प्रीतीची 'प्रेम'कथा - 21 Nitin More द्वारा फिक्शन कथा मराठी में पीडीएफ

Featured Books
श्रेणी
शेयर करा

प्रीतीची 'प्रेम'कथा - 21

२१

जय मंचरजी

अर्थात

प्रेमला धक्का!

पुढे दोन तीन का कितीतरी दिवस असेच गेले. असेच म्हणजे कसे विचारू नका. एकेक दिवस खायला उठायचा. संध्याकाळी उगाच बाहेर पडायलाच हवे. नाहीतर त्या जाॅबचे काय झाले विचारेल आई. मिलिंदा मेसेज पाठवायचा, 'समस्या हल करनेकी हमारी हर संभव कोशिशें जारी हैं. कृपया सहयोग करें.' एकतर त्याचा बाॅस बाहेर गेलेला म्हणे. तो येईतोवर काहीच करणे शक्य नाही. मग काही विरह गीते ऐकत पडून राहायची मी. संध्याकाळी कालिंदीकडे जाऊन वेळ घालवायचा. हे किती दिवस चालणार? न जाने क्यूं होता है ये जिंदगी के साथ.. अचानक ये मन.. लेकरके उसकी याद.. छोटी छोटीसी बात.. त्याच्या बरोबरचे ते क्षण आठवत होते.. उगाच म्हणत .. तुझ बिन जिया उदास रे.. आ जा!

एके दिवशी सकाळी उठली नि मिलिंदाचा फोन आला. आधल्या रात्रीत उत्तर सापडले असणार त्याला. नक्कीच. म्हणाला, "दहा वाजेपर्यंत ये. माझ्या आॅफिसात! बाकी आल्यावर बोलू."

बाकी बोलू..? नक्की उत्तर आहे की नुसतेच बोलू? सद्य परिस्थितीत करण्यासारखे अजून काय होते?

मी पोहोचली तर मिलिंदा डायरेक्ट त्याच्या बाॅसकडे घेऊन गेला. मंचरजी म्हणाले, "डिक्रा, तू चिंता नको करू. आपनलोक कायतरी करू. चाय पी. मग बोलू आपन."

चहा येईतोवर ते आपले काम करत राहिले. मिलिंदा पण बिझी होता. नक्की काय करणार हे दोघे कुणास ठाऊक. थोडे मोकळे झाले तसे मंचरजी माझ्याकडे वळून म्हणाले, "ह्ये बग प्रीती.. तेचं काय हाये.."

हे बोलेतोवर आत त्याचा प्यून आला. कुणीतरी बाहेर आलेय सांगत..

"सर, मी बाहेर थांबू.. माझ्यामुळे तुमचे काम.."

"अरे, नाय डिक्री .. तू एक कर.. आतल्या रूममंदी बस. अन बोलवत नाय तोवर भायेर यू नको. तुला आत सगलं दिसल बी सी सी टीव्हीत. अन आयकू पन यील. पन भायेर यू नको."

"ओके सर.."

"ध्यानमंदी ठेव. आत बसून ऱ्हा. डोन्ट कम आऊट..नायतर दिसला तुजा प्रेम नि धावली भायेर! मी बोलवेल तो परेंत आतमंदीच बस"

"यस सर.."

बाहेर कोण आले असावेत? प्रेम तर होताच.. नि सोबत.. भिंगारदिवे! मला कळेना काय होतेय ते. प्रेम ठीक, पण भिंदिसुद्धा? मिलिंदाचा मोठाच प्लॅन दिसतोय काहीतरी.

बाहेरून आवाज येत होता. "अरे भिंगार्दिवा.. ये. मस्त वाटले साला तुला बघून"

"काय फिरोज.. तू बोलावणार नि मी येणार नाही? आठवतात काॅलेजचे दिवस .."

"साला ते कसे विसरणार.. बरे का यंग मॅन.. व्हाॅट्स युवर नेम.. प्रेमानंद .. यस्स.. यू आर देवानंद्स ब्रदर! जस्ट अ जोक हां. साला मी काय म्हणते, लाईफ हैना तर हसत ऱ्हायला पाह्यजे. साला डोन्ट बी सीरियस! सीरियस म्हणजे काय रे भिंगार्दिवा.. "

"गंभीर!"

