लायब्ररी - 3 Sweeti Mahale द्वारा सामाजिक कथा मराठी में पीडीएफ

Featured Books
श्रेणी
शेयर करा

लायब्ररी - 3

शेवटी दुखरा पाय ओढत मी लायब्ररी पर्यंत पोहोचले आता मात्र मला शोध लावायचाच होता. आल्या पासून मी चौकस नजरेने आजूबाजूला लक्ष ठेऊन होते ,आधी हा प्रयोग केला नव्हता अस काही नाही कॉलेज ला आल्या पासून नकळत पणे लक्ष आजू बाजूला जात होतं.लायब्ररी मधे रोज येत असेल ना तो म्हणजे आजही दिसेल मी आजू बाजूला पूर्ण लक्ष ठेऊन होते. पण माझं bad luck की कॉलेज ची लायब्ररी एवढी मोठी की पूर्ण भाग फिरून पाहायचा म्हणजे एक तास तरी आरामात जाईल आणि हे महाशय कोणत्या कोपऱ्यातून आले आणि कुठे गेले याचा शोध मला कसा लागणार बर हे मला पाहून कदाचित हळूच काढता पायही घेत असतील तर मला कस कळणार तस दोन वर्षात निम्मं कॉलेज ओळखीचं झालं होतं येणारे जाणारे सगळेच चेहरे ओळखीचे असायचे गप्पा गोष्टी hi हॅलो सगळंच चालायचं मात्र ग्रुप मध्ये हे सांगायचं मी मुद्दामच टाळलं कारण हेच की सगळे मिळून जो इज्जतीचा पंचनामा करतात त्या पेक्षा गप्प राहिलेलं बरंच,
दिवसभर क्लास मध्ये बसूनही मी तासभर का होईना तिकडे वेळ घालवायची. संध्याकाळी घरी जायच्या आधी मी घाई घाईत हातात येईल ते पुस्तक घेऊन घरी पळाले.आणि या वेळी ही ते नीट चाळून बघितलं त्यात काहीच नव्हतं आणि घरी जाऊन बघते तर तर पुन्हा एक पत्र….ते पाहून मी तर डोक्यालाच हात लावला,
प्रिय निकिता
     तू मला शोधायचा जोरदार प्रयत्न चालू केलेला दिसतोय माझ्या लक्षात आलं , काहीही असो पण तू माझा वेगळा असा विचार तर करायला लागलीस!! छान वाटलं.एक सांगू माझा ना प्रेमावर विश्वास नव्हता आधी मी प्रेमाला फक्त एक संकल्पना मानायचो साधारण तीन-चार महिन्यांपूर्वीची गोष्ट असेल जेव्हा मी पहिल्यांदा तुला भेटलो ,साधासा पंजाबी ड्रेस केसांची घट्ट वेणी आणि कसलाच थाट नसलेली तू तुझ्या मैत्रिनिंबरोबर चालली होतीस , मी ही समोरून येत होतो तुमचं लक्ष नव्हतं बहुतेक पन जवळून जाताना ना तुझ्या पायातल्या पैंजनांचा आवाज ऐकून का कोण जाने माझी नजर आपोआप वर उठली गेली, मी क्षणभर तुला पाहतच राहिलो,मी सौदर्याला जास्त महत्व देत  नाही. कुणी सुंदर दिसत म्हणून भाळून जाव असाही माझं Nature नाही.पण तुला पाहील्यावर माहीत नाही का मला असं वाटलं की माझा शोध संपला.सौदर्य नाही तर मला तुझ्यातली तू दिसलीस याचा अर्थ असाही नाही की तू सुंदर नाहीस पण का कोण जाणे मला आणखी काही आवडलं जे इतरांपेक्षा वेगळं वाटलं काय ते माझ्या तेव्हा लक्षात येईना पण त्याच उत्तर त्यांनतर दोनच दिवसांनी मला मिळालं,जेव्हा मी ते पुस्तकातलं  पान तुझ्यासमोर फाडलं आणि तेव्हाच तुझ्या त्या निरागसतेने मला प्रेमाच्या खोल दरीत खेचून नेलं तुझी ती निरागसता आवडली, तुझं हसू आवडलं तुझं रागावणं आवडलं अजून काय सांगू तुझे सगळे भाव मी टिपलेत तुझ्या नकळत त्याबद्दल सॉरी पण काय करु स्वताला थांबवता येईना …
मी आपला कधी मुलींकडे मान वर करूनही न पाहणारा मी आणि आता मी माझ प्रेम या प्रकारे व्यक्त करतोय योग्य की अयोग्य देव जाणे पण माझ्या भावना खऱ्या आहेत ती स्वीकार अथवा त्याचा अस्वीकार कर त्याने जास्त काही फरक पडत नाही. मी आहे असाच राहणार दुरून तुझ्यावर प्रेम करणारा तू नसताना मनात झुरणारा.…तू शोधायचा प्रयत्न चालू केलास आणि आणि हवेत तरंगणारा मी क्षणात खाली आलो तुला भावना तर व्यक्त केल्या पण पुढे काय??? हे तुला बोलणं शेवटचं कृपा करून मला शोधण्याचा प्रयत्न करू नको.माझं एकतर्फी प्रेम unknown च राहील तर बरं होईल मी  तुझ्याकडून फक्त याच मदतीची अपेक्षा करतो…
                           तुझाच 
                        असून नसलेला
