पावसाळा सुरू झालेला. या दोघीना खूप आवडायचा पाऊस, त्यात भिजायला तर किती आवडायचं. विशेष करून सुप्रीला, पावसाळ्यात तर दर रविवारी या दोघींच्या पिकनिक ठरलेल्या. कधी ऑफिसच्या ग्रुप बरोबर, तर कधी त्यांच्या मित्र-मैत्रिणी सोबत, कधी फॅमिली सोबत आणि तसंच कोणी भेटलं नाही तर दोघीच जायच्या भिजायला. दोघीना एकमेकांशिवाय करमायचे नाही. अशीच त्यांची मैत्री होती, अतूट अशी. पण यंदाच्या पावसात काहीतरी वेगळं होणार होतं.
-------------------------------------------------------------------------------------------------------------------------
पावसाचे दिवस, त्यात रस्तावर पाणी साचलेलं. संजनाला scooty वर असताना मुद्दाम पाण्यातून गाडी घेऊन जायची सवय. उडणारे पाणी बघून तिला वेगळाच आनंद मिळायचं. त्यात सुप्री मागे असली कि विचारूच नका. ती संजनाला बरोबर सांगायची कि कुठे पाणी साचलेलं आहे ते, मग काय.... संजना गाडी वळवायची तिथे... हा पण ,ते पाणी लोकांवर उडणार नाही याची काळजी मात्र दोघी घ्यायच्या.
त्यादिवशी तसंच झालं.... रस्ता बऱ्यापैकी रिकामा होता. दोघी ऑफिसला निघाल्या होत्या scooty वरून. समोर रस्त्यावर पाणी साचलेलं. perfect scene एकदम. मग काय , निघाल्या दोघी सुसाट. भुर्रकन पाणी उडवलं. त्याचदिवशी, आकाश शहरात आलेला. तो काम करत असलेल्या मॅगझीनचे एक नवीन ऑफिस उघडले होते, ते बघण्यासाठी आकाश निघाला होता, नेमका त्याचं रस्त्याने. संजनाने पाणी उडवायला आणि आकाश समोर यायला एकचं वेळ झाली. आकाशने पटकन कॅमेरा मागे घेतला. तरीही स्वतःला त्या चिखलापासून वाचवू शकला नाही. चिखलाची एक छानपैकी नक्षी त्याच्या शर्ट आणि जीन्स वर दिसत होती आता. कॅमेरा थोडक्यात बचावला, तरीही थोडासा चिख्खल लागला कॅमेराला. संजनाला कळलं ते. तिने गाडी थांबवली. पण मागे बघायची हिंमत होतं नव्हती. सुप्रीने, आकाशकडे बघत लगेच एक smile दिली. " sorry uncle..... " म्हणाली, संजनाला scooty चालू करायला सांगितलं आणि दोघी पटकन नजरेआड झाल्या.
आकाश त्या दोघींकडे पाहत होता. त्यांच्यावर तरी काय रागवायचे. माणूस जातंच अशी असते, दुसऱ्यांना त्रास देयाचा फक्त आणि त्रास झालेला पाहून हसायचं. आकाश मनातल्या मनात म्हणाला. त्याला कूठे भावना होत्या. राग तर कधी यायचा नाही त्याला. कधी कधीच हसायचा. ते सुद्धा एखाद्या पक्षाचा आवाज ऐकून. त्या दोघी निघून गेल्या, तसा त्याने मागे लपवलेला कॅमेरा बाहेर काढला. हलकासा लागलेला चिख्खल पुसला. कपडे जरा झटकले आणि निघाला.
"काय गं मंद.... सांगता येत नाही का , म्हणे कोण नाही रस्त्यावर... तो काय भूत होता का मग... " संजना रागातच म्हणाली सुप्रीला.