"हां. अरे काॅलेजला होता तवा बी मदत करायचा हा मराठीसाठी. त्यामुळे थोडा थोडा यायचा. आन आता बायडी शिकवते घरला. यंग मॅन.. व्हाॅट विल्यू हॅव.. चाय, काॅफी?"

मंचरजींनी बेल वाजवली. प्यून आत आला.. तीन काॅफी म्हणून आॅर्डर देत म्हणाले,

"तर सांगत काय होता.. माजी बायडी मराठी आहे. साला या भिंगार्दिव्याला ठाऊक. काॅलेजक्वीन. तिला पटवायला ह्या सगळ्यानी केटली मेहनत घेतली. तर तुला गंमत सांगते.. आम्ही साला रोज झगडा करते, पण ते मराठीत!"

इतक्यात भिंदि उठला, "मी येतो फिरोज दहा मिनिटांत .. तू बोल."

"अरे चाय काॅफी तो पी.. साला तूने तो पी ही नहीं!"

"नाही, मी येतो जरा, आॅफिसला फोन करून"

भिंदि बाहेर गेला आणि मंचरजी सुरू परत..

"बोल यंग मॅन.. आय वाॅज इंप्रेस्ड हां साला. तू वार्ता चांगली करते. टाॅप. मीच बोलला भिंगार्दिव्याला, घ्यून ये त्याला. लाईक टू मीट यंग टॅलंट.. आमच्या टायमाची याद येते. काय साला दिवस होते.. वंडर्फूल.. वायफ काय करते तुझी? अरे साला, एक बात माज्या ध्यानात आली, तुम्ही लोक आले न मीच साला बोलतोय. तुला तर मी बोलू दिलाच नाही .."

"वाईफ नाही सर.. नाॅट मॅरीड"

"यट.. नाॅट यट बोलना. कर साला. मॅरीड झाला की साला सगळ्या गोष्टी साठी ब्लेम करायला वायफला आपन न आपनला ती मिळते. सच्चु. अरे हा चॅनलचा काम मंजी डोक्याला ताप. घरी गेला ना की शारदा बोलते, फिरोज, रेस्ट घे थोडा. साला तिथे आपला थकवा पळून जाते. अरे हां, तुज्या बुकातली हिराॅईन बी शारदाच है ना? साला शारदा नावाच्या पोरी हिराॅईन असतात का नाही.. बरे यंग मॅन.. वाईफ नाय पन गर्लफ्रेंड कुटाय तुझी.."

"सर.. नाही .."

"नाऊ.. डोन्ट टेल मी.. तुझ्यासारख्या यंग हॅंडसम डॅशिंग बाॅयला गर्लफ्रेंड नाय. साला आजकालच्या पोरींना काय समजते की नाय काही. इक्ता चांगला पोरगा साला असाच सिंगल .."

"सर काय तुम्ही.."

"एक विचारू काय.. म्हणजे गर्लफ्रेंड नाही म्हणून .. माज्या बायडीच्या रिलेशनमंदी हाय एक मुलगी.. मराठीच तुज्यासारखी"

"नाही सर.. म्हणजे मला लग्नच नाही करायचेय म्हणून!"

"ओ हो! साला! हां तो भिंगार्दिवा बोलला मला, तुला सोशल रिफाॅर्मर बनायचे. बन बन साला. पन एक सांगते, कितीबी भांडन झाला ना तर साला वाईफ ती वाईफच असते. दुसरा कोन तेची जागा नाय घेऊ शकत. अरे आमच्या टायमाला होता एक ब्रह्यचारी. साला चालीस वरीसचा झाला तवा वाटला त्याला कोन तरी पार्टनर पाह्यजे. तवा वेल निघून जाते ना. साला नंतर बसला रडत. ते साला त्याचे नशीब, हा भिंगार्दिवा न मी, दोघांनी शोदली पोरगी तेच्यासाठी. लगन कर तू.. काय रे.. तुला विचारतो.. सगल्यात मोठा रिफाॅर्मर कोन जाला?"

"आंबेडकर, फुले.."

"त्यांनला तर होत्या ना बायड्या. अँड इफ आय अॅम नाॅट राँग, त्या बायड्यापन त्यांच्यासारख्याच काम करायच्या. मला काय वाटते ना या बायड्या आपली ताकत अन हिंमत.. तुला काय वाटते..?"

