Pritichi Premkatha - 11 books and stories free download online pdf in Marathi

प्रीतीची 'प्रेम'कथा - 11

११

परत भिंगारदिवे!

अर्थात

आॅपरेशन प्रेम!

सकाळी मिलिंदा, काकु नि बुरख्यातली मी तिघेही गेलो, त्या साहित्य दिवे प्रकाशनातल्या भिंगारदिव्याला भेटायला. आज भिंगारदिवेचा उशीरा येण्याचा बेत होता. बाहेरचा तो माणूस म्हणाला तसा नि माझ्याकडे पाहून म्हणाला, "बोलवून घेऊ ना त्यांना. सांगतो चॅनेलचे लोक आलेत."

मिलिंदा म्हणाला, "ठीक. आम्ही थांबतो थोडा वेळ."

तो फोन करायला आत गेला. कालिंदी म्हणाली, "हमे है बेसब्रीसे इंतजार की आएंगो वो.. पण इधर भटके उधर भटके.. वो देते हैं खो!"

"आता खो खो हसते मी.."

"सुलताना.. तमीजसे बात करो! पठाणसाहिबा!"

मी चपापून गप्प झाली. न जाणो भिंगारदिवा उगवला अचानक तर.

तो आतला माणूस येताना दिसताच कालिंदी सूर बदलत बोलली, "सर सांगत हे होते मी, बरंका आपल्या चॅनेलवर उद्याच्या स्लाॅट मध्ये हा इंटरव्ह्यू टाकायचाच सर."

"हो पण मिस कालिंदी, आय वोंट ॲक्सेप्ट इनकम्पलीट वन. अर्धवट काम करून आले तुम्ही..

काय साहेब येताहेत ना?"

"होय साहेब. येताहेत. थोडे थांबा म्हणाले सर."

"ओके.."

आम्ही बसून वाट पाहायला लागलो. तो माणूस समोर बसल्याने आमची बोलती बंद करून!

भिंगारदिवे आलाच आपकी तुंदिलतनू सावरत. करंजीत ठासून सारण भरल्यासारखा खुर्चीभर बसला. येतानाच तयारीत आलेला दिसत होता. होते नव्हते ते केस चापूनचोपून बसवून आलेला.

तो आत बसताच आम्ही शिरलोच आत.

"यस कम इन.. वाॅन्ट मोअर बाईट्स?"

तिकडे दुर्लक्ष करत कालिंदी मिलिंदाकडे पाहात म्हणाली,

"सर, ही गेव्ह अस द इंटरव्ह्यू .. बट आॅल राॅंग ॲड्रेसेस सर. आणि नंबर सुद्धा चुकीचे."

"मि. भिंगारदिवे, तुम्ही चुकीचे नंबर नि पत्ते दिल्याने

ते रेकॉर्डिंग अर्धवट राहिले आहे. आय ॲम आन्सरेबल टू सीनियर्स. तुम्ही त्या लेखकाला इथे बोलवा.. नाहीतर तो इंटरव्ह्यू आम्हाला कॅन्सल करावा लागेल."

"अहो, तुम्हाला मी चुकीचे दिले पत्ते आणि नंबर .. पण खरे दिले असते तरी हेच झाले असते. जगदाळे माणूस चांगला आहे पण त्याला कुणी बोलवू शकत नाही.. आणि बोलायला ही लावू शकत नाही. तर त्याचा इंटरव्ह्यू ही दूरची बात."

"म्हणजे?"

"त्याच्या मागे लागलात तर तुम्ही माझाही इंटरव्ह्यू दाखवणार नाहीत.. आणि तो खरेच भेटला तर तुम्ही आहे तोही कट करून टाकाल. विद्रोही मटेरियल आहे जगदाळे. कुणाशी बोलेल? त्याला मनात येईल तरच तो येईल! नाहीतर नाही. याबाबत मी मदत करावी असे काही नाही."

"पण साहेब तुम्ही पत्ता तर द्या खरा. आम्ही करतो प्रयत्न. मला खात्री आहे या सलमाला तो नाही नाही म्हणणार.."

मी हळूच मिलिंदाला चिमटा काढला. तो सुलतानाला सलमा बनवून बसला! पण भिंगारदिवा स्वतःतच मग्न होता.. त्याला सलमा नि सुलतानातला फरक कळला नाहीच!