" अरे... हे बरं आहे , तुझ्या बदली मी बोलली ना सॉरी त्याला... " ,
" आणि तो काय अंकल होता का.... सॉरी अंकल बोललीस ते. एकतर चिख्खल उडवला, त्यात त्याला अंकल म्हणालीस... दोनदा अपमान केल्यासारखं झालं ते.... " संजना scooty थांबवत म्हणाली.
" हा... ओरड आता मलाच.. गरीब आहे ना मी,.... गरीब लोकांना सगळेच ओरडत असतात. ओरडा तुम्ही श्रीमंत लोकं... " सुप्री तोंड एवढंसं करत म्हणाली.
" ये नौटंकी.... झाली नाटकं सुरु परत.... चल जायचे नाही का ऑफिसला.... नाहीतर सर येतील. " सरांचे नावं ऐकताच सुप्री पटकन scooty वरून उतरली आणि दोघी झटपट ऑफिस मध्ये आल्या.
दोघीनी त्यांचे computer चालू केलेच होते, तेवढ्यात ऑफिस मध्ये एकाने announcement केली.
" एक मिनिट... जरा सगळ्यांनी लक्ष द्या इकडे.... आपल्या ऑफिसच्या मजल्यावर, कोपऱ्यात एका मॅगझीनच्या ऑफिसचे उद्घाटन होत आहे. तर त्यांनी आपल्या सर्वाना आमंत्रण दिलं आहे. बॉसची permission मिळाली आहे. सगळ्यांनी आता तिथेच चला, ते आपली वाट बघत आहेत. चला लवकर. " तसे सगळे उठले.
" चला... आजच्या नाश्त्याची सोय झाली." सुप्री संजनाला बोलली. ते आजूबाजूच्या लोकांनी सुद्धा ऐकलं. सगळेच हसायला लागले.
" गप्प गं येडे.... म्हणून तुला कूठे घेऊन जात नाही मी ." संजना पुढे काही बोलणार, इतक्यात तिचं लक्ष मॅगझीनच्या नावाकडे गेलं." wild india " .... "सुप्री... नावं बघ मॅगझीनचं... " सुप्रीने नावं बघितलं आणि मोठयाने ओरडली. " Wow !!!!!!! " अचानक झालेल्या आवाजाने सगळे तिच्याकडे बघू लागले.
" काय झालं ? काय झालं ? " सगळे विचारत होते.
" अरे.. तुम्हा कोणाला माहित नाही का.... हे मॅगझीन... "आकाश", त्याची फोटोग्राफी... आठवलं का... " तेव्हा लक्षात आलं सगळ्यांच्या. आकाशला कोण ओळखायचे नाही. .... निदान त्याने काढलेल्या फोटोज वरून तरी. अर्थात त्याला कोणी पाहिलं नव्हतं. आजतरी आकाशला बघायला मिळेल, याची उत्सुकता लागली सगळ्यांना.
एव्हाना सगळे जमले होते, उद्घाटनासाठी. तरीही काही सुरु होतं नव्हतं. सुप्रीला भूक लागली होती. तीच पुढे जाऊन बोलली.
" ओ काका, कोणाची वाट बघत आहेत. नाहीतर ते थंड होईल ना नास्ता... मग बरोबर नाही लागतं थंड थंड..... " तसा तो हसला आणि म्हणाला.
" आमच्या मोठया ऑफिस मधून एक जण येणार आहे. तो आला कि सुरु करू. " त्याने आकाशचे नावं घेणे मुद्दाम टाळलं. १० मिनिटे गेली असतील. मागून एक जण पुढे आला. केस विस्कटलेले, वाढलेली दाढी, पाठीवर मोठी सॅक, गळ्यात कॅमेरा आणि अंगावर घातलेल्या कपड्यांवर चिख्खल.... सगळ्याचे लक्ष त्याच्याकडेच गेलं.
" माझ्यासाठी थांबायची काही गरज नव्हती सर... तुम्ही सुरु करा. " आपण ज्या माणसाला नास्ताचे विचारलं, तो त्या मॅगझीनचा बॉस होता ते सुप्रीला कळलं. तशी ती जराशी मागे झाली.
