प्रीतीची 'प्रेम'कथा - 14 Nitin More द्वारा फिक्शन कथा मराठी में पीडीएफ

Featured Books
श्रेणी
शेयर करा

प्रीतीची 'प्रेम'कथा - 14

१४

सापडला एकदाचा

अर्थात

दिवस मुलाखतीचा!

मी निघाली. तोच काकुची मागून हाक आली.

"प्री थांब!"

मी थबकली तशी म्हणाली, "मी पण येतेय काकांकडे. तू त्यांना काय सांगशील? मीच बोलते."

"ठीक. पण भिंदि आला तर तिकडे?"

"तो काय संताजी धनाजी आहे इतिहासातला की तो राक्षस आहे खायला? मी बोलते काकांशी. बघू मग. आणि काय तो भिंदि सर्व संचारी ईश्वर आहे की काय?"

"बरे चल."

"आलेच. तयार होऊन."

तात्यांच्या आॅफिसात आलो तर तात्या चकित झाले. त्यात कालिंदीला पाहून तर अजूनच!

"काय इकडे कुठे स्वारी?"

"स्वारी नाही, साॅरी तात्या.. हिचे काही काम होते. काल आलेली ना.. तिला म्हटले मी.. आॅफिसचे काम आॅफिसात. हो की नाही हो तात्या?"

त्यांचीच साक्ष काढत बोलली मी.

काकुने सुरू केले, "आमच्या चॅनेलला एका लेखकाची मुलाखत घ्यायचीय. त्याच्या पुस्तकासंदर्भात. त्यासाठी मदत हवीय.."

"बोल बेटा.. काय मदत हवीय?"

"ते तुंबाऱ्याची गोष्ट पुस्तकाचे लेखक .."

"प्रेमानंद जगदाळे. त्यांची मुलाखत हवीय."

"पण ते तर साहित्य दिवे प्रकाशनाचे पुस्तक .."

"हो ना काका. तिकडचे भिंगारदिवेसाहेब म्हणतात.."

"ते जाऊ देत. तर तुला त्या लेखकाची मुलाखत हवीय.. भिंगारदिवे म्हणाले मला, त्यांची मुलाखत घेतलीय कुणीतरी .."

"काका, चॅनेलवाल्यांनी सांगितलेय, लेखकाची मुलाखत तर हवीच. आणि हा लेखक सापडत नाहीये .. माझ्या नोकरीचा प्रश्न आहे.."

काकु काकुळतीला येत डोळ्यात न आलेले पाणी पुसत म्हणाली..

.. आणि तात्यांनी प्रेमानंद जगदाळेला डायरेक्ट फोन लावला ..

"तो उचलत नाहीये .." बेसावधपणे म्हणाली मी पण तात्यांच्या एका फोन काॅल मध्ये उचलला फोन त्याने आणि तात्यांच्या लक्षात आलेच नाही मी बोलली ते म्हणून बरे.

तात्या बोलत होते. तिकडून प्रेम काय बोलत होता याचा अंदाज येत होता .. आणि भिंदिने दिलेल्या अंदाजासारखाच होता तो..

"नमस्कार .. गाजतेय तुमची तुंबाऱ्याची गोष्ट .. नवीन लेखकाची .. चांगलीच असणार.. प्रमोशन पाहिजे.. टीव्हीवाले मुलाखत घेऊ इच्छितात.. अहो पण.. तुमचे ठीक आहे.. तरी पण.. लोकांना माहित झाले तर.. नाही मला काय वाटतेय.."

प्रेमचे आढेवेढे लक्षात येत होते फोनवर. म्हटले येथे काम माझेच. माझ्या बोलण्यावर नाही म्हणूच शकणार नाही तो..

तात्यांना खूण केली मी.. मी बोलते म्हणून आणि

"ही प्रीती बोलतेय तुमच्याशी" म्हणून तात्यांनी फोन माझ्या हाती दिला.

एक क्षण माझ्या काळजात धडधड झाली पण आता बावचळून कसे चालेल? आणि वर मला माझ्याच अशा प्रसंगात अगदी बिनधास्त बोलण्याचा अभिमान! तो व्यर्थ ठरवून कसा चालेल? क्षणात सावरली मी आणि म्हणाली, "हॅलो, प्रीती बोलतेय!" माझ्या मंजूळ आवाजातच तो निम्मा गारद व्हायला पाहिजे!

