प्रीतीची 'प्रेम'कथा - 5 Nitin More द्वारा फिक्शन कथा मराठी में पीडीएफ

Featured Books
श्रेणी
शेयर करा

प्रीतीची 'प्रेम'कथा - 5

सकारात्मक!

अर्थात

प्रेमाकडे पहिले पाऊल!

विचार केला तर वाटते आतापर्यंत झालेच काय माझ्या गोष्टीत? एकदा मी तो जो कुणी होता त्याला पाहिले अाणि आवडला मला तो. तो कोण कुठला.. कशाचा पत्ता नाही! यापेक्षा जास्त काहीच घडले नाही. पुढे तरी काही व्हावे की नाही? अर्थातच. काय आहे आपल्याकडे कधी आपण अशा अर्धवट गोष्टी सांगतो का? म्हणजे ज्यात काहीच घडले नाही अशा? अशा गोष्टी घडतातच, पण कुणी सांगत बसत नाही त्या. एखादी शोकांतिका असतेही पण तिच्यातही दु:खद का होईना, अंत असतोच. त्यामुळे मी सांगतेय ही गोष्ट म्हणजे तिला काही न काही शेवट असायचाच! 'दे लिव्हड हॅपिली एव्हर आफ्टर.' हा शेवट! त्याच्या मध्येमध्ये काय काय घडले हे मात्र सांगितलेच पाहिजे. तेच नाही सांगितले तर निम्म्याहून अधिक सिनेमे बनलेच नसते! त्यामुळे शेवट माहिती असला तरी गोष्ट सांगायलाच हवी. फक्त एक आहे.. हा असला शेवट हे मला कुठे आधी माहिती होते? माझीतर सुरूवातच 'वो कौन था' पासून झालेली. एक आता मला लक्षात आले त्यानंतर .. कुछ तो करना पडेगा. त्या पुस्तकातून हिंट मिळाली असती का? कुणास ठाऊक!

पण माझ्या स्वामींच्या महिम्याची प्रचीती लवकरच आली मला! होय अशा गोष्टींना अनुभव नाही तर 'प्रचीती' म्हणतात! अशा म्हणजे साधुपुरूषांकडून येणाऱ्या! तर माझ्या या शोधात अचानक एक क्ल्यू मिळाला. तात्या रात्री बोलत बसलेले आईशी. अचानक प्रेमानंद जगदाळेचा उल्लेख आला. नेहमीप्रमाणे आधी लक्ष नव्हते माझे. त्यामुळे कुठून ते संभाषण सुरू झाले कळले नाही.

"बराय मुलगा!" आई म्हणाली आणि मी कान टवकारलेच!

"अगं नोकरीत असले लोक टिकत नाहीत. त्यामुळे थोडे सांभाळून घ्यायला लागते. पण जगदाळे थोडा गरम डोक्याचा आहे."

"प्रेमानंद? दिसतो शांत अगदी."

"मला विचार. त्याला पुस्तक दिले परत. वाचले की नाही विचारत होता. अगं लिहितो चांगला पण थोडासा एक टोकावर जाऊन लिहितो."

या क्षणी ते पुस्तक पूर्ण न वाचल्याचा पश्चात्ताप झाला मला. तरीपण आता पुढे यातूनच काही माहिती मिळेल इतके जाणवून मी बोललीच,

"त्या पुस्तकाबद्दल बोलताय? तुम्ही ओळखता त्याला? म्हणजे तोच लेखक आहे?"

"अगं त्यादिवशी नाही का अालेला तो?"

"श्रीखंडपुरी खाऊन गेला तो?"

"हं.. मने तोच. अगं लिहितो तो. त्याचे पहिलेच पुस्तक. मला म्हणाला वाचून सांगा.. आमच्या आॅफिसात येत जात असतो कधीकधी. तुला आवडले का ते?"

आता खरे सांगावे तर पंचाईत. नाही वाचले म्हणावे आणि कधी तात्यांना तो भेटला तर.. बोलता बोलता तात्या सांगतील.. 'काय तुमचे पुस्तक.. आमची मनी झोपून गेली वाचता वाचता!'

