प्रेमाचं पुस्तक...! Deepak Ramkisan Chavan द्वारा सामाजिक कथा मराठी में पीडीएफ

Featured Books
श्रेणी
शेयर करा

प्रेमाचं पुस्तक...!

प्रेमाचं पुस्तक ...!

खोल दरी खोर्यात मोरगाव वसलेलं होतं. चारही बाजुंनी लाल डोंगराचा परिसर व मध्यभागी पन्नास-साठ वस्तीच गाव होतं. डोंगराळ भाग असल्याने गावात आदिवासी लोकांची वस्ती फार मोठ्या प्रमाणात होती. लभाणी, फासे, पारधी अश्या कित्येक आदिवासी जमाती या गावात रहायच्या. प्रत्येक कुटुंब आनंदाने जिवन जगत होतं. दिवसा रानावनात भटकून लाहोर्या, ससे पकडणं हा या लोकांचा प्रमुख व्यवसाय होता. गुरूवारी गावाजवळून पाच मैल अंतरावर असणार्या बाजारात या लाहोर्या, सश्यांची विक्री ही आदिवासी जमात करायची. दहा रूपयाला एक अश्या तिन लाहोर्यांची झुंड तिस रूपयाला विकायचे. त्यातून मिळालेल्या पैशातुन आठवड्याचा बाजार व्हायचा.

गावात आदिवासींची वस्ती फार मोठ्या प्रमाणात होती. गावात शिक्षणाचा फारसा प्रसार झाला नव्हता. शिक्षण म्हटलं तर लोकांना शिक्षणाची भाषाच कळेना अनं तेथील लोकांची भाषा इतरांना कळत नव्हती. त्यामुळे दररोज दैनंदिन कामाशी जुळवून घेताना नविन माणसाला फार कसरत करावी लागायची.

शिक्षणासाठी शाळा पण फार दुरवर होती. गावात सारी आदिवासी जमातीची माणसं होती प्रत्येकाला आपलं पोट भरायचं पडलं होतं, त्यामुळे शिक्षणाचा कुणाला नाद नव्हता. बाजारात लाहोरीचा सौदा करताना एक लाल रंगाची दहाची नोट ग्राहकाने दिली कि आपलं पैक व्यवस्थित आपल्याले मिळाल्याचं समाधान ही मंडळी करत होती . गावाच्या बाजुला असलेल्या डोंगरातुन एक रेल्वेमार्ग जात होता. डोंगराजवळ एक रेल्वे सिग्नल होता, या रेल्वे सिग्नल जवळ दररोज सकाळी भल्या पहाटे बाहेरगावावरून येणार्या पॅसेंजर थांबायच्या. पॅसेंजर मधील काही प्रवाशांकडे तिकीटं नसायची, तर काही फळा-फुलांचा धंदा करणारी माणसे यामध्ये असायची. सिग्नलजवळ पॅसेंजर थांबताच ही मंडळी पॅसेंजर मधून खाली ऊतरायची. रेल्वेरूळाजवळ असलेल्या एका फाटकातून बाहेर पडता येत होते . बाहेर पडताच एसटी स्टँड होतं तिथून ही माणसं पुढच्या प्रवासाला निघायची. पॅसेंजर मधून उतरलेल्या प्रवाशांकडुन उरलेले शिळे अन्न, खाद्यपदार्थ मागुन हि आदिवासी माणसं पोटाचा गुजारा करायची. थंडीच्या दिवसात धुकं पडलेलं असायचं. सकाळी शेकोटी करून सारी आदिवासी मंडळी अंग शेकायची. घरी गरिबी असल्यानं कुडाची, कौलारू छपराची घरं हि मंडळी बांधायची. दुरून अगदी टुमदार दिसायची...बघणारा नुसता प्रेमात पडावा त्याप्रमाणे . सकाळी शेकोटी शेकताना दुरून येणार्या पॅसेंजरचा हाॅर्न वाजला कि सर्व आदिवासी महिला हातात भले मोठे  कटोरे घेऊन भिक्षा मागायला रूळाच्या दिशेने जायच्या. पुरूष मंडळी घरी पोरेबाळे सांभाळायची. प्रवासी संख्या मोजकीच असायची त्यामुळे भिकपण व्यवस्थित प्रत्येकाच्या वाट्यावर येत नसायची.  काही प्रवाशांना पुढच्या प्रवासासाठी लवकर एसटी मिळत नसायची, त्यामुळे असे प्रवाशी थंडीच्या दिवसात स्टँडवर जाऊन काकडत बसण्यापेक्षा या आदिवासींच्या शेकोट्यांवर बसणे पसंत करायचे.