पण पलिकडे तो त्याच आवाजात बोलतोय .. माझे मिशन एकच.. त्याला वेगळ्या पद्धतीने बोलावयास भाग पाडणे..

"अभिनंदन .. गाजतेय तुमचे पुस्तक!"

"त्याने काय होतेय हो? त्यातला आशय महत्त्वाचा!"

"अगदी बरोबर. म्हणूनच हे टीव्हीवाले.."

"तेवढे सोडून बोला! माझा या माध्यमांवर नाही विश्वास!"

"हे एक खरेय तुमचे. विश्वास टाकावा असे लोक फार दुर्मिळ झालेत नाही आजकाल? पण ते इंटरव्ह्यूचे एक राहू देत.. मी मनापासून सांगते, अशा पुस्तकाच्या लेखकाशी मी बोलली.. मला अभिमान वाटतो त्याबद्दल! का नाही वाटणार? जगाच्या विपरित नि प्रवाहाविरूद्ध पोहणारे तसे संख्येने कमीच असतात. बाकी सारे महाजनो येन गत: स पंथ: असे काय म्हणतात त्यातले. साॅरी हां.. विद्रोही लेखकास अशी गुळमुळीत गोग्गोड भाषा सोसायची नाही. पण आशय लक्षात घ्या हां. उद्या तुमच्या लेखणीच्या एकेक फटकाऱ्यातून उगवेल संघर्षाच्या तरवारीचे पाते. आणि बदलेल ही निर्दयी दुनिया. फुंकून टाका तुम्ही असे लाखो हजारो टीव्हीचे उकिरडे. प्रस्थापित जगाला मारा लाथ आणि पुढे व्हा.." इथे मी 'तुम्ही नाथ' म्हणून यमक जुळवणार होते! समोर काकु नि तात्या आ वासून माझे बोलणे ऐकत होते!

माझ्या बोलण्याने पैलतीरावरचा प्रेम चेकाळला. विद्रोही निखाऱ्यावर फुंकर मारून त्याची ज्वाला भडकवलेली मी!

"खरेय तुम्ही म्हणता ते. मला समजून घेणाऱ्या फक्त तुम्हीच आहात हो. नाहीतर सारे म्हणतात, हा प्रेम म्हणजे खोपडी सटकलीय याची. खरेय. अरे या दुनियेतल्या अन्यायाने खोपडी सटकेल नाहीतर काय? पण मी म्हणतो बोलणाऱ्याची उपडी खोपडी आणि काय?"

मला ही संधी चांगली वाटली. तशी मी काही अभिनय वगैरे नाही करत पण इथे मी हसत सुटली. इतकी की पलिकडून प्रेम गोंधळला! मग हसतच मी म्हणाली, "तुम्हाला विनोदी विद्रोही म्हणतात ना ते खरेच आहे. कित्ती कित्ती विनोदी बोलता तुम्ही! माझ्या तर हसून हसून डोळ्यांत पाणी आले!"

खरेतर खोपडी नि उपडीत हसण्यासारखे काय होते? पण हसली मी.

प्रेम त्यामुळे अजून चेकाळला, "त्याचे काय आहे ना, माझी फिलाॅसाॅफी आहे.. अस्वलाला गुदगुल्या करूनच मारावे!"

"म्हणजे? मी अस्वल?"

"नाही हो.. तुम्हाला नाही अस्वल म्हणत मी.. ही जनरीत आहे ना.. ओबडधोबड ती!"

"अय्या! मला बघा हां एक कल्पना सुचलीय.. मला सांगा विद्रोह म्हणजे काय?"

"काय?"

"तुम्हीच सांगा.. प्रत्यक्ष विद्रोही लेखकाकडून ऐकणे म्हणजे कृष्णाच्या तोंडून गीता ऐकणे!"

"हुं.. तुम्ही बोलण्यात हार जाणाऱ्या नाहीत हां.. विद्रोह म्हणजे एल्गार.. विद्रोह म्हणजे लढाई, विद्रोह म्हणजे यःकश्चित दुनियेच्या छाताडावर पाय ठेऊन उभे राहणे.. विद्रोह म्हणजे लाथ मारून पाणी काढणे.. विद्रोह म्हणजे आपल्याला जे पटते त्याच्याही विरूद्ध उभे राहणे.. म्हणजे सर्वोच्च विद्रोह!"

