Nishabd - 3 books and stories free download online pdf in Marathi

निशब्द - भाग 3

आता खऱ्या अर्थाने माझ्या आयुष्याला सुरुवात झाली होती .. दिवसेंदिवस मित्रांची संख्या वाढत होती ..क्लास च्या बाहेर निघाल्यानंतर फक्त कॉलेजचे गेट पार करण्यासाठी पंधरा मिनिटे लागावी अशी ती वेळ होती .. श्रेयसी आणि मी अगदी मनाने एकमेकांच्या जवळचे झालो होतो .. विचार करता प्रत्येक गोष्टीत आम्ही स्पर्धक होतो पण प्रत्यक्षात मात्र एकमेकांच्या गुणांना साथ देणारे पक्के मित्र झालो ..वेगवेगळ्या वादविवाद , वक्तृत्व , निबंध स्पर्धा मध्ये भाग घेऊन कॉलेज साठी बक्षीस आणू लागलो.. फक्त बी.ए. शाखेतच नाही तर संपूर्ण कॉलेजमध्ये विश्वास हे नाव आता ओळखीचं झालं होतं ..भरीस भर म्हणजे माझ्यासोबत प्रत्येक स्पर्धेला ती स्वतः भाग घेऊ लागली आणि बक्षीस आणू लागली ..कॉलेजचे सर्वात जास्त बक्षीस आणून देणारे व्यक्ती म्हणून आम्ही दोघेही नावाजत होतो.. त्यामुळे आनंद द्विगुणित होऊ लागला ..श्रेयसी आणि माझी सर्वात आवडती गोष्ट म्हणजे सूत्रसंचालन .. सुरुवातीला कसं बोलायचं वगैरे जमायचं नाही पण आमच्या मराठीच्या मॅडम मुळे ते देखील सोप झालं..काही दिवसातच आम्ही दोघांनी देखील त्या गोष्टीत आता प्रावीण्य मिळवलं होतं ..कॉलेजमधील कुठलाही महत्त्वाचा कार्यक्रम असला की आम्हाला सूत्रसंचालन नक्कीच मिळायचं .. सर्व गप्पा एन्जॉयमेंट करण्यात बीए प्रथम वर्ष निघून गेलं ..
दुसऱ्या वर्षाची सुरुवात देखील तशीच झाली .. यादेखील सत्रात दोघांनीही उत्तम मार्क्स मिळविले होते .. त्यामुळे आता स्तुती प्रशंसा नेहमीचच झालं ..कधीकधी मी स्वतः यामध्ये भारावून जायचो पण ती मात्र नेहमीच स्थिर आणि शांत असायची .. मला अनेकदा असा प्रश्न पडला होता आणी मी तिला तसं विचारलं देखील होतं पण आता स्मित हास्य करुन उत्तर टाळण्याच काम करू लागली.. दुसऱ्या वर्षाच्या सुरुवातीला कॉलेजमध्ये विद्यापीठ प्रतिनिधीची निवडणूक होणार होती . सर्व शाखेतून आपापले उमेदवार उभे झाले होते...माझ्या शाखेतून मला उभं राहण्यासाठी विचारण्यात आलं ..सुरुवातीला अभ्यासाकडे दुर्लक्ष होईल म्हणून मी ते नाकारलं परंतु दिवसेंदिवस सर्वांचा आग्रह वाढला आणि सरांनीही समजूत काढल्यामुळे मला विद्यापीठ प्रतिनिधी पदासाठी उभं राहावच लागल ..पण या सर्वात आमचं एक मत ठरलं ते असं की कॉलेज बद्दलचे सर्व निर्णय विद्यार्थीच घेतील .मी कोणत्याही पार्टीकडून उभा राहणार नाही .. त्यामुळे अपक्ष लढण्याची तयारी सुरू झाली .. ठरलेल्या तारखेला नामांकन देखील भरलं ..ओपन वोटिंग असून देखील कुठलाही गोंधळ न होता निवडणूक छान पार पाडली..शेवटी वोटिंगचा दिवस उगवला आणि वोटिंग पार पडली ..आता काही दिवसात निकाल येणार होता .. तशी सर्वांना काळजी होती पण त्यांना कदाचित माहिती होतं की मीच जिंकणार म्हणून म्हणून सेलिब्रेशनची तयारी सुरू झाली .. शेवटी निकाल आला आणि 80% मत मिळून मी विजयी झालो.. सर्व कॉलेज फटाक्याच्या आणि डीजेच्या आवाजाने दुमदुमत होतं आणि मला सर्वांनी उचलून धरलं होतं किती सुंदर आणि अविस्मरणीय क्षण होता तो ..
