Bhatkanti - Suruvaat aeka pravasachi - 9 books and stories free download online pdf in Marathi

भटकंती.. (सुरुवात एका प्रवासाची ) ........ (भाग ९)

आकाश परतला तेव्हा संध्याकाळची उन्ह परतू लागली होती. घड्याळाचा काटा ६ वर आला होता. आकाश सुद्धा दमलेला होता. प्रथम तोही गावात जाऊन अंघोळ करून आला. थोडंसं खाऊन आणि रात्रीच्या जेवणाचं सांगून तो आपल्या tent मध्ये आला. सगळे त्याचीच वाट बघत होते. एवढंच कि सगळे वेगवेगळे, २-३ जण एका बाजूला निवांत गप्पा मारत बसले होते.
" मिळाला का रस्ता तुला... सॉरी तुम्हाला. " संजना जीभ चावत म्हणाली.
" मिळाला... उद्या निघू पहाटे... " आकाश सॅक एका बाजूला ठेवत म्हणाला. " बाकी सगळे जेवलात ना पोटभर... ",
"हो..",
"आणि तुमची friend... ती कुठे दिसत नाही ती... " आकाश आजूबाजूला बघत म्हणाला.
" ती ना... ती बघा तिथे बसली आहे ." संजना बोट दाखवत म्हणाली. सगळा ग्रुप tent जवळच बसला होता. सुप्री मात्र जरा वरच्या बाजूलाच पण एकटी बसली होती.
" ok... मी रात्रीच्या जेवणाचेही सांगितलं आहे... ते येतील थोड्यावेळाने.... मी जरा आराम करतो.... आणि हो, एकेरी नावाने बोललात तरी चालेल. " संजना हसत निघून गेली.


५ च मिनिटं झाली असतील. आकाशला झोप लागत नव्हती. बाहेर नजर टाकली तर बाकीचे अजूनही गप्पा मारत बसलेले होते. संजनानेही आपल्या गप्पा दुसऱ्या मैत्रिणी बरोबर सुरु केल्या होत्या. हळूच त्याने सुप्रीकडे नजर टाकली. सकाळपासून ती तशीच गप्प गप्प होती. आताही एकटीच बसून होती. आकाश त्याच्या तंबूतून बाहेर आला. हळूच तिच्या मागे जाऊन उभा राहिला. सुप्रीला लगेच कळलं ते. तरी काहीच reaction नाही तिची. आकाश खाली बसला पण जरा दूरचं तिच्यापासून. थोड्यावेळाने आकाश बोलला.
" काही विचारू का... if you don't mind... " ,
"हम्म.. " सुप्री बोलली.
"तुम्ही गप्प गप्प ,शांत... बऱ्या दिसत नाहीत. ",
"का ?" सुप्रीने विचारलं.
" means... या दोन-तीन दिवसात तुमच्या बडबडीची सवय झाली आहे ना... आणि अचानक शांत झालात एवढ्या... बरं , त्या तुमच्या friend सोबत सुद्धा बोलत नाहीत. म्हणून विचारलं." सुप्री काही बोलली नाही.
" पुन्हा... सकाळी त्या डोंगरावरून तो छान नजारा पाहताना... तुमच्या डोळ्यात पाणी आलं... म्हणजे मला खूप कुतूहल निर्माण झालं आहे... कि एवढी हसरी, सतत बोलणारी मुलगी... रडू पण शकते..... काय झालं नक्की ? " तेही सुप्रीने ऐकून घेतलं आणि तशीच शांत बसून राहिली. आकाशला कळून चुकलं कि हि काही बोलणार नाही, संजनाचं बरोबर होतं. कुणाशी ती बोलत नाही,म्हणून आकाश उठून जाऊ लागला. तसा मागून आवाज आला.
" ते द्रुश्य बघून एक वेगळीच फीलिंग झाली मनात. " सुप्रीच बोलली ते.
आकाश तिच्याकडे न बघता तसाच तिच्यापुढे पाठ करून बसला. " ते धुकं... अंगाला चिटकून जात होतं, ते वरून कोसळणारे झरे.... त्यातून वाट काढत उडणारे पक्षी... एकदम शांत झालं मन.... असं वाटलं कि जीवनाचा हाच आनंद होता, जो इतकी वर्ष शोधत होते... एक जाणीव झाली, कि शांतता आपल्या मनातच असते, फक्त ती शोधून काढायला कोणीतरी वाटाड्या भेटला पाहिजे.. तो आनंद भेटला, मन शांत झालं..... एवढं छान द्रुश्य समोर दिसल्यावर ...... पाऊस आला भरून, मनात आणि डोळ्यात... " सुप्री आताही डोळे पुसत म्हणाली.


