रुद्रा ! - १० suresh kulkarni द्वारा फिक्शन कथा मराठी में पीडीएफ

Featured Books
श्रेणी
शेयर करा

रुद्रा ! - १०

राघवला जेम तेम तीन तासाची झोप मिळाली होती. तो सकाळी आठच्या सुमारास तयार झाला होता. आज बरीच कामे होती. त्याने मोबाईल ऑन केला. जाधवकाकाचे दोन मिस्ड कॉल दिसत होते. तसाही तो त्यांना फोन करणारच होता.
"हॅलो,जाधवकाका तुमचे दोन मिस्ड कॉल दिसतायत!"
"सर, सकाळीच शकीलशी बोलणे झाले. काल रात्री तुम्ही धम्माल केलीत म्हणे. "
"धम्माल कसली काका? नुसतीच धावपळ झाली. दोन्ही पक्षी भुर्र उडाले. हाती कोणीच आलं नाही! त्यात तो मनोहराचा अपघात!"
"हो, सांगितलं शकीलने."
"बर, तुम्ही ताबडतोब व्हॅन आणि फोर्स घेऊन जसवंतच्या घरी जा. तो 'नक्षत्र'च्या आऊट हाऊस मध्ये राहतो हे तुम्हाला ठाऊक आहे. मी पाच मिनिटात तिकडेच येतोय. त्याला ताब्यात घ्यायचंय. आपल्याला आज बरीच काम आहेत. तो सापडला तर त्याला कोर्टात हजर करून रिमांड घ्यावा लागेल. आणि नाही सापडला तर हुडकून काढावा लागेल. तेव्हा तयारीने या. " राघवने फोन कट केला. आणि गिल साहेबांना फोन केला. कालचे रिपोर्टींग केले. जसवंतला ताब्यात घेत असल्याचे कानावर घातले. दुसऱ्या मिनिटाला तो 'नक्षत्र'च्या रोखाने निघाला.
०००
तो 'नक्षत्र'वर पोहंचला तेव्हा गेट बाहेर पोलीस व्हॅन उभी होती. अपेक्षे प्रमाणे जाधवकाका त्याच्या पेक्ष्या लवकर पोहंचले होते. राघवच्या घरा पेक्षा पोलीस स्टेशन पासून 'नक्षत्र' जवळ होते. तो तडक जसवंतच्या आऊट हाऊस कडे निघाला. आऊट हाऊसचे दार ओढून घेतलेले होते. बाहेर जाधवकाका मोबाईलवर कोणाशी तरी बोलत होते.
"काका, जसवंत?"
त्यांनी आपले फोनवरी बोलणे न थांबवता फक्त दाराकडे बोट दाखवले! राघवला हे थोडेसे विचित्रच वाटले. तो आधाश्या सारखा आऊट हाऊस मध्ये घुसला,आणि थिजल्या सारखा दारातच उभा राहिला. कारण समोरचे दृश्य तितकेच भयानक होते! समोर जसवंत जमिनीवर वेड -वाकडा पडलेला होता! त्याचा चेहरा आणि शरीर काळे निळे पडले होते! तो जिवंत नाही या साठी नाडी तपासण्याची गरज नव्हती!
जाधवकाका फोन आटोपून राघव जवळ आले.
"जाधवकाका, हे असं व्हायला नको होत! मनोहर पाठोपाठ हा हि गेला! खुन्या पर्यंत पोहंचण्याच्या पायऱ्या एक एक करून निखळत आहेत! बरे आपल्या टीमला बोलावून घ्या!"
"सर, तुम्ही आलात तेव्हा मी तोच फोन करत होतो!"
मनोहरच्या गांज्याच्या पुड्यातील जहाल विषाने आपला प्रताप दाखवला होता!
पुढील चार तास राघव जसवंतचे आऊट हाऊस इंच-न-इंच आपल्या पोलिसी नजरेने चाळून काढले. 'जसवंतला गांजाचे प्रचंड व्यसन होते' या खेरीज त्याच्या हाती काहीच लागले नव्हते!
०००
राघव खोल विचारात गढून गेला होता. संतुकरावांच्या खुनाचे रहस्य वरचेवर गूढ होत चालले होते. जसवंतवर विषप्रयोग झाला होता. हे त्याच्या पोस्टमोर्टम रिपोर्ट मध्ये सिद्ध होणार होते. संतुकरावांना शेवटचा जिवंत पहाणारी एकमेवा व्यक्ती जसवंत होती. तो हि आता मेला होता. जसवंतशी सम्पर्कात असणारा मनोहर, तोही अपघातात मेला होता! संतुकरावच्या संदर्भातील या खूनामुळे प्रकरणातील गुंता वाढलाच होता. त्यात हि 'मनोहर' हे प्रकरण ज्यास्त गूढ होते. तो खुनी असेल असे, हाती आलेले पुरावे निर्देश करत नव्हते. संतुकरावांचा आणि त्याचा काहीतरी सबंध होता. तो काय? हे अजून उलगडले नव्हते. संतुकराव-जसवंत- मनोहर -संतुकराव अशी साखळी स्पष्ट होती! फक्त एक लिंक मिसिंग होती. तो बेनामी खुनी आणि मनोहर यांच्यातली! या खूना मागे कोण असेल?
जसवंत आणि मनोहरच्या पोस्टमोर्टमचे रिपोर्ट आले होते. जसवंतच्या पोटात आणि रक्तात गांज्या आणि अर्सेनिकचे रेसिडूय सापडले होते. मृत्यूचे कारण 'विषप्रयोग' हेच होते. मनोहरच्या रिपोर्टमध्ये पहाण्या सारखे फारसे नव्हते. त्याचे बरेचसे अवयव हायवे वरून खरडून काढावे लागले होते! तो अपघात भयानकच होता! या रिपोर्ट सोबत एक अजून छोटासा रिपोर्ट होता. जसवंतच्या मोबाईल मधील कॉल हिस्टरीचा! गेल्या दोन महिन्यात जसवंतने गावाकडच्या बायको पेक्षा अधिक फोन मनोहरला केले होते!
पुन्हा मनोहर!
०००