त्याच दिवशी माझं कॉलेज समोर भाषण झालं आणि त्या नवीन पर्वाची सुरुवात झाली.. कॉलेजची कामे करायची म्हटलं तर सर्वात आवश्यक असतो तो मुलांचा सपोर्ट .. तो मला मिळत होता ..मग आता कॉलेजमध्ये थोडेफार बदल घडविण्याची तयारी सुरू झाली पण या सर्व गोष्टींमध्ये मला सुरुवातीला खूप त्रास होऊ लागला ..एकीकडे मुलांचं एकल की शिक्षकांशी तुटायच आणि शिक्षकांच ऐकल की मुलांशी तुटायच .मग पुढे यातून सामंजस्याने मार्ग काढण्याचा निर्णय झाला.. स्वाभाविक हे सर्व शिक्षक आणि मित्र यांच्यात संतुलन साधल्यामुळे होत गेलं पण या काळात श्रेयसीशी बोलणं मात्र कमी होऊ लागल..कधी कधी त्याचा त्रास होऊ लागला पण त्यावेळेला पर्याय नव्हता .. याही परिस्थितीत ती मला नेहमीच समजून घ्यायची .
ह्यावेळी आमच्या कॉलेजमध्ये मोठा कार्यक्रम होणार होता .. त्यामुळे पुढील पाच दिवस कॉलेजमध्ये मज्जा आणि मस्ती चालणार होती आणि त्यामध्ये आमच्या जिल्ह्यातले सर्व पदवीचे कॉलेज सहभागी होणार होते .. तेव्हा पंधरा दिवस आधीच सर्व तयारी सुरू झाली .. माझ्या आयुष्यातला तो एकमेव कार्यक्रम होता जिथे विज्ञान , वाणिज्य आणि कला शाखेचे सर्व विद्यार्थी मिळून कामे करत होती .. त्यांना सांभाळण्याची जबाबदारी माझी होती ..कार्यक्रमाला सुरुवात झाली .. कॉलेजच्या पहिल्या दिवसाच सूत्रसंचालन श्रेयसी आणि मला मिळाल..पहिल्याच दिवशी कार्यक्रमाची सुरुवात अगदी दणक्यात झाली ..असेच पाच दिवस विविध कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते.. आणि स्पर्धांमध्ये विविध कॉलेज बाजी मारत होते .. या सर्व काळात आमच्या मुलांनी खूप कामे केली .. शेवटी रिझल्टचा दिवस आला तेव्हा मी जेवणाकडे होतो.. दोन कॉलेजमध्ये बक्षिसात बरोबरी झाली होती आणि शेवटचं बक्षीस होतं ते पर्सनॅलिटी डेव्हलपमेंटच ..जो जिंकणार त्याला फिल्डट्रॉफी जाणार होती ..शेवटी निकाल जाहीर झाला आणि त्यात श्रेयसी , अंकित विजयी झाले ..अंकित हा दुसऱ्या कॉलेजचा विद्यार्थी असल्याने स्वाभाविकच आमच्या कॉलेजने सर्वात जास्त बक्षिसे जिंकली आणि फिल्ड ट्रॉफीसुद्धा आम्हाला मिळाली ...सर्वांनीच निकाल जाहीर होताच जल्लोष करण्यास सुरुवात केली ..त्यांचा आवाज बाहेर ग्राउंड पर्यंत येत होता ..फटाक्याच्या आवाजाने सर्व कॉलेज बहरल होत ..तेवढ्यात मी तिथे आलो..या स्पर्धेत मला एकट्यालाच ५ बक्षिसे मिळाले होते त्यामुळे मी येताच सर्वांनी मलाही खांद्यावर उचलून धरण ..हा माझ्या आयुष्यातला सर्वात सुंदर क्षण होता ..हाच तो सुवर्णमय काळ ज्यासाठी प्रत्येक व्यक्ती जीवापाड मेहनत घेत असतो .. या काळातच सर्वात चांगले मित्र भेटले ..त्या सुंदर आठवणी आजही जशाच्या तशा सर्वांच्या आठवणीत कायम आहेत ..