प्रवाशांमध्ये सकाळी काॅलेजला जाणारी काही मुलंमुली असायची तिपण या शेकोटीचा आनंद घ्यायची.
पन्नास साठ वस्तीच्या गावात रामचंद्र आपला गुजारा करायचा. रामचंद्र आदिवासी होता. शिक्षणाअभावी अडाणी राहिल्यानं त्याचं आयुष्य एक मळलेलं पान बनलं होतं. लहान वयातच लग्न झाल्याने रामचंद्रवर घराची जबाबदारी आली होती. अडाणीपणानं त्यानं चार पोरी व पाचवा पोरगा असं भलं मोठं कुटुंब जन्माला घातलं होतं. काळे मळलेले कपडे, विस्कटलेले केस, नाकात नथा व अंगावर काळे दुपाटे असा काहीसा रामचंद्रच्या पोरींचा अवतार होता. घरी गरिबी होती व भिक मागुन जिवन जगणं हाच पेशा असल्यानं सुंदरतेचा विचारचं या मुलींच्या मनीमानसी नसायचा. हरवलेल्या जगातली हि माणसं होती. रामचंद्रचे वय साठ-सत्तरच्या आसपास होतं. वाकलेली कुबडी पाठ, तोंडावर भली मोठी पांढरी दाढी, गुडघ्यापर्यत धोतर, अंगात लांब बायांचा पांढरा सदरा असा रामचंद्रचा अवतार होता. रामचंद्रला एका मागोमाग एक अशा चार पोरी झाल्यानंतर पाचवा मुलगा देवानं पदरात टाकला होता. मोगली असं त्याचं नाव होतं. दिसायला गोरापान, उंच बांध्याचा, कानात घातलेल्या बाळ्या व विस्कटलेले केस असा त्याचा अवतार होता. म्हातारपणात तोच रामचंद्रचा आधार बनणार होता.घरात मुलं जशी कळती झाली तशी रामचंद्रन भिक मागायला लावली होती. मोगली दररोज रानावनांत मित्रांसोबत फिरायचा. रानावनात लाहोरी, ससे पकडण्यात तो फार पटाईत होता. रानावनातले ससे, लाहोरी, करवंद व सुका मेवा तो आठवड्याच्या बाजारात विकायचा. त्यामधून येणार्या पैशातुन तो घरात हातभर लावायचा. सर्व घर भिक्षा मागुन जगायचं पण मोगलीला भिक्षा मागायची लाज वाटायची त्यामुळे तो कधीही त्या रेल्वे रुळाकडे फिरकत नसायचा.

थंडीचे दिवस होते. सकाळ होऊन ही अंधारल्यागत वातावरण झालं होतं. सगळीकडे धुकं पडलं होतं. सारेजण शेकोट्या करून शेकत होते. धुक्यामुळे दुरवर दिसणार्या अंधारातुन पॅसेंजरचा आवाज आला .अंगातली थंडी मेल्यागत सर्व आदिवासी बाया शेकोटीवरून उठल्या व पॅसेंजरच्या दिशेने हातात कटोरा घेऊन चालु लागल्या होत्या. काही क्षणात पॅसेंंजर नेहमीच्या सिग्नलजवळ येऊन थांबली. एकामागे एक असे करत हळूहळू प्रवासी उतरु लागले होते. काही वेळात मागे राहिलेली एक तरूण मुलगी धावतपळत तिथे आली. दिसायला चांगल्या घरची, गोरीपान, मिनीस्कर्ट घातलेला व ओठाला भलीमोठी लिपस्टीक लावलेली. कानाला स्कार्फ बांधून दोन हातात आपली पुस्तक सावरत ती शेकोटीपाशी येऊन ऊभी राहिली. सोना नाव होतं तिचं, तालुक्याच्या काॅलेजात ती शिकायची. गावात काॅलेज नसल्यानं तालुक्याच्या ठिकाणी शिकायला यावं लागायचं. तालुक्याच्या ठिकाणी शिकायला जाण्यासाठी हाच सोपा अनं शाॅर्टकट रस्ता होता. पॅसेंजरने आदिवासींचा तांडा गाठायचा अनं तिथल्या स्टँड मधून तालुक्याची बस पकडायची.

