प्रीतीची 'प्रेम'कथा - 23 Nitin More द्वारा फिक्शन कथा मराठी में पीडीएफ

Featured Books
श्रेणी
शेयर करा

प्रीतीची 'प्रेम'कथा - 23

२३

सुरूवातीचा शेवट

अर्थात

घोड्याची गंगेत अंघोळ!

'गुड मा‌ॅर्निंग!

स्वप्ने पहायला शिका. स्वप्नांसाठी झोप आवश्यक.. तेव्हा परत झोपी जा.. नवीन स्वप्ने पहा.. सुप्रभात!'

या मोबायल्याची कमाल पहा. त्याने जगच नाही तर दिवसाचे प्रहरदेखील आणलेत जवळ. सकाळसकाळी मी उठली..

रीतसर आळस झटकून. आळोखेपिळोखे दिली मी. समोरच्या मोबाईलात टुणss आवाज आला. हा माझा खास अलार्म म्हणावा.. त्यात आलेला तो गुड मॉर्निंगवाला मेसज!नुसता गुड मॉर्निंग नाही तर ज्ञान वाटप ही त्यात.

परत झोपी जा म्हणे! मला काय, मी झोपते! झटकलेला आळस मी परत गोळा केला. गेलेली झोप परत डोळ्यांत जमा केली. पापण्या घट्ट मिटून ती परत उडून जाऊ नये म्हणून पडून राहिली.. स्वप्ने पहायची आता माझ्यावर जबाबदारी होती. त्यासाठी झोपणे जरूरी होते.

शुभ प्रभातीचा तो संदेश.. संदेश नव्हे तर आदेश होता. प्रेमआदेश! त्या संदेशाने तर रात्रीच्या प्रहरास सकाळी ढकललेले. माझा प्रेम आहेच तसा विनोदी! सुप्रभाती निद्राधीन होण्याचा संदेश. आणि तो मी टाळणार तरी कशी? झोपली झाले. स्वप्न पाहायची तर झोपायला तर हवे.

मीच नाही.. या प्रीतीचे प्रेम.. आणि या प्रीतीचा प्रेम देखील .. हेच तर सांगतोय! म्हणजे मी त्याच्याच बद्दल सांगतेय हे. सांगू म्हटले की काय काय सांगू कळत नाही. प्रीतीचा प्रेम! किती छान वाटते ऐकायला! प्रीतीचे प्रेम आणि प्रीतीचे प्रेम.. दोघेही एकच!

झोपली मी. स्वप्न पडते कसले?

तर तेच! प्रेम आणि प्रीती. स्वप्नात खुद्द बिस्मिल्लाखान सनई वादन करताहेत नि मी सलज्ज का काय म्हणतात त्या वदनाने माळ घालतेय. मध्ये आंतरपाट तसाच! आणि माझ्या प्रेमचा चेहरा पण दिसला नाही नीट. स्वप्नाची फ्रेम बिघडली वाटते. तरी पडले स्वप्न ते चांगलेच झाले. स्वप्नात तरी प्रीती प्रेमची झाली. उगाच शंका काढू नका. नीट नाही दिसला चेहरा म्हणून काय झाले.. आतंरपाट तसाच होता.. म्हणून काय झाले.. तो प्रेमच होता. दुसरा कुणी कसा असेल? इतक्या तपस्येनंतर? आणि मी बरी प्रेमला असेच सोडून देईन?

