Rudra - 15 books and stories free download online pdf in Marathi

रुद्रा ! - १५

संपूर्ण पुरावे आणि प्रत्यक्ष खून करतानाच व्हिडीओ असून सुद्धा रुद्रा फाशीवर जाईल याची खात्री दीक्षितांना वाटेना! विशेषतः डॉ. रेड्डीच्या साक्षीने त्यांना काळजीत टाकले होते. तरी ते आज शेवटचा प्रयत्न करणार होते.
कोर्ट स्थानापन्न झाल्यावर दीक्षितांनी रुद्राची फेर तपासणी करण्याची परवानगी कोर्टास मागितली. 'आता अजून कसली तपासणी?'अशा आशयाच्या आठ्यापाडत नाराजीनेच कोर्टानी परवानगी दिली.
"आरोपी रुद्रा, आपण काय प्रताप केलात हे जग जाहीर झालाय! माझा फक्त एका प्रश्नाचे उत्तर द्या. रात्री आकाराच्या ऑड वेळेला, तुम्ही त्या बंगल्याच्या मागील आडबाजूच्या आऊट हाऊस मध्ये कशाला गेला होतात?"
रुद्राच्या कपाळावर आठ्या पसरल्या. हा प्रश्न त्याला अनपेक्षित होता. खून करतानाच व्हिडीओ हाती असताना 'तेथे का गेलात?' हा प्रश्न डोक्यात येणे या साठी जबर लॉजिकचा मेंदू असावा लागतो. तो दीक्षितांकडे असल्याचे रुद्राने मनातल्या मनात मान्य केले.
कोर्टात पिनड्रॉप सायलेन्स होता.
"मी संतुकरावांच्या आऊट हाऊस मध्ये का गेलो याचे अत्यंत साधे उत्तर आहे. मी रोज डिनर नन्तर बाईकवर एक रपेट मारत असतो. कोठेतरी बाईक पार्ककरून चालत शतपावली करतो. माझा रोजचा मार्ग वेगळा असतो. त्या दिवशी मी असाच शतपावली साठी निघालो होतो. हमरस्त्यापासून एक लहानशी सडक जात होती. मी एका झाडाजवळ माझी बाईक पार्क केली. आणि त्या सडकेवर चालू लागलो. सडकेच्या दोन्ही बाजूना दाट झाडी होती. सडकेवर म्हणावा तसा अंधार नव्हता पण भक्क उजेडही नव्हता. मी व्हाट्स अप स्टेट्स पाहण्यात गुंतलो होतो, तेव्हड्यात कोठुनसा एक इसम आला आणि त्याने माझे हिप पॉकेट मधले पैशाचे पाकीट खसकन ओढून पळ काढला. मी त्याचा पाठलाग करत असताना त्याने माझे पाकीट एका बंगल्याच्या कम्पाऊंडवालच्या पलीकडे भिरकावून दिले आणि तो अंधारात नाहीसा झाला. मला पाकीट हस्तगत करणे गरजेचं होत. त्यात माझे महत्वाचा कागदपत्रे,क्रेडिट कार्ड्स,ड्राइव्हिंग लायसेन्स, घराची कि व इतर गोष्टी होत्या. मी बंगल्याच्या मुख्य गेटवर आलो आणि तेथील उंच्यापुऱ्या वॉचमनला पॉकेट कम्पाऊंड मध्ये पडल्याचे सांगू पहात होता. पण त्याने काहीही न ऐकून घेता मला हाकलून दिले. मी नाईलाजाने पुन्हा त्या बंगल्याच्या मागील बाजूस आलो. जवळच्या झाडाच्या आधाराने आत उडी घेतली. आता एका आऊट हाऊस मधल्या उघड्या खिडकीतून मंद प्रकाश येत होता. त्या प्रकाशात काही तरी चमकत होते. ते माझे पाकीट असावे असे मला वाटले. मी खिडकी पर्यंत पोहंचलो. ती चमकणारी वस्तू एक कागद निघाली. पण मला माझे पाकीट त्या आऊट हाऊस मधल्या