खुप वेळेपासुन शेकोटीत भर न टाकल्यानं शेकोटी विझू लागली होती. सारी माणसं आपआपल्या वाटेला जाऊ लागली होती. सोनाची बस अजुन आली नव्हती त्यामुळे तिने शेकोटीजवळ बसणे पसंत केले होते. मोगली हातात पांढरा तांब्या घेऊन एका हातात काळी मशेरी घेत शेकोटीच्या बाजुला तोंड धुवत होता. थंडीन काकडलेल्या कोवळ्या देहाच्या सोनाला पाहुन मोगलीला तिची दया आली. सोना श्रीमंत घरची मुलगी होती. वैभव धनसंपन्न असं सोनाचं घर होतं. एकटीच लाडकी असल्यानं वडिलांनी तिला तालुक्याच्या ठिकाणी शिक्षणाला पाठवलं होतं. घरची श्रीमंत असल्यानं सोनानं कधी घरचं काम केलं नव्हतं. त्यामुळे दररोजच्या या जळकुंड्या जिवनाशी तिचा संबधच आला नव्हता. अंगाला थंडी वाजु लागल्यानं तिला या जिवनाची जाणीव होऊ लागली होती. थंडीपासून वाचण्यासाठी ती धडपड करू लागली होती. जवळ असलेल्या स्कार्फमध्ये आपलं अंग थंडीपासुन झाकणं तिला असह्य झालं होतं. तिची ति धडपड पाण्यात पडलेल्या एखाद्या  चिमणीच्या पाखरा सारखी सुरू होती. सोनाला होणारा हा असह्यपणा पाहुन मोगलीला राहवलं नाही . तोंड धुताधुता तो तटकन ऊठला अनं घराच्या छपरावरची तुरहाट्याची पेंढी ओढुन त्यानं शेकोटीच्या आहारावर टाकली. छपरावरून ओढलेली पेंढी पाहुन सोनाला जणू एखाद्या  गरिबाचं घर उद्वस्त व्हावं त्याप्रमाणे   वाटलं. मोगली पेंढी आहारावर टाकत दोन गुडघ्यावर खाली बसत शेकोटी फुंकु लागला होता. मोगलीच्या फुंकण्यानं आहाराला बळ मिळालं. शेकोटीमधून ठिणग्या उडु लागल्या होत्या. कोमजणार्या एखाद्या  झाडाला खतपाणी दिल्यावर त्यानं ज्याप्रमाणे बहरावं त्याप्रमाणे शेकोटीला वेग आला होता. हळूहळू शेकोटीने वेग धरला, चांगलीच ऊब जाणवायला लागली होती . सोना शेकोटीजवळ चांगल शेकावं म्हणून दोन पावलं पुढं येऊन बसली. गुलाबी थंडीत सोनाच्या ओठावरची लिपस्टीक जळत्या शेकोटीच्या उजेडात अगदी खुलून दिसु लागली होती. सोनाला पाहुन मोगली लाजु लागला होता.दोघांमध्ये दोन हाताचं अंतर होतं पण तरीही दोघे एकमेकाशी काही न बोलता शेकोटी शेकत होते .