"मला? तसे पटते सर.. पण"

"अरे, साला पन बिन करू नको.. साला अजून तुजा उमरच काय? सांगतो तू तर भेटवू मुलगीला?"

"नाही सर.. म्हणजे तशी एक आहे.. पण मीच म्हटले उगाच .."

"काय.. बोलते तू.."

"तशी गर्लफ्रेंड नाही सर.. पण मी असा.. माझी नोकरी टिकत नाही .. पण लग्न म्हणजे उगाच बंधन.."

"ओ.. देअर यू आर साला. करेक्ट. पण तू साला सुरी वापरते ना.. नि मॅच बाॅक्स. नीट नाय वापरली तर डेंजर. तसा हाय लगनाचा. बंधन तर हायना. तुला बी न तिलाबी. बायडीला सांभाळले की ती तुला सांभाळेल. साला लवकर बोलून टाक तिला. काँपिटिशन खूप साला. दुसरा कुनी पळवून नेईल."

"नाही सर. कुणी नाही. पण तुम्ही म्हणता ते खरे आहे. लग्नाने कामात मदतच होईल .."

"पटलं ना तुला .. तर लवकर बोल तिला.. काॅलेजचा एक सिली जोक आटवला.. लवकर म्हणजे लव.. कर! समजला की नाय?"

"काय सर तुम्ही.. "

"अरे बोलला ना मी.. अभी तो मैं जवान हूं.. साला दुनिया बदल पण रडत नाय.. हासत. आनि हासायचा तर बायडी हवीच.. आनि रडायचा तर हवीच हवी.. "

"होय सर. खरंय तुमचे.."

"अरे ज्या कामाला बोलावला त्येच्य विसरला साला.."

"कसले काम सर?"

"अरे तुझे ते बुक, पुसतक.. ज्याचा इंटरव्ह्यू जाला, ते वाचायचे हाय.. टीव्हीवर नवा प्रोग्राम. साला चॅनलवर कसला स्टँडर्डचा प्रोग्राम पायजे.. तुझा बुक साला हिट! भिंगार्दिवा बोलला मला. दोगं मिळून वाचायचा साला. एक तुजा आवाज नि दुसरा फिमेल व्हाॅईस. नाही म्हनू नको हां. साला क्वालिटी प्रोग्राम देत नाय म्हनून लोक बघत नाय.. आन आपन लोगानला ब्लेम करते, टीआरपी नाय म्हनून. करशील ना?"

"सर तुम्हाला कसं नाही म्हणू."

"नाय म्हनूच नको ना! तुज्या ओळखीत हाय का कुनी अशी वाचनारी..?"

"नाही सर.. कुठून असणार .."

"साला काय तू.. गर्लफ्रेंड नाय.. मुलगी पन ओळखीची नाय.. पन खरं सांग साला, खरंच कुणी नाय की या ओल्ड मॅनला सांगत नाय तू. तसा अभी तो मैं जवान हूं समजला ना.. एवढा हँडसम विदाऊट गर्लफ्रेंड.. पटत नाय. आजकाल पोरींना अक्कल कमी हाय साला. ठीक.. एक मुलीला बोलावून ठेवलेय.. दोघे मिळून थोडी प्रॅक्टिस कर. मंग रेकॉर्ड करू."

"यस सर. तुम्हाला भेटून खूप बरे वाटले सर. आजकाल मोठी माणसं फक्त उपदेश करतात. नो वन अंडरस्टँड्स अस."

"अरे साला, तेचा काय हाय, आमच्या वखताला म्हंजी माझ्या वख्ताला माजा ड‌ॅडी लवकर गेला. सांगायला कुनी नाय. पन आमचा एक टीचर होता.. भडकमकर सर.. फाईन सोल. एकेका पोराला घेऊन समजून सांगायचा. त्याचा सपोर्ट होता.. आज मी पण तेच करते.. तरूण पोरा लोक साला थोडे कन्फ्यूज असनारच. तेनला समजून सांगायला पायजे की नाय.. ते जाव दे.. तू रिहर्सलला जा. मी सांगते मिलिंदाला."

मंचरजींनी मिलिंदाला आत बोलावून घेतले, म्हणाले, "ती पोरी अाली की नाय?"

"आली सर.."

"काय नाव तिचे.."