खुर्चीच्या पायाशी पडलेले दिसले! खिडकीस गज,किंवा जाळी नव्हती. मी सरळ आत गेलो. पाकिटाला हात घालणार तोच त्या औटहाऊसचे दार वाजले. कोणीतरी पांढऱ्या केसाचा म्हातारा आत आला. मी घाबरून शेजारच्या अंधाराऱ्या खोलीत सरकलो. वेळ जात होता. तो म्हातारा खुर्चीवर बसून लॅपटॉपवर काहीतरी पहात होता आणि माझे पाकीट त्याच्या खुर्चीच्या पायापाशी पडलेले होते. तो लवकर उठेल अशी चिन्हे दिसेनात, शेवटी मी मनाचा हिय्या करून त्याच्या खुर्चीकडे सरकलो. माझे दुर्दैव आड आले. त्याला माझी चाहूल लागली. मी पटकन माझे पाकीट खिशात सारले आणि ओरडण्याचा बेतात असलेल्या म्हाताऱ्याच्या तोंडावर माझा पंजा दाबला! पुढचे मला माहित नाही. पण आता ते सर्वानाच व्हिडिओत दिसतंय. "
"आरोपी रुद्रा, मला तुमची हि 'कहाणी' फारशी विश्वासाहार्य वाटत नाही! तुम्ही संतुकरावांचा खून त्या 'इच्छापत्रातील' पैशा साठी केलात! आणि त्या साठीच खुनाचे पुरावेही तुम्हीच तयार केलेत! आणि 'पश्चातापाचे' नाटक करत पोलिसांना सरेंडर झालात! तुम्हाला या कोर्टाकडून 'खुनी' असल्याचे प्रमाणपत्र हवे आहे! बोला हे खरे आहे कि नाही?" अडोव्हकेट दीक्षितांनी आवाज चढवून रुद्राला विचारले.
काही क्षण रुद्रा शांत राहिला.
"वकील साहेब, हा खून होईपर्यंत मलाच काय कोणालाही त्या 'इच्छापत्राची' माहिती नव्हती! मग मी कसा पैशा साठी खून करणार? आणि तो व्हिडीओ कोणी, का केलाय मला माहित नाही! आणि तुम्ही तो कोठून पैदा केला ते तुम्हालाच ठाऊक! पैशा साठी मी खून कसा करू शकतो हे तुम्हीच कोर्टास सांगा!"
दीक्षित थोडेसे खजील झाले.
"न्यायमूर्ती महोदय, आरोपी रुद्रप्रसाद रानडे, यांनी कोर्टाचा अमूल्य वेळ वाया घालवला आहे. अनेक मनघडन गोष्टी सांगून, कोर्टाची वेळोवेळी दिशाभूल करण्याचे निंद्य कृत्य केले आहे. मृत संतुकरावांच्या देहावर याच्या बोटांचे ठसे आहेत. त्या व्हिडिओत, तो प्रत्यक्ष खुन करतानाचे चित्रीकरण आहे. सर्व साक्षी आणि पुरावे फक्त एकाच सत्याकडे निर्देश करताहेत, आणि ते म्हणजे आरोपी रुद्रप्रसाद रानडे यांनी हा खून अतिशय शांत मनाने, थंड डोक्याने, जाणीवपूर्वक खून केला आही. एका आदरणीय वयोवृद्धांचा समाधानाने जगण्याचा अधिकार मारून टाकलाय! अश्या क्रूरकर्म्या, समाजघातकास कठोर शासन झालेच पाहिजे! याला 'मरे पर्यंत फाशी'ची शिक्षा देण्यात यावी अशी मी माननीय कोर्टास विनंती करतो. जेणे करून गुन्हेगारांना जरब बसेल आणि समाजाची सुरक्षितता अश्वासित होईल. लोक निर्भयपणे जगू शकतील. कायद्याचा सर्वत्र आदर राहील." दीक्षितांनी आपले छोटेसे भाषण प्रभावीपणे करून, आपल्या जागी बसले. आता त्यांचे काम संपले होते. रुद्राचे म्हणणे एकूण कोर्ट निकाल देणार होते.
