती. लग्नापूर्वी ताईंनी सामाजिक कार्याचा श्रीगणेशा केला होता. हरिजन वसाहतीतील लोकांना सार्वजनिक नळावर पाणी भरायला बंदी होती हे पाहून ताईंनी स्वतःच्या वाड्यातील विहिरीचे पाणी काढून या लोकांना देण्याचे महान कार्य केले. मानवतेवर त्यांचा मोठा विश्वास होता. बाबा आणि साधनाताई यांच्या लग्नाचा एक किस्सा सांगितला जातो. बाबा आमटे एकदा एका लग्नासाठी नागपूरला गेले होते. त्यावेळी त्यांनी एखाद्या साधूप्रमाणे दाढी वाढवली होती. तिथे त्यांची भेट साधनाताईंशी अर्थात इंदूताईंसोबत झाली. आश्चर्य म्हणजे त्यांचे प्रेम बसले. दुसरीकडे इंदूताईंची अवस्था वेगळी नव्हती. परंतु त्यांच्या घरी हे लग्न आणि जावाई म्हणून बाबा पसंत नव्हते. शेवटी विरोध पत्करून बाबा-इंदू हा प्रेमविवाह पार पडला. त्यानंतर साधनाताईंचा बाबा आमटे यांच्या प्रत्येक सामाजिक कार्यात त्यांचा महत्त्वपूर्ण सहभाग असे.

बाबा आमटे यांच्या आयुष्यात अजून एक घटना घडली. एकेदिवशी मुसळधार पाऊस पडत होता. बाबा आमटे हे कामानिमित्त बाहेर पडले होते. त्यांनी पाहिले की, एक माणूस रस्त्यावर पडला होता. खूप माणसे त्याला पाहून पुढे जात होती परंतु कुणीही त्याला मदत करत नव्हते. बाबा आमटे यांनी विचार केला की, अशी वेळ कुणावरही अगदी माझ्यावरही येऊ शकते. त्याला मदत करायला हवी या विचाराने बाबा आमटे त्या माणसाजवळ पोहोचले आणि त्या माणसाला लोक का मदत करत नव्हते हे त्यांच्या लक्षात आले कारण त्या माणसाला कोड होता. त्या आजाराने त्याचे सर्वांग व्यापले होते. हातपाय झडलेले होते. जिथे प्रत्येकाला त्या माणसाबद्दल घृणा वाटत होती तिथे बाबा आमटे यांच्या मनात त्या गृहस्थाबद्दल माया, कणव, सहानुभूती उत्पन्न झाली. बाबांनी कोणताही विचार केला नाही. त्या आजाराने पछाडलेल्या व्यक्तीला सरळ स्वतःच्या घरी घेऊन आले. त्यांच्या या कृत्याचा साधनाताई यांना राग आला नाही उलट अभिमान वाटला. त्यानंतर १९४९-५० या वर्षात बाबा आमटे यांनी कुष्ठरोगाचे शिक्षण घेतले, अभ्यासक्रम पूर्ण केला. आजाराची लक्षणे, परिणाम, दुष्परिणाम सारे काही समजून घेतले. साधनाताई यांच्याबरोबर सातत्याने चर्चा करीत असताना त्यांनी कुष्ठरोगाने आजारी असलेल्या सात माणसांवर उपचार सुरू केले. बाबा आमटे यांच्या कुटुंबात दोन मुलांचा जन्म झाला. विकास आणि प्रकाश अशी त्यांची नावे ठेवण्यात आली. बाबा आणि साधनाताईंनी एक फार मोठा धाडसी निर्णय घेतला. त्याप्रमाणे हे दोघे पती-पत्नी आपल्या दोन मुलांना आणि कुष्ठरोगाने बाधित असलेल्या त्या सात आजारी व्यक्तींना घेऊन चंद्रपूर जिल्ह्यातील वरोरा या गावाजवळ असलेल्या पडीत माळरानात येऊन राहिले. सुरूवातीला 'ना छप्पर ना स्वच्छ जमीन' अशी अवस्था होती. एक झाड हेच त्यांचे निवासस्थान! भविष्यात हेच निवासस्थान कुष्ठरोग्यांचे माहेरघर, हक्काचे निवास