"प्रीती सर. तिला काम हवे होते. बरी वाटतेय. एकदा ट्रायल घेऊन टाकू!"

"ठीक. जा तू. रेकॉर्डिंग रूम मध्ये बसव या यंग मॅनला. तिला बी बोलव."

मी आतून प्रेमच्या चेहऱ्यावरचे भाव पाहात होती. मंचरजींची मात्रा लागू पडेलसे दिसत होते.. प्रेमला घेऊन मिलिंदा निघून गेला. मला मचरजींनी बोलावले बाहेर ..

"पोरी, आता पुढे तू बग.. पण धुतलाय त्याचा ब्रेन.. ते ब्रेनला काय बोलते तुज्या मराठीत?"

"मेंदू सर.."

"हां तर मेंदू धुतलाय. आजच काम तमाम कर"

"यस सर"

"नुसता यस सर नाय.. पेंडा पाटव एक किलो..

"यस सर.."

"पारसी डेरीचा.."

"यस सर."

इतक्यात माझ्या मोबाईलवर प्रेमचा मेसेज आला, 'मिसिंग यू.. आपण भेटू शकतो का?'

एकूण बाण जागी बसलेला दिसतच होता.. फक्त आता हलवून खुंटा बळकट करणे बाकी होते!

बाजूला रेकॉर्डिंग स्टुडिओ होता. प्रेम येऊन बसलेला. मी त्याला मेसेज पाठवला, जणू मला माहिती नाही तो तिथे आहे अशा प्रकारे .. अर्थातच. 'बिझी आहे सध्या. नंतर फोन करते!'

मी आत गेली. साळसूदपणे समोर बघत पुढे गेली जणू त्याला पाहिलेच नसावे. मी पुढे जाताच त्याची हाक आली, "प्रीती, तू?"

मी वळून मागे पाहिले .. तोच तो झोप उडवणारा चेहरा!

"प्रेम तू? तू पाठवलेलास मेसेज आताच! काय दुनिया किती छोटी आहे नाही?"

"तुला पाहून किती बरे वाटतेय सांगू.. "

मिलिंदा आलाच तितक्यात. म्हणाला, "तुम्ही एकमेकांना ओळखता?"

"हो.. शी इज माय फ्रेंड.. गुड फ्रेंड.. बेस्ट वन.. अँड इन फ‌ॅक्ट नाऊ फियान्सी!"

"वाॅव! काँग्रॅट्स!"

मिलिंदाने हळूच डोळा मारला मला.

मिलिंदाच म्हणाला, "काहीतरी बिघडलेय स्टुडिओत. बाजूलाच कॅन्टिन आहे. तिकडे बसा. बोलावतो नंतर!"

आम्ही बाजूच्याच कॅटीनमध्ये बसलो जाऊन.

"मी बोलत नाही तुझ्याशी.."

रागावून मी बोलली. आपल्या माणसावरच रागावता येते ना हक्काने! हा माझा पहिला राग!

"साॅरी, प्रीती. साॅरी. कान पकडून. तुला दोन आईस्क्रीम घे पण राग विरघळून जाऊ देत.."

"हं.. पण अशी कशी उपरती झाली साधुमहाराजांना?"

"काय सांगू .. गेले काही दिवस तुझ्या शिवाय कसे काढले मलाच ठाऊक.. आणि आता इकडे ते बाॅस आहेत त्यांनी मोठे लेक्चर दिले .. त्याने मार्ग सोपा झाला. व्हेरी नाईस अँड काईंड मॅन. नाहीतर मला वाटते उद्या किंवा परवा पर्यंत मी पांढरे निशाण फडकवलेच असते.. आमची रसद तोडली तर किती वेळ तग धरणार मी?"

"रसद?"

"प्राणवायू! तू."

"चल. खोटे सांगतोयस.."

मग खूप वेळ आम्ही बोलत बसलेलो. स्टुडिओ काही रिपेयर झालाच नाही. तसा होणारच नव्हता तो. न बिघडलेल्या गोष्टी कुणी कशा करणार रिपेअर, हो की नाही?

मी त्याला त्याच स्नोमॅन मध्ये तेच स्ट्राॅबेरी आईस्क्रीम खाऊ घालण्याची शिक्षा केली! आणि त्याच समुद्रकिनाऱ्यावर बसून प्रेमाच्या आणाभाका घेतल्या आम्ही!