"साहेब, एक काम करू, तुम्ही त्याचा पत्ता द्या. बाकी आम्ही पाहतो. आणि उद्या दुपारी पहायला विसरू नका.. ज्वालाग्राही सर्वदा.. तीन वाजून तीन मिनिटांनी .." आणि त्यानंतर त्याने तोंडाने त्या प्रोग्राम आधीचे म्युझिक ही म्हटले!

भिंगारदिव्याला जास्त आॅप्शन न देता मिलिंदा बोलला आणि टीव्ही स्टार भिंगारदिवे संमोहित झाल्यासारखा पत्ता नि नंबर देऊन बसला. म्हणाला, "त्याला कळू देऊ नका.. मी दिलाय नंबर.

नाही हो! तुम्हाला कशाला मध्ये घालू आम्ही?"

मी चुकून मराठीत बोलून गेले. पण बुरख्याआडून बोलल्याने मी बोलल्याचे लक्षात आले नसावे. कालिंदीने हळूच पाठीमागून टोचले मला नि माझ्यातली सुलताना जागी झाली..

"बहुत शुक्रिया, आपकी बडी मेहरबानी सर."

आमचे एक काम झाले होते! थोडक्यात प्रेम प्रकरण जरा विक्षिप्त असणार की सणकी? पण मी भाळलेले त्याच्यावर. आता माघार घेणे नाही. आता मिशन जगदाळे! हा पत्ता खरा असावा.. फोन तो उचलण्याची शक्यता नाहीच.. तरी फिरवला. अपेक्षेप्रमाणे त्याने उचलला नाहीच.

पुढे जाण्याआधी मी आमच्या प्रेप्रीप्रेबंसची इमर्जन्सी मीटिंग बोलावली. जे ऐकले त्यातून ही टीव्हीची अायडिया काढून टाकावीसे वाटले मला त्यासाठी. हा प्रेमाचा किल्ला मलाच लढवावा लागणार होता असे दिसत होते.

अाम्ही रस्त्यातल्याच एक हाॅटेलात बसलो. इमर्जन्सी मीटिंग ना!

"घेणार?"

मिलिंदा कालिंदीला विचारतोय नि ती काळवेळ विसरून लाजतेय! लग्नाला एकच वर्ष झालेय. पण एक वर्ष तरी झालेय ना? अजून लाजतेय ती!

"चहा की काॅफी विचारतोय तो.."

मी बुरखा काढत धर्मांतर करत म्हणाली, "तुला काय वाटले?"

मिलिंदाने मीटिंगची सूत्रे हाती घेतली.. म्हणाला, "वेटर, तीन मसाला डोसा.. कडक भाजना जरा! मग आमच्याकडे वळत म्हणाला, अगं डोशाला वेळ लागतो यायला. आपल्याला मीटिंग संपवायची तर थोडा वेळखाऊ पदार्थच हवा!"

"म्हणून तुम्ही त्या उडप्याकडे डोसे खायचात? मी पाहिलेय.."

"हुं.. लवकरच तू ही खाशील.. डोसे मोहब्बतके! त्यात मसाला प्यार का! अाणि प्रीतीसांबार!"

"आणि चटणी प्रेम की! बाकी होवो न होवो हे शेवटचे रिॲलिस्टिक एकदम! अनुभवाचे बोल!"

कालिंदीने लटक्या रागात त्याच्याकडे पाहिले. मी होते म्हणून नाहीतर अजूनही काही केले असते तिने.

डोसा येईतोवर मिलिंदाने मीटिंग सुरू केलीही.

"तर आता पुढे काय?"

"पुढे हेच. सुलताना बेगम कॅमेरा घेऊन.. इंटरव्ह्यू विथ जगदाळे! होप त्याच्या घरास नाही टाळे!"

"कहने को तो ढूंढते हैं हम उनको तनहाईमें.. नहीं मिले लेकिन वो अबतक .. हम भी है घाईमें!"

"अग तसे नाही काही. भिंदि काय म्हणाला?"

"बिंदी? कोण?"

"बि नव्हे.. भि.. भिंदि बोले तो भिंगारदिवे! तर भिंदी म्हणाला, प्रेम इंटरव्ह्यू देणार नाही बहुधा." "आपल्याला तो नकोच आहे.."

