Pritichi Premkatha - 10 books and stories free download online pdf in Marathi

प्रीतीची 'प्रेम'कथा - 10

१०

भिंगारदिवे!

अर्थात

प्रेमानंदाचा अर्धा शोध!

प्रकाशक भिंगारदिवे. साहित्य दिवे प्रकाशन! यांनी कसले लावलेले दिसतात दिवे? आम्ही त्या अंधाऱ्या आॅफिसात पोहोचलो तेव्हा भिंगारदिवे बिझी होते म्हणे. म्हणजे बाहेर फक्त सांगितले आम्ही, "भिंगारदिवे साहेबांना भेटायचेय!"

त्यावर उत्तर, "साहेब बिझी आहेत मिटींगीत. थांबावे लागेल."

"आम्ही ज्वालाग्राही सर्वदाच्या रिपोर्टर.. मी मिस कालिंदी कुरतडकर आणि ही कॅमेरावुमन सुलताना पठाण. साइझवरून वाटत नसेल पठाण पण लग्नानंतर नाव बदलते त्यांच्यात पण.. होय की नाही गं."

"सच कहा आपने मोहतरमा. पर लगता नहीं हमारा नसीब अच्छा है.. लगता नहीं साब हमें इंटरव्ह्यू देंगे."

टीव्ही चॅनेल आणि इंटरव्ह्यू म्हटल्यावर तो बाहेरचा तीन ताड उडाला. मी कॅमेरावरून हात फिरवला तसा टुणकन् आत गेला आणि बाहेर आला तो बत्तीशी दाखवतच! म्हणाला, "साहेब बोलावताहेत!"

मिलिंदाचे निरीक्षण खरेच होते. टीव्हीचे कॅमेरावाले आले म्हटले की वजन पडतेच! कितीही प्रत्यक्षात आपण लाईटवेट असलो तरी.

आत भिंगारदिवे बसलेले. खुर्चीत गच्च भरून राहिल असा देह. तेवढेच भव्य टक्कलही. काकु पुढे होत म्हणाली, "नमस्कार सर. आम्ही ज्वालाग्राही सर्वदा चॅनेलच्या व्हिडीओ जर्नालिस्टस. मी कालिंदी कुरतडतकर आणि ही कॅमेरावुमन सुलताना पठाण. आम्ही तुमची एका पुस्तकासंबंधात मुलाखत घेण्यासाठी आलोय."

मुलाखत, ती ही टीव्हीवरची. हे ऐकून कुठले पुस्तक वगैरे न विचारता भिंगारदिवा उठला. शर्टबिट सरळ केला. डोक्यावर होते तेवढे केस सरळ केल हाताने. माझ्या कॅमेरात त्याचे टक्कल नक्कीच चमकले असते! तो परत येऊन बसला. म्हणाला, "करा सुरू!"

काकु म्हणाली, "तुमचे ते नवे पुस्तक विद्रोही लेखक प्रेमानंद जगदाळे यांचे आहे ना ते.. त्याबद्दल."

"हो! हो! फार उत्तम! जगदाळे उत्तम लिहितो."

"सर, तुमच्या बरोबर लेखकाची पण मुलाखत झाली असती तर.."

"हां.. एक लेखककी अपनी ओळखच क्या है? उसका लिखा प्रकाशमें लाता कौन है? वो प्रकाशकच की नै? म्हणूनच उस्को प्रकाशक म्हणते हैं! ये रेकॉर्ड मत करना हा. पण काय है प्रकाशक कोही हीरेकी ओळख होती है."

एकाएकी भिंगारदिवा आपल्या दिव्य हिंदीचे दिवे का लावायला लागला कुणास ठाऊक! नाही.. माझ्या म्हणजे सुलतानाच्या हातातल्या कॅमेरामुळे असणार. सुलतानाला मराठी कळते कुठे! आणि कॅमेरा सगळ्यात महत्त्वाचा!

"तर बोलवू शकाल तुम्ही त्यांना?"

"नाही.. कसे बोलावणार?"

"कसे म्हणजे?"

"कसे बोलवणार?"

"कसे काय? फोन करा त्यांना! बोलावून घ्या. आम्ही थांबतो तोवर. हो की नाही प्री.. सुलताना?"

"प्रि. सुलताना म्हणजे?"