आकाश तिचं बोलणं ऐकून चकीत झाला. "मला वाटलं नव्हतं, इतके सुंदर विचार आहेत तुमचे... एक वेगळंच व्यक्तिमत्त्व आहे तुमच्यात... फक्त ते लपवून ठेवता तुम्ही जगापासून, का ते माहित नाही... माझी आई बरोबर बोलते मग, जे सारखे हसत असतात ना... ते मनात खूप दुःख लपवून ठेवतात..... कसं असते ना, आपल्याला एकचं life भेटते आणि ती अशी घुसमटत ठेवली ना, तर स्वतःलाच त्रास होतो... त्यामुळे जे असेल ना, ते बाहेर काढायचं. रडावसं वाटलं तर रडून घेयाचं.... हसावं वाटलं तर मोकळेपणाने हसायचे... कारण गेलेला प्रत्येक क्षण.... हा कधीच परत फिरून येणारा नसतो...त्यामुळे जीवनातला प्रत्येक क्षण जगायचा. " आकाशने स्वतःच मत मांडलं. सुप्री शांतपणे ऐकून घेत होती. " आता समोरच द्रुश्य बघा... किती positivity भरली आहे त्यात.... इतका वेळ तुम्ही समोर बघत होता, आणि विचारात गुंतून गेला होता.... या कडे तुमचं लक्षच नसेल. " सुप्री समोर बघू लागली.


संध्याकाळ होत होती. ते जिथे बसले होते, तिथून गावाचं विहंगम द्रुश्य नजरेस पडत होतं.पाऊस नसल्याने आणि सूर्यास्त होत असल्याने..... पश्चिमेकडचं आभाळ कलंडत्या सूर्याने सोनेरी, गडद नारंगी रंगाचे झाले होते. दूरवर पर्वतांची रांग दिसत होती. त्यावर अस्पष्ठ असे , काही मागे सुटून गेलेले ढग तरंगत होते... खाली चरायला गेलेल्या गायी-वासर परत गावात येत होते. त्यांच्या हंबरण्याने आणि चालण्याने एक वेगळाच ध्वनी तयार होतं होता.... पक्षांचे थवेच्या थवे आपापल्या घरी निघाले होते.... कुठेतरी दूर, गावच्या जुन्या मंदिरात, संध्याकाळच्या पूजेची तयारी चालू होती. त्यात चालू असलेला घंटानाद, त्या संध्याकाळच्या थंड हवेत मिसळला जात होता. दमले-भागलेले शेतकरी.... पुन्हा घराकडची वाट पकडत होते. मावळत्या सूर्याने त्यांच्या सावल्या लांब करून, त्यांच्या आधीच त्यांना घरी पोहोचवलं होतं. येणाऱ्या वाऱ्यासोबत झाडं डोलत, आपल्या झोपायची तयारी करत होते... किती छान !!!!