राघवने सकाळचा ब्रेकफास्ट उरकला. आणि मोबाईल उचलला.
"हॅलो, जॉन! राघव हियर!"
"गुड मॉर्निंग सर!"
"जॉन, अजून दहा मिनिटात म्हणजे बरोबर साडेनऊला भोसेकर चाळीच्या कोपऱ्यावर येतोय! तू गेटवर थांब!"
"सर, मी आसपासच आहे! मनोहर साठी येताय ना? पण तो काल रात्री आलेलाच नाही!"
"मला माहित आहे! आणि तो येणार हि नाही!"
"का?"
" कारण तो कालच ऍक्सीडेन्टमध्ये मेलाय! "
या राघवाल सगळ्याच गोष्टी ऍडव्हान्समध्ये कशा कळतात? ओन्ली गॉड नोज! जॉनला राघवने पुन्हा एकदा चकित केले होते!

राघव आणि जॉन भोसेकराच्या चाळीतील मनोहरच्या खोलीकडे निघाले. राघवच्या बुटाच्या आवाजाने चाळीतील रिकामटेकडे बघ्यांची झुंबड उडाली. या चाळीला अनेक थोरा मोठ्यांचे पाय लागले होते. पण पोस्टमन शिवाय 'खाकी' वर्दीवाले कोणीच आले नव्हते. आज पोलिसांच्या आगमनाने चाळ पावन झाली होती!
बघ्यांची गर्दी वाढत होती. जॉनने दाखवलेले मनोहरच्या खोलीचे दार फक्त लोटलेले होते.
" या खोली शेजारी कोण राहतंय?" राघवच्या या वाक्यासरशी जदूची कांडी फिरवावी तशी बघ्यांची गर्दी गायब झाली. लोक पोलिसांशी सहकार्य करणे सोडाच, पण साधे बोलायला देखील नाखूष असतात. याची प्रचिती राघवला पुन्हा एकदा आली.
"जॉन, जरा चौकशी कर, शेजारी कोण राहतंय? मनोहर कोठून आला? म्हणजे त्याचे गाव कोणते? त्याचे येथे मुंबईत कोण -कोण नातेवाईक आहेत? थोडक्यात जमेल तितकी माहिती काढ! तोवर मी घरात नजर टाकतो. "
राघवने दोन्ही हातानी ते लोटलेले दार उघडून मनोहरच्या खोलीत प्रवेश केला. सगळे घर अस्ताव्यस्त पडले होते. एकुलते एक कपात 'आ' वासून पहात होते. त्यातले सगळे कपडे एक एक सुटे करून घरभर पसरले होते. लोखंडी पत्र्याची पेटीचे झाकण मोडून टाकले होते. पलंगावरल्या गादी उशीचे तर पोस्टमोर्टमच झाले होते. आतला कापूस, चिंध्या धिटाईने बाहेर डोकावत होत्या. इतकेच काय? डाळ - तांदळाचे आणि चहा-साखरेचे डब्बे पण धारा तीर्थी पडले होते! कोणी तरी छत आणि भिंती सोडून सगळी खोली मायक्रोस्कोप खाली तपासून काढली होती! कोणी तरी, काहीतरी, या