"अहो, आम्ही तिला प्रिन्सेस सुलताना म्हणतो. राजकन्येसारखी सुंदर आहेना म्हणून.. बुरख्यात अंदाज नाही येणार कुणाला.. "

"कुछभी हां.. कालिंदी. हमें बहुत लाज वाट.. आती है. उतना लेखक भी आ जाते तो जरा इंटरव्ह्यू पुरा हो जाता.."

"अरे.. मै समजता हूं.. पण आए हो तर मेरा भाग तो रेकॉर्ड कर लो.."

"पर जगदाळेजी.."

"अरे वो कैसा आएगा? वो ठैरा बाहेरगावका आदमी. कधी इधर कधी उधर. उसका क्या एक ठिकाणा है क्या. जळगाव गया है वो."

माझा धीर सुटत चालला. हातापायांना घाम सुटला माझ्या. कॅमेरा हातातून सुटतो की काय असे झालेले. काकु म्हणाली तितक्यात, "चालेल सर.. तुम्ही तुमचा इंटरव्ह्यू द्या. फक्त त्या जगदाळेंचा पत्ता द्या. इकडचा नि तिकडचाही. आम्ही तिकडे जाऊन करू रेकॉर्ड! हो की नाही प्री.. सुलताना? जळगाव काय दूर थोडीच आहे?"

"हुं. करेंगे हम. बस पता मिल जाय!"

मग काय! इंटरव्ह्यू झाला. भिंगारदिवा खूश झाला. प्रेमानंद जगदाळे या उदयोन्मुख लेखकाबद्दल चार बरे शब्द बोलताना भिंगारदिव्याचे डोळे चमकले. बरा दिसतोय ॲक्टर. इंटरव्ह्यू दाखवू तेव्हा नक्की कळवतो असले आश्वासन देऊन आम्ही निघालो. भिंगारदिव्याकडून प्रेमचा नंबर नि दोन पत्ते मिळाले. माझ्याकडचा नंबर पाहिला मी पडताळून तर तो दुसराच कुठलातरी होता! त्याने जाणूनबुजून दिला की काय चुकीचा नंबर? बघून घेईन मी ही. नावाची प्रीती आहे म्हटले बच्चमजी.

काही असो.. प्रेमके प्रेमकी ओर पुढचे चिमुकले कदम आणि काय!

तिकडून निघालो आणि घरी आलो कालिंदीच्या. मिलिंदा वाटच पाहात होता. सगळी कहाणी ऐकून म्हणाला, "म्हणजे अर्धा प्रेमानंद सापडला. आनंद आहे! आता ही पाहिल सारे!"

"अरे.. नाही. त्याने मला दिलेला नंबर चुकीचा होता. मुद्दाम दिला असणार तो. पण तो एक असेल तर मी शंभर आहे. सोडते का अशी!"

"म्हणजे आता मिशन प्रेमानंद जगदाळे? ॲट जळगाव?"

"आधी फोन कर नव्या नंबरावर.."

"मी?"

"मग काय मी?"

"नको. तूच आधी बोल. बघ उचलतोय का फोन."

मिलिंदाने लावला फोन. पण तो उचलेल तर शपथ! म्हणजे आता डायरेक्ट अटॅक करणे आले. इकडचा पत्ता कुठेतरी डोंगरीतला. तो विभाग जरा कठीण म्हणून मिलिंद स्वतः येणार.. उद्या! अाज का नाही? मी अधीर होते पण असे गुडघ्याला बांधलेले बाशिंग पाहून परत थट्टा केली असती त्याने. आता वाट पाहाणे आलेच.

घरी आले तर टेबलावर 'ते' पुस्तक समोर पडलेले! तात्या बसलेले. त्या पुस्तकाकडे पाहून न पाहिल्यासारखे केले प्रथम. मग म्हणाली मी, "तात्या हे पुस्तक?"

"हो. जगदाळे आला होता आज."

"आज? जळगावला गेला होता ना?" शेवटचे मी अजाणता बोलून गेली.

"तुला गं काय खबर?"

"मला? मला कसे माहिती असणार? जळगावला तो मनीषाचा नवरा गेला होता.."

"पण तू म्हणाली जगदाळेबद्दल.."

"नाही मी गोंधळली थोडीशी. दुसऱ्या पुस्तकाबद्दल तात्या?"

"छे गं. असंच आलेला. म्हणजे पुस्तकासाठीच असेल."

