आकाशने सांगितल्याप्रमाणे, सगळा ग्रुप एका ठिकाणी येऊन पोहोचला. आजूबाजूला झाडं-झुडुपं होती. फक्त मधेच तेव्हढी जागा रिकामी राहिली होती. तेव्हा सुप्रीला कळलं, आकाशचं बोलणं. आकाशने घड्याळात पाहिलं, दुपारचे ३.३० वाजत होते.
" चला, पटपट tent लावून घेऊया, नंतर जेवणाची सोय करावी लागेल." सगळ्यांनी tent बाहेर काढले. आकाशला तर सवय होती tent मध्ये राहायची. १० मिनिटात त्याने एकट्यानेच त्याचा तंबू उभा केला. बाकीचे मात्र अजूनही 'तंबू कसा बांधायचा' ते पुस्तकात बघून बघून फक्त प्रयन्त करत होते. आकाशला हसायला आलं.
" एकालाही येत नाही का ... " आकाशने विचारलं...
"आम्ही काय रोज येत नाही इथे... तंबू बांधायला यायला. " सुप्री वेडावून दाखवत म्हणाली. आकाशने तिच्याकडे दुर्लक्ष केलं.
" मी दाखवतो कसा तंबू उभा करायचा ते... सगळ्यांनी बघून घ्या... पुन्हा पुन्हा दाखवणार नाही... पुढचे काही दिवस तरी तुम्हाला हे tent वापरायचे आहेत... ",
"Yes sir " सगळ्यांनी एकसुरात म्हटलं आणि हसू लागले.
पुढच्या अर्ध्या-एक तासात सगळ्यांचे तंबू बांधून झाले, अर्थातच सगळयांना शिकवून. त्यानंतर आकाशने त्यातल्या चार-पाच मुलांना सोबत घेतलं.
" रात्रीच्या जेवणची सोय करून येतो आम्ही... " ते निघणार इतक्यात त्यातली एक मुलगी बोलली.
" मला ना , जास्त spicy वगैरे आणू नका.. आणि oily पण नको, डीएटिंग करते आहे ना मी... " आकाश ते ऐकून बोलला...
"बरं... अजून कोणाला काही सांगायचे आहे का " तर अजून एक मुलगी म्हणाली,
" मला पण साधंच काहीतरी आणा... मसाला डोसा,इडली वगैरे.... रात्री पचायला चांगल असते ते... ",
"ठीक आहे.. ",
"मला दोन वडापाव पण चालतील, हा पण ... लाल चटणी नको हा त्यात... " एक मुलगा म्हणाला.
" मला तर काहीपण चालेल.... कांदेपोहे भेटले तर दोन प्लेट आणा..... मला खूप आवडतात कांदेपोहे... " सुप्रीने सुद्धा ऑर्डर दिली.
" आणि त्यावर कोथिंबीर , खोबरं वगैरे पाहिजे का... " आकाशने विचारलं.
" हो मग.... मस्तच लागते ते ... प्लिज हा... " सुप्री हात जोडत म्हणाली. संजनाने तिला चिमटा काढला. तशी सुप्री कळवळली.
" ई !! तुला नको तर तू नको खाऊस ना, मला कशाला चिमटा काढतोस.... " सुप्री हात चोळत म्हणाली.
" पागल... आपण कुठे आहोत ते तरी कळते का तुला.. सगळे आपले ऑर्डर देत आहेत... जंगलात आहोत आपण.... आणि म्हणे कांदेपोहे वर खोबरं पाहिजे... येडी कुठली... " संजनाने सुप्रीच्या डोक्यावर टपली मारली.
आकाशने बघून हसला आणि त्या मुलांना घेऊन काही फळं वगैरे मिळतात का ते शोधायला गेला. खूप वेळाने ते परत आले. प्रत्येकाच्या हातात काहीतरी होतेच. त्यांना बघून एका मुलीने लगेचच एक चादर आणली. त्यावर सगळ्यांनी जमवून आणलेली फळ ठेवली. जास्त नव्हती तरी सगळ्यांना पुरतील अशी होती. सगळेच त्या फळांकडे बघत बसले होते. एकही जण पुढे येत नव्हता. आकाश सर्व बघत होता.
