AGENT - X (6) Suraj Gatade द्वारा फिक्शन कथा मराठी में पीडीएफ

Featured Books
श्रेणी
शेयर करा

AGENT - X (6)

६.

मिथिल आपल्या प्रपोसलचा हेका काही केल्या सोडायला तयार नव्हता. मिस्टर वाघ येऊन गेल्यानं तो बिथरला नक्कीच नव्हता, पण सावध मात्र झाला होता. मिस्टर वाघ गेल्या-गेल्या सगळ्या ऑफिसमध्ये शोधाशोध करून त्यानं लगेच तातडीची बोर्ड मीटिंग बोलावली,
"गेल्या काही दिवसांत झालेल्या नुकसातून हीच एक डील आपल्याला बाहेर काढू शकते." तो मीटिंग मध्ये म्हणाला.
हेच मिथिल पुन्हा पुन्हा सर्वांना पटवून देण्याचा प्रयत्न करत होता आणि त्यासाठी पुन्हा मिस्टर वाघ येऊन गेल्याच्या दिवशी तातडीची मिथिलनं बोर्ड मीटिंग त्यानं बोलावली होती...
"जे झालं, ते वाईट झालं... आपले तिसरे बोर्ड मेंबर सांगावकर अकाली मृत्यूमुखी पडले..." अत्यंत कळवल्यानं तो बोलला.
"खून आहे तो..." बावन्न वर्षांचा निशांत पुरोहित हा बोर्ड मेंबर मिथिलला पुढं न बोलू देता ठामपणे रागाच्या स्वरात म्हणाला.
"खरंय तुमचं... पण तुमच्या लक्षात येतंय का... की तेच लोक मारले जात आहेत, ज्यांनी माझ्या एमडी होण्याला विरोध दर्शविला होता...!" खोटी आसवं ढाळत मिथिल बोलला.
"म्हणजे तू?" पुढं निशांतला काही बोलवलं नाही. तो सडन शॉकमध्ये गेला.
"हो!" चेहऱ्यावरचे भाव बदलत आणि ते अत्यंत क्रूर स्मित करत मिथिल म्हणाला,
"मला एमडी करण्याच्या माझ्या बापाच्या निर्णयापुढं तुमचं काही चाललं नाही, म्हणून तुम्ही मी आणलेल्या प्रत्येक प्रस्तावाला नाकारण्याचा सपाटाच लावलाय! आणि हे मला समजत नाही असं समजू नका! आय कान्ट टॉलरेट थिस! मी हे खपवून घेणार नाही!"
"म्हणजे तुम्ही आम्हालाही मारणार तर?" दिनेश मेहता या बोर्ड मेंबरने निर्भयपणे विचारलं.
"तुम्हाला मी कोण वाटतो ओ? सायकोपॅथ?" मिथिलनं वैतागून विचारलं. म्हणाला,
"एक तर मला साथ द्या, नाही तर राजीनामे! हा, पण दोन्ही जमणार नसेल, तर मात्र माझ्याकडं पर्याय उरणार नाही!" पुढच्याच क्षणी शांतपणे मिथिलनं आपलं म्हणणं मांडलं,
"आणि पोलिसांत वैगैरे जाण्याचा प्रयत्न केलात, तर मी तेही मॅनेज करू शकतो हे तुम्हाला माहीत आहेच. पैसा बोले जग डोले उगाच म्हणत नाहीत आपल्यात! चार पैसे फेकले, की मी पुन्हा तुमची वाट लावायला बाहेर!" म्हणत त्यानं प्रश्न करणाऱ्याकडं तिरकं पाहत मंद पण अत्यंत कपटी स्मित केलं.
"काय भाषा आहे? आपल्या वडलांच्या नांवाला आणि कंपनीला बट्टा लावणारी अवलाद आहेस तू!" साठ वर्षांचा दिनेश दात-ओठ खात म्हणाला.
त्याचं असं बोलणं मिथिलला ऐकवलं नाही. सेमी ऑटोमॅटिक पिस्टल घेऊन तो टेबल वर चढूनच दिनेशच्या समोर टेबलवर जाऊन बसला.
त्यानं दिनेशच्या खुर्चीच्या आर्मरेस्टवर असलेला दिनेशचा डावा हात उजव्या पायाने दाबला आणि पिस्टल लोड करून त्याच्या दोन भुवयांच्या मध्ये रोखलं. हे पाहून एसीत असून देखील निशांतला घाम फुटला. त्याच्या हनुवटी वरून घामाचे थेंब त्याच्या शर्ट व ट्राउझरवर ओघळू लागले.