सोना दिसायला एवढी सुंदर होती कि मोगलीला नजरेला नजर मिळवण असह्य झालं होतं. तिच्या अनं आपल्या सुंदरतेत मोगलीला जमीन आसमानचा फरक वाटु लागला होता. शेकोटीचं जळणं चालु होतं. मोगलीने शेकोटीत टाकलेली पेंढी मध्येच जळू लागली होती. शेकोटी अधिक वेळ पेटत रहावी म्हणून मोगलीने पेंढीचा बाजुचा न जळणारा काही भाग एका काडीने आहारात ढकलायला सुरूवात केली. मोगलीची ही कल्पना सोनाला आवडली होती. मोगली दोन हात आहारावर ठेऊन शेकत होता तेवढ्यात सोनाच्या हाताचा स्पर्श मोगलीच्या हाताला झाला. सामान्य माणसाच्या जिवनातला हा स्पर्श होता पण तो मोगलीच्या हद्याला पार चटके लावुन गेला होता.सोना सुशिक्षित होती त्यामुळे मोगलीच्या हाताला झालेला स्पर्श ही सोनासाठी एक सामान्य गोष्ट होती. काहीही न घडल्याचं दाखवत सोना शेकत बसली होती. एकाच शेकोटीवर दोन जिव बसले होते पण एक सामान्य दुनियेत होता तर एक पार प्रेमाच्या जाळ्यात गुंफला गेला होता. आपण कुठं आहोत, काय करतो याचं त्याला भान राहिलं नव्हतं. मोगलीला शरीरसुख काय असतं हे माहीतचं नव्हतं. चित्रपटातल्या उघड्या नट्या व त्यांची उघड्या देहाची पोस्टरं मोगली फक्त पॅसेंजरवरच्या चिटकवलेल्या जाहिरातीतच बघायचा व त्यातच समाधान मानायचा.मोगलीला सोनाचा झालेला स्पर्श एका वेगळ्या दुनियेत घेऊन गेला होता. तेवढ्यात पाच सहा लहान मुलांचा घोळका पळत शेकोटीजवळ आला . मी सासु आणली...मी सासु आणली...मले सासु सापडली असं ओरडत एक लहान मुलगा शेकोटीजवळ पेंढी घेऊन आला. सासु म्हणजेच मराठवाड्याच्या भाषेत पेंढी होय. त्या मुलाचा आवाज ऐकुन मोगली व सोना दोघे भानावर आले . दोघांनी काहीही न झाल्याचे भाव चेहर्यावर आणले. तेवढ्यात बाजुच्या एसटी स्टँडवर बोरखेडची बस आल्याचं एसटी मास्तरने सुचीत केलं होतं. त्या आवाजाने सोना एसटी स्टँडकडे जायला निघाली. जाताना तिने "थॅक्यू" म्हणत मोगलीचे आभार मानले. मोगली तिच्या बाय बाय करणार्या हाताकडे एकटक बघतच राहिला. क्षणभरात ती दिसेनासी झाली. सोनापण मोगलीच्या प्रेमात पडली. तिला दररोज पाड्यावर यायला आवडत होतं. मोगली दररोज तिच्यासाठी रानातुन करवंद, सुका मेवा आणायचा.सोनापण त्याला काॅलेजमधल्या गप्पा सांगायची. मोगलीला सोनावर एवढं प्रेम झालं होत कि कधीही रेल्वे सिग्नलकडे भिक्षा न मागायला जाणारा मोगली आता सिग्नलकडे जात होता. कधीकधी तो स्व:त रेल्वे पटरी पार करून सोनाला पाड्यावर आणायचा.

