AGENT - X (7) Suraj Gatade द्वारा फिक्शन कथा मराठी में पीडीएफ

Featured Books
श्रेणी
शेयर करा

AGENT - X (7)

७.

आता मिथिलचं नेक्स्ट टार्गेट कोण आहे हे मिस्टर वाघला माहीत होतं! रादर् मिथिलसाठी त्यानं स्वतःच ते सेट केलं होतं.

दरम्यान मिस्टर वाघचं नेमकं काय चालू आहे हे हजारेला मात्र काही उमगत नव्हतं. तो अक्षरशः वैतागला होता. फिफ्टी प्रसेन्ट पेयमेंट त्यानं मिस्टर वाघला आधीच केलं होतं आणि असं असून ठोस असं काही मिस्टर वाघ करत असल्याचं (त्याच्या दृष्टिकोनातून तरी) त्याला दिसत तर नव्हतं.
मिस्टर वाघनं त्याला सतत रिपोर्टिंग करावं असं त्याचं म्हणणं होतं. जे मिस्टर वाघ कधीच करणारा नव्हता...
"तुमचं काय चाललंय काही कळत नाही मिस्टर वाघ!" तो रागातच मिस्टर वाघला बोलला.

यावेळी मिस्टर वाघनं स्वतःच स्वतःला मिलींद हजारेच्या घरी जेवणासाठी आमंत्रित केलं होतं आणि हजारे नाईलाजाने त्याला जेवू घालत होता...
घास तोंडाजवळ नेत काही न बोलता मिस्टर वाघनं हजारेकडं पाहिलं आणि भाकरीच्या शेवटच्या तुकड्याचा केलेला घास त्यानं तोंडात सरकवला.
'आपण काहीच बोलणार नाही!' हे त्यानं त्याच्या या कृतीतून हजारेला दर्शवलं होतं. त्यामुळं हजारेचा अधिकच जळफळाट झाला, पण त्याची बायको एव्हाना स्वयंपाक घरातून बाहेर येऊन मिस्टर वाघला भात वाढत असल्यानं त्याला राग व्यक्त करता आला नाही. तो मूठ आवळून शांत बसला. त्याच्या या कुचंबनेवर मिस्टर वाघ हसला. त्याच्या अशा अचानक हसण्यानं हजारेची बायको वाढायचं थांबली.
"नाही. काही नाही. एक जोक आठवला." म्हणत 'वाढा' असं सांगण्यासाठी त्यानं ताटाकडं खूण केली.
'किती खातोय हा भुक्कड! भस्म्या झालाय का याला? तिकडं पैसा खातोय आणि इकडं जेवण हादडतोय हरामखोर! काम तर काडीचं करत नाहीये. आपणच पायावर धोंडा मारून घेतलाय...' हजारे दात खात पुटपुटत होता.
पण त्याच्या रागाची इंटेन्सिटी इतकी होती, की त्याचे ओठ हालत होते. म्हणून लीप रिडींग एक्सपर्ट असलेल्या मिस्टर वाघ पासून त्यांचं बोलणं लपलं नाही.
आणि हजारेकडं पाहून हसतच भाताचा घास त्यानं तोंडात भरला...

"जेवण छान झालं होतं!" म्हणत त्यानं ओले हात नॅपकिनला पुसले. आणि एक मोठ्या रकमेचा चेक लिहून त्यानं हजारेच्या बायको समोर धरला.
'हे काय?' या अर्थानं ती मिस्टर वाघाकडं पाहू लागली.
"आपल्याकडं परान्न वर्ज्य मानलं आहे. म्हणून काही तरी भेट देण्याची प्रथा आहे. गृहस्थानं फुकट खाऊ नये. म्हणून ही छोटी भेट!" तो हसत म्हणाला.
आणि त्यानं तो चेक घेण्यास हजारेच्या बायकोला भाग पाडलं. म्हणाला,
"अन्नपूर्णेचा किती सम्मान करावा तितका कमी. पण कुवती प्रमाणं करतो. स्वीकारा." म्हणत त्यानं चेक तिच्या हातात अक्षरशः कोंबला.
असं म्हणून त्यानं भेट म्हणून जरी हे पैसे दिले असल्याचं वरकरणी दिसत असलं, तरी पैसे देण्यामागचं त्याचं खरं कारण काय, याचा अंदाज मला आला होता...
ऋण चढण्या आधीच तो ते फेडू पाहत होता...