"म्हाताऱ्या! तूच सगळ्यात आधी माझ्या एमडी होण्याला नकार घंटा वाजवली होतीस हे मी विसरलो नाही! पुढं जर चपर चपर केलीस ना, तर हा ट्रिगर दाबला गेलाच म्हणून समज!" मिथिल रागानं बोलला.
आणि लगेच त्यानं भाव बदलत इतर बोर्ड मेंबर्सवर विनंती रुपी नजर फिरवत तो बोलला,
"काय मागणी आहे माझी? माझं म्हणणं इतकंच आहे, की आपण आपल्या कंपनी अंतर्गत 'व्हिएक्स'ची निर्मिती करावी! किती मोठी ऑर्डर आहे माहीत आहे का तुम्हाला? इतकी मोठी संधी आपण हातची जाऊ देतोय..."
त्याच्या वागण्यात विकृती स्पष्ट दिसत होती.
"जाऊ देतोय तेच बरंय! आपण औषधं बनवतो ते लोकांचे प्राण वाचावेत म्हणून. आपण काही कोणी टेररिस्ट किंवा नाझीज नाही आहोत, की टॉक्सिक 'नर्व एजन्ट' तयार करून लोकांना मारावं!" पिस्टल माथ्याला असून दिनेशनं निडरपणे बोलण्याचं धाडस केलं होतं.
पण त्या धाडसाचं फळ त्याला लगेचच मिळालं!
"म्हातारा आहे, पप्पांचा मित्र आहे, कंपनी चालू झाल्यापासून पप्पांच्या सोबत आहे म्हणून तुला सहन करत आलो, ऐकत आलो! म्हणूनच तू आत्तापर्यंत वाचलायंस! नाही तर पहिला नंबर तुझाचं होता... पण आता बास! खूप झालं! तुझी वेळ आली! मोठ्या मोठ्या देवांची नांवं घे!"
मिथिलचं बोट ट्रिगरवर कसू लागलं. दिनेश निडरपणे मिथिलच्या डोळ्यांत पाहत होता. बाकी बोर्ड मेंबर्स स्तब्ध होते. आपला जीव प्रत्येकाला प्यारा होता म्हणून मिथिलला अडवायला उठण्याचं धाडस कुणीच केलं नाही. दिनेशची जहाल नजर मिथिलला सोसवली नाही. तो अत्यंत चिडला आणि...
"चल मीच नांव घेतो. जय... श्री... राम...!" म्हणत त्यानं ट्रिगर खेचला.
पिस्टलच्या गोळीचा आवाज कॉन्फरन्स रूम भर घुमला. सगळेच शॉक मध्ये. मात्र कॉन्फरन्स रूम साऊंड प्रूफ असल्यानं आत काय झालंय हे बाहेरील एम्प्लॉईजना मात्र काहीच अंदाज आला नव्हता. ते आपले नॉर्मली आपलं काम करत राहिले होते.
कॉन्फरन्स रूम मध्ये सर्वच सुन्न! मिथिल टेबलवरच बसून होता, पायाने दिनेशचा हात चिरडत. त्यानं तिरकस बाजूलाच बावरून आणि घाबरून बसलेल्या निशांतकडं पाहिलं. तसं निशांतला कापरं भरलं.
"आणि तू! जरा संभाळूनच रहा! बाहेर तुझे काय उपद्व्याप चाललेत ते मला माहीत नाही असं समजू नको!" मिथिलनं पिस्टलचं बॅरेल निशांतवर रोखून नाचवत तो निशांतला म्हणाला,
"नाही तर इथं मोठं होल पडंल!" म्हणत मिथिलनं बॅरलचं नोक निशांतच्या कनपट्टीवर दाबलं.
घामाने निथळलेला निशांत घाबरून थरथरत खाली बघत होता... हे पाहून मिथिलच्या चेहऱ्यावर क्रूर स्मित उमटलं,
"गुड! मला वाटतं आता कुणालाच काहीच ऑब्जेशन असणार नाही!" टेबल वरून खाली उतरत पिस्टल वरील गनपावडर आपल्या रूमालाने साफ करत मिथिल सर्वांना म्हणाला.
आणि सर्वांची सहमती त्याने स्वतःच ठरवली. पण त्याची ही कृती न पटलेल्या दोघा-तिघांनी आपापले राजीनामे तक्षणी लिहून देण्याची चुकभुल केलीच... त्यात निशांतही होता.
"सर, सिदात...!" एक जण परवानगी न घेता कॉन्फरन्स रूम मध्ये गडबडीनं घुसत म्हणाला.
त्याच्या बोलण्याने मिथिल गंभीर झाला. त्या व्यक्तीनं वाक्य जरी पूर्ण केलं नसलं, तरी त्याला काय म्हणायचंय हे मिथिलला समजलं होतं. आणि म्हणून लगेचच तो कॉन्फरन्स रूम बाहेर पळाला...

