आली दिवाळी - ४ Vrishali Gotkhindikar द्वारा पौराणिक कथा मराठी में पीडीएफ

Featured Books
श्रेणी
शेयर करा

आली दिवाळी - ४

आली दिवाळी भाग ४

दिवाळीचा तिसरा दिवस असतो लक्ष्मीपूजन
नेहेमी अमावस्या अशुभ मानली जाते पण ही अमावास्या हा दिवाळीतील सर्वांत महत्त्वाचा दिवस मानला जातो.
त्या दिवशी महाकाली, महालक्ष्मी व महासरस्वती यांची पूजा करतात. शाईची दौत, रुपया आणि वही ही त्यांची प्रतिके मानली जातात.

याची पुजा खालील प्रकारे करतात
एका चौरंगावर लाल रंगाचा कापड घालतात .
चौरंगाच्या बाजूला रांगोळी काढतात . चौरंगावर अक्षतांचे अष्टदल कमल किंवा स्वस्तिक काढतात .
एक चांदीचा तांब्याचा अथवा मातीचा कलश गंगा जल युक्त पाण्याने भरुन घेतात .
कलश चौरंगावर ठेवून कलशावर नारळ ठेवून आंब्याच्या पानानी सजवतात .
कलशाभोवती ताजी फुलं सजवतात.
कलशाच्या डाव्या बाजूला लक्ष्मीसाठी हळदीने कमलाचे फूल काढून त्यावर लक्ष्मीची मूर्ती स्थापित करतात.
समोर सोनं, चांदी किंवा साधा शिक्का ठेवतात. कुबेराची प्रतिमा ठेवतात ,गणपती कलशाच्या उजव्या बाजूला स्थापित करतात.
आणि त्यांच्यासमोर अक्षता ठेवतात .
देवीजवळ व्यापार संबं‍धित पुस्तक किंवा डायरी, नवीन कॉपी ठेवावी. लक्ष्मी आणि गणपतीच्या मूर्तीचे तिलक करतात . समोर गायीच्या तुपाचा किंवा तेलाचा दिवा व धूप लावतात.
पूजा स्थळी केससुणीची पूजा करतात .

हातात फुलाच्या पाकळ्या, अक्षता घेऊन हात जोडून शांत मनाने गणपती आणि मग लक्ष्मीची आराधना करतात.
लक्ष्मी मंत्र किंवा ओम महालक्ष्मयै नम: जप करतात.
आणि षोडशोपचार पूजन करतात .
देवी लक्ष्मीला शिंगाडा, मकाणे, नारळ, बत्ताशे, लाह्या, पान, करंजी, तांदळाचे लाडू, मूगाचे लाडू, सीताफळ, रव्याचा शिरा, डाळिंब, केशर मिठाई अत्यंत प्रिय आहे.
लवंग, वेलची आणि साखर घालून तयार केलेल्या गायीच्या दुधाचा खवा धने, गूळ, साळीच्या लाह्या, बत्तासे इत्यादी पदार्थ लक्ष्मीला वाहून नंतर यातील कोणत्याही पदार्थचा नैवेद्य दाखवतात व ते आप्तेष्टांना वाटतात.
नवीन जमाखर्चाच्या वहीच्या तिसर्‍या पानावर 'श्री' हे अक्षर लिहून त्यावर एक विड्याचं पान व एक रुपया ठेवतात. नंतर त्या वहीची पंचोपचार पूजा करतात. रात्रभर वही तशीच उघडी ठेवून जवळ एक दिवा तेवत ठेवतात. सर्व जण जागरण करतात. सकाळी वहीला नमस्कार करून 'लक्षलाभ' हे शब्द तीनदा उच्चारतात.
पूजा झाल्यावर आरती करतात . आरती नंतर देवीला घरात आगमानाची प्रार्थन करतात आणि काही चुकलं असल्यास क्षमा याचना करतात .
अशी पूजाही काही ठिकाणी केली जाते

समृद्धी आणि ऐश्वर्य यांचे प्रतीक असलेल्या लक्ष्मीची पूजा याखेरीज चलनी नोटा, नाणी, सोन्याचे अलंकार यांचीही पूजा यावेळी केली जाते. व्यापारी वर्गात यापूजेच्या वेळी फटाके उडवून आनंद साजरा केला जातो.

त्यानंतर ब्राह्मणांना आणि अन्य क्षुधापीडितांना भोजन घालतात. रात्री जागरण करतात..

या दिवशी श्रीविष्णूने लक्ष्मीसह सर्व देवांना बळीच्या कारागृहातून मुक्त केले आणि त्यानंतर ते सर्व देव क्षीरसागरात जाऊन झोपले, अशी कथा आहे.

लक्ष्मी पुजन ची कथा अशी सांगतात
एका गावात एका पिंपळाच्या झाडावर एक सावकार कन्या रोज दिवा लावत असे .त्या झाडावर लक्ष्मीचा वास होता .
एके दिवशी लक्ष्मी प्रसन्न होऊन तिने सावकार कन्येला दर्शन दिले व आपली मैत्रीण होण्यास सांगितले
सावकार कन्येने होकार दिला .
काही दिवसांनी लक्ष्मी तिला आपल्या घरी घेऊन गेली व तिचे चांगले आदरातिथ्य केले .चांगले चांगले पदार्थ खाऊ घातले खुप भेटी दिल्या .
सावकार कन्या आनंदीत झाली .
मग लक्ष्मीने तिला विचारले तु आता मला तुझ्या घरी केव्हा बोलावशील ?
सावकार कन्या चिंतेत पडली ,आपले घर साधे आपण कसे लक्ष्मी चे चांगले स्वागत करणार असे तिला वाटले .
लक्ष्मीने हे ओळखले
ती म्हणाली तु फक्त मला बसायला एक चौरंग ठेव आणि माझ्या पुजेची तयारी कर .त्याप्रमाणे सावकार कन्येने तयारी केली आणि अचानक आकाशातून उडणार्या घारीच्या तोंडातून एक मौल्यवान हार सावकाराच्या अंगणात पडला .
तो हार घेऊन सावकार कन्येने विकला व लक्ष्मीच्या स्वागताची जय्यत तयारी केली .
आपल्या घरी लक्ष्मीचे चांगले स्वागत करून पूजा करून तिचा कृपा प्रसाद मागितला .
लक्ष्मीने सांगितले,” सत्य मार्गाने धन कमावून दिवाळी अमावास्येला जो माझी मनोभावे पूजा करेल त्याच्याकडे मी वर्षभर आनंदात वास्तव्य करेन .

पुराणांत असं सांगितलं आहे की, अमावास्येच्या रात्री लक्ष्मी सर्वत्र संचार करते व आपल्या निवासासाठी योग्य जागा शोधते. जिथे स्वच्छता, रसिकता असेल, तिथे तर ती आकर्षित होतेच; शिवाय ज्या घरात चारित्र्यवान, कर्तव्यनिष्ठ, संयमी, धर्मनिष्ठ, देवभक्त व क्षमाशील पुरूष आणि गुणवती व पतिव्रता स्त्रिया असतील, त्या घरी वास्तव्य करणं लक्ष्मीला आवडतं.
लक्ष्मी पूजना नंतर घरात लक्ष्मीचा वास सुरु होतो व खर्या अर्थाने दिवाळी सुरु होते .

क्रमशः