या काळात सर्वच गोष्टींकडे दुर्लक्ष होऊ लागलं ..फक्त अभ्यासाला कसाबसा वेळ द्यायचो.. ह्या सर्वात माझी विद्यापीठ प्रतिनिधी म्हणून कार्यकिर्द फार गाजली.. पाहता - पाहता दुसर वर्ष देखील आता संपल होत .. मी पुन्हा नव्याने अभ्यासाला लागलो .. तिसर्‍या वर्षी आपोआपच विद्यापीठ प्रतिनिधीची संधी चालून आली पण इतरांना देखील संधी मिळावी शिवाय श्रेयसीला पण वेळ देता यावा म्हणून मी ती संधी सोडली अर्थात यात माझा स्वार्थ होताच ..आता जास्तीत जास्त वेळ मी श्रेयसीला देऊ लागलो .. आणि ती माझ्या अगदी जवळची झाली .. तिसऱ्या वर्षाचे ते सुरुवातीचे दिवस होते ..काही मुलींनी मला प्रपोज देखील केलं होतं..एक प्रपोज तर खुद्द श्रेयसी समोर आला होता ..तेव्हा श्रेयसी दोन दिवस माझ्यासोबत बोलली नव्हती ..मलाही तिच्या भावणाबद्दल अंदाज होता .. काही काळानंतर या गोष्टीचा अर्थ मला कळला होता..
कृतिका माझी खूप जवळची मैत्रिण .. आम्ही दोघं वेळ मिळेल तेव्हा गप्पा मारत बसायचो. एक दिवस असेच दोघे गप्पा मारत असताना विषय निघाला आणि तिने मला विचारलं की , " तुला कशी मुलगी हवी आहे रे विश्वास ? " .. त्यावेळी मी मात्र गप्प होतो पण तिने विनंती केल्यावर मात्र सर्व काही सांगावं लागलं .. माझे शब्द होते , " मला ना विशेषता सलवार सूट वर राहणाऱ्या मुली आवडतात , छान कानातलं लोम्बकळत असलेले झुमके , गळ्यात एक साधी चेन आणि मोकळे केस अशी मुलगी जेव्हा दिसेल तर खरच मी तिच्या प्रेमात पडेल."
ती अगदीच मन लावून ऐकत होती शेवटी इकडच्या तिकडच्या गोष्टी करून आमच बोलणं संपल.. काही दिवसांचा कालावधी गेला होता .. बरोबर सात दिवसानंतर श्रेयसी पांढऱ्या सलवार वर मला हवी तशीच अजून आली होती .. आज प्रत्येक व्यक्ती जणू तिच्याकडे आश्चर्याने पाहत होता .. मी त्यावेळी मात्र आपल्या कामात व्यस्त होतो.. मी तिला पहावं असं वाटत असावं पण आमची नजरानजर मात्र होत नव्हती .. मग अगदी तिच्या पैंजनाच्या आवाजाने माझी नजर तिच्या कडे गेली ..नेमकी त्याच वेळेला ती माझ्याकडे बघत नव्हती .. आज संपूर्ण क्लासमध्ये मी तिच्याकडे नजर चुकवून बघत होतो पण हे मी तिला मात्र जाणवू दिल नाही..शेवटी नऊ पंचेचाळीसला बेल वाजली आणि पंधरा मिनिटांची सुट्टी झाली .. मी चहा घेण्यासाठी बाहेर निघालो आणि ती धावत - धावत माझ्याकडे यावी असा तो प्रसंग..ती माझ्यासोबत एक - एक पावले टाकत पुढे चालू लागली ..त्याक्षणी ती आपल्या केसांना हाताने वारंवार सावरत होती..माझ्या ते लक्षात येत होतं पण मी काहीच बोलू शकलो नाही ..मलाही ते फार आवडलं होत ..तिला सांगावस वाटत होतं पण हिंमतच करू शकलो नाही ..आम्ही दोघे आपल्याच विश्वात होतो .. त्याच वेळी माझ्या लक्षात आलं की सर्व मुलं आज आमच्याकडेच बघत होती ..मी काही क्षणांसाठी लाजलो पण तीच मात्र कुणाकडे लक्ष नव्हतं .. कदाचित ती माझ्यात एवढी गुंतली असावी की तिला त्याचं भानच नव्हत..काही क्षणात आम्ही कॅन्टीनमध्ये पोहोचलो ..चहा घेतला .