मिथिल आणि त्याला इन्फॉर्मेशन देणारा व्यक्ती एक्सपरिमेन्ट रूम मध्ये घाईने पळत घुसले. मिथिलनं एकच कटाक्ष सोबतच्या व्यक्तीवर टाकला, तशी ती व्यक्ती बाहेरून दरवाजा लावून घेऊन निघून गेली.
आणि खूप विदारक अशी एका माणसाची किंकाळी त्या ठिकाणी घुमली...
याच्या पुढं तिथं काय झालं एवढं मात्र मिस्टर वाघला समजलं नाही...


"पण मुळात एवढं तरी तुम्हाला कसं कळलं ते मला समजत नाही..." मी मिस्टर वाघला म्हणालो.
"मी काय बागेत फिरायला म्हणून धन्वंतरी फार्माच्या ऑफिसरवर गेलो नव्हतो!" मिस्टर वाघ उपहासानं म्हणाला.
"मग तुम्ही केलंत तरी काय? मिथिलनं चौकशीसाठी तर आधीच साफ नकार दिला होता." त्याच्या टिप्पणीवर नाराज होत मी म्हणालो.
"बग्स प्लांटींग! म्हणून तर तिथं काय चाललंय मला समजत होतं!"
"पण तुम्ही सिक्युरिटी कॅमेराजना अवॉईड केलंतच कसं?"
"सर्विलीयन्स कॅमेरा जॅमरच्या मदतीने!"
"ते आणि काय हाय?" मी वैतागानं विचारलं.
माझ्या रिएक्शनवर तो हसला. म्हणाला,
"कॅमेरा जॅमरच्या हाय फ्रिक्वेन्सीमुळं आपल्या आसपास तीस मीटर पर्यंतचे कॅमेराज् जॅम होतात. प्रिटी मस्ट द सेम लाईक सिग्नल जॅमर!"
"इज इट रियली पोसीबील?" मी शंकेनं विचारलं.
"वायर्ड कॅमेराज् असतील, तर नाही. पण वायरलेस कॅमेराज् वर ही ट्रिक वर्क होते. आणि मी आधी माहिती घेतल्यामुळं मला माहित होतं, की जॅमरने काम होईल."
"आणि कॅमेराज् वायर्ड असतेत, तर?"
"हॅकिंग करावं लागलं असतं इतकंच! त्या खोलीपर्यंत तर गेलो, पण आत मला जाता नाही आलं. म्हणून मला तिथं बग्स इन्स्टॉल नाही करता आले. मी मॅनेजरला आत काय आहे म्हणून विचारलं, तेव्हा त्यानं ते स्टोअर रूम असल्याचं सांगितलं आणि दाखवण्याचं टाळलं. म्हणून मी बाहेर का होईना, पण एक बग इम्प्लांट केलाच!"
"मग तुम्ही इतकं माहीत असून देखील मिथिलला का मोकळं सोडलंत? जेवढा मी तुम्हाला ओळखतो, तुम्ही कॉन्फरन्स ऐकल्या क्षणी त्याला संपवायला हवं होतं..."
माझं बोलणं ऐकून मिस्टर वाघनं स्मित केलं,
"तू मला एवढा ओळखतोस, तर तुला हे पण माहीत असेलच, की प्रत्येक गोष्ट मी योग्य वेळेवरच करतो. त्याला मारण्याची ती वेळ नव्हती. कंपनीत ती व्यक्ती कोण आहे जीला त्या बंद दरवाजामागे ठेवलंय आणि कशासाठी? हे शोधायचं होतं. मिथिलला व्हिएक्सचं प्रपोसल ज्यांनी दिलं त्या त्या लोकांनाही शोधणं मला गरजेचं होतं.
"हं! शिवाय खूप दिवसांनी खेळण्यासाठी एक लायकीची शिकार मिळाली होती! वाघ ती कशी सहजासहजी जाऊ देणार होता...!" असं म्हणत तो मोठ्यानं असुरी हसला.
ते हसू ऐकून माझ्या अंगावर काटा उभा राहिला... आता पर्यंतच्या आमच्या संभाषणात मी हे विसरूनच गेलो होतो, की मी 'गॉड ऑफ डेथ' सोबत चर्चा करतोय...
त्याच्या या हसण्याने मला याची आठवण करून दिली. आणि मी पटकन भानावर आलो. माझ्या लक्षात आलं, की मी तर त्याच्याच घरी बसलोय... जिथे अत्यंत विषारी साप त्याने घरी पाळून ठेवलेत...
