Bhanjyachi gosht books and stories free download online pdf in Marathi

भाज्यांची गोष्ट.

शाळेच्या बस मधून टुणकन उडी मारताच अभेद्य साहेबांची पोपटपंची सुरु झाली."आई, टिचरनी आज आम्हला व्हेजिटेबल्स शिकवल्या.आई, आपल्या घरात आहेत ना व्हेजिटेबल्स? मला त्याची भाजी करू दे टिफिनला उद्या."अशी बडबड सुरु होती. त्याला शाळेतल्या घडणाऱ्या गोष्टी घरी आल्यावर सांगायची भारी हौस. ती सवय चांगलीच आहे. घरी आल्यावर मी त्याला विचारले "कोणत्या व्हेजिटेबल्स शिकवल्या टिचरनी?" त्याने स्कूलबॅग मधून पुस्तक काढून मला चित्रातून एकेक भाजीचे नाव सांगू लागला. मला गंमत वाटली. मी म्हणाले,"अभि तुला खऱ्या भाज्या कश्या असतात? त्या कश्या उगवतात? त्याला काय म्हणतात? त्या कश्या शिजवतात? हे माहिती आहे का?". अर्थातच नकारार्थी मान हलली. मग मी विचार केला कि आज आठवडी बाजारात घेऊन जायचे आणि त्याच्या काही आवडीची आणि काही आपल्या आवडीची भाजी आणायची.यानिमित्ताने भाजी मंडई कशी असते, हे तो पाहिल.त्याला याविषयी सांगितल्यावर स्वारी खुश झाली."येह !मी भाजी आणायला जाणार".संध्याकाळी बाबा ऑफिसातून घरी आल्यावर बाबांनाही हि गोष्ट सांगितली.अभेद्याच्या बाबांनीही दोन पिशव्या घेतल्या आणि गाडीवरून शेजारच्या गावात भरणाऱ्या भाजी मंडईत अभेद्याला घेऊन गेलो.बांबूच्या मोठ्या पेटीमध्ये ठेवलेल्या वांगी, भेंडी, दोडका, मिरची कसे ऐटीत बसले होते तर हिरव्यागार पालक, मेथीनी मंडई हिरवीगार झाली होती. भाजीवाले ओरडत होते,"घ्या, घ्या!भेंडी, गवारी, मेथी, शेपू". हे पाहून अभेद्यला गम्मत वाटली."आई हे कशे ओरडतात बघ ना.."असे म्हणून त्यानेही भाजीवाल्यांची नक्कल करायला सुरुवात केली. आम्ही आई-बाबा मात्र हसत होतो. त्याला त्याच्या आवडीच्या भाज्या घ्यायला सांगितले तेंव्हा त्याला खूप आनंद झाला. मी विचारले,"अभेद्य आता तू सांग कोणती भाजी घ्यायची"त्याने आनंदाने समोरच्या भाजीवाल्याकडे बोट दाखवले आणि म्हणाला "भेंडी...लॅडीस फिंगर".त्याला भेंडी हात घ्यायला लावली. त्याने काही भेंड्या निवडून पिशवीत टाकल्या. त्यानंतर मेथी, पालक, काकडी, कोबी या भाज्या पिशवीत घेतल्या.प्रत्येक भाजी घेताना तिचे उपयोग आणि तिचे इंग्लिश आणि मराठी नाव आम्ही सांगत होतो. त्यामुळे अभेद्यचे व्हेजिटेबल्स नॉलेज वाढत होते. त्याच्यासाठी त्याच्या शाळेच्या छोट्या पुस्तका पेक्षाही हे भाजी मंडईचे फार मोठे आणि वास्तवातील खरे पुस्तक होते.अभिला आता शेपू, चुका, अंबाडी, सुरण,तांदळी, कारले, पात्री, घोळ, पडवळ अश्या रानभाज्यांची माहिती कळली होती.त्यांच्या खाण्याने शक्ती येते असे म्हटल्यावर 'मी आता शक्तिमान होणार' असे म्हणून अभेद्याने दोन्ही हात आडवे करून दंडाच्या इवल्याश्या बेडक्या फुगवल्या. घरी आल्यावर मात्र माझा शोध सुरु झाला तो प्रत्येक भाजीची वेगळी रेसिपी बनवण्याचा. कारण मुलांना आपण नेहमी भाज्या खाण्यावरून रागावतो. बऱ्याच घरातील आयांची हीच तक्रार आहे. पण मुलांना त्यांच्या आवडीच्या भाज्यांसोबतच त्यांना न आवडणाऱ्या पण जास्त शक्ति देणाऱ्या भाज्यांचे महत्व सांगितले तर त्यांच्या ना आवडणाऱ्या भाज्याही आवडत्या होतील.त्यातही त्या वेगवेगळ्या प्रकारे शिजवल्या आणि त्यांच्या विविध प्रकारच्या रेसिपी केल्या तर लहान मुले आनंदाने भाज्या खातील. यासाठी काही पारंपरिक आणि आधुनिक पारकर वापरून त्या भाज्यांची धिरडी, सूप, पराठे, रोल केले. खरे तर निसर्गातून उगवणाऱ्या भाजांच्यातून आपल्याला भरपूर व्हिटॅमिन, आयर्न, कल्शिअम मिळत असते. मुलांना शाळेत शिक्षक शिकवतात. पण त्या चार भिंतींच्या बाहेरील हि निसर्गाची शाळा खूप काही ज्ञान देणारी आहे. तसे तर भाज्या हि खूप साधी गोष्ट आहे, पण अभेद्यमुळे मलाही नव्याने भाज्यांचा अभ्यास करता आला.आई-वडील म्हणून आपण मुलांना प्रॅक्टिकल क्नॉलेज देणे आजच्या युगात महत्वाचे झाले आहे.केवळ पुस्तकातील अभ्यास वाचून घेणे, गृहपाठ लिहिणे त्याबरोबरीने मुले जे शिकत आहेत त्याचा अर्थ आणि त्या वस्तूंची माहितीही मुलांना देणे हे खरे शिक्षण आहे. भाज्या हि गोष्ट जरी छोटी वाटत असली तरी त्याची माहिती अभेद्याला व्हावी म्हणून त्याला भाजी मंडईत घेऊन जाणे, त्याच्या आवडीची भाजी घेणे, त्याची मराठी- इंग्रजी नावे सांगणे हि घटना मला खूप महत्वाची वाटली. कारण निसर्ग हाच खूप मोठा शिक्षक आहे आणि शक्ती दाताही.

इतर रसदार पर्याय