"कोण? प्रेम?" काकु!

मी रागाने तिच्याकडे पाहात जोरात म्हणाली, "इंटरव्ह्यू. कदाचित टीव्हीवाले आलेत पाहून आपल्याला तो हाकलून देईल. त्याऎवजी मीच जाऊन पाहते त्या पत्त्यावर. पुढे काय करायचे ते तिथे काय होते यावर अवलंबून."

"म्हणजे.. वुई आर बोन्स इन कबाब?" मिलिंदा म्हणाला.

"आम्ही नको आता.. कामापुरती मामी?" कालिंदी!

"नाही, पण ती म्हणते ते ठीकच आहे. दिव्य दिवे म्हणतो तसा असेल जगदाळे तर.."

"आपल्या प्लॅनला लागेल टाळे! प्री.. तू जा.. तूच जा!"

"किंवा तू जाच!"

"तर डोसा येण्याच्या आत मीटिंग संपली देखील. तू जा. बाकी डिटेल्स एडिट केले तरी चालतील पण तुझ्या भेटीचा वृत्तांत पाठव आम्हाला."

वेटरनी आणलेल्या तीन डोशांकडे पाहात तो म्हणाला.. आम्ही डोसे खाताना फक्त त्या चमच्यांचा नि तोंडाचा आवाज येत राहिला. डोसे संपवून बिल घेऊन वेटर आला आणि तितक्यात त्याच हाॅटेलात तात्या आणि भिंगारदिवे प्रवेशले! मी हळूच कालिंदीला इशारा केला. तात्यांना ती ओळखतेच. एकाएकी आमचा आवाज बंद झाला.

दोघे बसले एका ठिकाणी. आमच्यापासून लांब होते. आम्हाला दिसत होते, पण त्यांनी मुद्दाम पाहिले नाही तर दिसलो नसतो आम्ही. आता डोसा नाही समोर. बिल हातात आलेले. कामाशिवाय उडप्या बसू देईल? बाहेर पडणार कसे? माझा बुरखा काढलेला मी. पण गळ्यात आयकार्ड लटकत होते. ते काढून पर्समध्ये टाकले. कॅमेरा मिलिंदाकडे दिला.

"स्पेअर बुरखे आहेत का तुझ्याकडे?" काकु म्हणाली.

"बुरखा आणि स्पेअर?" मी.

इतक्यात मिलिंदाच्या डोक्यात झटकन विचार आला असावा.. म्हणाला,

"थांबा. अजून एकेक डोसा खाऊ.. ते जाईपर्यंत बाहेर जाणे धोक्याचे आहे."

"मी? मला अजून एक डोसा नाही जाणार.."

"मला पण!" कालिंदी म्हणाली.

"ठीक. एक डोसा.. तुम्ही हळूहळू चहा प्या!"

"पण मी चहा नाही पीत.. आणि काॅफीपण!"

"तुला प्रेम हवा ना?" लहान मुलीला विचारावे तशी काकु म्हणाली. मीही लहान मुलीसारखी मान हलवली.

"मग चहा प्यावाच लागेल.. वेळ घालवायला." काकु म्हणाली.

वेटरला बिल परत देत मिलिंद म्हणाला, "हमने हमारे पेटमें वापस चेक किया. अजून भूक बाकी है. एक डोसा और लाव. वैसा ही कडक भाजके!"

वेटर निघून गेला.

"अरे आमचा चहा? उशीर होईल नंतर.."

"आपल्याला तोच करायचाय.. बसा."