" काय झालं ? " आकाशने विचारलं,
" नाही... असंच, कधी असं जेवण घेतलं नाही ना म्हणून... " एकजण बोलला.
" का... काय वाईट आहे यात... " आकाशने पुढे येत एक फळ उचललं. तसे सगळे पुढे आले, आणि सगळ्यांनी काहींना काही हातात उचलून घेतलं.
" धुतलेली तरी आहेत का ... " एका मुलीने प्रश्न केला.
" हो मग, आम्ही स्वतः धुवून आणली आहेत. शिवाय पाणीही आणलं आहे पिण्यासाठी... " आकाश सोबत गेलेल्या मुलांपैकी एक जण लगेच बोलला. तसे सगळे फळं खाऊ लागले.
" असं वाटते आहे कि आज उपवासच आहे. " सुप्री फळ खाताना बोलली.
" येडपट... कधी सुधारणार गं तू..."संजना म्हणाली.
" तुझ्या नंतर.. " सुप्री वेडावत म्हणाली. सगळेच शांत बसले होते. आकाशने काही लाकडं जमवून आणली होती. संध्याकाळ होत आली तशी त्याने ती गोलाकार रचून "शेकोटी" केली. सकाळपासून पाऊस होता त्यामुळे हवेत गारठा होता. सगळेच 'थंड' झालेले. शेकोटी बघताच त्याच्या आजूबाजूला येऊन बसले. आकाश गप्पच होता. संजना आकाशकडे बघत होती. कधीपासून तिला "सॉरी" बोलायचे होते आकाशला... चिखल उडवला होता ना तिने म्हणून. बाकी सुप्रीची नेहमी प्रमाणे बडबड चालू होती. त्यात बाकीचे हि मिसळले होते. थोड्यावेळाने तिचं लक्ष आकाशकडे गेलं.
" तुम्ही गप्प का ? बोला तुम्हीसुद्धा " एकजण आकाशला बोलला.
" मी नाही बोलत जास्त... शांतता आवडते मला... ",
"हो का... मग हिमालयात गेला का नाहीत.. " सुप्रीने joke केला आणि एकटीच हसू लागली. नंतर सगळेच हसले. आकाश त्यावर काही बोलला नाही.
"सॉरी हा... राग आला असेल तर... " सुप्री लगेच बोलली.
" मला राग येत नाही कुणाचा... ",
" wow !!! बरं आहे मग... तुम्हाला काही बोललं तरी राग येत नाही ... कोणी चिखल उडवला तरी राग येत नाही. " सुप्री संजनाकडे बघत म्हणाली.
" ये संजू... तू उगाचच घाबरलीस.... ओ, मिस्टर A.... तुम्हाला सांगते ना.... किती घाबरली होती संजू त्यादिवशी.... चिखल उडवला तेव्हा.... सॉलिड टरकली होती तुम्हाला .... उगाचच... " सुप्री म्हणाली. संजनाने तिच्या पाठीत धपाटा मारला.
" पागल... देव अक्कल वाटत होता तेव्हा कुठे होतीस... " संजना म्हणाली.
" तुझ्याबरोबर फिरत होती." एकच हशा पिकला. आकाशही हसू लागला. त्याला हसताना बघून सुप्रीला आश्चर्य वाटलं.
"तुम्ही हसता पण का... " सुप्रीचा प्रश्न.
" हो मग.... कधीतरी ..... शेवटी माणूसच आहे ना मी... " आकाशचं उत्तर..
" तुम्हाला राग येत नाही ना, तर मला वाटलं तुम्ही हसत सुद्धा नाहीत. ",
"तस नाही , पण मला या निसर्गात रमायला आवडते. इकडॆ कुठे कोण असते, झाडं, डोंगर, पशु, पक्षी.... बराचसा वेळ माझा फिरण्यात जातो... मग कुठे कोणावर रागवणार, म्हणून.... राग वगैरे नाहीच येत कधी. " सगळे मन लावून ऐकत होते.