खोलीत शोधात होते? कोण? आणि काय? उघड्या कपाटाच्या कोपऱ्यातल्या फटीत काही तरी अडकलेले राघवला दिसले त्याने ती वस्तू अलगद ओढून बाहेर काढली. ती एक प्लॅस्टिकची झिप लॉक असलेली छोटीशी पुडी होती. अस्सल गांजाची! अशीच पुडी जसवंतच्या आऊट हाऊस मध्ये पण सापडली होती! मनोहर जसवंतला 'माल' पुरवत होता? कदाचित अशाच गांजातून जसवंतला विषबाधा झाली असावी. मनोहरने जसवंतचा काटा काढला असे सूचित करणारा हा पुरावा होता!
०००
अनपेक्षितपणे तो बुटका टकलू ढाब्यातून वेगाने धावत हायवे कडे पळत आला, त्याच्या मागे राघव होताच! क्षणात त्या बुटक्याला चिरडून तो राक्षसी ट्रक निघून गेला. रुद्राला हे नाट्य, तो उभा होता तेथून दिसत होते. मेंदूने या सर्वांचा अर्थ लावेपर्यंत काहीवेळ तो एका जागी स्तब्ध उभा राहिला. या अपघातून तो बुटका वाचणे शक्यच नव्हते. रुद्राने डोक्यावर हेल्मेट घातले आणि आपल्या स्पोर्ट्स बाईकला स्टार्ट केले. तो रस्त्याला लागला तेव्हा त्याच्या गाडीचा स्पीडोमीटर तीन अंकी आकडा दाखवत होता! पण त्याचे डोके त्या पेक्षाही वेगाने काम करत होते. ते पाच फुटी माकड मेल होत! तरी रुद्राला फासा पर्यंत नेणारे ते रेकॉर्डिंग त्याच्या जवळच होते! त्याचा मोबाईल राघवच्या हाती लागला तर? तर फारसे बिघडणार नव्हते. कारण त्यातल्या क्लिप मध्ये रुद्राचा चेहरा दिसत नव्हता. आणि संपूर्ण रेकॉर्डिंग मोबाईवर असण्याची शक्यता खूप कमी होती. अन असली तरी राघवला रुद्रा पर्यंत पोहचण्यास काही काळ नक्कीच लागणार होता! तो बुटका ढाब्यात आला तेव्हा मोबाईलवर बोलताना रुद्राने पहिले होते. अश्या जबरदस्त अपघातातून मोबाईल सही सलामत सापडणे, म्हणजे चमत्कारच म्हणावा लागला असता. राघव अपघाताच्या स्पॉटवर होता. काही प्रमाणात तो अपघाताला कारणीभूत पण होता. बॉडी ऍम्ब्युलन्स मध्ये जायी पर्यंत राघव गुंतणार होता! शिवाय लगेच तो बुटक्याच्या घरा पर्यंत पोहंचणार नव्हता! तेव्हा हीच वेळ होती, त्या बुटक्याच्या घराची तपासणी करण्याची!
रुद्राची बाईक भोसेकर चाळीकडे वळली!
०००

(क्रमशः )