"तुम्ही म्हणता ते पटतय मला! पण एकच सांगू.. तुम्ही जे शेवटचे सांगितलेत ना.. जे पटते मला. मला काय वाटते सांगू.. तुम्हाला टीव्ही वगैरे मिथ्या वाटतात ना.."

"अर्थातच.."

"तर त्याविरूद्ध विद्रोह कराच तुम्ही आणि याच टीव्हीवर. सर्वोच्च विद्रोह होईल तो!"

"असे म्हणता?"

"खरेच!"

"तुम्ही म्हणता तर विचार करायला हरकत नाही. समानधर्मी कुणी भेटले ना की बरे वाटते."

"वाटते ना? मग या की! नुसतेच फोनवर कशाला .. प्रत्यक्ष या. इथे आपण भेटूदेखील नि तुमची मुलाखतही होऊन जाईल.. कामात काम.. काय? कधी येताय?"

"येतोच लगेच" म्हणत त्याने फोन ठेवला.

कालिंदीने तात्यांच्या नकळत डोळा मारला मला. तात्यांनी चक्क टाळी दिली मला! एक गड तर सर झाला. आता पुढे बघू. मी म्हणाली ना, एकदा तो भेटलाना की पुढे मी सारे बघून घेईन!

प्रेम थोड्याच वेळात पोहोचला. किती दिवसांनी पाहात होती त्याला मी. माझ्या काळजाचा ठोका चुकल्यावाचून राहिला नाही. त्या ठोक्याला जागच्या जागी बसवत मी म्हणाली,

'ही कालिंदी! कालिंदी कुरतडकर. मी हिला काकु म्हणते. ही त्या टीव्ही चॅनेलवर असते. हिला घ्यायचाय तुमचा मुलाखत .. नाही तुमची इंटरव्ह्यू .. नाही तुमची मुलाखत!"

"नमस्ते. मी कालिंदी. सदासर्वदा चॅनेलवर आपले स्वागत आहे."

कालिंदी चक्क चॅनेलचे नाव चुकली! पण विद्रोहात मग्न प्रेमला कुठल्याच चॅनेल्सची नावे ठाऊक नसल्याने काहीच बिघडले नाही. इतक्यात तात्या म्हणाले, "तुम्ही संपवा तुमचे काम. झाले की बोलवा!"

वा! तात्या तर काहीच न करता गेले. कालिंदी आहे .. मी आहे आणि तो! कॅमेरा? तो आणायला आम्ही विसरलोच! मिलिंदा नसल्याने ही गडबड झालीय! तात्पुरता मोबाईलमध्ये रेकॉर्ड करता येईल .. मी इमर्जन्सी प्लॅन बनवला मनातल्या मनात. कालिंदीला बाहेर बोलावले.. म्हटले, "कॅमेरा कुठे? आपण मोबाईलमध्ये करू रेकॉर्ड. नावापुरता तरी करायलाच लागेल!"

हे बोलत असतानाच प्रेम उठून आमच्या मागे येऊन उभा राहिला, म्हणाला, "काय नावापुरता करताय?"

"काही नाही. चला इंटरव्ह्यू घेऊ!"

"नावापुरता?" तो हसत म्हणाला .. विनोदी विद्रोही ना तो!

कालिंदी बसली. मी मोबाईलचा कॅमेरा आ‌ॅन करून बसली. कालिंदीने सराईतपणे प्रश्न सुरू केले.. बाकीचे सांगत नाही पण महत्त्वाचे सांगते ..

कालिंदी : तुमची भूमिका नेहमीच अाक्रमक राहिली आहे. तर तुमच्या घरी.. तुमच्या पत्नीस ही भूमिका पटते का?

मी टवकारले कान.

एक क्षण विचार करत प्रेम म्हणाला, "विद्रोही लेखकास असले काही पटत नाही नि परवडतही नाही .."

"म्हणजे?"

"समाजसंस्थेचे बेगडी नियम उधळून लावतो अाम्ही. आमच्या प्रत्येक श्वासात असतो तो द्रोह.. आम्ही क्षणोक्षणी जगतो तो विद्रोह!"

"पण तुमच्या पत्नीला पटते ते सारे?"

