Pritichi Premkatha - 4 books and stories free download online pdf in Marathi

प्रीतीची 'प्रेम'कथा - 4

तो सापडला?

अर्थात

तुंबाऱ्याची गोष्ट!

सकारात्मक विचारांचा सकारात्मक फायदा लवकरच दिसला मला. म्हणजे त्या अजनबी राजकुमाराचे दर्शन वगैरे नाही, पण घरातच काही हिंट मिळाली मला. म्हणजे झाले असे की इतक्या दिवसात मला समोर असून दिसले कसे नाही कुणास ठाऊक! किंवा स्वामीजी म्हणतात तशी वेळ यावी लागते एखाद्या गोष्टीची! त्या दिवशी संध्याकाळी बसले होते बाहेरील झोपाळ्यावर झोके घेत. हवा सुटलेली जोराची. मनातही अर्थातच, तेच विचारांचे झोके! तात्या बाहेरून आले तेच घाईघाईत. घरात शिरले.. समोरच्या कपाटातून त्यांनी एक पुस्तक काढून बाहेर ठेवले आणि आईला म्हणाले, "अगं जातो मी लगेच. ते पुस्तक राहून गेलेय त्यादिवशी. ते देऊन येतो."

माझ्या डोक्यात लख्खन् प्रकाश पडला. तो.. म्हणजे राजकुमार.. आला तेव्हा त्यानेच आणलेले पुस्तक ते. तात्या म्हणालेले त्याला, "देतो लवकरच."

म्हणजे त्या पुस्तकास त्याचा हात लागलाच असला पाहिजे. काय असेल त्या पुस्तकात? कदाचित त्याचे नाव.. किंवा फोटो? तात्या आत गेले तशी मी त्या पुस्तकावर झडप घातली. आणि इतके दिवस मला कसे काय आठवले नाही याची खंत करत बसले. तात्या आले बाहेर.. म्हणाले, "दे देऊन येतो ते पुस्तक."

मी अगदी माझ्या अभिनयक्षमतेची पराकाष्ठा करीत म्हणाली, "कोणाचे हो तात्या पुस्तक? अगदी घाईत आलात नि द्यायला चाललात?"

माझ्या बोलण्यात नक्कीच निरागसपणा असणार. तात्या क्षणभर थांबले नि म्हणाले, "वाचायचेय तुला? मग उद्या नेतो. मला वाटले वेळ आहेतर काम संपवून टाकतो!"

मला जणू पुस्तके वाचण्याचा छंद असावा अशा थाटात म्हणाली मी, "होय तात्या उद्या देते सकाळी. पण कसलेय ते पुस्तक? कोणी लिहिलेय? आणि कुणाला द्यायचे ते परत?"

"वाच की.. कळेलच! आणि मी देतो उद्या ज्याचे आहे त्यास.."

"म्हणजे?"

राजकुमाराला? शेवटचा शब्द अगदी ओठावर आलेला पण त्याला मुश्किलीने आत ढकलला मी.

"तुला कशास उचापती नसत्या .. उद्या मात्र सकाळी पुस्तक दे .."

तात्यांनी विषय असा संपवून टाकला. मी मात्र माझा शोध थोडीच संपवणार होती? हे पुस्तक तर हाती आलेय पण त्याचा राजकुमाराचा शोध घेण्यात उपयोग किती? कोण जाणे. हां.. त्याचे नाव माहिती होईतो त्याला मी राजकुमार म्हणतेय.. तेव्हा अगली सूचना मिलने तक.. राजकुमार म्हणजे, तोच!

पुस्तक घेऊन मी आत गेली.