हे सगळे आताचे! इतक्या साऱ्या गडबड घोटाळ्यातून शेवटी घोडे न्हाले गंगेत. पण त्या आधी अजून धक्का बसायचा बाकीच होता. धक्का म्हणजे तसा भिंदिसारखा. भिंदिला सगळे ठाऊक होते म्हणे! तरीही त्याने कधी दाखवले नाही. आणि खलनायक तर तो नव्हताच कधी, उलट मदत त्यानेच केली मला! आणि प्रेमला ही! खरी गंमत तात्यांची आणि आईची. तात्यांना तो पहिल्या दिवशीच पसंत होता! म्हणजे घरी जेवायला आला तेव्हापासूनच! आईही म्हणालेली, मुलगा चांगला आहे! फक्त प्रेमची खात्री नव्हती कोणालाच! प्रेम ही तेव्हाच पडलेला प्रेमात, आणि मी? त्यामुळेच तर एवढे रामायण घडले! आणि आता भिंदिने तात्यांना समोवार मध्ये त्यादिवशी आणलेले, आमची जोडी दाखवायला. माझे सारे जाॅब नि कसल्या कसल्या थापा.. सारे त्यांना ठाऊक होते! म्हणजे गंमत अशी झाली ना, की सगळ्यांनाच सगळे ठाऊक पण एकमेकांना ते ठाऊक आहे की नाही हेच नव्हते ठाऊक! ठाऊक नाही मला हे वाक्य व्याकरणदृष्ट्या योग्य आहे की नाही.. पण माझा प्रेमातला चोरटेपणा मात्र आई तात्या नि भिंदि तिघांनाही ठाऊक होता! आणि तो बहुधा सर्वांनीच मान्य केला असावा.. तात्या न रागावता म्हणाले ही, "मने, नावाची मांजरच तू. डोळे मिटून पितेस दूध. तुला वाटणारच कोणी पाहात नाहीए. पण दिसत मात्र होते सर्वांनाच. पण सर्वांना दिसते हे तुला दिसत असेल तर ना!"

कुठून सुरू झाली माझी कथा नि कशी इथवर येऊन पोहोचली! प्रेम नि माझ्या जोडीमुळे सगळेच खुश झाले. त्याच्या घरची एक चिंता मिटली. तात्या नि आईला तर तो आवडला होताच. थोडक्यात गंगेत सचैल स्नान झाले घोड्याचे! आता फक्त लग्नाची तारीख वार ठरायचे बाकी आहे. या विद्रोहकुमाराच्या कलाने होईल सारे. त्यामुळे मुहूर्त वगैरेची भानगड नाही. नसता फाफट पसारा ही नको म्हणाला तो.. नको तर नाहीच! सारेच घाबरतात त्याच्या विक्षिप्तपणाला! पण तो खरेतर विक्षिप्त नाहीच. न पटणाऱ्या गोष्टी नाही करत तो इतकेच.. आणि करूही देत नाही. मला पटलेय ते. थोड्याफार विचित्र वागण्याशिवाय कुणी लक्ष देत नाहीत आणि आपले म्हणणे खरे करता येत नाही. बदल घडवायचा असेल तर वाईटपणा घ्यायलाच हवा. यालाच कुणी आपले घोडे दामटणे म्हणत असेल तर.. पण आता याच घोड्याने केलेय गंगेत स्नान!

प्रेम आता दुसरे पुस्तक लिहायला घेतोय. म्हणजे आधीचे ते दिवस सरले मागे. पुस्तकाच्या नावाखाली भेटायचे. आता भेटतो आम्ही. प्रेमाच्या तर मारतोच गप्पा पण पुस्तकाबद्दलही करतो चर्चा. मी पण सुधरलीय. म्हणजे वाचते तो लिहितो ते.. न झोपता. पण त्याचे पहिले वहिले.. तुंबाऱ्याची गोष्ट वाले पुस्तक आम्ही दोघांनी मिळून टीव्हीवर वाचन करेपर्यत वाचले नव्हते! पण मी म्हणाली ना.. कमलदलात अडकलेला भुंगा, त्यासारखे झालेय माझे! ज्या पुस्तकांपासून मी दूर होती त्यांच्यातच अडकलीय आता मी! आणि तेही जाणूनबुजून! आणि आनंदाने!

लवकरच आम्ही विवाहबंधनात अडकू.. ती प्रेप्रीप्रीबंस कधीच बरखास्त झालीय. मंचरजींना आम्ही जोडीने एक किलोभर पारसी डेअरीचे पेढे देऊन आलो. पाया पडलो त्यांच्या तर डोळ्यांत पाणी आले त्यांच्याही. आमची जोडी जुळावी म्हणून कित्येकांनी काय काय केले.. सर्वांचे चीज झाले..

आता पुढे काय? आणि ते सुखाने नांदू लागले यावर

ही प्रेमकथा प्रीतीची समाप्त होतेय.. खरे तर नव्याने सुरू होतेय! दिसते मजला सुखस्वप्न नवे.. आणि काय!