भटकंती.. (सुरुवात एका प्रवासाची ) ........ (भाग ११) Vinit Rajaram Dhanawade द्वारा फिक्शन कथा मराठी में पीडीएफ

Featured Books
श्रेणी
शेयर करा

भटकंती.. (सुरुवात एका प्रवासाची ) ........ (भाग ११)

अर्ध्या-पाऊण तासाने पावसाने विश्रांती घेतली. तोपर्यंत आकाश तसाच विचार करत बसला होता. सुप्री दुरूनच बघत होती. काहीच हालचाल होत नाही म्हणून स्वतः आकाश जवळ गेली.
" निघूया का पुढच्या प्रवासाला... म्हणजे आता पाऊस सुद्धा थांबला आहे म्हणून म्हटलं... " आकाश भानावर आला.
" ते दोघे तयार आहेत का पण... " आकाशने उलट प्रश्न केला.
" त्यांना तयार करतो आम्ही... आपण निघूया... " सुप्रीने बाकी सगळ्यांना तयार केलं निघण्यासाठी. आकाशसुद्धा तयार झाला. फक्त प्रश्न होता कि जायचे कुठे . समोरचा रस्ता जवळपास बंद... पूल असून सुद्धा तिथे आता जाणे धोकादायक होते कारण नदीचं पाणी काठापासून खूप आत शिरलं होतं. आकाश पुन्हा काही आठवू लागला. नदीच्या प्रवाहाच्या विरुद्ध दिशेला गेलं कि प्रवाहाचा वेग कमी असतो, शिवाय नदीचं पात्र सुद्धा रुंदीने कमी होत जाते, जे आकाशने कुठेतरी वाचलं होतं. तसा विचार करून त्याने सर्वांना कुठे जायचे ते सांगितले. तसंच पुढे जाऊन नदी पार करता आली तर तोही प्रयन्त करायचा ठरवलं. त्यांनी प्रवास सुरु केला. आकाशच्या मागून चालत होते... झालेल्या प्रकाराने घाबरलेले... थोडं पुढे गेल्यावर घनदाट झाडी दिसली, म्हणजे पुढे जंगल सुरु होते... घड्याळात बघितलं त्याने... दुपारचे १२ वाजत होते. एवढा वेळ कधी निघून गेला ते कळलंच नाही... त्यात आभाळ अजून काळवंडलेलेच होते. जंगलात एखादी जागा भेटली पाहिजे, जिथे तंबू उभे करता येतील. असं विचार करतच तो चालत होता.


इतक्यात समोरून काही माणसं येताना दिसली. त्याच्या एकंदरीत पेहरावरून ते आदिवाशी असावेत असा अंदाज आकाशने बांधला. आकाशने सगळ्यांना थांबायला सांगितलं. चार माणसं आलेली. या सर्वाना त्यांनी दुरूनच बघितलं, हे एवढे सगळी माणसं कोण आहेत, कुठे निघाले आहेत हे बघण्यासाठी ते स्वतःहून आले होते. आकाशला प्रश्न पडला कि कोणत्या भाषेत बोलावं. त्यामुळे कोणीच बोलत नव्हतं. एकाने या सर्वांकडे एक नजर फिरवली. थकलेले, भिजलेले, काही थंडीने कुडकुडत होते. आकाश सगळ्यांत पुढे होता. त्यालाच विचारले, " कुठं निघालात तुमी... ? " हे मराठी पण बोलतात याचे आकाशला आश्चर्य वाटलं, पण बरं सुद्धा वाटलं. लगेच त्याने उत्तर दिलं. " शहराच्या दिशेने निघालो आहोत... त्यासाठी त्या पलीकडच्या गावात जात होतो... तर पाऊस सुरु झाला. भिजलो आम्ही सगळे... " पुन्हा त्याने या सगळ्या ग्रुपवर नजर टाकली. " तुमा समदयाना आदी आमच्या पाडयात नेतो... लई थंड लागली हाय त्या पोरींना... " आकाशला हे माहित होतं, सगळयांना थंडी वाजत असणार, त्यांच्या सोबत जायलाच पाहिजे नाहीतर कोणीतरी आजारी पडायचं. असं आकाशने सगळ्यांना सांगितलं,ते तर आधीच तयार होते.