जणू प्रेमपत्रच असावे असे वाचायला! माझी पुस्तकांशी अशी दोस्ती असती तर बीएला क्लास नसता मिळाला? नसो. कुठले पुस्तक आहे ते, यावर ते अवलंबून.. नाही का? पहिल्याच पानावर दोन नावे होती.. एक लेखकाचे नाव.. 'प्रेमानंद जगदाळे' आणि वर त्याच्या मालकाचे नाव.. तेही 'प्रेम'! नुसतेच प्रेम. आडनाव वगैरे नाही. त्याखाली तारीख. दोन्ही व्यक्ती एकच असाव्यात की वेगवेगळ्या? शक्यता मात्र दोघांपैकी एक त्या राजकुमाराचे नाव असायची. आत पत्ता होता तो प्रकाशकाचा. लेखकाची ओळख होती, पण फोटो टाकण्याइतपत आपले मराठी प्रकाशक प्रगत झाले नाहीत अजून. पण त्यामुळे माझ्यासारख्यांची किती अडचण होते याचा त्यांना काहीच अंदाज नसावा! पण सकारात्मक विचारांची सकारात्मक आठवण झाली मला. त्यामुळे पुढे प्रेमानंद म्हणजे प्रेम म्हणजेच माझा राजकुमार.. हे असेच असणार ठरवून मी वाचायला बसली. आणि हे असेच असले तर कमीत कमी हे पुस्तक वाचलेले असायला हवे! 'प्रेमानंद जगदाळे.. एक प्रथितयश विद्रोही लेखक' अशी ओळख होती. उपरोध आणि उपहासपूर्ण शैली आणि सामाजिक विषयांवर घणाघात ही त्यांची व्यवच्छेदक लक्षणे असेही म्हटलेले! व्यवच्छेदक! म्हणजे काय? असेल काहीतरी! पण एकूण लक्षण चांगले दिसत होते. मी प्रीती आणि तो प्रेम! वा! काय जोडी बनेल नाही? रब ने बना दी जोडी आणि काय! बना दी म्हणजे बनवेल! प्रीती प्रेम जगदाळे! वा!

हां.. तुम्ही म्हणाल, मी प्रीती कशी? आई तर मनी म्हणते मला. त्याचे कारण एकच, मी मांजरीसारखी साय खायची लहान असताना, तेही चोरून. तेव्हा मनी नाव पडले. ते दुधाच्या भांड्याला साय चिकटावी तसे चिकटलेच मला. पण माझे नाव.. प्रीती! आणि तो.. प्रेम! पण हा प्रेम चोप्रासारखा तर नाही ना निघणार? नाही.. माझ्या मना हो सकारात्मक! प्रीती आणि प्रेम.. स्वप्ने पाहात मी बसली नि पुस्तक वाचायचेच विसरली. रात्री जाग आली तर आई जेवायला उठवत होती. काय स्वप्ने पडली आठवत नाही पण माझे हे असेच. पुस्तक आले डोळ्यापुढे की झोप आवरत नाही मला. नाहीतर बीएला क्लास चुकला असता का अवघ्या बारा टक्क्यांनी? रात्री मांडी घालून पुस्तक उघडून बसलीच. एक प्रेमकथा होती ती. सामाजिक काही पार्श्वभूमी. मुलगा दलित आणि अनाथ. मुलगी चांगल्या खात्यापित्या घरची. त्यात मुलगी कमी शिक्षित. मुलगा मात्र उच्च शिक्षित. नाव होते पुस्तकाचे, 'तुंबाऱ्याची कथा'! प्रेमकथाच ती. त्यात हा मुलगा विनोदी. कथा गंभीर पण हा बिनधास्त मारत सुटलाय विनोद! हाच प्रेमानंदाचा विद्रोह की काय? जहाल शब्द विनोदामागे लपवून आणलेले ते मात्र छान. तरीही व्हायचे तेच झाले. झोप आली आणि झोपी गेलेली जागी झाली तेव्हा पुस्तक घेऊन बाबा निघून गेले होते.

राजकुमार, किंवा कदाचित प्रेमानंद, किंवा नुसताच प्रेम येऊन गेल्याला आता चांगले दोन आठवडे होऊन गेलेत. सकारात्मक विचार म्हटले तरी किती करणार? काहीतरी करायला पाहिजेच. पण करणार तरी काय? सिनेमात कशा अशा वेळी नायिकेच्या मैत्रिणी मदतीला येतात. काही नाहीतर तिला चिडवतात तरी आणि ती लाजून चूर बिर होते. मला मदत करायला कोण येणार होते आता? तरीही चोरून लपून मी आरशासमोर लाजून चूर होतच होती! का कुणी यावे याबद्दल ही करू विचार .. सकारात्मक अगदी? पंधरावीस दिवसांत ते पुस्तक सोडून काहीच हाती नाही लागले .. पण स्वामी म्हणतात, सबुरी! ती ठेवलीच पाहिजे. नाहीतरी दुसरे करण्यासारखे काय होते माझ्याकडे? पण काहीतरी हातपाय हलवायला हवेत..

हलवीनही. पण कुठल्या दिशेने?

उगाच दिशा चुकली तर आग सोमेश्वरी नि बंब रामेश्वरी पोहोचायचा!

इतर रसदार पर्याय

शेयर करा

NEW REALESED