गोष्ट...किंवा गोष्टी. आपण बऱ्याच जणांनी लहानपणी चिऊ काऊच्या, राजा राणीच्या, प्राण्यांच्या पक्ष्यांच्या गोष्टी ऐकल्या असतील. तुम्ही म्हणाल यात नवीन काय? आम्ही खूप गोष्टी आजी-आजोबांकडून ऐकल्या आहेत.पण गोष्टी सांगणे सुद्धा एक कला आहे. नुस्तीच हाताची घडी घालून गोष्ट कोणी सांगू लागले तर खूप बोअर वाटेल.गोष्ट..मग ती कोणतीही असो तिच्यात शिरून त्या गोष्टीतील पात्रे अभिनयाने, आवाजाने जिवंत करता यायला हवीत. तरच ती गोष्ट ऐकण्यात मजा येते आणि ती गोष्ट कायम स्मरणात राहते.आजच्या व्हर्चुअल जगात हातात मोबाइल, कॉम्पुटर, टॅब अशी साधने वापरून विविध सर्च इंजिने वापरून लहान मुलांसाठी गोष्टी ऐकवल्या जातात, दाखवल्या जातात. परंतु स्वतः आई बाबा किंवा घरातील वडीलधारी मंडळींनी हावभावासहित एखादी गोष्ट सांगणे हे महत्वाचे आहे. मानसिक दृष्ट्या लहान मुलांना चेहऱ्यावरचे हावभाव, लकब, आवाज हे पटकन लक्षात राहतात.त्यामुळे त्यांच्यातील श्रवण आणि ग्रहण क्षमता विकसित होते. त्यामुळे त्यांच्या बौद्धिक क्षमतेतही वाढ होते. रात्री झोपताना गोष्ट सांगणे, जेवण भरवताना गोष्ट सांगणे यामुळे मुलांची आकलनशक्ती भक्कम होते. त्यातही विविध प्रकारच्या गोष्टींचा समावेश आहे. साहसी, विनोदी, जातक कथा, नैतिक कथा, काल्पनिक कथा, देवदेवतांच्या कथा अशा अनेक प्रकारच्या गोष्टी लहानपणी मुलांना सांगणे महत्वाचे आहे.त्यातूनच त्यांच्यातीळ सुप्त गुण विकसित होऊ शकतील. गोष्ट सांगताना प्रथम जी गोष्ट सांगायची आहे त्याबद्दल आधी मुलांना माहिती द्यावी. म्हणजे त्यातील पात्रे, त्यांची नावे, त्यांची माहिती द्यावी. प्राणी, पक्षी असतील तर ते कुठे आढळतात, त्यांचा रंग, आवाज,त्यांचा रहिवास याची माहिती देणे महत्वाचे आहे. कारण बऱ्याचदा मुलांनी असे प्राणी आसपास पाहिलेले असतात.त्यामुळे त्यांची मुलांच्या नजरेतून झालेली निरीक्षणे मुले उत्साहाने सांगू शकतात. त्यांचे आवाज काढू शकतात.त्यामुळे गोष्ट त्यांना मनोरंजनात्मक वाटेल आणि ते ऐकण्यासाठी आतुर असतील.गोष्ट सांगताना आणखी एक मुद्दा महत्वाचा आहे तो म्हणजे आवाजातील चढ-उतार. गोष्ट सांगताना त्यातील पात्रांच्या तोंडी असणारे संवाद हे कोणत्या प्रकारचे आहेत हे लक्षात घेऊन त्याप्रकारे आवाजातील चढ-उतार करता यायला हवेत. राग, आनंद, द्वेष, हसणे- रडणे अशा भावना हावभावातून आणि आवाजातून फुलवता येणे हि कला आहे. ती आत्मसात करता यायला हवी. त्यासाठी सूक्ष्म निरीक्षण असणे खूप महत्वाचे आहे.निसर्गातील पशु-पक्षी, माणसे, त्यांच्या सवयी याचा अभ्यास असायला हवा.आवाज अनेक प्रकारे बदलता यायला हवा.गोष्ट सांगण्यासाठी हल्ली पपेटाचा वापर होतो. तेही खूप चांगले आहे.तसेच गोष्टीसाठी चित्रांचाही वापर करता येऊ शकतो.गोष्ट हि अनेक प्रकारे सांगता येते.अभिनय आणि आवाज हा महत्वाचा भाग आहेच पण चित्राच्या माध्यमातूनही गोष्ट फुलवता येते. वाचिक अभिनयही करता येईल. गोष्ट वाचताना त्यातील संवाद लक्षात घेऊन त्याप्रकारे कथा,गोष्ट वाचून दाखवण्याचीही कला अप्रतिम आहे.शब्दांच्या माध्यमातून गोष्ट वाचताना केवळ आवाजाच्या माध्यमातून अशा गोष्टी सांगता येतील. रेडिओवर अशा प्रकारचे कार्यक्रम होतात.गोष्ट हा सर्वांच्याच आवाडीचा विषय आहे. लहानांपासून मोठ्यापर्यंत सर्वाना कथा आवडतात. रामायण, महाभारत, पंचतंत्र, विक्रम वेताळ, इसापनीती, अलिफ लैला, सिंदबाद, मोगली अशा अनेक काल्पनिक, पौराणिक आणि साहसी कथा आपण सर्वानीच लहानपणी वाचल्या आणि ऐकल्या असतील. परंतु सध्याच्या मॉडर्न आणि नेट युगात नवीन कथा लिहिण्याचे प्रमाण अत्यल्प आहे. जे.के.रोलिंग या लेखिकेने 'हॅरी पॉटर' या काल्पनिक साहसी कथांचे भांडार उपलब्ध केल्याने नवा प्रवाह कथेच्या प्रांतात आला. सध्या लहान मुलांच्या कथाविश्वात फॅन्टसीला खूप महत्व आहे. तशा प्रकारच्या कथा लिहिण्याची गरज आहे आणि नवीन रोमांचक पात्रांसह कौटुंबिक ओलावा असणाऱ्या कथेची गरज आहे. आजच्या युगात मोबाईल आणि इंटरनेट यामुळे मुलांच्या भावविश्वात कमालीचा बदल झाला आहे.विभक्त कुटुंबामुळे नाती त्यांना कळत नाहीत.चांगले-वाईट गुण यांचीही माहिती नसल्याने अनेकदा मुले वाममार्गाला लागतात. गोष्टींच्या माध्यमातून लहानपणी आपल्या पिढीला जे संस्कार मिळाले ते आजच्या मुलांना मिळण्यासाठी त्यांना गोष्टी सांगितल्या पाहिजेत.त्यासाठी नवीन बालकथांची निर्मिती होण्याची गरज आहे.