माझ्याबद्दल विचारत होता का विचारावेसे वाटले मला. पण कसे विचारणार? म्हणून गप्प बसली.

"तो लिहून देणार होता त्याबद्दल काय झाले तात्या?"

विषय निघालेला तो हातचा सोडू नये म्हणून मी म्हणाली.

"ते नाही माहित पण अगं तुला गंमत माहितीय? कुठल्या तरी टीव्ही चॅनेलचे लोक आलेले त्याच्या प्रकाशकाकडे. जगदाळेच्या पुस्तकाबद्दल इंटरव्ह्यू घ्यायला."

"खरंच? मग त्याचा पण घेतला असेल ना?"

"छे गं. त्याला काय ठाऊकच नाही त्याबद्दल. मला त्या प्रकाशकाने सांगितले. म्हणाला जगदाळेचा नंबर दिलाय त्याने पण हा बेटा कुणाला दाद देणाऱ्यातला नाही! म्हणून तो जळगावला गेल्याची थाप मारली.. म्हणून मी विचारले तुला.. तो जळगावला गेल्याची काय बातमीबितमी छापून आली की काय?"

"नाही हो. जळगावला तो मंगलाचा नवरा गेला..

मंगला.. हो.. आम्ही तिला मनीषाच म्हणतो. मंगला किती आऊटडेटेड वाटते ना? तिचाच नवरा.. तुम्ही नाही ओळखत त्याला. मग पुढे त्या पुस्तकाबद्दल काही बोलणे झाले?"

"नाही गं. तो ही एक काॅपी देऊन गेला. माझ्यासाठी. म्हणाला दुसऱ्या पुस्तकाबद्दल मात्र काही नाही."

मला संशय आला. हा ही माझ्यासारखाच तर नाही? मी त्याला शोधतेय नि तो मला? पण शक्य नाही ते. नाहीतर स्वतःहून फोन केला असता. आणि त्याने दिलेला नंबर पण चुकीचा! या प्रेमचे कोडे काही सुटेनासे दिसत होते. पण हा तात्यांकडे का आला परत? आला तर दुसऱ्या पुस्तकाबद्दल आळीमिळी गुपचिळी? परत हा इंटरव्ह्यूपासून दूर पळेल म्हणतात! मग टीव्ही चॅनेलवाले बनून जावे की न जावे?

परत एकदा प्रेमप्रीती प्रेमबंध समितीची मिटिंग भरली. मी सगळ्यांना हे लेटेस्ट अपडेट्स दिले. आमच्या समितीने काढलेले निष्कर्ष असे:

१. प्रेमानंद थोडा चक्रम असला पाहिजे. या निष्कर्षावर मी विरोधी मत नोंदवले. बिचाऱ्या प्रेमला त्याची बाजू न मांडताच चक्रम का ठरवावे?

२. तो सध्या नि नेहमीसाठीही इथेच असतो. जळगाव वगैरे सारे झूठ आहे

३. त्याला प्रत्यक्ष त्या तिथे पाहिल्याशिवाय त्याचा पत्ता खरा आहे हे मानू नये.

४. त्याच्या फोनचे गूढ त्याला भेटूनच सोडवावे लागेल

५. टीव्ही चॅनेलवाले बनून जाण्याचा फायदा असा की त्याने मुलाखत दिली तर त्याची अधिक माहिती काढता येईल. इथे काकुने त्याच्या बायकोबद्दल म्हणजे आधीच लग्न झाले आहे का याबद्दल माहिती काढता येईल हा फायदा सांगितला! दुष्ट आहे ती. मी विरोधी मत नोंदवले.

६. टीव्हीसाठी अरेंजमेंट मागच्या वेळेसारखीच राहिल. म्हणजे माझा बुरखा परत वापरावा लागेल मला. काकु येण्यास कांकू करीत होती. तिचे मत असे की पुढे प्रेमला ती नकली पत्रकार असल्याचे कळेल तेव्हा मुश्किल होईल. मी तिला तिच्या वेळी मी काय काय केले .. हे मिलिंदाला माहिती असूनही फरक न पडल्याचे सांगितले आणि वर 'हो की नाही मिलिंदा' अशी साक्ष ही काढली त्याची!

७. आता यावेळी तरी त्याचा परफेक्ट छडा लावणे. तो कुठे राहतो पासून सगळी कुंडली मांडणे.