आता पर्यंत मला स्वप्नातही कधी वाटलं नव्हतं की कुणी माझ्यावरही प्रेम करेल.माझं ते वेंधळ ध्यान आठवून मलाच माझी कीव यायची आणि हा असा कोण महाशय जो माझ्या प्रेमात पडला असेल??? खर तर मला त्याच्या अतिसामान्य आवडीची हसायला आली, अजूनही मला काही खर वाटेना ,अरे बापरे म्हणजे हाच तो मुलगा ज्याने ते पान फाडलं!! शीट यार मी पाहायला हवे होत.मी बराच वेळ डोक्याला ताण देऊन त्या दिवशी ज्याने ते पान फाडलं त्या मुलाचा चेहरा आठवण्याचा प्रयत्न केला पण काही आठवेल तर शप्पथ कारण तसही मी रागाच्या भरात त्याचा चेहरा पहिला नव्हता.तो तेव्हाच आठवत नव्हता तर आता कसा आठवणार.एक एक गोष्ट त्याला माहित आहे माझ्याबद्दल,… अरे त्याने उल्लेख केलला की तो रोज मला भेटायचा पण कसा मला तर कुणी अस आठवत नाही!!!.बराच वेळ विचार करून मला एक कल्पना सुचली त्याच पत्राच्या मागे मी उत्तरादाखल एक मजकूर लिहिला मी तुला भेटू शकते का?
दुसऱ्याच दिवशी उत्तर आलं नाही… कृपा करून मला शोधण्याचाही प्रयत्न करू नकोस आणि हे उत्तर मात्र या वेळी मला पोहोचलं अस दर वेळीच होईल असं काही नाही…आपल्या संभाषणात अनेक असे अव्यक्त चेहरेही सहभागी असतात हे विसरू नको त्यामुळे ही पद्धत इथेच बंद केलेली बरी….
अरे!!! काय हे!! आता असही बोलणं बंद ??  पहिल्यांदा कुणीतरी माझ्यावर प्रेम असल्याची कबुली द्यावी आणि तो कोण हे ही मला माही नसावं??हे मात्र मला काही पटेना .
याता कितीही नाही म्हंटल तरी मला एक नवा छंद लागला कोण असेल तो?? कसा असेल या तारुण्यसुलभ कल्पना येण तर साहजिकच पण एक लहर तर मनात उठलीच होती. भेटायची उत्सुकता मात्र लागलीच होती. आज कितीही वेळ गेला तरी चालेल पण शोध तर लाऊयातच म्हणून आधी त्या पुस्तकातल्या कार्ड वरची सगळी नाव मी लिहून घेतली. रजिस्टर तरी बघूया म्हणून मी पुन्हा ते रजिस्टर हातात घेतलं एवढं मोठं रजिस्टर आणि त्यापुढे माझी इच्छाशक्ती जास्त वेळ टिकणे तर जवळ जवळ अशक्यच होते. पुन्हा माझा नेहमीचा स्वभाव उफाळून आला तस मी तर रजिस्टर तसच टाकून घरी पळाले. 
     त्या दिवशीपासून तर एक वेगळीच जाणीव निर्माण झाली होती.सतत कुणीतरी आपल्याला पाहतय या भावनेने कशातच लक्ष लागेना, एक वेगळाच ध्यास लागला आणि finally ती गोष्ट घडली ज्याची मी एवढी आतुरतेने वाट पाहत होते. 
सकाळी सकाळी कॉलेज च्या गेटमधून आत येत नाही तर सवी माझी वाटच पाहत उभी होती.मला पाहून पळतच माझ्याकडे आली..निक्के……हे बघ तुझा आशिक माजनू सापडला….तिने नाचतच स्वताभोवती गिरकी घेतली.. काय कसा???
तिच्या चेहऱ्यावर जग जिंकल्याचा आनंद होता.सांग ना सवे मलाही ते ऐकायची जबरदस्त उत्सुकता लागली होती.  तर ऐक तो आहे अभिनव पाटील आपल्याला तीन वर्षे सिनिअर आहे . म्हणजे ??मग कॉलेज मध्ये कसा??? मी पाठोपाठ  प्रश्न टाकला.. अग सीनिअर जरी असला तरी लायब्ररी मध्ये अभ्यासाला येत असतो कसल्याशा स्पर्धा परीक्षेची तयारी करतो अस ऐकलं मी..फेसबुक इंस्टा व्हाट्सएप कुठेही नाही अगदी पुस्तकी किडा आहे हा..
आणि हो शेवटचं हा मला भेटला कसा?? काल तू घरी गेल्यावर मी लायब्ररी मधे बसले होते.तेव्हा तो माझ्याकडे आला आणि त्याने मला हे दिल..!!
तिने हातातलं पत्र नाचवत मला दाखवलं, 
दे ना सवे प्लिज …मी केविलवाण्या सुरत म्हणाले मात्र तिला माझी गंमत घ्यायची होती म्हंटल हे ही होउदे..बराच वेळ नाचल्यावर तिने ते माझ्या हातात दिल.. घे वाच बाई तोंड बघ कस झालंय!!! मी ते हातात घेऊन वाचणार तोच सगळी gyang तिथे टपकली काय रे सवे ,निक्के काय करताय?? आदी सवीच्या डोक्यात टपली मारत म्हणाला. तसे बाकीचेही सगळे आमच्या भोवती जमले 
त्यांना पाहून मी हातातलं ते पत्र हळूच बॅगेत सरकवला कारण यांच्या हातात गेलं तर पुन्हा मिळणे नाही  हे मला पक्क माहीत होतं आणि तसही मी अजून ते वाचलं ही नव्हतं!!