" अरे !! काय हे... अंगावर चिख्खल कसा उडाला.... " तोपर्यत आकाशची नजर सुप्रीकडे गेली होती. त्याने तिला लगेच ओळखलं.
" काही नाही सर, शहरात आलं कि होतंच असं... " उद्घाटन झालं आणि सगळे नास्ता करायला गेले.
" श्शी !!! काय ते ध्यान त्या माणसाचे... " संजना म्हणाली.
" मॅडम, ते ध्यान आपल्यामुळेच झालं आहे... आठवला का मघाचचा अंकल... " संजनाची ट्यूब पट्कन पेटली. सुप्रीला न सांगताच उलट पावली निघून आली. आकाश वॉशरूम मध्ये जाऊन कपडे स्वच्छ करून आला.
सुप्री सगळ ऑफिस बघत होती. फोटोज सगळेच छान होते, specially आकाशने काढलेले फोटो...... जमलेले सगळेच ते फोटो बघत होते. सुप्रीचं लक्ष फोटो वरून एका कोपऱ्यात गेलं. आकाश आपला कॅमेरा चेक करत होता. सुप्री त्याच्या जवळ गेली.
" पुन्हा एकदा सॉरी... " आकाशने सुप्रीकडे फक्त एकदाच पाहिलं... आणि पुन्हा कॅमेरा साफ करू लागला.
" नास्ता नाही करत का तुम्ही... थंड होईल मग, already तुमच्यामुळे उशीर झालेला .... " सुप्री बोलता बोलता थांबली. आकाशची काहीच reaction नाही. तो शांतपणे कॅमेऱ्यावर उडालेला चिख्खल साफ करत होता. सुप्रीला काहीतरी विचारायचे होते. चुळबुळ चुळबुळ चालू होती तिची. त्यात आकाश काहीच बोलत नव्हता. पुन्हा विचारलं तिने.
" तुम्ही कॅमेरामन आहेत का.... सॉरी... सॉरी, फोटोग्राफर आहात का... ",
"हो" आकाश बोलला शेवटी...
" अरे व्वा !!!! म्हणजे तुम्ही आकाशला नक्की ओळखत असणार ना... " त्यावर तो सुप्रीकडे बघायला लागला. "म्हणजे...... हे फोटो त्यानेच काढेल आहेत ना म्हणून.... कसला भारी फोटो काढतो ना तो... भारीच आहे एकदम तो..." आकाशला जरा गंमत वाटली. त्याने चेहऱ्यावर तसं दाखवलं नाही.
" तुम्ही पाहिलं आहे का त्याला.... " आकाश चा पहिला प्रश्न...
" तसं पाहिलं नाही कधी.... पण एवढे छान फोटो काढणारा पण छानच असेल ना..... म्हणून विचारलं तुम्हाला कि कधी पाहिलं आहेत का त्याला, I mean रोजच भेटत असेल ना तुम्हाला... " आकाशने नकारार्थी मान हलवली आणि कॅमेराकडे लक्ष दिलं. सुप्रीचा नास्ता संपला होता. तिच्या ऑफिस मधले कर्मचारी आता माघारी त्यांच्या ऑफिसमध्ये गेले सुद्धा. तशी सुप्री निघाली. परत थांबली.
" excuse me..... तुमचे नावं नाही सांगितले तुम्ही.... एवढा वेळ बोलत होतो आपण, नावं राहिलं कि राव... माझं नावं सुप्रिया... पण सगळे "सुप्री" च बोलतात. तुमचं नावं काय... " सुप्रीने हात पुढे केला.
" ..... अंकल.... " आकाशने डोकं वर न करताच उत्तर दिलं. पुढे केलेला हात सुप्रीने तिच्याच डोक्यावरून फिरवला. आकाशकडे जीभ बाहेर काढून दाखवली आणि निघून गेली.
============================= क्रमश : =================