अशा साऱ्या निर्णयानंतर आम्ही त्या डोंगरीच्या डोंगरावर गिर्यारोहण करायला निघालो. फरक इतकाच की मिलिंदा पण होता आमच्याबरोबर. तेही एक कामावर सुट्टी टाकून. 'दास डोंगरी राहतो' म्हणत मीही बुरख्यात निघाली. मागच्या वेळेमुळे बुरख्याची सवय झालेली मला. हातातल्या कॅमेराच्या धुडाची पण आणि मुख्य म्हणजे हिंदीची सुद्धा! त्याच्याशी काय बोलावे याचे आडाखे बांधत चाललेली मी. आजूबाजूस माझे ध्यान नव्हते. आता एकच लक्ष्य.. प्रेमानंद!

डोंगरीतल्या घरी पोहोचलो दिलेल्या पत्त्यावर विचारत विचारत. लोक म्हणाले, "नाम नहीं मालूम पर वो रूम उधर है.." तसे आम्ही गेलो उधर! तर भले मोठे टाळे. आजूबाजूला चौकशी केली तर गेल्या आठवड्यापासून घर बंदच होते ते! आणि तिथे आधी कुणी नवरा बायको राहात होते! माझी अवस्था अगदीच केविलवाणी झाली. पत्ता बरोबर असेल तर पंचाईत.. तर तो चुकीचाच असायला हवा! नवरा बायको म्हणे! छे! अशक्य! अाणि कालच तो भेटलाय तात्यांना. म्हणजे जळगाव प्रमाणे हाही पत्ता चुकीचाच. आणि कोण जाणे.. फोन नंबरही चुकीचाच असणार! थोडक्यात पत्ता चुकीचा असल्याचा मला तरी अानंदच झाला!

आम्ही परत आलो. आता पुढे काय? स्वामी म्हणतात तसे.. सकारात्मक विचार! मी बसून तेच करायला लागली. आजवरच्या सकारात्मक गोष्टी लिहून काढल्या.. मग नकारात्मकचा हिशेब मांडला. होऊन जाऊ दे जमाखर्च आणि काय!

सकारात्मक

१. इतक्या वर्षांनी लव्ह ॲट फर्स्ट साईट व्हावे असा कुणी दिसला. नाहीतर काॅलेजची इतकी वर्षे गेली.. भाकड!

२. तो आला.. त्याने पाहिले .. आणि जिंकले!

३. काहीच ठाऊक नसताना त्याचे नाव तरी शोधून काढले मी.

४. एकदा भेट झाली प्रत्यक्ष! नैन लडे न लडे.. म्हणजे लडे नैन पण एकतर्फी..

५. काहीच ठाऊक नसताना मी त्याच्या पुस्तकावर केली चर्चा

६. काही नाहीतर तात्यांकडूनच काढताच येईल माग त्याचा. माग? तो शिकारी काढतो ना म्हणे.. सावजाचा?

७. आणि माझा माझ्या स्वतःवर आहे विश्वास. फक्त येऊ तर दे समोर. जरा सामने तो आओ छलिए.. छलिए म्हणजे जो छळतो तो का?

नकारात्मक

१. त्याने दिलेला नंबर चुकीचा.

२. त्याचे मिळालेले पत्ते चुकीचे.

३. त्याने केला नाही फोन.

४. पुस्तकाच्या दुसऱ्या भागाचा नाही पत्ता.

५. तो आला.. त्याने जिंकले पण पाहिले मात्र नाही मला.

जमा ७ नि खर्च ५! हा हिशेब जमा खात्यातलाच. त्यात अाजवर नफा झालाय. मी विचार करत बसली. डोके खाजवत म्हटले असते पण ना माझ्या डोक्यात उवा आहेत ना कोंडा. मग कशाला खाजवावे डोके? पुढे कायतरी व्हायला पाहिजे .. पण ते काय?

रात्री मिलिंदाचा फोन आला. म्हणाला, उद्या तो भिंगारदिवेला करेल फोन आणि विचारेल परत नंबर. नाहीतरी त्याची मुलाखत अडकलेलीच राहिल.. किंवा थेट त्याला प्रेमला तिकडेच बोलावून घ्यायला सांगतो!

मला आता जीवनाच्या सुरनळीच्या टोकाला थोडासा म्हणजे अंधुक प्रकाश दिसला!

इतर रसदार पर्याय

शेयर करा

NEW REALESED