Rudra - 12 books and stories free download online pdf in Marathi

रुद्रा ! - १२

रुद्राने आपल्या फ्लॅटवरून एक नजर फिरवली. सर्व आवश्यक वस्तू त्याने पॅक करून एका छोट्याश्या बॅग मध्ये भरून घेतल्या होत्या. रात्रभर खपून त्याने त्या बुटक्याच्या उशीच्या अभ्र्यात लपवलेला स्पाय कॅमेरा आणि रेकॉर्डिंग डिवाइस हस्तगत केले होते. त्याची कॉपी नसेल तर खुनाचा कसलाच पुरावा कोणालाच मिळणार नव्हता! तरी त्याचे आणि बुटक्या टकल्याचे कनेक्शन राघवच्या हाती लागण्याची एक अंधुक शक्यता होतीच! बुटक्याच्या बॉडी बरोबर जर त्याचा मोबाईल हाती लागला तर, राघव कॉल हिस्ट्रीवरून रुद्रापर्यंत पोहचू शकत होता! रुद्राला काल स्पाय कॅमेऱ्या सोबत दोन लाखाची रोकड हि मिळाली होती! मुंबईत थांबणे धोकादायक होते. सारासार विचार करून रुद्राने रत्नागिरीचे तिकीट तत्काल मध्ये बुक केले होते.
ट्रेनला अजून बराच बराच अवकाश होता. म्हणून त्याने टीव्ही ऑन केला. स्क्रीनवर संतुकराव त्यांचे 'इच्छापत्राचे' जाहीर वाचन करत होते!
ती टीव्हीची ब्रेकिंग न्यूज पाहून रुद्रा चक्रावला. त्याने आपल्या सिगारेटच्या पाकिटातून नवीन किंग साईझ सिगारेट ओठाच्या डाव्या कोपऱ्यात अलगत धरून लाईटरने पेटवली. दोन दमदार कश मारल्यावर त्याचा मेंदू काहीसा तरतरीत झाला. काय माणसू साला! खुन्याला जायदाद बक्षिसे देणारा! संतुकराव सहदेव हॅट्स ऑफ टू युअर टॅलेन्ट! एक हाताने द्यायचे अन दुसऱ्या हाताने काढून घ्यायचे! वा! मानला म्हाताऱ्याला. खून केल्याचे सिद्ध करून घ्यायचे, पण शिक्षा न होवू देण्याची काळजी घ्यायची! तरच पंधराशे कोटीची लक्ष्मी पायघड्या घालणार! रुद्राला ती लक्ष्मी वाकुल्या दाखवतेय असे वाटले. साला कसलं सॉलिड चॅलेंज आहे!
रुद्राने घड्याळात पहिले. स्वतःशीच मान डोलावली. मोबाईल काढला आणि कॅब बोलावली. दहाव्या मिनिटाला कॅब दाराशी उभी राहिली. तो कॅबच्या मागच्या सीटवर बसला.
" डॉ. रेड्डीच्या क्लीनिकला घे!" राघवने ड्रॉयव्हरला सूचना केली.
डॉ. रेड्डीला भेटून आल्यानन्तर रुद्राचा खिसा बऱ्यापैकी 'हलका ' झाला होता. पण ते गरजेचेच होते!
०००
दार उघडून आत आलेला तरुण भारदस्त होता. वय साधारण तिशीच्या आतबाहेर. म्हणजे आपल्याच वयाचा, राघव त्याचे निरीक्षण करत होता. उंची,सव्वा सहा फुट तर नक्कीच होती. भक्कम कमावलेले शरीर त्याच्या कपड्यातूनही जाणवत होते. ब्रँडेड निळ्या रंगाची जीन, वर पांढरा लेनिनचा फुल शर्ट, शूज आणि बेल्ट काळ्या लेदरचे, चकचकीत पॉलिश्ड! डौलदार चाल,चालण्यात काठोकाठ भरलेला आत्मविश्वास! त्याचे प्रतिबिंब करारी चेहऱ्यावरहि उमटलेले होते! हि मॅन असच असतो नाही का? हा सिनेमा क्षेत्रात असता तर, आजच्या सगळ्या 'खानावळी' बंद पडल्या असत्या! उगाच राघवच्या मनात येऊन गेले. त्याने एक छोटीशी ट्रॅव्हल बॅग डाव्या हातात अगदी सहज धरली होती. म्हणजे लेफ्टी असावा. त्याचे ओठ काळपट वाटत होते. चेन स्मोकर!
"मिस्टर राघव?" त्याने उंची डोओ लावला होता. त्याचा आवाज देहाला शोभेलसा म्हणजे जड आणि खर्जातला होता.
" एस!" प्रश्नार्थक मुद्रेने राघव म्हणाला.
"मी रुद्रप्रताप रानडे!" आपला दणकट पंजा पुढे करत तो म्हणाला. राघवने हात मिळवला. राघवला त्याच्या मसल पावरची कल्पना आली.
"प्लिज, बसा आणि बोला काय काम होत !"
" मी सरेंडर करायला आलो आहे. माझ्या हातून प्रसिद्ध व्यावसायिक आणि उद्योजक संतुकराव सहदेव यांचा खून झाला आहे!"
राघव त्या देखण्या तरुणाकडे वेड्या सारखा पहातच राहिला!
०००