" बघा... थोडयावेळाने अंधार होईल... हे सगळं दिसेनासं होईल.... तरीही किती आनंद आहे या सगळ्यात.... काळोख होतं असला तरी त्यांना माहित आहे कि प्रकाश नक्की होईल पुन्हा... अशीच positive thinking असावी नेहमी.... " सुप्रीला मनापासून पटलं ते... " तर मग, चला आता... रात्र होईल ना... tent कडे जायला हवे... " आकाश तेव्हढं बोलून निघाला. सुप्री हि निघाली...
"thanks... " सुप्री म्हणाली.
" thanks कशाला ?.... आणि कोणाला म्हणायचे असेलच तर ते स्वतःला म्हणा..... कारण प्रत्येक वेळेस एकच व्यक्ती असते आपल्यासोबत... ती व्यक्ती म्हणजे आपण स्वतः... प्रत्येक सुखात ,दुःखात स्वतःला thanks म्हणालं तर life आणखीन छान होईल... " म्हणत आकाश खाली निघून गेला. सुप्रीच्या चेहऱ्यावर प्रसन्नता होती. आकाश तर केव्हांच त्याच्या tent मध्ये जाऊन झोपला. सुप्री खाली आली आणि संजनाला शोधू लागली. संजना दिसली तशी तिला जाऊन मिठी मारली सुप्रीने.
" काय मॅडम... जाग्या झालात वाटते. " संजना हसत म्हणाली.
" हो, गाढ झोपेतून कोणीतरी उठवलं असं वाटते आहे आता. " सुप्री हसत म्हणाली.
"चल ना... शेकोटी करूया आणि सगळ्यांसोबत गाणी बोलू ... मज्जा करू... " सुप्रीची बॅटरी charge झाली होती आता... थोडयावेळाने , शेकोटी पेटवली आणि यांची गाणी सुरु झाली. आकाशने हि थोडयावेळाने त्यांना "join" केलं. बराच वेळ त्यांची गाणी चालू होती. यानंतर रात्री गावकऱ्यांनी जेवण आणून दिलं. छानपैकी जेवण करून सर्व जेवायला गेले. आकाश अजूनही शेकोटी जवळ बसून होता.


सुप्री त्याच्याजवळ आली. " झोप येत नाही वाटते कोणालातरी..... " तसं आकाशने मागे वळून बघितलं. आणि हसला.
"असं काही नाही... मघाशी झोपलो होतो ना... म्हणून जरा उशिरा झोपीन.... पुन्हा उद्याचे विचार चालू आहेत डोक्यात... त्या गावात लवकरात लवकर पोहोचलो , आणि तिथे काही वाहन मिळालं तर तुम्हाला उद्याचं शहराकडे निघता येईल ना... " आकाश शेकोटीत लाकडं टाकतं म्हणाला.
" हम्म....... लगेच कंटाळलात वाटते आम्हाला.... गणू , बघ रे.......कशी असतात लोकं... " त्यावर दोघेही हसायला लागले.
"तसं नाही.... पण तुम्ही लवकरात लवकर घरी जाऊ शकता ना... मी तर इकडेच असतो फिरत.... by the way.... पुन्हा नॉर्मल झालात वाटते... छान असंच राहायचं नेहमी.... बरं, तुम्ही आता झोपायला जा... कारण उद्या जमलं तर लवकर निघू... मी झोपतो थोडयावेळाने... " सुप्री झोपायला गेली. जाता जाता परत आली.
" thanks... मिस्टर A... आता तरी नावं सांगा.. " ,
"सांगेन कधीतरी... " म्हणत आकाश पुन्हा शेकोटी कडे पाहू लागला. सुप्री हसतच तिच्या तंबूकडे आली आणि झोपी गेली.


आकाश उशिरा झोपला पण सकाळी वेळेत उठला. बाकीचे सगळे झोपले होते. लवकर निघायचे होते म्हणून सगळ्यांना जागं करून आंघोळी साठी गावात पाठवून दिलं. गाववाल्यांनी सुद्धा खूप मदत केली त्यांना . आकाश निरोप घेयाला गेला तेव्हा सुद्धा त्यांनी प्रवासात काहीतरी खाण्याचे बांधून दिलं. आकाश पुन्हा त्याच्या tent जवळ आला तेव्हा, बाकीच्यांनी सामान आणि तंबू बांधून सुद्धा ठेवले होते.
" अरे व्वा !!!! शिकले वाटते सगळॆ.... छान... " आकाश आनंदात म्हणाला.
" छान वगैरे राहूदे... तुमचंच सामान राहिलं आहे... तुमच्यामुळे उशीर होणार आता.. चलो जल्दी... निघणे का है.... " सुप्री वेडावत म्हणाली.
" सॉरी मॅडम.... लवकर तयारी करतो... " आकाशच्या त्या उत्तराने सगळे हसू लागले.
आकाशने १० मिनिटात सामान बांधलं, पाठीवर सॅक लावली आणि म्हणाला, " चला मग... निघूया का भटकंतीला...","हो !!! " सगळे एकसुरात म्हणाले आणि त्यांचा पुढचा प्रवास सुरु झाला.

============================= क्रमश :

इतर रसदार पर्याय

शेयर करा

NEW REALESED