ती त्याहीवेळी फक्त माझ्याकडे पाहत होती आणि मी तिच्याकडे दुर्लक्ष करू लागलो ..मी तिच्याकडे पाहत नाही म्हणून ती रागावली ..मी लवकरात लवकर चहा घेतला आणि पुन्हा क्लासला परत आलो .. शेवटी एक क्लास केला आणि दोघे सोबतच घराकडे निघालो..आता मात्र तिचा चेहरा उतरला होता..हे माझ्या लक्षात आलं त्यामुळे मी तिला म्हणालो कि , " श्रेयसी यार तू खरच खूप सुंदर दिसत आहेस !! "
आणि तिचे उत्तर एकण्यासारख होतं , " चल खोटे नको बोलू , असं होतं तर मग तू आधिच का नाही सांगितलं ?" ..ती फारच रागात जाणवत होती पण तो रुसवाही तिच्या चेहऱ्यावर अधिकच गोड वाटत होता .. तेव्हा मी मुद्दामूनच म्हणालो , " मुळात तुझी जो फॅन फॉलोविंग आहे ती खूप मोठी आहे त्यामुळे मला असं वाटलं की कदाचित माझ्या शब्दांना काहीच किंमत राहणार नाही ."
तेव्हा ती लटक्या रागात म्हणाली , " मग एवढेच होतो तर आता तरी कशाला सांगितलं ?"

तिचा प्रश्न खरच मनाला सतावणारा होता..तेव्हा मीच म्हणालो, " की मी तुला सांगितलं नसतं तर कदाचित तुझ्या सुंदरतेचा अपमान झाला असता ."
शब्दांमध्ये जादू असे म्हणतात ना आता ते जाणवल.. माझ्या काही स्तुतीपर शब्दांनी तिच्या चेहऱ्यावर हास्याची कळी उमलली होती आणि ती म्हणाली की , "सर्वजणांनी विश केलं पण तू जर विश नसत केलं तर कदाचित काहीतरी अपूर्ण राहिलं आहे असं वाटलं असतं त्यामुळे थँक्यू थँक्यू व्हेरी मच ."
मी देखील संधीचा फायदा घेऊन तिला म्हणालो की , " माझ्या शब्दाने तुला जर एवढा फरक पडत असेल तर तू अशीच दररोज का येत नाही ? "..तो दिवस आणि नंतरचा प्रत्येक दिवस अगदी ती तशीच आली ..

आयुष्यात मुली तर खूप आल्या तुझ्यावर प्रेम करते अस देखील म्हणाल्या पण पहिल्यांदाच अशी मुलगी बघत होतो जी फक्त माझ्या एका इच्छेसाठी संपुर्णरित्या बदलली होती.. याच काळात आम्ही एकमेकांच्या अगदीच जवळ आलो .. एकमेकांकडे आकर्षिल्या जात होतो.. प्रेम नक्कीच होतं फक्त व्यक्त कोण करतो हेच पाहायचं होतं ..
तिसरं वर्ष अभ्यासाच्या दृष्टीने फार महत्त्वपूर्ण होत त्यामुळे आम्ही दोघांनी इतर गोष्टींकडे दुर्लक्ष करून अभ्यासावर लक्ष देण्यास सुरुवात केली..होती..आम्ही जेव्हा - जेव्हा जोडीने एखादी स्पर्धा जिंकायचो किंवा सूत्रसंचालन करायचो तेव्हा सर्वजण कपल म्हणून चिडवायचे आणि ती गोष्ट आम्ही दोघांनी फार एन्जॉय केली आणि करत होतो .. हो ..पण आम्ही आमच्या भावना सहज रित्या कोणासमोर उघड होऊ दिल्या नाही त्यामुळे आमच्याबद्दल फारशी कुणाला शंका येत नव्हती ..
ती अलीकडे फार विचित्र वागू लागली होती.. मी तिला याबद्दल विचारलं पण ती नेहमीच उत्तर देणे टाळत असे ..त्यानंतर मी मात्र तिला कधीच कुठलीही गोष्ट विचारली नाही .. त्या सत्राचा सप्टेंबर महिना होता ..आमच्या सर्वांच्या विनंतीवरून सरांनी आम्हाला चिखलदऱ्याला न्यायचं ठरवल..सुरुवातीला श्रेयसिने येण्यास नकार दिला पण माझ्यासाठी ती देखील आली होती..आमची स्वारी चिखलदर्याला निघाली .. बसमधला प्रवास हा फार धमालदायक होता ..सर्व मूल मज्जा मस्ती करण्यात गुंग होती .. गाण्याच्या भेंड्या , शेरोशायरी यांनी तर वातावरण तृप्त करून टाकलं होतं .. सर्वांच्या विनंतीवरुन आम्हा दोघांना गाणं सुद्धा म्हणावं लागल .. बस जशी-जशी समोर जात होती तसतशा आठवणी आणखी बनत जात होत्या..ते काही तास मुलांनी अगदी धुमाकूळ घातला ..आता मुलेही ओरडून - ओरडून थकली .. शेवटी बस सायंकाळी चिखलदऱ्याला पोहोचली ..तेथे आम्ही आधीच जेवणाची आणि रूमची व्यवस्था करून ठेवली होती .. सर्वांचं जेवण झालं .रात्र झोपून काढली ..आता सर्वाना प्रतीक्षा होती ती सकाळची ...