"आरोपी रुद्रप्रसाद रानडे, सर्व साक्षी पुरावे आटोपले आहेत. आपणास या उप्पर काही सांगावयाचे आहे का ?"
"होय महोदय, मला माझी बाजू मांडण्याची संधी द्यावी!" रुद्रा नम्रपणे म्हणाला.
"आरोपी रुद्रप्रसाद रानडे यांची बाजू ऐकून घेण्यासाठी उद्याची तारीख देण्यात येत आहे. आणि तोवर कोर्टाचे कामकाज स्थगित होत आहे."
कोर्टाने आदेश दिले आणि उठून आपल्या चेम्बर मध्ये निघून गेले.
०००

आज साडेदहा पासूनच कोर्ट प्रेक्षकांनी भरले होते. कारण आज रुद्राचा बचावासाठी युक्तिवाद होणार होता. खुनाचा भक्कम पुरावा विरोधात असून हि, 'मी खून केलाच नाही!' या विधानावर रुद्रा ठाम होता! डॉ. रेड्डीच्या उलटतपासणी नंतर अडोव्हकेट दीक्षितही गांगरल्याचे जाणकारांच्या नजरेतून सुटले नव्हते. एकीकडे करोडोची संपत्ती आणि एकीकडे फाशीचा दोर! मोठी विचित्र केस होती आणि ती शेवटच्या टप्प्यावर होती. दैनिकाचे रिपोर्टर्स, चॅनलचे प्रतिनिधी यांचा प्रेक्षकात भरणा अधिक होता.
बरोब्बर अकराला कोर्टाचे कामकाज सुरु झाले.
"आरोपी रुद्रप्रसाद, आपल्या बचावाच्या युक्तिवादास सुरवात करावी." कोर्टाने रुद्रास आदेश दिले.
कोर्टाच्या निर्देशानंतर रुद्रा सावकाश उठला. त्याच्या चेहऱ्यावर प्रचंड आत्मविश्वास दीक्षितांना जाणवत होता. रुद्राने न्यायासनास आणि प्रेक्षकांना नम्र अभिवादन केले.
"न्यायमूर्ती महोदय,मी एक सामान्य माणूस आहे. मी सुजाण नागरिकांप्रमाणे कायद्याचे पालन करतो. मला कायद्याचा आदर वाटतो आणि न्यायदान प्रणालीवर माझा पूर्ण विश्वास आहे. हा माझा विश्वास सार्थ होईल याची मला खात्री आहे. याच विश्वासावर मी निर्भयपणे माझी बाजू मांडणार आहे. मला माझे म्हणणे मांडण्याची संधी दिल्याबद्दल मी न्यायासनाचा आभारी राहीन.
मी न्यायालयाचा फारसा वेळ घेणार नाही. तो व्हिडीओ माझ्या विरोधातला सर्वात भक्कम पुरावा आहे. त्यात मी प्रत्यक्ष खून करताना सर्वांना दिसतोय! मी हि ते या पूर्वीच मान्य केले आहे! पण ते केवळ अर्ध्य सत्य आहे!