वेटर डोसा आणेपर्यंत आम्ही खाली मुंडी घालून बसलो. तात्या नि भिंदि दूरवर होते त्यामुळे काय बोलतात ते कळत नव्हते. पण त्याचा फायदा इतकाच की आमचा आवाजही जात नव्हता त्यांच्या पर्यंत. तरीही ते प्रेमबद्दल काही बोलत असतील तर? पण त्यांच्या जवळ जाण्याची रिस्क घेणेच रिस्की होते! आमचे भांडे फुटले तर? तात्या कालिंदीला ओळखतात .. मिलिंदाला ही. दोघांना वेटरने पटापट आॅर्डर द्यावी आणि आम्हाला हळूहळू अशी प्रार्थना करण्याहून वेगळे मी काय करणार होती? पण नेमके उलट झाले. त्यांचे टेबल रिकामे नि आमच्या टेबलावर मसाला डोसा येऊन बसला लगेच! हळूहळू खाण्याशिवाय पर्याय नव्हताच मिलिंदाला. 'अाॅपरेशन प्रेम' ऐवजी आमचा ॲजेंडा आता 'आॅपरेशन हाॅटेलातून सुटका' झाला होता! आम्ही जणू त्या उडप्याकडे स्थानबद्ध झालेलो. थोड्यावेळात 'त्या' टेबलावरची आॅर्डर आली. मिलिंदाचा डोसा संपवून आम्ही चहा मागवला. माझ्या आयुष्यातला पहिला चहाचा घोट या उडप्याच्या हाॅटेलात लिहिला असावा! चहा तसा बरा आहे. पण तात्या नि भिंदि उठले नाहीत तर कदाचित काॅफीपण प्यावी लागेल! एकदाचे तात्या नि भिंदि उठले. ते निघेतोवर कालिंदीला दोन कप चहा प्यावा लागला! प्रेम माणसाला काय काय करायला लावते नाही! हे खरे तर कालिंदीला लागू नाही होत आता, पण हे सारे माझ्या प्रेमखातर!

तात्या गेले निघून नि आम्ही निघालो. मी घरी जाऊन दुपारी निघेन.. आॅपरेशन प्रेमवर. कालिंदी नि मुकुंदा दोघे निघून गेले. काही अंतरावर आले तर पाठून तात्यांची हाक! नशीब कॅमेरा नव्हता हाती! इथून आमचे काॅलेज जवळच आहे. ती थाप पचून जाईल! मी क्षणार्धात विचार केला!

"काय गं मनी.. इथे कशी? काॅलेजात का?"

"अं.. हो. जरा रेफरन्स पाहिजे होता!"

रेफरन्स! हे काही खोटे नव्हतेच! फक्त रेफरन्स प्रेम नि प्रेमाचा होता एवढेच!

तेवढयात तात्या म्हणाले, "सकाळी लवकर निघालीस.. न खाता. भूक लागली असेल. चल डोसा खातेस?"

मला भरल्यापोटी परत डोसा खाण्याची कल्पनाच करवेना. घाईघाईत म्हणाली, "नाही. घरी जाऊन जेवते. उगाच बाहेर कशाला खायचे. आणि तुम्ही इथे?"

"अगं ते प्रकाशक आहेत ना भिंगारदिवे त्यांना भेटायला आलेलो."

"भिंगारदिवे म्हणजे .. ते पुस्तक आपल्याकडे आहे त्याचे प्रकाशक ना?"

"हो. चल निघतो. तू घरी जा. लगेच जा. मी येतोच चार वाजेपर्यंत."

"लवकर तात्या?"

"हो. कुणी येणार आहेत. तू थांब हा घरी."

"मी? मला जायचेय बाहेर."

"हे काय.. हे बाहेरच तर आहे. अजून किती जाशील बाहेर. जा."

"पण माझे काम?"

"अगं त्याहून महत्त्वाचे काम आहे.. तू जा मी आलोच.."

"पण ते भिंगारदिवे.. काय म्हणाले?"

"काय नाही.. मी निघतो. लवकर येतो. तू तयार रहा."

भिंगारदिव्याच्या निमित्ताने काही माहिती मिळते का पहायचा माझा प्लॅन फोल ठरवत तात्या निघून गेले. आणि मी घराकडे निघावेच लागले. जाता जाता वाटले, इथूनच सरळ त्या पत्त्यावर जावे. घरून परत निघता येईल की नाही कुणास ठाऊक. पण नेमका बुरख्याच्या आतला ड्रेस माझ्या लकी रंगाचा नव्हता! पाहिलंत एवढा फरक पडतो लकी रंग नसल्याने. तो असता तर हा सारा गोंधळ झालाच नसता. काही होवो.. तो लकी ड्रेस घालूनच जाणार मी. स्वामींनी स्पष्ट सांगितलेय.. कुठल्याही महत्त्वाच्या कामासाठी मरून रंगाचाच ड्रेस घाल मुली. आणि ही मुलगी नेमकी आज ते विसरली. होणार नाही तर काय हा असला गोंधळ?

इतर रसदार पर्याय

शेयर करा

NEW REALESED