सकाळचे सहा वाजले असावेत.. आमची स्वारी मग निसर्ग निसर्गरम्य देखाव्यात दाखल झाली.. शहरी वातावरणातून आज तो निसर्ग देखील पहिल्यांदाच आकर्षक वाटत होता..तो उंचावरून पडणारा धबधबा , हिरवीगार झाडे बघून मन अगदी प्रसन्न झालं होतं..मला निसर्गाबद्दलची खूप आवड असल्याने मी मात्र पक्षांचे फोटो काढण्यात अगदीच व्यस्त झालो .. याच सुमारास पाण्यात खेळने , फोटो काढण्याची सर्वांची तयारी सुरू झाली..प्रत्येक व्यक्ती लहान बनून इकडे - तिकडे दरवळत होता ..तिथे कुणालाच कुणाच भान नव्हतं ..तसं पाहता श्रेयसीला फोटो काढायला आवडत नसे पण आज सर्वांसाठी तिने देखील आम्हाला जॉईन केलं होतं .. काही वेळाने असं काही घडलं की ज्यावर मला पण विश्वास बसेना.. माझ्या सर्व मैत्रिणीनि मला तिच्याबाजूला उभं केलं आणि फक्त आम्हा दोघांचा फोटो काढला ..ती त्याही क्षणी फार लाजत होती पण माझ्या आनंदासमोर आज तिला दुसरं काही दिसत नव्हतं .. आजही तो फोटो माझ्याकडे आहे..आठवण म्हणून.. मुलांनी त्या संपूर्ण वेळात धुमाकूळ घातला होता..मजा मस्ती करून सर्व मूल दमली .. शेवटी जेवण झालं आणि आमची स्वारी पुन्हा एकदा घराकडे परतली ..
पाचव्या सत्राच्या पेपरला आता काहीच दिवस बाकी होते त्यामुळे अभ्यासाला सुरुवात झाली होती .. शेवटी ते सत्र देखील दोघांनी टॉप केल.पण यावेळी टॉपर ती होती आणि मी मात्र दुसरा ..सर्वात महत्त्वाच म्हणजे तिला सर्वात पहिलं विश करणारा देखील मीच होतो. हरल्यानंतर देखील आनंद होऊ शकतो हे मला पहिल्यांदाच अनुभवायला मिळालं होतं.. जसे दिवस जाऊ लागले कॉलेज जीवन संपण्याची भीती वाटू लागली ..शेवटी तोही दिवस आला ज्याची भीती आणि आतुरता सर्वांनाच वाटत होती.. फेअरवेल ..
फेअरवेल ..हाच तो दिवस ज्याची प्रत्येक विद्यार्थी आतुरतेने वाट पाहत असतो ..आज कधी नव्हे ते मी देखील घरून सजून - धजून निघालो ..मी जेव्हा हॉलमध्ये प्रवेश केला तेव्हा हॉल खूप छान सजवलेला होता .
