AGENT - X (3) Suraj Gatade द्वारा फिक्शन कथा मराठी में पीडीएफ

Featured Books
श्रेणी
शेयर करा

AGENT - X (3)

३.

आणखी एक मृत्यू झाला होता. धन्वंतरी फार्माचा तिसरा बोर्ड मेंबर, सत्तेचाळीस वर्षीय नारायण सांगावकर आपल्या लिविंगरूम मध्ये विस्कटला होता.
हो. विस्कटला म्हणतोय; कारण त्याच्या शरीराच्या वरचा भाग कापून तुकडे करून लिविंगरूम भर विखुरले होते. मिस्टर वाघ त्या ठिकाणी पोहोचला.
तो येण्याआधी पंचनामा उरकून हजारेनं सर्वांना तेथून बाहेर काढलं होतं. मिस्टर वाघ या केसवर काम करतोय हे त्याला कोणालाही कळू द्यायचं नव्हतं. मिस्टर वाघनं बॉडी पाहिली. मृताचा गळा चिरण्यात आला होता.
"किचन नाईफ वापरलंय!" मिस्टर वाघ बॉडी एक्झामाईन करत मागेच उभ्या असलेल्या हजारेला म्हणाला.
"किचन मधला चाकू? कशावरून?" हजारेनं आश्चर्यानं विचारलं.
"बॉडीवरील कट बघा. खांद्यापासून वर चिरलंय. एखाद्या गाईला कापावं तसं. कुकिंगच्या भाषेत याला 'चक स्टेक कट' म्हणतात." मिस्टर वाघनं स्पष्टीकरण दिलं.
"म्हणजे... खुनी एक शेफ आहे...? किती निर्घृणपणे मारलंय..." हजारे विचारांच्या तंद्रीत बोलून गेला.
"सांभाळून राहा हं हजारे!" मिस्टर वाघच्या उच्चारांवर हजारे दचकून भानावर आला.
"हॅ! मी काही घाबरत नाही! जर खूनीने मला मारण्याचा प्रयत्न करण्याची चूक केली, तर तो मेलाच म्हणून समजा!"
"म्हणजे त्यावेळी तुम्हाला माझी गरज पडणार नाही. माझे पैसे द्याल ना पण?" मिस्टर वाघनं हजारेंच्या चेष्टा करण्यासाठी त्याला विचारलं.
हजारेनं मिस्टर वाघला काही उत्तर देण्याआधी मिस्टर वाघचं कशावर तरी लक्ष गेलं होतं आणि तो त्या दिशेने पळून देखील गेला होता. हे लक्षात येताच हजारे देखील त्याच्या मागून पळाला...

रस्त्यावर,
"काय झालं असं अचानक पळून का आलात?" हजारेनं दम खात विचारलं.
"दरवाज्यातून कोणी तरी पळून गेल्याचं दिसलं. आपल्यावर बहुतेक कोणीतरी पाळत ठेऊन आहे. किंवा तो खूनी देखील असू शकतो!" मिस्टर वाघनं उत्तर दिलं.
"शीट! हाताला लागला असता, तर आताच सोक्षमोक्ष झाला असता!" हजारे वैतागाने उद्गारला.
"तो लागेलच ओ! पण आणखी वीस लाख ऍड झाले ते मात्र विसरू नका!" म्हणत मिस्टर वाघनं हजारे काही बोलण्याची वाट न बघता आपला रस्ता धरला.
इकडे हजारे सुद्धा मिस्टर वाघला शिव्या घालत त्याच्या जीपपाशी गेला. आपण आपल्याच पायावर धोंडा मारून घेतलाय की काय असं त्याला वाटू लागलं...

मिस्टर वाघला जेव्हा असं वाटलं, की आता आपण हजारेच्या दृष्टिक्षेपातून दूर झालो आहोत, तेव्हा त्याच्या पायांना पुन्हा वेग आला.
तो त्याच दिशेनं धावला होता, ज्या दिशेने मघासची व्यक्ती धावली होती. एका अगदीच वर्दळ नसलेल्या अरूंद गल्लीत ती व्यक्ती एका काळ्या रेंज रोव्हरसमोर उभी होती. तिला चटकन आत घेण्यात आलं होतं आणि दरवाजा लावून घेण्यात आला होता. वर्दळीचा आवाज नसल्यानं गाडीचा दार बंद झालेला आवाज मिस्टर वाघच्या कानावर स्पष्टपणे पडला. गाडी निघून गेली.

दुसरीकडे इन्स्पेक्टर हजारेनं आपल्या टीमला हॉटेल्स, रेस्टॉरंट, ढाबा, कत्तलखाना जिथं जिथं वैध-अवैधरित्या गोमांस मिळतं तिथं तिथं छापे मारायला सांगितलं. आणि त्यांच्या सेफ्स व कुक्सना अटक करण्याचे आदेश दिले. गोमांस बंदीच्या नावाखाली तो हे करू शकत होता. त्यामुळे खऱ्या खून्याला शंका येण्याचं काहीच कारण नव्हतं...
त्याच्या आदेशानुसार सेफ्स व खाटीकांना पोलीस स्टेशनला गोळा करण्यात येवू लागलं होतं...

तिकडे मिस्टर वाघचं काही तरी वेगळंच चालू होतं. रेंज रोव्हरचा नंबर त्याला मिळाला होता. गाडी पाहिल्यावरच त्यानं तो टिपून घेतला होता. आपल्या हॅकिंग स्किल्स वापरून त्यानं आरटीओ डेटाबेस मधून त्या गाडीची माहिती मिळवली. ती पुष्पक मेस्त्री नांवाच्या कुठल्यातरी माणसाची होती.
मिस्टर वाघनं पुष्पक मेस्त्रीला फोन लावून त्याला भेटण्याची वेळ घेतली,
"हॅलो, मी नज़ीम अहमद बोलतोय!" मिस्टर वाघ पुष्पक मेस्त्रीला म्हणाला.
"हा बोला...!" पलीकडून पुष्पकने उत्तर दिलं, पण त्याच्या आवाजावरून तो अनोळखी व्यक्तीशी बोलतोय हे स्पष्ट होत होतं. 'आपण कोण? मी आपल्याला ओळखलं नाही...' हा अर्थ त्या बोलण्यात निहित होता.
"साहेब, मी एक छोटा शेतकरी हाय. हळदीची लागवड करतू. आपण हळदीचा व्यापार करता असं समजलं. म्हणून फोन केला..." मिस्टर वाघ त्याला म्हणाला.
"हा होय! पण माझी ठरलेली लोकं आहेत. त्यांच्याकडूनच मी हळद खरेदी करातो." तिकडून मेस्त्री बोलला.
"साहेब, असं करू नका. एकदा भेटा. मला खात्री हाय तुमाला आमच्या हळदीची क्वालिटी नक्की आवडंल."
"मित्च! बरं संध्याकाळी यायला जमेल?" त्यानं ही ब्याद एकदाची टाळू असा विचार करून विचारलं.
"हा व्हय साहेब!"
"बरं सात वाजता या. मी पत्ता मेसेज करतो."
"नक्की नक्की साहेब! थॅन्क्यु साहेब! ठेवतो साहेब!" म्हणत मिस्टर वाघनं फोन ठेवला आणि नेहमीच कुटील हसला...