संध्याकाळ झाली होती. आमच्या हातातील चहा कधीच गार झाला होता. बोलणं चालू झाल्यानंतर दोघांनीही एकही घोट घेतला नव्हता. साडे सात वाजून गेले होते. मोठ्या पावसामुळे अंधारून तर कधीच आलं होतं. आईला काळजी नको म्हणून मग मिस्टर वाघनं मला माझ्या घरी सोडलं.
आठ दहाला मी माझ्या गल्लीच्या कॉर्नरला होतो. मला तेथेच सोडून मिस्टर वाघ निघून गेला होता. पावसाची रिपरिप चालूच होती, पण भिजण्यासारखा पाऊस नव्हता.
आजही बरेच प्रश्न अनुत्तरित राहिले म्हणत मी रात्र जागूनच काढली...
बाहेर विजांचा कडकडाट चालू होता... आणि माझ्या आतही तुफान उठलं होतं... प्रश्नांचं... न उलगडणाऱ्या कोड्यांचं...

केवढा तो गुंता... वरून दिसताना सगळं तर किती सहज सोपं दिसत होतं...
गुन्हेगार कोण आहे हे देखील माहीत होतं...
पण माणसं का मारली जाताहेत हे कळत नव्हतं...
नर्व एजंट ही काय भानगड होती? आणि खरंच ते इतकं घातक आहे का, की आपला जीव गमावला तरी बेहत्तर! पण असलं काही आपल्या कंपनीत बनवू द्यायचं नाही असं बोर्ड मेंबर्सनी ठरवलं होतं...?
मुळात बोर्ड मेंबर्स् शांतच का होते? का नाही त्यांनी त्यांच्या एमडी विरुद्ध शासन - प्रशासनाकडे धाव घेतली? नुसता विरोध दर्शविला म्हणजे झालं असं नाही ना होतं... मरणाची भीती म्हणून ते गप्प असतील का? पण तसेही ते मरणारच होते. हे त्यांच्या कसं लक्षात आलं नाही... लोकांच्या आणि पर्यायाने त्यांच्याही सुरक्षेचा हा प्रश्न होता...
मरणाच्या भीतीनं सारासार विचार करण्याची शक्ती माणूस गमावतो हेच खरं...
शिवाय काही अज्ञात अतिरेकी ताकदी या सगळ्यामागंचं मूळ होत्या का? तेही कळायला सध्या मार्ग नाही!
आणि सिदात...?
ते एक काय प्रकरण होतं?
शिवाय या सगळ्याचा हानियाशी काय संबंध?
कशाचीच लिंक लागत नाही...!
सगळं कसं 'जिगसॉ पजल' सारखं आहे! तुकडे तर सगळे समोर आहेत, पण ते जोडायचे कसे; ते मात्र समजत नाहीये...