" काय? तू -तू तो खून केलास?" राघव अविश्वासाने समोर बसलेल्या रुद्राकडे पहात म्हणाला.
"हो! माझ्याच हातून तो खून झालाय!"
"कसा?"
त्या नन्तर रुद्रा तासभर बोलत होता. त्या रात्री कसे घरामागच्या झाडाच्या आधारे कंपाउंड वॉल पार केली, कसे घरात घुसलो, कसे डाव्याहाताच्या चिमटीत नाक आणि तोंडावर पंकजा आवळून संतुकरावचा जीव घेतला, आणि मग कसे पसार झालो. सगळे अगदी बारीक सारीक तपशीलासह त्याने राघवला सांगितले.
"रुद्रा तू सांगितलेली स्टोरी खूप आवडली. त्याची आम्हीआमच्या पद्धतीने पडताळणी करूच! पण त्या पूर्वी मला काही गोष्टींचा खुलासा हवाय! आणि तू खरं बोलतोय याचा पुरावाही! "
"पुरावा? आता मात्र कमाल करताय ऑफिसर! प्रत्यक्ष खुनी तुमच्या समोर बसून 'माझ्या हातून खून झालाय!' हे सांगतोय, आणि तुम्हाला वेगळा पुरावा हवाय? तसेही आवश्यक तो 'पुरावा' शोधणं पोलिसांचे काम असते, असा माझा समज आहे."
"तू खून करून पळून जाण्या ऐवजी पोलिसात का आलास?"
"मला झाल्या गोष्टीचा पश्चाताप होतोय! माझ्या हातून खून झाल्या पासून मला रात्रभर झोप नाही! म्हणून मी आत्मसमर्पण करतोय!" या स्पष्टीकरणावर राघवचा अजिबात विश्वास बसत नव्हता. गिल्टी वाटणाऱ्या माणसाचे एक हि लक्षण रुद्राच्या देहबोलीत नव्हते!
"खून कसा केलास हे तू सांगितलंस. आता का केलास हे हि सांग!"
"आता तुम्हाला स्पष्टच सांगतो. मी खूप आर्थिक अडचणीत होतो. मी-मी खुनाची सुपारी घेतली होती! मला माहित नव्हते कि मी ज्याचा खून करतोय तो एक श्रीमंत माणूस आहे. मला एक 'अर्धमेला म्हातारा नौकर मार्गातून बाजूला करायचं' असेच सांगितले होते!"
"किती रुपयाची 'सुपारी' होती?"
"फक्त तीन लाखाची!"
"मिळाले?"
"नाही! फक्त दोनच मिळाले! बाकी वसूल करणार होतो, पण आता ते शक्य नाही!"
"का?"
" सुपारी देणारा एका अपघातात मेलाय! कसे वसूल करणार?"
"कोण होता तो?'
" नाव गाव नाही माहित! "
'मनोहर!' राघवच्या मनात नाव चमकून गेले!
"त्याचे वर्णन करू शकशील?"
रुद्राने मनोहरचे अचूक वर्णन केले. आता बरोबर जमतंय. मिसिंग लिंक म्हणजे हा रुद्राच होता! राघवने मनातल्या मनात ताडले.
"रुद्रा, मला माहित आहे तू काही 'पश्चाताप' झालाय म्हणून सरेंडर होत नाहीस! तुला संतुकरावांच्या 'इच्छापत्रा' तली संपत्ती हवी आहे!"