माझे मित्र राहुल , अक्षय, अरुण हे आधीच आले होते..आल्या - आलीच जेव्हा मुलींकडे बघू लागलो तेव्हा जणू सर्व अप्सरा आज पृथ्वीवर आल्या असल्याचा भास झाला ..कुणाकडे बघू नि कुणाकडे नको अस झालं होतं ..कुणी साडी लावून आलं होतं तर कुणी लाचा ..मी तर काही वेळ त्या सर्वात हरवूनच गेलो .शेवटी मित्रांच्या आवाजाने भानावर आलो .आज मात्र मी संपूर्ण वेगळा होतो.. निळा शर्ट , आतून वाईट टीशर्ट आणि क्रिमी पॅन्ट ..आज पहिल्यांदाच मला त्यां सर्वांनी अस बघितलं होतं त्यामुळे तो हटकेपणा नक्कीच सर्वांना आवडला होता ..आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे ती स्तुती मुलींकडून ऐकायला मिळाली होती .. माझी नजर मात्र आत्ताही श्रेयसीला शोधत होती.. अचानक ती आतमध्ये येऊ लागली ..ती लाल साडी , ते मोकळे केस लोम्बकळणारे कानातले आणि ती आधीच पांढरीशुभ्र ..त्यामुळे काही क्षणांसाठी मी तिच्यात हरवुन गेलो.. तिच्याकडे जावं तेव्हाच सर्व मैत्रिणी माझ्या बाजूला गोळा झाल्या ..त्यामुळे ती नाराज झाली आणि इतर मित्रांना भेटायला गेली .. या संपूर्ण वेळात मैत्रिणींनी मला काही एकट सोडलं नाहीच त्यामुळे ती माझ्यावर अधिकच रागावली होती ..त्यात माझी मैत्रीण प्रिया घसरून पडणार म्हणून तिला सावरलं आणि मॅडमचा राग आणखीनच वाढला ..शेवटी कार्यक्रमाला सुरुवात झाली.. सर्वांचा स्वागत करण्यात आलं आणि मग लगेचच भाषणाला सुरुवात झाली ..सुरज जे काही बोलला त्यामुळे भावनिक व्हायला झालं .. नंतर श्रेयसी बोलू लागली तेव्हा मात्र हॉल टाळ्यानी गजबाजला ..नंतर माझा नंबर आला..जेव्हा मी माझी परिस्थिती, मला आलेले वाईट अनुभव यांचं कथन केलं तेव्हा पूर्ण हॉल अगदी शांत झाला.. कदाचित काहींचे डोळे देखील ओले झाले असावेत .. मी सर्वांना धन्यवाद म्हणून आटोपतं घेतलं आणि जणू कॉलेज संपल्याच स्वतःकडूनच वदवून घेतलं ..शेवटी आमच्या प्रिन्सिपल सरांचे भाषण झालं आणि आमच्या कार्यक्रमाचा पहिला टप्पा आटोपला..
दुसऱ्या टप्प्यात होता डान्स , सिंगिंग यांचा तडका.. त्यात पेपर डान्सची मजाच वेगळी..मला आयुष्यात न जमलेली गोष्ट म्हणजे डान्स त्यामुळे मी या सर्वात वेगळाच होतो पण माझी ज्युनिअर स्वाती आली आणि तिने मला डान्स साठी बोलावल .. मला ते जमत नव्हत पण सर्वांच्या इच्छेसाठी ते कराव लागल .. हा डान्स स्पर्धेचा भाग नसल्याने डान्स करण्याला काहीच हरकत नव्हती .. त्यामुळे आमचे कपल डान्स सुरू झाले.. या सर्वात श्रेयसी मात्र नाराज झाली ..बहुदा तिलाही माझ्यासोबत डान्स करायचा होता त्यामुळे ती थोडी हिरमुसली ..पण तिलाही सूरजने बोलावल्यामुळे ती पण डान्स करू लागली ..वेगवेगळ्या स्पर्धा घडून आल्या ..शेरोशयरी असो की विनोद अगदी सर्वच मस्त वाटत होतं ..तो क्षण कधी संपूच नये असं झालं होतं पण ते शक्य नव्हतं .शेवटी सर्वांनी डिजेवर डान्स केला आणि जेवणाची धडपड सुरु झाली ..या सगळ्यात मी तिला एकदाही भेटलो नव्हतो..जेवण आटोपलं आणि मला काही काम असल्यामुळे थोड्या वेळासाठी बाहेर आलो ..मागे वळून बघितलं तर श्रेयसी होती ..तिने सरळ माझा हात धरून कॉलेजच्या गार्डनला नेले .. सायंकाळचे जेमतेम सहा वाजले होते .. मी तिला काही क्षण पाहतच बसलो आणि ते घडलं ज्यावर मला कधीही विश्वास बसत नाही..आज श्रेयसी वेगळीच भासत होत..तिच्या मनात काय चाललं होतं याचा पत्ताच लागत नव्हता .. तिने काही क्षणातच हातात असलेल गुलाब मला दिलं आणि म्हणाली ,

" तुझी नि माझी भेट ती
क्षणोक्षणी का आठवे
आधी कधी ना वाटले
काहीतरी होते नव्हे
सांगू कशा मी तुला संख्या रे
माझ्या या भावना
माझिया प्रियाला प्रीत कळेना " ..

विश्वास मला तू खूप म्हणजे खूप आवडतोस ..तू देशील माझी आयुष्यभर साथ ??

क्रमशः ....

इतर रसदार पर्याय

शेयर करा

NEW REALESED