असलेले, देशविदेशात कीर्ती पोहोचलेले 'आनंदवन!' आनंदवन या आश्रमाचा सुरुवातीपासूनच एक मंत्र आहे, 'श्रम हाच श्रीराम आमचा!' या नाऱ्याने प्रेरित होऊन आनंदवनात उपचारासाठी आलेले आजारी लोक या आश्रमालाच स्वतःचे घर समजून कष्ट करून जीवन जगत होते. पैशासाठी इतरांसमोर पसरणारे हात अनेक हातांना आधार देण्याचे काम करू लागले. स्वावलंबन हा त्यांचा फार मोठा आधार बनला. ज्या आजारी व्यक्तींना स्पर्श करणे तर सोडा जवळ जायचे लोक टाळत होते अशा आजारी माणसांच्या जखमा धुवून मलमपट्टी करणे, प्रसंगी त्यांना जेवू घालणे अशी कामे हे दांपत्य आपल्या मुलांसह आणि इतर लोकांना मदतीला घेऊन करु लागले. शारीरिक स्वच्छता करतांना या आजाऱ्यांनी गमावलेला आत्मविश्वास, जगण्याची दुर्दम्य इच्छा त्यांच्या मनात निर्माण केली. त्यामुळे निराश झालेल्या व्यक्ती जिथे स्वतःचे जीवन संपविण्याचा विचार करत होते त्याच व्यक्ती आमटे कुटुंबीयांच्या प्रयत्नाने माणूस म्हणून जीवन जगू लागले. त्या कुष्ठरोग हा संसर्गजन्य आजार आहे ही बाब जवळपास सर्वमान्य होती. जिथे कुष्ठरोगाने पछाडलेल्या माणसाला समाज बहिष्कृत करीत असे तिथे त्याचे कुटुंबीयसुद्धा त्याला घराबाहेर काढायला मागेपुढे पाहत नसत. अशा वाळीत टाकलेल्या लोकांना बाबांनी जवळ केले, त्यांना आधार दिला. कुष्ठरोग हा संसर्गजन्य आजार नाही हे बाबा आमटे लोकांच्या मनात ठसविण्याचा प्रयत्न करीत असत. हा संसर्गजन्य आजार नाही हे स्वतःच्या पुढाकारातून पटवून देण्यासाठी बाबा आणि ताईंनी एक निर्णय घेतला. त्याप्रमाणे त्यांनी कुष्ठरोग असलेल्या एका मातापित्याची मुलगी दत्तक घेतली. दत्तक असली तरीही त्या मुलीला केवळ मंगला हे नाव देऊन ते थांबले नाहीत तर स्वतःच्या इतर दोन अपत्याप्रमाणे तिला स्वतःची मुलगी मानून तिचे पालनपोषण केले. विलास मनोहर या युवकासोबत मंगलाचे लग्न लावून दिले. कुष्ठरोगी स्वावलंबी व्हावेत, त्यांचे पुनवर्सन व्हावे या उद्देशाने आश्रमातील प्रत्येक जण लहानमोठे काम करत असे. त्यातून आश्रमासाठी आर्थिक मदत मिळत असे. त्या गावात एक अत्यंत श्रीमंत व्यक्ती राहात होती. तो दरवर्षी एकदा गावातील गरिबांना जेवण देत असे. हे जेवण भिकारजेवण या नावाने ओळखल्या जात असे. दुसऱ्या शब्दात ते जेवण गरिबांसाठी म्हणजेच त्या श्रीमंतांच्या शब्दात भिकाऱ्यासाठी असे. एके वर्षी या श्रीमंत गृहस्थाने आश्रमातील कुष्ठरोग्यांना जेवणासाठी पाठवावे असा निरोप बाबांकडे पाठवला. भिकारजेवणासाठी कुष्ठरोग्यांना आमंत्रण म्हणजे हा कुष्ठरोग्यांचा अपमान आहे असे मानून बाबा प्रचंड संतापले. भोजनाच्या दिवशी बाबा आणि साधनाताई दोघेच त्या श्रीमंताकडे गेले आणि म्हणाले की, 'आमच्या आश्रमात आम्ही दोघेच भिकारी आहोत.' बाबांच्या आश्रमात कुष्ठरोग्यांना कशी सन्मानाची वागणूक होती ते या उदाहरणातून लक्षात येते.