" तुम्ही काहीही अनुमान काढू शकता! तुम्हाला असे वाटते का मी 'खुनाचा आरोप' सिद्ध करून घेऊन शिक्षा न होऊ देता 'बा इज्जत बरी ' होऊ शकेन? तो दूधखुळेपणा होईल! नाही का? आणि त्या साठी मी खुनासारख्या गम्भीर गुन्ह्याची कबुली देईन?"
रुद्राला फारसे विचारण्या सारखे सध्यातरी राघवकडे काही नव्हते. तेव्हड्यात राघवचा मोबाईल वाजला.
राकेश होता.
"सर, संतुकरावांच्या इच्छापत्राची व्हीडिओ जेनुइन आहे. आवाज त्यांचाच आहे!"
" ठीक!"राघवने फोन कट केला.
रुद्राचा बोटांचे ठसे घेऊन तातडीने लॅबमध्ये पाठवले. इतर सोपस्कार आटोपल्यावर. त्याची जबानी लिहून घेतली. त्यात 'माझ्या हाताने संतुकरावांचा जीव घेतला 'असे स्पष्ट लिहून त्यावर रुद्राची सही घेतली.
"ऑफिसर, एक रिक्वेस्ट आहे! लवकरच तुम्ही मला कायदेशीर अटक करणार आहेत. मी स्मोकर आहे. अटकेपूर्वी एक सिगारेट ओढण्याची परवानगी ---"
राघवने रुद्रास मूक संमती दिली. डोळ्याच्या कोपऱ्यातून जाधव काकांना 'लक्ष ठेवा'ची खूण केली आणि फोन उचला. वरिष्ठांना रुद्राच्या सरेंडरची माहिती दिली. पुढील लाईन ऑफ अक्शनसाठी तोंडी परवानगी घेतली. फोन संपला तेव्हा रुद्रा राघव समोर बसलेला होता.
राघवचा मोबाईल वाजला.
"सर, अभिनंदन आता पाठवलेले फिंगर प्रिंट्स संतुकरावांच्या बॉडीवरील प्रिन्टशी तंतोतंत जुळताहेत! कोठे सापडले?"
"तो माणूस सध्या माझ्या समोर बसलाय!" राघव सावकाश म्हणाला आणि त्याने फोन कट केला.
" रुद्रप्रताप रानडे! यु आर अंडर अरेस्ट!"
"माय प्लेजर! त्यासाठीच आलोय!" रुद्रा कडवट स्माईल देत म्हणाला.
मूर्ख माणूस! राघव मनात म्हणाला.
रुद्राने खिशातून एक छोटेसे पाकीट काढून राघवला दिले.
"हे काय आहे?"
" हि, या रुद्रप्रताप रानडेंकडून इन्स्पे. राघवला भेट आहे!"
राघवन ते पाकीट उघडले. त्यात एक आठ गिबिचे कार्ड होते. त्याने ते समोरच्या लॅपटॉपमध्ये इन्सर्ट केले. आणि डोळे फाडून स्क्रीनकडे पहात राहिला. त्यात रुद्रा संतुकरावांच्या खुर्चीमागे उभाराहून त्यांचे तोंड दाबत होता आणि ते हातपाय झाडात होते, मरे पर्यंत!
या रुद्राला फासावर जाण्याची इतकी कसली घाई झाली आहे?
०००
देशभरातीत सगळ्या न्यूज चॅनल्सवर एकच ब्रेकिंग न्यूज होती.'संतुकराव सहदेव यांच्या खुन्यास अटक!'

(क्रमशः )

इतर रसदार पर्याय

शेयर करा

NEW REALESED