डॉ. रेड्डीच्या साक्षीकडे मी आपले लक्ष्य वेधू इच्छितो. मी एलिन हॅन्ड या मानसिक व्याधीचा शिकार आहे. हि व्याधी खूप जुनी आणि बळावलेली आहे, हे माझ्या साक्षीदारांच्या साक्षीतून सिद्ध झालाय. लहानपणी पाचसहा वर्षाचा असताना सायकलवरून पडून डोक्याला जखम झाली होती. नंतर मग कधीतरी बारीक सारीक वस्तू उचलण्याची सवय लागली आणि वया बरोबर वाढतच गेली. माझा डावा हात काय करतोय मला कळेना. माझ्या डाव्या हाताला त्याचा स्वतंत्र मन आहे, तो त्याला हवे ते, मला न कळूदेता करत असतो! तो माझ्या मुळीच ऐकण्यात नाही, याची मला दिवसेंदिवस खात्री पटत गेली. डॉ. रेड्डी म्हणतात कि हा डावा हात माझ्याच शरीराचा अवयव आहे. पण ते तसे नाही! त्यांचे प्रयत्न चालू आहेत. मीही त्यांच्या सूचनांचे पालन करतोय. काही प्रमाणात त्यांच्या प्रयत्नांना यश येतंय. पूर्वी परिणाम समोर येईपर्यंत हाताने काय केलंय हे कळायचे नाही. पण आताशा समजू लागलंय.
त्या दिवशी पण, माझा हात त्या म्हाताऱ्याच्या तोंडावर आहे, तो म्हातारा जिवाच्या आकांताने तडफडतोय, हे मला काळात होते! मी नको म्हणत असतानाही तो 'हात' तोंडावरचा दाब वाढवतच गेला! माझ्या मनात त्या म्हाताऱ्याचा जीव जावा हा उद्देश कधीच नव्हता! एका अनोळखी वृद्धास काहीही कारण नसताना मी का मारेन?
महोदय,हे पूर्ण सत्य मी या आदरणीय न्यायासना समोर मांडलय. तो खून माझ्याच 'हाताने' केला असला तरी तो मी केलेला नाही! डॉ. रेड्डी सारख्या आंतरराष्टीय तज्ञाची साक्ष माझ्या विधानास पूरक आहे! मीही अडोव्हकेट दीक्षितांप्रमाणेच म्हणेन कि 'गुन्हेगारास कठोर शासन झाले पाहिजे!'. माझ्या हाताने, जो माझ्या मेंदूच्या,मनाच्या नियंत्रणाबाहेर आहे, केलेल्या गुन्ह्याची शिक्षा मला कशी देता येईल? 'शंभर गुन्हेगार सुटले तरी चालतील पण एकाही निर्दोषाला शिक्षा होता कामा नये' या न्यायप्रणालीच्या ब्रीदावर माझी श्रद्धा आहे.
माझी न्यायदेवतेच्या निवाड्यावर श्रद्धा आहे. मला केवळ आणि केवळ 'न्याय'च मिळेल या बद्दल तिळमात्रही शंका नाही! आणि मी त्याची प्रतीक्षा करीन. धन्यवाद!" जेव्हा रुद्रा आपले बचावाचे भाषण संपवून जागेवर बसला तेव्हा संपूर्ण कोर्टात स्मशान शांतता पसरली होती!
"या केसचा निकाल पुढील तारखेस जाहीर होईल. तोवर कोर्ट ऍडजर्न होतय!" या आवाजाने लोक भानावर आले.
०००
सहा महिन्यांनी रुद्रा डॉ. भोसलेंच्या हॉस्पिटल समोर उभा होता. या विश्वविख्यात डॉक्टरांची आज त्याच्याकडे अपॉइंटमेंट होती. मायोइलेक्ट्रिक कृत्रिम हस्तरोपणात त्यांची ख्याती होती. या तंत्रदानाने केलेल्या हाताचे कार्य संचलन मेंदूद्वारे होणार होते! ऍडव्हान्स रोबोटिक्स या विज्ञान शाखेचा तो चमत्कार होता. हा उपचार, त्या साठी लागणार इलेक्रॉनिकस उपकरणांनी युक्त कृत्रिम हात, सारेच प्रचंड खर्चिक होते. पण 'सहदेव ग्रुप्स'च्या मालकांसाठी त्याची काळजी करण्याचे कारण नव्हते! रुद्रा आता 'सहदेव ग्रुप'चा कायदेशीर मालक होता!