मी म्हटले प्यार दीवाना होता है तसाच चोरटा पण होता है. आणि खोटा पण बोलता है जरूर पडल्यास! त्यामुळे मी खोटे बोलणे पत्करले. आणि दिमागकी बत्ती जल गयी! म्हटले, "तात्या.. मला तर आवडले पुस्तक .. हाती घेतले ते वाचल्यावाचून सोडवेना. रात्रभर जागून वाचले मी! तुम्ही सांगा हां त्यांना नक्की मला आवडल्याचे!"

मुद्दाम आदरार्थीवचन वापरत बोलली मी. आणि मी मोठा नि:श्वास टाकला. प्रेमकी ओर बढनेवाले मेरे प्रेमके पहिले चिमुकले कदम!

माझा विश्वास बसेना. इतक्या चुटकीसरशी त्याचा ठावठिकाणा कळावा! मी ठरवले.. लोहा गरम है तब तक ठोको उसको.. मंगता है इतका!

मी इतक्या झरकन सारे ठरवू शकते हे मला कधीच पटले नसते एरवी. पण मी इमर्जन्सी निर्णय घेतले. पुस्तक वाचल्याचे एक खोटे.. मग त्यापुढे अजून खोटे का बोलू नये? 'एक खून को भी फांसी और दो को भी फांसीहीच!' आठवला तो फेमस डायलाॅग मला. एका खोट्याचे ते पाप नि दुसऱ्याचे पण.. पापच! मग का नाही दामटावे घोडे पुढे?

म्हणून मी पुढे बोलली, "वाटत नाही पहिलेच पुस्तक असेलसे. सराईत लेखक असावा असे वाटते! आणि मी तर त्या पुस्तकातली काही वाक्ये पण लिहून काढलीत! छान आहेत."

एवढी मेहनत केली असती तर.. परत तेच.. बीएला क्लास नसता मिळाला? मी हळूच आई आणि तात्यांच्या तोंडाकडे पाहून घेतले. बहुधा तात्या त्या पुस्तकाच्याच विचारात असावेत. आणि आईचे लक्ष नसावे. नाही तर मी सांगते त्यावर विश्वास नसता बसला त्यांचा. आपल्या बीए झालेल्या मुलीस आवडले म्हणजे पुस्तक चांगले असावे इतपत मला वाटते त्यांना समजले असावे. कारण त्यांचा चेहऱ्यावरचे भाव बदलले.

"असं म्हणतेस? मग मी सांगतो आमच्या साहेबाला.. दुसरी एडिशन आपण काढू! नाहीतर नवीनच काढू त्याचे पुस्तक."

तात्या 'रंगढंग प्रकाशना'त आणि त्यांचे काम हेच.. होतकरू लेखक शोधणे! त्यामुळेच त्यांनी प्रेमला बोलावले असणार घरी! ही संगती मला इतक्या उशीरा लागावी? याआधी ही एक दोनदा कुणाला आणलेले घरी. इतक्यात विसरले मी? हा सारा प्रेमाच्या प्रेमाचा प्रताप .. आणि काय! पण आता या नव्या पुस्तक प्रकाशनात मला आशेचा किरण दिसला. काहीतरी होईल आता. कुठे न कुठे काहीतरी चक्रे फिरवीनच मी! फक्त हलवून खुंटा बळकट करावा तसे म्हणाली मी, "होय तात्या, एकदम बेस्ट सेलर! काय भाषा.. आणि विचार आणि विनोद!" एवढे बोलून थांबली नाही मी.. उचललीच होती जीभ तर टाळूला लावून बोलली, "तात्या एकदा भेटायला हवे या लेखकाला!"

माझ्या या साहसाचे मलाच कौतुक वाटले. बहुधा कोण तो खुदा, प्यार देता है तो आयडिया पण अपनेआप आ ही जाती हैं. एकतर मी पुस्तकाची तारीफ केली, त्यावर नोट्स काढल्याचे सांगितले .. आणि आता वर 'लेखक तुमच्या भेटी'ला याची पण सोय करून घेतली! इतक्या दिवसांतल्या सकारात्मक विचारांचा सकारात्मक परिणाम असावा! असावा कसला, असावाच! स्वामीजी म्हणतात ते खोटे कसे असेल?

जय स्वामी अरपितानंदजी की!