हा विचार मनात येताच बाहेरील पावसाचा आणि मिस्टर वाघच्या हसण्याचा प्रचंड आवाज येत असताना त्यातूनही सापांची 'हिस्स्' माझ्या कानावर पडू लागली. ते माझ्या पायाशी रेंगाळत आहेत असा भास होऊ लागला. बाहेर प्रचंड मोठा पाऊस एव्हाना चालू झाला होता आणि मी त्या थंड वातावरणात सुद्धा घाबरून घामानं थबथबलो होतो... मी गारठलो तर होतो, पण थंडीने नाही, तर मरणप्राय भीतीने!
हे खूप डेडली कॉम्बिनेशन आहे... भितीमुळेच तुमचं बॉडी टेम्प्रेचर तर वाढलेलं असतं, पण त्याच भीतीमुळे एकाचवेळी तुम्ही गारठूनही गेलेले असता...!
"सूरज!" मिस्टर वाघनं मला हाक दिली.
तसा मी भानावर आलो. इतका, की मिस्टर वाघ समोर तोंड सांभाळून आणि प्रयत्न झालाच, तर आवळून बोलायला पाहिजे हे माझ्या लक्षात आलं. न जाणे कधी आपण देखील...
सापांचा आवाज हा माझ्या मनाचा खेळ होता आणि त्याचा थंड स्पर्श देखील; हे माझ्या ध्यानी आलं. सुटलेल्या थंड हवेमुळे पायाला गार वाटत होतं हे लक्षात आलं.
"सूरज!" त्यानं पुन्हा हाक मारली.
"अं?!" मी प्रतिक्रिया दिली.
"कुठं हरवलास?"
"नाही.. कुठं नाही... तुम्ही बोला..." मी म्हणालो.
"मिथिल इतका बेरकी आणि चलाख आहे, की त्याने मी त्याच्या ऑफिसमधून निघाल्यावर सर्व सर्विलीयन्स कॅमेराजची तपासणी करण्यासाठी आपल्या सिक्युरिटीला कामाला लावलं.
पण मी ज्या पिरियड मध्ये त्या ऑफिस मध्ये गेलो होतो, त्या पिरियड मध्ये काहीच रेकॉर्ड न झाल्याचं त्याच्या लक्षात आलं.
त्यानंतर त्यानं ताबडतोब सर्व कॅमेरे बदलून घेतले होते. आणि संपूर्ण ऑफिस व रिसर्च डिपार्टमेंट मध्ये तपास घेण्यास सिक्युरिटीला त्याने ऑर्डर दिली होती."
"मग त्यांना तुमची हिअरिंग डिव्हाइसेस सापडली नाहीत?"
"नाही! कारण मी ती लपवलीच अशी होती की सापडू नयेत!"
मिस्टर वाघच्या या सहज वाटणाऱ्या उत्तरावर मला समजलं, की मी मूर्खासारखा प्रश्न त्याला केला होता. मिस्टर विजय वाघ आहे तो! तो काहीही करू शकतो...!
"या नंतर सगळ्यात आधी त्यानं आपल्या सिक्युरिटी व सर्विलीयन्स ऑफिर्सना फायर केलं!
"मुळात मिस्टर वाघला सिक्युरिटीने आत सोडलंच का आणि स्क्रीन्सवर ब्लॅक आऊट झाल्यावर ताबडतोब त्याला माहिती देण्यात का आली नाही असा जाब मिथिलनं ऑफिसर्सना विचारला होता.
"त्यावर, 'वाघ हे पोलिसांकडून आले असल्यानं आणि त्यांना निशांत सर स्वतः घ्यायला गेटवर आले असल्यानं त्यांना अडवलं नाही असं सिक्युरिटी ऑफिसरनं त्याला सांगितलं' व त्याच्या सर्विलीयन्स ऑफीसरनं सांगितलं, की 'दुसऱ्या युनिट मध्येही हाच प्रॉब्लेम झाला होता म्हणून त्यानं टेक्निकल इन्कवायरी केली होती. शिवाय काही वेळातच सर्व कॅमेरे पूर्ववत काम करू लागले होते. म्हणून त्याला काही गंभीर आहे असं नाही वाटलं...'
"त्यांच्या स्पष्टीकरणावर समाधानी न होऊन मिथिलनं सिक्युरिटी व सर्विलीयन्स ऑफिसर्सना कामावरून हाकलून लावाढा."
"थिस मिथिल मॅन मस्ट बी डेंजरस...!" मी विचारांत हरवून बोलून गेलो.
"इतका, की तू विचारही नाही करू शकत!" मिस्टर वाघ निष्काळजीपणे स्मित करत माझ्याकडं रोखून पाहत बोलला...
आणि मग वर छताकडं रोखून कुठं तरी हरवल्या सारखा पाहत तो उद्गारला,
"सिदात!"