प्रीतीची 'प्रेम'कथा - 1 Nitin More द्वारा फिक्शन कथा मराठी में पीडीएफ

Featured Books
श्रेणी
शेयर करा

प्रीतीची 'प्रेम'कथा - 1

सांगते ऐका!

अर्थात

मी : एक तपस्विनी!

'गुड मा‌ॅर्निंग!

स्वप्ने पहायला शिका. स्वप्नांसाठी झोप आवश्यक.. तेव्हा परत झोपी जा.. नवीन स्वप्ने पहा.. सुप्रभात!'

या मोबायल्याची कमाल पहा. त्याने जगच नाही तर दिवसाचे प्रहरदेखील आणलेत जवळ. सकाळसकाळी मी उठली..

रीतसर आळस झटकून. आळोखेपिळोखे दिली मी. समोरच्या मोबाईलात टुणss आवाज आला. हा माझा खास अलार्म म्हणावा.. त्यात आलेला तो गुड मॉर्निंगवाला मेसज!नुसता गुड मॉर्निंग नाही तर ज्ञान वाटप ही त्यात.

परत झोपी जा म्हणे! मला काय, मी झोपते! झटकलेला आळस मी परत गोळा केला. गेलेली झोप परत डोळ्यांत जमा केली. पापण्या घट्ट मिटून ती परत उडून जाऊ नये म्हणून पडून राहिली.. स्वप्ने पहायची आता माझ्यावर जबाबदारी होती. त्यासाठी झोपणे जरूरी होते.

शुभ प्रभातीचा तो संदेश.. संदेश नव्हे तर आदेश होता. प्रेमआदेश! त्या संदेशाने तर रात्रीच्या प्रहरास सकाळी ढकललेले. माझा प्रेम आहेच तसा विनोदी! सुप्रभाती निद्राधीन होण्याचा संदेश! आणि तो मी टाळणार तरी कशी? झोपली झाले. स्वप्न पाहायची तर झोपायला तर हवे.

मीच नाही.. या प्रीतीचे प्रेम.. आणि या प्रीतीचा प्रेम देखील .. हेच तर सांगतोय! म्हणजे मी त्याच्याच बद्दल सांगतेय हे. सांगू म्हटले की काय काय सांगू कळत नाही. प्रीतीचा प्रेम! किती छान वाटते ऐकायला! प्रीतीचे प्रेम आणि प्रीतीचे प्रेम.. दोघेही एकच!

झोपली मी.

स्वप्न पडते कसले? तर तेच! प्रेम आणि प्रीती. स्वप्नात खुद्द बिस्मिल्लाखान सनई वादन करताहेत नि मी सलज्ज का काय म्हणतात त्या वदनाने माळ घालतेय. मध्ये आंतरपाट तसाच! आणि माझ्या प्रेमचा चेहरा पण दिसला नाही नीट. स्वप्नाची फ्रेम बिघडली वाटते. तरी पडले स्वप्न ते चांगलेच झाले. स्वप्नात तर प्रीती प्रेमची झाली. उगाच शंका काढू नका. नीट नाही दिसला चेहरा म्हणून काय झाले.. आतंरपाट तसाच होता.. म्हणून काय झाले.. तो प्रेमच होता. दुसरा कुणी कसा असेल? इतक्या तपस्येनंतर? आणि मी बरी प्रेमला असेच सोडून देईन?

तपस्या म्हटली ना मी तर कुणी तपस्विनी नाहीतर योगिनी झाली असे वाटले मला. तप आणि तपस्या! काय काय नाही केली मी त्या प्रेमसाठी. पार्वतीने म्हणे शंकराला प्रसन्न केले तप करून. मी पण केले तेच. म्हणजे मी पार्वती? म्हणजे प्रेम? भोळा शंकर? भोळा? त्याला मी हल्ली हे बोलली तर म्हणाला, "तू ना, पार्वती.. तुला मी लंकेची पार्वती बनवेन!"

मी आधी तर खूश झाली पण त्या लंकेच्या पार्वतीचा अर्थ कळला.. अशी रागावली ना त्या भोळ्या सांबावर. पण त्याला मिळवण्यासाठी मी काय काय नाही केली. आधी रागावली नसती मी. पण आता काय तो माझा झाला म्हणून रागावली. त्याला मी पण मग बोळा शंकर बोलली. मी पार्वती नि तू बोळा शंकर बोलली. अजून असे चिडवले ना तर पुढच्या वेळी बुळा शंकर म्हणेन त्याला. सोडते का मी? मी पण बसली रूसून. आणि रागावली मी की त्याला आईस्क्रीम द्यावेच लागते मला. त्याशिवाय काय थंड होत नाही मी. मला चिडवतो म्हटले की त्याच्या खिशाला तितकी तर चाट बसायलाच हवी की नाही? तरी पण यावेळी मी दोन आईस्क्रीम शिवाय सोडली नाही त्याला. चांगलाच महागात पडला पाहिजे त्याला हा मला चिडवायचा धंदा. स्ट्रॉबेरी आईस्क्रीम! आजवरच्या गोष्टीत ही स्ट्रॉबेरी नि हे स्ट्रॉबेरी आईस्क्रीम नसते तर?

तर गोष्ट ही त्याचीच. म्हणजे प्रेमची नव्हे. तर त्याला मी कशी शोधून काढली त्याची. त्याला मी भेटली आयती. नशीबवान आहे तो. पण त्यासाठी त्याचे नशीब इतके बलवत्तर असावे की मी जंग जंग पछाडून त्याच्या पर्यंत पोहोचावे.. म्हणजे अगदी मी निगुतीने स्वयंपाक करावा नि ह्याने डायरेक्ट येऊन पाटावर गिळायला बसावे? आणि मी त्याला मिळावी? बिना मेहनतीने? पण माझा प्रेम आहेच तसा! तप करून मिळवण्यासारखा!