"पत्नी? लग्नसंस्थेतील नियमांत मी स्वत:ला कुठेच बसवू शकत नाही. त्यामुळे न रहेगी पत्नी न बजेगी उसकी बीन!"

बापरे! इतकेच नाही, तर अजून काही काही विचारले तिने, पण ते पुस्तकाबद्दल.माझे लक्ष उडाले! एक चांगली गोष्ट म्हणजे याचे लग्न झालेले नाही .. आणि वाईट गोष्ट .. हा म्हणतो याचा लग्नसंस्थेवर विश्वास नाही! ज्या गोष्टीवर विश्वास नाही तीच करून पाहण्याचा विद्रोह करण्यास याला भाग पाडणे हे टीव्हीवरच्या मुलाखतीवर बोलावण्याइतके सोपे नाही! पण ते सिनेमात काहीतरी म्हणतात तसे, हमने भी कच्ची गोलियां नहीं खाई की खेली है! मी म्हटले, अब आएगा मजा. जितके कठीण काम तितके मोठे आव्हान.. आणि हा चॅलेंज मला!

मुलाखत संपली. कालिंदी म्हणाली, "मी जरा फोन करून सांगते चॅनेलवाल्यांना".. म्हणून समंजसपणे बाहेर गेली. मी आणि प्रेम उरलो केबिनमध्ये. मी पुढची स्ट्रॅटेजी ठरवण्याआधी महत्त्वाचे हेच की प्रेमशी भेट होत राहणे. त्याशिवाय त्याच्या वाकड्या शेपटास सरळ करणे शक्य नाही! तेव्हा आता फक्त पुढच्या भेटीची तजवीज करणे!

"तुमचा फोन नाही आला. ते दुसरे पुस्तक.. पहिले प्रकरण?"

"हो ना! राहिले."

"आणि मी फोन केलेला .."

"ओह.. माझा नंबर बदलला. काय आहे जग बदलण्याची गोष्ट करणाऱ्याने कमीतकमी फोन नंबर तरी बदलत राहायला हवा की नाही? आणि जळगावहून माझे आबा म्हणजे वडील आलेले. कालच गावी गेले. थोडा बिझी होतो मी!"

"पण तात्यांचा फोन तुम्ही झटक्यात उचललात?"

मी त्याच्या शेपटावर पाय देते की काय असे वाटून मी सावरून घेत बोलली, "त्यामुळे बरे झाले. आजची मुलाखत झाली!"

मी हिंदीतला मुलाकात शब्द वापरायला हवा होता पण मुलाखतच बोलली.

"हो. त्यांचा फोन न उचलून कसे चालेल. माझे पुढचे प्रकाशक आहेत ते!"

चला. याबाबतीत तरी विद्रोह नाही म्हणून नि:श्वास टाकत बोलली मी, "तात्या त्यांच्या आ‌ॅफिसची कामे सांगतात मला. त्यांचे फोन मी करते ना.. कितीतरी. एकटे तात्या बिचारे किती काम करणार? तुमचा तो नंबर द्या ना.. जो तुम्ही उचलता.. आणि माझा नंबर सेव्ह करा.. केअर आॅफ रंगढंग प्रकाशन.. " आणि एकाएकी सूर बदलत म्हणाली मी, "कराल ना प्लीज?"

एखादा तरूण कितीही विद्रोही म्हणत असला स्वतःला तरी त्याच्यासमोरच्या तरूण मुलीच्या अशा आर्जवी बोलण्याला टाळू शकेल? अर्थातच नाही! त्याने आपला तो खास नंबर दिला. माझा नंबर पण नीट सेव्ह करून घेतला. एक मोठे काम झाले म्हणत मी खुश झाली. तात्यांना भेटून प्रेम निघून गेला.

आणि हळूच डोकावत कालिंदी आत अाली.. आणि पाठोपाठ .. तात्या.. आणि भिंदि! कालिंदीच्या त्या मालिनी अवताराबद्दल सांगायचं मी विसरलीच होती तिला. आणि आता समोर कालिंदी आहे! आणि भिंदिसुद्धा! काय होणार आता? माझ्या छातीचे ठोके जोरात पडायला लागले! तात्या समोर बसलेले. कालिंदी आपली बॅग उचलत म्हणाली, "मला निघायला हवे प्रीती. कामे खूप आहेत."

"ठीक मालिनी. निघ तू." मी म्हणाली.