त्या राजप्रासादतुल्य हॉस्पिटलच्या भव्य प्रवेशद्वारात पाऊल टाकण्या पूर्वी रुद्राने आपल्या डाव्या हातावर नजर टाकली. त्या जयपूर लाकडी हाताला उजव्या हाताने चापचून पहिले.
"सर्व साक्षी आणि दाखल केलेले पुरावे पहाता हे कोर्ट मयत सुखदेव यांचा खून आरोपी रुद्रप्रताप रानडेंच्या हातून झाल्याचे ग्राह्य धरते! आरोपी रुद्रप्रसाद रानडे हि व्यक्ती आणि त्यांचा 'डावा हात 'यांना भिन्न अस्तित्व असू शकते हा तज्ज्ञांचा निकष, गुन्हेगारास कठोर शासन या तत्वांचा विचार करता, हे न्यायासन आरोपी रुद्रप्रसाद रानडे याना निर्दोषत्व बहाल करते!, पण त्यांच्या डाव्या हातास मात्र 'सदोष मानव हत्या' केल्या बद्दल दोषी ठरवते आहे! या गुन्ह्याबद्दल त्या डाव्या हाताला 'देह दंडा'ची शिक्षा फर्मावते आहे! सदरील गुन्हेगार 'हात' कोपरा पासून अलग केला जावा! हे या कोर्टाचे आदेश आहेत!"
हा कोर्टाने दिलेला आदेश रुद्राच्या कानात घुमत होता.
तेव्हड्यात कोणी तरी त्याच्या खांद्याला स्पर्श केल्याचे त्याला जाणवले. त्याने मागे वळून पहिले, तो इन्स्पे. राघव होता!
"रुद्रा, तू कोर्टाची हि लढाई जरी जिंकली असलीस तरी हा राघव तुला सोडणार नाही. सत्य कधीच लपून रहात नाही. आणि मी ते सत्य हुडकून काढीनच. "
"इन्स्पे. राघव मला या आयुष्याने एक गोष्ट शिकवली आहे. ती मी आज तुमच्याशी शेयर करतो. 'सत्य' आणि 'कायदा किंवा न्याय' हे एका बाजूने असावे हे अपेक्षित असते. पण वास्तवात तसे नेहमीच घडत नसते! आज 'न्याय' माझ्या बाजूने आहे! तुम्ही 'सत्य' हुडकत बसा. सापडले आणि मला त्यात गुंतवता आले तर, माझी लढण्याची तयारी आहे!"
"या क्षणापासून सावध रहा! मी तुझ्या पाठीशी आहे लक्षात ठेव!"राघव रुद्राला बजावून गेला.
रुद्रा स्वतःशीच हसला. राघवच्या साहेबाना आज सकाळीच त्याने एक महागडे गिफ्ट दिले होते आणि ते त्यांनी खिशात टाकले होते. खऱ्या अर्थाने ते स्वतः त्या क्षणा पासून रुद्राच्या 'खिश्यात' विराजमान झाले होते!
रुद्राने हॉस्पिटल मध्ये प्रवेश केला. नवीन हात त्यांनीच वाट पहात होता!
(समाप्त )

---------------------------------------------------------------------------------------------------------------------------नमस्कार मित्रानो, आज 'रुद्रा!' ला निरोप देतो आहोत. माझ्या या पहिल्याच दीर्घ लेखनाचे आपण प्रेमाने स्वागत केल्या बद्दल आभारी आहे. असेच 'वाचानाशिर्वाद' मिळत राहो, हीच विनंती. पुन्हा भेटूच. एखादी नवीन कथा घेवून. फिरून एकदा धन्यवाद!
सु.र. कुलकर्णी .

इतर रसदार पर्याय

शेयर करा

NEW REALESED