बाबा आमटे यांनी जसे कुष्ठरोगाने आजारी माणसांची सेवा करण्यासाठी स्वतःला वाहून घेतले त्याचबरोबर त्यांनी इतर क्षेत्रात समाजसेवेलाही सर्वस्व मानले. मानवा-मानवामध्ये प्रेम निर्माण व्हावे, एकता वृद्धिंगत व्हावी या उद्देशाने त्यांनी 'भारत जोडो' या अतिशय महत्त्वाच्या अभियानांतर्गत खूप काम केले. या अभियानाची व्याप्ती काश्मीर ते कन्याकुमारीपर्यंत होती. या दरम्यान बाबा आमटे यांनी जवळपास चार हजार किलोमीटर पेक्षा जास्त लांबपल्ल्याचा प्रवास केला. या यात्रेत बाबांसोबत शंभर मुले आणि सोळा मुली होत्या. विशेष म्हणजे ही सारी तरुणाई पस्तीस वर्षाखालील वय असलेली होती. या चळवळीचा अजून एक उद्देश असा होता की, जनतेमध्ये पर्यावरणाबद्दल जाणीव निर्माण करून जागृती करणे. देशात ठिकठिकाणी अशांतता, असंतोष होता तो दूर करून एक सौहार्दाचे वातावरण निर्माण करणे यासाठी हा प्रयत्न होता. बाबांची भारत जोडो यात्रा अनेक राज्यांना भेटी देत गुजरात, मध्यप्रदेश, उत्तरप्रदेश, दिल्ली मार्गे पंजाब राज्यात पोहोचली. पंजाब राज्यात त्यावेळी आतंकवाद माजला होता त्यामुळे लोकांमध्ये जसा असंतोष होता तशीच एक प्रकारची भीती आणि दहशतीचे वातावरण होते. पंजाबमध्ये असलेली अमृतसर, गुरदासपूर आणि माझा या गावात अपराधजन्य घटना घडत होत्या. बाबा आमटे यांनी या गावांना भेटी दिल्या आणि आतंकवादाने भयभीत असलेल्या लोकांसोबत चर्चा केली. त्यांना धीर दिला. यासोबतच बाबा फरीदकोट, डोराबाबा, नानक, तरनतारण, फगवाडा, कपूरतला अशा गावातही गेले. पंजाबमधील लोकांशी चर्चा केल्यानंतर बाबांना जाणवले की, पंजाबमधील अधिकतर जनता भलेही नाराज असेल पण ती खलिस्तानचे समर्थन करीत नाही.... भारतीय स्वातंत्र्य चळवळीतही बाबा आमटे यांनी महत्त्वपूर्ण असे योगदान दिले आहे. महात्मा गांधी यांच्या नेतृत्वाखाली त्यांनी वेगवेगळ्या आंदोलनात भाग घेतला. १९४२ यावर्षी सुरु झालेल्या 'भारत छोडो' या आंदोलनात सक्रीय सहभाग तर नोंदवलाच पण या आंदोलनात ज्या आंदोलनकर्त्यांना सरकारने पकडले होते अशा आंदोलकांचे खटले चालवण्यासाठी भारतातील वकिलांना संघटित करण्याचे फार मोठे काम बाबा आमटे यांनी केले.