कालिंदी इकडे तिकडे मालिनी कोण म्हणून बघायला लागली.

"प्रीती, अगं ती कालिंदी .." तात्या म्हणाले.

"बऱ्या भेटलात तुम्ही.. तुमचाच नंबर मागत होतो तर या म्हणतात त्या ओळखत नाही तुम्हाला .."

"अहो ओळखत नाही कसली. घरी आली."

"तात्या ती मालिनी.. हिची जुळी बहीण!"

"जुळी? कधी झाली?"

"काय तात्या .. जुळी हिच्या बरोबरच नाही का जन्मणार? ही मालिनी. कालिंदीऐवजी हीच आली."

"का हो.. तुम्ही तर म्हणाल्यात त्या एकमेकींचे तोंडही पाहात नाहीत."

कालिंदी तशी हुशार आहे. 'त' वरून ताकभात कळेल अशी. ही माझीच काही तिकडमबाजी हे तिला लगेच कळले. सावरून म्हणाली,

"काय आहे काका, कालिंदी नि मी म्हणजे तुझं माझं जमेना नि तुझ्यावाचून करमेना.. पण बिचारी तापाने फणफणलीय. सख्खी बहीण माझी, भांडली तरी रक्त एकच ना? मी म्हणाले, मीच जाते तुझ्या ऐवजी, कुणाला कळणारही नाही!"

"पण धर्मेंद्रला तर कळत असेलच ना?"

"हेमा.. मालिनी आणि धर्मेंद्र! काका तुम्हाला बरे माहिती हिच्या होणाऱ्या नवऱ्याचे नाव?" काकुला हिंट मिळावी अशा बेताने बोलली मी.

"अहो, मला कसे माहिती असणार? तुम्हीच सांगितले ना सकाळी?"

भिंदि बोलून गेला नि काकुला आपोआप उलगडा झाला..

"काय आहे साहेब, कालिंदीला सारे लगेच पोचवायचे आहे.. मी निघते. आणि आज धर्मू पण येणार आहे घरी.."

"अहो पण माझा इंटरव्ह्यू ..?"

भिंदि बोलेतोवर ती निघालीच.. मी म्हटले, "नीट जपून जा. कालिंदीची काळजी घे. तापात आहे बिचारी."

काकु निघून गेली. भिंदि डोके खाजवीत बसला. तात्यांना त्याला जगदाळे न्यूज द्यायची असावी, कारण तात्याच म्हणाले, "मने, तूही निघ आता."

पडत्या फळाची आज्ञा घेऊन मी बाहेर पडली. जगदाळेंच्या बातमीपेक्षा भिंदिपासून वाचणे सध्या गरजेचे होते. भिंदिचा एक किल्ला आज दुसऱ्यांदा लढवलेला मी. भिंदि जास्त स्मार्ट असता तर तिथेच पकडले असते मला. त्या धर्मेंद्राच्या गडबडीत तो काकुचा नंबर घ्यायला ही विसरला. आता भिंदिला टाळणे हेच एक पथ्य!

हळूहळू चालता चालता माझ्या डोक्याची चक्रे जलद चालायला लागली. थोडा गोंधळ झाला खरा पण दिवसाचा हिशेब मांडायचा तर..

जमा..

१ ते १०. प्रेमची भेट.

११. जगदाळे म्हणजे प्रेमचेच वडील असण्याची शक्यता वाढली. जळगाव .. वडील.. कालच गेले परत.. इथवर धागा जुळतोय!

१२. माझ्याकडे प्रेमचा नंबर आहे आता. डायरेक्ट उचलेलच तो.

नकारात्मक..

१. भिंदि.. छे त्याचे कशाला नकटे नाक खुपसवावे इथे. भिंदि कटाप! असे पण मी भिंदिला का घाबरतेय? त्याला मीच सुलताना हे ठाऊक नाहीए. कालिंदी नि तिचा तो इंटरव्ह्यू .. मिलिंदा मॅनेज करेलच. म्हणजे भिंदिला घाबरायचे कारण नाही. यापुढे काकु काय त्याच्या संपर्कात येत नाही!

म्हणजे आजचा दिवस नफ्याचा! पुढचा प्लॅन बनवायला लागेल! रात्री विचार करेन. सकारात्मक अगदी. स्वामीजींची कृपा!