आदिवासी पाडा तिथून जवळच होता. जास्त चालावं लागलं नाही त्यांना. तो ग्रुप पोहोचल्या पोहोचल्या त्यांच्याभोवती सगळ्यांनी गर्दी केली. हे सगळे दमलेले, थकलेल्या मुलांना त्यांनी लगेच मदत केली. आधी सर्वाना गरम-गरम पाणी दिलं अंघोळीसाठी... त्यानंतर पोट भरण्यासाठी खूप काही आणून दिलं. त्या दोंघाचे लगेच उपचार सुरु केले. गावात डॉक्टर कुठे मिळतात, त्यात हा आदिवासी पाडा.... इथे कोण असणार... त्यांच्याकडे जो वैद्य होता त्यानेच सगळ्यांची मलमपट्टी केली... आकाशच्या पायाला सूज आलेली. त्याचा पाय त्या लाकडी पुलात अडकला होता ना, त्याचा पाय त्या वैद्याने औषधी पाला लावून बांधून टाकला. " दोन दिवस तरी ते काढायचा नाही " असं बजावून वैद्य गेला. आकाशने खाऊन घेतलं. दमलेला खूप... लगेच झोपी गेला.


आकाश जागा झाला तेव्हा संध्याकाळ होत आलेली. तसाच उठायचा प्रयन्त केला तर लगेचच एक कळ त्याच्या सर्वांगात फिरली. पायातून प्रचंड वेदना येत होत्या. मग काय करणार, बसून राहिला. त्याला सकाळी जी माणसं भेटली होती, आकाशला जागा झालेलं पाहून तो आत , झोपडीत आला.
" झाली का झोप पावनं... " आल्या आल्या त्याने विचारलं.
" हो .. हो, पण पाय दुखतो आहे जरा... " आकाश पाय सावरत म्हणाला.
" सूज आलेली न पायाला... व्हयलं बरा... दोन दिस मदे... आराम करा तुमी... " म्हणत तो जाऊ लागला.
" थांब जरा... मलाही बाहेर जायचे आहे... एखादी काठी देता का आधारासाठी... " आकाशने त्याला थांबवत म्हटलं. त्यावर तो हसला.
" अवो... आराम करा जरा... लगीच कुठं निघाला... " ,
"तसं नाही, मला बसून रहायची सवय नाही म्हणून. शिवाय माझ्यासोबत आलेले, ते कुठे आहेत, ते सुद्धा बघावं लागेल ना.. " तशी त्याने आकाशला एक काठी दिली. आकाश काठी पकडून कसाबसा उभा राहिला आणि त्याच्या खांदयावर हात ठेवूनच झोपडीबाहेर आला.