आणि दुसऱ्या दिवशी मी पुन्हा मिस्टर वाघच्या घरी पोहोचलो. ते सारे प्रश्न डोक्यात घेऊन. त्यांची उत्तरं मिळवण्याच्या लालसेनं मला मिस्टर वाघच्या घराकडं खेचलं होतं...
मी गेट उघडलं. मिस्टर वाघच्या घरचं गेट उघडताना मला मी यमलोकाचा किंवा भूत बंगल्याचा दरवाजा खोलतोय की काय असा नेहमी भास होतो... मी लॉन पार करून मुख्य दरवाजा पाशी पोहोचलो. तो फक्त पुढं केलेला होता...
बरोबरच आहे म्हणा! यांच्या घरात शिरण्याचं धाडस कोण करणार?!
मी दाराला हात लावला, तसं दार आतल्या बाजूला उघडलं.
"आत ये!" मिस्टर वाघचा आतून जोराचा आवाज आला.
मी आत प्रवेश करता झालो. पाहतो तर काय, मिस्टर वाघ त्याच्या नेहमीच्या जाग्यावर बसून नागाच विष काढत होता.
नागाच्या तोंडाकडं बघतच त्यानं मला आत येऊन बसण्याचा इशारा केला. मी हललो होतो त्या नागाला पाहून. जागीच खिळलो होतो.
"तुला माहिती आहे याचं सायंटिफिक नेम काय आहे?" त्यानं माझ्याकडं न बघताच विचारलं.
'मला जाणून घेण्यात काही इंटरेस्ट नाही! हा नाग आहे एवढं मला पुरेसं आहे!' असं मी म्हणालो; पण मनातल्या मनात.
त्यानं वर पाहिलं. माझ्या चेहऱ्यावरची भीती बघून त्यानं आपलं काम थांबवलं आणि त्या नागाला पेटीत ठेऊन ती पेटी भिंती लगतच्या टेबलावर ठेऊन दिली. परत पहिल्या जागेवर येत तो म्हणाला,
"इंडियन कोब्रा रेकग्नाईझ्ड् एज ट्रु कोब्रा. वन ऑफ द मोस्ट वेनमस स्नेक्स ऑन अर्थ! सायंटिफिक नेम 'नाया नाया' ऑर 'नाजा नाजा'! व्हॉट ए ब्युटीफुल क्रिएचर! मला कळत नाही तू यांना इतकं का घाबरतोस?" बसत तो मला म्हणाला.

'हा बोलायचं म्हणून बोलतो का? विषारी सापांना कोण नाही घाबरत?' मी वैतागानं मनाशी बोललो. आणि क्षणात चपपलो!
'हे... हे विष तो कोणासाठी काढतोय... माझ्यासाठी तर... नाही...?
'नाही! म्हणजे नसावं...! असं असू शकत नाही!
'मिस्टर वाघच्या घरी आल्यावर किंवा त्याला असं काहीतरी करताना पाहिलं, की डोकं असं काहीतरी भलतंच विचार करत राहतं... मी काय केलंय? काहीच तर नाही... मग... मग मी का भिऊ...?'

स्वतःला समजावत मी त्याच घाबरल्या अवस्थेत त्याच्या समोर बसलो. खाली बघत... कुठं तरी हरवून त्याचं बोलणं चालूच होतं,
"खरी विषारी जात कुठली ठाऊक आहे?" त्यानं विचारलं. पण नेहमी प्रमाणे माझ्या उत्तराची वाट न पाहता त्यानंच उत्तर दिलं. म्हणाला,
"माणसाची!"
मी दचकून वर त्याच्याकडं बघितलं. तो कुठं तरी हरवल्या सारखा कुठं दुसरीकडंचल पाहत बोलतच होता...
"साप कितीही विषारी असला, तरी तो विनाकारण कोणाच्या वाट्याला जात नाही! ना आपल्याकडील सामर्थ्याचा त्याला गर्व असतो! पण या उलट माणूस! काही नसताना अहंकाराने आंधळा झालेला! संधी मिळताच फसवेल! आणि त्याच्यावरच कसा अन्याय झालाय अशी उलट बोंब ठोकेल...! अत्यंत विषारी; माणूस...!" तो बोलायचं थांबला.
आजही तो वेगळ्याच मूड मध्ये दिसत होता. त्यामुळं त्याला पुढं कंटीन्यू करण्यास सांगावं, की नको हे मला कळेना...
तो नेहमीच असा काहीतरी सांगता - सांगता मध्येच कोशात जातो. एकटेपणामुळं त्याला असं होतं असेल का? पण नाही! तसंही असू शकत नाही! कारण तो तटस्थ आणि स्थीर बुद्धीचा माणूस आहे. तो असा ढळूच शकत नाही!
मग लक्षात येतं, की खूप जग बघितलंय यानं! खूप चित्र-विचित्र अनुभव घेतलेत. असं ज्यावेळी लक्षात येतं; त्यावेळी त्याचं असं असबद्ध बोलणं विनाकारण वाटत नाही...!
मी शांत होतो. आणि मिस्टर वाघही. मग त्यानेच शांतता भंग केली. म्हणाला,
"लेट्स स्टार्ट! त्याशिवाय तुला तुझी कथा पूर्ण करता येणार नाही!"
आणि त्यानं पुढं सांगायला सुरुवात केली...