बाबा आमटे यांच्या संघर्षमय जीवनातील घटनांचा मागोवा घेत असताना नर्मदा नदीवर उभारण्यात येणाऱ्या प्रकल्पात त्यांनी बजावलेल्या कामगिरीची नोंद घेणे क्रमप्राप्तच आहे. पर्यावरण हा बाबांच्या आवडीचा विषय. मध्यप्रदेश आणि गुजरात या दोन राज्यांमधून प्रवास करणारी एक मोठी नदी म्हणजे नर्मदा नदी! सरकारी योजनेनुसार नर्मदा नदीवर 'नर्मदा सागर' आणि 'सरदार सरोवर' अशी दोन मोठी धरणे बांधण्यात येणार होती परंतु यामुळे या दोन्ही प्रकल्पाच्या परिसरातील सामान्य जनता आणि शेतकरी अडचणीत येण्याची शक्यता होती. अनेकांना आपापली घरे सोडून विस्थापित होण्याची वेळ येणार होती. या भागातील जनतेच्या पुनर्वसन करण्याची पुरेशी आणि योग्य ती काळजी सरकारने घेतली नाही असा एक मतप्रवाह निर्माण झाला होता. तसेच दोन्ही प्रकल्पांमुळे फार मोठे जंगल क्षेत्र पाण्याखाली जाऊन नैसर्गिक पर्यावरण बिघडण्याची शक्यता होती. त्यामुळे त्या भागातील जनतेने या प्रकल्पांविरोधात फार मोठा लढा उभारला होता. मेधा पाटकर यांनी 'नर्मदा बचाव' हे आंदोलन सुरु केले होते. बाबा आमटे यांनी या दोन्ही प्रकल्पांचा सखोल अभ्यास केला, आंदोलकांशी, स्थानिक जनतेशी चर्चा केली. आणि बाबा आमटे यांनी या आंदोलनाला केवळ मौखिक पाठिंबा दिला असे नाही तर या आंदोलनाचे नेतृत्व केले. तब्बल बारा वर्षे बाबांनी नर्मदा तीरी मुक्काम ठोकला होता. त्यामुळे पाटकर आणि स्थानिक आंदोलकांना फार मोठे बळ मिळाले.....

बाबा आमटे यांच्या कार्याची दखल देशविदेशात घेण्यात आली. त्यांना अनेक पुरस्कार मिळाले. पद्मश्री पुरस्कार (भारत,१९७१), जमनालाल बजाज पुरस्कार(१९७९), डी. लिट. (नागपूर विश्वविद्यालय, १९८०), डेमियन डट्टन पुरस्कार (अमेरिका, १९८३), रेमन मॅगेसेस (फिलीपीन, १९८५), पद्मभूषण (भारत, १९८६), डी. लिट. (पुणे विद्यापीठ, १९८५-८६), घनश्यामदास बिर्ला आंतरराष्ट्रीय पुरस्कार (१९८८), मानवाधिकार पुरस्कार (संयुक्त राष्ट्र, १९८८), टेंपलटन पुरस्कार (धार्मिक क्षेत्रातील नोबल, १९९०), पर्यावरण पुरस्कार (ग्लोबल पाचशे संयुक्त राष्ट्र,१९९१), लाइवलीहुड पुरस्कार (स्वीडन, १९९२), गांधी शांती पुरस्कार (१९९९), महाराष्ट्रभूषण (महाराष्ट्र सरकार, २००४) परंतु नर्मदा आंदोलनात सहभागी होताना बाबांनी पद्मविभूषण हा पुरस्कार भारत सरकारला वापस केला.

२००८ यावर्षी बाबा आमटे यांनी वयाच्या चौऱ्यान्नव वर्षात प्रवेश केला. ९ फेब्रुवारी २००८ यादिवशी त्यांचे कर्करोगाने दु:खद निधन झाले....

नागेश सू. शेवाळकर