एक दिवस सोना नेहमीप्रमाणे पाड्यावर आली व शेकोटी शेकत बसली. तिच्याजवळ असलेल्या बॅगेत वेगवेगळ्या रंगाची पुस्तके होती.त्या पुस्तकांची माहीती ति मोगलीला देत होती. पहिल्यांदाच शिक्षणाविषयी ऐकायला मिळत असल्याने मोगली ही सोनाचं म्हणणं कान देऊन ऐकत होता. मोगलीची ही उत्सुकता पाहुन सोनापण पार सुखावली होती. नेहमीप्रमाणे सोनाची एसटी आली व तिने नेहमीसारखाच मोगलीचा निरोप घेतला. आपलं इंग्रजीचं पुस्तक सोना तांड्याजवळच्या शेकोटीजवळ विसरून गेली होती. काही वेळाने ते पुस्तक मोगलीच्या नजरेत पडलं. शेकोटीची सर्व राख हवेच्या वेगाने त्या पुस्तकावर ऊडाली होती. मोगलीने पुस्तक हातात घेतलं व तो मनोमन खुप खुष झाला होता कारण त्या पुस्तकाच्या निमित्तांन का होईना मोगलीला सोनाला भेटण्याची संधी मिळणार होती. दिवसामागुन दिवस गेले पण सोना काय आलीच नाही. तिचं पाड्यावर येणचं बंद झालं होतं. मोगली दररोज सोनानं विसरलेलं पुस्तक घेऊन रेल्वेच्या सिग्नलजवळ जायचा. पॅसेंजरमधून ऊतरणार्या प्रवाशांमध्ये सोनाला शोधत असायचा. कधीकधी काॅलेजच्या मुलींचा घोळका पाहुन तो घोळका एखाद्या  चोरानं चोरीसाठी एखाद्या  घराची टेहळणी करावी त्याप्रमाणे न्याहाळायचा पण कुठेच सोना दिसत नव्हती. रूळावरून जाणार्या प्रत्येक पॅसेंजरमध्ये तो सोनाला शोधत असायचा. पॅसेंजरमधून काॅलेजला जाणारी सोना मोगलीच्या चेहर्यासमोर फक्त एक कथेमधलं पात्र बनुन राहिली होती. सोना आज नाही तर उद्या येणार या आशेन मोगली सोनाची वाट पाहत रेल्वेरूळाजवळ फिरकत असायचा. आठवडा ऊलटून गेला होता पण सोनाचा काहीच पत्ता नव्हता.
नेहमीप्रमाणे सकाळची साडेसहाची पॅसेंजर आली होती. सगळे प्रवाशी, काॅलेजची मुलंमुली उतरून दररोजच्या रस्त्याने चालू लागले होते. प्रवाशांच्या घोळक्यात एक काॅलेजला जाणार्या मुलींचा घोळका  होता. मुलींच्या घोळक्यात सोना असावी या संशयान मोगली घोळक्याचा पाठलाग करत नेहमीप्रमाणे न्याहाळू लागला होता. तेवढ्यात काॅलेजला जाणार्या मुलींच्या घोळक्यातून काही शब्द मोगलीच्या कानावर पडले. मोगली एखाद्यान कोंबात जावं त्याप्रमाणे सुन्न होऊन धाडकन पटरीवर कोसळला. आठवड्यापुर्वी काॅलेजात येताना सोनाला रेल्वेची धडक लागुन ती मृत्यूमुखी पडल्याची मोगलीला मुलीच्या त्या घोळक्यातून कळली होती, त्यामुळे सोनाचं तांड्यावर येणच बंद झालं होतं. सोनाच्या या बातमीने मोगली फार दुखावला होता. प्रेम माणसानं चुकुनही करू नाही अशी मोगलीची समजुत झाली होती. प्रेमाच्या या धक्क्याने त्याचं शरीरही खंगत चाललं होतं. नेहमी सकाळी गजबजणारा तांडा अगदी कुणी मेल्यागत वाटू लागला होता. मोगलीजवळ फक्त सोनाचं एक पुस्तक प्रेमाची आठवण म्हणून राहिलं होतं.

मोगलीला खरं प्रेम मिळालं नाही पण सोना विसरून गेलेल्या त्या पुस्तकानं मोगलीला फार काही शिकवलं होतं. मोगलीचं लग्न झालं व आज मोगलीच्या मुलांमध्येपण त्या पुस्तकाने शिक्षणाची ज्योत पेटवली आहे . सारा आदिवासी पाडा साक्षर झाला आहे .एक माणुसकीचं जिवन हा आदिवासी पाडा जगत आहे . आज सोना या जगात नाही पण सोनाच्या त्या पुस्तकानं कितीतरी पिढ्या साक्षर केल्या आहेत. एक अख्खा समाजचं बदलून टाकला आहे .

लेखक - दिपक चव्हाण
मु.पो. मुंदेफळ, ता. मेहकर, जि. बुलढाणा
मो. 7900050536