"मग इकडे येता कशाला तुम्ही... i mean, फोटोग्राफी वगैरे ठीक आहे... पण शहरात का राहत नाहीत... " एका मुलीने विचारलं.
" छान असते निसर्गात... म्हणून राहतो इथे.. ",
"पण अजून ते 'छान' असं काही दिसलं नाही अजून... " सुप्री खूप वेळाने बोलली.
" सकाळी बघूया... चालेल का. " आकाश बोलला.
" ह्या... उगाचच बोलायचं मग... फुसका बार... " सुप्री वेडावत म्हणाली. आकाशला कळलं ते.
" शहरात कधी रात्रीच कोणी फिरलं आहे का... " आकाशचा प्रश्न. सगळेच हो म्हणाले. " आता सगळ्यांनी वर आभाळात बघून सांगा... असं द्रुश्य कुठे दिसतं का ते.. " सगळे वर पाहू लागले. सकाळपासून पडून पडून पाऊस थकला असावा. म्हणून रात्रीच आभाळ मोकळं होतं. चंद्र सुद्धा एका बाजूलाच होता. आभाळाच्या त्या "काळ्या" कॅनव्हासवर लाखो तारे चमकत होते. बहुदा त्यामुळेच चंद्र सुद्धा एका बाजूला जाऊन बसला होता. काय द्रुश्य होतं ते. व्वा !!.... सुप्री तर "आ" वासून ते बघत होती. actually, सगळ्यांनी पहिल्यादांच एवढे तारे बघितले होते.
आकाश सगळ्यांकडे पाहत होता आणि बाकीचे सगळे वर आभाळात... " आता कळलं ना... मला काय छान वाटते ते.. .. शहरात फक्त चंद्र तेवढा दिसतो. " आकाश बोलला तरी अजूनहि सगळे वरचं बघत होते. आकाशने घड्याळात बघितले. रात्रीचे ९ वाजत होते.
" मला वाटते आता सगळ्यांनी झोपायला पाहिजे ना... " त्या बोलण्याने सगळे भानावर आले.
"एवढ्या लवकर.... एवढ्यात तर मराठी सीरिअल पण संपत नाहीत... " संजना तोंड एवढंस करत म्हणाली.
" तुम्ही सगळे जागे राहा. मी जातो झोपायला." आकाश त्याच्या tent मध्ये जाऊन झोपला.
"त्याला जाऊदे.... आपण गाण्याच्या भेंड्या खेळूया." सुप्री म्हणाली.
" नको बाबा... एकतर आपल्याला इकडचं काही माहित नाही.... ज्याला माहित आहे तो झोपायला गेला... आपली गाणी वगैरे ऐकून कोणी वाघ, आदिवासी आले तर " एक मुलगी घाबरत म्हणाली.
" हो... बरोबर आहे हीच... " असं म्हणत एक-एक जणं आपापल्या तंबूत निघून गेले. राहिल्या फक्त दोघी.... संजना आणि सुप्रिया...
" आता हि शेकोटी कोणी विझवणार... माझा काका... " सुप्री मोठयाने बोलली." ओ मिस्टर A.... काय करायचं शेकोटीचं.... " ओरडून बोलत होती ती. लगेच आकाश त्याच्या तंबूतून बाहेर आला आणि आणलेलं पाणी त्याने शेकोटीवर ओतलं दिलं. आला तसाच पटकन त्याच्या तंबूत निघून गेला.
" विचित्र आहे ना अगदी... हा माणूस.... म्हणे निसर्गात राहायला आवडते... मला वाटते ना... याला घरीच कोणी घेत नसेल, अश्या स्वभावामुळे... रागच येतं नाही म्हणजे काय... आमच्या संजूला बघा... नाकावरचं राग असतो, फक्त एक बटन दाबलं कि सुरू " सुप्रीने तिचं नाक दाबलं.
" थांब हा,तुला आता चांगलाच मार देते... " तशी सुप्री तिच्या तंबूत पळाली. दोघींची आत मस्ती सुरु झाली. नंतर त्या झोपी गेल्या.
============================= क्रमश :