संद्याकाळचे पाच-सव्वा पाच वाजले असतील. सकाळी आलेल्या वादळाने सगळ्यांना झोडपलं होतं. या आदिवासी पाड्यात काही झोपड्यांची पडझड झाली होती. ते पुन्हा उभारण्याचे प्रयन्त चालू होते. काही बायका रात्रीच्या जेवणाच्या तयारीत गुंतल्या होत्या. आकाशच्या ग्रुप मधल्या काही मुली, सुप्री-संजना धरून... त्यांना मदत करत होत्या. मुलंसुद्धा काहीबाही मदत करत होते. हे बघून आकाशला बरं वाटलं. मदत करायला शिकवावं लागत नाही वा कोणाकडून शिकवलं हि जात नाही.. ते असं मनातून यावं लागते... तेच घडत होतं समोर.
" कुठं निघालसा तुमी .... " त्याने विचारलं आकाशला.. आकाशच लक्ष त्याच्याकडे गेलं.
" हं.. हो... मला पाहिलं तुमचं नावं सांगा... आणि मला एक मोठा प्रश्न पडला आहे, तुम्ही एवढं चांगलं मराठी कसं बोलता, म्हणजे मी खूप आदिवासी पाड्यात जाऊन आलेलो आहे. त्यांची मराठी तोडकी-मोडकी असते, त्यांच्या वेगळ्याच भाषेत बोलतात... मग तुम्ही एवढं चांगलं मराठी... ",
"या बसा इकडं... " आकाशला त्याने एका दगडावर बसवलं. " माज नावं सखा... आमचा हा पाडा, लई वरीस झालीत... इकडचं हाय... ते समोर गावं हाय ना... तीत आमचं येन-जान आसत... आनखी, गावात शाला हाय ना... तीत जावून शिकतात इतली पोरं.. मग त्यांची भाषा तर यनारच ना साहेब... " त्याने उत्तर दिलं. " माजा आजा (आजोबा )आला व्हता इथं,तवा पासून इथं गावाजवळच समदयानी पाडा बांधायचा ठरवलं... तवापासून इथंच हायत सगळे... आता तुमी सांगा... कुठं निगाला व्हता... एवढ्या पाऊस-पाण्यात... " ,
"त्यांना सगळयांना शहरात जायचे आहे, त्यासाठी निघालो होतो.. ",
"म्हजे... तुमाला नाय जायचं का... ? " .
" तसं नाही, ते वाट हरवले होते, मागच्या गावातल्या लोकांनी सांगितलं कि या गावात, शहरात जाण्यासाठी वाहन मिळू शकेल... तर नदीला पूर आला... जाऊ शकलो नाही पलीकडे, त्यात तुमच्या वैद्याने दम दिला.. दोन दिवस काढू नका मलमपट्टी... " आकाश हसत म्हणाला.


"बराबर हाय त्याच... वैद्य हायत ते... आनी तसा पन पावसात या नदीला पूर येतोच... शहरात जाणाऱ्या वाटा पन बंद होतात... वाहन कुटून मिलनार तुमाला... " सखा बोलला.
"म्हणजे कोणताच वाहन जात नाही शहरात... " आकाश चिंतेत पडला.
" व्हय... आनी त्या गावातली मानस पन गेली आसतील दुसरीकडं... पानी गेलं असलं ना गावात... " सखा आकाशकडे बघत म्हणाला.
"खूप दिवस झाले आता, या सगळ्यांना शहरात सोडायचा वायदा केला आहे मी... आता कसं जमणार ते... " आकाश बोलला.
" साहेब... घाबरू नका...उद्याचा दिस थांबा इथं... तुमचा पाय पन बरा व्हईल... मग मी दावतो वाट... ",
"म्हणजे ? " ,
" इतुन ... काही अंतरावर आजून एक गाव हाय.. तिथं मिलतील, गाड्या.... मी नेईल तुमाला... आता आराम करा... " असं बोलून सखा त्याच्या कामाला गेला. आकाश जरा रिलॅक्स होऊन आजूबाजूचं द्रुश्य बघू लागला. सगळेच कामात गुंतले होते. संजनाने त्याला तसं एकटं बसलेलं पाहिलं आणि त्याची विचारपूस करायला आली.
"कसे आहात तुम्ही... मी बघितलं मघाशी तुम्हाला... तुम्ही झोपला होता ना... पायाला लागलं आहे का फार... ? " संजनाने पटापट विचारून टाकलं.
" लागलं नाही.... सुजला आहे ना पाय म्हणून बांधून ठेवला आहे पाय... बाकी काही नाही... आणि मी एकदम ठीकठाक आहे... फक्त जरासं अंग दुखते आहे.. " संजना ऐकत होती. चुळबुळ करत तिथेच उभी होती. आकाशला समजलं ते.
" काही बोलायचे आहे का तुम्हाला ... ?" ,
" तुम्ही... त्याला वाचवण्यासाठी उडी मारलीत ती... कशाला... त्याने तर तुमचं ऐकलं तरी होतं का.. " आकाश त्यावर हसला.
" म्हणजे तो संकटात सापडला तरी मी ते मनात ठेवावं असं वाटतं का तुम्हाला ? " ,
" तसं नाही, पण केवढं ते पाणी वाहत होतं. मी पहिल्यांदा एवढं पाणी बघत होते. त्यात तुम्हाला पोहता येते म्हणून... नाहीतर तो तर वाहूनच गेला असता.. " संजना घाबरत म्हणाली.
" मला पोहता येत नाही.. ", आकाश शांतपणे म्हणाला.
" काय?" संजना उडालीच. " मग... ते... कसं काय एवढं केलंत.... पाण्यात पडला असता तर ... कोणी बाहेर काढलं असतं .. म्हणजे तुम्ही पण safe नव्हता त्याला वाचवताना.. " ,
" पण मी तसं केलंचं नसतं तर तो आज वाचलाच नसता ना, मला फक्त त्याला वाचवायचं होतं आणि ते मी केलं, कारण तुमच्या सगळ्यांची जबाबदारी माझ्यावर आहे ना, आपण प्रत्येक गोष्टीला घाबरत बसलो ना, तर कोणतंच काम कधीच पूर्ण होणार नाही.... मलाही काही गोष्टीची भीती वाटते आणि ते स्वाभाविकच आहे, पण एका मर्यादेपर्यंत घाबरणे ठीक असते.... त्याला डोक्यावर बसवलं ना, तर ती भीती नेहमी, प्रत्येक कामात पुढे येते आणि माणूस limited होऊन जातो. स्वतःला मर्यादा घालून घेतो.... हा, हि एक चांगली गोष्ट आहे कि प्रत्येकाला आपली मर्यादा, limitations माहित असाव्यात..... आणि safe वगैरे म्हणालात ना... ते काही नसते. safe होण्यासाठी , आधी मनातली भीती काढून टाकावी लागते, ते तरी कोणाला शक्य नाही. " संजनाला मनोमन पटलं ते.


बोलता बोलता अंधार होऊ लागला. " बाकी, ते दोघे आहेत ना बरे... " आकाश उभा राहत म्हणाला.
" हो... चांगले ठणठणीत आहेत... फक्त तुम्ही चांगले व्हा... ',
"हो... उद्या जमलं तर निघू... " आकाश म्हणाला.
" नको नको... तुम्ही चांगले व्हा... मग जाऊ... कोणाला घाई नाही आहे आता.. " संजना हसत म्हणाली. आकाशने संजनाला "बाय" केलं आणि त्याच्या झोपडीकडे निघाला. वाटेत सुप्री समोर.
" काय मग... झाली का हिरोगिरी करून... ",
"म्हणजे ? ",
"पाय वगैरे तोडून घेतलात म्हणून विचारलं.. " सुप्री म्हणाली. त्यावर आकाशाला हसायला आलं.
" सूज आली आहे फक्त.. ",
"हा .. मग कशाला करायचं हे सगळं... कोणाला इंप्रेस करायचा आहे का... ",
" काही पण.... होईल बरा पाय, या एक दिवसात.. तुम्ही टेन्शन घेऊ नका... लवकर घेऊन जाईन शहरात तुम्हाला... आता मी विश्रांती घेतो. ",
"मस्करी केली ओ.... लवकर ठीक व्हा... नाहीतर उचलून घेऊन जायला लागेल तुम्हाला... आणि हो... एवढीच हौस असेल ना... पाय वगैरे तोडून घेण्याची तर आधी आम्हाला शहरात सोडून या, मग हवे तेवढे पाय तोडून घ्या.. " सुप्री हसत म्हणाली आणि निघून गेली. आलटून-पालटून सगळ्यांनी आकाशची चौकशी केली . रात्र सुद्धा मजेत गेली सर्वांची.


============================= क्रमश :